माय नेम इज ब्लॉगर, फूड ब्लॉगर !

Submitted by अनिंद्य on 12 May, 2022 - 03:54

माय नेम इज ब्लॉगर, फूड ब्लॉगर

4BD282D1-1FD5-4AA5-8419-0D78BD3E28FC.jpeg

फोर जी फाईव्ह जी ची संपर्क क्रांती करणारी दुनिया आपल्या देशात अवतरली आणि आपल्या जालीय जीवनातही एक मोठा बदल घेऊन आली. आता स्मार्टफोन झालाय आपला नवीन तळहात आणि जालविश्व् बनलंय आपलं दुसरं घर. फेसबुक, इन्स्टा, टिकटॉक वगैरे आता घरचेच झालेत पण गेली काही वर्ष टिकटॉकर्स, स्टॅन्ड अप कॉमेडीयन्स आणि यू ट्युबर्स च्या जोडीला प्रचंड फोफावलेला एक नवा वर्ग म्हणजे फूड ब्लॉगर्स / Vloggers.

जगभरातील एकूण फूड ब्लॉगर्स सुमारे २२ कोटी आहेत अन त्यातले निम्मे एकट्या भारतात आहेत म्हणे. आता एव्हढ्या प्रचंड संख्येने रोज नवीन काही Vlogging साठी तेवढ्याच संख्येत खाण्यापिण्याच्या जागा पण हव्या. होते नव्हते ते सर्व प्रसिद्ध 'स्पॉट्स कव्हर झाले' (हो असेच म्हणायचे) असल्यामुळे आता गाडी वळलीय गाड्यांकडे. भारतभरातील गल्लीबोळातल्या बबड्या - बबलींनी आपल्याला रस्तोरस्ती, गावोगावी, गल्लोगल्ली भरत असलेल्या खाद्यजत्रेची दैनिक वारी घडवून आणण्याचा चंगच बांधलाय. अक्षरशः लाखो फूड ब्लॉगर्स आपले जालीय जीवन व्यापून वर दशांगुळे उरतील असे विक्राळ रूप प्राप्त करते झाले आहेत.

हिंदी, इंग्रजी, मराठी, गुजराती, तेलुगू, तमिळ .... एक भाषा सोडली नाही या बबड्या-बबलींनी. अहिराणी, कच्छी आणि मेवाडी बोलीतही फूड ब्लॉगर्स उदंड आहेत. त्यांची दुबळी दीनवाणी प्रतिभा अखंड ओसंडून वाहत आहे. मठ्ठ रांजणे (माठ म्हटले नाही मिलॉर्ड, प्लीज नोट ! रांजण इज अ बिगर साईज्ड माठ मिलॉर्ड) असे बहुसंख्य फूड ब्लॉग्जर्सचे थोडक्यात वर्णन करता येईल. भाषा गचाळ, गृहपाठ-अभ्यास नाही, शब्दखजिना रिता आणि संवादफेक वगैरे तर दुसऱ्या ग्रहावरच्या गोष्टी. भाषेची गिरणी कोणतीही असू देत यांचं दळण सेम-टू -सेम. बरं स्वतःच्या ब्लॉगचे / चॅनेलचे नाव तरी धडके घ्यायचे ना, तर ते ही नाही. नाव काय तर 'भुक्कड' 'भूखा सांड' 'पोटात किडे' वगैरे. ‘पोटातले जंत’ वगैरे अजून कोणी नाहीये ही देवाची कृपा. हिंदीत 'भुक्कड' ही शिवी आहे हे माहिती असण्याची काही गरज नाहीच. भुकेले म्हणजे भुक्कड समजत असावेत, दोन्ही शब्दात 'भूक' कॉमन आहे ना, झाले मग.

सगळ्यात भयाण असते ती यांची त्रयोदश प्रश्नोत्तरी. म्हंजे तेरा मठ्ठ प्रश्न आणि त्यांची (मिळालीच तर) उत्तरे :

१) टपरीवजा जागा असेल तर - भैय्या तुम्हारा नाम बताओ हमारे दर्शको के लिये (याचं मराठी दादा / काका / वैनी / ताई तुमचं नाव सांगा असे). हे दुकान कधीपासून असे विचारले तर याचं उत्तर उत्तर भारतीय टपरीवाला २५ वर्षाच्या पुढे असेच देणार. जुने दुकान / हॉटेल असेल तर गल्ल्यावरच्या इसमाला डायरेक्ट तुमची कितवी पिढी हे दुकान चालवणारी असे विचारायचे. तसा नियमच आहे.

दिल्ली-मथुरा-आग्रा शहरातले कळकट्ट जुनाट दिसणारे दुकान असेल तर हमखास ‘हमारे परदादाजी ने शुरु किया था और अब मै और मेरा बेटा देखते हैं’ असे लोणकढे उत्तर मिळेल. दुकान १० वर्षे जुने का असेना. नॉनव्हेज पदार्थ विकणारे असतील तर कुठल्याश्या अवधी-लखनवी-रामपुरी नवाबजाद्याच्या खानसाम्याची सातवी-आठवी पिढी असणार याची खात्रीच. त्याकाळी साधारण अर्धी जनता खानसाम्याचे (आणि सोबत अखंड पुनरुत्पादनाचे) काम करत असल्याशिवाय आज गल्लीबोळात त्यांचे वंशज सापडते ना.

२) कितने साल से खडे हो आप यहाँ ? अरे ठोंब्या, तो रोज संध्याकाळी फक्त ३ तासच अमुक पदार्थ विकतो ते तूच नाही का सांगितले व्हिडिओच्या सुरवातीला? तो मनुष्य फक्त तीन तास रोज उभा राहतो तिथे, कितने सालों से नाही ! तो काय वर्ष वर्ष उभ्याने तपश्चर्या करणारा योगी आहे का ?

३) थोडे लाडात येऊन (ब्लॉगर स्त्रीपात्र असेल तर अति लाडात येऊन) - तर मग आज तुम्ही कॉय 'बनवणार' आमच्या साठी? बटाटवड्याच्या स्टॉल वर बटाटेवडे करतात, डोश्याच्या स्टॉल वर डोसे, अजून काय कप्पाळ ? आणि हो, मराठीत सर्व खाद्यपदार्थ 'बनवले' जातात, ठीक वैसे ही जैसे हिंदी में 'बनाये' जाते हैं. अशी ही बनवाबनवी.

४) हे कश्यापासून 'बनते'? किंवा हिंदीत 'ये किस चीज से बनता है भैय्या? अरे वज्रमूर्खांनो, तुमच्या ब्लॉगचे ब्रीदवाक्य 'जायके के जानकार' आहे ना? तुम्ही स्वतःला फूडी, खवैय्ये वगैरे म्हणवता ना? मग साधी जिलबी करण्यासाठी काय पदार्थ लागतात हे सुद्धा तुम्हाला माहित नाही? अरे जिलबी आणि इमरतीतला फरक समजायला तुम्हाला पुढचा जन्म घ्यावा लागेल रे. कदाचित इमरतीसाठी उडीद भिजवून वस्त्रगाळ स्मूथ वाटताना बघून तर तुम्ही दहीवड्याची तयारी चालूये म्हणून मोकळे व्हाल, काही भरोसा नाही.

५) आंटी / भैया ये क्या डाल रहे हो ? वो क्या डाल रहे हो ? आंटी नी मख्ख चेहरा ठेवून 'जीरा' किंवा 'हरा धनिया' असे निष्पाप उत्तर दिले तरी 'आहाहा, ओहोहो, वाह वाह, मजा आनेवाला है दोस्तो' वगैरे ..

६) यानंतर तो स्टार प्रश्न येतो - समस्त फूड ब्लॉगर जनतेला हवाहवासा वाटणारा. ‘बटर कौन सा यूज करते हो ?’ भैय्याचे उत्तर - अमूल. या पॉइंटला समस्त फूड ब्लॉगर जमात वेडीपिशी होते, त्यांचे चेहरे चमकू लागतात, डोळे मिचकावून 'अमूऊऊऊल बतततत्त्त्तर, आहाहा, ओहोहो, वाह वाह. शानदार, गजब है गजब.. असे चित्कार. या पॉईंटला मराठीत अग्गायी गsss ... अम्मूऊल का ? अशी किंचाळी फोडणे आवश्यक.

७) ये देखिये, ये देखिये, ये देखिये (हे जमेल-सुचेल तसे ३ ते ९ कितीही वेळा) .....और ये हो गयी दोस्तो चीज की बारिश ! कोई कंजूसी नही. भाईसाब गजब है गजब.. कितना सारा चीज है देखो. जनाब, मेरे मुंह में तो पानी आ रहा है, रुका ही नही जा रहा है वगैरे. पुन्हा एकदा 'आहाहा, ओहोहो, वाह वाह, मजा आ गया' वगैरे वगैरे.. या सगळ्या बैलांना समोर बसवून प्रत्येकी अर्धा किलो अमूल चीज चे आणि बटरचे स्लॅब जबरदस्ती चावून चावून खायला लावायचे माझे एक हिंसक स्वप्न आहे. चव तुला मूळ पदार्थाची कळली नाहीये अजून आणि कौतुक कसले तर अमूल चीजचे ? हाऊ स्टुपिड इज द्याट ! येणि वे.

2962BDB9-033A-43E5-821D-FC667A1EDB73.jpeg८) आणि आता कोविडकाळाची नड म्हणून - भैयाने देखो मास्क पेहना है, सफाई का पूरा ध्यान रखा है - हे बोलत असतांना तो भैया कळकट्ट प्लॅस्टिकच्या जुनाट डब्यातून बॅटर घेऊन तितक्याच कळकट्ट कढईत पुनःपुन्हा वापरून काळ्या झालेल्या तेलात 'इंद्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहा' च्या निरिच्छ वृत्तीने अग्नी-आहुती टाकत असतो, त्याच हातांनी हजारो हात लागून आलेल्या नोटा-नाणी मोजून घेत-देत असतो... ‘हायजिन का पूरा ध्यान’ कसे ठेवलेय यावर आमचे ब्लॉगर दादा/ ताई कंठरावाने जीव तोडून सांगत असतात ...

९) विक्रेत्या व्यक्तीचे केस पांढरे आणि कपडे थोडे जूनसर असतील तर यांना ताबडतोब 'हार्ड वर्किंग आंटी/अंकल' असा खिताब न मागता देण्यात येतो. खाण्यापिण्याचा स्टॉल चालवणे हे कष्टाचेच काम आहे, कुणीही केले तरी. त्याचा वयाशी किंवा राहाणीमानाशी काहीही संबंध नाही. हे 'हार्ड वर्किंग' तर मग उरलेले काय स्वतःच्या महालातील बागेतल्या गुलाबकळया खुडतात काय रस्त्याच्या कडेला त्यांच्या उन्हातल्या टपरीत ? हार्ड वर्किंग अंकल म्हणे. काहीही.

१०) हे रटाळ प्रश्नोपनिषद ह्या पॉइंटला थोडे मंद्र सप्तकाकडे झुकते, ब्लॉगरचे किंचाळणे थोडे(सेच) कमी होते - पदार्थांची चव घेण्याचा एक १० सेकंदाचा कार्यक्रम उरकला जातो. तो जगात भारी पदार्थ ओठांच्या बाह्यभागाला जेमतेम स्पर्श करताच ही मंडळी माना डोलावून डोळे मिटू लागतात आणि जिभेचा एक फक्त त्यांनाच जमणारा 'टॉककक्क' असा चित्तचमत्कृतिकारक आवाज काढतात. ब्लॉगर मराठी असेल तर 'मस्त मस्त मस्स्स्सस्स्स्त असे चढत्या भाजणीचे मस्तकात जाणारे मस्तकार आणि हिंदी असेल तर तेच परत मझा आ गया. ह्यावेळी तो पदार्थ चीजयुक्त असल्यास त्याला करकचून दाबून वितळलेल्या चीजचे ओंगळवाणे ओघळ क्लोजअप घेऊन दाखवणे हा अनेकांचा छंद असतो.

११) बरं, साधारण सव्वादोन सेकंदात यांना पदार्थातले सर्व बारकावे लग्गेच समजतात. पदार्थात 'लसणीचा मस्स्त फ्लेवर आलाय' वगैरे शेरे देता येतात. अरे दादा, त्या माणसानी किलोभर पदार्थ करतांना पाव किलो लसूण आमच्या डोळ्यादेखत टाकलाय रे, तूच नाही का दाखवला व्हिडीओ आम्हाला? तो तुझा 'फ्लेवर' पदार्थ करतांना, खातांना आणि नंतर खाऊन ढेकर देताना किलोमीटरभर अंतरातही जाणवेल ना रे... फ्लेवर म्हणे ! खातांना कचाकचा लसूण येईल दाताखाली.

१२) यांनतर एक राउंड होतो तो - लय भारी, लय म्हंजे लयच भारी, जगात भारी, जाळ अन धूर संगटच, आजवर खाल्लेल्या मिसळीत सर्वात भारी, ऐसी पानीपुरी / टिक्की / जलेबी आप को पूरी दुनिया में कहीं नहीं मिलेगी, गजब का स्वाद वगैरेचा ... 'जग' आणि 'पूरी दुनिया' म्हणजे यांच्या लेखी त्यांना माहिती असलेल्या त्यांच्या गावातील चारसहा जागा! अरे नतद्रष्ट जीवांनो, दुनिया फार मोठी आहे. तुमच्या मोहल्ल्यात, वस्तीत, गावात जे काही मिळतं ते अनुभवाच्या तोकडेपणामुळे तुला 'लय भारी' वाटत असेल तर तो दोष तुझा आहे, दर्शकांचा नाही. अनुभवाचं वर्तूळ मोठं करा रे, दायरा बढाओ !

१३) आता आपल्या राशीतील शनी साडेसातीच्या शेवटच्या टप्प्यात येतो. दोन सेकंदात 'तुमचा पत्ता नीट सांगा आंटी / ताई/ दादा/ भैय्या' असे टपरीमालकाला धमकावून आणि पदार्थ मिळण्याचे टायमिंग वगैरे तोंडातल्या तोंडात सांगून झाले की मग .... तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच खूपच फारच अतीच आवडलाच्च असेलच्च, म्हणून पेज लाईक करा, सब्सक्राईब करा, शेयर करायला विसरू नका. आम्ही असेच नवनवीन खाण्याच्या जागा घेऊन पुन्हा येऊ असे धमकीवजा आश्वासन आणि मग हुश्श...... संपले टॉर्चर !

मराठीत फूड ब्लॉगर तुलनेने कमी आहेत. जे आहेत ते 'कानातून धूर आणणारी मिसळ' आणि 'सर्वात मोठी गावरान / कारभारी / सरपंच मटन थाळी' यापलीकडे फार काही जाऊ शकलेले नाहीत. मराठी फूड ब्लॉगर्सपैकी शेकडा ९९ लोक Mutton चा उच्चार 'मटण' आणि Chicken चा उच्चार 'चिकण' असा का करतात हे न सुटणारे कोडे आहे. दोन्ही इंग्रजी शब्दांना सुयोग्य सुटसुटीत पर्याय मराठीत अजूनही न रुजल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करूया.

‘आजच्या धकाधकीच्या जीवनात’ किंवा ‘कधी कधी आपल्याला घरी जेवण बनवायला (स्वयंपाक करायला नाही, प्लीज नोट माय लॉर्ड) कंटाळा येतो’ अशी रटाळ आणि चावून चोथा झालेल्या पाण्याहून पातळ शब्दात फूड व्हिडिओची सुरुवात करणाऱ्या ब्लॉगर्सचे पुढचे निवेदन ऐकण्याची इच्छा होत नाही. ते मात्र नेटाने ४-५ मिनिटे दळण दळतात. टीव्हीच्या मराठी बातमीदारांचे 'जसे की तुम्ही बघू शकता' टाईपचे मराठी आणि 'भन्नाट', 'मस्त', 'चमचमीत' आणि सांगणारी व्यक्ती पुण्या-ठाण्याची असल्यास 'अप्रतिम' अशा चार विशेषणांचा आलटून पालटून वापर करीत कोणत्याही पदार्थाचे, हॉटेलचे किंवा टपरीचे वर्णन पूर्ण करतात. त्या शहरात-गावात शेकडो टपऱ्यांवर सेम पदार्थ मिळत असला तरी त्यांच्या आजच्या एपिसोडमधले ठिकाण 'शहरातल्या खवैयांची पंढरी' वगैरे असल्याचे बिनधास्त सांगतात. ही पंढरी मात्र प्रत्येक एपिसोडला बदलते, गाभाऱ्यात कधी वडापाव तर कधी 'मेंदू' वडा (मेदुवडा नाही) असल्याने भक्तही बदलत असावेत. ह्यांचं काम फक्त 'वॉव वॉव', 'ओ माय गॉड' चे चित्कार काढणे, 'बघा बघा कित्ती बटर सोडलंय' किंवा 'पुरी कशी टम्म फुललीय' अशा त्याच त्या कॉमेंट आणि त्याला जोडून दुसरी-चौथीतली मुलं शालेय नाटकात करतील त्या लेव्हलचा पूरक अभिनय करत राहणे एव्हढेच.

चहाच्या चमच्याने दोन दोन चमचे रंगहीन-चवहीन-वासहीन टाईपचे पदार्थ १०-१२ वाट्यांमधून देणाऱ्या 'अनलिमिटेड थाळी' प्रकाराचे ह्या लोकांना फार कौतुक. 'अनलिमिटेड थाळी' पद्धतीच्या जागांचे विशेष प्रेम हे मराठी आणि गुजराती दोन्ही फूड ब्लॉगरमध्ये दिसते. 'पोटभर खा, अनलिमिटेड... थाळीत ‘हे ही’ मिळते, ‘ते ही’ मिळते, अनलिमिटेड, अनलिमिटेड - तारसप्तकात हे पुन्हा पुन्हा सांगणे आणि वर 'फक्त' अमुक अमुक रुपये असे ठासून सांगत राहणे मराठी-गुजराती दोन्हीकडे असते. ह्या थाळी प्रकाराच्या उपाहारगृहांची नावे हा एक वेगळाच विषय आहे. आता महाराजा, महाराणी, राजधानी, थाटबाट वगैरे नावे जुनी झाल्यामुळे 'सासुरवाडी', 'रजवाडु', 'ससुराल', सासूमाँ की रसोई', 'पाहुणचार', 'जावईबापू' वगैरे नावे चलनात आहेत, थाळीतले पदार्थ मात्र तेच जुनेपुराणे. जून झालेल्या जावयाला कोण विचारतो सासुरवाडीत? वाढलंय ते खा गुमान. आमचे ब्लॉगर मित्र मात्र लग्नानंतर पहिल्यांदाच मांडवपरतणीला सासुरवाडीला गेलेल्या जावयासारखे उत्साहात !

'स्ट्रीट फूड' म्हटले की स्वच्छतेचा मुद्दा बहुतेक ठिकाणी ऑपशनलाच टाकावा लागतो. वापरलेला कच्चा माल आणि जागेची स्वच्छता आधीच 'अनहेल्दी' श्रेणीची असेल तर तयार झालेले प्रॉडक्ट अधिकाधिक 'सुपर अनहेल्दी प्रो मॅक्स' कसे करता येईल याची जणू देशव्यापी स्पर्धा आहे. भारतीय स्ट्रीट फूड वेंडर्स आणि फूड ब्लॉगर्सच्या जगात ज्यात त्यात बटर ओतणे आणि भसाभसा मायोनिझ, चीज टाकणे म्हणजे पदार्थ 'भारी' असे एक गृहीतक जोरात आहे. मुंबई- अहमदाबाद पट्ट्यात तर सॅन्डविचमध्ये ब्रेड ऑप्शनल आणि चीज हाच मुख्य घटक पदार्थ झालाय.

कसलीशी गचाळ 'फ्यूजन' रेसिपी असेल एखाद्या जागी तर मग ह्यांचे वासरू वारं पिते जणू. मुळात स्ट्रॉबेरीचा पिझ्झा, अननसाची भजी आणि श्रीखंडाचे स्टफिंग असलेले सॅन्डविच खायला कोणी का तयार होईल हेच कळत नाही. त्यावर अगदी किळस वाटेल एव्हढी 'चीज की बारिश' आहेच. हे असले उद्योग करणाऱ्या जागा सहा-आठ महिन्यात गाशा गुंडाळतात हे बघितले आहे. पण असल्याच जागा फूड ब्लॉगर्सच्या यादीत सर्वात वर असतात, अलग आणि ‘हटके’ म्हणून.

ह्या बटबटीत पार्श्वभूमीवर दर्जेदार फूडब्लॉगिंग करणाऱ्या काही मोजक्याच लोकांचे काम उठून दिसते. विषयातले ज्ञान, केलेला रिसर्च, अन्नाविषयीचे मौलिक चिंतन, जिव्हेचा जागतिक स्वादानुभव, स्वतःच्या अंगी असलेला तोलामोलाचा सुगरणपणा, सुंदर भाषा असे सर्व एकत्र असल्यामुळे विनोद दुआंचा 'जायका इंडिया का' सारखा दर्जेदार कार्यक्रम कोण विसरू शकेल? अनेक वर्षांआधी देशातील वेगवेगळ्या शहरातल्या खाद्यजत्रेला घरोघरी पोहचवणारे आद्य फूड ब्लॉगरच म्हणावे त्यांना. (प्रस्तुत हौशी लेखकूला दुआंच्या दर्जेदार प्रकाशनासाठी खाद्यभ्रमंतीबद्दलच लिहायला मिळाले हा बहुमान इथे आत्मस्तुतीचा दोष पत्करूनसुद्धा सांगावा वाटतो मिलॉर्ड Happy )

आता उदंड झालेल्या कोट्यावधी फूड ब्लॉगर्समधील काहींना लाखो प्रेक्षक आहेत. त्यांना मोठमोठ्या तारांकित हॉटेल्समध्ये मानाची आमंत्रणं असतात, चकटफू. काहींना भरपूर द्रव्यप्राप्ती सुद्धा होते म्हणे. उर्वरित लाखो-हजारोंना काही लाईक्स आणि एक दोन कॉमेंटवर समाधान मानावे लागत असणार. आणि आपल्या सारख्या दर्शकासाठी आहेच 'आहाहा, ओहोहो, वाह वाह, मजा आनेवाला है दोस्तो आणि मस्त मस्तत्त्त्त मस्तत्त्त्त चीज आणि अमूल बत्तर ! ..

समाप्त

* * *

(लेखातील चित्रे जालावरून साभार)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< लोक का बघतात असले निरर्थक व्हिडियो >>
>>> कारण इंटरनेट स्वस्त आहे आणि लोकांकडे भरपूर रिकामा वेळ आहे...
जसे बॉडीबिल्डिंग व्हिडिओ फक्त टीनएज किंवा जिम जाणारे बघतात , हे फूड व्हिडीओज साठी खास एज ग्रुप ऑडियन्स नाहीय.. प्रत्येक वर्ग फूड ब्लॉग आवडीने बघू शकतात.. एज नो बार...

च्रप्स सहमत.
जो बिकता है वही टिकता है
डिमांड आहे म्हणून सप्लाय आहे.
भरमसाठ डिमांड आहे म्हणून भरमसाठ सप्लाय आहे.
आपण सर्वांना या लेखातील आणि प्रतिसादातील जोक्स रिलेट झाले कारण आपण हे विडिओ एकापेक्षा अनेक बघितले आहेत.
भले आपल्याला ॲंकर बोअर वाटला तरी पदार्थ आवडीचा असतो वा माहिती उपयुक्त असते.

छान लिहिले आहे.
जनरली देहाच्या चोचल्यांशी जोडलेले जे काही असेल त्याची व्हिज्युअल्स बघायला माणसाला आवडते जसं पॉर्न( एक्स्ट्रीम उदाहरण), त्यामुळे या व्लॉगिंगला मरण नाही. Happy काही युट्यूबर तर प्रमाण व कृतीही दाखवत नाहीत नुसतं दाखवतात. लोकही नुसतं बघतात. मी सहसा फक्त हेब्बार बघते. बोलणं नाही व प्रमाण योग्य असते, व्हिडीओ दोन ते पाच मिनिटाचा असतो. बाकी आपण बघायचं त्यांनी खायचं , आपण त्यांना व्ह्यू द्यायचे आणि पुन्हा मुगाची खिचडी टाकायची, मगं ती खाताना अन्याय झाल्यासारखे वाटते ... म्हणून बंदच केलं...!

Lekh avdla. baki gharat kay chamchamit khayla asel tar ch he asle vlogs baghayla maja ahe... Nahi tar apla gharcha sadha jevan jevtana he bghitla tar kharach jeebh khavalte.

Hebbars kitchen mast ahe channel. Short videos astat without badbad mhanun baghayla changla vatata.

स्ट्रीट फूड पीके झिया भाई. रमजान महि न्यात पूर्ण हज उमरा करून आले. . दुबई फिरून आले. आता परत पीके टूर चालू आहे. क्वेट्टा गावी जातो ले टेस्ट् भागात. हे तसे तालुक्याचे गाव टाइप आहे. भात वर समोसे व वर छोले चा ट मसाला कांदा कोथिंबीर दही चटण्या असा नवाच पदार्थ दिसतो. आता पुढील भागात क्वेट्टा मधिल ऐतिहासिक व नैसर्गिक सुंदर भाग दाखव्णार आहेत. तळलेले आलू पराठे सर्वत्र आहेतच.

मी व्ह्लॉग वर पदार्थ बघून मग रेसीपी सर्च करते. निशोल्डा, मुतब्बक( अरबी पराठा) फूल असे पदार्थ इथे बघूनच माहिती पडले आहेत.
खालील पदार्थात किती कॅलरीज असतील नकी.

डब्यात आधी एक कंडेन्श्ड मिल्क चा लेअर. मग पोळी व केळी ह्यांचे मिक्स. मग क्रीम मग परत कं मिल्क. वर हनी वर भाजलेले काजू. वर परत कं मिल्क. दोन चमचे खाल्ले तरी मला बास होईल. व वरून क्रिस्पी सिरीअल पण असते. हे रमजान च्या दिवसात खातात. फारच ग्लोरिफाइड शिकरण पोळी.!!

दीड-दोन दिवसातच शतकी प्रतिसाद ह्या धाग्यावर ! हे भाग्य पूर्वी माझ्या कोणत्याही लेखाला मिळालेले नाही. जय हो.

याचाच एक अर्थ असा की आपल्यापैकी अनेकजण माझ्यासारखेच ब्लॉगरग्रस्त आहात Happy

नेहेमी मी प्रत्येक प्रतिसादकाला नावानिशी थँकयू म्हणतो पण इथे तसे शक्य दिसत नाही. प्रतिसाद आणि रंगतदार चर्चेबद्दल सर्वांचे मनापासून आभार.

- अनिंद्य

पुर्वी ndtv वर रॉकी आणि मयुर ह्यांचा एक फुड अ‍ॅन्ड ट्रॅवल शो होत हायवे ऑन माय प्लेट, They had almost covered length and breadth of India. Happy

शी, तो रणवीर ब्रार इतका बोरींग आहे. किती तेच तेच पदार्थ सगळे करतात असं वाटते.

आधी शुभांगी कीर म्हणून असेच पहायचे. त्या बाई मग एकदमच बोर झाल्या जेव्हा, व्युजच्यी नावाने घरातली प्रत्येक गोष्ट माथी मारायला लागले.
त्यात तो अशुद्ध बोलणारा त्यांचा तो मुलगा. आणि त्याचे ते रटाळ बोलणे. घरातीलच लोकांना भेटी देताना पण अगदी किंमती सांगून , कॅमेरा मारून.

दुसरं म्हणजे, भारतातील लोकं एमोशनल फूल असतात तर, ईमेज बिल्डिंग करायची असेल आणि व्युज वाढवायचे असतील तर, एखादा कुत्रं पाळायला लागेल, मदत करताना विडिओ बनवेल आणि बडबड करेल.
अ‍ॅनालिटिक्स पहाल तर, भारताकडून युट्युबची कमाई ज्यास्त होते तरी ह*** कंपनी ज्यास्त टॅक्स लावते. जगात दुसरा नंबर लागतो भारताचा. युट्युबच्या अ‍ॅड कमाई चांगली आहे.

तशीच ती मधुरा, फालतु रेसीपी असतात बर्‍याच. मैद्याच्या वगैरे तरी सांगताना अप्रतिम चवीची, दूधाशिवाय... रटाळ.

दिल्ली वॉक्स ठिक आहे पण बोरच होतो. बॅंगलोर वाला तो मद्रासी, सतत फक्त इडलीच खात असतो असे वाटते.

आजकाल पैसे (व्युज वाढवून) मिळवायला लोकं काहीही दाखवतील. अगदी बेडरूममधून उठण्यापासून ते सगळं.
माझी मुलगी पायलट असल्याने तिने, एका पायलटचे ब्लॉग सुचवले मला लॉकडॉउनमध्ये बघायला कारण सुरुवातीला तो पायलटच्या जीवनाशी गोष्टी सांगायचा. आता तर तो उठलो, जेवलो, अगदी चक्क संडासला गेलो , पोटं खराब इतकं असतं तरी लोकं देव असल्यासारखे पुजा करतात.

सोमीवर उत्तरेकडे जरा ज्यास्तच हे भक्तगण दिसतात असं पाहणीत दिसतय. जसं, मूवी कल्चर मध्ये, सौदिंडीयन हिरोला पुजतात तर सोमी कलचर मध्ये उत्तर भारतात पुजणं प्रकार आहेत.

एका पायलटचे ब्लॉग सुचवले मला लॉकडॉउनमध्ये बघायला कारण सुरुवातीला तो पायलटच्या जीवनाशी गोष्टी सांगायचा. आता तर तो उठलो, जेवलो.......
flying b**** ???

रणबीर ब्रार ची बघून इथे एक पाककृती करून टाकली होती

गोभी मुसलम

इथल्या तज्ञ लोकांनी त्यातही किडे काढले.

https://www.maayboli.com/node/77933

पण पाककृती करणारे आणि नुसतेच ते दुकानात गिळून व्हिडीओ करणारे हे दोन डिष्टींक्त प्रकार आहेत

रणबीर ब्रार महिलाहत्यारा आहे असे काही महिला कलिग्ज म्हणतात. जपून.>> वहिनी मराठी आहेत. बारके पाच सहा वर्शाचे पोर आहे इशान ते ही येत असते. खाने पेइच फोकस रखना अच्छा है.

<< लोक का बघतात असले निरर्थक व्हिडियो >>
>>> कारण इंटरनेट स्वस्त आहे आणि लोकांकडे भरपूर रिकामा वेळ आहे... >>>>>>>>लोकांकडे रिकामा वेळ आहे म्हणून ते हे विडिओ बघता असे जनरलायझेश करू नका काही लोक कामाला जात येत त्यांचा जो रुटीन मधला बोरिंग वेळ असतो तो सुखकर व्हावा म्हणूनहि हे असे व्हिडिओज बघतात। नॉर्मली ऑफिसच्या येण्या जाण्याच्या ट्रेन किंवा बस मध्ये इतरांच्या गोष्टीत नाक खुपसण्यापेक्षा आपल्या मोबाईलमध्ये डोकं खुपसून राहणं लोक जास्त पसंत करतात . तास मग रिकामा वेळ लोक माबो वर पण घालवतातच ना याचे उदाहरण म्हणजे एखादा पेटलेला धागा ज्यात सुरुवात होते नॉर्मल डिबेट ने आणि एन्ड होतो चिखलफेकीत। लोकांकडे एवढा वेळ कुठून येतो काय माहित ?

एखादा पेटलेला धागा ज्यात सुरुवात होते नॉर्मल डिबेट ने आणि एन्ड होतो चिखलफेकीत। लोकांकडे एवढा वेळ कुठून येतो काय माहित ?
+१११११

एक मृणालिनी बेंद्रे म्हणून पुण्यातील ताई आहेत, अशक्य म्हणजे अशक्य नाटकी बोलते, चालते, यडी आहे एकदम, हावभाव तर बोलायलाच नको. मनोरंजनाची 100 टक्के हमी Proud

रॉकी मयूर शो माझा आवडता होता, रणविर ब्रार आवडतो मला पण हिमालया सिरिज नाही फार आवडली त्याची. द ग्रेट इंडियन रेसिपीज आवडायची.

अजून खाता रहे मेरा दिल ही पूर्वी बघायचे, सरदारजी एक करायचे बहुतेक, ती आवडायची.

एक मृणालिनी बेंद्रे म्हणून पुण्यातील ताई आहेत, अशक्य म्हणजे अशक्य नाटकी बोलते >>> अगदी अगदी. पूर्वी सिरियल्समध्ये काम करायची, तिथेही नव्हती आवडत.

मस्त लेख. बहुतेकांच्या मनातले लिहिले आहे तुम्ही . हेब्बरला म्हणूनच पर्याय नाही. शी इज द बेस्ट!
असाच एक प्रकार परदेशात राहणार्‍या ताई दादांचा झाला आहे. ___ मध्ये ग्रोसरी स्टोअर मध्ये काय मिळतं? किंवा ___मधल्या माझ्या फ्रिजात कोणत्या गोष्टी असतात? गाळलेल्या जागेत कुठल्यातरी देशाचे नाव घाला. मग त्या देशातल्या घरातल्या व घराबाहेरच्या गोष्टींचा भडीमार चालू होतो. Happy

रनबीर आधी खूप आवडायचा, त्याच्या लूक्स, संवाद,माहिती डीटेलिंग सकट, पण आता खरंच अ ती झालं..
आता तर तो वेबसीरीज मधे ही येतोय.
लोक का बघतात असले निरर्थक व्हिडियो>>> कधी कधी हे ब्लॉगर्स आधी चांगले कन्टेंट द्यायचे पण आता काहिही दाखवतात..आपल्या लक्षात आले की अनसबस्क्राईब करायचे, एवढंच करू शकतो.
कधी तरी सर्फ करताना चांगले कन्टेंट पण दिसून जातात.. मला १ दा चटण्या रेसिपी शोधताना स्ट्रीट स्टाईल व्हिडीओ वरून १ छान चॅनल मिळाले होते..

प्रतिसादांत अनेक देशी-विदेशी फूड ब्लॉगर्सचे उल्लेख आले आहेत. त्यातील जवळपास सर्व मी वेळोवेळी बघतो, काही मला आवडतात, काही नाही. शेफ लोकांचे चॅनेल्स वेगळे, ते 'खाद्यभ्रमंती' ब्लॉगर्स नाहीत. लेख फक्त वात आणणाऱ्यांबद्दल होता Happy

कोणतेही चॅनेल अनेक महिने-वर्षे चालवायचे तर 'कन्टेन्ट' हवे, चांगल्या प्रतीचे. त्याची वानवा आहे. भाषा आणि रिसर्च यावर मेहनत घ्यावी लागते, त्याची तयारी कमी जणांकडे असते. जे चांगले ब्लॉगर्स आहेत त्यांनाही सर्व करून झाले आता 'नवीन' काय असे प्रश्न असावेत, त्यामुळे तोचतोचपणा येत असावा.

खानपान आणि आपल्या देशातील खाद्य-विविधता हे माझ्या आवडीचे विषय आहेत, त्यामुळे अधूनमधून कंटाळा आला तरी या विषयावर उपलब्ध असलेले साहित्य चाळत असतोच.

साधारण १५-२० प्रतिसादकांना लेख वाचून हसू आले, त्यांचे विशेष आभार.

Pages