खूप दिवसांनी एक विचार करायला भाग पाडणारा चित्रपट पाहिला. ओह माय गॉड ..!!
वादाने उत्सुकता वाढवली होतीच, तसेच मी देखील सतत सोयीनुसार आस्तिक नास्तिक असे पारडे बदलत असल्याने मला या चित्रपटात मांडलेले विचार माझ्या विचारांशी मेळ खातात का? किंवा माझे विचार चुकीचे आहेत आणि ते बदलायला हवेत का? हे जाणून घ्यायची उत्सुकता जरा जास्तच होती.
कोणताही चित्रपट असो वा कथा असो, लेखकाला/दिग्दर्शकाला जो मुद्दा मांडायचा असतो तोच प्रेक्षकांच्या मनावर बिंबवण्यासाठी तो कथा अश्या काही वळणाने नेतो की आपल्याला तो त्याच्याच दृष्टीकोणातून विचार करण्यास भाग पाडतो. अर्थात हेच त्याचे खरे कसब असते आणि यावरच त्या कलाकृतीचे यश.. आणि म्हणूनच मी शक्यतो तटस्थपणे किंवा माझ्याच विचारांचा चष्मा चढवून त्याकडे बघायचा प्रयत्न करतो. त्या अनुषंगानेही तो चित्रपट बर्यापैकी पटला.. आवडला... पण खास आवडले आणि लक्षात राहिले ते त्यातील मिथुनदाच्या तोंडी असलेले शेवटचे वाक्य.. " दे आर नॉट गॉड लविंग पीपल.. दे आर गॉड फिअरींग पीपल..!!" ..
माझ्यासाठी चित्रपट या वाक्यावरच संपला... आणि त्यावरच डोक्यातले विचारचक्र सुरू झाले.
पहिलाच विचार मनात आला, मी स्वता कोण आहे?
आस्तिक की नास्तिक?
जर आस्तिक असेल तर गॉड लविंग आहे की गॉड फिअरींग?
आता ही नास्तिकत्वाची व्याख्या काय परीमाण लाऊन आपण बनवतो यावरच ते ठरवता येईल, पण एखाद्या देवभोळ्या माणसाला चिडवण्यासाठी किंवा खिजवण्यासाठी म्हणा, मी त्याच्यासमोर हटकून नास्तिक असल्याचा दावा करतो. अशी माणसे घरातच ढिगाने भरली असल्याने आमच्याकडे आस्तिक-नास्तिक हा वाद चालूच असतो.
वाडवडीलांचा पिढिजात व्यवसाय देवाच्या कृपेनेच चालू आहे यावर त्यांचा ठाम विश्वास. रोज न चुकता पूजा अर्चा केली जाते.. घरातही.. दुकानातही.. अगरबत्ती, धूप, सणासुदीला पेढे वगैरे, अगदी साग्रसंगीत... गॉड लविंग पीपल..!
पण त्याचवेळी यात काही चुकलेमाकले तर याचा फटका धंद्यापाण्याला बसणार ही चिंता असतेच.. आणि जेव्हा खरेच काही फटका बसतो तेव्हा देवाचेच काही करण्यात कमी तर नाही ना पडलो, त्याचाच तर कोप नाही ना झाला, हेच आधी बघितले जाते.. गॉड फिअरींग पीपल..!!
आई जेव्हा उत्साहात जेवण बनवून देवासमोर नैवेद्य ठेवते तेव्हा तिच्या कडे पाहून वाटते.. वाह.. गॉड लविंग पीपल..!
तेच नैवेद्यात एखादा मोदक कमी पडला वा तिला जे काही बनवायचे होते ते फिस्कटले तर तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकून ती घाबरीघुबरी होते.. नाह.. गॉड फिअरींग पीपल..!!
पण तीच आई जेव्हा मला भूक असह्य झालीय हे बघून देवाला नैवेद्य दाखवायच्या आधीच चार पुर्या देवासाठी बाजूला काढून चार पुर्या माझ्या पुढे करते तेव्हा मात्र मी कन्फ्यूज होतो की आता या आईला कोणत्या कॅटेगरीत टाकू..??
"आणि आता कसे ग तुझ्या देवाला हे चालते?" असे बोलून मी तिच्याशी वाद घालायला जातो, तेव्हा तुझ्या वाटणीचे पाप मलाच लागेल हा तिचा युक्तीवाद मला निरुत्तर करून जातो.. आणि मनात पुन्हा तोच प्रश्न सोडून जातो.. इज शी गॉड लविंग पीपल..? ऑर गॉड फीअरींग पीपल..?
स्वताचे नास्तिकत्व सिद्ध करायला जेव्हा मी मंदीराच्या बाहेर उभा राहतो तेव्हा माझ्यामते मी ना गॉड लविंग पीपल असतो ना गॉड फिअरींग पीपल...
पण रस्त्यात लिंबू मिरची दिसल्यास पायाने मुद्दाम ढकलून जाणारा असा मी जेव्हा त्या मंदीराच्या आवारातील एखाद्या फुलावर पाय पडल्यास ते पाया पडून बाजूला सरकावून ठेवतो... तेव्हा हे माझे असे वागणे कोणत्या कॅटेगरीत मोडते हे मी आजवर समजू शकलो नाही.
देवाकडे काहीतरी मागण्यासाठी नवस ठेवायचा हे मला कधीच पटले नाही,
पण त्यापेक्षाही हे जास्त पटले नाही की तो नवस फेडता आला नाही तर त्याचे काही विपरीत परीणाम होतात.
तरीही सत्यनारायणाची पूजा मला फार आवडते, कारण तिच्या प्रसादाचा शिरा मला जगात गोड लागतो.
थोड्याच वेळापूर्वी मी टीव्हीवर सैफ करीनाच्या लग्नासंदर्भातील बातमी पाहून म्हणालो, की यांचे वर्षभर टिकले तर मी सत्यनारायणाची पूजा घालेन.
झाले, आईची बडबड सुरू... असे काही गंमतीतही बोलायचे नसते रे.. तसे झाले आणि पूजा घालता नाही आली तर त्याचे परीणाम भोगायला लागतील.. चल शब्द मागे घेतो असे सांग देवाला...
आणि तिने माझ्या हातावर साखर ठेवली...
त्यांच्या लग्नाचे पेढे तर नाही पण साखर मात्र तोंडात पडली... शेवटी काय, तर आपण सारे "गोड" लविंग पीपल...!!
- आनंद
सिनेमा अजून पह्यला नाही. हे
सिनेमा अजून पह्यला नाही.
हे लिखाण आवडले
आवडलं
आवडलं
छान लिहिले आहे आवडले. मलाही
छान लिहिले आहे आवडले.
मलाही हा पिक्चर पटला आणि अगदी आचं वाक्याने विचारात पाडले होते.
अंड्या, लेखन आवडले. विषयात
अंड्या, लेखन आवडले. विषयात चित्रपट ग्रुप हवा होता, म्हणजे पुढे नेमके संदर्भ सापडतील.
ह्म्म!
ह्म्म!
आम्हाला तर शेवट आवडला..
आम्हाला तर शेवट आवडला.. बुतशिकन धर्मात सामील व्हा.. असा सरळ संदेश आहे.
अंड्या, लहानपणी आपल्याला
अंड्या,
लहानपणी आपल्याला आईवडीलांविषयी जसे प्रेम वाटते तसाच त्यांचा धाकही असतो. आपण मोठे असलो तरी देवाची लेकरेच आहोत. त्यामुळे देवाबद्दल प्रेम आणि धाक दोन्ही वाटणं साहजिकच आहे.
आ.न.,
-गा.पै.
आवडलं
आवडलं
आनंदा, छान जमलाय लेख...
आनंदा, छान जमलाय लेख... हलका-फुलका.
सिनेमा पाहिला नाही पण लेख
सिनेमा पाहिला नाही पण लेख आवडला!
लिहीत रहा रे मुला!
सिनेमा नाही पाहिला, बहुतेक
सिनेमा नाही पाहिला, बहुतेक पहाणारही नाही.
पण तुझा लेख मात्र मस्त जमलाय.
"समोरचा दिवा आहे हे जसे
"समोरचा दिवा आहे हे जसे निश्चित, तसे देव आहे हे तुम्ही निश्चित मानता का?"
---- देव आहे मी निश्चित मानतो. समोरचा दिवा आहेच याची मी हमी घेऊ शकत नाही. ----- (विचारपोथी - आचार्य विनोबा भावे).
भाविकाला देव, अभाविकाला दगड - संत तुकाराम महाराज.
तुमच्या मातोश्री काय किंवा वरती उल्लेख केलेले संतमंडळी काय - अशांबरोबर ना तुम्ही देव आहे का नाही वाद घालू शकत, ना त्यांच्या अढळ निश्चयापासून हलवू शकत.
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.
छान लेखन.
छान लेखन.
मस्तचं झालाय लेख.
मस्तचं झालाय लेख.
त्रोटक लिहिलय पण विषय आवडला,
त्रोटक लिहिलय पण विषय आवडला, विषयाच्या निमित्ताने तुमच्या मनात निर्माण झालेली खळबळ, स्वतःचेच विचार तपासून बघावेसे वाटणं हे आवडलं.
त्रोटक म्हणजे - गाडी चालतेय का बघायला स्टार्ट केली, चालतेय कळलं मग बंद केली किंवा गल्लीतल्या गल्लीत एक फेरी मारली. असं वाटलं वाचताना. गाडीने स्पीड घेत मोठी राउंड मारली असती, राउंड संपवताना स्पीड स्लो करत गाडीला ब्रेक लावला असता तर त्या गाडीवर मागे बसून फिरण्याची मजा अनुभवता आली असती आणि वर आवडलं लिहीलय तिथे कदाचित "आवडेश" असं लिहू शकले असते.
पुलेशु
आनंद चांगलं लिहिलय! जरा
आनंद
चांगलं लिहिलय! जरा विस्त्रुत लिहायला हवं होतं पण छान!
शॉर्ट एन स्वीट आहे. आवडला
शॉर्ट एन स्वीट आहे. आवडला लेख.
खरायं अगदी सोयीनुसार
खरायं अगदी सोयीनुसार आस्तिक-नास्तिक होण्याचा सराव सुरू आहे माझा
छान लिहिलय. थोडकच असलेलं
छान लिहिलय. थोडकच असलेलं आवडलं. विस्त्रुत लिहायचं तर पुस्तक लिहुन होइल असा हा विषय आहे.
धाक देखिल दोन प्रकारचा असू शकतो... एक म्हणजे, मी चुकिचं वागलो तर मला शिक्षा करतील याचा किंवा दुसरा, मी चुकीचं वागलो तर (ज्यांच्यावर मी प्रेम करतो) त्यांना वाईट वाटेल याचा. तर देवाबद्दलचा धाग त्याच्यावरच्या प्रेमामुळे आलाय का? याचे उत्तर प्रत्येक आस्तिकाने स्वतःच स्वतःला दिलेले बरे.
मलातर सगळे (baring exceptions) गॉड फिअरींगच वाटतात. सत्यनारायणाची पूजा तर निव्वळ धमक्यांनी भरलेली आहे. घरच्यांबरोबरच्या वादात मी एक विचारतो की तुम्हाला तुमचा देव असा सूड घेणारा असेल असं वाटतं का? जर उत्तर हो असेल तर अशा सूड घेणार्या देवावर तुम्ही प्रेम करू इच्छिता का? पण कोणी स्वतःला हे प्रश्ण विचारतात का?... आपल्याकडे आस्तिकता ही अनुवंशीक असते
आपल्याकडे आस्तिकता ही
आपल्याकडे आस्तिकता ही अनुवंशीक असते >>> अगदी अगदी
चांगलं लिहीलंय.
चांगलं लिहीलंय.
देव कशासाठी निर्माण केलेला
देव कशासाठी निर्माण केलेला आहे????????????? मनुष्याला कशाची तरी भिती असावी या करिताच....
छान लिहिलय.
छान लिहिलय.
चांगलं लिहिलं आहे.
चांगलं लिहिलं आहे.
मस्तच
मस्तच
सत्यनारायणाची पूजा हा सदैव
सत्यनारायणाची पूजा हा सदैव चेष्टेचा विषय ठरला आहे. बर्याच वेळी अपसमजामुळे..
वर कोणीतरी म्हणाले सत्यनारायण कथा धमक्यानी भरलेली आहे.जरा पाहुया किती धमक्या आहेत ते..
१. पहिली कथा आहे साधुवाण्याची - तो संतती व्हावी म्हणुन हे व्रत करतो..संतती झाल्यावर म्हणतो..तिच्या लग्नाच्या वेळी व्रत करेन म्हणतो आणि विसरतो. एका तर्हेने हे देवाशी करारच नाही का? आणि करार मोडला की त्याचे परिणाम नसणार का? नसावेत का? का आपण देवाशी आपल्या कन्विनियन्स प्रमाणे वागावे आणि त्याने आपण कसेही वागलो तरी ते मान्य करावे? इतकी आपली भक्ती खरी असते का? आपण आपल्या स्वार्थापलिकडे कधी जातो का?
२.त्याला चंद्रकेतु राजा त्याचे धन परत करतो तेव्हा त्याच्या अंगी आता तरी नम्रता आलेली आहे का हे पहायला एक साधा प्रश्न विचारतो..त्यालाही तो परत उन्मत्तपणे उत्तर देतो. परत एकदा त्याला "समज" द्यावी लागते.
३. त्याची कन्या पुजा करते आणि प्रसाद घ्यायला विसरते. एखादी पूजा/विधी ही एक "प्रोसेस" च नाही का? आणि मग ते काहीतरी कसेतरी उरकुन टाकुन ते देवाला आवडेल का? तिची देव तिला आठवण करुन देतो.
४. अंगध्वज राजा त्याच्या प्रजेने भक्तिभावाने प्रसाद आणुन दिलेला असतो. ते तो उन्मत्तपणाने नाकारतो. तेव्हा त्यालाही "समज" द्यायला लागते. नम्रता अंगी असायलाच हवी.
वरील चारही गोष्टीमधे विनाकारण कुठे कोणाला त्रास झालेला आहे का याचा आपणच विचार करायचा. एकंदरीत आपला सुर असा आपण लावतो की आम्ही आम्हाला हवे तसे वागु..देवाने मात्र आमच्याशी सदैव चांगलेच वागायला हवे. आपल्या बोलण्यात्/वागण्यात थोडी शिस्त आली तर काय हरकत आहे? मग ती देवाच्या भितीने/धाकाने का असेना.
मी तर या कथेपासुन असा बोध घेतला आहे की
अ)कोणाला शब्द देण्याआधी विचार करायला हवा आणि आपण दिलेला शब्द पाळायलाच हवा मग तो माणसाला असो की देवाला.
ब्)आपण जे काम करतो त्यात आपले पुर्ण लक्ष असायला हवे आणि ते काम नीट व्हायला हवे. काहीतरी कसेतरी घाईघाईत काम करणे टाळावे.
क)शक्यतो उन्मत्तपणा अंगी न आणता नम्रपणा असावा.
असो. हे माझे इंटरप्रीटेशन झाले. शेवटी प्रत्येक कथेपासुन काय घ्यावे हे आपल्यावर आहे नाही का? टु इच देअर ओन..
अवांतर प्रतिसादाबद्दल क्षमस्व!
मनस्मी जी , या फक्त बोधकथा
मनस्मी जी , या फक्त बोधकथा आहेत (इसापनीतीप्रमाणे) आणी त्या कथा म्हणूनच सोडून देत असू तर तुमचे म्हणणे काही अंशी मान्य . (तरीही पूजा झाल्यावर फक्त प्रसाद खायचा रहिला म्हणून पतीची नाव पतीसह बुडण थोड जास्त होतय अस माझ मत)
पण याला घाबरून जेव्हा लोक प्रसाद चुकवला तर माझ काही खर नाही या टेन्शन मधे येतात अन त्याहीपेक्षा दुसर्याला देतात तेव्हा वाईट वाटत
त्रोटक लिहिलय पण विषय आवडला,
त्रोटक लिहिलय पण विषय आवडला, विषयाच्या निमित्ताने तुमच्या मनात निर्माण झालेली खळबळ, स्वतःचेच विचार तपासून बघावेसे वाटणं हे आवडलं.+ १००
लोकहो, सूर्य १५ कोटी
लोकहो,
सूर्य १५ कोटी किलोमीटर्सवरून आणि चंद्र ३ लाख ८५ हजार किलोमीटर्सवरून इथल्या समुद्रास केवळ २ मीटर्सची भरती आणतात. या प्रमाणाचे अतिव्यस्त स्वरूप भयावह करणारे आहे. त्यांना २ मीटर्स, २०० मीटर्स आणि २०० मीटर्स सारखेच.
कल्पना करा, समुद्राच्या २०० मीटर्स उंचीच्या भरतीच्या लाटा उसळताहेत. कुठे पळणार आहोत आपण? या पार्श्वभूमीवर आपलं पृथ्वीवरील अस्तित्वच मुळी भयव्याप्त आहे. तर मग देवासंबंधीचं भय हे मूलभूत मानावं का? सरळधोप निष्कर्ष काढता येईल?
:भयचकित झालेला बाहुला:
आ.न.,
-गा.पै.
Pages