युगांतर - आरंभ अंताचा! भाग ४२
"भीम, तुझ्या बंधुंना सांग की बाहेरून लाकडे आणू नका सध्यातरी. तू काल आणलेली चार झाडे अजून पडली आहेत पडवीत. ती पुरतील अनेक दिवस."
भीम ओसरीवर बसला होता. त्याच्या हातातल्या तृणपात्याकडे नजर लावून एकाग्रपणे बघत होता. बहुदा कुंतीचे शब्दही त्याच्या कानापर्यंत पोचले नसावेत. त्याची तंद्री भंग करायला हे पुरेसे नसावे.
कुंती मात्र दुपारच्या भोजनाची तयारी करण्यात व्यस्त होती. पुत्रांनी धान्य आणले की ते शिजवण्याकरता आणि अन्न स्वादिष्ट बनवण्याकरता बाकीची तयारी असायला हवी, म्हणून तिची लगबग सुरु होती आणि शक्तीचे काम म्हणल्यावर भीम शिवाय पान हलत नसे. तिने पुन्हा भीमला हाक मारली.