प्रतिभावंतांच्या तऱ्हा

Submitted by कुमार१ on 23 January, 2022 - 21:40

अनेक प्रतिभासंपन्न व हुशार माणसे त्यांच्या कलानिर्मितीमुळे समाजात लोकप्रिय असतात. ती विशिष्ट समूहांमध्ये वलयांकित म्हणून गणली जातात. परंतु ती व्यवहारात मात्र कित्येकदा (इतरांचे दृष्टीने) तऱ्हेवाईक असतात. त्यातले काही तर विक्षिप्त म्हणूनही प्रसिद्ध होतात.
या मंडळींचे अशा वागण्याचे बरेच किस्से समाजात प्रचलित असतात. त्यातले काही खरे, काही तिखटमीठ लावून वाढवलेले तर काही असत्यही असतात. अशी व्यक्ती जितकी जास्त प्रसिद्ध, तितकेच तिच्या नावावर खपवल्या जाणार्‍या किश्शांची संख्याही भरपूर असते.

अशा व्यक्तींची जागतिक क्रमवारी लावायची ठरल्यास त्यात बहुदा अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा प्रथम क्रमांक लागेल ! त्यांच्या नावावर असलेले किंवा खपवलेले असंख्य किस्से आपण कधी ना कधी ऐकलेले असतात. महाराष्ट्रीय साहित्यिकांपुरते बोलायचे झाल्यास या बाबतीत पु ल देशपांडे यांचा प्रथम क्रमांक लागेल. कालौघात अशा किश्शांच्या खरे-खोटेपणाची शहानिशा करणेही कठीण होऊन बसते. नामवंत व्यक्तींच्या संदर्भात प्रचलित असलेल्या गमतीशीर, तऱ्हेवाईक किश्शांचे किंवा त्यांच्या जगावेगळ्या कृतींचे संकलन करण्यासाठी हा धागा आहे.
माझ्या वाचनात आलेल्या काही साहित्यिकांच्या किश्शांपासून सुरुवात करतो.

१. दुर्गा भागवत : त्यांच्या भरीव साहित्य सेवेबद्दल त्यांना ज्ञानपीठ आणि पद्मश्री असे दोन्ही पुरस्कार सरकारतर्फे जाहीर झालेले होते. परंतु हे दोन्ही पुरस्कार कणखर दुर्गाबाईंनी पंतप्रधान इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीच्या निषेधार्थ नाकारले होते.
जेव्हा कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ मिळाले तेव्हा सर्वांनाच आनंद झालेला होता; अपवाद फक्त दुर्गाबाई ! त्यांनी एका माणसाला सांगितले, “नाशिकला जा आणि कुसुमाग्रजांना विचार की, तुम्हाला ज्ञानपीठ मिळालं ते ठीक आहे. परंतु आणीबाणीच्या काळात तुम्ही काय करीत होतात ?” त्या माणसाने हा निरोप खरंच कुसुमाग्रजांना पोचवला. त्यावर ते हसत उत्तरले, “हे पहा, दुर्गाबाईंचे प्रश्न दुर्गाबाईंना विचारू देत, तुमचे प्रश्न तुम्ही विचारा !” असे हे बेरकी प्रत्युत्तर.

२. जी ए कुलकर्णी : त्यांचे एक वैशिष्ट्य होते. त्यांची कुठलीही कथा अथवा लेख जेव्हा एखाद्या नियतकालिकात प्रकाशित होई, त्यानंतर तो छापील लेख ते स्वतः बिलकुल वाचत नसत. ते म्हणायचे, “जेव्हा लेख हस्तलिखित स्वरूपात माझ्याजवळ असतो तोपर्यंतच तो माझा. एकदा का तो छापून झाला की तो आता वाचकांचा झालेला असतो. त्याचे भवितव्य त्यांच्या हाती’.
जीएंची बरीच पुस्तके एका प्रकाशकांनी प्रसिद्ध केली होती. जीएंनी संबंधित प्रकाशकांशी पत्रव्यवहार भरपूर केला परंतु आयुष्यात भेट घेण्याचे मात्र टाळले. त्यांच्या काजळमाया या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. तो त्यांनी स्वीकारला देखील होता. परंतु पुढे या घटनेवर (तांत्रिक मुद्द्यावरून) साहित्य क्षेत्रात टीका झाली. त्याने व्यथित होऊन त्यांनी (प्रवासखर्चासह) तो पुरस्कार सरकारला परत केला होता.

३. चि त्र्यं खानोलकर (आरती प्रभू) यांचा किस्सा तर अजब आहे. ते लोकांना छातीठोकपणे सांगत, "साहित्यबाह्य गोष्टींना वगळून निव्वळ गुणवत्तेच्या जोरावरच ज्ञानपीठ पारितोषिक द्यायचे ठरले तर मराठी भाषेत तरी तो मान फक्त आपल्या एकट्याकडेच जातो !"
अनेकांना हे ऐकून अचंबा वाटे.
एवढेच नाही तर खानोलकरांनी वि स खांडेकर यांच्याबद्दलही असे वक्तव्य केले होते,
" येत असतील त्यांना वाचकांची ढिगांनी पत्रे आणि तामिळनाडूतील एखादी मुलगी त्यांना पूज्य पिताजी म्हणूनही संबोधत असेल. पण ते वेगळं आणि चांगलं लेखक असणं वेगळं".
स्वतःचे साहित्यिक यश डोक्यात गेल्याने त्यांनी अनेकांना उद्धटपणे बोलून दुखावलेले होते.

आता पाहू काही विदेशी साहित्यिकांचे नमुने :

४. सॉमरसेट मॉम हे विख्यात इंग्लिश लेखक. त्यांच्या लेखनाची कठोर शिस्त होती. रोज सकाळी नऊ ते दुपारी एक पर्यंत ते त्यांच्या लेखनाच्या टेबलाशी असत आणि रोज काही ना काही लिहित. त्यामध्ये रविवार असो वा सण, किंवा अगदी स्वतःचा वाढदिवस, लेखनात कधीही खंड पडला नाही. त्यांना एका मुलाखतकाराने विचारले होते की रोज नवे लेखन खरच सुचते का ? त्यावर ते म्हणाले, “नाही, रोज नवे सुचत नाही. तरीसुद्धा मी लेखनाच्या टेबलापाशी ४ तास बसतोच. कित्येकदा काहीतरी विचार करत माझ्या स्वतःच्याच सह्या असंख्य वेळा गिरवत बसतो. पण नित्यक्रम चुकवत नाही”.

५. झोरान झिवकोविच या सर्बिअन लेखकाचे एक मत अजब आहे. तो म्हणतो, की ५० वर्ष हे वय लेखक होण्यासाठी आदर्श आहे. आयुष्यातील त्या आधीची वर्षे सखोल वाचनात घालवावीत. कारण आपण लिहायला सुरुवात करण्यापूर्वी गेल्या हजारो वर्षातल्या आपल्या आधीच्या लोकांनी काय लिहून ठेवले आहे ते वाचणे आवश्यक आहे !

६. जे डी सालिंजर हे अमेरिकी लेखक त्यांच्या कॅचर इन द राय या कादंबरीमुळे गाजले. या कादंबरीच्या पहिल्या आवृत्तीच्या मुखपृष्ठावर एक अतिशय जिवंत असे चित्र छापले होते. परंतु पुढे त्यांनी मुखपृष्ठावरील चित्र या प्रकाराचाच धसका घेतला. पुढे त्यांच्या सर्व पुस्तकांसाठी त्यांनी मुखपृष्ठावर कोणतेही चित्र अथवा छायाचित्र छापायचे नाही असा आग्रह धरला. लेखकाच्या शब्दांमधून जो काही आशय व्यक्त होतोय तीच त्या पुस्तकाची वाचकावर उमटणारी एकमेव ओळख असली पाहिजे हे त्यांचे मत. लेखकाला काय सांगायचय त्यासाठी एखाद्या चित्रकाराची मध्यस्थी नसावी यावर ते ठाम राहिले.
याच धर्तीवर एका व्यंगचित्रकारांची अशीच भूमिका आहे. त्यांचे नाव आता आठवत नाही. ते देखील त्यांच्या व्यंगचित्रांमध्ये किंवा चित्राखाली शब्दांचा अजिबात वापर करीत नसत. चित्रकाराच्या चित्रातूनच् प्रेक्षकाला जे काही समजायचं आहे ते समजले तरच ते उत्कृष्ट चित्र, असे त्यांचे ठाम मत होते. या निमित्ताने लेखन आणि चित्रकला या दोन्ही कला समांतर चालाव्यात की एकमेकांना पूरक म्हणून त्यांचा वापर करावा हा एक चर्चेचा विषय उपस्थित होतो.

आता एक किस्सा राजकारणी व्यक्तीचा...
७. हा अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दलचा असून ते पंतप्रधान होण्यापूर्वीच्या काळातला आहे. ते जेव्हा दुर्गम भागांत दौऱ्यांवर निघत तेव्हा बरोबर स्वतःचा एक छोटा ट्रांजिस्टर ठेवत. तो नियमित ऐकणे हा त्यांचा छंद होता. निघण्यापूर्वी ते बरोबरच्या सचिवांना विचारत, “आपण जिथे चाललो आहोत तिथे जर या ट्रांजिस्टरच्या बॅटरीज संपल्या तर त्या विकत मिळतील ना? नाहीतर बरोबर ठेवाव्यात ”. त्यावर त्यांचे सचिव फक्त मंद स्मित करीत.

आणि हा किस्सा गिर्यारोहकाचा ...
८. जगातील पहिले एव्हरेस्टवीर सर एडमंड हिलरी यांनी त्यांच्या पर्वतचढाईचे अनुभव ‘व्ह्यू फ्रॉम द समिट’ या पुस्तकात लिहिले आहेत. कालांतराने हिलरी भारतातील न्यूझीलंडचे उच्चायुक्त होते. त्यांच्या या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘शिखरावरुन’ या नावाने श्रीकांत लागू यांनी केलेला आहे. त्या अनुवादासाठी लागू यांनी हिलरी यांची परवानगी मागितली होती. त्यावर हिलरींनी ती लगेच दिली. मग लागूंनी विचारले की मानधन किती द्यावे लागेल ? त्यावर हसून हिलरी म्हणाले, “मला पैसे नकोत, फक्त तुमची पिठलं-भाकरी एकदा खाऊ घाला !”
अशी ही दिलदार वृत्ती.

असे गमतीशीर किंवा तर्‍हेवाईक किस्से सांगण्यासाठी मी काही क्षेत्रांतील व्यक्ती निवडल्या आहेत. हे किस्से मी कुठल्या ना कुठल्या पुस्तक/नियतकालिकात वाचलेले आहेत. प्रतिसादांमध्ये वाचकांनी कुठल्याही क्षेत्रातील नामवंतांचे असे किस्से लिहायला हरकत नाही. तुम्ही लिहिलेला किस्सा हा स्वतः वाचलेला आहे की ऐकीव आहे याचा सुद्धा उल्लेख करावा. तुमच्या माहितीतील एखाद्या व्यक्तीचा (जरी वलयांकित नसली तरी) जर काही वैशिष्ट्यपूर्ण किस्सा असेल तरी लिहायला हरकत नाही.
....................................................................................................................

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमोल पालेकरांच्या ‘ऐवज’ पुस्तकातून :
>>>>> ह्या पुस्तकाबद्दल मी हल्लीच 'खाने में क्या है' ह्या यूट्यूब मालिकेत पाहिले. अमोल पालेकर अतिशय विद्वान, संयमित आणि भारदस्त आहेत. त्यांची दुसरीही एक मुलाखत पाहिली आहे. त्यांचं बोलणं ऐकावं वाटतं. दुसरी मुलाखत मधुराणी गोखलेनी घेतलेली होती. तिलाही ते घरचीच भाची, पुतणी असल्यासारखे आदराने व जिव्हाळ्याने तरीही मोकळेपणाने बोलत होते. असे 'ट्रू जंटलमन' विरळाच झालेत हल्ली..! आदर दिला की अंतर ठेवतात बरेच जण. मोकळेपणा आला की उथळ वाटतात. येथे त्याचा लवलेशही नव्हता.

दत्ता दामोदर नायक हे गोव्यातील लेखक असून ते कोकणी, मराठी व इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये लेखन करतात. त्यांनी नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत लेखकांचे तीन प्रकार सांगितले आहेत आणि त्यासाठी कीटकांच्या उपमा वापरल्यात :

१. मुंगी : ही फक्त जमवते आणि साठा करते. भरपूर माहिती वाचकांना देणारे लेखक या प्रकारचे. परंतु हा साठा म्हणजे ‘संचय’ नसतो.

२. कोळी : हा आपल्या अंगातली रसायने वापरून त्यापासून तलम व बळकट जाळे तयार करतो. आपल्या अनुभवाचे अनुभूतीत रूपांतर करणारे लेखक या प्रकारचे.

३. मधमाशी : हिचे कष्ट तर अपार आहेत. ती शेकडो फुलांमधून मध घेते, पचवते आणि त्यातून पुढे मधुररस निर्माण करते.
नायक स्वतः मधमाशी होण्याचा प्रयत्न करीत राहतात.

https://www.youtube.com/watch?v=l89hUrEcjRY&t=1013s

लेखक-पुस्तक-वाचक या साखळी संदर्भात प्रसिद्ध लेखक दत्ता नायक यांनी एक मजेदार असा 50 टक्क्यांचा नियम सांगितला आहे तो विस्ताराने असा :
जेवढे लेखक लिहायचा विचार करतात त्यातले 50% च लिहितात,
जेवढी पुस्तके लिहिली जातात त्यातली 50%च प्रकाशित होतात,

जेवढी प्रकाशित होतात त्यातली 50% च खपतात,
जेवढी खपतात त्यातली 50% च लोक वाचतात,

जेवढे वाचक पुस्तक वाचतात त्यातल्या 50% लोकांनाच त्याचा अर्थ समजतो
आणि
ज्या वाचकांना पुस्तकाचा अर्थ समजला आहे त्यातले 50%च वाचक लेखकाला प्रतिसाद देतात !

https://www.youtube.com/watch?v=0J-XSr06T94&t=2561s
. . .

प्रतिसाददाते ही अल्पसंख्य जमात म्हणायला हरकत नाही.
Happy

डॉक्टर नको !
साधारणपणे हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये डॉक्टरची भूमिका ही दुर्लक्षित प्रकारची असते. या भूमिकेसाठी निवडलेली पात्रे (अपवाद वगळता) बऱ्याचदा सामान्य, शामळू आणि कोणताही प्रभाव न पडणारी वाटतात. त्यामुळे या भूमिकेसाठी चांगले कलाकार सहसा तयार नसतात. परंतु सीआयडी या टीव्हीवरील गाजलेल्या गुन्हा मालिकेतील एका डॉक्टरांच्या गाजलेल्या भूमिकेबाबतचा हा किस्सा.

या मालिकेतील डॉ. आर पी साळुंके खूपच गाजल्याने अनेकांना परिचित आहेत. टीव्ही कलाकार नरेंद्र गुप्तांना जेव्हा या भूमिकेसाठी प्रथम विचारण्यात आले तेव्हा त्यांनी लगोलग स्पष्ट नकार दिला होता. ते दूरदर्शनवरील ‘वागळे की दुनिया’ पासून काम करीत असल्याने त्यांचे मालिका विश्वात तसे नाव झालेले होते.

“कुठलीही अन्य भूमिका द्या, पण डॉक्टरची नको !” असे त्यांनी दिग्दर्शकांना सांगून टाकले. त्यावर दिग्दर्शक हसून म्हणाले की तुम्ही एकदा सेटवर येऊन तर बघा, यातील डॉक्टर हे नेहमीचे ‘बाळू’ डॉक्टर नसून ते फॉरेन्सिकचे डॉक्टर आहेत.

हे समजून घेतल्यानंतर गुप्ता यांनी सदर भूमिकेसाठी होकार दिला. पुढे या भूमिकेने त्यांना चांगल्यापैकी प्रसिद्धी व लोकप्रियता मिळाली. एका मुलाखतीत त्यांनीच हा किस्सा सांगितलाय.

मभादि निमित्ताने लिहिलेल्या चंद्रकांत खोतांच्या लेखानिमित्ताने 'निवडक अबकडइ' वाचलं. अनेक किस्से लिहिता येतील. जमेल तसे लिहिन. आता पटकन आठवलेला सी. रामचंद्र (रामचंद्र चितळकर ऊर्फ अण्णासाहेब) या थोर संगीतकाराबद्दल लिहिलेल्या श्रीकांत सिनकरांनी लिहिलेल्या लेखातला हा किस्सा. स्वतःच सी. रामचंद्र यांनी सिनकरांना सांगितला.

'आझाद' चित्रपटाचं संगीत देताना 'कितना हसीं है मौसम..' या गाण्यासाठी अण्णासाहेबांना तलत मेहमूदच हवा होता. तलतवर त्यांचं प्रेम आणि भक्तीही होती. 'मला हवा तसा स्वर मी फक्त तलतच्याच कंठातून काढू शकतो. तलत काय चीज आहे- हे कळण्यासाठी नुसते कान 'तयार' असणं पुरेसं नाही, तर त्यासाठी स्वतःच संगीतकार व्हायला हवं' असं ते म्हणत.

चाल बांधून त्यांनी तलतला फोन केला. पण तो नेमका गेला होता कराचीला, त्याच्या कुणा नातेवाईकाकडे. हे ऐकल्यावर ते अस्वस्थ झाले. तलतशिवाय कुणाचीही ते या गाण्यासाठी कल्पनाच करू शकत नव्हते. चालही त्यांनी तलतला साजेशीच, त्याला समोर ठेऊनच बांधलेली. काही दिवस ते काय करावं या विचारात होते, पण मार्ग सापडत नव्हता.

हे सारं ऐकून 'मग शेवटी तुम्ही काय केलंत??' असं सिनकरांनी अधीरतेने विचारलं, तेव्हा ते म्हणाले, 'काय करणार मग. बराच विचार करून शेवटी, तलतच्या आवाजाची जास्तीत जास्त करता येईल तेवढी नक्कल करून लतासोबत मीच ते गाणं म्हटलं!!'

हे वाचताना सिनकरांना ऐकून जेवढा हादरा बसला, तितकाच मलाही बसला. कारण हे गाणं तलतने म्हणलं आहे, असं मी (सिनकर, आणखी अजून हजारो लोकांसारखंच) आजवर समजत होतो.

सी. रामचंद्र यांनी 'मेरे पिया गये रंगून', 'आना मेरी जान संडे..', 'शोला जो भडके' अशी गाणी म्हटली आहेत. या पार्श्वभूमीवर सेम टू सेम तलतसारखा कंपायमान आवाज म्हणजे कमाल झाली.
---

सिनकरांच्या या लेखाचं शीर्षक आहे- 'आनंदे नाचत पंढरीसी जाऊ'. सी. रामचंद्र यांनी संगीत दिलेला हा विसोबा खेचराचा अभंग. लगेच हे गाणंही ऐकलं. इतकं गोड, सुरेल अभंगगाणं आजवर कसं ऐकलं नव्हतं याची रुखरूख लागून राहिली.

‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल’ची जन्मकथा
ही पिंजरामधील लावणी अजरामर झालेली आहे. ती जगदीश खेबुडकर यांनी कशी लिहिली याचा किस्सा भन्नाट आहे.

पिंजरामध्ये शांताराम बापूंना एक फक्कड लावणी हवी होती म्हणून त्यांनी खेबुडकरांना तसे सांगितले. खेबुडकर सकाळी नऊ वाजता लिहायला बसले आणि एकावर एक मुखडे तयार करत गेले परंतु ते दिग्दर्शक शांतारामबापूंना काही पटेनात. असं करता करता संध्याकाळचे सहा वाजले आणि तोपर्यंत खेबुडकरांनी 49 मुखडे लिहिले होते पण त्यातला एकही शांतारामबापूंना काही पटलेला नव्हता.

शेवटी बापू त्यांना म्हणाले की आता तुम्ही घरी जा, शांत झोपा आणि पहाटे उठून काहीतरी लिहा म्हणजे काहीतरी चांगलं तयार होईल. खेबुडकर तिथून गेले. जेवण वगैरे झाल्यावर त्यांना झोप येणे शक्यच नव्हतं ते खूप विचार करत बसले आणि अखेरीस रात्री दीड वाजता डोक्यात वीज चमकल्याप्रमाणे त्यांना या लावणीचा मुखडा सुचला.
आता ते फोनपाशी गेले आणि त्याचा रिसीवर उचलणार, तेवढ्यात त्यांनाच फोन आला आणि तो बापूंचा होता. मग खेबुडकर यांनी त्यांना तो मुखडा ऐकवला. ऐकता क्षणी बापू खुश झाले आणि म्हणाले,

“हे असंच मला काहीतरी पाहिजे होतं. हा मुखडा ऐकला रे ऐकला की प्रेक्षक लोहचुंबकासारखा खेचला जाणार आहे ! आता तुम्ही राम कदम यांना चाल लावायला सांगा”.

योगायोगाचा भाग म्हणजे राम कदम तिथेच शेजारी पडलेले होते. त्यांनी लगेच फोनवर येऊन बापूंना सांगितलं की मी सगळं तुमचं बोलणं ऐकत होतो आणि तेवढ्यात माझी चाल तयार झालेली आहे.
ती चाल लावण्यासाठी कदमांनी त्यांचे गुरुबंधू नौशाद यांच्या बैजू बावरातील ‘मोहे भूल गये सावरिया या गाण्याची चाल आधार म्हणून घेतलेली आहे.

https://www.youtube.com/watch?v=XsDjIr0Sh3g&t=266s

साजिरा व कुमारसर, वरच्या दोन्ही पोस्टी आवडल्या. Happy

मोहे भूल गये सावरिया’ या गाण्याची चाल आधार म्हणून घेतलेली आहे.
>>> हे वाचून एकदम 'खरंच की' मनात आलं. Happy

धन्यवाद !
. . .
जगदीश खेबुडकर
यांच्या प्रतिभेबाबत लिहावे तेवढे थोडेच आहे. त्यांनी एकूण चार हजार गाणी (कवितांसह) लिहिली आणि त्यापैकी चारशे लावण्या आहेत.

त्यांच्या अपत्यांची नावेही प्रतिभासंपन्न आहेत :
अभंग व मुक्तछंद ही मुले, तर
कविता (पडळकर) व अंगाई (महाजनी) या मुली

>>योगायोगाचा भाग म्हणजे राम कदम तिथेच शेजारी पडलेले होते.
तुम्हाला बहुदा पहुडलेले असे म्हणायचे असेल. हा किस्सा मी ही वाचला होता. खेबुडकर व राम कदम दोघांचीही एकाच रूम वर राहण्याची सोय केली होती शांताराम साहेबांनी!

'अबकडइ' च्या आठवणी
---
साहित्याच्या चळवळी या सामाजिक चळवळीशी आजवर अनेक ठिकाणी निगडित असत गेल्या आहेत. या गोष्टीला जागतिक इतिहास साक्षीदार आहे, आपल्याच देशातही याची काही उदाहरणं आहेतच.

लिट्ल मॅगझिन (लघुअनियकालिकं) च्या चळवळीत साठच्या दशकात उगवली आणि नंतर अनेक लोक येत गेले. त्यांनी भुमिका घेतल्या, त्यांत वादही झाले, आणि पुढे काही संघटनांचा उदय झाला. 'सत्यकथा'सारख्या जवळजवळ लब्धप्रतिष्ठितांसाठीच असलेल्या गोष्टीला विद्रोह म्हणून घेतलेली भुमिका, आणि तिचं पुढे सामाजिक क्रांतीत कसं रुपांतर झालं- याचं जबरदस्त उदाहरण- दलित पँथर. सत्यकथा आणि लिट्ल मॅगझिन्स कारणमात्र ठरले असतील, मात्र सुरुवात इथंच झाली होती- हे नाकारता येत नाही.

माझ्या लहाणपणी 'दलित पँथर' म्हणलं की धडकी भरे इतका प्रभाव या संघटनेचा होता. आजही काही ठिकाणी 'दलित पँथर'चे बोर्ड दिसतात. मात्र वलय केव्हाच संपलं आहे. आता अनेक वाटण्या झालेली ही एकेकाळची जबरदस्त संघटना तत्त्वाच्या दृष्टीने आता एक आऊटडेटेड संघटना (?) आहे, असं पँथरचेच एकेकाळचे नेते म्हणतात. मात्र पँथर हे तेव्हाचं 'प्रॉडक्ट' होतं हे नाकारता येत नाही.

राजा ढाले, ढसाळ, गवई, ज.वि.पवार, नेरुरकर, भाई संगारे आणि इतर काही- हे पँथरचे संस्थापक. हे झालं ६०च्या दशकाच्या उत्तरार्धात. 'अबकडइ'च्या १९८४ च्या दिवाळी अंकात साक्षात नामदेव ढसाळांचाच 'दलित पँथरची गणगौळण' नावाचा पँथरची जन्मकहाणी सांगणारा आणि नंतर 'पँथर'चीच बेमुर्वतखोरपणे डिसेक्शन करणारा दीर्घलेख लेख प्रसिद्ध झाला. स्वभावाप्रमाणेच कुणाचाही मुलाहिजा न ठेवता धडाकेबाज नॅरेशन शैलीने त्यांनी हा लिहिला आहे. या लेखातले काही अंश. (लेखात ते सलग नाहीत).
---

"... आणि लिट्ल मॅगझिनचा ग्रुपच इतका थोर होता, की जातीचा फातीचा त्यात प्रादुर्भाव नव्हता. ती जातीविहीन अशी वाड्मयीन चळवळ होती. जात-पात-धर्म यापेक्षा तुम्ही काय लिहिता, आणि ते किती मोलाचं आहे, असा तो संस्कार होता...

"... तोपर्यंत पँथरचं नाव जिकडेतिकडे झालेलं. मारामार्‍या. शिवसेनेने पँथरच्या सभेवर हल्ले केले. वरळीला असं झालं. नायगावला असं झालं. प्रत्येक सभेत आमच्या मारामार्‍या असायच्या. कोणीतरी प्रचंड बोलायचं, आणि बहुजन समाज त्याची रिअ‍ॅक्शन द्यायचा. सगळीकडे पेपरमधनं गाजावाजा सुरू झाला...

"... १०० सभा केल्या की १०० खटले आमच्यावर होत. काही कारण नसताना १०० खटले. मग कोर्टकचेर्‍या, असं करता करता चिक्कार ठिकाणी मी 'वाँटेड' झालो. मी त्याची कदरच केली नव्हती. पोलिसांच्या हातात सापडायचंच नाही आणि फक्त सभेच्या वेळी जायचं. तेव्हा पोलिस हात लावत नाहीत, हे माझं नेहेमीचंच टेक्निक असायचं. पोलिस वैतागून गेले की हा सर्वात घाणेरडं बोलतो आणि सापडत नाही म्हणजे काय?...

"... ढालेची एक वाईट खोड होती. लोकांना नेहेमी नावं ठेवायची, की तुझ्यात हे कमी आहे, अन ते, अन ते. तर मी त्यावेळी सर्व व्यसनांचा सर्रास अधिपतीच होतो. कंट्री असो, काही असो , की घेतली. त्याच्यावर चरस. त्याच्यावर कोकिनचं पान- अशा माझ्या भानगडी चालूच असायच्या. कामाठीपुरा आणि कंपनी- माझा त्यात उपदेश. व्हीडी, असं माझं एक मजेशीरच मिश्रण होतं. परंतु ढाले एका रात्रीत सज्जन झालेला प्राणी ना?...

"... आमचा एक मोर्चा वसंतराव नाईकांसमोर नेल्यावर ते म्हणाले- अरे अरे अरे काय हे असं माथेफिरुसारखं करताय? तुम्हाला काय पाहिजे मला सांगा! मी म्हणालो- मला काही नको, फक्त या विधानसभेला सुरूंग लावायची इच्छा आहे. नाईक चिरुट ओढत हसले मिस्कील. त्यावेळी त्या हास्याचा अर्थ कळला नाही. स्टेट पॉवर मोठी असते. तिच्याकडे लष्कर असतं, शिपाई असतात, न्यायसंस्था, मनुष्यबळ, उत्पादनाची साधनं असतात. आम्ही आपलं आंधळेपणाने जसं काय दोन मवाल्यांत मारामार्‍या करतो आहोत जसं...

"... बाबा आढावचं बोलणं मायाळु. बाबा आमच्या पुस्तकावर पण खुष. गोलपिठा उशाला घेऊन झोपायचे असं म्हटलं तर अतिशयोक्ती नाही. राजा ढालेचा सतत संपर्क हुसेन दलवाई वगैरेंशी. हे त्याचे त्या काळचे सल्लागार. कारण आम्ही कामगार आघाडीत होतो...

"... १९८०पर्यंत बाळ ठाकरेंची आणि आमची दोस्ती झाली नव्हती तोवर मारामार्‍या झाल्या. काही ठिकाणी तर क्रूर रीतीचं वैमनस्य. त्यांचे वडील प्रबोधनकार केवढे ग्रेट. आंबेडकरांचे त्यावेळचे सहकारी. आणि १३ वर्षं त्या माणसाने अनवाणी पायाने अस्पृश्यतेसाठी काम केलं आहे...

"... आपलं राजकारण कपट-कारस्थानाचं कधी नव्हतं आणि तसा भावही निर्माण कधी झाला नाही. त्याचं कारण वाड्मयीन गोष्टींतही कदाचित असावं, पण राजा ढालेच्या सुडाच्या पद्धतीचं राजकारण कधी करता आलं नाही. मी सतत कामाठीपुर्‍याच्या संस्कृतीशी अ‍ॅट्चॅड राहिलो...

"... आंबेडकरांच्या नंतर कुणीही त्यांनी घेतलेल्या धर्मांतराचा अन्वयार्थ लावणारी माणसं अजिबात आपल्यात नाहीत... त्यांच्या निर्वाणानंतर जे पोलॅरायझेशन व्हायला पाहिजे ते कुणी केलं नाही. दलित पँथरने चिक्कार काम केलं, पण ते फक्त एक प्रेशर ग्रुप म्हणून. प्रश्नांवर काम केलं नाही. त्यासाठी मनुष्यबळ पाहिजे...

"... आजपर्यंत निसर्गाचा इतिहास असा आहे, आणि आजपर्यंतच्या माणसाचाही इतिहास तसाच आहे, की माणसाला जे जे जाचक होतं ते तो फेकुन देतो, आणि जगायला पुरक असतं, त्याचा तो स्वीकार करतो. हा जो माणसाचा बेसिक स्थायीभाव माणसाच्या प्रकृतीतला आहे, त्याबद्दल मी फार आशावादी आहे... "
---

हा लेख फार मोठा, आणि मुळातच एक दस्तावेज म्हणता येईल असा आहे, आणि तो मुळातुनच वाचला पाहिजे..

* पहुडलेले >>> + १.
( न झोपता जरा 'पडतो' या अर्थाने ते क्रियापद वापरले होते).
. . .
* 'अबकडइ' च्या आठवणी >>> आवडल्या !

तलत आणि पिंजरा - दोन्ही पोस्ट्स भारी आहेत.
खेबुडकर आणि राम कदम.... ग्रेट ग्रेट. देवाची माणसं.
साजिरा,
यातील फक्त काही नावं माहीत आहेत
'अबकडइ' च्या आठवणी >>>>> नवीन माहिती

अनियतकालिकांच्या आठवणीमध्ये अजून एक धमाल आठवण म्हणजे श्रीरंग गोडबोले आणि त्यांच्या मित्रपरिवाराने एकेकाळी चालवलेले कष्टा हे अनियतकालिक.
एरवी आपण गप्पाटप्पा, खिल्ली उडवणे अशा स्वरूपाचा मजकूर असलेल्या पुस्तिकेला कट्टा म्हटले असते. गोडबोलेंनी सांगितल्यानुसार ती पुस्तिका मोठ्या कष्टाने काढल्यामुळे त्याला तसे नाव दिले !

त्यातली एका मराठी गीझर उद्योजकाची खिल्ली उडवणारी जाहिरात मुळातून वाचण्यासारखी आहे. ती या मुलाखतीत पाहता येईल :

https://www.youtube.com/watch?v=qyHjqD0qRXw

स्वतःचे नाटक प्रत्यक्ष पाहण्याबाबत तीन गाजलेल्या नाटककारांच्या तीन प्रकारच्या तऱ्हा कशा होत्या हे चंद्रकांत कुलकर्णीनी सांगितलय :
१. वसंत कानेटकर त्यांचे नाटक नाट्यगृहातील पहिल्या रांगेतील मधोमध बसून अगदी लहान मुलाप्रमाणे त्याचा आनंद घेत.

२. विजय तेंडुलकर स्वतःचे नाटक बघायला जात नसत. अनुभवातून त्यांना समजले होते की नाटकाच्या पहिल्या काही प्रयोगांना कलाकार चाचपडत असतात आणि ते नाटककाराने पाहणे हे त्याच्यासाठी त्रासदायक असते. म्हणून ते तिथे न जाता प्रयोग संपल्यानंतर संबंधित नेपथ्यकाराकडे नाटक कसे झाले याची चौकशी करायचे.

३. जयवंत दळवी यांनी स्वतःचे नाटक कधीच प्रेक्षागृहात बसून पाहिले नाही परंतु ते विंगेत उभे राहून ते पाहत असत.
https://www.youtube.com/watch?v=QEAWCVjDjJ4

कविता (पडळकर)

>> नव्हे पाडळीकर

त्यातली एका मराठी गीझर उद्योजकाची खिल्ली उडवणारी जाहिरात मुळातून वाचण्यासारखी आहे. ती या मुलाखतीत पाहता येईल :

>> साधारण काय टाइम स्टॅम्पला आहे?

अनियतकालिकांच्या आठवणीमध्ये अजून एक धमाल आठवण म्हणजे श्रीरंग गोडबोले आणि त्यांच्या मित्रपरिवाराने एकेकाळी चालवलेले कष्टा हे अनियतकालिक >>> हे कष्टा होतं का? मला वाटलं कट्टाच नाव होतं. माझ्याकडे ९०ज मधला एक कट्टा आहे त्याचं पहिलं पान डकवते इथे. तुम्ही हेच अनियतकालिक म्हणत आहात का ते सांगा -

IMG-20250325-WA0011.jpg

वाचावं ते नवलंच असं वाटतं इकडच्या पोस्टीं वाचून.

वर कट्टा मध्ये मुकुंद टांकसाळे यांनी वेगळं नाव घेतलं आहे का. ते म टा त लिहायचे बहुतेक म्हणून ओळखीचे वाटलं.

बहुतेक अनियतकालिकाचे नेहमीचे नाव कट्टा असावे. एका विशिष्ट अंकाचे नाव कष्टा ठेवले असावे. जसे भीमेला एका विशिष्ट ठिकाणी चंद्रभागा म्हणतात!

Pages