माय नेम इज ब्लॉगर, फूड ब्लॉगर !

Submitted by अनिंद्य on 12 May, 2022 - 03:54

माय नेम इज ब्लॉगर, फूड ब्लॉगर

4BD282D1-1FD5-4AA5-8419-0D78BD3E28FC.jpeg

फोर जी फाईव्ह जी ची संपर्क क्रांती करणारी दुनिया आपल्या देशात अवतरली आणि आपल्या जालीय जीवनातही एक मोठा बदल घेऊन आली. आता स्मार्टफोन झालाय आपला नवीन तळहात आणि जालविश्व् बनलंय आपलं दुसरं घर. फेसबुक, इन्स्टा, टिकटॉक वगैरे आता घरचेच झालेत पण गेली काही वर्ष टिकटॉकर्स, स्टॅन्ड अप कॉमेडीयन्स आणि यू ट्युबर्स च्या जोडीला प्रचंड फोफावलेला एक नवा वर्ग म्हणजे फूड ब्लॉगर्स / Vloggers.

जगभरातील एकूण फूड ब्लॉगर्स सुमारे २२ कोटी आहेत अन त्यातले निम्मे एकट्या भारतात आहेत म्हणे. आता एव्हढ्या प्रचंड संख्येने रोज नवीन काही Vlogging साठी तेवढ्याच संख्येत खाण्यापिण्याच्या जागा पण हव्या. होते नव्हते ते सर्व प्रसिद्ध 'स्पॉट्स कव्हर झाले' (हो असेच म्हणायचे) असल्यामुळे आता गाडी वळलीय गाड्यांकडे. भारतभरातील गल्लीबोळातल्या बबड्या - बबलींनी आपल्याला रस्तोरस्ती, गावोगावी, गल्लोगल्ली भरत असलेल्या खाद्यजत्रेची दैनिक वारी घडवून आणण्याचा चंगच बांधलाय. अक्षरशः लाखो फूड ब्लॉगर्स आपले जालीय जीवन व्यापून वर दशांगुळे उरतील असे विक्राळ रूप प्राप्त करते झाले आहेत.

हिंदी, इंग्रजी, मराठी, गुजराती, तेलुगू, तमिळ .... एक भाषा सोडली नाही या बबड्या-बबलींनी. अहिराणी, कच्छी आणि मेवाडी बोलीतही फूड ब्लॉगर्स उदंड आहेत. त्यांची दुबळी दीनवाणी प्रतिभा अखंड ओसंडून वाहत आहे. मठ्ठ रांजणे (माठ म्हटले नाही मिलॉर्ड, प्लीज नोट ! रांजण इज अ बिगर साईज्ड माठ मिलॉर्ड) असे बहुसंख्य फूड ब्लॉग्जर्सचे थोडक्यात वर्णन करता येईल. भाषा गचाळ, गृहपाठ-अभ्यास नाही, शब्दखजिना रिता आणि संवादफेक वगैरे तर दुसऱ्या ग्रहावरच्या गोष्टी. भाषेची गिरणी कोणतीही असू देत यांचं दळण सेम-टू -सेम. बरं स्वतःच्या ब्लॉगचे / चॅनेलचे नाव तरी धडके घ्यायचे ना, तर ते ही नाही. नाव काय तर 'भुक्कड' 'भूखा सांड' 'पोटात किडे' वगैरे. ‘पोटातले जंत’ वगैरे अजून कोणी नाहीये ही देवाची कृपा. हिंदीत 'भुक्कड' ही शिवी आहे हे माहिती असण्याची काही गरज नाहीच. भुकेले म्हणजे भुक्कड समजत असावेत, दोन्ही शब्दात 'भूक' कॉमन आहे ना, झाले मग.

सगळ्यात भयाण असते ती यांची त्रयोदश प्रश्नोत्तरी. म्हंजे तेरा मठ्ठ प्रश्न आणि त्यांची (मिळालीच तर) उत्तरे :

१) टपरीवजा जागा असेल तर - भैय्या तुम्हारा नाम बताओ हमारे दर्शको के लिये (याचं मराठी दादा / काका / वैनी / ताई तुमचं नाव सांगा असे). हे दुकान कधीपासून असे विचारले तर याचं उत्तर उत्तर भारतीय टपरीवाला २५ वर्षाच्या पुढे असेच देणार. जुने दुकान / हॉटेल असेल तर गल्ल्यावरच्या इसमाला डायरेक्ट तुमची कितवी पिढी हे दुकान चालवणारी असे विचारायचे. तसा नियमच आहे.

दिल्ली-मथुरा-आग्रा शहरातले कळकट्ट जुनाट दिसणारे दुकान असेल तर हमखास ‘हमारे परदादाजी ने शुरु किया था और अब मै और मेरा बेटा देखते हैं’ असे लोणकढे उत्तर मिळेल. दुकान १० वर्षे जुने का असेना. नॉनव्हेज पदार्थ विकणारे असतील तर कुठल्याश्या अवधी-लखनवी-रामपुरी नवाबजाद्याच्या खानसाम्याची सातवी-आठवी पिढी असणार याची खात्रीच. त्याकाळी साधारण अर्धी जनता खानसाम्याचे (आणि सोबत अखंड पुनरुत्पादनाचे) काम करत असल्याशिवाय आज गल्लीबोळात त्यांचे वंशज सापडते ना.

२) कितने साल से खडे हो आप यहाँ ? अरे ठोंब्या, तो रोज संध्याकाळी फक्त ३ तासच अमुक पदार्थ विकतो ते तूच नाही का सांगितले व्हिडिओच्या सुरवातीला? तो मनुष्य फक्त तीन तास रोज उभा राहतो तिथे, कितने सालों से नाही ! तो काय वर्ष वर्ष उभ्याने तपश्चर्या करणारा योगी आहे का ?

३) थोडे लाडात येऊन (ब्लॉगर स्त्रीपात्र असेल तर अति लाडात येऊन) - तर मग आज तुम्ही कॉय 'बनवणार' आमच्या साठी? बटाटवड्याच्या स्टॉल वर बटाटेवडे करतात, डोश्याच्या स्टॉल वर डोसे, अजून काय कप्पाळ ? आणि हो, मराठीत सर्व खाद्यपदार्थ 'बनवले' जातात, ठीक वैसे ही जैसे हिंदी में 'बनाये' जाते हैं. अशी ही बनवाबनवी.

४) हे कश्यापासून 'बनते'? किंवा हिंदीत 'ये किस चीज से बनता है भैय्या? अरे वज्रमूर्खांनो, तुमच्या ब्लॉगचे ब्रीदवाक्य 'जायके के जानकार' आहे ना? तुम्ही स्वतःला फूडी, खवैय्ये वगैरे म्हणवता ना? मग साधी जिलबी करण्यासाठी काय पदार्थ लागतात हे सुद्धा तुम्हाला माहित नाही? अरे जिलबी आणि इमरतीतला फरक समजायला तुम्हाला पुढचा जन्म घ्यावा लागेल रे. कदाचित इमरतीसाठी उडीद भिजवून वस्त्रगाळ स्मूथ वाटताना बघून तर तुम्ही दहीवड्याची तयारी चालूये म्हणून मोकळे व्हाल, काही भरोसा नाही.

५) आंटी / भैया ये क्या डाल रहे हो ? वो क्या डाल रहे हो ? आंटी नी मख्ख चेहरा ठेवून 'जीरा' किंवा 'हरा धनिया' असे निष्पाप उत्तर दिले तरी 'आहाहा, ओहोहो, वाह वाह, मजा आनेवाला है दोस्तो' वगैरे ..

६) यानंतर तो स्टार प्रश्न येतो - समस्त फूड ब्लॉगर जनतेला हवाहवासा वाटणारा. ‘बटर कौन सा यूज करते हो ?’ भैय्याचे उत्तर - अमूल. या पॉइंटला समस्त फूड ब्लॉगर जमात वेडीपिशी होते, त्यांचे चेहरे चमकू लागतात, डोळे मिचकावून 'अमूऊऊऊल बतततत्त्त्तर, आहाहा, ओहोहो, वाह वाह. शानदार, गजब है गजब.. असे चित्कार. या पॉईंटला मराठीत अग्गायी गsss ... अम्मूऊल का ? अशी किंचाळी फोडणे आवश्यक.

७) ये देखिये, ये देखिये, ये देखिये (हे जमेल-सुचेल तसे ३ ते ९ कितीही वेळा) .....और ये हो गयी दोस्तो चीज की बारिश ! कोई कंजूसी नही. भाईसाब गजब है गजब.. कितना सारा चीज है देखो. जनाब, मेरे मुंह में तो पानी आ रहा है, रुका ही नही जा रहा है वगैरे. पुन्हा एकदा 'आहाहा, ओहोहो, वाह वाह, मजा आ गया' वगैरे वगैरे.. या सगळ्या बैलांना समोर बसवून प्रत्येकी अर्धा किलो अमूल चीज चे आणि बटरचे स्लॅब जबरदस्ती चावून चावून खायला लावायचे माझे एक हिंसक स्वप्न आहे. चव तुला मूळ पदार्थाची कळली नाहीये अजून आणि कौतुक कसले तर अमूल चीजचे ? हाऊ स्टुपिड इज द्याट ! येणि वे.

2962BDB9-033A-43E5-821D-FC667A1EDB73.jpeg८) आणि आता कोविडकाळाची नड म्हणून - भैयाने देखो मास्क पेहना है, सफाई का पूरा ध्यान रखा है - हे बोलत असतांना तो भैया कळकट्ट प्लॅस्टिकच्या जुनाट डब्यातून बॅटर घेऊन तितक्याच कळकट्ट कढईत पुनःपुन्हा वापरून काळ्या झालेल्या तेलात 'इंद्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहा' च्या निरिच्छ वृत्तीने अग्नी-आहुती टाकत असतो, त्याच हातांनी हजारो हात लागून आलेल्या नोटा-नाणी मोजून घेत-देत असतो... ‘हायजिन का पूरा ध्यान’ कसे ठेवलेय यावर आमचे ब्लॉगर दादा/ ताई कंठरावाने जीव तोडून सांगत असतात ...

९) विक्रेत्या व्यक्तीचे केस पांढरे आणि कपडे थोडे जूनसर असतील तर यांना ताबडतोब 'हार्ड वर्किंग आंटी/अंकल' असा खिताब न मागता देण्यात येतो. खाण्यापिण्याचा स्टॉल चालवणे हे कष्टाचेच काम आहे, कुणीही केले तरी. त्याचा वयाशी किंवा राहाणीमानाशी काहीही संबंध नाही. हे 'हार्ड वर्किंग' तर मग उरलेले काय स्वतःच्या महालातील बागेतल्या गुलाबकळया खुडतात काय रस्त्याच्या कडेला त्यांच्या उन्हातल्या टपरीत ? हार्ड वर्किंग अंकल म्हणे. काहीही.

१०) हे रटाळ प्रश्नोपनिषद ह्या पॉइंटला थोडे मंद्र सप्तकाकडे झुकते, ब्लॉगरचे किंचाळणे थोडे(सेच) कमी होते - पदार्थांची चव घेण्याचा एक १० सेकंदाचा कार्यक्रम उरकला जातो. तो जगात भारी पदार्थ ओठांच्या बाह्यभागाला जेमतेम स्पर्श करताच ही मंडळी माना डोलावून डोळे मिटू लागतात आणि जिभेचा एक फक्त त्यांनाच जमणारा 'टॉककक्क' असा चित्तचमत्कृतिकारक आवाज काढतात. ब्लॉगर मराठी असेल तर 'मस्त मस्त मस्स्स्सस्स्स्त असे चढत्या भाजणीचे मस्तकात जाणारे मस्तकार आणि हिंदी असेल तर तेच परत मझा आ गया. ह्यावेळी तो पदार्थ चीजयुक्त असल्यास त्याला करकचून दाबून वितळलेल्या चीजचे ओंगळवाणे ओघळ क्लोजअप घेऊन दाखवणे हा अनेकांचा छंद असतो.

११) बरं, साधारण सव्वादोन सेकंदात यांना पदार्थातले सर्व बारकावे लग्गेच समजतात. पदार्थात 'लसणीचा मस्स्त फ्लेवर आलाय' वगैरे शेरे देता येतात. अरे दादा, त्या माणसानी किलोभर पदार्थ करतांना पाव किलो लसूण आमच्या डोळ्यादेखत टाकलाय रे, तूच नाही का दाखवला व्हिडीओ आम्हाला? तो तुझा 'फ्लेवर' पदार्थ करतांना, खातांना आणि नंतर खाऊन ढेकर देताना किलोमीटरभर अंतरातही जाणवेल ना रे... फ्लेवर म्हणे ! खातांना कचाकचा लसूण येईल दाताखाली.

१२) यांनतर एक राउंड होतो तो - लय भारी, लय म्हंजे लयच भारी, जगात भारी, जाळ अन धूर संगटच, आजवर खाल्लेल्या मिसळीत सर्वात भारी, ऐसी पानीपुरी / टिक्की / जलेबी आप को पूरी दुनिया में कहीं नहीं मिलेगी, गजब का स्वाद वगैरेचा ... 'जग' आणि 'पूरी दुनिया' म्हणजे यांच्या लेखी त्यांना माहिती असलेल्या त्यांच्या गावातील चारसहा जागा! अरे नतद्रष्ट जीवांनो, दुनिया फार मोठी आहे. तुमच्या मोहल्ल्यात, वस्तीत, गावात जे काही मिळतं ते अनुभवाच्या तोकडेपणामुळे तुला 'लय भारी' वाटत असेल तर तो दोष तुझा आहे, दर्शकांचा नाही. अनुभवाचं वर्तूळ मोठं करा रे, दायरा बढाओ !

१३) आता आपल्या राशीतील शनी साडेसातीच्या शेवटच्या टप्प्यात येतो. दोन सेकंदात 'तुमचा पत्ता नीट सांगा आंटी / ताई/ दादा/ भैय्या' असे टपरीमालकाला धमकावून आणि पदार्थ मिळण्याचे टायमिंग वगैरे तोंडातल्या तोंडात सांगून झाले की मग .... तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच खूपच फारच अतीच आवडलाच्च असेलच्च, म्हणून पेज लाईक करा, सब्सक्राईब करा, शेयर करायला विसरू नका. आम्ही असेच नवनवीन खाण्याच्या जागा घेऊन पुन्हा येऊ असे धमकीवजा आश्वासन आणि मग हुश्श...... संपले टॉर्चर !

मराठीत फूड ब्लॉगर तुलनेने कमी आहेत. जे आहेत ते 'कानातून धूर आणणारी मिसळ' आणि 'सर्वात मोठी गावरान / कारभारी / सरपंच मटन थाळी' यापलीकडे फार काही जाऊ शकलेले नाहीत. मराठी फूड ब्लॉगर्सपैकी शेकडा ९९ लोक Mutton चा उच्चार 'मटण' आणि Chicken चा उच्चार 'चिकण' असा का करतात हे न सुटणारे कोडे आहे. दोन्ही इंग्रजी शब्दांना सुयोग्य सुटसुटीत पर्याय मराठीत अजूनही न रुजल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करूया.

‘आजच्या धकाधकीच्या जीवनात’ किंवा ‘कधी कधी आपल्याला घरी जेवण बनवायला (स्वयंपाक करायला नाही, प्लीज नोट माय लॉर्ड) कंटाळा येतो’ अशी रटाळ आणि चावून चोथा झालेल्या पाण्याहून पातळ शब्दात फूड व्हिडिओची सुरुवात करणाऱ्या ब्लॉगर्सचे पुढचे निवेदन ऐकण्याची इच्छा होत नाही. ते मात्र नेटाने ४-५ मिनिटे दळण दळतात. टीव्हीच्या मराठी बातमीदारांचे 'जसे की तुम्ही बघू शकता' टाईपचे मराठी आणि 'भन्नाट', 'मस्त', 'चमचमीत' आणि सांगणारी व्यक्ती पुण्या-ठाण्याची असल्यास 'अप्रतिम' अशा चार विशेषणांचा आलटून पालटून वापर करीत कोणत्याही पदार्थाचे, हॉटेलचे किंवा टपरीचे वर्णन पूर्ण करतात. त्या शहरात-गावात शेकडो टपऱ्यांवर सेम पदार्थ मिळत असला तरी त्यांच्या आजच्या एपिसोडमधले ठिकाण 'शहरातल्या खवैयांची पंढरी' वगैरे असल्याचे बिनधास्त सांगतात. ही पंढरी मात्र प्रत्येक एपिसोडला बदलते, गाभाऱ्यात कधी वडापाव तर कधी 'मेंदू' वडा (मेदुवडा नाही) असल्याने भक्तही बदलत असावेत. ह्यांचं काम फक्त 'वॉव वॉव', 'ओ माय गॉड' चे चित्कार काढणे, 'बघा बघा कित्ती बटर सोडलंय' किंवा 'पुरी कशी टम्म फुललीय' अशा त्याच त्या कॉमेंट आणि त्याला जोडून दुसरी-चौथीतली मुलं शालेय नाटकात करतील त्या लेव्हलचा पूरक अभिनय करत राहणे एव्हढेच.

चहाच्या चमच्याने दोन दोन चमचे रंगहीन-चवहीन-वासहीन टाईपचे पदार्थ १०-१२ वाट्यांमधून देणाऱ्या 'अनलिमिटेड थाळी' प्रकाराचे ह्या लोकांना फार कौतुक. 'अनलिमिटेड थाळी' पद्धतीच्या जागांचे विशेष प्रेम हे मराठी आणि गुजराती दोन्ही फूड ब्लॉगरमध्ये दिसते. 'पोटभर खा, अनलिमिटेड... थाळीत ‘हे ही’ मिळते, ‘ते ही’ मिळते, अनलिमिटेड, अनलिमिटेड - तारसप्तकात हे पुन्हा पुन्हा सांगणे आणि वर 'फक्त' अमुक अमुक रुपये असे ठासून सांगत राहणे मराठी-गुजराती दोन्हीकडे असते. ह्या थाळी प्रकाराच्या उपाहारगृहांची नावे हा एक वेगळाच विषय आहे. आता महाराजा, महाराणी, राजधानी, थाटबाट वगैरे नावे जुनी झाल्यामुळे 'सासुरवाडी', 'रजवाडु', 'ससुराल', सासूमाँ की रसोई', 'पाहुणचार', 'जावईबापू' वगैरे नावे चलनात आहेत, थाळीतले पदार्थ मात्र तेच जुनेपुराणे. जून झालेल्या जावयाला कोण विचारतो सासुरवाडीत? वाढलंय ते खा गुमान. आमचे ब्लॉगर मित्र मात्र लग्नानंतर पहिल्यांदाच मांडवपरतणीला सासुरवाडीला गेलेल्या जावयासारखे उत्साहात !

'स्ट्रीट फूड' म्हटले की स्वच्छतेचा मुद्दा बहुतेक ठिकाणी ऑपशनलाच टाकावा लागतो. वापरलेला कच्चा माल आणि जागेची स्वच्छता आधीच 'अनहेल्दी' श्रेणीची असेल तर तयार झालेले प्रॉडक्ट अधिकाधिक 'सुपर अनहेल्दी प्रो मॅक्स' कसे करता येईल याची जणू देशव्यापी स्पर्धा आहे. भारतीय स्ट्रीट फूड वेंडर्स आणि फूड ब्लॉगर्सच्या जगात ज्यात त्यात बटर ओतणे आणि भसाभसा मायोनिझ, चीज टाकणे म्हणजे पदार्थ 'भारी' असे एक गृहीतक जोरात आहे. मुंबई- अहमदाबाद पट्ट्यात तर सॅन्डविचमध्ये ब्रेड ऑप्शनल आणि चीज हाच मुख्य घटक पदार्थ झालाय.

कसलीशी गचाळ 'फ्यूजन' रेसिपी असेल एखाद्या जागी तर मग ह्यांचे वासरू वारं पिते जणू. मुळात स्ट्रॉबेरीचा पिझ्झा, अननसाची भजी आणि श्रीखंडाचे स्टफिंग असलेले सॅन्डविच खायला कोणी का तयार होईल हेच कळत नाही. त्यावर अगदी किळस वाटेल एव्हढी 'चीज की बारिश' आहेच. हे असले उद्योग करणाऱ्या जागा सहा-आठ महिन्यात गाशा गुंडाळतात हे बघितले आहे. पण असल्याच जागा फूड ब्लॉगर्सच्या यादीत सर्वात वर असतात, अलग आणि ‘हटके’ म्हणून.

ह्या बटबटीत पार्श्वभूमीवर दर्जेदार फूडब्लॉगिंग करणाऱ्या काही मोजक्याच लोकांचे काम उठून दिसते. विषयातले ज्ञान, केलेला रिसर्च, अन्नाविषयीचे मौलिक चिंतन, जिव्हेचा जागतिक स्वादानुभव, स्वतःच्या अंगी असलेला तोलामोलाचा सुगरणपणा, सुंदर भाषा असे सर्व एकत्र असल्यामुळे विनोद दुआंचा 'जायका इंडिया का' सारखा दर्जेदार कार्यक्रम कोण विसरू शकेल? अनेक वर्षांआधी देशातील वेगवेगळ्या शहरातल्या खाद्यजत्रेला घरोघरी पोहचवणारे आद्य फूड ब्लॉगरच म्हणावे त्यांना. (प्रस्तुत हौशी लेखकूला दुआंच्या दर्जेदार प्रकाशनासाठी खाद्यभ्रमंतीबद्दलच लिहायला मिळाले हा बहुमान इथे आत्मस्तुतीचा दोष पत्करूनसुद्धा सांगावा वाटतो मिलॉर्ड Happy )

आता उदंड झालेल्या कोट्यावधी फूड ब्लॉगर्समधील काहींना लाखो प्रेक्षक आहेत. त्यांना मोठमोठ्या तारांकित हॉटेल्समध्ये मानाची आमंत्रणं असतात, चकटफू. काहींना भरपूर द्रव्यप्राप्ती सुद्धा होते म्हणे. उर्वरित लाखो-हजारोंना काही लाईक्स आणि एक दोन कॉमेंटवर समाधान मानावे लागत असणार. आणि आपल्या सारख्या दर्शकासाठी आहेच 'आहाहा, ओहोहो, वाह वाह, मजा आनेवाला है दोस्तो आणि मस्त मस्तत्त्त्त मस्तत्त्त्त चीज आणि अमूल बत्तर ! ..

समाप्त

* * *

(लेखातील चित्रे जालावरून साभार)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

:))

अ‍ॅड्स बघायच्या नसतील तर मोझिला फायरफॉक्स वापरावे. त्यात एक्स्टेंश्न्स आहेत अ‍ॅड ब्लॉक करणारे. ते युट्युबला ही चालतात. मला गेल्या वर्षभरात एकही अ‍ॅड दिसली नाहीये युट्युबवर.

ब्लॉगर मंडळींच्या आर्थिक व्यवहाराबद्दल सोपे करून सांगितल्याबद्दल संबंधितांचे आभार.

पैसे मिळवतात त्यांचे कौतुक आहेच, पण लेखात लिहिलंय त्या वातकारींबद्दल रागही आहे Happy

अनिंद्य : अगदी पटला तुमचा लेख. फुड काय कुठलेही व्लॉग बघताना कंटेट, प्रेझेंटेशनच्या नावाने बोंब, शब्दसंपत्तीचा दुष्काळ प्रकर्षाने जाणवतोे.

मला आवडतो रणवीर ब्रार. तो बारीक सारीक टिप्स सांगतो व्यवस्थित. अर्थात मी त्याचे फ्युजन पदार्थांचे व्हिडीओ नाही बघितले कधी. एकंदरीत माईंडलेस फ्युजन, चीज, बटर, मेयॉनिज, शेजवानचा मारा दिसला की मी व्हिडीओ बघत नाही. त्या पापा-मम्मीज किचनमध्ये प्रत्येक पदार्थात कांदा, लसूण, टोमॅटो, आलं, गरम मसाला असं असतंच. सगळ्या पदार्थांची चव सेम लागत असेल. तेच मधुराचे, बडबड फार आणि तेच तेच घटक पदार्थ. कल्पना तळपदेंचे व्हिडीओ आवडतात, पारंपारिक सीकेपी रेसिपी स्वतःच्या स्वयंपाकघरात करताना बघून बरं वाटतं. गावरान किचनमधील आज्जी आणि मावशींचे पारंपारिक रेसिपींचे व्हिडीओ आवडतात. त्यांच्या बोलण्यातही गावरान गोडवा जाणवतो.

अनुराधा चॅनेल वाल्या बाईने एक पुस्तक लिहि ले आहे. सदान कदा प्रत्येक विडीओ च्या सुरुवातीला मराठी नट्या ते प्लग करतात. ते फार बोअर

@ MazeMan

खरंय. आपल्या देशाचे खाद्य-वैविध्य एवढे प्रचंड आहे की नुसते 'पारंपरिक' पदार्थ जरी म्हटले तरी प्रत्येक प्रांताच्या हजारो रेसिपीज होतील.

फ्यूजन ला ना नाही, पण कशातही काहीही पदार्थ टाकून केलेला काला - त्याले फ्यूजन म्हणू नाही Happy

पण हे अगदी खरंय. जम्बो डॉसा, बाहुबली डोसा, शेजवान डोसा, पोळीचा/ कणकेचा/ मैदा न वापरता पिझ्झा/ फ्रँकी आणि असे बरेच काहीबाही "हेल्दी" पदार्थ यात इतकं भसाआआआभस चीज ओततात ना.... त्यापेक्षा कधीतरी तो हेल्दी पदार्थ असाच त्याच्या मूळ स्वरूपात खाल्ला, म्हणजे 'अनहेल्दी' तरी परवडेल!!! मी हे फेसबुकवर खूप बघितलंय, प्रत्यक्षात बघायचा प्रश्नच नाही.

हा हा हा. खरंय. एक्सट्रा चीझी बर्गर विथ डाएट कोक सारखं Wink

मला तर 'हेल्दी 'रेसिपी ऐकले की घाम फुटतो आता. साबुदाण्याची खिचडी ऑलिव्ह ऑईलमध्ये ! साबुदाणा वडे आप्पेपात्रात. ५ थेम्ब तेल कमी की साबुदाणा हेल्दी ? काहीही Happy

युट्युबवर ‘डब्यात काय आहे‘ की कायतरी नावाचा सेगमेंट आहे. त्यात सिरियलमध्ये काम करणारी मंडळी त्यांच्या डब्यात काय नेतात हे दाखवतात. मोठमोठ्या बास्केट्समध्ये पूर्ण दिवसाचं जेवणखाण घेऊन जायचा ट्रेंड दिसतोय बायकांचा. हो बायकाच. पुरूष जरा सुटसुटीत आणतात असं दिसतं. ह्यात एका सिरियलमध्ये काम करणारीने दोन तीनदा मी डाएट करतेय म्हणत भूक लागल्यावर बटर कुकीज आणि सॉफ्ट ड्रिंक्सची बाटली दाखवली. कोणत्या डाएटमध्ये हे चालतं हे विचारायला हवं.

Masteer recipe lady showed a healthy salad for diabetics with dates!!!

मराठी भाषेत एका शब्दाचे अनेक अर्थ आहेत. मराठी भाषेत पूर्वी एखाद्या शब्दाचा अर्थ वेगळा असेल तर आज सगळे वापरू लागले तर शब्दाचा अर्थ बदलतो. म्हणजे भाषेचं डबकं करायचं नसेल तर बदलायला तरी हवा.

अमित, +१

अतुल यांचा 'परदेशी बनावटीच्या' हा विनोद आठवला.

मराठी भाषेत एका शब्दाचे अनेक अर्थ आहेत. मराठी भाषेत पूर्वी एखाद्या शब्दाचा अर्थ वेगळा असेल तर आज सगळे वापरू लागले तर शब्दाचा अर्थ बदलतो. म्हणजे भाषेचं डबकं करायचं नसेल तर बदलायला तरी हवा.>>>

हे फक्त ' खाना बनाना ' चे मराठी रुपांतर आहे!

मुंबई- अहमदाबाद पट्ट्यात तर सॅन्डविचमध्ये ब्रेड ऑप्शनल आणि चीज हाच मुख्य घटक पदार्थ झालाय.>>> Lol Lol Lol
लेख एकदम मस्त आहे आणि बऱ्याचशा प्रतिक्रियाही वाचायला मजा आली. काहींमधून माहिती मिळाली.

मी हे वर सांगितलेले वलॉग्स कधी बघितलेले नाहीयेत.

पण मोजकेच २-३ ब्लॉग्स आणि चॅनेल्स, एखादी पाककृती येत नसेल तर बघते, खूप उपयोगी पडतात. किंवा कितीतरी नवीन पदार्थ गेल्या सात आठ वर्षांत ह्याच मंडळींमुळे करायला शिकले. त्यामुळे माझी त्यांच्या विषयी तक्रार नाही पण कृतज्ञता वाटते.

आणि माझा एक विचार की ह्या आज्या, मावश्या, ताई वर्षानु वर्ष खपून पदार्थ बनवतायत आणि फबी/ यूट्यूब मुळे त्यांच्या खास रेसिपीस जगभरातील लोकांना मिळतायत, कितीतरी एकेकटी राहणारी मुले, विद्यार्थी, स्वयंपाक करायला शिकणारी मंडळी ह्यांना खर्च काही चॅनेल्स चा उपयोग होतो.
मग त्यांना त्याचा मोबदला मिळाला तर काय हरकत आहे. त्यावर आक्षेप का घ्यावा.
उलट गावात खेड्यात त्यांना थोडाफार रोजगार मिळाल्यासारखे झाले असे म्हणायला लागेल.

वर बऱ्याच जणांनी वेगवेगळे चॅनेल्स सांगितले पण ह्यांचा उल्लेख आवर्जून करते,
निशामधुलिकाची काजू कत्तली रेसिपि, बुरा घालून बेसन लाडू अतिशय सुंदर होतात.
एकतारी पाक, दोन तरी पाक विडिओ बघितल्याशिवाय फोनवर बोलून काळात नाही.
साऊथ इंडियन लोकांच्या हरतऱ्हेच्या चटण्या अशा चॅनेल्सवरूनच मिळाल्या.

ब्लॉग / vlog वाल्यांमध्ये दोन मुख्य जमाती आहेत

- स्वतः रांधणारे - शेफ, पाककृती वाले वगैरे
- फक्त खाणारे आणि त्यावर vlog बनवणारे

दोन्ही प्रकारातले vlog बघतो अधून मधून.
दुसऱ्या प्रकारात डोक्यात जाणारे - वात आणणारे मठ्ठमभारती जास्त आहेत, लेख त्यांच्याबद्दलच आहे Happy

Sumedha, khandbahale यांच्या शब्दकोशानुसार बनवणे याचे खालील अर्थ आहेत -
बनवणे ⇄ build
बनवणे ⇄ constitute
बनवणे ⇄ construct
बनवणे ⇄ create
बनवणे ⇄ dupe
बनवणे ⇄ fool
बनवणे ⇄ form
बनवणे ⇄ fox
बनवणे ⇄ hoodwink
बनवणे ⇄ make
बनवणे ⇄ prepare
बनवणे ⇄ trap
बनवणे ⇄ trick

आणखी इतर शब्दकोश पाहता त्यातही असे वेगवेगळे अर्थ दिलेले आहेत. तुम्ही सांगता तो यातला फक्त एकच अर्थ आहे; पण बाकीचे चुकीचे नाहीत.

मला वाटते एकाच शब्दांतून इतके सगळे अर्थ व्यक्त होणे किंवा इतक्या अनेक अर्थांसाठी एकच शब्द वापरला जाणे/ वापरावा लागणे ह्या स्थितीपेक्षा ह्यातल्या अनेक अर्थांसाठी प्रत्येकी एक शब्द अधिक प्रचलित असणे ही स्थिती त्या भाषेचे शब्दवैभव, शब्दसंपन्नता दाखवते, आणि सूक्ष्म अभिव्यक्ती क्षमताही.

हीरा, सहमत. माझा मुद्दा बनवणे याचा अमुक अर्थ होत नाही - ह्याबद्दल होता. बाकी जे अर्थ आहेत, त्यांना समानार्थी मराठीत इतर शब्दही आहेत आणि ते नक्कीच वापरावेत. पण त्या ऐवजी कुणी बनवणे वापरला तर चुकीचा ठरत नाही. फक्त वापरकर्त्या व्यक्तीची कमी शब्दसंपदा दर्शवतो (आणि तो काही गुन्हा नाही).

मला वाटते एकाच शब्दांतून इतके सगळे अर्थ व्यक्त होणे किंवा इतक्या अनेक अर्थांसाठी एकच शब्द वापरला जाणे/ वापरावा लागणे ह्या स्थितीपेक्षा ह्यातल्या अनेक अर्थांसाठी प्रत्येकी एक शब्द अधिक प्रचलित असणे ही स्थिती त्या भाषेचे शब्दवैभव, शब्दसंपन्नता दाखवते, आणि सूक्ष्म अभिव्यक्ती क्षमताही.>>>> शब्दवैभव, शब्दसंपन्नता किती समर्पक आहे.

मला वाटते एकाच शब्दांतून इतके सगळे अर्थ व्यक्त होणे किंवा इतक्या अनेक अर्थांसाठी एकच शब्द वापरला जाणे/ वापरावा लागणे ह्या स्थितीपेक्षा ह्यातल्या अनेक अर्थांसाठी प्रत्येकी एक शब्द अधिक प्रचलित असणे ही स्थिती त्या भाषेचे शब्दवैभव, शब्दसंपन्नता दाखवते, आणि सूक्ष्म अभिव्यक्ती क्षमताही.>>>> शब्दवैभव, शब्दसंपन्नता किती समर्पक आहे.

काल सहज एक चॅनेल बघितलं साऊथचं, ते नेहेमीचं नव्हतं. एक जरा उंच बाई, केरळमधली असावी. रगड्यात वाटून इडल्या केल्या, नंतर चटणीसाठी उभ्या उभ्या नारळ फोडला बहुतेक खाली रोपं वगैरे असावीत, फोडल्यावर नारळाच्याच एका वाटीत पाणी ठेवलं आणि ते तोंड लाऊन प्यायलं. नंतर विळीवर नारळ खवताना दाखवली. ह्या गोष्टी टाळायला हव्यात, तुम्ही खवत असाल उष्टा नारळ पण बघताना कसं वाटतं, जर ती वाटी धुऊन घेतली असेल किंवा तो भाग काढला असेल तर ते दाखवलं नाहीये ( तसं करणंही चुक वाटतं मला म्हणजे मुळात नारळाच्या वाटीला तोंड लाऊन पाणी पिऊ नये असं वाटतं ), मग ती रेड सॉईल वाली व्यवस्थित आहे याबाबत. मुळात आपल्याकडे नारळ फोडताना खाली भांडे ठेऊन पाणी त्यात काढतात आणि नंतर नारळ खवायला घेतात.

नंतर इडली चटणी खायला कोणीतरी काहीतरी द्यायला आलेलं त्याला दिली, सोबत चहा दिला.

हे कुठे लिहू ते समजत नाहीये मला, योग्य नसेल इथे तर काढून टाकेन.

Pages