माय नेम इज ब्लॉगर, फूड ब्लॉगर
फोर जी फाईव्ह जी ची संपर्क क्रांती करणारी दुनिया आपल्या देशात अवतरली आणि आपल्या जालीय जीवनातही एक मोठा बदल घेऊन आली. आता स्मार्टफोन झालाय आपला नवीन तळहात आणि जालविश्व् बनलंय आपलं दुसरं घर. फेसबुक, इन्स्टा, टिकटॉक वगैरे आता घरचेच झालेत पण गेली काही वर्ष टिकटॉकर्स, स्टॅन्ड अप कॉमेडीयन्स आणि यू ट्युबर्स च्या जोडीला प्रचंड फोफावलेला एक नवा वर्ग म्हणजे फूड ब्लॉगर्स / Vloggers.
जगभरातील एकूण फूड ब्लॉगर्स सुमारे २२ कोटी आहेत अन त्यातले निम्मे एकट्या भारतात आहेत म्हणे. आता एव्हढ्या प्रचंड संख्येने रोज नवीन काही Vlogging साठी तेवढ्याच संख्येत खाण्यापिण्याच्या जागा पण हव्या. होते नव्हते ते सर्व प्रसिद्ध 'स्पॉट्स कव्हर झाले' (हो असेच म्हणायचे) असल्यामुळे आता गाडी वळलीय गाड्यांकडे. भारतभरातील गल्लीबोळातल्या बबड्या - बबलींनी आपल्याला रस्तोरस्ती, गावोगावी, गल्लोगल्ली भरत असलेल्या खाद्यजत्रेची दैनिक वारी घडवून आणण्याचा चंगच बांधलाय. अक्षरशः लाखो फूड ब्लॉगर्स आपले जालीय जीवन व्यापून वर दशांगुळे उरतील असे विक्राळ रूप प्राप्त करते झाले आहेत.
हिंदी, इंग्रजी, मराठी, गुजराती, तेलुगू, तमिळ .... एक भाषा सोडली नाही या बबड्या-बबलींनी. अहिराणी, कच्छी आणि मेवाडी बोलीतही फूड ब्लॉगर्स उदंड आहेत. त्यांची दुबळी दीनवाणी प्रतिभा अखंड ओसंडून वाहत आहे. मठ्ठ रांजणे (माठ म्हटले नाही मिलॉर्ड, प्लीज नोट ! रांजण इज अ बिगर साईज्ड माठ मिलॉर्ड) असे बहुसंख्य फूड ब्लॉग्जर्सचे थोडक्यात वर्णन करता येईल. भाषा गचाळ, गृहपाठ-अभ्यास नाही, शब्दखजिना रिता आणि संवादफेक वगैरे तर दुसऱ्या ग्रहावरच्या गोष्टी. भाषेची गिरणी कोणतीही असू देत यांचं दळण सेम-टू -सेम. बरं स्वतःच्या ब्लॉगचे / चॅनेलचे नाव तरी धडके घ्यायचे ना, तर ते ही नाही. नाव काय तर 'भुक्कड' 'भूखा सांड' 'पोटात किडे' वगैरे. ‘पोटातले जंत’ वगैरे अजून कोणी नाहीये ही देवाची कृपा. हिंदीत 'भुक्कड' ही शिवी आहे हे माहिती असण्याची काही गरज नाहीच. भुकेले म्हणजे भुक्कड समजत असावेत, दोन्ही शब्दात 'भूक' कॉमन आहे ना, झाले मग.
सगळ्यात भयाण असते ती यांची त्रयोदश प्रश्नोत्तरी. म्हंजे तेरा मठ्ठ प्रश्न आणि त्यांची (मिळालीच तर) उत्तरे :
१) टपरीवजा जागा असेल तर - भैय्या तुम्हारा नाम बताओ हमारे दर्शको के लिये (याचं मराठी दादा / काका / वैनी / ताई तुमचं नाव सांगा असे). हे दुकान कधीपासून असे विचारले तर याचं उत्तर उत्तर भारतीय टपरीवाला २५ वर्षाच्या पुढे असेच देणार. जुने दुकान / हॉटेल असेल तर गल्ल्यावरच्या इसमाला डायरेक्ट तुमची कितवी पिढी हे दुकान चालवणारी असे विचारायचे. तसा नियमच आहे.
दिल्ली-मथुरा-आग्रा शहरातले कळकट्ट जुनाट दिसणारे दुकान असेल तर हमखास ‘हमारे परदादाजी ने शुरु किया था और अब मै और मेरा बेटा देखते हैं’ असे लोणकढे उत्तर मिळेल. दुकान १० वर्षे जुने का असेना. नॉनव्हेज पदार्थ विकणारे असतील तर कुठल्याश्या अवधी-लखनवी-रामपुरी नवाबजाद्याच्या खानसाम्याची सातवी-आठवी पिढी असणार याची खात्रीच. त्याकाळी साधारण अर्धी जनता खानसाम्याचे (आणि सोबत अखंड पुनरुत्पादनाचे) काम करत असल्याशिवाय आज गल्लीबोळात त्यांचे वंशज सापडते ना.
२) कितने साल से खडे हो आप यहाँ ? अरे ठोंब्या, तो रोज संध्याकाळी फक्त ३ तासच अमुक पदार्थ विकतो ते तूच नाही का सांगितले व्हिडिओच्या सुरवातीला? तो मनुष्य फक्त तीन तास रोज उभा राहतो तिथे, कितने सालों से नाही ! तो काय वर्ष वर्ष उभ्याने तपश्चर्या करणारा योगी आहे का ?
३) थोडे लाडात येऊन (ब्लॉगर स्त्रीपात्र असेल तर अति लाडात येऊन) - तर मग आज तुम्ही कॉय 'बनवणार' आमच्या साठी? बटाटवड्याच्या स्टॉल वर बटाटेवडे करतात, डोश्याच्या स्टॉल वर डोसे, अजून काय कप्पाळ ? आणि हो, मराठीत सर्व खाद्यपदार्थ 'बनवले' जातात, ठीक वैसे ही जैसे हिंदी में 'बनाये' जाते हैं. अशी ही बनवाबनवी.
४) हे कश्यापासून 'बनते'? किंवा हिंदीत 'ये किस चीज से बनता है भैय्या? अरे वज्रमूर्खांनो, तुमच्या ब्लॉगचे ब्रीदवाक्य 'जायके के जानकार' आहे ना? तुम्ही स्वतःला फूडी, खवैय्ये वगैरे म्हणवता ना? मग साधी जिलबी करण्यासाठी काय पदार्थ लागतात हे सुद्धा तुम्हाला माहित नाही? अरे जिलबी आणि इमरतीतला फरक समजायला तुम्हाला पुढचा जन्म घ्यावा लागेल रे. कदाचित इमरतीसाठी उडीद भिजवून वस्त्रगाळ स्मूथ वाटताना बघून तर तुम्ही दहीवड्याची तयारी चालूये म्हणून मोकळे व्हाल, काही भरोसा नाही.
५) आंटी / भैया ये क्या डाल रहे हो ? वो क्या डाल रहे हो ? आंटी नी मख्ख चेहरा ठेवून 'जीरा' किंवा 'हरा धनिया' असे निष्पाप उत्तर दिले तरी 'आहाहा, ओहोहो, वाह वाह, मजा आनेवाला है दोस्तो' वगैरे ..
६) यानंतर तो स्टार प्रश्न येतो - समस्त फूड ब्लॉगर जनतेला हवाहवासा वाटणारा. ‘बटर कौन सा यूज करते हो ?’ भैय्याचे उत्तर - अमूल. या पॉइंटला समस्त फूड ब्लॉगर जमात वेडीपिशी होते, त्यांचे चेहरे चमकू लागतात, डोळे मिचकावून 'अमूऊऊऊल बतततत्त्त्तर, आहाहा, ओहोहो, वाह वाह. शानदार, गजब है गजब.. असे चित्कार. या पॉईंटला मराठीत अग्गायी गsss ... अम्मूऊल का ? अशी किंचाळी फोडणे आवश्यक.
७) ये देखिये, ये देखिये, ये देखिये (हे जमेल-सुचेल तसे ३ ते ९ कितीही वेळा) .....और ये हो गयी दोस्तो चीज की बारिश ! कोई कंजूसी नही. भाईसाब गजब है गजब.. कितना सारा चीज है देखो. जनाब, मेरे मुंह में तो पानी आ रहा है, रुका ही नही जा रहा है वगैरे. पुन्हा एकदा 'आहाहा, ओहोहो, वाह वाह, मजा आ गया' वगैरे वगैरे.. या सगळ्या बैलांना समोर बसवून प्रत्येकी अर्धा किलो अमूल चीज चे आणि बटरचे स्लॅब जबरदस्ती चावून चावून खायला लावायचे माझे एक हिंसक स्वप्न आहे. चव तुला मूळ पदार्थाची कळली नाहीये अजून आणि कौतुक कसले तर अमूल चीजचे ? हाऊ स्टुपिड इज द्याट ! येणि वे.
८) आणि आता कोविडकाळाची नड म्हणून - भैयाने देखो मास्क पेहना है, सफाई का पूरा ध्यान रखा है - हे बोलत असतांना तो भैया कळकट्ट प्लॅस्टिकच्या जुनाट डब्यातून बॅटर घेऊन तितक्याच कळकट्ट कढईत पुनःपुन्हा वापरून काळ्या झालेल्या तेलात 'इंद्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहा' च्या निरिच्छ वृत्तीने अग्नी-आहुती टाकत असतो, त्याच हातांनी हजारो हात लागून आलेल्या नोटा-नाणी मोजून घेत-देत असतो... ‘हायजिन का पूरा ध्यान’ कसे ठेवलेय यावर आमचे ब्लॉगर दादा/ ताई कंठरावाने जीव तोडून सांगत असतात ...
९) विक्रेत्या व्यक्तीचे केस पांढरे आणि कपडे थोडे जूनसर असतील तर यांना ताबडतोब 'हार्ड वर्किंग आंटी/अंकल' असा खिताब न मागता देण्यात येतो. खाण्यापिण्याचा स्टॉल चालवणे हे कष्टाचेच काम आहे, कुणीही केले तरी. त्याचा वयाशी किंवा राहाणीमानाशी काहीही संबंध नाही. हे 'हार्ड वर्किंग' तर मग उरलेले काय स्वतःच्या महालातील बागेतल्या गुलाबकळया खुडतात काय रस्त्याच्या कडेला त्यांच्या उन्हातल्या टपरीत ? हार्ड वर्किंग अंकल म्हणे. काहीही.
१०) हे रटाळ प्रश्नोपनिषद ह्या पॉइंटला थोडे मंद्र सप्तकाकडे झुकते, ब्लॉगरचे किंचाळणे थोडे(सेच) कमी होते - पदार्थांची चव घेण्याचा एक १० सेकंदाचा कार्यक्रम उरकला जातो. तो जगात भारी पदार्थ ओठांच्या बाह्यभागाला जेमतेम स्पर्श करताच ही मंडळी माना डोलावून डोळे मिटू लागतात आणि जिभेचा एक फक्त त्यांनाच जमणारा 'टॉककक्क' असा चित्तचमत्कृतिकारक आवाज काढतात. ब्लॉगर मराठी असेल तर 'मस्त मस्त मस्स्स्सस्स्स्त असे चढत्या भाजणीचे मस्तकात जाणारे मस्तकार आणि हिंदी असेल तर तेच परत मझा आ गया. ह्यावेळी तो पदार्थ चीजयुक्त असल्यास त्याला करकचून दाबून वितळलेल्या चीजचे ओंगळवाणे ओघळ क्लोजअप घेऊन दाखवणे हा अनेकांचा छंद असतो.
११) बरं, साधारण सव्वादोन सेकंदात यांना पदार्थातले सर्व बारकावे लग्गेच समजतात. पदार्थात 'लसणीचा मस्स्त फ्लेवर आलाय' वगैरे शेरे देता येतात. अरे दादा, त्या माणसानी किलोभर पदार्थ करतांना पाव किलो लसूण आमच्या डोळ्यादेखत टाकलाय रे, तूच नाही का दाखवला व्हिडीओ आम्हाला? तो तुझा 'फ्लेवर' पदार्थ करतांना, खातांना आणि नंतर खाऊन ढेकर देताना किलोमीटरभर अंतरातही जाणवेल ना रे... फ्लेवर म्हणे ! खातांना कचाकचा लसूण येईल दाताखाली.
१२) यांनतर एक राउंड होतो तो - लय भारी, लय म्हंजे लयच भारी, जगात भारी, जाळ अन धूर संगटच, आजवर खाल्लेल्या मिसळीत सर्वात भारी, ऐसी पानीपुरी / टिक्की / जलेबी आप को पूरी दुनिया में कहीं नहीं मिलेगी, गजब का स्वाद वगैरेचा ... 'जग' आणि 'पूरी दुनिया' म्हणजे यांच्या लेखी त्यांना माहिती असलेल्या त्यांच्या गावातील चारसहा जागा! अरे नतद्रष्ट जीवांनो, दुनिया फार मोठी आहे. तुमच्या मोहल्ल्यात, वस्तीत, गावात जे काही मिळतं ते अनुभवाच्या तोकडेपणामुळे तुला 'लय भारी' वाटत असेल तर तो दोष तुझा आहे, दर्शकांचा नाही. अनुभवाचं वर्तूळ मोठं करा रे, दायरा बढाओ !
१३) आता आपल्या राशीतील शनी साडेसातीच्या शेवटच्या टप्प्यात येतो. दोन सेकंदात 'तुमचा पत्ता नीट सांगा आंटी / ताई/ दादा/ भैय्या' असे टपरीमालकाला धमकावून आणि पदार्थ मिळण्याचे टायमिंग वगैरे तोंडातल्या तोंडात सांगून झाले की मग .... तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच खूपच फारच अतीच आवडलाच्च असेलच्च, म्हणून पेज लाईक करा, सब्सक्राईब करा, शेयर करायला विसरू नका. आम्ही असेच नवनवीन खाण्याच्या जागा घेऊन पुन्हा येऊ असे धमकीवजा आश्वासन आणि मग हुश्श...... संपले टॉर्चर !
मराठीत फूड ब्लॉगर तुलनेने कमी आहेत. जे आहेत ते 'कानातून धूर आणणारी मिसळ' आणि 'सर्वात मोठी गावरान / कारभारी / सरपंच मटन थाळी' यापलीकडे फार काही जाऊ शकलेले नाहीत. मराठी फूड ब्लॉगर्सपैकी शेकडा ९९ लोक Mutton चा उच्चार 'मटण' आणि Chicken चा उच्चार 'चिकण' असा का करतात हे न सुटणारे कोडे आहे. दोन्ही इंग्रजी शब्दांना सुयोग्य सुटसुटीत पर्याय मराठीत अजूनही न रुजल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करूया.
‘आजच्या धकाधकीच्या जीवनात’ किंवा ‘कधी कधी आपल्याला घरी जेवण बनवायला (स्वयंपाक करायला नाही, प्लीज नोट माय लॉर्ड) कंटाळा येतो’ अशी रटाळ आणि चावून चोथा झालेल्या पाण्याहून पातळ शब्दात फूड व्हिडिओची सुरुवात करणाऱ्या ब्लॉगर्सचे पुढचे निवेदन ऐकण्याची इच्छा होत नाही. ते मात्र नेटाने ४-५ मिनिटे दळण दळतात. टीव्हीच्या मराठी बातमीदारांचे 'जसे की तुम्ही बघू शकता' टाईपचे मराठी आणि 'भन्नाट', 'मस्त', 'चमचमीत' आणि सांगणारी व्यक्ती पुण्या-ठाण्याची असल्यास 'अप्रतिम' अशा चार विशेषणांचा आलटून पालटून वापर करीत कोणत्याही पदार्थाचे, हॉटेलचे किंवा टपरीचे वर्णन पूर्ण करतात. त्या शहरात-गावात शेकडो टपऱ्यांवर सेम पदार्थ मिळत असला तरी त्यांच्या आजच्या एपिसोडमधले ठिकाण 'शहरातल्या खवैयांची पंढरी' वगैरे असल्याचे बिनधास्त सांगतात. ही पंढरी मात्र प्रत्येक एपिसोडला बदलते, गाभाऱ्यात कधी वडापाव तर कधी 'मेंदू' वडा (मेदुवडा नाही) असल्याने भक्तही बदलत असावेत. ह्यांचं काम फक्त 'वॉव वॉव', 'ओ माय गॉड' चे चित्कार काढणे, 'बघा बघा कित्ती बटर सोडलंय' किंवा 'पुरी कशी टम्म फुललीय' अशा त्याच त्या कॉमेंट आणि त्याला जोडून दुसरी-चौथीतली मुलं शालेय नाटकात करतील त्या लेव्हलचा पूरक अभिनय करत राहणे एव्हढेच.
चहाच्या चमच्याने दोन दोन चमचे रंगहीन-चवहीन-वासहीन टाईपचे पदार्थ १०-१२ वाट्यांमधून देणाऱ्या 'अनलिमिटेड थाळी' प्रकाराचे ह्या लोकांना फार कौतुक. 'अनलिमिटेड थाळी' पद्धतीच्या जागांचे विशेष प्रेम हे मराठी आणि गुजराती दोन्ही फूड ब्लॉगरमध्ये दिसते. 'पोटभर खा, अनलिमिटेड... थाळीत ‘हे ही’ मिळते, ‘ते ही’ मिळते, अनलिमिटेड, अनलिमिटेड - तारसप्तकात हे पुन्हा पुन्हा सांगणे आणि वर 'फक्त' अमुक अमुक रुपये असे ठासून सांगत राहणे मराठी-गुजराती दोन्हीकडे असते. ह्या थाळी प्रकाराच्या उपाहारगृहांची नावे हा एक वेगळाच विषय आहे. आता महाराजा, महाराणी, राजधानी, थाटबाट वगैरे नावे जुनी झाल्यामुळे 'सासुरवाडी', 'रजवाडु', 'ससुराल', सासूमाँ की रसोई', 'पाहुणचार', 'जावईबापू' वगैरे नावे चलनात आहेत, थाळीतले पदार्थ मात्र तेच जुनेपुराणे. जून झालेल्या जावयाला कोण विचारतो सासुरवाडीत? वाढलंय ते खा गुमान. आमचे ब्लॉगर मित्र मात्र लग्नानंतर पहिल्यांदाच मांडवपरतणीला सासुरवाडीला गेलेल्या जावयासारखे उत्साहात !
'स्ट्रीट फूड' म्हटले की स्वच्छतेचा मुद्दा बहुतेक ठिकाणी ऑपशनलाच टाकावा लागतो. वापरलेला कच्चा माल आणि जागेची स्वच्छता आधीच 'अनहेल्दी' श्रेणीची असेल तर तयार झालेले प्रॉडक्ट अधिकाधिक 'सुपर अनहेल्दी प्रो मॅक्स' कसे करता येईल याची जणू देशव्यापी स्पर्धा आहे. भारतीय स्ट्रीट फूड वेंडर्स आणि फूड ब्लॉगर्सच्या जगात ज्यात त्यात बटर ओतणे आणि भसाभसा मायोनिझ, चीज टाकणे म्हणजे पदार्थ 'भारी' असे एक गृहीतक जोरात आहे. मुंबई- अहमदाबाद पट्ट्यात तर सॅन्डविचमध्ये ब्रेड ऑप्शनल आणि चीज हाच मुख्य घटक पदार्थ झालाय.
कसलीशी गचाळ 'फ्यूजन' रेसिपी असेल एखाद्या जागी तर मग ह्यांचे वासरू वारं पिते जणू. मुळात स्ट्रॉबेरीचा पिझ्झा, अननसाची भजी आणि श्रीखंडाचे स्टफिंग असलेले सॅन्डविच खायला कोणी का तयार होईल हेच कळत नाही. त्यावर अगदी किळस वाटेल एव्हढी 'चीज की बारिश' आहेच. हे असले उद्योग करणाऱ्या जागा सहा-आठ महिन्यात गाशा गुंडाळतात हे बघितले आहे. पण असल्याच जागा फूड ब्लॉगर्सच्या यादीत सर्वात वर असतात, अलग आणि ‘हटके’ म्हणून.
ह्या बटबटीत पार्श्वभूमीवर दर्जेदार फूडब्लॉगिंग करणाऱ्या काही मोजक्याच लोकांचे काम उठून दिसते. विषयातले ज्ञान, केलेला रिसर्च, अन्नाविषयीचे मौलिक चिंतन, जिव्हेचा जागतिक स्वादानुभव, स्वतःच्या अंगी असलेला तोलामोलाचा सुगरणपणा, सुंदर भाषा असे सर्व एकत्र असल्यामुळे विनोद दुआंचा 'जायका इंडिया का' सारखा दर्जेदार कार्यक्रम कोण विसरू शकेल? अनेक वर्षांआधी देशातील वेगवेगळ्या शहरातल्या खाद्यजत्रेला घरोघरी पोहचवणारे आद्य फूड ब्लॉगरच म्हणावे त्यांना. (प्रस्तुत हौशी लेखकूला दुआंच्या दर्जेदार प्रकाशनासाठी खाद्यभ्रमंतीबद्दलच लिहायला मिळाले हा बहुमान इथे आत्मस्तुतीचा दोष पत्करूनसुद्धा सांगावा वाटतो मिलॉर्ड )
आता उदंड झालेल्या कोट्यावधी फूड ब्लॉगर्समधील काहींना लाखो प्रेक्षक आहेत. त्यांना मोठमोठ्या तारांकित हॉटेल्समध्ये मानाची आमंत्रणं असतात, चकटफू. काहींना भरपूर द्रव्यप्राप्ती सुद्धा होते म्हणे. उर्वरित लाखो-हजारोंना काही लाईक्स आणि एक दोन कॉमेंटवर समाधान मानावे लागत असणार. आणि आपल्या सारख्या दर्शकासाठी आहेच 'आहाहा, ओहोहो, वाह वाह, मजा आनेवाला है दोस्तो आणि मस्त मस्तत्त्त्त मस्तत्त्त्त चीज आणि अमूल बत्तर ! ..
समाप्त
* * *
(लेखातील चित्रे जालावरून साभार)
मला पण आवडतात त्या … मस्त आहे
मला पण आवडतात त्या … मस्त आहे. रेसिपी बुक पण आहे त्यांचे.
आता बंद करतील gas तथास्तु !
आता बंद करतील gas
तथास्तु !
मस्त हहपूवा
मस्त हहपूवा
चपाती कशी बनवावी हे कोणत्या
चपाती कशी बनवावी हे कोणत्या व्ह्लॉगवर दाखवतात ?
खराखुरा शेफ दाखवायचा असेल तर रेसिपी सांगून झाल्यावर घरी फोन करून कूकला आज काय बनवायचे हे सांगतो हे नक्की दाखवले पाहीजे.
नवीन Submitted by शान्त माणूस on 18 May, 2022 - 22:5 >>>>>आमच्या केबलवर नवीन चॅनेल सुरु झाले आहे q tv त्यात कालच मधुरा ने चपाती कशी बनवतात ते दाखवले। तिच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाला काहीतरी झाले होते म्हणून बँडेज लावले होते आणि तिने तसेच पीठ मळले मग थोडावेळ झाकून ठेवायला सांगितले व पोळी लाटताना ते बँडेज काढले होते।
कुकिंग शुकिंग चांगले आहे.
कुकिंग शुकिंग चांगले आहे. त्या स्पृहा जोशीने पण एक अगदी नवीन फूड व्लॉग सुरू केलाय , 2 च एपिसोड झाले असावेत. एकदम तरखडकरी इंग्रजी बोलत असते, एकदम बोर. अवघड वाक्यरचना असेल तर हिंदी वर घसरते गावरान खरी चव मस्त आहे, त्या आजी एकदा विहिरीत चक्क पोहल्या होत्या, वय 85+ सहज असेल.
गावरान खरी चव त्या आजी आणि
गावरान खरी चव त्या आजी आणि सुनेचा पार्ट चांगला आहे आणि तो कोतमिरीचे मूतखड्यावर गावरान औषधी उपयोग चर्चासत्रवाला आला की तर जामच मजा येते.
अरे तो गावाकडची वाट चॅनेल हा
अरे तो गावाकडची वाट चॅनेल हा वेगळा ह्यात आई आणि मुलगी आहे. तो तू म्हणत आहेस तो quack आहे भगत.
ओह्ह. सॉरी! गोंधळ झाला!
ओह्ह. सॉरी! गोंधळ झाला!
गावाकडची वाट म्हणत आहे अमित
गावाकडची वाट म्हणत आहे अमित बहुदा. मला त्यांचे कुटुंब असलेले भाग शांत आणि चांगले वाटले बघितले तेव्हा. मुलं फार गोड आहेत. कित्ती काम करतात सगळे. ते औषध वगैरे मी बघत नाही. मला ते सगळे मिळून काम करतात ते छान वाटल. मुलाला अगदी सगळे काम शिकविले आहे. खेड्यात सहसा दिसत नाही ते. आणि मिसेस शेती उत्तम करतात. ते आवडले. खेडेगावात जिथे पैसा भरपुर आहे तिथे बाया अक्षरशः नुस्त्या गॉसिप करताना पाहिले आहे. त्यामूळ त्यांचे काम करणे आवडले. अलिकडे नाही बघितल खर.
Apron , Boone baking , Traditional me हे कुकिंग चॅनल बघते मी. California Gardening, self sufficient me गार्डनिंग साठी. थोडे एम्ब्रॉईडरी व्हिडीओ .
पण युट्युब पेक्षा इन्स्टाग्राम आवडते. तिथले होम डेकोर आणि साड्या,फॅशन अकाउंट्स फॉलो करायला आवडते. फेसबुक, वॉट्स अॅप फारस बघत नाही.
सीमा, त्यात फक्त त्या ताई आणि
सीमा, त्यात फक्त त्या ताई आणि मुलेच काम करतात. हा पटठ्या आळशी आहे एक नंबर म्हणून त्याच्या वडिलांना पण तो असलं चॅनेल चालवतो ते फार आवडत नाही. त्याचे आई वडील पण खूप राबतात. हा अशीच भोंदू औषध विकत असतो. महाराष्ट्रात अल्पभूधारकच जास्त आहेत, आणि अशा घरातल्या स्त्रिया, मूल आणि मालक शेतात आणि घरातपण प्रचंड राबतात. दोन, चार गुरे असतील तर अजून उस्तवार.
धमाल लेख आहे. मजा आली. मी फूड
धमाल लेख आहे. मजा आली. मी फूड ब्लॉग्ज व व्लॉग्ज फारसे पाहिलेले नाहीत पण वर्णनावरून अंदाज आला
यांचे बिझिनेस मॉडेल कसे चालते मला कायम आश्चर्य वाटते -यांचे म्हणजे यू ट्यूबचे व अॅड्स देणार्या कंपन्यांचे. असंख्य पब्लिक रॅण्डमली कोठे येता जाता, निवांत बसलेले असताना, घरी बेडवर एकामागून एक क्लिप्स पाहात असतात. तासाभराने त्या लक्षातही राहात नाहीत. त्यातून अॅड वगैरे वर क्लिक करण्याची शक्यता शून्य. त्यातून विकत घेण्याची तर आणखी शून्य. नुसतेच डेली/मंथली व्ह्यूज. आधी जाहिरात आली तर ज्या क्षणी "स्किप अॅड" येते तेव्हा लगेच स्किप करतात. यू ट्यूबने त्यांना याकरता पैसे द्यायला त्यांना ते यातून मिळायला हवेत. जे अॅड वाले देतात. पण अॅड वाल्यांना या खर्चातून नक्की नफा किती मिळत असेल?
आता गूगलने यातून कीवर्ड्स वापरून इतर ठिकाणी ते दाखवले व त्यावरून लोकांनी विकत घेतले वगैरे असलेही प्रकार फारसे होत नसावेत. मग यांची इकॉनॉमी चालते कशी? यावर फंडिंग करणारे लोक मूर्ख नाहीत. अशा अॅड देणार्या कंपन्यांमधे सोशल मिडीया मार्केटिंग, अॅड अॅनेलिसिस भरपूर केला जातो. मग आपल्याला माहीत नसलेल्या मार्गाने त्या कंपन्यांना पैसा मिळतो असे असेल किंवा ज्या कंपन्या मुळात चांगल्या आर्थिक अवस्थेत आहेत त्यांना तरीही हा खर्च करत राहणे परवडत असावे. दुसरे म्हणजे सध्याच्या
धकाधकीच्या जीवनातसोशल मीडीया मार्केटिंग बजेट नको असे म्हणून कोणीही करीयर सुसाइड करणार नाही१. फूड ब्लॉगरला पैसा यू ट्यूब देते
२. यू ट्यूब तेथे अॅड्स दाखवून त्या कंपन्यांकडून पैसे घेते.
३. यातून लोक आपली उत्पादने घेतील या अपेक्षेने अॅड देणार्या कंपन्या सोशल मार्केटिंग बजेट्स वापरतात. त्याचे अनेक ठिकाणी अॅनेलिसीस ठराविक काळानंतर केले जातात. त्यातही उत्पादनाची विक्री व त्याचा या अॅड्सशी संबंध जोडायचा प्रयत्न करतात.
पण कधीतरी ३ वाल्या कंपन्यांना पैसा मिळाल्याशिवाय हे चक्र वर्षानुवर्षे कसे सुरू राहते हे मला झेपलेले नाही.
लंपन completely agree. तो
लंपन completely agree. तो आळशी आहे हे मला पण खटकले.
आमच्याकडे सांगली भागात जिथे शेताला भरपुर पाणी आहे आणि उस/सोयाबीन पिकवितात तिथे पैसा भरपुर आणि शेतीचे काम नाही अशी परिस्थिती आहे. बाया /पुरुष फार टाईमपास करतात. जिथे डाळी वगैरे पिकविल्या जातात ,भाजी असते तिथे मात्र भरपुर काम असते.
फा नाही तसे नाही ते. नंतर लिहिते.
अरे मी आत्ता हा धागा वाचला.
अरे मी आत्ता हा धागा वाचला. शिर्षक वाचून स्किप करत होते कारण मी एकाही फूड ब्लॉगर ला फॉलो करत नाही, विडीओ पण नाहीच बघत. त्यामुळे तसंच काही असेलसं वाटलं. पण आज म्हटलं बघूच काय आहे. पण एकदम धमाल धागा निघाला आणि प्रतिसाद पण एक से एक आहेत
चीज, बटर बद्दलच्या सगळ्या पोस्टींना मम!
नवरा खूप फॉलो करतो हे फुड व्लॉग प्रकरण! त्याला वाचायला द्यायला पाहिजे हा लेख. हि कॅन रिलेट
मला समहाऊ खूप कंटाळा येतो या व्लॉग प्रकरणाचा. स्पेशली ट्रॅव्हल आणि फुडवाले. ते पूर्वी नाही का लोकं कुठे लांबच्या ट्रीपला जाऊन आले की तिथले फोटो दाखवून, रसभरीत वर्णन ऐकवतात. त्या टाईप वाटतं. फूडवाले प्रकार पण तसेच , तुम्ही खाणार, लाळ गाळणार ते (आम्ही) का म्हणून बघत बसायचं ते बघून शेवटी टीपिकल पदार्थच खाल्ले किंवा केले जातात. (हे मा वै म. वेगळी मतं असूच शकतात.)
मलाही फारेंड सारखाच प्रश्न
मलाही फारेंड सारखाच प्रश्न पडला आहे. Are we missing something ?
१. फूड ब्लॉगरला पैसा यू ट्यूब
१. फूड ब्लॉगरला पैसा यू ट्यूब देते
२. यू ट्यूब तेथे अॅड्स दाखवून त्या कंपन्यांकडून पैसे घेते.
३. यातून लोक आपली उत्पादने घेतील या अपेक्षेने अॅड देणार्या कंपन्या सोशल मार्केटिंग बजेट्स वापरतात.
>>>
4. व्युव्हर्स ऍड न बघताच स्किप करतात.
५. प्रेक्षकांचा वैयक्तिक डेटा
५. प्रेक्षकांचा वैयक्तिक डेटा गुगल गोळा करते आणि त्यानुसार त्या त्या प्रेक्षकाला ठराविक जाहिरात दिसते.
६. गुगल ह्यासाठी जाहिरातदार कंपनी कडून पैसा कमवते (फोकस्ड जाहिरात - टार्गेट लोकांसाठी)
७. टार्गेट प्रेक्षक कुठल्या निकषांवर ठरवावा, त्या जाहिरातींचा काय आणि किती परिणाम झाला, जाहिरात धोरणात काय बदल करावा ह्याचा अनालिसीस करायला जाहिरातदार कंपनी वेगवेगळ्या कंपन्यांना (सर्वेक्षण करणाऱ्या, अनालीसिस करणाऱ्या, इत्यादी) पैसे देते
८. अनालिसिस करणारी कंपनी जाहिरातदार कंपनीला त्यांची धोरणे किती नफा मिळवून देत आहेत हे दाखवते. तो का होतो आहे ह्याचा अभ्यास ह्या कंपन्या करतीलच असं काही नाही. किंबहुना त्याची फारशी फिकीर कुणाला नसते. कदाचित ब्रँड चे नाव लोकांच्या कानीकपाळी टाकत राहणे, लोकांना योग्य वेळेस आपले उत्पादन दाखवणे (म्हणजे कुणी गूगलवर टिव्ही च्या किमती बघत असेल तर पुढचे काही दिवस त्याला टिव्ही विक्रेत्यांच्या, साऊंड सिस्टीम विक्रेत्यांच्या, ओटीटी च्या वगैरे जाहिराती दाखवणे), ठराविक वेळेस डिस्काउंट आहे असे दाखवणे, ठराविक वस्तुसोबत पाहिजे असलेली दुसरी वस्तू मोफत आहे असे दाखवणे इत्यादी अनेक प्रकारे लोकांना खरेदी करायला उद्युक्त केले जाते. जितक्या लोकांना जाहिरात दाखवली त्यातले खूपच कमी लोक खरेदी करणार हे सर्वांनाच माहिती असते. पण सर्वांनाच कॉमन जाहिरात दाखवण्यापेक्षा टार्गेट प्रेक्षक हेरून त्यांना ठराविक जाहिरात दाखवली तर त्यातून मिळणारा नफा हा तुलनेने जास्त असावा.
थँक्स हपा. हो त्या
थँक्स हपा. हो त्या personalization बद्दल कल्पना आहे. पण नफा नक्की त्यातून होतो का - किंवा तीच व्यक्ती तेथे जाहिरात पाहून त्यानंतर आठवड्याभरात कोठूनतरी खरेदी करते का - या लेव्हलचा अॅनेलिसिस कंपन्या करतात असे ऐकले आहे. पण तू लिहीले आहेस तसेच असावे - त्यातून थेट आर्थिक नफा किती यापेक्षा ब्रॅण्ड सतत लोकांसमोर आदळत राहणे हे मुख्य मोटिवेशन असावे.
सीमा - लिही तू ही.
अनिंद्य - हे या ब्लॉगर्स शी संबंधित असल्याने इथे लिहीले. अवांतर होत असेल तर वेगळी कडे ही चर्चा करू.
आर्थिक नफा अर्थातच होत असणार.
आर्थिक नफा अर्थातच होत असणार. अॅनॅलिसिस करणार्या कंपन्यांचं कामच ते आहे की ती जाहिरात किती परिणामकारक आहे ते दाखवणे. ज्या अर्थी हा अॅनॅलिसिस करूनही कंपन्या जाहिराती चालूच ठेवत आहेत, नपेक्षा वाढवतच आहेत, त्या अर्थी नफा नक्कीच होत आहे.
मी थेट आर्थिक नफा किती - ह्याकडे ते दुर्लक्ष करतात असं म्हटलेलं नाही. तो नफा किती हे त्यांचं मुख्य ध्येय असणार. फक्त तो नफा का होत आहे, त्यामागे काही मनोवैद्यानिक कारणे आहेत का, ह्यामध्ये त्यांना फारसा इंटरेस्ट असेल असं वाटत नाही. काही ठराविकच कंपन्या त्यात डोकं खुपसत असतील आणि बर्यचश्या कंपन्या बाकीचे करतात म्हणून आपण करून बघू असा दृष्तिकोन ठेवत असणार.
वरती मटा/लोकसत्ता दर्जाचे टायपो केल्याबद्दल क्षमस्व.
जाहिरातींचा मनावर अप्रत्यक्ष
जाहिरातींचा मनावर अप्रत्यक्ष परिणाम असतो.
उदाहरण:
1. मी लोळत युट्युब व्हिडीओ बघतेय.त्यावर अजीओ ची ऍड आली.मी स्कीप केली.
2. नंतर मी मायबोली उघडली.मायबोली ने मला दाखवलं की अजीओ वर चांगला सेल चालू आहे.
3. मला गुगल पे वर अजीओ चं कुपन मिळालं जे 1000 च्या खरेदीसाठी 200 रु डिस्काउंट देतंय.
4. अजीओ चा 1000 चा फायदा झाला.हेच टॉप मला 15 किलोमीटर ड्राईव्ह करून एफ सी रोड ला अजीओ पेक्षा 100 रु स्वस्त पडले असते.पण 30 किलोमीटर चे पेट्रोल, मग खरेदी करून स्वयंपाक करायला वेळ नाही म्हणून बाहेर खाण्याचा खर्च हे पाहता मला अजीओ ने महाग विकलेले कपडेही परवडले.
5. कोरियन सिरीज बघत त्यातले कॉस्मेटिक ब्रँड पाहिले. मेकअप वापरत नसल्याने स्पष्ट दुर्लक्षच केले.
6. अचानक ऑफिस पार्टी निमित्त कुठेतरी चकाचक ठिकाणी जायला आपले थोबाड, केस व कपडे योग्य नाहीत याची जाणीव होऊन आता मेकप चे सामान घ्यायचेच तर त्या कोरियन सिरीज ने सुचवलेले घेऊ असे करून घेतले गेले.
7. फेसबुक माझी खरेदी आवड लक्षात घेऊन मला स्वतंत्र.कॉम आणि उन्नती सिल्क च्या साड्या सारख्या दाखवतं. मी 3 महिने दुर्लक्ष केलं.मग एक समारंभ आला आणि त्यातली एक साडी ऑनलाइन मागवली.
युट्युब किंवा फेसबुकवर दाखवलेल्या जाहिराती हा त्यांचा नजदिकी नुकसान दूर का फायदा असतो.ते सिगारेट चे पाकीट आणि त्यावर दाखवलेले तंबाखू ने सडलेले तोंड जसे मनात 100 वेळा जाहिरात पाहिल्यावर भिनत जाते तसे. फेसबुक युट्युब मायबोली जाहिरातींवर सेटिंग बदलणे, डकडकगो वापरणे हे उपाय आहेतच पण ज्याला या नशेची मजा करायचीच आहे तो काही हे वापरत नाही
युट्युबचं प्रीमियम
युट्युबचं प्रीमियम सबस्क्रिप्शन पण आहे. तिथूनही त्यांना रेव्हेन्यू येतो. तिथे ad न दाखवण्याचेच पैसे लावतात!
बाकी व्हिडियो category बघून ad कस्टमाईझ करत असावेत.
फा.. मलाही सेम हाच प्रश्न
फा.. मलाही सेम हाच प्रश्न पडतो.
बरं... बाकी व्हिडियो category बघून ad कस्टमाईझ करत असावेत....म्हणावं तर तसेही नाही... मी कधीही टॉयलेट क्लिनिंग बद्दल काहीही बघत नाही...तरी सदैव हारपिक , डोमेक्स चा रतीब असतो आणि सौंदर्य प्रसाधने.... !!
काही काही जाहीराती तर इतक्या निर्बुद्ध पणे तयार केलेल्या असतात...की स्किप अॅड करायच्या आधी किमान ती कशाची जाहीरात आहे हे तरी कळावं ना प्रेक्षकांना...तर नाही!!!
पण ते सोशल मिडीया बजेटींग चं खरं असावं..... आहेत फंड्स.... वापरा....
YoutubeVanced अॅपमध्ये
YoutubeVanced अॅपमध्ये जाहिराती टोटली गायब असतात किंवा सगळ्या व्हिडिओच्या शेवटी क्लब केलेल्या असतात. (Advanced मधून Ad काढून टाकलंय.) बाकी सगळं यूट्यूबसारखंच असतं. आधी यूट्यूबमध्ये काम करणार्या काही लोकांनीच हे तयार केलंय.
असं ऐकलंय.
अवांतराबद्दल सॉरी.
Google forces YouTube Vanced
Google forces YouTube Vanced to shut down ‘due to legal reasons’
https://www.theverge.com/2022/3/13/22975890/youtube-vanced-app-discontin...
अवांतराबद्दल सॉरी.
जाहिरातींचा मनावर अप्रत्यक्ष
जाहिरातींचा मनावर अप्रत्यक्ष परिणाम असतो. >> +१
बरेच दिवस या विषयावर लेख लिहायचा विचार होता. जमले की लिहितो.
टेस्ला जाहिरात करत नाही-
टेस्ला जाहिरात करत नाही- इंस्टेंड ते अमाऊंट आर अँड डी मध्ये टाकते...
जाहीराती कुणाला दाखवतोय तो
जाहीराती कुणाला दाखवतोय तो डेमोग्राफिक एकदा समजला की टारेगेटेड अॅड दाखवता येतात. त्या ही हल्ली इंटरॅक्टिव्ह करण्याचे प्रकार चालू आहेत. कारची अॅड असली जवळच्या शोरूम साठी क्लिक करा वर क्लिक केलं की आपल्या गावातल्या शोरुमचा पत्ता, अपॉईनमेंट बुक करा, वेळ सांगा असले प्रकार पूर्वी काम करायचो त्या प्रॉडक्टवर करता यायचे. बँडरस्नॅच इन अॅड!
यूट्युब टीव्हीवर बघताना लॉगिन कराचा धोशा लावतं, फेबुला तर प्रचंड माहिती असतेच. नेफ्लिही (यातही लवकरच अॅड येणार आहेत) वेगवेगळी प्रोफाईल करतं त्यात कंटेंट क्युरेट करणे हे असतंच पण तुम्ही कोण, वय काय, लिंग काय, काय बघायला आवडतं, कुठल्या अॅड स्किप न करता बघितल्या आहेत, प्रोफेशन काय, साधारण पगार काय असेल, कुठल्या शहरात रहाता, पत्ता काय, नेबरहुड कसं आहे, आर्थिक स्तर काय असेल, लग्न झालेलं आहे का, लहान मुलांचा कंटेंट बघता का, दिवसाच्या कुठल्या वेळेला काय बघता, ब्राऊजर क्रोम वापरत असाल तर मग दिवाळीच. अॅमेझॉनला तर तुम्ही एक्झॅक्टली किती पैसे कशावर खर्च करता याची तुमच्यापेक्षा जास्त माहिती आहे. आता हा सगळा डेटा मोठ्या प्लेअर कडे असेल तर त्यांचा अॅड प्लॅटफॉर्म असू शकतो.
किंवा हा डेटा देऊन शेअर करुन अॅड प्लॅटफॉर्म कुठली अॅड दाखवायची ते सांगतं. ज्यांना अॅड द्यायच्या आहेत ते अॅड प्लॅटफॉर्मला देतात. लिनिअर टीव्ही (आपला जुना टीव्ही) वरच्या अॅड म्हणूनच जास्त इफेक्टिव्ह नसतात आणि त्यात फीडबॅकही कमी क्लालिटीचा मिळतो. पण त्यातही सुपरबोलच्या प्रेक्षकाचं डेमोग्राफिक माहित असल्याने तेव्हा टार्गेटेड करता येतात.
असो.
म्हणावं तर तसेही नाही... मी
म्हणावं तर तसेही नाही... मी कधीही टॉयलेट क्लिनिंग बद्दल काहीही बघत नाही...तरी सदैव हारपिक , डोमेक्स चा रतीब असतो आणि सौंदर्य प्रसाधने.... !!
Toilet cleaning चे व्हिडियो पण असतात का? Ad साठी ते बघण्याची गरज नाही. समजा तुम्ही मराठी टीव्ही रिलेटेड किंवा इंडियन रेसिपीज इत्यादी बघत असला तर तुम्ही एक स्त्री आहात हे ताडून तुम्हाला cleaning products, cosmetics चे ads दाखवतात.
तुम्ही आजकाल ऑनलाईन लोकसत्ता
तुम्ही आजकाल ऑनलाईन लोकसत्ता वाचत असाल तरी तुम्हाला टॉयलेट क्लिनरची जाहिरात येऊ शकते. त्यांच्या बातम्यांची पातळी बघून जो मनस्ताप होतो, तो टॉयलेटमध्येच मोकळा होतो, हे आता गुगलपासूनही लपून राहिलेले नाही.
हपा
हपा
ऑनलाईन लोकसत्ता वाचत असाल तरी
ऑनलाईन लोकसत्ता वाचत असाल तरी तुम्हाला टॉयलेट क्लिनरची जाहिरात येऊ शकते >>
Pages