कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी / आम्रचर्चा

Submitted by अनिंद्य on 10 April, 2025 - 06:57

कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी आणि आम्रचर्चा

भारतीयांचे आंबाप्रेम जगप्रसिद्धच आहे. त्यातही आंब्याचे प्रचंड कौतुक करण्यात आणि चवीने आस्वाद घेण्यात महाराष्ट्राचा नंबर पहिला. गुजरात आणि उत्तर प्रदेश नंतर येतात मागोमाग.

आंबा कोणताही आणि कसाही खाल्ला तरी आवडणारे कोट्यावधी लोक आपल्या देशात आहेत. आंब्याची फुले-आम्रमंजिरी, कैरी, पिकलेला आंबा तर आहेच, त्यातली कोय सुद्धा चवीने खाणारी लोकं आपण.

617389ef-2ed4-409d-9c77-679aaddec669.jpegपन्हे, नानाविध लोणची, चटण्या, सलाद, कैरीयुक्त भेळ, कैरी-कांद्या सारखी तोंडी लावण्याची सुखे, चैत्र स्पेशल वाटली डाळ, चित्रान्न, आमरस, आंबा बर्फ़ी - आम्रखंड सारख्या मिठाया, मँगो लस्सी- आईसक्रीम, मँगो मिल्कशेक, मँगो मस्तानी, आंबा पोळी/ आम पापड, मँगो कँडी, सॉस, अमचूर, टिटोरा, रॉ मँगो स्लाइस चूरणगोली … एक ना हजार प्रकारे आंबा आणि कैरी आपले खाद्यजगत समृद्ध आणि चवदार करत आहेत, पिढ्यानपिढ्या. अविरत.

e06f854a-ccc5-48f2-b10e-37ed0beafb74.jpeg

देशातल्या जवळपास सर्व प्रमुख भाषांमधे आपल्या आम्रप्रेमाची स्तवने आहेत, कालिदास आंब्याला कामवल्लभा म्हणतो तर वात्स्यायनाचा कामदेव आम्रमंजिरींच्या प्रेमात. आम्रवृक्ष-वाटिका-फल याबद्दलच्या गीत-कवितांची ओसंडून वाहणारी समृद्धी म्हणजे आपले सामायिक वैभव.

8557ffd6-bc55-4a19-bdb9-663450d5f197.jpeg

तर मंडळी, आता कैऱ्या आणि आंबे सीझन सुरु झालाय. कैरी- आंब्याच्या पाककृती, फोटो, तुमच्या आवडीचे आंबे, आठवणी, आंबा खादाडी, त्याचे केलेले विक्रम असे सर्व celebrate करण्यासाठी माबोकर भरत, ऋतुराज आणि सिमरन यांच्या सल्ल्यावरून हा “आम्रमहोत्सव” धागा.

भरभरून कैरी-आंबे खा, जुन्या- नवीन पाककृती करुन बघा, कैरी-आंब्याबद्दलच्या कथा - कविता -क़िस्से -फोटो आणि अनुभव इथे शेयर करा. सबकुछ मँगो असा हा धागा होऊ द्या !

a123d0e0-8fb6-408e-87e0-575c581b70b5.jpeg

चला तर मंडळी, सब्ज़ और सुर्ख आमों से आमनोशी करें …

Man, go, get a Mango !!

* * *

(वरील सर्व फोटो माझेच. मोबल्याचे. Picture quality अगदीच बेसिक असली तरी कैरी-आंबाप्रेम कमअस्सल नाहीए, तेव्हढे समजून घ्या)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज इंग्रो मध्ये छान बाहेरून तरी करकरीत अशा कैऱ्या मिळाल्या. उद्या पासून मीठ लावून, मेथांबा आणि भेळ अशा संपवू. तर ते चटकन होणारं लोणचं कसं करतात? टिकत नाही पण मस्त लागतं... रेसिपी असेल तर द्या.

वर अमवा की डारी पे गाणाऱ्या कोकिळेचा उल्लेख आला आहे. वीकांताला पुणे मुक्कामी पहाटेच कोकिलकूजन ऐकायाला मिळाले. ❤️ पक्षी मात्र दिसला नाही. तो सहसा दिसत नाहीच.

आंब्याच्या आगमनाची पहिली चाहूल कोकिळेला लागते अशी कविकल्पना आहे. कॉलिंग ऋुतुराज, हरपा, स्वाती … ते जास्त सांगू शकतील

BTW, “कोकिलवास” नामक आंबा मी कोलकात्यात खाल्ला आहे. तो आंबा आणि त्याचा मोहोर अती सुगंधी असल्याने कोकिळ त्या झाडावरच तासंतास बसून गातात- राहतात म्हणे.

कोकिलवासची एक उपशाखा “रसालतरू”. ते आंबा कलम ढाक्यावरून आणले आणि त्याचे आंबे फक्त मुर्शिदाबादच्या तत्कालीन राजपरिवारासाठीच राखीव होते म्हणे. ते मला नाही दिले कुणी, नुसतीच स्टोरी सांगितली 😀

कोकिलवास, रसालतरु नवीनच कळले.
मला नाही दिले कुणी, नुसतीच स्टोरी सांगितली ....... Lol

गवसणी करून बघायची होती.पण वरच्या प्रतिसादानंतर bet रद्द केला.कदाचित चपाती ,भात सारे पोटभरू एकाचवेळी पोटात जावे ही सदिच्छा असावी.

हल्ली ठाण्यात ही दिवसभर कोकिळा गात असते. कोकिळवास आंबा नाव नी गोष्ट दोन्ही मस्त.
झटपट लोणच म्हणजे कैऱ्या चिरा ,विकतचा मसाला मीठ आणि गार करून फोडणी घाला , झालं तयार लोणच. Happy
गवसणी म्हणजे फार काही ग्रेट नाही वाटत मला ही . त्या पेक्षा तांदळाचे जाळीदार घावन आणि रस छान लागत. पुऱ्या टाळायच्या असतील तर मी बरेच वेळा करते.
कोकण पट्टीत सर्वात पहिले देवगड हापूस तयार होतो मग उत्तरे कडचे म्हणजे रत्नागिरी, गुहागर, अलिबाग आणि शेवटी गुजरात असे आंबे मार्केट ला येतात. पूर्वी आमचे संपले की बलसाड हापूस मिळायचा. तेव्हा तरटाने शिवलेली बांबूची टोकरी असायची . आमच्या पेट्या तेव्हा लाकडी आणि सहा सात डझन च्या ही असत ह्या मात्र तेव्हा ही तीन चार डझनाच्याच असत. देवगड एवढा नाही पण छान असायचे ते आंबे ही. हल्ली बलसाड मिळतो की नाही कोण जाणे ? आमचे संपले की डायरेक्ट लंगडा आणि दशेराच दिसतात बाजारात.

अरेरे! देवकी असं करू नका. चॅलेंज घ्या. आयतं खाणार्‍यांना तरी आवडते का बघा, मला स्वातीच्या आम्रसांदणी - बिघडवून दाखवा चॅलेंजवरचे तुमचे प्रतिसाद उगाचच आठवले.

आंब्याचा शिरा - दीपांजली हाही एक हिट पदार्थ आहे.

मला न आवडलेला आंब्याचा एक पदार्थ - फजेतो - दही + आंब्याची गुजराती कढी

बंगलोरच्या हल्लीमने hallimane( उच्चार?) रेस्टॉरंट मध्ये मँगो फेस्टिव्हल असतो. https://www.youtube.com/watch?v=mxeP6Lfq950

ऋतुराज यांच्या पहिल्या प्रतिसादातल्या आणि अनिंद्य वेळोवेळी लिहीत असलेल्या माहितीसाठी कौतुक करायचं राहिलं होतं.

हो ममो बलसाड हापूस मिळतो अजुन बोरीवलीत.. कालच तरटाने शिवलेली बांबूची टोकरी घरी आली आहे.बाकी इथल्या आम्रपुराणात हरवून जायला होतय

बलसाड हापूस मिळतो अजुन बोरीवलीत.. व्वा मस्तच..
तरटाने शिवलेली बांबूची टोकरी घरी आली आहे > अजून ही तरटाचं पॅकिंग आहे वाचून छान वाटलं.

पूर्वी आंब्यामध्ये हवा खेळती राहण्यासाठी थोड्या अंतर सोडून मारलेल्या पात्तळ लाकडाच्या पट्ट्यांची पेटी असायची आमची. जग जरी त्याला पेटी म्हणत असलं तरी मध्ये स्पेस असल्याने आम्ही त्याला " पिंजरा " म्हणायचो. जरा कमी ग्रेडच्या माला साठी पिंजरे वापरण्यात येत असत. आंबे संपले की पिंजरे डिस्मेंटल करून ग्राहक त्या लाकडी पट्ट्या मस्त बंबात घालत असे. असो.

हल्ली आता पुठ्ठा बॉक्सच वापरतो. पिंजरे इतिहास जमा झाले . आणि हल्ली सगळे दोन डझनांचे बॉक्स, पाच डझन चा बॉक्स ही इतिहास जमा ... असो.

.. सर्वात पहिले देवगड हापूस तयार होतो मग उत्तरे कडचे म्हणजे रत्नागिरी, गुहागर, अलिबाग आणि शेवटी गुजरात / वलसाड हापूस असे आंबे मार्केट ला येतात. ……

हा क्रम रोचक आहे. मान्सून प्रवासाचा pattern फॉलो करतात की काय हापुस पिकतांना ?

वलसाड हापूस थोडा उशीरा येतो, खरं आहे.
वलसाड भागातल्या हापूस आणि चिकूच्या बऱ्याच बागा पारशीजनांच्या मालकीच्या आहेत. बागेत कामाला आजूबाजूचा आदिवासी समाज. दोघांचा प्रामाणिक व्यवहार impressive आणि पैश्याची वखवख कमी.

आधी त्या भागात कोळसा वापरणारे औष्णिक विद्युत प्रकल्प आणि आता मुंबई अमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे बागक्षेत्र आणि फळांचा दर्जा दोन्ही उतरणीवर आहेत.

इथे भरपूर माहिती मिळतेय. मज्जा येतेय या धाग्यावर उंडरायला.
मी पण आमरसऐवजी आंबा कापून खाणार्यांच्या गटात. घरात मात्र सगळ्यांना आमरस पुरी / चपाती जास्त आवडते. मग मी माझ्या वाटणीचा आंबा बाजूला काढून ठेवते.
वरती आमरसासोबत खाण्याचे जे काही पदार्थ आलेत त्याबद्दल ऐकले आहे किंवा पाहिले तरी आहे. माहेरी शेजारी होते त्यांच्याकडे सिझनला दरवर्षी शेवया आमरसचा बेत असायचा आणि आमच्या कुटूंबाला आमंत्रण असायचे पण मला नाही आवडायचा तो बेत.
माझ्या सासरी गव्हाचे पिठ पातळ कालवून त्याचा डोसासारखा प्रकार करतात त्याला आम्ही मेताळ म्हणतो, लुसलुशित असतो, तो आमच्याकडे आमरससोबत हिट आयटम आहे. मी तो माझ्यासाठी कुरकुरीत करून चहासोबत खाते. पण खूप वेळखाऊ आणि किचकट काम आहे मेताळ बनविणे. नवर्याने दोन-तीन वेळा आठवण केली पण मी त्याच्या बोलण्याकडे कानाडोळा करत एकदा पुरी तर एकदा चपातीसोबत आमरस दिला Lol

हापुस आंबा मला सोलून खायला आवडतो, हल्ली कापते मात्र, तो साका वगैरे प्रकार असतो ना. रायवळ खाल्ला तर चूफून . दोन वर्षांपूर्वी फळमाशीचा खूप प्रादुर्भाव झालेला कोकणात. सासरचे आंबे खूप खराब निघालेले, त्यावर्षी माहेरचे थोडेच मिळाले होते पण खूप सुरेख होता रत्नागिरी हापूस (तोच मागे बाबांना देऊ शकलेले तो ). मागच्यावर्षी फळमाशांसाठी जाळ्या वगैरे बसवलेल्या. यावर्षी अजून आमचे इथे आले नाहीयेत.

मला आंबा किंवा आमरस असाच खायला आवड्तो, पुरी पोळी, भात कशाबरोबरही नाही. केलं की खाते कॉम्बो (आमर्स पुरी) पण विशेष आवडत नाही. माझ्या आणि हापूस आंब्यांच्या मध्ये कुठलाही पदार्थ आलेला चालत नाही मला, हाहाहा.

आंबा शिकरणही करते, लेक आवडीने खातो, त्याच्यासाठी करते. त्याला शिकरण म्हणायचं की नाही माहिती नाही पण केळ्याऐवजी आंबा, रेसिपी सेम म्हणून मी शिकरण म्हणते.

वटपौर्णिमेच्या सुमारास वलसाड, दशहरा, लंगडा बाजारात असतात. गंगादशहरा नावाचे एक व्रत असतं त्यावेळी उद्यापनाला दशहरा आंबे दान करतात असं ऐकून आहे.

आमरस + गव्हाच्या पिठाचा डोसा ? इंटरेस्टिंग.

…..न आवडलेला आंब्याचा एक पदार्थ - फजेतो - दही + आंब्याची गुजराती कढी…

+ ११११

दह्याची किंवा फक्त कैरीची कढी जास्त चांगली होणार चवीला. मनिम्याऊ यांची रेसिपी आहे इथे.

आंबट चवीचे पदार्थ करतांना दोन आंबट घटक एकत्र वापरले की चव फसते, अपवाद खूप कमी. भदाभदा टोमेटो असलेल्या (विशेषतः बाहेरच्या) पावभाजीची चव घेण्याआधीच त्यात २-३ लिंबू फोडी पिळणारे, टोमेटो रसम मधे चिंचा घालणारे, कैरी+दही कढ़ी करणारे, आंब्याच्या पन्ह्यात लिंबू पिळणारे या बल्लवांचा/खवैय्यांचा चवीचा सेन्स अगदीच “हे” असतो असे माझे मत. 🙂

वसंत कोकिळांचा 'मेटिंग सीझन' असल्यामुळे ते (नर) तेव्हा गातात म्हणे. डायरेक आंब्यांशी संबंध नाही. Happy
हा एक मजेशीर लेख त्यासंदर्भात सापडला बघा. Happy

आणि हा त्यात उल्लेख आलेला शेर :
असर ये तेरे अन्फ़ास-ए-मसीहाई का है 'अकबर'
इलाहाबाद से लंगड़ा चला लाहौर तक पहुँचा

>>> या बल्लवांचा/खवैय्यांचा चवीचा सेन्स
हो ना! आंबटशौकीन मेले! Proud
(इथे आमच्यापर्यंत येणार्‍या कैर्‍या अनेकदा पुरेशा आंबट नसतात, त्यामुळे आम्हाला पिळावं लागतं लिंबू कैरीच्या पदार्थांत.) Happy

.. कैर्‍या अनेकदा पुरेशा आंबट नसतात…

हा सीन नव्हता कंसिडर केला. इथे आंबटशौक जस्टिफाइड आहे हो 😀

लंगडा चला लाहौर पहुंचा 👌

मनीमोहोर, छल्ला, भरत आणि निल्सन यांचे ४ मेथांबा फोटो आल्याने आता पाचवा माझा.

94e69f70-04fa-4a63-9d5f-8e312cef53f7.jpeg

आम की लौंज / कैरी लुंजी / मेथांबा. सोबत तव्यावरचा लच्छा पराठा.

आमच्याकडे लुंजी ऋतुनुसार तीन फळांची करतात - आवळ्याची, काळ्या द्राक्षांची (यात दाणामेथी नसते) आणि अर्थातच ही कैरीची.

तिन्ही आवडतात पण कैरी ती कैरीच 😋

अहाहा.

मी लेख क्र ५ पासून सुरुवात केली वाचायची चिनूक्स.

Thanks for sharing here, सर्वच लाभान्वित होतील

अनिंद्य, मेथांबा बेस्ट.
आजही केला होता घरी. एप्रिल - मे मधील संकष्टी चतुर्थ्या मेथांब्या शिवाय पूर्ण होत नाहीत!
काळया द्राक्षांच्या लुंजी ची रेसिपी लिहा प्लीज. इथे अप्रस्तुत असेल, तर वेगळा धागा काढून लिहा.
करवंदाची पण लुंजी करता येईल की!!

.. काळया द्राक्षांच्या लुंजी ची रेसिपी..

जरूर. केली की सचित्र अहवाल सादर करणार 🙂

करवंदाची ? होईल चांगली असे वाटतेय. करवंद कुठून आणायची हा सवाल आहे.

अमरावतीला सासरी आमच्याकडे मागच्या अंगणात करवंदाची जाळी होती. माझ्या साबा कच्च्या करवंदाचे लोणचे, लुंजी, साखरांबा सगळे काही करायच्या. हे सर्व त्यांच्या हातचे आयते खायला मिळाले आहे . सगळंच एक्दम टेस्टी !! कधी रेसिपीही विचारली नाही तेव्हा त्यांना, कारण उनाडासारखं ते त्यांच्याच हातचे खायचे म्हणून डोक्यात. आता तिकडेही ते अंगण आणि ती झाडे नाहीत. साबा पण खूप थकल्यात आता, त्यांनाही आठवेल की नाही शंका आहे.

बंगलोरच्या हल्लीमने hallimane( उच्चार?) >>>>

हळ्ळीमने असा उच्चार आहे. हळ्ळी म्हणजे खेडेगाव आणी मने म्हणजे घर.

त्या हळ्ळीमन्ने कायच्या काय गोड पदार्थ वाढतात( आंब्याचे/ कैरीचे) पण गुळ/ साखर खुपच होते एकाच जेवणात. जात नाही इतके पदार्थ.
एक दोनदाच बरे वाटते.

आमच्याकडे गावठी आंब्यामध्ये गावी, साखरी आंबा होता. म्हणजे चक्क साखर खातोय असे वाटायचे. मग खोबरी सुद्धा होता
बाकी, गावठी मध्ये रायवळ, बिटकी( छोटे हापुस आंबे) ह्याची शर्यत लागायची. ह्या नंतर नंबर पायरीचा असायचा.
आमरसात आम्ही हापुस आणि पायरी. नुसता हापुस कधीच नाही.
हापुस पण असायचेच पण रायवळचे ताजे लोणचं, रायतं आणि पन्हं ह्यात मजा असायची.
आजी पाण्यातली कैरी असा वर्षभर टिकणारा प्रकार करायची, त्यात बिटकीची अक्खी कैरी टाकयची.
छुंदा, आंब्याचा मावा( आटलेला रस), साठं , शीरा, खीर , आमसुलं, कैरीचे पापड ( नक्कीच कोणी एकले नसतील) वगैरे साठी हापुसची कैरी/रस.
आजीचे खुपच नियम असत. मी कधीच लक्ष घातले नाही. मग आईचा जीव काढायची ती. आई पुर्णवेळ नोकरी करून करायची. आता तीही थकली तेव्हा असे काही घरचे पदार्थ बंदच झाले.
खिचडी, पापड व हि कैरी अहाहा.
हापुस ज्यास्त विकायचो म्हणून बाकी आंबेच संपवायचो आधी.

मेथांबा मस्तच.

आमच्याकडे गावठी आंब्यामध्ये गावी, साखरी आंबा होता. >>> माहेरी होता, साखरांबा म्हणायचो आम्ही. खरंतर रायवळच्या असंख्य जाती आहेत.

गोव्याचा मानकुराद मात्र खाल्ला नाहीये कधी, ते इथे बाजारात वगैरे विकायला नसतात.

… आपल्याकडे आहे ते वाटून खायचं ही भावना …

…ते आवर्जून इतर नातेवाईकांना आमरस जेवायला बोलवायचे…

.. एक पेटी आंबे वाटायचो आम्ही….

This is so good !

आपल्याकडचे आंबे वाटून खाणे हे एक विशेष भारतीय लक्षण म्हणून मान्य व्हावे इतके ते कॉमनप्लेस आहे. वाटून खाण्याने आनंद द्विगुणित होतो.

वर चिनूक्स यांचे अभ्यासपूर्ण लेख जरूर वाचा. त्यातही चांगल्या प्रतिचे आंबे मित्र-सहकारी यांना भेट म्हणून पाठवण्याचे गेल्या शतकातील संदर्भ आहेत. वर इलाहाबाद से लंगडा चला लाहौर पहुंचा हेसुद्धा तेच आहे, गिफ्टिंग मँगोज.

आमराईत बसून आंबे खाण्याच्या पार्टीज् आपल्या देशात सर्वत्र झडतात. त्याला उर्दूत “आमनोशी” असा स्पेसिफ़िक शब्द आहे. मराठीत आहे की नाही मला माहित नाहीं. उर्दू कथांमधे “आमनोशी” साठी अमुक दिवशी आमंत्रण आहे असे बरेचदा येते.

ही करा visual आमनोशी :

6246026f-b3e5-4e11-ae0b-00ab34de3052.jpeg
The fabe Alphonso आमरस, from Konkan to my table 👆 👆 👆

मेथांबा आणि कांद्याच लोणच मस्तच...
आमरसाचा रंग मस्त दिसतोय पण मिक्सर मधून काढलेला रस बिग नो.. ह्या साठी मी बाहेरचा, किंवा टिन मधला ही रस खाऊ शकत नाही.
फ्रीजर मधला रस ही आवडत नाही. चव साफ बदलते असं माझं मत.

आमरस, कैरी कांदा लोणचं दोन्ही मस्त मस्त.

आमरस, पन्हे दोन्ही मिक्सर मधले आवडत नाही आमच्याकडे.

आमराईत बसून आंबे खाण्याच्या पार्टीज...
याबद्दल फारसे ऐकलेले नाही कधी, (हुरडा पार्टी सारखे.)
कारण एकतर आंबा असा रेडी झाडावर फार कमी पिकतो.

Pages