प्रतिभावंतांच्या तऱ्हा

Submitted by कुमार१ on 23 January, 2022 - 21:40

अनेक प्रतिभासंपन्न व हुशार माणसे त्यांच्या कलानिर्मितीमुळे समाजात लोकप्रिय असतात. ती विशिष्ट समूहांमध्ये वलयांकित म्हणून गणली जातात. परंतु ती व्यवहारात मात्र कित्येकदा (इतरांचे दृष्टीने) तऱ्हेवाईक असतात. त्यातले काही तर विक्षिप्त म्हणूनही प्रसिद्ध होतात.
या मंडळींचे अशा वागण्याचे बरेच किस्से समाजात प्रचलित असतात. त्यातले काही खरे, काही तिखटमीठ लावून वाढवलेले तर काही असत्यही असतात. अशी व्यक्ती जितकी जास्त प्रसिद्ध, तितकेच तिच्या नावावर खपवल्या जाणार्‍या किश्शांची संख्याही भरपूर असते.

अशा व्यक्तींची जागतिक क्रमवारी लावायची ठरल्यास त्यात बहुदा अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा प्रथम क्रमांक लागेल ! त्यांच्या नावावर असलेले किंवा खपवलेले असंख्य किस्से आपण कधी ना कधी ऐकलेले असतात. महाराष्ट्रीय साहित्यिकांपुरते बोलायचे झाल्यास या बाबतीत पु ल देशपांडे यांचा प्रथम क्रमांक लागेल. कालौघात अशा किश्शांच्या खरे-खोटेपणाची शहानिशा करणेही कठीण होऊन बसते. नामवंत व्यक्तींच्या संदर्भात प्रचलित असलेल्या गमतीशीर, तऱ्हेवाईक किश्शांचे किंवा त्यांच्या जगावेगळ्या कृतींचे संकलन करण्यासाठी हा धागा आहे.
माझ्या वाचनात आलेल्या काही साहित्यिकांच्या किश्शांपासून सुरुवात करतो.

१. दुर्गा भागवत : त्यांच्या भरीव साहित्य सेवेबद्दल त्यांना ज्ञानपीठ आणि पद्मश्री असे दोन्ही पुरस्कार सरकारतर्फे जाहीर झालेले होते. परंतु हे दोन्ही पुरस्कार कणखर दुर्गाबाईंनी पंतप्रधान इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीच्या निषेधार्थ नाकारले होते.
जेव्हा कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ मिळाले तेव्हा सर्वांनाच आनंद झालेला होता; अपवाद फक्त दुर्गाबाई ! त्यांनी एका माणसाला सांगितले, “नाशिकला जा आणि कुसुमाग्रजांना विचार की, तुम्हाला ज्ञानपीठ मिळालं ते ठीक आहे. परंतु आणीबाणीच्या काळात तुम्ही काय करीत होतात ?” त्या माणसाने हा निरोप खरंच कुसुमाग्रजांना पोचवला. त्यावर ते हसत उत्तरले, “हे पहा, दुर्गाबाईंचे प्रश्न दुर्गाबाईंना विचारू देत, तुमचे प्रश्न तुम्ही विचारा !” असे हे बेरकी प्रत्युत्तर.

२. जी ए कुलकर्णी : त्यांचे एक वैशिष्ट्य होते. त्यांची कुठलीही कथा अथवा लेख जेव्हा एखाद्या नियतकालिकात प्रकाशित होई, त्यानंतर तो छापील लेख ते स्वतः बिलकुल वाचत नसत. ते म्हणायचे, “जेव्हा लेख हस्तलिखित स्वरूपात माझ्याजवळ असतो तोपर्यंतच तो माझा. एकदा का तो छापून झाला की तो आता वाचकांचा झालेला असतो. त्याचे भवितव्य त्यांच्या हाती’.
जीएंची बरीच पुस्तके एका प्रकाशकांनी प्रसिद्ध केली होती. जीएंनी संबंधित प्रकाशकांशी पत्रव्यवहार भरपूर केला परंतु आयुष्यात भेट घेण्याचे मात्र टाळले. त्यांच्या काजळमाया या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. तो त्यांनी स्वीकारला देखील होता. परंतु पुढे या घटनेवर (तांत्रिक मुद्द्यावरून) साहित्य क्षेत्रात टीका झाली. त्याने व्यथित होऊन त्यांनी (प्रवासखर्चासह) तो पुरस्कार सरकारला परत केला होता.

३. चि त्र्यं खानोलकर (आरती प्रभू) यांचा किस्सा तर अजब आहे. ते लोकांना छातीठोकपणे सांगत, "साहित्यबाह्य गोष्टींना वगळून निव्वळ गुणवत्तेच्या जोरावरच ज्ञानपीठ पारितोषिक द्यायचे ठरले तर मराठी भाषेत तरी तो मान फक्त आपल्या एकट्याकडेच जातो !"
अनेकांना हे ऐकून अचंबा वाटे.
एवढेच नाही तर खानोलकरांनी वि स खांडेकर यांच्याबद्दलही असे वक्तव्य केले होते,
" येत असतील त्यांना वाचकांची ढिगांनी पत्रे आणि तामिळनाडूतील एखादी मुलगी त्यांना पूज्य पिताजी म्हणूनही संबोधत असेल. पण ते वेगळं आणि चांगलं लेखक असणं वेगळं".
स्वतःचे साहित्यिक यश डोक्यात गेल्याने त्यांनी अनेकांना उद्धटपणे बोलून दुखावलेले होते.

आता पाहू काही विदेशी साहित्यिकांचे नमुने :

४. सॉमरसेट मॉम हे विख्यात इंग्लिश लेखक. त्यांच्या लेखनाची कठोर शिस्त होती. रोज सकाळी नऊ ते दुपारी एक पर्यंत ते त्यांच्या लेखनाच्या टेबलाशी असत आणि रोज काही ना काही लिहित. त्यामध्ये रविवार असो वा सण, किंवा अगदी स्वतःचा वाढदिवस, लेखनात कधीही खंड पडला नाही. त्यांना एका मुलाखतकाराने विचारले होते की रोज नवे लेखन खरच सुचते का ? त्यावर ते म्हणाले, “नाही, रोज नवे सुचत नाही. तरीसुद्धा मी लेखनाच्या टेबलापाशी ४ तास बसतोच. कित्येकदा काहीतरी विचार करत माझ्या स्वतःच्याच सह्या असंख्य वेळा गिरवत बसतो. पण नित्यक्रम चुकवत नाही”.

५. झोरान झिवकोविच या सर्बिअन लेखकाचे एक मत अजब आहे. तो म्हणतो, की ५० वर्ष हे वय लेखक होण्यासाठी आदर्श आहे. आयुष्यातील त्या आधीची वर्षे सखोल वाचनात घालवावीत. कारण आपण लिहायला सुरुवात करण्यापूर्वी गेल्या हजारो वर्षातल्या आपल्या आधीच्या लोकांनी काय लिहून ठेवले आहे ते वाचणे आवश्यक आहे !

६. जे डी सालिंजर हे अमेरिकी लेखक त्यांच्या कॅचर इन द राय या कादंबरीमुळे गाजले. या कादंबरीच्या पहिल्या आवृत्तीच्या मुखपृष्ठावर एक अतिशय जिवंत असे चित्र छापले होते. परंतु पुढे त्यांनी मुखपृष्ठावरील चित्र या प्रकाराचाच धसका घेतला. पुढे त्यांच्या सर्व पुस्तकांसाठी त्यांनी मुखपृष्ठावर कोणतेही चित्र अथवा छायाचित्र छापायचे नाही असा आग्रह धरला. लेखकाच्या शब्दांमधून जो काही आशय व्यक्त होतोय तीच त्या पुस्तकाची वाचकावर उमटणारी एकमेव ओळख असली पाहिजे हे त्यांचे मत. लेखकाला काय सांगायचय त्यासाठी एखाद्या चित्रकाराची मध्यस्थी नसावी यावर ते ठाम राहिले.
याच धर्तीवर एका व्यंगचित्रकारांची अशीच भूमिका आहे. त्यांचे नाव आता आठवत नाही. ते देखील त्यांच्या व्यंगचित्रांमध्ये किंवा चित्राखाली शब्दांचा अजिबात वापर करीत नसत. चित्रकाराच्या चित्रातूनच् प्रेक्षकाला जे काही समजायचं आहे ते समजले तरच ते उत्कृष्ट चित्र, असे त्यांचे ठाम मत होते. या निमित्ताने लेखन आणि चित्रकला या दोन्ही कला समांतर चालाव्यात की एकमेकांना पूरक म्हणून त्यांचा वापर करावा हा एक चर्चेचा विषय उपस्थित होतो.

आता एक किस्सा राजकारणी व्यक्तीचा...
७. हा अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दलचा असून ते पंतप्रधान होण्यापूर्वीच्या काळातला आहे. ते जेव्हा दुर्गम भागांत दौऱ्यांवर निघत तेव्हा बरोबर स्वतःचा एक छोटा ट्रांजिस्टर ठेवत. तो नियमित ऐकणे हा त्यांचा छंद होता. निघण्यापूर्वी ते बरोबरच्या सचिवांना विचारत, “आपण जिथे चाललो आहोत तिथे जर या ट्रांजिस्टरच्या बॅटरीज संपल्या तर त्या विकत मिळतील ना? नाहीतर बरोबर ठेवाव्यात ”. त्यावर त्यांचे सचिव फक्त मंद स्मित करीत.

आणि हा किस्सा गिर्यारोहकाचा ...
८. जगातील पहिले एव्हरेस्टवीर सर एडमंड हिलरी यांनी त्यांच्या पर्वतचढाईचे अनुभव ‘व्ह्यू फ्रॉम द समिट’ या पुस्तकात लिहिले आहेत. कालांतराने हिलरी भारतातील न्यूझीलंडचे उच्चायुक्त होते. त्यांच्या या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘शिखरावरुन’ या नावाने श्रीकांत लागू यांनी केलेला आहे. त्या अनुवादासाठी लागू यांनी हिलरी यांची परवानगी मागितली होती. त्यावर हिलरींनी ती लगेच दिली. मग लागूंनी विचारले की मानधन किती द्यावे लागेल ? त्यावर हसून हिलरी म्हणाले, “मला पैसे नकोत, फक्त तुमची पिठलं-भाकरी एकदा खाऊ घाला !”
अशी ही दिलदार वृत्ती.

असे गमतीशीर किंवा तर्‍हेवाईक किस्से सांगण्यासाठी मी काही क्षेत्रांतील व्यक्ती निवडल्या आहेत. हे किस्से मी कुठल्या ना कुठल्या पुस्तक/नियतकालिकात वाचलेले आहेत. प्रतिसादांमध्ये वाचकांनी कुठल्याही क्षेत्रातील नामवंतांचे असे किस्से लिहायला हरकत नाही. तुम्ही लिहिलेला किस्सा हा स्वतः वाचलेला आहे की ऐकीव आहे याचा सुद्धा उल्लेख करावा. तुमच्या माहितीतील एखाद्या व्यक्तीचा (जरी वलयांकित नसली तरी) जर काही वैशिष्ट्यपूर्ण किस्सा असेल तरी लिहायला हरकत नाही.
....................................................................................................................

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

‘कादंबरीचे पहिले वाक्य’
हा पाश्चात्य साहित्यात बहुचर्चित विषय आहे. अनेक नामांकित लेखकांच्या पुस्तकांतील पहिले वाक्य हे अतिशय अर्थपूर्ण आणि पकड घेणारे असते. अशी बरीच वाक्ये अजरामर झालेली असून ती स्वतंत्र अभ्यासाचा विषय होऊन बसली आहेत. या संदर्भात लिओ टॉलस्टॉय यांच्या Anna Karenina या कादंबरीचे पहिले वाक्य (इंग्रजीत) लिहिण्याचा मोह होतोय :

All happy families are alike; each unhappy family is unhappy in its own way.
त्रिकालाबाधित सत्य सूचित करणारे असे हे अजरामर वाक्य !

या वाक्याला अनुसरून इंग्रजीत Anna Karenina principle असे एक तत्त्व मांडले गेले. त्याचा मथितार्थ असा :

एखादी कृती यशस्वी होण्यासाठी तिच्याशी संबंधित सर्व घटकांची पूर्तता व्हावी लागते; कोणत्याही एका घटकाच्या त्रुटीमुळे त्यात अपयश येते.

'अनुकूल' आणि त्या खालची 'द स्केअरक्रो' दोन्ही वाचल्या. 'द स्केअरक्रो' सुरवातीला भितीदायक आणि नंतर अतिशय दुर्दैवी वाटली. कमी शब्दांत प्रभावी आहे.

अनुकूल या कथेत आणि फिल्ममधे फार फरक नाही. तरीही -

अनुकूलचे मालक निकुंज बाबू फिल्ममधे प्रोफेसर व यात व्यावसायिक आहेत. कथेत ते मित्रांसोबत विरंगुळा म्हणून जुगार खेळतात. त्यांचे व्यवसायाने वकील असलेले काका- निबारन बॅनर्जी त्यांच्याकडे अधुनमधून येत असतात. जे कंजूष असूनही भरपूर संपत्ती बाळगून असतात. फिल्ममधे स्वतः निकुंज बाबुंनी भगवद्गीतेत नीती व सत्याची बाजू कशी बदलत असते आणि अशा वेळी आपण विवेकाने - conscience ने ठरवून आपल्या हिताचे निर्णय घ्यावे लागतात असे सांगितले.

कथेत तसं काही नाही, त्याची अशी द्विधा मनस्थिती होत नाही. उलट तो आपापलेच शिकून निबारन बाबूंची गीतापठणातली चूक दाखवून देतो. तेव्हा ते त्यांना यःकश्चित नोकराने आपल्या सारख्याची चूक काढणं हा मोठा अपमान वाटून निकुंज बाबुंकडे तक्रार करतात. निबारन बाबूंना अनुकूलला आवडून घ्यायचेच नसते असे येथे वाटले. सगळ्यात अनाकलनीय किंवा open to interpretation म्हणता येईल अशी गोष्ट म्हणजे नंतर जेव्हा टागोरांचे गाणं गुणगुणत असताना अनुकूल निबारनबाबूंची चूक दाखवून देतो व ते त्याच्यावर हात उगारतात व तो त्यांना बोटाने शॉक देऊन मारतो. अर्थात या नियमाची सर्वांना कल्पना असते व निकुंज बाबुंचा व्यवसाय डबघाईस आला आहे, त्या कारणाने अनुकूलला परत पाठवावे लागणार आहे याचीही अनुकूलला कल्पना असतेच. या 'अपघातामुळे' काकांची सगळी प्रॉपर्टी निकुंज बाबुंना मिळते.

फिल्म मधे त्याला गीतेवर बोलून विवेकाबद्दल समजावलेले दाखवले आहे. येथे त्याने स्वतःच निर्णय घेतला आहे. अनुकूलने परिस्थितीनुरूप स्वतःत बदल केले आहेत, त्याला निकुंज बाबुंकडे रहायचे आहे. त्यासाठी त्यांना पैशाची गरज होती, त्याने अडाप्ट आणि इवॉल्व केले आहे. तो 'आता यांच्या मृत्यूने तुमचं भलंच होईल' असेही म्हणतो. त्याला स्वतःची विकसित होत जाणारी मन आणि बुद्धी आहे. जे फिल्म मधे तितके स्पष्टपणे लक्षात येत नाही. त्याने ह्या नियमाचा स्वतःच्या आणि निकुंज बाबूंच्या हितासाठी वापर केल्यासारखे कथेत ठळकपणे जाणवते.

छान परिक्षण केले आहे. या कथे बद्दल बरेच काही लिहिण्यासारखे आहे. पण मला वाटते हा धागा त्या साठी नाही. satyajit ray ह्यांच्या सिनेमाबद्दल बरेच काही लिहिले गेले आहे. पण आपल्या मराठी वाचकांना त्यांच्या कथांबद्दल फारशी माहिती नसावी असे मला वाटते.

आज अलगुज शब्दाचा शोध घेत "फारसी मराठी " शब्दकोशापर्यंत पोहोचलो. हा कोश माधव त्रिंबक पटवर्धन ह्यांनी तयार केला. ते माधव जुलिअन ह्या टोपण नावाने मराठीत कविता करत असत. ते फारशी भाषेचे अभ्यासू होते. त्या भाषेचे प्राध्यापकही होते.
त्यांनी "बेगमेचे शिवबास पत्र" नावाची कविता केली होती. महाराज जेव्हा दिल्लीला गेले होते तेव्हा कुणी बेगम त्यांच्यावर फिदा झाली आणि तिने हे पत्र लिहिले अशी पार्श्वभूमी. कदाचित काही दुसरीही कथा असेल . ह्या कवितेत अनेक फारसी शब्दांचा भरणा होता. मी खूप शोध घेतला पण मला ही कविता मिळाली नाही.
अनंत काणेकर ह्यांनी मग "शिवबाचे बेगमेस उत्तर" म्हणून एक कविता केली. हे उत्तर केवळ मूळ कवितेची खिल्ली उडवण्यासाठी रचले होते. काणेकरांची "उत्तर" मजेदार आहे.
वर उल्लेखिलेल्या कवितेस उत्तर म्हणून अनंत काणेकरांनी पुढील कविता जुलै ३,१९२८ ह्या दिवशी केली.

मज पाहुनी तुवा गे । लिहिलेस बेगमे, ते
अडखळत वाचुनीया । आनंद होइ माते
ते ’नाथ’ आणि ’स्वामी’ । मज सर्व काहि उमजे
इश्की, दमिष्कि, दिल्नूर । काहीच गे, न समजे !
जरि या मराठमोळ्या । शिवबास बोध व्हावा,
तरि फारशी-मराठी । मज कोश पाठवावा

कविवर्य सुरेश भटांचा आज जन्मदिन. त्या निमित्ताने काही आठवणींना उजाळा.
त्यांना वयाच्या तिसऱ्या वर्षीच पोलिओ झाल्याने ते अधू झाले आणि त्यामुळे इतर मुलांसारखे खेळता येईना. सतत घरी राहण्यातूनच ते कविता करू लागले आणि कविता त्यांची आयुष्यभराची सोबती झाली.

“माझ्या आईमुळे मी कवी झालो”
, असे ते अभिमानाने म्हणतात. त्यांच्या शालेय अपयशामुळे त्यांना घरात सुद्धा नीट वागणूक मिळत नव्हती. त्यावर ते म्हणतात,
“माझ्याच घरात मी दुय्यम नागरिक झालो होतो” .

त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात एक प्राध्यापक महाशय त्यांना म्हणाले होते की सुरेश तू आता कवी म्हणून संपलास; आता गावोगावी मास्तरकी कर. त्यावर भट त्यांना एवढेच म्हणाले,
“ते अजून ठरायचे आहे !”

https://www.youtube.com/watch?v=GxXlW6gYpHE

>>>>“ते अजून ठरायचे आहे !”
वाह!!! तडफदार. मेष-सूर्य. मला आवडतात मेष-सू जातक. म्हणजे सहसा असे पहाण्यात आहे. विशेषतः स्त्रिया.

हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात राग गाण्याचे एक समयचक्र आहे. म्हणजे, दिवसाच्या आणि रात्रीच्या निरनिराळ्या प्रहरी कोणते राग गायचे यांचे शास्त्र आहे. मागे आरती अंकलीकर यांनी एका मुलाखतीत म्हटले होते, की त्या काही हे समयचक्र पाळत नाहीत; त्या कोणत्याही वेळी कोणताही राग तन्मयतेने गाऊ शकतात. संगीत महोत्सवातील परिस्थिती आणि अनुभवानंतर त्यांच्यात हा बदल झाला होता.

या विषयावरील डॉ. पंडित शशांक कट्टी यांचा एक लेख आजच्या पुणे- मटात वाचला. त्यात त्यांनी या शास्त्रीय समयचक्राचे दिलेले स्पष्टीकरण रोचक वाटले. दिवसा शरीरात डोपामिन निर्माण होते तर रात्री मेलाटोनिन. यानुसार आपले शरीर विविध वेळी विविध ‘अवस्थां’मध्ये असते.

म्हणून वेगवेगळे सूर आणि राग हे त्या त्या वेळेला शरीरात घडणाऱ्या घडामोडींना उपकारक आणि सहाय्य करणारे असतात. रागांचे समयचक्र वैद्यकीय मानसशास्त्र आणि अंतर्मनाच्या इशाऱ्यावर बांधलं गेलेलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

त्या कोणत्याही वेळी कोणताही राग तन्मयतेने गाऊ शकतात. >> आवडले आणि पटले सुद्धा.

दिवसा शरीरात डोपामिन निर्माण होते तर रात्री मेलाटोनिन >> विकिपीडिया नुसार: The anticipation of most types of rewards increases the level of dopamine in the brain. (अर्थातच जागेपणी म्हणजे दिवसा). Melatonin is a hormone secreted in the brain during the night, playing a crucial role in regulating the sleep-wake cycle. पण रागदारीमुळे डोपामिन/मेलाटोनिन यांच्यावर परिणाम होतो हे मत अतिशयोक्ती वाटते. अमक्या वेळी तमका राग गायचा, हा भंपकपणा वाटतो. किंवा कदाचित राग मेघमल्हारसारखे असेल. मुळात गायचा हा राग पावसाळ्यातच आणि जर चुकून माकून पाऊस पडला की म्हणायचे की बघा बघा, या रागामुळे पाऊस पडला. Lol

सगळे राग आणि त्यांच्या गायच्या वेळा यांचा अभ्यास नाही. पण काही राग मात्र मनात एक भाववस्था निर्माण करतात आणि ती वेळेशी जोडलेली असते.

किशोरीताईंची 'सहेला रे' ऐकताना डोक्यात सकाळची प्रसन्न वेळच येते. त्याच रागातलं खूप प्रसिद्ध चित्रपटगीत - 'ज्योती कलश छलके' - हे पण तीच वेळ जागवते डोक्यात. ज्योती कलश छलके याचे शब्द सकाळचे वर्णन करतात म्हणून त्या वेळेची जाणीव होते का डोक्यात? तर नाही. नुसत्या वाद्यांवर जरी ते गाणे वाजवले तरी तोच अनुभव येतो मला. सहेलामध्ये तर सकाळाचे वर्णनही नाहीये तरी ती बंदिश सकाळच जाणवून देते. त्यामुळे सकाळाच्या घाई-गडबडीत भूप ऐकायला जितका मस्त वाटतो तितका तो दुपारी निवांतपणे ऐकला तरी वाटत नाही.

याच्या उलट वृंदावनी सारंग - त्याच्या सुरावटी लहानपणीच्या सुट्टीतल्या दुपारची आठवण करून देते. एक आळस आहे पण थकवा नाही, काही करायची उर्मी आहे - अशी काहीशी अवस्था होते तो ऐकताना. त्यात ना सकाळचा प्रसन्नपणा आहे ना संध्याकाळची हुरहुर. त्यामुळे तो सकाळी किंवा संध्याकाळी ऐकताना जास्त मजा येत नाही.

अर्थात हा माझा अनुभव झाला. डॉक्टरांनीच लिहिलेल्या "आंबट बुवा आणि खारट बाई" चा अनुभव जसा सगळ्यांना येऊ शकत नाही तसा हाही अनुभव सगळ्यांना येइलच असे नाही. पण तो अनुभव एखाद्याला नाही आला म्हणजे ते म्हणणे चुकीचे ठरत नाही.

तर्कतिर्थ लक्ष्मणशास्त्र्यांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितले होते - गुरुकुलात वादविवाद आयोजीत केले जात. प्रत्येक वेळेला विद्यार्थ्याला त्याला पटणारे मतच मांडायला मिळेल असे नसायचे. अनेक वेळा त्याला न पटणारे मतही मांडायला लागायचे अणि तेही अगदी हिरीरीने. हे एवढ्याकरता केले जायचे की विद्यार्थ्याला आपले मत तावून सुलाखून घेता यावे आणि जेंव्हा तो दुसर्‍या मताचे खंडन करेल तेंव्हा ते अभ्यासपूर्ण असेल. त्याला कळत नाही किंवा त्याला पटत नाही म्हणून दुसर्‍या बाजूला भंपकपणा म्हणेल असे होणार नाही.

पण रागदारीमुळे डोपामिन/मेलाटोनिन यांच्यावर परिणाम होतो हे मत अतिशयोक्ती वाटते>>> रागदारी बद्दल माहित नाही पण संगीतामुळे डोपामिन वर परिणाम होतो. आन्त्तर जालावर शोध घेतल्यावर बरेच संदर्भ मिळाले.

@माधव
उत्कृष्ट प्रतिसाद.
मला सकाळी उठल्यानंतर प्रभातवंदनाच ऐकायला आवडेल. तेव्हा जीना यहा मरना यहा असलंकाही नाही आवडणा र.

माधव, अत्यंत समतोल आणि वाचनीय प्रतिसाद.
* गुरुकुलात वादविवाद >>> संकल्पना आवडली.
. . .
* शोध घेतल्यावर बरेच संदर्भ >> होय, अनेक संदर्भ मिळतील.

इथे (https://www.researchgate.net/publication/258172750_The_Effect_of_Music_o....) या विषयावर झालेल्या अनेक संशोधनांचा आढावा घेणारा एक शोधनिबंध आहे. त्यात विविध प्रकारच्या पाश्चात्य संगीतामुळे शरीरातील हार्मोन्स व neurotransmittersच्या पातळीत झालेले चढ व उतार प्रत्यक्षात मोजलेले आहेत.

त्या पीडीएफमध्ये पंडित रविशंकरांच्या संगीतामुळे झालेला परिणामही नोंदला आहे - Cortisol & noradrenaline ही स्ट्रेस हार्मोन्स कमी झालेली आढळली.

Happy छान लिहिले आहे माधव आणि कुमारसर. दोन्ही पोस्टी मुद्देसूद वाटल्या. गुरुकुलातली पद्धत आवडली. मनाच्या निकोप वाढीसाठी आदर्श वाटली. संगीताच्या मनावर होणारा परिणाम तर आपण अनुभवतोच, मूड बदलतो बऱ्याच गाण्यांनी. त्याला खरेतर संदर्भांची गरजही नाही.

<< किशोरीताईंची 'सहेला रे' ऐकताना डोक्यात सकाळची प्रसन्न वेळच येते. >>
"सहेला रे" हे भूप रागातले गाणे आहे म्हणे आणि भूप राग संध्याकाळी ७ ते ९ दरम्यान गायला जातो म्हणे. थोडक्यात, एखादे गाणे आवडले तर वाट्टेल तेव्हा बिनदिक्कत गा आणि ऐका. उगीच विशिष्ट रागाचा आणि विशिष्ट वेळेचा मुलामा नको. I rest my case.

उबो, तुम्हाला माझा मुद्दाच कळला नाही.

मी दोन राग ऐकल्यावर 'मला' काय अनुभूती येते ते लिहिले होते. त्यातली एक अनुभूती ही प्रचलीत वेळेशी विपरीत आहे (भूप) आणि दुसरी प्रचलीत वेळेला अनुसरून आहे (वृंदावनी सारंग).

कुठलीही कलाकृती जो अनुभव देते तो केवळ व्यक्तीसापेक्ष असतो. त्या कलाकृतीने एका माणसाला जे वाटेल त्याच्या बरोबर उलटे दुसर्‍या माणसाला वाटू शकते. त्यात चूक बरोबर असे काही नसते - भंपकपणा तर नसतोच नसतो.

त्यामुळे एखादा राग एखाद्या ठराविक वेळी का गायचा, तसे केल्याने काय फायदे तोटे होतात (निदान स्वतःपुरते तरी), तो दुसर्‍या वेळेस गायल्याने काय होते याचा पुरेपुर अभ्यास केल्याशिवाय त्याला भंपक्पणा म्हणणे मला तरी योग्य वाटत नाही. कलेच्या बाबतीत तो अभ्यास हा अधिकच क्लिष्ट असतो कारण वर म्हटल्याप्रमाणे कलेचा अनुभव हा व्यक्तीसापेक्ष असतो.

* मूड बदलतो बऱ्याच गाण्यांनी
>>>>
ग्राहकांचा मूड व संगीतप्रकार
हॉटेल व्यवसायात असणाऱ्या एका मराठी गृहस्थांनी पूर्वी अन्यत्र एक लेख लिहिला होता त्याची आठवण झाली. हॉटेलमध्ये खानावळींपासून उंची रेस्टॉरंट आणि मद्यालयांचा समावेश असतो. अशा भिन्न पद्धतीच्या ठिकाणी ग्राहकांच्या करमणुकीसाठी कोणते संगीत लावायचे याचे देखील काही आडाखे हॉटेल मालकांनी ठरवलेले असतात.

जिथे खानावळ या पद्धतीचे दैनंदिन जेवण असते तिथे लोकांनी लवकर जेवून निघणे अपेक्षित असते, जेणेकरून टेबले पटापट रिकामी होतात. अशा ठिकाणी हटकून किशोरकुमारची उडत्या चालीची गाणी लावतात. त्या गाण्यांच्या गती/तालानुसार दैनंदिन ग्राहक भरभर जेवतो आणि निघतो. या उलट उंची रेस्टॉरंटमध्ये लोक २-४ तास निवांत काढून आलेले असतात. अशा वेळी तिथे मंद संगीत किंवा गझला लावतात. संगीताच्या त्या मंदपणामुळे ग्राहकही जास्त काळ बसतो आणि अधिकाधिक मद्य आणि/अथवा पदार्थ ऑर्डर करत राहतो.

माधव, छान पोस्ट.
कुमार सर, छान लिहिले आहे.
ग्राहकांचा मूड व संगीतप्रकार>>>>> अगदी पटले.

ही पोस्टही छान आहे. Happy उंची रेस्टॉरंट्स मधे खरेच मंद संगीत असते, बरेचदा तर शब्द नसलेलं म्हणजे नुसतीच सितार किंवा पियानो वगैरे मागे वाजत असते. संथ कारभार असतो आणि किमती चौपट करून वसूल केलेलाही असतो. जरा अंधारही असतो म्हणजे प्रकाशयोजना सुद्धा माईल्ड किंवा रिलॅक्स्ड असते. मंद संगीत व मंद प्रकाश अशा 'ॲम्बियन्स'ने भलतेच रिलॅक्स वाटते.

मराठी पुस्तकात कायम अशा भारी रेस्टॉरंटमधलं संगीत 'सांद्र' असतं, असा उल्लेख असायचा. पुलंच्या अपूर्वाईत माँजिनीज रेस्टॉरंटमधील फजितीचा किस्सा आहे, त्यामधे 'तत्कालीन कादंबरीकारांनी ते संगीत सांद्र असतं' असं बजावून सांगितल्याचा उल्लेख आहे.

अनया,
अगदी अगदी.
कुमार सरांचे वर्णन वाचून मलाही अगदी हाच किस्सा आठवला. त्यात त्यांनी काटेचमच्यावर लिहिलेही होते की टेबलावर काटा पाहिला की अंगावर दुसरा काटा यायचा.

मंद संगीत असते >>> त्यात बर्‍याच वेळेला ट्रेबल कमी केलेला असतो. हाय फ्रिक्वेन्सी वगळल्यामुळे तो मंदपणा अधिक प्रभावशाली होतो. दुसरा फायदा असा की आवाज एका ठिकाणाहून येतो असे न वाटता चहूकडून येतोय असे वाटते.

Pages