माय नेम इज ब्लॉगर, फूड ब्लॉगर
फोर जी फाईव्ह जी ची संपर्क क्रांती करणारी दुनिया आपल्या देशात अवतरली आणि आपल्या जालीय जीवनातही एक मोठा बदल घेऊन आली. आता स्मार्टफोन झालाय आपला नवीन तळहात आणि जालविश्व् बनलंय आपलं दुसरं घर. फेसबुक, इन्स्टा, टिकटॉक वगैरे आता घरचेच झालेत पण गेली काही वर्ष टिकटॉकर्स, स्टॅन्ड अप कॉमेडीयन्स आणि यू ट्युबर्स च्या जोडीला प्रचंड फोफावलेला एक नवा वर्ग म्हणजे फूड ब्लॉगर्स / Vloggers.
जगभरातील एकूण फूड ब्लॉगर्स सुमारे २२ कोटी आहेत अन त्यातले निम्मे एकट्या भारतात आहेत म्हणे. आता एव्हढ्या प्रचंड संख्येने रोज नवीन काही Vlogging साठी तेवढ्याच संख्येत खाण्यापिण्याच्या जागा पण हव्या. होते नव्हते ते सर्व प्रसिद्ध 'स्पॉट्स कव्हर झाले' (हो असेच म्हणायचे) असल्यामुळे आता गाडी वळलीय गाड्यांकडे. भारतभरातील गल्लीबोळातल्या बबड्या - बबलींनी आपल्याला रस्तोरस्ती, गावोगावी, गल्लोगल्ली भरत असलेल्या खाद्यजत्रेची दैनिक वारी घडवून आणण्याचा चंगच बांधलाय. अक्षरशः लाखो फूड ब्लॉगर्स आपले जालीय जीवन व्यापून वर दशांगुळे उरतील असे विक्राळ रूप प्राप्त करते झाले आहेत.
हिंदी, इंग्रजी, मराठी, गुजराती, तेलुगू, तमिळ .... एक भाषा सोडली नाही या बबड्या-बबलींनी. अहिराणी, कच्छी आणि मेवाडी बोलीतही फूड ब्लॉगर्स उदंड आहेत. त्यांची दुबळी दीनवाणी प्रतिभा अखंड ओसंडून वाहत आहे. मठ्ठ रांजणे (माठ म्हटले नाही मिलॉर्ड, प्लीज नोट ! रांजण इज अ बिगर साईज्ड माठ मिलॉर्ड) असे बहुसंख्य फूड ब्लॉग्जर्सचे थोडक्यात वर्णन करता येईल. भाषा गचाळ, गृहपाठ-अभ्यास नाही, शब्दखजिना रिता आणि संवादफेक वगैरे तर दुसऱ्या ग्रहावरच्या गोष्टी. भाषेची गिरणी कोणतीही असू देत यांचं दळण सेम-टू -सेम. बरं स्वतःच्या ब्लॉगचे / चॅनेलचे नाव तरी धडके घ्यायचे ना, तर ते ही नाही. नाव काय तर 'भुक्कड' 'भूखा सांड' 'पोटात किडे' वगैरे. ‘पोटातले जंत’ वगैरे अजून कोणी नाहीये ही देवाची कृपा. हिंदीत 'भुक्कड' ही शिवी आहे हे माहिती असण्याची काही गरज नाहीच. भुकेले म्हणजे भुक्कड समजत असावेत, दोन्ही शब्दात 'भूक' कॉमन आहे ना, झाले मग.
सगळ्यात भयाण असते ती यांची त्रयोदश प्रश्नोत्तरी. म्हंजे तेरा मठ्ठ प्रश्न आणि त्यांची (मिळालीच तर) उत्तरे :
१) टपरीवजा जागा असेल तर - भैय्या तुम्हारा नाम बताओ हमारे दर्शको के लिये (याचं मराठी दादा / काका / वैनी / ताई तुमचं नाव सांगा असे). हे दुकान कधीपासून असे विचारले तर याचं उत्तर उत्तर भारतीय टपरीवाला २५ वर्षाच्या पुढे असेच देणार. जुने दुकान / हॉटेल असेल तर गल्ल्यावरच्या इसमाला डायरेक्ट तुमची कितवी पिढी हे दुकान चालवणारी असे विचारायचे. तसा नियमच आहे.
दिल्ली-मथुरा-आग्रा शहरातले कळकट्ट जुनाट दिसणारे दुकान असेल तर हमखास ‘हमारे परदादाजी ने शुरु किया था और अब मै और मेरा बेटा देखते हैं’ असे लोणकढे उत्तर मिळेल. दुकान १० वर्षे जुने का असेना. नॉनव्हेज पदार्थ विकणारे असतील तर कुठल्याश्या अवधी-लखनवी-रामपुरी नवाबजाद्याच्या खानसाम्याची सातवी-आठवी पिढी असणार याची खात्रीच. त्याकाळी साधारण अर्धी जनता खानसाम्याचे (आणि सोबत अखंड पुनरुत्पादनाचे) काम करत असल्याशिवाय आज गल्लीबोळात त्यांचे वंशज सापडते ना.
२) कितने साल से खडे हो आप यहाँ ? अरे ठोंब्या, तो रोज संध्याकाळी फक्त ३ तासच अमुक पदार्थ विकतो ते तूच नाही का सांगितले व्हिडिओच्या सुरवातीला? तो मनुष्य फक्त तीन तास रोज उभा राहतो तिथे, कितने सालों से नाही ! तो काय वर्ष वर्ष उभ्याने तपश्चर्या करणारा योगी आहे का ?
३) थोडे लाडात येऊन (ब्लॉगर स्त्रीपात्र असेल तर अति लाडात येऊन) - तर मग आज तुम्ही कॉय 'बनवणार' आमच्या साठी? बटाटवड्याच्या स्टॉल वर बटाटेवडे करतात, डोश्याच्या स्टॉल वर डोसे, अजून काय कप्पाळ ? आणि हो, मराठीत सर्व खाद्यपदार्थ 'बनवले' जातात, ठीक वैसे ही जैसे हिंदी में 'बनाये' जाते हैं. अशी ही बनवाबनवी.
४) हे कश्यापासून 'बनते'? किंवा हिंदीत 'ये किस चीज से बनता है भैय्या? अरे वज्रमूर्खांनो, तुमच्या ब्लॉगचे ब्रीदवाक्य 'जायके के जानकार' आहे ना? तुम्ही स्वतःला फूडी, खवैय्ये वगैरे म्हणवता ना? मग साधी जिलबी करण्यासाठी काय पदार्थ लागतात हे सुद्धा तुम्हाला माहित नाही? अरे जिलबी आणि इमरतीतला फरक समजायला तुम्हाला पुढचा जन्म घ्यावा लागेल रे. कदाचित इमरतीसाठी उडीद भिजवून वस्त्रगाळ स्मूथ वाटताना बघून तर तुम्ही दहीवड्याची तयारी चालूये म्हणून मोकळे व्हाल, काही भरोसा नाही.
५) आंटी / भैया ये क्या डाल रहे हो ? वो क्या डाल रहे हो ? आंटी नी मख्ख चेहरा ठेवून 'जीरा' किंवा 'हरा धनिया' असे निष्पाप उत्तर दिले तरी 'आहाहा, ओहोहो, वाह वाह, मजा आनेवाला है दोस्तो' वगैरे ..
६) यानंतर तो स्टार प्रश्न येतो - समस्त फूड ब्लॉगर जनतेला हवाहवासा वाटणारा. ‘बटर कौन सा यूज करते हो ?’ भैय्याचे उत्तर - अमूल. या पॉइंटला समस्त फूड ब्लॉगर जमात वेडीपिशी होते, त्यांचे चेहरे चमकू लागतात, डोळे मिचकावून 'अमूऊऊऊल बतततत्त्त्तर, आहाहा, ओहोहो, वाह वाह. शानदार, गजब है गजब.. असे चित्कार. या पॉईंटला मराठीत अग्गायी गsss ... अम्मूऊल का ? अशी किंचाळी फोडणे आवश्यक.
७) ये देखिये, ये देखिये, ये देखिये (हे जमेल-सुचेल तसे ३ ते ९ कितीही वेळा) .....और ये हो गयी दोस्तो चीज की बारिश ! कोई कंजूसी नही. भाईसाब गजब है गजब.. कितना सारा चीज है देखो. जनाब, मेरे मुंह में तो पानी आ रहा है, रुका ही नही जा रहा है वगैरे. पुन्हा एकदा 'आहाहा, ओहोहो, वाह वाह, मजा आ गया' वगैरे वगैरे.. या सगळ्या बैलांना समोर बसवून प्रत्येकी अर्धा किलो अमूल चीज चे आणि बटरचे स्लॅब जबरदस्ती चावून चावून खायला लावायचे माझे एक हिंसक स्वप्न आहे. चव तुला मूळ पदार्थाची कळली नाहीये अजून आणि कौतुक कसले तर अमूल चीजचे ? हाऊ स्टुपिड इज द्याट ! येणि वे.
८) आणि आता कोविडकाळाची नड म्हणून - भैयाने देखो मास्क पेहना है, सफाई का पूरा ध्यान रखा है - हे बोलत असतांना तो भैया कळकट्ट प्लॅस्टिकच्या जुनाट डब्यातून बॅटर घेऊन तितक्याच कळकट्ट कढईत पुनःपुन्हा वापरून काळ्या झालेल्या तेलात 'इंद्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहा' च्या निरिच्छ वृत्तीने अग्नी-आहुती टाकत असतो, त्याच हातांनी हजारो हात लागून आलेल्या नोटा-नाणी मोजून घेत-देत असतो... ‘हायजिन का पूरा ध्यान’ कसे ठेवलेय यावर आमचे ब्लॉगर दादा/ ताई कंठरावाने जीव तोडून सांगत असतात ...
९) विक्रेत्या व्यक्तीचे केस पांढरे आणि कपडे थोडे जूनसर असतील तर यांना ताबडतोब 'हार्ड वर्किंग आंटी/अंकल' असा खिताब न मागता देण्यात येतो. खाण्यापिण्याचा स्टॉल चालवणे हे कष्टाचेच काम आहे, कुणीही केले तरी. त्याचा वयाशी किंवा राहाणीमानाशी काहीही संबंध नाही. हे 'हार्ड वर्किंग' तर मग उरलेले काय स्वतःच्या महालातील बागेतल्या गुलाबकळया खुडतात काय रस्त्याच्या कडेला त्यांच्या उन्हातल्या टपरीत ? हार्ड वर्किंग अंकल म्हणे. काहीही.
१०) हे रटाळ प्रश्नोपनिषद ह्या पॉइंटला थोडे मंद्र सप्तकाकडे झुकते, ब्लॉगरचे किंचाळणे थोडे(सेच) कमी होते - पदार्थांची चव घेण्याचा एक १० सेकंदाचा कार्यक्रम उरकला जातो. तो जगात भारी पदार्थ ओठांच्या बाह्यभागाला जेमतेम स्पर्श करताच ही मंडळी माना डोलावून डोळे मिटू लागतात आणि जिभेचा एक फक्त त्यांनाच जमणारा 'टॉककक्क' असा चित्तचमत्कृतिकारक आवाज काढतात. ब्लॉगर मराठी असेल तर 'मस्त मस्त मस्स्स्सस्स्स्त असे चढत्या भाजणीचे मस्तकात जाणारे मस्तकार आणि हिंदी असेल तर तेच परत मझा आ गया. ह्यावेळी तो पदार्थ चीजयुक्त असल्यास त्याला करकचून दाबून वितळलेल्या चीजचे ओंगळवाणे ओघळ क्लोजअप घेऊन दाखवणे हा अनेकांचा छंद असतो.
११) बरं, साधारण सव्वादोन सेकंदात यांना पदार्थातले सर्व बारकावे लग्गेच समजतात. पदार्थात 'लसणीचा मस्स्त फ्लेवर आलाय' वगैरे शेरे देता येतात. अरे दादा, त्या माणसानी किलोभर पदार्थ करतांना पाव किलो लसूण आमच्या डोळ्यादेखत टाकलाय रे, तूच नाही का दाखवला व्हिडीओ आम्हाला? तो तुझा 'फ्लेवर' पदार्थ करतांना, खातांना आणि नंतर खाऊन ढेकर देताना किलोमीटरभर अंतरातही जाणवेल ना रे... फ्लेवर म्हणे ! खातांना कचाकचा लसूण येईल दाताखाली.
१२) यांनतर एक राउंड होतो तो - लय भारी, लय म्हंजे लयच भारी, जगात भारी, जाळ अन धूर संगटच, आजवर खाल्लेल्या मिसळीत सर्वात भारी, ऐसी पानीपुरी / टिक्की / जलेबी आप को पूरी दुनिया में कहीं नहीं मिलेगी, गजब का स्वाद वगैरेचा ... 'जग' आणि 'पूरी दुनिया' म्हणजे यांच्या लेखी त्यांना माहिती असलेल्या त्यांच्या गावातील चारसहा जागा! अरे नतद्रष्ट जीवांनो, दुनिया फार मोठी आहे. तुमच्या मोहल्ल्यात, वस्तीत, गावात जे काही मिळतं ते अनुभवाच्या तोकडेपणामुळे तुला 'लय भारी' वाटत असेल तर तो दोष तुझा आहे, दर्शकांचा नाही. अनुभवाचं वर्तूळ मोठं करा रे, दायरा बढाओ !
१३) आता आपल्या राशीतील शनी साडेसातीच्या शेवटच्या टप्प्यात येतो. दोन सेकंदात 'तुमचा पत्ता नीट सांगा आंटी / ताई/ दादा/ भैय्या' असे टपरीमालकाला धमकावून आणि पदार्थ मिळण्याचे टायमिंग वगैरे तोंडातल्या तोंडात सांगून झाले की मग .... तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच खूपच फारच अतीच आवडलाच्च असेलच्च, म्हणून पेज लाईक करा, सब्सक्राईब करा, शेयर करायला विसरू नका. आम्ही असेच नवनवीन खाण्याच्या जागा घेऊन पुन्हा येऊ असे धमकीवजा आश्वासन आणि मग हुश्श...... संपले टॉर्चर !
मराठीत फूड ब्लॉगर तुलनेने कमी आहेत. जे आहेत ते 'कानातून धूर आणणारी मिसळ' आणि 'सर्वात मोठी गावरान / कारभारी / सरपंच मटन थाळी' यापलीकडे फार काही जाऊ शकलेले नाहीत. मराठी फूड ब्लॉगर्सपैकी शेकडा ९९ लोक Mutton चा उच्चार 'मटण' आणि Chicken चा उच्चार 'चिकण' असा का करतात हे न सुटणारे कोडे आहे. दोन्ही इंग्रजी शब्दांना सुयोग्य सुटसुटीत पर्याय मराठीत अजूनही न रुजल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करूया.
‘आजच्या धकाधकीच्या जीवनात’ किंवा ‘कधी कधी आपल्याला घरी जेवण बनवायला (स्वयंपाक करायला नाही, प्लीज नोट माय लॉर्ड) कंटाळा येतो’ अशी रटाळ आणि चावून चोथा झालेल्या पाण्याहून पातळ शब्दात फूड व्हिडिओची सुरुवात करणाऱ्या ब्लॉगर्सचे पुढचे निवेदन ऐकण्याची इच्छा होत नाही. ते मात्र नेटाने ४-५ मिनिटे दळण दळतात. टीव्हीच्या मराठी बातमीदारांचे 'जसे की तुम्ही बघू शकता' टाईपचे मराठी आणि 'भन्नाट', 'मस्त', 'चमचमीत' आणि सांगणारी व्यक्ती पुण्या-ठाण्याची असल्यास 'अप्रतिम' अशा चार विशेषणांचा आलटून पालटून वापर करीत कोणत्याही पदार्थाचे, हॉटेलचे किंवा टपरीचे वर्णन पूर्ण करतात. त्या शहरात-गावात शेकडो टपऱ्यांवर सेम पदार्थ मिळत असला तरी त्यांच्या आजच्या एपिसोडमधले ठिकाण 'शहरातल्या खवैयांची पंढरी' वगैरे असल्याचे बिनधास्त सांगतात. ही पंढरी मात्र प्रत्येक एपिसोडला बदलते, गाभाऱ्यात कधी वडापाव तर कधी 'मेंदू' वडा (मेदुवडा नाही) असल्याने भक्तही बदलत असावेत. ह्यांचं काम फक्त 'वॉव वॉव', 'ओ माय गॉड' चे चित्कार काढणे, 'बघा बघा कित्ती बटर सोडलंय' किंवा 'पुरी कशी टम्म फुललीय' अशा त्याच त्या कॉमेंट आणि त्याला जोडून दुसरी-चौथीतली मुलं शालेय नाटकात करतील त्या लेव्हलचा पूरक अभिनय करत राहणे एव्हढेच.
चहाच्या चमच्याने दोन दोन चमचे रंगहीन-चवहीन-वासहीन टाईपचे पदार्थ १०-१२ वाट्यांमधून देणाऱ्या 'अनलिमिटेड थाळी' प्रकाराचे ह्या लोकांना फार कौतुक. 'अनलिमिटेड थाळी' पद्धतीच्या जागांचे विशेष प्रेम हे मराठी आणि गुजराती दोन्ही फूड ब्लॉगरमध्ये दिसते. 'पोटभर खा, अनलिमिटेड... थाळीत ‘हे ही’ मिळते, ‘ते ही’ मिळते, अनलिमिटेड, अनलिमिटेड - तारसप्तकात हे पुन्हा पुन्हा सांगणे आणि वर 'फक्त' अमुक अमुक रुपये असे ठासून सांगत राहणे मराठी-गुजराती दोन्हीकडे असते. ह्या थाळी प्रकाराच्या उपाहारगृहांची नावे हा एक वेगळाच विषय आहे. आता महाराजा, महाराणी, राजधानी, थाटबाट वगैरे नावे जुनी झाल्यामुळे 'सासुरवाडी', 'रजवाडु', 'ससुराल', सासूमाँ की रसोई', 'पाहुणचार', 'जावईबापू' वगैरे नावे चलनात आहेत, थाळीतले पदार्थ मात्र तेच जुनेपुराणे. जून झालेल्या जावयाला कोण विचारतो सासुरवाडीत? वाढलंय ते खा गुमान. आमचे ब्लॉगर मित्र मात्र लग्नानंतर पहिल्यांदाच मांडवपरतणीला सासुरवाडीला गेलेल्या जावयासारखे उत्साहात !
'स्ट्रीट फूड' म्हटले की स्वच्छतेचा मुद्दा बहुतेक ठिकाणी ऑपशनलाच टाकावा लागतो. वापरलेला कच्चा माल आणि जागेची स्वच्छता आधीच 'अनहेल्दी' श्रेणीची असेल तर तयार झालेले प्रॉडक्ट अधिकाधिक 'सुपर अनहेल्दी प्रो मॅक्स' कसे करता येईल याची जणू देशव्यापी स्पर्धा आहे. भारतीय स्ट्रीट फूड वेंडर्स आणि फूड ब्लॉगर्सच्या जगात ज्यात त्यात बटर ओतणे आणि भसाभसा मायोनिझ, चीज टाकणे म्हणजे पदार्थ 'भारी' असे एक गृहीतक जोरात आहे. मुंबई- अहमदाबाद पट्ट्यात तर सॅन्डविचमध्ये ब्रेड ऑप्शनल आणि चीज हाच मुख्य घटक पदार्थ झालाय.
कसलीशी गचाळ 'फ्यूजन' रेसिपी असेल एखाद्या जागी तर मग ह्यांचे वासरू वारं पिते जणू. मुळात स्ट्रॉबेरीचा पिझ्झा, अननसाची भजी आणि श्रीखंडाचे स्टफिंग असलेले सॅन्डविच खायला कोणी का तयार होईल हेच कळत नाही. त्यावर अगदी किळस वाटेल एव्हढी 'चीज की बारिश' आहेच. हे असले उद्योग करणाऱ्या जागा सहा-आठ महिन्यात गाशा गुंडाळतात हे बघितले आहे. पण असल्याच जागा फूड ब्लॉगर्सच्या यादीत सर्वात वर असतात, अलग आणि ‘हटके’ म्हणून.
ह्या बटबटीत पार्श्वभूमीवर दर्जेदार फूडब्लॉगिंग करणाऱ्या काही मोजक्याच लोकांचे काम उठून दिसते. विषयातले ज्ञान, केलेला रिसर्च, अन्नाविषयीचे मौलिक चिंतन, जिव्हेचा जागतिक स्वादानुभव, स्वतःच्या अंगी असलेला तोलामोलाचा सुगरणपणा, सुंदर भाषा असे सर्व एकत्र असल्यामुळे विनोद दुआंचा 'जायका इंडिया का' सारखा दर्जेदार कार्यक्रम कोण विसरू शकेल? अनेक वर्षांआधी देशातील वेगवेगळ्या शहरातल्या खाद्यजत्रेला घरोघरी पोहचवणारे आद्य फूड ब्लॉगरच म्हणावे त्यांना. (प्रस्तुत हौशी लेखकूला दुआंच्या दर्जेदार प्रकाशनासाठी खाद्यभ्रमंतीबद्दलच लिहायला मिळाले हा बहुमान इथे आत्मस्तुतीचा दोष पत्करूनसुद्धा सांगावा वाटतो मिलॉर्ड )
आता उदंड झालेल्या कोट्यावधी फूड ब्लॉगर्समधील काहींना लाखो प्रेक्षक आहेत. त्यांना मोठमोठ्या तारांकित हॉटेल्समध्ये मानाची आमंत्रणं असतात, चकटफू. काहींना भरपूर द्रव्यप्राप्ती सुद्धा होते म्हणे. उर्वरित लाखो-हजारोंना काही लाईक्स आणि एक दोन कॉमेंटवर समाधान मानावे लागत असणार. आणि आपल्या सारख्या दर्शकासाठी आहेच 'आहाहा, ओहोहो, वाह वाह, मजा आनेवाला है दोस्तो आणि मस्त मस्तत्त्त्त मस्तत्त्त्त चीज आणि अमूल बत्तर ! ..
समाप्त
* * *
(लेखातील चित्रे जालावरून साभार)
अनिंद्य , धमाल लिहिले आहे.
अनिंद्य , धमाल लिहिले आहे.
तुम्ही लिहिलेले सगळं एकदम पटलं .
तशीच दिपीका कक्कर..'दिपीका की
तशीच दिपीका कक्कर..'दिपीका की दुनिया' वाली..आधी आवडत होते तिची विडिओ.
आता कंटाळा आला..
घर ातला प्रत्येक दिवस, प्रत्येक फंक्शन, सणवार.. मग त्यानिमित्ताने केलेले पदार्थ, trips, shopping सगळच दाखवत सुटलीये.. नवर्याला व नंदेलाही आणलय पुढे यातुन.
Trip ला गेली तरी तिथल्या hotel मधे पण ही एखादा पदार्थ करणार.
बाकी काही trip एंजॉय करत नाही.
सिरीयलच्या शुटिंगला पण मधल्या वेळेत हिचं सेटवरचं कुकिंग बघा..
तिचा प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस ती कसा घालवते हे दाखवत बसते.
सासर्यांना ऍडमिट केलं त्याचही शुटिंग.. दवाखान्यात..आत जाताना.. बाहेर येताना.वडिलांची कशी आम्ही काळजी घेतोय हे दाखवायची धडपड..
^^मायबोलीवर स्कोप आहे.
^^मायबोलीवर स्कोप आहे.
रणवीर ब्रार अमेझॉन प्राईम
रणवीर ब्रार अमेझॉन प्राईम वरच्या 'मॉडर्न लव्ह मुंबई' या वेबसिरीज मधील 'बाई' नावाच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये एक समलैंगिक दाखवला आहे.
हे मोठे लोक झाले.. टिपिकल
हे मोठे लोक झाले.. टिपिकल indian girl म्हणून लातूरची एक मुलगी आहे. अशक्य बेकार video आहेत. कंटेंट असा काही नाहीच वरून बालिश भाषा.. मला तिला बघून डोक्यावर हात मारून घ्यावासा वाटला होता.
तसच कर्ली टेल्स वाली कामिया जानी. कधीकधी अत्यंत सुरेख कसदार कंटेंट असतो . पण एकंदरीतच पाट्या टाकू प्रकार जास्त आहे.
रणवीरला बघितला वेबसिरीजमध्ये.
रणवीरला बघितला वेबसिरीजमध्ये. तिथेही शेफ दाखवला आहे. त्याच्या सारखी नल्ली निहारी हिरोने कधी खाल्ली नसेल असा त्याचा दावा असतो जो हिरो खोडून काढतो. ते गॅसवर पदार्थ बनत असताना लोकांना बोलवून हाताने ती उकळत असलेली वाफ आपल्याकडे घेतल्यासारखी करून वास घेणे म्हणजे जबरदस्ती लोकांना स्वतः चे कौतुक करायला लावण्यासारखे आहे. पदार्थ चांगला बनत असेल तर सुगंध आपोआप सगळीकडे पसरतो. अभिनय करणे त्याला नवीन नसावे. इथे फक्त समलैंगिक शेफ दाखवला आहे.
इथे फक्त समलैंगिक शेफ दाखवला
इथे फक्त समलैंगिक शेफ दाखवला आहे》पुरुषांना पण जाळ्यात ओढतोय की काय?
‘टुडेज स्पेशल‘ ची दर्शना
‘टुडेज स्पेशल‘ ची दर्शना तांबोळी, कमालीची अशुद्ध मराठी आणि इंग्लिश शब्दही चुकीचे बोलते
‘आजचा टुडेज स्पेशल’ एपिसोड अशी दर वेळी सुरवात आणि जेवण बनवणे वगैरे तर असतच !
हेब्बारचे व्हिडिओ छोटे आणि
हेब्बारचे व्हिडिओ छोटे आणि 'टू द पॉईंट' असतात त्यामुळे मलापण आवडतात. पण बऱ्याच पदार्थांमध्ये ती कांदा, टॉमेटो, आलंलसूण पेस्ट, गरम मसाला हे घालते. तोचतोचपणा वाटतो त्यामुळे.
कांदा, टॉमेटो, आलंलसूण पेस्ट,
कांदा, टॉमेटो, आलंलसूण पेस्ट, गरम मसाला हे घालते. तोचतोचपणा वाटतो
National levelला आहे. राजस्तान,कर्नाटक कुठेही गेलो तर मेनू कार्ड पाहून ओर्डर करायच्या हाटिलात जात नाही. ती स्थानिक लोकांसाठी असतात.
'बाई' बोर आहे, पण एक वाक्याचा
'बाई' बोर आहे, पण एक वाक्याचा 'टेक अवे' म्हणजे -
'The best ingredient in great food is LOVE - प्यार !'
आता हे क्लिशे आहे पण क्लिशे इज क्लिशे फॉर अ रीझन
छान लिहिलंय! मी भारतातल्या
छान लिहिलंय! मी भारतातल्या Golgappa girl आणि SugarSpiceNice या दोघींचे व्हिडिओ बघते अधूनमधून. Mark Weins आणि strictly dumpling चे व्हिडिओ मजेशीर आहेत. एकेकाळी खूप पाहिले पण आता पहात नाही इतके.
अशक्य म्हणजे अशक्य नाटकी
अशक्य म्हणजे अशक्य नाटकी बोलते, चालते, यडी आहे एकदम, >>>>>totally
कृष्णाई गझनेचे व्हिडिओज छान
कृष्णाई गझनेचे व्हिडिओज छान असतात फक्त ते भविष्यात शुभांगी कीर यांच्या व्हिडिओच्या मार्गाने जायला नकोत.
काहीही ‘बनवणे’ आणि खूप ‘सारं’
काहीही ‘बनवणे’ आणि खूप ‘सारं’ आता सगळ्यांच्या तोंडी बोकाळलं आहे. युट्युब कशाला इथे मायबोलीवरही हिंदी शब्द मराठी असल्याच्या थाटात लिहून तेच कसं योग्य मराठी आहे हे ठसवणारे आयडी आहेतच की.
आईच्या हातचं मध्ये आलोक राजवाडेला त्याच्या आईने व्हिडिओ सुरु झाल्या झाल्याच ‘बनवणं’ म्हणू नये हे सांगितलं हे फारच आवडलं. त्याला काही फरक पडला नाही म्हणा. तो पुन्हा तसंच बोलत होता.
एक मृणालिनी बेंद्रे म्हणून
एक मृणालिनी बेंद्रे म्हणून पुण्यातील ताई आहेत, अशक्य म्हणजे अशक्य नाटकी बोलते >>>> ही 'कुर्यात सदा टिंगलम' च्या ओरिजिनल कास्ट मधे होती. आनंद अभ्यंकरची बहिण.
ते सर्व सोडा, इतके शेफ
ते सर्व सोडा, इतके शेफ लोकांचे व्हिडिओ बघतो आपण, काम झाल्यावर एकतरी नग गँस बंद करतांना दिसलाय का ?
आईच्या हातचं मध्ये आलोक
आईच्या हातचं मध्ये आलोक राजवाडेला त्याच्या आईने व्हिडिओ सुरु झाल्या झाल्याच ‘बनवणं’ म्हणू नये हे सांगितलं हे फारच आवडलं. >>> हो. माझ्या घरात (माझ्या जवळचे) जे जे बनवतात आणि मी त्यांना आलोकच्या आईसारखं सांगत असते त्यांना तो व्हिडीओ पाठवला.
>>आईच्या हातचं मध्ये आलोक
>>आईच्या हातचं मध्ये आलोक राजवाडेला त्याच्या आईने व्हिडिओ सुरु झाल्या झाल्याच ‘बनवणं’ म्हणू नये हे सांगितलं हे फारच आवडलं.
+११
मला ते ‘तुम्ही पाहु शकता‘
मला ते ‘तुम्ही पाहु शकता‘ डोक्यात जाते. अरे भावा, आम्ही येडचापासारखे तुझा विडीओ बघत वेळ घालवतोय, तु जे
दाखवतोयस ते डोळ्यांवर आदळतेय, त्यात अजुन तुझे ‘ तुम्ही पाहु शकता’ काय??? पाहतोयच ना???
मला रणवीर आवडतो. इतक्या
मला रणवीर आवडतो. इतक्या भाउगर्दीत फार थोडे शेफ खरे वाटतात, त्यात रणवीर येतो. टिपी करायचा असला तर रणवीर, रेसिपी प्रत्यक्ष करायची असेल तर हेब्बर बघा फटाफट आणि पदार्थ करा झटाझट. कुणाल कपुर पण गोड आहे. कुकिन्ग शुकिन्ग पोर्गा यमन पण उगीच चर्हाट न लावता पदार्थ दाखवतो.
हल्ली सुदैवाने माझा एकुणच सो मि वावर व उत्साह कमी झालेला आहे. तो असाच कमी होत राहो ही इशचरणी प्रार्थना.
हे तीन पंजाबी शेफ एक एक
हे तीन पंजाबी शेफ एक एक स्पेक्ट्रम वर राहतात. रण वीर ब्रार, कुणाल कपूर व अजय चोप्रा. व विकास खन्ना एक क्युट आहे सध्या फार दिसत नाही विनीत कायतरी पण एक नेटफ्लिक्स वर शो होता तो ही खास पंजू. ह्याचे बायको बरोबरचे शोज आहेत.नेटफ्लिक्सवर एक सीरीज. सर्व एकच टाइप हाय मॅ स्क्यु लानिटी. ( कांदा कापतो) मी कसा फ्रेट . व रेसीपी दाखवून उपकार करतो. विकास खन्ना साध्या रेसेपीचे काही त्याचे असे इंटरप्रिटेशन करतो व त्याच्या न्युयॉर्क मधील हाटेला त खपेल असे बनवतो. व आहे अमृतसर मधलाच पण वावर असा की व्हाइटर दॅन व्हाइट मॅन.
कोचिन मधीन नेट्स रत्नागिरीत जिताडा फिश पकडतो. तेव्हा अगदी व्हाइट मॅन च्या वरता ण अभिनय. ( हे जुने शोज आहेत )
रेसीपीच्या बरोबरीने भांडी पातेली पण विकतात. आपले विश्णू जी पण एकदम काहीही जुनेपाने विकतात. एक फ्राय पाव्ड र काही तरी सस्पिशिअस पदार्थ तळणीच्या तेलात घालतात. पण ह्याला एफ एस एस आय अॅप्रुवल आहे का विचार्ले तर उत्तर नाही.
मस्त लेख.
मस्त लेख.
काम झाल्यावर एकतरी नग गँस बंद करतांना दिसलाय का ? >> आणि ओटा स्वच्छ करणे, झाक-पाक करणे इ इ ...
विकास खन्नाचे यु ट्युब चॅनेल
विकास खन्नाचे यु ट्युब चॅनेल नसावे बहुतेक. मी तरी पाहिले नाही. मला तरी ह्या लोकान्मध्ये अॅटिट्युड वाटला नाही. विकास खन्नाला मास्टरशेफ मध्ये पाहिले होते व थोडा धक्का बसला होता. इतका मोठा शेफ व इतका नम्र. लोकान्शी बोलायच्या पद्धतीवरुन तसे वाटले. मी काही प्रत्यक्ष भेटलेले नाही.
ओटा कसला धुताहेत. पदार्थ
ओटा कसला धुताहेत. पदार्थ काढतानाही अर्धा भान्ड्यातच राहतो हो. आमच्यात पदार्थ केलेले भान्डे आधी नीट पुसुन पदार्थ काढुन घ्यायची व त्यात थोडे पाणी घालुन ते पाणीही घ्यायची पद्धत आहे.
चपाती कशी बनवावी हे कोणत्या
चपाती कशी बनवावी हे कोणत्या व्ह्लॉगवर दाखवतात ?
खराखुरा शेफ दाखवायचा असेल तर रेसिपी सांगून झाल्यावर घरी फोन करून कूकला आज काय बनवायचे हे सांगतो हे नक्की दाखवले पाहीजे.
>>तुम्ही पाहु शकता‘>> हा एकदम
>>तुम्ही पाहु शकता‘>> हा एकदम परवलीचा शब्द आहे. कोणताही ब्लॉगर असो, हे हमखास म्हणतोच म्हणतो.
कूकिंग शुकिंग पण छान असतो...
कूकिंग शुकिंग पण छान असतो...
आता बंद करतील gas .
आता बंद करतील gas .
रोजचे तीस रुपये झालाय आताच. पन्नास व्हायचाय दिवाळीपर्यंत.
Anuradha 's channel म्हणून
Anuradha 's channel म्हणून एका वयस्कर बाईंचा चॅनेल आहे. मला आवडतात त्यांचे व्हिडीओ. चालू शकतं ही त्यांची परवलीची फ्रेज आहे.
Pages