आईबाबांना मी नेहमीच पूजा पोथी पाठ करतांना पाहिल. श्लोकच्या श्लोक पोथ्याच्या पोथ्या माझ्या नुसत्या ऐकुन पाठ आहेत. दर वेळेला मंदिरात प्रवेश केला की खूप प्रसन्न वाटत. तिथला गंध, मृदंग, मंजुळ घंटानाद; मंदिर जुनं आणि पाण्यातिरी असेल तर मन अजून प्रफुल्लीत वाटत. पण तिथे आलेले भक्त बघितलेत की मला जाणवत ते रिकामपण. मूर्तीच्या रुपात भक्तांच निर्मितीकाराला बघण हाच कर्ता धर्ता असा अतूट विश्वास त्यांच्या डोळ्यात बघितला की ती धुंदी, ती दृढ श्रद्धा माझ्यात नाही ह्याचा मला खेद वाटतो. त्या नितांत भक्तीचा अनुभव घेण निश्चीतच विशेष असेल पण त्याचा माझ्यात लवलेशही नाही.
खूप दिवसांनी एक विचार करायला भाग पाडणारा चित्रपट पाहिला. ओह माय गॉड ..!!
वादाने उत्सुकता वाढवली होतीच, तसेच मी देखील सतत सोयीनुसार आस्तिक नास्तिक असे पारडे बदलत असल्याने मला या चित्रपटात मांडलेले विचार माझ्या विचारांशी मेळ खातात का? किंवा माझे विचार चुकीचे आहेत आणि ते बदलायला हवेत का? हे जाणून घ्यायची उत्सुकता जरा जास्तच होती.
नास्तिक असुन तुला
दर्शनाला नेणारी मी
माझ्या इच्छेखातर
येणारा तू
हार-फुलांचा भाव करत
ताट घेणारी मी
दारातल्या भिक्षुकांना
मदत करणारा तू
रांगेत पुढे जाण्यासाठी
धडपडणारी मी
देवळाची सुबकता
न्याहाळाणारा तू
चिडुन नमस्कारासाठी
तुला खुणावणारी मी
देवळातली प्रसन्नता
अनुभवणारा तू
देवळातही चपलेची
काळजी करणारी मी
गरजुने नेली असेल
विचार करणारा तू
खरेच देव नक्की
कुणाला पावत असेल
माझ्यासारख्या आस्तिकाला
की तुझ्यासारख्या नास्तिकाला?