प्रतिभावंतांच्या तऱ्हा

Submitted by कुमार१ on 23 January, 2022 - 21:40

अनेक प्रतिभासंपन्न व हुशार माणसे त्यांच्या कलानिर्मितीमुळे समाजात लोकप्रिय असतात. ती विशिष्ट समूहांमध्ये वलयांकित म्हणून गणली जातात. परंतु ती व्यवहारात मात्र कित्येकदा (इतरांचे दृष्टीने) तऱ्हेवाईक असतात. त्यातले काही तर विक्षिप्त म्हणूनही प्रसिद्ध होतात.
या मंडळींचे अशा वागण्याचे बरेच किस्से समाजात प्रचलित असतात. त्यातले काही खरे, काही तिखटमीठ लावून वाढवलेले तर काही असत्यही असतात. अशी व्यक्ती जितकी जास्त प्रसिद्ध, तितकेच तिच्या नावावर खपवल्या जाणार्‍या किश्शांची संख्याही भरपूर असते.

अशा व्यक्तींची जागतिक क्रमवारी लावायची ठरल्यास त्यात बहुदा अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा प्रथम क्रमांक लागेल ! त्यांच्या नावावर असलेले किंवा खपवलेले असंख्य किस्से आपण कधी ना कधी ऐकलेले असतात. महाराष्ट्रीय साहित्यिकांपुरते बोलायचे झाल्यास या बाबतीत पु ल देशपांडे यांचा प्रथम क्रमांक लागेल. कालौघात अशा किश्शांच्या खरे-खोटेपणाची शहानिशा करणेही कठीण होऊन बसते. नामवंत व्यक्तींच्या संदर्भात प्रचलित असलेल्या गमतीशीर, तऱ्हेवाईक किश्शांचे किंवा त्यांच्या जगावेगळ्या कृतींचे संकलन करण्यासाठी हा धागा आहे.
माझ्या वाचनात आलेल्या काही साहित्यिकांच्या किश्शांपासून सुरुवात करतो.

१. दुर्गा भागवत : त्यांच्या भरीव साहित्य सेवेबद्दल त्यांना ज्ञानपीठ आणि पद्मश्री असे दोन्ही पुरस्कार सरकारतर्फे जाहीर झालेले होते. परंतु हे दोन्ही पुरस्कार कणखर दुर्गाबाईंनी पंतप्रधान इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीच्या निषेधार्थ नाकारले होते.
जेव्हा कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ मिळाले तेव्हा सर्वांनाच आनंद झालेला होता; अपवाद फक्त दुर्गाबाई ! त्यांनी एका माणसाला सांगितले, “नाशिकला जा आणि कुसुमाग्रजांना विचार की, तुम्हाला ज्ञानपीठ मिळालं ते ठीक आहे. परंतु आणीबाणीच्या काळात तुम्ही काय करीत होतात ?” त्या माणसाने हा निरोप खरंच कुसुमाग्रजांना पोचवला. त्यावर ते हसत उत्तरले, “हे पहा, दुर्गाबाईंचे प्रश्न दुर्गाबाईंना विचारू देत, तुमचे प्रश्न तुम्ही विचारा !” असे हे बेरकी प्रत्युत्तर.

२. जी ए कुलकर्णी : त्यांचे एक वैशिष्ट्य होते. त्यांची कुठलीही कथा अथवा लेख जेव्हा एखाद्या नियतकालिकात प्रकाशित होई, त्यानंतर तो छापील लेख ते स्वतः बिलकुल वाचत नसत. ते म्हणायचे, “जेव्हा लेख हस्तलिखित स्वरूपात माझ्याजवळ असतो तोपर्यंतच तो माझा. एकदा का तो छापून झाला की तो आता वाचकांचा झालेला असतो. त्याचे भवितव्य त्यांच्या हाती’.
जीएंची बरीच पुस्तके एका प्रकाशकांनी प्रसिद्ध केली होती. जीएंनी संबंधित प्रकाशकांशी पत्रव्यवहार भरपूर केला परंतु आयुष्यात भेट घेण्याचे मात्र टाळले. त्यांच्या काजळमाया या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. तो त्यांनी स्वीकारला देखील होता. परंतु पुढे या घटनेवर (तांत्रिक मुद्द्यावरून) साहित्य क्षेत्रात टीका झाली. त्याने व्यथित होऊन त्यांनी (प्रवासखर्चासह) तो पुरस्कार सरकारला परत केला होता.

३. चि त्र्यं खानोलकर (आरती प्रभू) यांचा किस्सा तर अजब आहे. ते लोकांना छातीठोकपणे सांगत, "साहित्यबाह्य गोष्टींना वगळून निव्वळ गुणवत्तेच्या जोरावरच ज्ञानपीठ पारितोषिक द्यायचे ठरले तर मराठी भाषेत तरी तो मान फक्त आपल्या एकट्याकडेच जातो !"
अनेकांना हे ऐकून अचंबा वाटे.
एवढेच नाही तर खानोलकरांनी वि स खांडेकर यांच्याबद्दलही असे वक्तव्य केले होते,
" येत असतील त्यांना वाचकांची ढिगांनी पत्रे आणि तामिळनाडूतील एखादी मुलगी त्यांना पूज्य पिताजी म्हणूनही संबोधत असेल. पण ते वेगळं आणि चांगलं लेखक असणं वेगळं".
स्वतःचे साहित्यिक यश डोक्यात गेल्याने त्यांनी अनेकांना उद्धटपणे बोलून दुखावलेले होते.

आता पाहू काही विदेशी साहित्यिकांचे नमुने :

४. सॉमरसेट मॉम हे विख्यात इंग्लिश लेखक. त्यांच्या लेखनाची कठोर शिस्त होती. रोज सकाळी नऊ ते दुपारी एक पर्यंत ते त्यांच्या लेखनाच्या टेबलाशी असत आणि रोज काही ना काही लिहित. त्यामध्ये रविवार असो वा सण, किंवा अगदी स्वतःचा वाढदिवस, लेखनात कधीही खंड पडला नाही. त्यांना एका मुलाखतकाराने विचारले होते की रोज नवे लेखन खरच सुचते का ? त्यावर ते म्हणाले, “नाही, रोज नवे सुचत नाही. तरीसुद्धा मी लेखनाच्या टेबलापाशी ४ तास बसतोच. कित्येकदा काहीतरी विचार करत माझ्या स्वतःच्याच सह्या असंख्य वेळा गिरवत बसतो. पण नित्यक्रम चुकवत नाही”.

५. झोरान झिवकोविच या सर्बिअन लेखकाचे एक मत अजब आहे. तो म्हणतो, की ५० वर्ष हे वय लेखक होण्यासाठी आदर्श आहे. आयुष्यातील त्या आधीची वर्षे सखोल वाचनात घालवावीत. कारण आपण लिहायला सुरुवात करण्यापूर्वी गेल्या हजारो वर्षातल्या आपल्या आधीच्या लोकांनी काय लिहून ठेवले आहे ते वाचणे आवश्यक आहे !

६. जे डी सालिंजर हे अमेरिकी लेखक त्यांच्या कॅचर इन द राय या कादंबरीमुळे गाजले. या कादंबरीच्या पहिल्या आवृत्तीच्या मुखपृष्ठावर एक अतिशय जिवंत असे चित्र छापले होते. परंतु पुढे त्यांनी मुखपृष्ठावरील चित्र या प्रकाराचाच धसका घेतला. पुढे त्यांच्या सर्व पुस्तकांसाठी त्यांनी मुखपृष्ठावर कोणतेही चित्र अथवा छायाचित्र छापायचे नाही असा आग्रह धरला. लेखकाच्या शब्दांमधून जो काही आशय व्यक्त होतोय तीच त्या पुस्तकाची वाचकावर उमटणारी एकमेव ओळख असली पाहिजे हे त्यांचे मत. लेखकाला काय सांगायचय त्यासाठी एखाद्या चित्रकाराची मध्यस्थी नसावी यावर ते ठाम राहिले.
याच धर्तीवर एका व्यंगचित्रकारांची अशीच भूमिका आहे. त्यांचे नाव आता आठवत नाही. ते देखील त्यांच्या व्यंगचित्रांमध्ये किंवा चित्राखाली शब्दांचा अजिबात वापर करीत नसत. चित्रकाराच्या चित्रातूनच् प्रेक्षकाला जे काही समजायचं आहे ते समजले तरच ते उत्कृष्ट चित्र, असे त्यांचे ठाम मत होते. या निमित्ताने लेखन आणि चित्रकला या दोन्ही कला समांतर चालाव्यात की एकमेकांना पूरक म्हणून त्यांचा वापर करावा हा एक चर्चेचा विषय उपस्थित होतो.

आता एक किस्सा राजकारणी व्यक्तीचा...
७. हा अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दलचा असून ते पंतप्रधान होण्यापूर्वीच्या काळातला आहे. ते जेव्हा दुर्गम भागांत दौऱ्यांवर निघत तेव्हा बरोबर स्वतःचा एक छोटा ट्रांजिस्टर ठेवत. तो नियमित ऐकणे हा त्यांचा छंद होता. निघण्यापूर्वी ते बरोबरच्या सचिवांना विचारत, “आपण जिथे चाललो आहोत तिथे जर या ट्रांजिस्टरच्या बॅटरीज संपल्या तर त्या विकत मिळतील ना? नाहीतर बरोबर ठेवाव्यात ”. त्यावर त्यांचे सचिव फक्त मंद स्मित करीत.

आणि हा किस्सा गिर्यारोहकाचा ...
८. जगातील पहिले एव्हरेस्टवीर सर एडमंड हिलरी यांनी त्यांच्या पर्वतचढाईचे अनुभव ‘व्ह्यू फ्रॉम द समिट’ या पुस्तकात लिहिले आहेत. कालांतराने हिलरी भारतातील न्यूझीलंडचे उच्चायुक्त होते. त्यांच्या या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘शिखरावरुन’ या नावाने श्रीकांत लागू यांनी केलेला आहे. त्या अनुवादासाठी लागू यांनी हिलरी यांची परवानगी मागितली होती. त्यावर हिलरींनी ती लगेच दिली. मग लागूंनी विचारले की मानधन किती द्यावे लागेल ? त्यावर हसून हिलरी म्हणाले, “मला पैसे नकोत, फक्त तुमची पिठलं-भाकरी एकदा खाऊ घाला !”
अशी ही दिलदार वृत्ती.

असे गमतीशीर किंवा तर्‍हेवाईक किस्से सांगण्यासाठी मी काही क्षेत्रांतील व्यक्ती निवडल्या आहेत. हे किस्से मी कुठल्या ना कुठल्या पुस्तक/नियतकालिकात वाचलेले आहेत. प्रतिसादांमध्ये वाचकांनी कुठल्याही क्षेत्रातील नामवंतांचे असे किस्से लिहायला हरकत नाही. तुम्ही लिहिलेला किस्सा हा स्वतः वाचलेला आहे की ऐकीव आहे याचा सुद्धा उल्लेख करावा. तुमच्या माहितीतील एखाद्या व्यक्तीचा (जरी वलयांकित नसली तरी) जर काही वैशिष्ट्यपूर्ण किस्सा असेल तरी लिहायला हरकत नाही.
....................................................................................................................

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

* १८ मार्च १८६२ >>> धन्यवाद !
1975 मधील >>> क्षमस्व.
* * *
मराठीतील अशा विक्रमाबाबत काही कल्पना नाही. परंतु माझ्या संग्रही असलेल्या या (https://www.maayboli.com/node/77708) पुस्तकातील पान पंधरावरील एक वाक्य तब्बल 143 शब्दांचे आहे.
त्या वाक्यात बरेच अर्धविराम, स्वल्पविराम आणि एखादा कंस आलेला आहे.

वरील प्रकाराच्या उलट लेखनशैली म्हणजे छोटी छोटी वाक्ये करणे आणि लेखनात पूर्णविरामांचा सढळ वापर करणे.
या प्रकारचे लेखन हे साने गुरुजी आणि अर्नेस्ट हेमिंग्वे यांचे लेखनवैशिष्ट्य असल्याचे काही लेखांमध्ये वाचले आहे.
(मी त्यांचे मूळ साहित्य वाचलेले नाही).

अस्मिता, तुम्ही म्हणताय तो लेखक 'ज्युझे सारामागो' हा नोबेल विजेता पोर्तुगीज लेखक आहे. तुम्हाला हा धागा आठवत असेल- https://www.maayboli.com/node/82532

मात्र इथं गंमत थोडी वेगळी आहे. तिथं वाक्यं छोटीच किंवा नेहेमीसारखीच आहेत, पण संपूर्ण पुस्तकात कुठेही पूर्णविराम वा कुठचीही विरामचिन्हे नाहीत. तसं तर मग हे पुस्तक म्हणजे जगातलं, मध्ये कुठचंही विरामचिन्हे नसलेलं एकच एक असं सर्वात मोठं वाक्य ठरेल. पण हा तांत्रिक मुद्दा झाला. विरामचिन्हं नसली तरी तिथं हजारो वाक्य आहेत, हे वाचकाला कळतंच.
वरच्या लेखात लेखकाच्या या अशा शैलीचं विवेचन करणारा एक परिच्छेद आहे..

हो, हेच साजिरा. धन्यवाद. Happy बरेच तपशील विसरले होते, पण तुम्ही लिहिलेय एवढं आठवत होतं.

वरील प्रकाराच्या उलट लेखनशैली म्हणजे छोटी छोटी वाक्ये करणे आणि लेखनात पूर्णविरामांचा सढळ वापर करणे. >>> छोटी छोटी वाक्ये करून पूर्णविरामांचा सढळ वापर केल्याने वाचकांच्या मनावरची पकड जात असेल असे वाटले.

* वाचकांच्या मनावरची पकड जात असेल
>>> असं वाटतं की हे वाचकाच्या अभिरुचीनुसार सापेक्ष असावे. फार लांब वाक्ये देखील नको वाटणारे वाचक असतात.
. . .

लेखनात उद्गारवाचक चिन्हांचे प्रमाण किती असावे हा पण एक रोचक विषय. इंग्लिश लेखनात एकंदरीतच ती काटकसरीने वापरतात. मराठी लेखनात अनेकांना ती बऱ्यापैकी वापरायचा मोह होत असतो.

या चिन्हाबद्दल F. Scott Fitzgerald या प्रसिद्ध लेखकांनी म्हटले होते,
“उद्गारवाचक चिन्ह म्हणजे आपणच आपल्या विनोदावर हसण्याचा प्रकार आहे”.

उद्गारवाचक चिन्ह म्हणजे आपणच आपल्या विनोदावर हसण्याचा प्रकार आहे
>>
हे फारच परफेक्ट आहे. कोणाला वाटो ना वाटो, पण मला आश्चर्य वाटलं, गंमत वाटली, भारी वाटलं- अशासारखं. किंवा मग तुम्हालाही (वाचकांना) वाटलं पाहिजे असंही.

मी लिहित असेन तर एखाद्या वाक्यापुढे उद्गारवाचक चिन्ह दिल्याने त्याची इंटेंसिटी डायल्युट होईल- असं सारखं वाटत राहतं.

उद्गारवाचक चिन्ह म्हणजे आपणच आपल्या विनोदावर हसण्याचा प्रकार आहे >>> मस्त.

मला बरोबर उलटं वाटतं साजिरा, जिथे इंटेंसिटी , आश्चर्य वाटायला हवं तेथे द्यावेच वाटते. सहसा क्रियापद शेवटी द्यायचे नाही. अर्थात अती करायचे नाही, मोजकीच वाक्य ठेवायची.

काय सुरेख चित्र आहे हे...!
वरचे जास्त चपखल वाटते, वाक्यरचना खालीलप्रमाणे हवी असेल तर सरळ पूर्णविराम दिलेला बरा.
हे काय सुरेख चित्र आहे..!

फार लांब वाक्ये देखील नको वाटणारे वाचक असतात.>>> Happy जास्त लांब वाक्य झाल्याने एकाग्रता ढळून पकड सुटण्याची शक्यताही असतेच. निर्मितीप्रक्रियेचा उपप्रकार म्हणून अवतरणचिन्हांचा वापर नेमका कसा करावा हे देखील खूप रोचक आहे.

तुम्ही लिहित असाल, तर वाचकांना ठरवू देत इंटेंसिटी- इतकंच काय ते. कारण इतरांचं वाचताना, त्यांनी उद्गार काढले म्हणून मला नवल वाटतंच असं नाही. हसूही येऊ शकतं.

हसूही येऊ शकतं. >>> Happy तसं तर सगळे लेखनच 'हिट ऑर मिस' असतं. आपण आपल्या आणि वाचकांच्या भावना किंवा त्यातले सुक्ष्म फरक जास्तीत जास्त समांतर करण्याचे प्रयत्न करू शकतो फक्त. Happy खरंतर वाचकांचा विचार करायचाही नाही, फक्त आपल्या विचारांशी- भावनांशी align करायचे.

हो म्हणजे ते टीव्हीसिरियल्स सारखं झालं ना. एका डॉय्लॉगवर क्रमाने सतरा चेहेर्‍यांच्या प्रतिक्रिया आणि सोबत घाबरवणारं ढॅन्ढॅणढाण्ण म्युझिक. अरे नाही आम्हाला अजिबात नवल वाटत आणि घाबरतही नाही आम्ही. उगाच काय. Proud

>>>>>>>तसं तर सगळे लेखनच 'हिट ऑर मिस' असतं. आपण आपल्या आणि वाचकांच्या भावना किंवा त्यातले सुक्ष्म फरक जास्तीत जास्त समांतर करण्याचे प्रयत्न करू शकतो फक्त.
अस्मिता, तू नंदन यांचा 'पुनर्वाचनाय च' लेख वाचला आहेस का? आता सापडणार नाही वाचला असशील तर पूर्वीच वाचला असला पाहीजे. ही जी लिखाणाची प्रोसेस आहे, त्याचे वर्णन त्यांनी ' एकूणच ’या हृदयीचे त्या हृदयीं’ ध्येय गाठताना होणारी दमछाक ' असे केलेले आहे.
जें जाल जळीं पांगिलें । तेथ चंद्रबिंब दिसे आंतुडलें ।
परि थडिये काढूनि झाडिलें । तेव्हां बिंब कें सांघे ॥
पाण्यात दिसणारे चंद्रबिंब जाळं फेकल्यावर, क्षणभर त्यात अडकल्याचा भास होतो खरा; पण बाहेर ओढून पाहिल्यावर ते हाती काही लागत नाही; असा हा दृष्टांत जसा लेखकाच्या अभिव्यक्तीच्या मर्यादा स्पष्ट करतो, तसाच वाचकाच्या जाणीवांचाही. ही त्या लेखातील ओळ.
सत्य आहे कधीकधी वाचकांपर्यंत लेखन, एखादा मुद्दा पोचतो तर कधी पूर्णतः मिस होतो. तू जे प्रयत्न म्हणाते आहेस त्यालाच नंदन दमछाक म्हणत आहेत Happy ग्रेट माईंडस थिंक अलाइक.

हे वाचा. अस साधे सरळ सोप्पे लिहा.
1. देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली.
2. सुरुवातीला पृथ्वी पूर्णपणे रिकामी होती; पृथ्वीवर काहीही नव्हते. अंधाराने जलाशय झाकलेले होते; आणि देवाचा आत्मा पाण्यावर पाखर घालीत होता
3. नंतर देव बोलला, “प्रकाश होवो” आणि प्रकाश चमकू लागला.
4. देवाने प्रकाश पाहिला आणि त्याला कळले की तो चांगला आहे. नंतर देवाने अंधारापासून प्रकाश वेगळा केला.
5. देवाने प्रकाशाला “दिवस” व अंधाराला “रात्र” अशी नावे दिली.संध्याकाळ झाली व नंतर सकाळ

बायबल केकू. Happy

थॅंक्यू सामो, सुंदर दृष्टांत आहे हा..! Happy
मी वाचलेला नाही तो लेख, मला एवढ्या सुंदर अलंकारिक भाषेत लिहिता येत नाही पण हो, असेच म्हणायचे होते. वाचकांच्या जाणिवांच्या मर्यादेत आपल्या अभिव्यक्तीला दामटवून बसवायचे नाही हे अगदी कळलं आहे, कारण वाचक मर्यादित असला म्हणून लेखकांनी कशाला मर्यादेच्या पिंजऱ्यात अडकायचे. असे किती वाचक असतील, म्हणजे पिंजरेच पिंजरे. मी वाचकांचा विचार करणं सोडून दिले आहे, आवडलं, कौतुक केले तर कृतज्ञता वाटते, आनंदही होतो, शेवटी मीही माणूसच आहे. पण अडकायचे नाहीये, रमायचे नाहीये. आता मला 'स्वान्तःसुखाय'चा खरा अर्थ कळला आहे.

>>>>आता मला 'स्वान्तःसुखाय'चा खरा अर्थ कळला आहे.
सुंदर!
>>>>आवडलं, कौतुक केले तर कृतज्ञता वाटते, आनंदही होतो, शेवटी मीही माणूसच आहे.
तुझी ही व्हल्नरेबिलिटी (माणुसपण) प्रचंड एन्डिअरिंग आहे - माझ्यासाठी. तुझ्या स्वभावाला, अन्यही लखलखीत पैलू आहेत. पण ही व्हल्नरेबिलिटी मला खूप आवडते Happy असो!

मी वाचकांचा विचार करणं सोडून दिले आहे, आवडलं, कौतुक केले तर कृतज्ञता वाटते, आनंदही होतो, शेवटी मीही माणूसच आहे. पण अडकायचे नाहीये, रमायचे नाहीये. आता मला 'स्वान्तःसुखाय'चा खरा अर्थ कळला आहे.>>> Lucky you! मी अजून प्रयत्न करतोय. कधीतरी जमेल ह्या आशेवर आहे.

वा ! उत्तम चर्चा आणि तऱ्हेतऱ्हेचे विचारमंथन.
आता "!" हा मुद्दा चर्चेत आलाच आहे तर त्या संबंधिचा किस्सा विस्ताराने पुढे लिहितोच . . .

छान, उद्बोधक चर्चा.
सामो छान दृष्टांत.
केकू, अस्मिता...छान व्यक्त केलंय. Happy

तर विषय आहे हेमिंग्वे यांच्या 'दि ओल्ड मॅन अँड द सी' या पुस्तकाच्या मराठी भाषांतराचा . . .

हेमिंग्वे यांच्या मते उद्गारचिन्ह वाचकांशी सलगी करायचा प्रयत्न करते. प्रस्तुत कादंबरी ही गंभीर प्रकृतीची असल्यामुळे तिच्यात त्यांनी फक्त दोन वेळा हे चिन्ह वापरलेले आहे.
या उलट एका कोळीयाने या त्याच्या मराठी भाषांतरात पुलंनी उद्गारचिन्हांचा सढळ वापर केला आहे. यावरून काही भाषा पंडितांनी त्या भाषांतरावर टीका केली होती. भाषांतरकाराने मूळ साहित्यकृतीच्या ' प्रकृतीचा' विचार करूनच आपल्या भाषांतरातील विरामचिन्हे ठरवावीत असा तो विचार आहे.

अर्थात यावर मतभिन्नता असू शकेल ( प्रत्येक भाषेची वैशिष्ट्ये, इत्यादी )

पाणिनी ह्या जगातील एकमाद्वितीय वैयाकरणाची कथा. पाणिनी चे संस्कृतचे ज्ञान यथा तथाच होते. हा पाणिनी राजा जलक्रीडेच्या वेळी राणीच्या अंगावर पाणी उडवत होता तेव्हा राणी कंटाळून संस्कृतमध्ये हसतहसत म्हणाली “मोदकै: सिंच माम्” म्हणजे उदकाने -पाण्याने मला भिजवू नकोस पण “मा”( नको ) आणि “उदक”(पाणी ) यांची संधी करून राणीने मोदक असं म्हटले .. राजाला वाटले राणी म्हणतेय मला मोदकांनी स्नान घाला. राजाने तत्काळ मोदक मागवून राणीच्या अंगावर फेकले. राणी आणि राणीच्या सख्या उपहासाने हसू लागल्या. हे पाणिनीच्या मनाला लागले. अपमान सहन न होऊन त्याबे राज्यत्याग केला आणि अरण्यात जाऊन घोर तपश्चर्या केली. शंकर महाराज प्रसन्न होऊन अवतीर्ण झाले. त्यांनी पाणिनीची इच्छा जाणली आणि आपला डमरू वाजवला, डमरूच्या आवाजाने पाणिनी ला ज्ञान प्राप्ती झाली. त्याने जे ऐकले तीच ती अष्टाध्यायीच्या सुरवातीला दिलेली सूत्रे. त्या सूत्रांच्या आधारे नंतर पाणिनीने संस्कृत व्याकरण लिहिले.
पण आज मी आंतरजालावर हीच कथा निराळ्या संदर्भात वाचली.
https://www.vedashreejyotish.com/the-epic-its-significance-in-sanskrit-l...
ही कथाही तितकीच रोचक आहे.

* मोदकांनी स्नान घाला.>>> छान.
आवडली.

अशा प्रकारचा अपमान सहन न झाल्याने एखाद्या व्यक्तीने स्वतः कष्ट आणि बुद्धीचा वापर करून स्वतंत्र निर्मिती केल्याची अन्य काही उदाहरणेही वाचली आहेत.
आता आठवावी लागतील

हीच कथा मी कुठेतरी कालीदासाबाबत वाचली.>> अस्ति कश्चित वाग्विशेषः? असं राणीने उपहासाने म्हटलं (विचारलं.) तेव्हा कालिदासाने अस्ति, कश्चित आणि वाग् (वाग्विशेषः मधलं) यावरून ३ साहित्यकृतींची निर्मिती केली.
(यात काय विशेष असं काहीतरी राणीने विचारलं होतं... मी ७वी-८वीत असताना ऐकलं होतं, आत्ता आठवत नाहिये)

अस्त्युत्तरस्यां दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराजः।
पूर्वापरौ तोयनिधी विगाह्य स्थितः पृथिव्या इव मानदण्डः>> कुमारसम्भव महाकाव्याची सुरूवात - अस्ति उत्तरस्यां दिशि देवतात्मा...

कश्चितकान्ता विरहगुरूणा... - कश्चित श्लोक पूर्ण श्लोक आठवत, पण मेघदूताची सुरूवात.

वागर्थाविव संपृक्तौ वागर्थप्रतिपत्तये ।
जगतः पितरौ वन्दे पार्वतीपरमेश्वरौ >>> रघुवंश महाकाव्याची सुरूवात.

प्रज्ञा९
छान आहे.
A Case of Reverse Engineering!

लेखनातील पूर्णविराम आणि उद्गारचिन्हांचे प्रमाण यावर परवा येथे चर्चा झाली होती. त्या संदर्भात अजून थोडी माहिती.

कोसलाची प्रथमावृत्ती 1963 मध्ये प्रसिद्ध झाली. त्याची मुद्रणप्रत तयार करायला नेमाडे आणि अशोक शहाणे मांडीला मांडी लावून बसले होते. तेव्हा त्या दोघांनी ठरवले की या सबंध कादंबरीत कुठे एकही उद्गारवाचक येता कामा नये आणि अवतरण चिन्हांची लुडबुड कुठेही नको.

त्या काळी प्रसिद्ध होत असलेले एकंदरीत साहित्य हे कृत्रिम, जुनाट आणि कृतक अलंकरण शैलीतलं होतं असं त्या दोघांचं मत. तशा साहित्यात वरील विरामचिन्हांचा सुळसुळाट झालेला होता.

Pages