कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी / आम्रचर्चा

Submitted by अनिंद्य on 10 April, 2025 - 06:57

कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी आणि आम्रचर्चा

भारतीयांचे आंबाप्रेम जगप्रसिद्धच आहे. त्यातही आंब्याचे प्रचंड कौतुक करण्यात आणि चवीने आस्वाद घेण्यात महाराष्ट्राचा नंबर पहिला. गुजरात आणि उत्तर प्रदेश नंतर येतात मागोमाग.

आंबा कोणताही आणि कसाही खाल्ला तरी आवडणारे कोट्यावधी लोक आपल्या देशात आहेत. आंब्याची फुले-आम्रमंजिरी, कैरी, पिकलेला आंबा तर आहेच, त्यातली कोय सुद्धा चवीने खाणारी लोकं आपण.

617389ef-2ed4-409d-9c77-679aaddec669.jpegपन्हे, नानाविध लोणची, चटण्या, सलाद, कैरीयुक्त भेळ, कैरी-कांद्या सारखी तोंडी लावण्याची सुखे, चैत्र स्पेशल वाटली डाळ, चित्रान्न, आमरस, आंबा बर्फ़ी - आम्रखंड सारख्या मिठाया, मँगो लस्सी- आईसक्रीम, मँगो मिल्कशेक, मँगो मस्तानी, आंबा पोळी/ आम पापड, मँगो कँडी, सॉस, अमचूर, टिटोरा, रॉ मँगो स्लाइस चूरणगोली … एक ना हजार प्रकारे आंबा आणि कैरी आपले खाद्यजगत समृद्ध आणि चवदार करत आहेत, पिढ्यानपिढ्या. अविरत.

e06f854a-ccc5-48f2-b10e-37ed0beafb74.jpeg

देशातल्या जवळपास सर्व प्रमुख भाषांमधे आपल्या आम्रप्रेमाची स्तवने आहेत, कालिदास आंब्याला कामवल्लभा म्हणतो तर वात्स्यायनाचा कामदेव आम्रमंजिरींच्या प्रेमात. आम्रवृक्ष-वाटिका-फल याबद्दलच्या गीत-कवितांची ओसंडून वाहणारी समृद्धी म्हणजे आपले सामायिक वैभव.

8557ffd6-bc55-4a19-bdb9-663450d5f197.jpeg

तर मंडळी, आता कैऱ्या आणि आंबे सीझन सुरु झालाय. कैरी- आंब्याच्या पाककृती, फोटो, तुमच्या आवडीचे आंबे, आठवणी, आंबा खादाडी, त्याचे केलेले विक्रम असे सर्व celebrate करण्यासाठी माबोकर भरत, ऋतुराज आणि सिमरन यांच्या सल्ल्यावरून हा “आम्रमहोत्सव” धागा.

भरभरून कैरी-आंबे खा, जुन्या- नवीन पाककृती करुन बघा, कैरी-आंब्याबद्दलच्या कथा - कविता -क़िस्से -फोटो आणि अनुभव इथे शेयर करा. सबकुछ मँगो असा हा धागा होऊ द्या !

a123d0e0-8fb6-408e-87e0-575c581b70b5.jpeg

चला तर मंडळी, सब्ज़ और सुर्ख आमों से आमनोशी करें …

Man, go, get a Mango !!

* * *

(वरील सर्व फोटो माझेच. मोबल्याचे. Picture quality अगदीच बेसिक असली तरी कैरी-आंबाप्रेम कमअस्सल नाहीए, तेव्हढे समजून घ्या)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

… बाहेरचा किंवा टिन मधला रस खाऊ शकत नाही….

+ १

पण माझे न आवडण्याचे कारण त्यात वरून प्रचंड प्रमाणात मिसळलेली साखर / artificial sweetener हे आहे. Insane amounts of added sugar kills the fun for me. आंब्याचा नैसर्गिक गोडवा, चव मारली जाते.

रस हातानी करण्यासाठी volunteers नाहीत, स्वत:ला करणे आवडत नाही, म्हणून मग मिक्सर 😀

… कैरी कांदा लोणचं …

आला मनिम्याऊ स्पेशल बेत + फोटो.

मनिम्याऊ, तुमच्या रेसिपी जरा हटके असतात. म्हणून और आन्दो मँगो रेसिपीज्, फोटोज्.

तुमच्या कैरीच्या कढीची रेसिपी+ फोटोपण शेयर करा इथे प्लीज.

… आंबे खाण्याच्या पार्टीज याबद्दल फारसे ऐकलेले नाही कधी…

अहो, अशा पार्ट्या करून; चांगले आंबे राजेलोकांना खिलवून मोठमोठ्या जहागिरी आणि पदे मिळवलीत अनेकांनी. लिहीन ते किस्सेही लवकरच. Stay tuned.

@ धनि, कैरीभात = 👌 झब्बू देईन तुम्हांला.

@ द.सा, धमाल आहे हे .. आलो आंबो आलो 😀

Keep sharing your mango musings.

मस्तच धागा.
फोटो काय छान टाकलेत सर्वांनी. आमरसाचे फोटो आवडले.

आजच रत्नागिरी वरून आंबा आला आहे आमच्या नेहमीच्या दुकानदाराकडे. संध्याकाळी घेऊन यायचा.
गेल्या शनिवारी सा सवडच्या बाजारात (अत्रे सभागृहाजवळ शेतकरी बसतात तिथे) गावरान आंबा मिळाला. त्याची जात कुठली विचारायचंच राहीलं. सुरूवातीचे काही आंबे थोडे आंबट निघाले. पण आताचे सगळे काय गोड आहेत.
आंबा कुठलाही असला तरी प्रत्येकाची गोडी स्पेशलच असते.

अक्षय तृतीयेला पहिला आंबा खाणारे कोण कोण आहेत ?

व्वा व्वा
काय ते एकेक प्रतिसाद, फोटो, माहिती, लेख आणि रेसिपीज.
वाचून मन तृप्त झालं.
बरं झालं आधीच निवडक दहात धागा नोंदवला.
चिनुक्स, स्वाती यांच्या लिंका अजून वाचायच्या आहेत.
आता आणखी काही आठवलेली माहिती..
कालिदासाच्या अभिज्ञानशाकुन्तलम् या काव्यात मधुकरिका (मधमाशी) आणि परभृतिका (कोकिळा) अशी नावे असलेल्या दोन उद्यानपालिका, उद्यानातील आम्रवृक्षावर आलेल्या पहिल्यावहिल्या मंजिरीचे कौतुक करतात असे वर्णन आहे.
परभृत - दुसऱ्याने पाळलेला, वाढवलेला. कोकिळा कावळ्याच्या घरट्यात अंडी घालते.
पोपटाला आंबा आवडतो म्हणून आंब्याला कीरेष्ट (कीर इष्ट) हे नाव आहे.
वसंत ऋतूत आम्रवृक्ष बहरतो व वसंत ऋतू हा मदनाचा सखा म्हणून ओळखला जातो. तसेच पोपट हे मदनाचे वाहन आहे.

ही काही आंब्याची नावे.
पिकप्रिय कोकिळेला प्रिय
अलिप्रिय भ्रमरला प्रिय
शुकप्रिय पोपटाला प्रिय

आज पन्हे करणार आहे. आमच्याकडे गावी कैऱ्या चुलीत विस्तवावर खरपूस भाजून मग त्याचे पन्हे करतात. स्वाद छान येतो.
आम्रसिजनात मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट येथील बादशाह नामक हॉटेलात चक्कर असतेच.
या आम्रसिजनात प्रत्येक टेबलवर मस्त आंब्याची पाने आणि आंब्याचे घोस ठेवलेले असतात.
अगदी माहोल बनतो.
Screenshot_20250418_160315_Gallery.jpg
आणि मग......
Screenshot_20250418_160323_Gallery.jpg

ऋतुराज फोटो सहीच.

अक्षयतृतीयेला काहीजण पितरांना आंबे अर्पण करून मग खातात, ही माहिती मला हल्ली काही वर्ष माहिती झाली. मुळात पितरांचे आमच्याकडे पितृपक्ष आणि त्या त्या तिथीला करतात त्यामुळे अक्षयतृतीयेला असं काही असतं हेच माहिती नव्हतं. इथल्या मायबोलीकर आर्यामुळे ही माहिती समजली मला.

त्यात कोकणात देवगड भागात आंबे लवकर येऊन कधी कधी अक्षयतृतीयेपर्यंत संपतातही. त्यामुळे आंबे आले की खायला सुरुवात असं.

अगदी शेतात आंबा पार्टी नाही, पण आंब्याच्या मोसमात आमच्याकडे रसाळी पार्टी होत असे. खेडेगावी म्हणजे जिथे आमची शेती आहे तिथल्या सगळ्या भावकीच्या शेतातल्या आंब्याच्या झाडांवर सगळ्या भावकीचा वाटा असे. सगळे गावराण आंबे... पण एक से एक बढ़कर... आकार अन चवी नुसार नावे ( भद्या, खोबऱ्या, साखरगोटी... वगेरे) असत. त्यामुळे उन्हाळ्यात घरी पोत्याने आंबे येत... जे कधिही विकले नाही... उलट सगळ्यांना वाटण्यात यायचे.... एखाद दिवशी ५०-१०० ओळखिच्या लोकांना बोलवून रसपूर्ण जेवण असायचं... त्यालाच रसाळी चं जेवण म्हणत असू...
उन्हाळ्यात घरी आंबे नाहीत किंवा रस असलेले जेवण नाही असे क्वचितच व्हायचे.

आंबा पार्टी वगैरे नाही बघितली सासरी माहेरी, सगळ्यांकडेच आंबे असतात. शेजारी सर्वांकडे आंबे देवाणघेवाण होते. कोणी आलं गेलं की आंबे कापून देतात. कोकणात हे दिवस चैत्रगौरी हळदीकुंकवाचे असतात, त्यामुळे आंबेडाळ आणि पन्हे पार्ट्या होतात म्हणायला हवं कारण हळदीकुंकु म्हटलं तरी कोणाला वगळत नाही लहान लेकरांपासून वयस्क सर्वांना आमंत्रण देतात. याच्या आठवणी जास्त माहेरच्या कोकणातल्या, विशेषत: शाळेच्या सुट्टीतलया आहेत. सासरी या दिवसांत जाणं होत नाही.

ऋतुराज मस्त पोस्ट आणि फोटो ही.
टिन मधला रस खाऊ न शकण्याच आणखी एक कारण म्हणजे कधी कधी त्याला येणारा preservative चा वास हे ही आहे.
आंबे जनरली झाडावर पिकत नाहीत. हिरव्या जून आंब्यांची काढणी होते आणि गवतात ते पिकवले जातात. मार्केटला ही हिरवे आंबेच पाठवतो कारण पिके आंबे ट्रान्सपोर्ट मध्ये दबले जाऊन खराब होतात. असो.
बागेतून फेरफटका मारत असताना कधी कधी पाडाचा आंबा मिळतो , ज्याची चव अवर्णीनीय असते. कोकणात आम्ही पाडाचा न म्हणता शिरपिक्या म्हणतो. हा शब्द मला जास्त आवडतो.

@ ऋुतुराज

अपेक्षेप्रमाणे सुंदर पोस्ट. देर लगी आने मे तुमकू लेकिन जब आए तो छा गए !

मधुकरिका काय परभृतिका काय … कीरेष्ट, पिकप्रिय, अलिप्रिय, शुकप्रिय… अफाट सुंदर शब्द ! ❤

बादशाह चे फोटो ग़ज़ब माहौल वाले. Let me guess the dishes - मँगो फिरनी आणि मँगो फ़्रेश क्रीम ?

आंबा कुठलाही असला तरी प्रत्येकाची गोडी स्पेशलच असते.

रानभुली, अनुमोदन. + 11111

एकट्या भारतातच आंब्याच्या सुमारे १५०० जाती documented आहेत, पैकी साधारण ५०० जातींच्या बागा मुद्दाम लावलेल्या आहेत, कलम वगैरे करून, हे खास विकण्यासाठीचे आंबे. प्रत्येकाचा आपापला फ़ेवरेट.

कैऱ्या चुलीत विस्तवावर खरपूस भाजून मग त्याचे पन्हे…

रसाळीचं जेवण…

अक्षयतृतीया आणि आंब्याचं कनेक्शन

शिरपिक्या, झाडपिक्या असे अर्थवाही शब्द …

धागा बहुआयामी अनुभवांनी नटतो आहे ❤

साडेतीन मुहूर्तांपैकी एक येतोय खरच. अक्षय्य तृतिया.
आंबा खाण्याचा श्रीगणेशा करतात काही लोकं. खरे आहे.

आंबोशीची चर्चा झाली का इथे, कैरीच्या फोडी वाळवतात त्याला आंबोशी म्हणतात. ती नुसती चघळून खातात, लोणचं करतात, पदार्थात आंबटपणासाठी वापरतात. आंब्याची सोले म्हणायच्या सासूबाई, मी आंबोशी म्हणते. त्याची पावडर करतात. आमचुर पावडर म्हणतात त्याला, आंबोशी पावडरही म्हणतात.

अबब! एकाच झाडावर ३०० आंब्याचे प्रकार...
Mango Man of India:- पद्मश्री कलीम उल्ला खान , उत्तर प्रदेश...
https://holidaysfarm.in/introducing-indias-mango-man-kaleem-ullah-khans-...

Screenshot_20250419-134023_Gallery.jpg
मेथांबा तिसरी बॅच.

आणि जेवायला पायरीचा रस!!
चवळीची पालेभाजी, कैरी खोबरं चटणी, ताजा मेथांबा, पोळी, आमटी. कालची उरलेली घासभर बिर्याणी आणि दोडक्याची भाजी. मी भाज्या केल्या, आणि वर त्या वाढल्या याबद्दल मला दुष्ट ठरवण्यात आलेलं आहे Proud

Screenshot_20250419-134035_Gallery.jpg

बडोद्यात सयाजीराव महाराजांच्या काळात अक्षय्य तृतीयेनंतर आम्रपंक्तिभोजन होई. भोजनाचं १३५ लोकांना आमंत्रण असे. त्यांपैकी सामिष ११५ आणि उरलेले निरामिष असत. लक्ष्मीविलास राजवाड्यात हा समारंभ सकाळी ११ वाजता सुरू होई.

त्याचा मेन्यू -

१. निरामिष -

भात, वरण, दोडक्याची भाजी, बटाट्याची भाजी, मेथीची भाजी हटीव, वांग्याची भाजी, मठाची उसळ, बेसनाची भजी, मसुराची आमटी, रव्याची पुरी, भुईमुगाचे दाण्याची चटणी, ओल्या मिरच्यांची चटणी, काकडीची कोशिंबीर, केळ्याची कोशिंबीर, मठ्ठा, तूप, गोळ्याचा पुलाव, आंब्याचा रस.

हे पदार्थ ब्राह्मणी रीतीचे असत.

२. सामिष -

शेवयाचा जर्दा कोंबडीचा (मोगलाई), चौरंगी बिर्याणी (मोगलाई), आलुचा कलिया (मोगलाई), तगड सुंठी (तंजावरी). कोंबडीची कढी (देशी), परोटे (मोगलाई), चपात्या (दक्षिणी), बाजरीची भाकर (दक्षिणी), बुराणी (मोगलाई)

आमरसासाठी ३ x २ फूट या आकाराच्या खादीच्या सहा रुमाल पट्ट्या असत. रसात दूध घालत. गरज पडल्यास नवटांक साखर असे. रसाच्या वाटीशेजारी वाफवलेल्या शेवया असत. कोणास इच्छा झाली तर शेवया रसात घालून खाता येई.

बडोद्याच्या स्वयंपाकघराच्या मॅन्युअलात पुढील नोंद आहे - माणसी दोन शेर प्रमाणें एकशे पंधरा पानांस पांच मण तीस शेर आंबे घेतले की ते १३५ पानास पुरे होतील कारण शेकडा वीस पानें त्याच सामानांत जास्त होतात त्याकरितां वेगळें सामान घेणें नको.

खादीचा एक रुमाल लांब इंच ३६, रुंदी इंच ३३ वजन तोळे साडे तेराचा असतो. अशा दोन रुमालाची एक पट्टी असते.

सेवया स्टोरपैकी घ्याव्या.

कैरीच्या चटणीसारखंच दिसतंय.... हो कैरीची चटणीच असते.काही जण कैरी किसतात.मी मिक्सरमधून काढली.

आम्रपंक्तिभोजनाचे वर्णन भारी आहे.आमारसासाठी खाडीच्या पट्ट्या का लागत असाव्यात?वस्त्रगाळ रस की काय?

प्रज्ञा, मेथांबा छानच की!
ताट एकदम मस्त.चपाती जास्त आवडली. मऊ आहे.

मी भाज्या केल्या, आणि वर त्या वाढल्या याबद्दल मला दुष्ट ठरवण्यात आलेलं आहे>> प्रज्ञा, तुम्ही खरंच दुष्ट आहात. पानात आंब्याचा रस, कैरी चटणी लोणचं असलं तर पोळ्या व्यतिरिक्त तिसरं चौथं काही नको.

चिनुक्स छान माहीती. मौराची आमटी म्हणजे कशाची. मठाची उसळ समजलं. तुमच्या आधीच्या लिंक्स अजून वाचायच्या आहेत.

देवकी मस्त टक्कू, रेसिपी सांग.

प्रज्ञा एकदम भारीच सर्व. माझ्या कैरी फ्रिजात वाट बघतायेत. एकदा आंबा डाळ, पन्हं केलं मग काहीच नाही.

Pages