माय नेम इज ब्लॉगर, फूड ब्लॉगर
फोर जी फाईव्ह जी ची संपर्क क्रांती करणारी दुनिया आपल्या देशात अवतरली आणि आपल्या जालीय जीवनातही एक मोठा बदल घेऊन आली. आता स्मार्टफोन झालाय आपला नवीन तळहात आणि जालविश्व् बनलंय आपलं दुसरं घर. फेसबुक, इन्स्टा, टिकटॉक वगैरे आता घरचेच झालेत पण गेली काही वर्ष टिकटॉकर्स, स्टॅन्ड अप कॉमेडीयन्स आणि यू ट्युबर्स च्या जोडीला प्रचंड फोफावलेला एक नवा वर्ग म्हणजे फूड ब्लॉगर्स / Vloggers.
जगभरातील एकूण फूड ब्लॉगर्स सुमारे २२ कोटी आहेत अन त्यातले निम्मे एकट्या भारतात आहेत म्हणे. आता एव्हढ्या प्रचंड संख्येने रोज नवीन काही Vlogging साठी तेवढ्याच संख्येत खाण्यापिण्याच्या जागा पण हव्या. होते नव्हते ते सर्व प्रसिद्ध 'स्पॉट्स कव्हर झाले' (हो असेच म्हणायचे) असल्यामुळे आता गाडी वळलीय गाड्यांकडे. भारतभरातील गल्लीबोळातल्या बबड्या - बबलींनी आपल्याला रस्तोरस्ती, गावोगावी, गल्लोगल्ली भरत असलेल्या खाद्यजत्रेची दैनिक वारी घडवून आणण्याचा चंगच बांधलाय. अक्षरशः लाखो फूड ब्लॉगर्स आपले जालीय जीवन व्यापून वर दशांगुळे उरतील असे विक्राळ रूप प्राप्त करते झाले आहेत.
हिंदी, इंग्रजी, मराठी, गुजराती, तेलुगू, तमिळ .... एक भाषा सोडली नाही या बबड्या-बबलींनी. अहिराणी, कच्छी आणि मेवाडी बोलीतही फूड ब्लॉगर्स उदंड आहेत. त्यांची दुबळी दीनवाणी प्रतिभा अखंड ओसंडून वाहत आहे. मठ्ठ रांजणे (माठ म्हटले नाही मिलॉर्ड, प्लीज नोट ! रांजण इज अ बिगर साईज्ड माठ मिलॉर्ड) असे बहुसंख्य फूड ब्लॉग्जर्सचे थोडक्यात वर्णन करता येईल. भाषा गचाळ, गृहपाठ-अभ्यास नाही, शब्दखजिना रिता आणि संवादफेक वगैरे तर दुसऱ्या ग्रहावरच्या गोष्टी. भाषेची गिरणी कोणतीही असू देत यांचं दळण सेम-टू -सेम. बरं स्वतःच्या ब्लॉगचे / चॅनेलचे नाव तरी धडके घ्यायचे ना, तर ते ही नाही. नाव काय तर 'भुक्कड' 'भूखा सांड' 'पोटात किडे' वगैरे. ‘पोटातले जंत’ वगैरे अजून कोणी नाहीये ही देवाची कृपा. हिंदीत 'भुक्कड' ही शिवी आहे हे माहिती असण्याची काही गरज नाहीच. भुकेले म्हणजे भुक्कड समजत असावेत, दोन्ही शब्दात 'भूक' कॉमन आहे ना, झाले मग.
सगळ्यात भयाण असते ती यांची त्रयोदश प्रश्नोत्तरी. म्हंजे तेरा मठ्ठ प्रश्न आणि त्यांची (मिळालीच तर) उत्तरे :
१) टपरीवजा जागा असेल तर - भैय्या तुम्हारा नाम बताओ हमारे दर्शको के लिये (याचं मराठी दादा / काका / वैनी / ताई तुमचं नाव सांगा असे). हे दुकान कधीपासून असे विचारले तर याचं उत्तर उत्तर भारतीय टपरीवाला २५ वर्षाच्या पुढे असेच देणार. जुने दुकान / हॉटेल असेल तर गल्ल्यावरच्या इसमाला डायरेक्ट तुमची कितवी पिढी हे दुकान चालवणारी असे विचारायचे. तसा नियमच आहे.
दिल्ली-मथुरा-आग्रा शहरातले कळकट्ट जुनाट दिसणारे दुकान असेल तर हमखास ‘हमारे परदादाजी ने शुरु किया था और अब मै और मेरा बेटा देखते हैं’ असे लोणकढे उत्तर मिळेल. दुकान १० वर्षे जुने का असेना. नॉनव्हेज पदार्थ विकणारे असतील तर कुठल्याश्या अवधी-लखनवी-रामपुरी नवाबजाद्याच्या खानसाम्याची सातवी-आठवी पिढी असणार याची खात्रीच. त्याकाळी साधारण अर्धी जनता खानसाम्याचे (आणि सोबत अखंड पुनरुत्पादनाचे) काम करत असल्याशिवाय आज गल्लीबोळात त्यांचे वंशज सापडते ना.
२) कितने साल से खडे हो आप यहाँ ? अरे ठोंब्या, तो रोज संध्याकाळी फक्त ३ तासच अमुक पदार्थ विकतो ते तूच नाही का सांगितले व्हिडिओच्या सुरवातीला? तो मनुष्य फक्त तीन तास रोज उभा राहतो तिथे, कितने सालों से नाही ! तो काय वर्ष वर्ष उभ्याने तपश्चर्या करणारा योगी आहे का ?
३) थोडे लाडात येऊन (ब्लॉगर स्त्रीपात्र असेल तर अति लाडात येऊन) - तर मग आज तुम्ही कॉय 'बनवणार' आमच्या साठी? बटाटवड्याच्या स्टॉल वर बटाटेवडे करतात, डोश्याच्या स्टॉल वर डोसे, अजून काय कप्पाळ ? आणि हो, मराठीत सर्व खाद्यपदार्थ 'बनवले' जातात, ठीक वैसे ही जैसे हिंदी में 'बनाये' जाते हैं. अशी ही बनवाबनवी.
४) हे कश्यापासून 'बनते'? किंवा हिंदीत 'ये किस चीज से बनता है भैय्या? अरे वज्रमूर्खांनो, तुमच्या ब्लॉगचे ब्रीदवाक्य 'जायके के जानकार' आहे ना? तुम्ही स्वतःला फूडी, खवैय्ये वगैरे म्हणवता ना? मग साधी जिलबी करण्यासाठी काय पदार्थ लागतात हे सुद्धा तुम्हाला माहित नाही? अरे जिलबी आणि इमरतीतला फरक समजायला तुम्हाला पुढचा जन्म घ्यावा लागेल रे. कदाचित इमरतीसाठी उडीद भिजवून वस्त्रगाळ स्मूथ वाटताना बघून तर तुम्ही दहीवड्याची तयारी चालूये म्हणून मोकळे व्हाल, काही भरोसा नाही.
५) आंटी / भैया ये क्या डाल रहे हो ? वो क्या डाल रहे हो ? आंटी नी मख्ख चेहरा ठेवून 'जीरा' किंवा 'हरा धनिया' असे निष्पाप उत्तर दिले तरी 'आहाहा, ओहोहो, वाह वाह, मजा आनेवाला है दोस्तो' वगैरे ..
६) यानंतर तो स्टार प्रश्न येतो - समस्त फूड ब्लॉगर जनतेला हवाहवासा वाटणारा. ‘बटर कौन सा यूज करते हो ?’ भैय्याचे उत्तर - अमूल. या पॉइंटला समस्त फूड ब्लॉगर जमात वेडीपिशी होते, त्यांचे चेहरे चमकू लागतात, डोळे मिचकावून 'अमूऊऊऊल बतततत्त्त्तर, आहाहा, ओहोहो, वाह वाह. शानदार, गजब है गजब.. असे चित्कार. या पॉईंटला मराठीत अग्गायी गsss ... अम्मूऊल का ? अशी किंचाळी फोडणे आवश्यक.
७) ये देखिये, ये देखिये, ये देखिये (हे जमेल-सुचेल तसे ३ ते ९ कितीही वेळा) .....और ये हो गयी दोस्तो चीज की बारिश ! कोई कंजूसी नही. भाईसाब गजब है गजब.. कितना सारा चीज है देखो. जनाब, मेरे मुंह में तो पानी आ रहा है, रुका ही नही जा रहा है वगैरे. पुन्हा एकदा 'आहाहा, ओहोहो, वाह वाह, मजा आ गया' वगैरे वगैरे.. या सगळ्या बैलांना समोर बसवून प्रत्येकी अर्धा किलो अमूल चीज चे आणि बटरचे स्लॅब जबरदस्ती चावून चावून खायला लावायचे माझे एक हिंसक स्वप्न आहे. चव तुला मूळ पदार्थाची कळली नाहीये अजून आणि कौतुक कसले तर अमूल चीजचे ? हाऊ स्टुपिड इज द्याट ! येणि वे.
८) आणि आता कोविडकाळाची नड म्हणून - भैयाने देखो मास्क पेहना है, सफाई का पूरा ध्यान रखा है - हे बोलत असतांना तो भैया कळकट्ट प्लॅस्टिकच्या जुनाट डब्यातून बॅटर घेऊन तितक्याच कळकट्ट कढईत पुनःपुन्हा वापरून काळ्या झालेल्या तेलात 'इंद्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहा' च्या निरिच्छ वृत्तीने अग्नी-आहुती टाकत असतो, त्याच हातांनी हजारो हात लागून आलेल्या नोटा-नाणी मोजून घेत-देत असतो... ‘हायजिन का पूरा ध्यान’ कसे ठेवलेय यावर आमचे ब्लॉगर दादा/ ताई कंठरावाने जीव तोडून सांगत असतात ...
९) विक्रेत्या व्यक्तीचे केस पांढरे आणि कपडे थोडे जूनसर असतील तर यांना ताबडतोब 'हार्ड वर्किंग आंटी/अंकल' असा खिताब न मागता देण्यात येतो. खाण्यापिण्याचा स्टॉल चालवणे हे कष्टाचेच काम आहे, कुणीही केले तरी. त्याचा वयाशी किंवा राहाणीमानाशी काहीही संबंध नाही. हे 'हार्ड वर्किंग' तर मग उरलेले काय स्वतःच्या महालातील बागेतल्या गुलाबकळया खुडतात काय रस्त्याच्या कडेला त्यांच्या उन्हातल्या टपरीत ? हार्ड वर्किंग अंकल म्हणे. काहीही.
१०) हे रटाळ प्रश्नोपनिषद ह्या पॉइंटला थोडे मंद्र सप्तकाकडे झुकते, ब्लॉगरचे किंचाळणे थोडे(सेच) कमी होते - पदार्थांची चव घेण्याचा एक १० सेकंदाचा कार्यक्रम उरकला जातो. तो जगात भारी पदार्थ ओठांच्या बाह्यभागाला जेमतेम स्पर्श करताच ही मंडळी माना डोलावून डोळे मिटू लागतात आणि जिभेचा एक फक्त त्यांनाच जमणारा 'टॉककक्क' असा चित्तचमत्कृतिकारक आवाज काढतात. ब्लॉगर मराठी असेल तर 'मस्त मस्त मस्स्स्सस्स्स्त असे चढत्या भाजणीचे मस्तकात जाणारे मस्तकार आणि हिंदी असेल तर तेच परत मझा आ गया. ह्यावेळी तो पदार्थ चीजयुक्त असल्यास त्याला करकचून दाबून वितळलेल्या चीजचे ओंगळवाणे ओघळ क्लोजअप घेऊन दाखवणे हा अनेकांचा छंद असतो.
११) बरं, साधारण सव्वादोन सेकंदात यांना पदार्थातले सर्व बारकावे लग्गेच समजतात. पदार्थात 'लसणीचा मस्स्त फ्लेवर आलाय' वगैरे शेरे देता येतात. अरे दादा, त्या माणसानी किलोभर पदार्थ करतांना पाव किलो लसूण आमच्या डोळ्यादेखत टाकलाय रे, तूच नाही का दाखवला व्हिडीओ आम्हाला? तो तुझा 'फ्लेवर' पदार्थ करतांना, खातांना आणि नंतर खाऊन ढेकर देताना किलोमीटरभर अंतरातही जाणवेल ना रे... फ्लेवर म्हणे ! खातांना कचाकचा लसूण येईल दाताखाली.
१२) यांनतर एक राउंड होतो तो - लय भारी, लय म्हंजे लयच भारी, जगात भारी, जाळ अन धूर संगटच, आजवर खाल्लेल्या मिसळीत सर्वात भारी, ऐसी पानीपुरी / टिक्की / जलेबी आप को पूरी दुनिया में कहीं नहीं मिलेगी, गजब का स्वाद वगैरेचा ... 'जग' आणि 'पूरी दुनिया' म्हणजे यांच्या लेखी त्यांना माहिती असलेल्या त्यांच्या गावातील चारसहा जागा! अरे नतद्रष्ट जीवांनो, दुनिया फार मोठी आहे. तुमच्या मोहल्ल्यात, वस्तीत, गावात जे काही मिळतं ते अनुभवाच्या तोकडेपणामुळे तुला 'लय भारी' वाटत असेल तर तो दोष तुझा आहे, दर्शकांचा नाही. अनुभवाचं वर्तूळ मोठं करा रे, दायरा बढाओ !
१३) आता आपल्या राशीतील शनी साडेसातीच्या शेवटच्या टप्प्यात येतो. दोन सेकंदात 'तुमचा पत्ता नीट सांगा आंटी / ताई/ दादा/ भैय्या' असे टपरीमालकाला धमकावून आणि पदार्थ मिळण्याचे टायमिंग वगैरे तोंडातल्या तोंडात सांगून झाले की मग .... तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच खूपच फारच अतीच आवडलाच्च असेलच्च, म्हणून पेज लाईक करा, सब्सक्राईब करा, शेयर करायला विसरू नका. आम्ही असेच नवनवीन खाण्याच्या जागा घेऊन पुन्हा येऊ असे धमकीवजा आश्वासन आणि मग हुश्श...... संपले टॉर्चर !
मराठीत फूड ब्लॉगर तुलनेने कमी आहेत. जे आहेत ते 'कानातून धूर आणणारी मिसळ' आणि 'सर्वात मोठी गावरान / कारभारी / सरपंच मटन थाळी' यापलीकडे फार काही जाऊ शकलेले नाहीत. मराठी फूड ब्लॉगर्सपैकी शेकडा ९९ लोक Mutton चा उच्चार 'मटण' आणि Chicken चा उच्चार 'चिकण' असा का करतात हे न सुटणारे कोडे आहे. दोन्ही इंग्रजी शब्दांना सुयोग्य सुटसुटीत पर्याय मराठीत अजूनही न रुजल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करूया.
‘आजच्या धकाधकीच्या जीवनात’ किंवा ‘कधी कधी आपल्याला घरी जेवण बनवायला (स्वयंपाक करायला नाही, प्लीज नोट माय लॉर्ड) कंटाळा येतो’ अशी रटाळ आणि चावून चोथा झालेल्या पाण्याहून पातळ शब्दात फूड व्हिडिओची सुरुवात करणाऱ्या ब्लॉगर्सचे पुढचे निवेदन ऐकण्याची इच्छा होत नाही. ते मात्र नेटाने ४-५ मिनिटे दळण दळतात. टीव्हीच्या मराठी बातमीदारांचे 'जसे की तुम्ही बघू शकता' टाईपचे मराठी आणि 'भन्नाट', 'मस्त', 'चमचमीत' आणि सांगणारी व्यक्ती पुण्या-ठाण्याची असल्यास 'अप्रतिम' अशा चार विशेषणांचा आलटून पालटून वापर करीत कोणत्याही पदार्थाचे, हॉटेलचे किंवा टपरीचे वर्णन पूर्ण करतात. त्या शहरात-गावात शेकडो टपऱ्यांवर सेम पदार्थ मिळत असला तरी त्यांच्या आजच्या एपिसोडमधले ठिकाण 'शहरातल्या खवैयांची पंढरी' वगैरे असल्याचे बिनधास्त सांगतात. ही पंढरी मात्र प्रत्येक एपिसोडला बदलते, गाभाऱ्यात कधी वडापाव तर कधी 'मेंदू' वडा (मेदुवडा नाही) असल्याने भक्तही बदलत असावेत. ह्यांचं काम फक्त 'वॉव वॉव', 'ओ माय गॉड' चे चित्कार काढणे, 'बघा बघा कित्ती बटर सोडलंय' किंवा 'पुरी कशी टम्म फुललीय' अशा त्याच त्या कॉमेंट आणि त्याला जोडून दुसरी-चौथीतली मुलं शालेय नाटकात करतील त्या लेव्हलचा पूरक अभिनय करत राहणे एव्हढेच.
चहाच्या चमच्याने दोन दोन चमचे रंगहीन-चवहीन-वासहीन टाईपचे पदार्थ १०-१२ वाट्यांमधून देणाऱ्या 'अनलिमिटेड थाळी' प्रकाराचे ह्या लोकांना फार कौतुक. 'अनलिमिटेड थाळी' पद्धतीच्या जागांचे विशेष प्रेम हे मराठी आणि गुजराती दोन्ही फूड ब्लॉगरमध्ये दिसते. 'पोटभर खा, अनलिमिटेड... थाळीत ‘हे ही’ मिळते, ‘ते ही’ मिळते, अनलिमिटेड, अनलिमिटेड - तारसप्तकात हे पुन्हा पुन्हा सांगणे आणि वर 'फक्त' अमुक अमुक रुपये असे ठासून सांगत राहणे मराठी-गुजराती दोन्हीकडे असते. ह्या थाळी प्रकाराच्या उपाहारगृहांची नावे हा एक वेगळाच विषय आहे. आता महाराजा, महाराणी, राजधानी, थाटबाट वगैरे नावे जुनी झाल्यामुळे 'सासुरवाडी', 'रजवाडु', 'ससुराल', सासूमाँ की रसोई', 'पाहुणचार', 'जावईबापू' वगैरे नावे चलनात आहेत, थाळीतले पदार्थ मात्र तेच जुनेपुराणे. जून झालेल्या जावयाला कोण विचारतो सासुरवाडीत? वाढलंय ते खा गुमान. आमचे ब्लॉगर मित्र मात्र लग्नानंतर पहिल्यांदाच मांडवपरतणीला सासुरवाडीला गेलेल्या जावयासारखे उत्साहात !
'स्ट्रीट फूड' म्हटले की स्वच्छतेचा मुद्दा बहुतेक ठिकाणी ऑपशनलाच टाकावा लागतो. वापरलेला कच्चा माल आणि जागेची स्वच्छता आधीच 'अनहेल्दी' श्रेणीची असेल तर तयार झालेले प्रॉडक्ट अधिकाधिक 'सुपर अनहेल्दी प्रो मॅक्स' कसे करता येईल याची जणू देशव्यापी स्पर्धा आहे. भारतीय स्ट्रीट फूड वेंडर्स आणि फूड ब्लॉगर्सच्या जगात ज्यात त्यात बटर ओतणे आणि भसाभसा मायोनिझ, चीज टाकणे म्हणजे पदार्थ 'भारी' असे एक गृहीतक जोरात आहे. मुंबई- अहमदाबाद पट्ट्यात तर सॅन्डविचमध्ये ब्रेड ऑप्शनल आणि चीज हाच मुख्य घटक पदार्थ झालाय.
कसलीशी गचाळ 'फ्यूजन' रेसिपी असेल एखाद्या जागी तर मग ह्यांचे वासरू वारं पिते जणू. मुळात स्ट्रॉबेरीचा पिझ्झा, अननसाची भजी आणि श्रीखंडाचे स्टफिंग असलेले सॅन्डविच खायला कोणी का तयार होईल हेच कळत नाही. त्यावर अगदी किळस वाटेल एव्हढी 'चीज की बारिश' आहेच. हे असले उद्योग करणाऱ्या जागा सहा-आठ महिन्यात गाशा गुंडाळतात हे बघितले आहे. पण असल्याच जागा फूड ब्लॉगर्सच्या यादीत सर्वात वर असतात, अलग आणि ‘हटके’ म्हणून.
ह्या बटबटीत पार्श्वभूमीवर दर्जेदार फूडब्लॉगिंग करणाऱ्या काही मोजक्याच लोकांचे काम उठून दिसते. विषयातले ज्ञान, केलेला रिसर्च, अन्नाविषयीचे मौलिक चिंतन, जिव्हेचा जागतिक स्वादानुभव, स्वतःच्या अंगी असलेला तोलामोलाचा सुगरणपणा, सुंदर भाषा असे सर्व एकत्र असल्यामुळे विनोद दुआंचा 'जायका इंडिया का' सारखा दर्जेदार कार्यक्रम कोण विसरू शकेल? अनेक वर्षांआधी देशातील वेगवेगळ्या शहरातल्या खाद्यजत्रेला घरोघरी पोहचवणारे आद्य फूड ब्लॉगरच म्हणावे त्यांना. (प्रस्तुत हौशी लेखकूला दुआंच्या दर्जेदार प्रकाशनासाठी खाद्यभ्रमंतीबद्दलच लिहायला मिळाले हा बहुमान इथे आत्मस्तुतीचा दोष पत्करूनसुद्धा सांगावा वाटतो मिलॉर्ड )
आता उदंड झालेल्या कोट्यावधी फूड ब्लॉगर्समधील काहींना लाखो प्रेक्षक आहेत. त्यांना मोठमोठ्या तारांकित हॉटेल्समध्ये मानाची आमंत्रणं असतात, चकटफू. काहींना भरपूर द्रव्यप्राप्ती सुद्धा होते म्हणे. उर्वरित लाखो-हजारोंना काही लाईक्स आणि एक दोन कॉमेंटवर समाधान मानावे लागत असणार. आणि आपल्या सारख्या दर्शकासाठी आहेच 'आहाहा, ओहोहो, वाह वाह, मजा आनेवाला है दोस्तो आणि मस्त मस्तत्त्त्त मस्तत्त्त्त चीज आणि अमूल बत्तर ! ..
समाप्त
* * *
(लेखातील चित्रे जालावरून साभार)
स्वाईप अप!
स्वाईप अप!
बाकी भाषा रटाळ, शब्दखजिना रिता, अभ्यास नाही वर बोट ठेवता ठेवता 'कितसे सालोंसे खडे हो' चा शाब्दिक अर्थ घेऊन 'तपश्चर्या करणारा योगी' विनोद टाळता आला असता की.
सगळीकडे अमूल बटर की नदीयाँ.
सगळीकडे अमूल बटर की नदीयाँ. आणि सगळ्या पदार्थांमध्ये चीज घालायची काय गरज आहे? मला ते पूर्वी मुंबईत वडापाव मध्ये चीज टाकायचे ते आवडायचे नाही आता तर कहां कहां पे चीज डालते है
आता तर कहां कहां पे चीज डालते
आता तर कहां कहां पे चीज डालते है >>>>
मराठीत फूड ब्लॉगर तुलनेने कमी
मराठीत फूड ब्लॉगर तुलनेने कमी आहेत. जे आहेत ते 'कानातून धूर आणणारी मिसळ' आणि 'सर्वात मोठी गावरान / कारभारी / सरपंच मटन थाळी' यापलीकडे फार काही जाऊ शकलेले नाहीत. >>> चला म्हणजे मला स्कोप आहे इथे करिअर बनवायचा .. पुढच्या वेळेस भारतात आले की माटुंग्याच्या चटई पावभाजीवाल्याला पकडून एक विडीओ करेन म्हणते
म्हाळसा >> तुम्ही
म्हाळसा >> तुम्ही उस्गावातल्या गोष्टी मराठीत ब्लॉग करा की. अजून वेगळे काही तरी - पहा इथे इकडची लोकं सुद्धा मिटक्या मारत खात आहेत
उसगावातली चित्रपटगृहे डी - टे
उसगावातली चित्रपटगृहे डी - टे - ल मध्ये लेडिज वॉशरुम सकट मध्यंतरी एका मराठी व्ह्लॉग मध्ये होती. :फेसपाम: सो उसगावातले करायचे असतील तर लगेच चालू करा. टफ्फ काँपिटिशन आहे
शामा गॅाट इट
शामा गॅाट इट
उसगावातली चित्रपटगृहे डी - टे
उसगावातली चित्रपटगृहे डी - टे - ल मध्ये लेडिज वॉशरुम सकट मध्यंतरी एका मराठी व्ह्लॉग मध्ये होती.>> हो बघितलंय ते.. इथे जास्त कॅाम्पिटिशन आहे म्हणून भारतातच जाऊन करेन
वाय एफ एल सोबत अजून एक
वाय एफ एल सोबत अजून एक सन्माननीय अपवाद म्हणजे दिल्ली फूड वॉक्स , तो अँकर थोडा तोतरा आहे, पण फूड हिस्टरी आणि कल्चर नीट कॅपचर करतो, फुकट सवंग डायलॉग नाही मारत आणि स्ट्रीट फूड मध्ये पण विक्रेत्यांना स्वच्छता, वर्तमानपत्राच्या कागदात गरम तळलेले किंवा ओले पदार्थ न देण्याचे अन त्यामागे वर्तमानपत्राच्या शाई मध्ये हेवी मेटल्स असतात त्याने ग्राहकांना पोयझनिंग होईल वगैरे डेफिनेटली उत्तम सल्ले पण तो देतो
भारी लिहिलय एकदम.
भारी लिहिलय एकदम.
छान झालाय लेख. बरेच मुद्दे
छान झालाय लेख. बरेच मुद्दे पटलेच. स्पेशली चीज, बटर आणि हिंदीतून मराठीत शब्दशः भाषांतर करायचे मुद्दे अगदीच परफेक्ट.
वाय एफ एल सोबत अजून एक
वाय एफ एल सोबत अजून एक सन्माननीय अपवाद म्हणजे दिल्ली फूड वॉक्स , >>>>> हो. याचे ब्लॉग्ज पण मस्त असतात.
लोल मस्त लेख. कृपाल अमन्नाचा
लोल मस्त लेख. कृपाल अमन्नाचा चॅनेल बेंगलोरमधल्या इटरीज वर आहे, तो प्रचंड बडबड करत असतो. आणि पदार्थ आवडला की एकदम काहीतरी विअर्ड आवाज काढतो. अशीच एक तन्वी किशोर नावाची बाई वटवट करत असते, एकदम चिरक्या आवाजात. एक शुभांगी किर नावाच्या बाईंचा चॅनल आहे फूडवर, त्यात सध्या त्यांच्या मुलाचं लगीन झालंय आणि त्याचा हनिमूनवर व्लॉग चालू आहे महाराष्ट्र टुरिजमचे व्हिडीओ मस्त आहेत. हल्ली जे रेसिपी करतात ते कमी लांबीचे व्हिडीओ ठेवतात, जे बरे आहे.
एक शुभांगी किर नावाच्या
एक शुभांगी किर नावाच्या बाईंचा चॅनल आहे फूडवर, त्यात सध्या त्यांच्या मुलाचं लगीन झालंय आणि त्याचा हनिमूनवर व्लॉग चालू आहे Proud>>
अस सतत प्रत्येक गोष्ट लोकांना सांगायचीच व्यसन असत असेल का लोकांना ? कि पैशासाठी अस करत असतील ?
ते थोबाडीत मारण्याचे व्हिडीओ तर फार वाईट आहेत. बायको नवर्याला मारते, आई मुलाला मारते . व्हॉट्सअॅप वर सगळे हसत असतात म्हणुन बघायला जावं तर हे सगळे बघायला मिळते. उत्सुकता फार मला. शाळेचा एक ग्रुप यासाठी सोडून दिला.
वाय एफ एल सारखे आणखी एक आवडते चॅनल, अनुराधा चॅनल पण सुरेख आहे. काकींचे बोलणे, पदार्थ फार छान. घरंदाज आणि सुसंस्कृत .
पण आजकाल हे बाकीचे व्हिडिओ बघून अस वाटत कि लोकांना तसला फालतुपणा आवडतो कि काय.
मिडलइस्टन आई/ बाप आपल्या अ
मिडलइस्टन आई/ बाप आपल्या अॅडल्ट मुलाला चपलेने मारतात वाले व्हिडिओ जाम फनी असतात. त्यातील अॅक्सेंटमुळे, का चपलेने मारीन शी आपलं कनेक्शन असल्याने... कोण जाणे, पण जाम हसू येतं.
काहीही दाखवतात , अगदी काहीही
काहीही दाखवतात , अगदी काहीही , पैसे मिळतात म्हणून. आणि खरच खूप मिळतात पैसे. काहीकाही लोकांनी महागड्या गाड्या घेतल्यात, घरे बांधलीत म्हणजे नक्कीच खूप इन्कम आहे. रोज तसेही काय दाखवणार ना?
येस पैसे मिळतात... मजबूत...
येस पैसे मिळतात... मजबूत...
येस पैसे मिळतात... मजबूत...
येस पैसे मिळतात... मजबूत...
>>>
कसे.. प्लीज मार्गदर्शन करणारा धागा काढा
मला बोअर झालेय रोज तोच जॉब करून...
आमचा पोराचा ड्रीम जॉब
आमचा पोराचा ड्रीम जॉब युट्युबर बनणे हाच आहे. कुठल्या युट्युबरला किती पैसे मिळाले कोणाचे किती फॉलोअर्स आहेत याची इत्यंभुत माहिती असते त्याला. देसी डॅड मेंटॅलिटी दाखवायला मला फुल स्कोप आहे.
कुठल्या युट्युबरला किती पैसे
कुठल्या युट्युबरला किती पैसे मिळाले कोणाचे किती फॉलोअर्स आहेत >> ह्या ॲनालिसिसचाच रोज व्हिडिओ बनवायला सांगा त्याला.. चांगला चालेल
भन्नाट लिहीलंय, हाहाहा.
भन्नाट लिहीलंय, हाहाहा.
सगळ्या पदार्थांमध्ये चीज
सगळ्या पदार्थांमध्ये चीज घालायची काय गरज आहे?
हे प्रकरण गुजरातमधून आलंय. तिकडचे हॉटेलवाले सांगतात की चिजवाल्या पदार्थांनाच मागणी आहे.
धमाल लिहिलय सगळं मजा आली.
धमाल लिहिलय सगळं मजा आली.
ते चित्कारणं अगदीच डोक्यात जातं खरंच. कुणीही उठतं आणि कॅमेरा अडकऊन युट्युबर बनतंय..
युट्युबर होणं म्हणजे
युट्युबर होणं म्हणजे स्वतःच्या घरात कॅमेरा लावून ठेवणं. तरी रोज रोज काय मसाला देणार? कोबीची भाजी खायला लागते हेच खूप आहे पण हे लोक ते पण दाखवत बसतात.
शुभांगी कीरचे पाच लाखावर फॅन्स आहेत. आता त्यावरच घर चालतं बहुतेक त्यांचं. मग काय हनिमून तर हनिमून.
माझ्या मुलीच्या क्लासमेटची आई
माझ्या मुलीच्या क्लासमेटची आई ब्युटी व्लॉगर आहे. अनेक वर्ष मेकप व्हीडीओज बनऊन झाले, लाईफ स्टाईल झाली , कूकींग शॉपिंग सगळं झाल तर १ एपि. मधे तिने ४० मिन खरकटी भांडी धुतली, बॅकग्राऊंड ला करोना काळात कसं मनोधैर्य ठेवावं या विषया वरच विकीपेडीय तिचं भाषण. फार च अद्भुत होतं ते
कॉमेंट्स मधे फार खेचली लोकांनी तिची..
पुढच्या महिन्यात नवा डिश वॉशर घेऊन मी कशी कॉमेंट्स नी खचून न जाता मार्ग काढला त्यावर प्रवचन
बघाच..सुपरप्रिन्सेसजो फूलटू लॉल.
लोकं का बघतात असले कार्यक्रम
लोकं का बघतात असले कार्यक्रम हेच कळत नाही
मी मध्यंतरी एक foodie incarnate नावाचा बघायहो
त्यातही हेच, बटर च्या नद्या आणि चीझ चे डोंगर
त्यात पुन्हा सँडविच मध्ये चॉकलेट आणि काय काय
तरी बाकीच्या लोकांच्या मनाने व्हरायटी असते
काश्मीरचा गुलाबी चहा वगैरे बघायला मज्जा आलेली
फॉलोअर्स तर मला न कळलेला प्रकार आहे, मध्यंतरी पोराने काही व्हिडीओ दाखवले एका माणसाचे
गळ्यात बटबटीत सोन्याची चेन घातलेला एक टकला माणूस वाचावचा चिकन खात असतो आणि क्लोजप मध्ये तो कसा खातोय हे दाखवतात
अत्यंत ओंगळवाणे आणि किळस यावी असे
त्याला कित्येक लाख फॉलोअर्स आहेत, म्हणलं लोकं सिरियसली हे बघतात?
हे खाण्याचे व्हिडिओ, त्याला
हे खाण्याचे व्हिडिओ, त्याला काहीतरी मुकबॅंग व्हिडीओ असे म्हणतात का?(के ड्रॅमा बघून आलेली अर्धअक्कल)
मूक बँग >>>> तोंड दाबून
मूक बँग >>>> तोंड दाबून बुक्क्यांचा मार
हेच आठवलं
मस्त लेख मला पण तुमचे फूड
मस्त लेख मला पण तुमचे फूड ब्लोगिन्ग चे प्रयत्न असा काही लेख असेल असे वाटलेले.
एकदम बरोब्बर लिहिले आहे. कुणाल वि जयकर ने खाणे ताबडतोब थांबवले पाहिजे. चेहरा पस रलेल्या भज्या सारखा दिसतो. व ते सोबो टाइप अॅड एजन्सीतले हिंदी. ओ पात्रानी मच्छी. ओ पुरी विथ भाजी ह्याव अन त्याव.
ह्या लोकांना अॅक्चुअल स्वयंपाका बद्दल कमी माहिती असते. अनुभव साप्रा नेहमी हिंग का स्वाद इतकेच म्हणतो. व बहुत बुनियादी उमदा हे शब्द विनोद दुवाचे ढापले आहेत. एक उमदा नावाचा टीशर्ट पण घालतो. पण प्रत्येक गावात तेच. कचोडी चहा सामोसा. बरोबर कसलीतरी भाजी.
पन देल्ही फूड वॉक्स चे छान असतात व्हिडीओ.
क्रिपा ल अमाना बरोब्बर फारच बडबड करतो व काही ही खाल्ले की म्म्म्म्म्म्म्म करत ऑर्गॅस्मिक एक्स्प्रेशन देतो. आगावु आहे. लिंक्ड इन वर पण स्वतःचे मोटर बाइक लेदर जाकेट वाले फोटो टाकतो. ह्याची बायको मात्र सुरेख आहे. श्रिवल्ली का काय नाव आहे. आंध्रा सुंदरी.
चैतन्य फूड ब्लॉग मला आव डतो. सांगली कोल्हापूर इचलकरंजी. उत्तम कव्हर करतो. पुणे हैद्राबाद सोलापूर परेन्त आला आहे.
चैतन्य मराठी मुलगा आहे. एकदा
चैतन्य मराठी मुलगा आहे. एकदा इलेक्ट्रिक कुकर चे डेमो देताना सौट मोड असे म्हटलेला. ते लै गोड.
तुम्ही अब्दुल मलीक फरीद पाहिले आहे का? एकदम हिंबो टाईप क्युट व्यक्तिमत्व. सौदी अरेबिआतील मक्का मह्द्ये राहणारा फक्त पार्सल आणतो व दाखवतो. कधी कधी आता बाहेर हाटेलात पण जातात.
स्ट्रीट फूड पीके मस्त ब्लॉग आहे. त्याचे चलें फार फेमस आहे. कधी कधी अब्दुल व हा मिळून कुठे कुठे जातात. ह्याचे चायना बॉर्डर वगैरे भाग बघा.
तनव्ही किशोर. तेच महा वचवच कार्टी. व प्रॉडक्ट प्लेसमेंट प्रोमोशन पण करत राहते.
शेफ बद्दल पण लिहा. रणवीर ब्रार कुणाळ कपूर, अजय चोप्रा. महा इरिटेटिन्ग.
Pages