हिंदुस्थानातील कुटुंब संस्थेच्या अनेक अंगांपैकी एक अविभाज्य अंग म्हणजे विवाहसंस्था होय.
प्रत्येकास आयुष्यात कधीनाकधी विवाह सोहळ्यात, त्या आधीच्या पुर्वतयारीत, प्रत्यक्ष सोहोळ्यातील कामात, व नंतरची मांडवपरतणी उरकण्यात सहभागी व्हायचा योग येतो, मग तो स्वतःच वधु/वर या भुमिकेत असेल, वा वर/वधुचे माता/पिता/नातेवाईक/मित्र/निरिक्षक या भुमिकेतून असेल.
तर हा धागा विवाहा निमित्ताने सध्या होणार्या घडणार्या अनेक योग्य वा अयोग्य रिती रिवाज रुढी परंपरा यांच्या आलेल्या स्वानुभवावर आधारित घटनांची/प्रसंगांची चर्चा करण्यासाठी आहे.
काही छान नविन प्रथाही सुरू होताना दिसत असतील, बरेच चांगलेही होत असेल तर ते ही इथे मांडणे अपेक्षित आहे, न की केवळ टीकात्मक लेखन.
चार माणसे जमली, की टाळक्याला टाळकी भिडणारच, त्यातुन विवाहप्रसंगी तर बघायलाच नको, तर अशावेळेस अनुभवलेल्या गंभीर/हलक्याफुलक्या/विनोदी प्रसंगाचे वर्णन इथे देण्यास कसली हरकत असावी? पुढच्यास ठेच, मागचा शहाणा, असे व्हावयाचे असेल, तर आपले अनुभव सांगायलाच हवेत ना?
(कृपयाच, इथे ऐकीव/ वा दुसर्या कुणीतरी मांडलेल्या विचारांचे/तत्वांचे सादरीकरण/प्रचार करण्याऐवजी, स्वानुभव व त्यावरील विचार मांडणे अपेक्षित आहे. धाग्यावर हलकीफुलकी चर्चा अपेक्षित असून कोणत्याही जातीधर्माला / समुहाला / व्यक्तिला दुखावणे अपेक्षित नाही)
या धाग्याव्यतिरिक्त, अशास्वरुपाच्या विषयावर मायबोलिवर आधिच एक धागा आहे, इच्छुकांनी तो देखिल नजरेखालून घालावा: लग्नातल्या गमतीजमती : http://www.maayboli.com/node/13968
जुनी मायबोली: http://www.maayboli.com/hitguj/messages/644/112938.html?1153310676
आज पुपु वर सहज सांगताना काही
आज पुपु वर सहज सांगताना काही पोस्टी माझेकडून झाल्या, त्यावरुन या धाग्याचे सुचले:
पुपुवरील माझ्या काही पोस्टी इथे परत टाकतो आहे:
*******************
>>>>>>
प्राजक्ता, देब्रांच्या अगत्याला अज्जिबात नावे नाही ठेवत, पण वधुवरपक्षाच्या प्रथम वर्षसणांच्या व अन्य संबंधातून वधूच्या वराकडील अन्य नातेवाईकांचे "अगत्य" करण्याची सक्ति होते ती निषिद्ध आहे. त्याबद्दल नंतर कधीतरी.
या अगत्यातूनच जेव्हा मानपान, रुसवेफुगवे, अडवणूक ही साईडप्रॉडक्ट्स नि:ष्पन्न होतात तेव्हा वैतागायला होते.
नावाशिवाय एक उदाहरण देतो, एका घरगुती (मंगळागौर वा तत्सम) कार्यक्रमात, मुलाकडील सर्व नणंदा, त्यांचे नवरे, सासूसासरे वगैरेंना स्वतंत्र आमंत्रणे दिल्यावर प्रत्यक्ष कार्यक्रमाचे वेळी दुपारी एकला जेवण वाढून तयार असूनही एक नणंद अजुन आली नाही म्हणून बाकी सर्व गोतावळा, "तिला काय वाटेल नै थांबलो तर" या वा अन्य कशा भावनेने जेवायला दुपारचे चार साडेचार वाजवतात तेव्हा यजमानाने काय करावे? असले अगत्य? हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवणारे? या निमित्तादाखल थांबलेल्या व्यक्ति सकाळी घरुन भरपेट नाष्टा करून आल्या होत्या, जेव्हा यजमान व बाकी लोक सकाळपासून उपाशीतापाशी राबत होते. पुन्हा पुन्हा विनवित होते, जेवायला चला चा "आग्रह(?)' करीत होते, पण भरल्या पोटी चार पर्यंत वा उपाशी असले तरी समोरच्याला नाकदुर्या काढायला लावण्याच्या अहमहमिकेपोटी तसेच उपाशी बसून रहाण्याची कुवत व शामत याला देशस्थी "अगत्य" म्हणायचे का?
बरे तर बर, त्यांच्यात काही वृद्ध व्यक्तिही होत्या, ज्या भुकेने कळवळलेल्या होत्या, त्याही तशाच बसून होत्या, मग त्यांच्या "वडीलकीचा" अधिकार कुठे गेला?
नको तितका वेळ लागुनही तसेच जेवायला थाम्बले म्हणजेच प्रेम/जिव्हाळा/अगत्य सिद्ध होते का?
अन हेच सिद्ध करायचे तर स्वतः यजमान असताना करा कि, दुसर्याच्या घरी तिसर्याच कार्यक्रमात आपापसातले जिव्हाळे सिद्ध करायला कार्यक्रमाच्या नियोजनाची, वेळापत्रकाची वाट लावणे गरजेचेच आहे का?
असला वेडेपणा कोब्रांकडे होत नाही. इकडे "याल तर तुमच्या सह, न याल तर तुमच्याविना" अस्साच खाक्या असतो, मग भले तो घरचा बाब्या असो वा दारचा पाहुणा. हा कल्चरल डिफ्रन्स जबरदस्त आहे.
असो. याने काही फार बिघडत नाही, शिकतील हळू हळू पेठी शिस्त
<<<<<<
*******************
>>>> मुलांकडे होणार्या कार्यक्रमातही तसे होत असेल पण मला आता मुलांकडे काही कार्यक्रम होतात का तेच आठवत नाहीय <<<<
गजाभौ, दुर्दैवाने "हिंदु" विवाहपद्धतीत पडलेल्या घातक प्रथांमधे 'वरपक्षाकडे' कुठलेच कार्यक्रम नसतात. अगदी सातव्या महिन्यात गर्भार मुलिला घरी आणायचे तर त्या आधीची ओटी देखिल माहेरच्यान्नीच भरायची असते. फरक असलाच तर मराठवाडी/विदर्भी, घाटी, कोकणी वगैरे प्रांताप्रमाणे साजरा करण्यात फरक पडतो.
हे असेच चालु राहिले तर येत्या काही वर्षात हिंदूधर्मातील (व खास करुन पुरोगामी ब्राह्मणी घरातील) कुटुंब व लग्नसंस्था बंद पडल्यास मला नवल वाटणार नाही. अतिशय वेगाने तिकडे वाटचाल चालु आहे.
*******************
या प्रथा पाळण्याच्या वर्हाडी/खानदेशी/मराठवाडी/घाटी/कोकणी प्रांतातील फरकामुळे व अज्ञानामुळे कसा गोंधळ होतो ते दोन देब्रांच्या विवाहप्रसंगातील उदाहरण थोडक्यात सांगू पहातो.
वर वधु दोघेही देब्रा, वर घाटावरील, तर वधू मराठवाड्यातील. लग्न परभणी येथे.
मराठवाडी पद्धत म्हणजे आहेर कोणताही द्या, त्याच्यावर टोपी व टॉवेल हवाच. अन हा टॉवेल हातभर/वीतभर असला तरी चालतो, पण तो हवाच हवा.
आता गंमत काय झाली की आहेराबरोबर असे टोपीटॉवेलही दिले गेले, तेव्हा वराकडील वयस्कर मंडळी भारी संतापली, काय तो इतकुस्सा शेम्बुड पुसायच्या हातरुमालागत टॉवेल देताय, अन तो ही लग्न समारंभात? अहो आमच्याकडे तो टोपीसहित मर्तिकाच्या तेराव्यानंतरच्या आहेरात देतात, शालीऐवजी ! तेराव्या पर्यंत बोडक्या डोक्याने हिंडायचे अस्ते ना, ते थांबवुन डोके झाकण्याकरता देतात बर ही टोपी!
झाला गोन्धळ... वधु कडच्यान्ना कळेना आपले काय चूकले,
वराकडचे समजुन घ्यायला तयार नाहीत की इकडच्या पद्धतीच अशा असतात....
बरे तर बरे, वराकडचेही कमी गोन्धळी नाहीत, तर शेवटी ज्याच्या खान्द्यावर बंदूक ठेवायची त्याच्यासमोर हळू हळू बोलून फुसकुल्या सोडून सोडून त्यास हैराण केलेले, व तो संतापल्यावर आपण गम्मत बघत बसले, व लग्नानंतर आज साताठ वर्षांनन्तरही त्याची चर्चा तिखटमीठ लावुन, व बंदुकधार्यालाच धारेवर धरत....
*******************
संपदा, माझी बायको देशस्थ, पण बालपण कोब्रांच्या संगतीत अन तरुणपण माझ्या संगतीत गेल्याने इतक्या वर्षात आता बर्यापैकी कोब्रा बनली आहे.
तर आमच्याकडे देब्रा पाहुणे आले.... बायकोने त्यान्ना या बसा म्हणले, पाणी दिले, सरबत करू की चहा करू विचारले, चहा चालतोना, की कॉफी करु असेही विचारले... पाहुण्याबाई नको नको म्हणत राहिल्या. दोनचारदा विचारुन झाल्यावर "आग्रह" करण्याची लिम्बीची क्षमता सम्पली. तिने तो विषय सोडून दिला. नंतर पाहुण्या परत गेल्या....... अर्थात चहा/कॉफी/सरबत काही न घेताच.
परत गेल्यावर (अन नंतर पुढील भेटीत पाहुणीची बहीण आमचेकडे आल्यावरही) हीच चर्चा, की अजुन परत विचारायला हवे होते की काय घेणार... चहा की सरबत ! नाही म्हणल्यावर एकदम नाहीच्च असे कसे ठरवले?
(मी दोनही प्रसंगी हजर होतो, अर्थात दुसर्या वेळेस पाहुणीच्या बहिणीला मी जे काही उत्तर दिले असेल कोब्रा पेठी खडूसपणे त्याची कल्पना करणे मी सूज्ञ वाचकांवर सोडून देतो )
*******************
मस्त धागा. आता मस्त
मस्त धागा. आता मस्त प्रतिसादांच्या प्रतिक्षेत.
बाकी सगळे कार्यक्रम वधुपक्षाकडे हे मात्र अग्दी खरे आहे.. वधुपक्ष वर्षभरातले आणि त्यानंतरचेही सगळे काही साग्रसंगीत करतो की नाही याकडे बारिक लक्ष ठेवायचे, जरा जरी ढील पडली तर लगेच आठवण करुन द्यायची आणि आपली करायची वेळ (चुकुन) आलीच तर, 'छे बाई, असल्या जुनाट रुढी आता आपल्यासारख्या सुशिक्षित लोकांनी बंदच करायला हव्यात. आम्हाला तर अजिबात असला जुनाटपणा चालत नाही' असे सांगायचे.
लिंबुकाका, भारी धागा
लिंबुकाका, भारी धागा आहे.

आमच्या कोकणात शक्यतो एकदा विवाह झाला की पुढचे सगळे विधी सासरीच होतात.
विवाहाचा खर्चपण बर्याचदा विभागून किंवा ज्याच्या घरी /गावात विवाह असेल त्यांच्याकडे.
पण बाकी ठिकाणी फारच जाच आहेत.
इथे कर्नाटकात एकदा मुलीचं लग्नं झालं की माहेरच्यांनी फक्तं सासरचं घर भरायचंच काम.
लग्नात हुंडा,मानपान, जेवणावळी सगळा खर्चं मुलीकडच्यांचा. दिवाळसण, धोंडा महिना, दसरा नागपंचमी सगळे सण माहेरी.
दिवाळसण आणि अधिकमासात जावयाला सोने हवेच.
मुलगी प्रेग्नंट झाली की चोरचोळी, मोठ्या डोहाळजेवणाला परत एका लग्नाचा खर्च. पुन्हा पाचसहाशे लोकांना जेवण, मुलीला जावयाला सोने आणि सगळ्याना कपडे.
मुलीला बाळ झाले तर पाच महिने माहेरी. बारश्याचा खर्च माहेरी.
यातही मुलीला जावयाला सोने आणि बाळाला सोने चांदी इ.
मग दर्वेळी मुलगी माहेरी आली की कपडे.
वाढदिवसाला सोने.
नातवाच्या मुंजीला(इकडे शाल म्हणून कार्यक्रम असतो) कपडे सोने मानपान जेवणावळ आणि जावयाने मागितले तर पैसे सुद्धा.
मुलीच्यासाठी पण असाच साडी नेसवायचा कार्यक्रम.
मुलगी वयात आली की परत असाच कार्यक्रम. परत सोने कपडे.
एकदा नातीच्या लग्नात सोने नाणे आणि मामाकडची म्हणून पाच चांदीची भांडी देऊन झाली की मगच सुटका.
बापरे साती. ही फारच झालं
बापरे साती. ही फारच झालं
आमच्या एका तेलुगू शेजाराने
आमच्या एका तेलुगू शेजाराने मुलीच्या लग्नाचे आमंत्रण आम्हाला चांदीचे निरांजन आणि ओटी मिठाई पैसे असे देऊन केले होते. लग्न झुरी हॅआटेल मधे होते.
साती, हे आमच्या घरा घरात
साती, हे आमच्या घरा घरात दिसून येत. मामाकडची भांडी देण्याचा बहुतेक लग्नात एक विधी असतो. एखादा प्लॉटही दिला जातो.
सोन मुलीला कमी घालणार अस सांगितल तर लग्न मोडली जातात.
अजून एक लिहायच राहिल तांदूळाच्या पोतीसुद्धा सासरी गेलेल्या मुलीला दरवर्षी दिल्या जातात. माझ्या आईला अजूनही तिच्या माहेरून तांदूळ दिला जातो. माझी आई मलासुद्धा तांदूळ घेऊन जा म्हणून मागे लागते तेव्हा मला जाम हसू येत.
आमच्या एका तेलुगू शेजाराने
आमच्या एका तेलुगू शेजाराने मुलीच्या लग्नाचे आमंत्रण आम्हाला चांदीचे निरांजन आणि ओटी मिठाई पैसे असे देऊन केले होते. लग्न झुरी हॅआटेल मधे होते. <<< 'अरे बापरे!' म्हणावे की 'अरे वा!' म्हणावे!
हो आरती. आमच्या सासूबाईंनापण
हो आरती.
आमच्या सासूबाईंनापण अजून दरवर्षी नागपंचमीची माहेरची साडी येते.
या धाग्यावर कदाचित अवांतर
या धाग्यावर कदाचित अवांतर असेल.. पण नुकतच फेबुवर वाचल आणि हा धागा समोर आला म्हणुन पोस्टावस वाटल... अगदीच वेगळ वाटत असेल तर सांगा काढुन टाकेन
लग्नघर.....
"मी हे वधूपक्षाच्या लग्नघराबद्दल म्हणतोय. बापाच्या आयुष्यातला खरंतर हा सगळ्यात आनंदी प्रसंग. कार्यालयातून परत आल्यावर भावनिक त्सुनामी येउन गेल्यानंतरची परिस्थिती घरभर असते. बरेचजण सुट्ट्या नसल्यामुळे परस्पर कार्यालयातून स्टेशनवर पळालेले असतात. सामान घेऊन गाड्यांबरोबर माणसंही घरी येतात. थकवा ओसरला की निघायच्या दृष्टीने रिटायर्ड लोकांनी दोनचार दिवसानंतरची जायची रिझर्वेशंस केलेली असतात.
मागे राहिलेले दहाबारा पाहुणे, घरभर अस्ताव्यस्तं पडलेलं सामान, रंगीबेरंगी कागदात गुंडाळलेली प्रेझेंटस, बाहेर लावलेल्या लाईटच्या माळांचा निस्तेज प्रकाश, प्रत्येकाच्या चेह-यावर मानसिक आणि शारीरिक थकव्याचा हलकासा पफ फिरवल्यासारखा थर, कुणालाही भूक नसते पण दुपारीच जेवण झाल्यावर परतलेली, कमी दमलेली एखादी अनुभवी वयस्कं आत्या, काकी मुगाच्या डाळीची खिचडी ग्यासवर चढवते, 'पोह्याचे पापड कुठेत गं? सांग फक्तं, मी काढते ' विचारत तिच्या दृष्टीने नुसत्याच मिरवणा-या पाहुण्या मुलीला/सुनेला 'ताक घुसळतेस पटकन?' अशी आदेशवजा विनवणी करते. सुनेला त्रास न देता सापडल्याच तर दहाबारा सांडगी मिरच्या तळून ठेवते.
उद्या सकाळी जाणारे पाहुणे आपापलं सामान गोळा करतात, सकाळी घालायचे कपडे, रिझर्वेशंस वरती काढून ठेवून टूथब्रश सकाळी सापडेल अशा नेमक्या जागी ठेवतात. आजीच्या चेह-यावर लग्नाकरता एवढ्या लांबून मुद्दाम आलेल्या माणसाबद्दलचं कौतुक ओसंडून वहात असतं. परत भेट होतीये न होतीये म्हणून ती मायेने चिवडा लाडूच्या दोन पुड्या त्यांच्या हातात कोंबते. गाड्यांचे, कुणीकुणी गेल्या दोन दिवसात खर्च केलेले पैसे आठवणीने दिले जातात. सुतकात असल्यासारखे सगळेजण ऊनऊन खिचडीचे दोन घास पोटात घालतात, लग्नं कसं झालं, फोटो, दागिने यावर हलक्या आवाजात निरुत्साही चर्चा होते. अशावेळी सगळं पटापट आवरलं जातं. बापाचा हात न वाजलेल्या फोनकडे सारखा जातो. एकदाचा उत्साहानी फसफसलेला, आनंदी फोन येतो, सगळा ताण रिलीज झाल्यासारखा बाप 'मिरची फारच तिखट आहे' म्हणत तांब्यानी वरून पाणी पित डोळ्यातलं मागे सारतो.
नमस्कार होतात, ओट्या भरल्या जातात, दिलं घेतलं जातं. आठवणी निघतात. डोळे ओले होतात, पुसले जातात, तोंडभरून आशिर्वाद मिळतात, दिले जातात, कानशिलावर बोटं मोडली जातात, परत लवकरच भेटण्याचे वायदे होतात, नातवंडांचे, माहेरवाशीणीचे गाल आजीच्या पाप्यांनी ओलसर होतात. दोनतीन दिवसात सुगी संपल्यावर पाखरं नाहीशी होतात तसा एकेक पाहुणा परततो. मग उरतो तो फक्तं नि:शब्द एकांत. मग आजी शहाण्यासारखी कोचावर सुखानी लवंडते.
शेवटच्या पाहुण्याला स्टेशनवर सोडून आलेला बाप 'मला भूक नाहीये गं, पडतो जरा' म्हणत बेडरूममधे जातो.मुलीचं कपाट उघडतो, घरी आल्यावर लागतील म्हणून तिनी ठेवलेल्या कपड्यांवरून थरथरता हात फिरवतो. लागूनच असलेल्या बेडवर बसतो आणि ओंजळीत तोंड धरून आवाज न करता धबधब्यासारखा फुटतो. मांजरीच्या पावलांनी पाठोपाठ आलेली मनकवडी बायको आई होते आणि त्या फक्तं वय वाढलेल्या सशाला छातीशी घट्ट धरते."
आमच्या कोकणात शक्यतो एकदा
आमच्या कोकणात शक्यतो एकदा विवाह झाला की पुढचे सगळे विधी सासरीच होतात.
विवाहाचा खर्चपण बर्याचदा विभागून किंवा ज्याच्या घरी /गावात विवाह असेल त्यांच्याकडे.
>>>
हो, कोकणात हे एक छान आहे. आपल्या आपल्यात ठराविक मानपान असतात, मात्र वधू-वर पक्षामध्ये जवळपास ५०-५० टक्क्यांचा हिशोब चालतो.
कदाचित मुळातच फारशी सुबत्ता नसणे हे देखील कारण असू शकते.
@ धागा, छान, वाचण्यास उत्सुक आणि कोण जाणे, कदाचित उपयुक्त
साती, पण वास्तव हेच आहे की
साती, पण वास्तव हेच आहे की अशाच अचाट पैसेकाढू प्रथांमुळे व शेळपट/पुचाट वर-पुरुषांमुळे परिस्थिती इतकी बिघडली की सरसकट मुली नकोतच व्हायला असा सरळ सरळ अन्यायी स्त्रीविरोधी भुमिकेचा प्रचार होऊन स्त्रीभृणहत्येत भर पडत राहिली आहे. हजारी स्त्रीयांचे प्रमाण अनैसर्गिकरित्या घटले आहे. घटलेल्या प्रमाणात दरहजारी अविवाहित रहाणारे दीडशे दोनशे नर-पुरुष (म्हणजे एकुण लोकसंख्येत किती ते गणित करा) आपापल्या वासना भागवायला काय थराला जातील यावर नियंत्रण नाही. असा सगळा अनागोंदी कारभार आहे व एकाही हिंदू कुटुंबाला याचा खेद वा खंत असल्याचे राहुदेच, या पद्धतीने विचारही करताना दिसत नाहीत. म्हणूनच मी हिंदून्ना ढोन्गी अन नालायक म्हणतो व म्हणूनच ते कायमच पराभूत मनःस्थितीत केवळ घरच्या बाईवर "राज्य/हुकुमशाही" करीत रहाताना दिसतात.
इतिहासात सहाच काय, परकीयांविरुद्ध लढलेली असंख्य सोनेरी पाने आहेत, पण या पानांमध्ये असल्या मनोवृत्तीचा एकही नगिना असू शकत नाही, असलेला नाही, असणार नाही.
आपण असल्या कृत्रिम प्रथा रुढींमुळे (ज्याला धर्मशास्त्रीय आधार नाही) आपली मूळची संस्कृती लयाला घालवीत आहोत.
अजुन काही वर्षात गरजेपुरती लिव्ह-इन्-रिलेशनशीप बोकाळून कुटुंब संस्थेचा नाश झाला तर नवल वाटणार नाही. अन एकदा का कुटुंब व्यवस्था मोडकळीस आली की हा समाज परत कधी "हिंदू" म्हणून उभाच राहू शकणार नाही.
मुग्धटली, इथे असायला काहीच
मुग्धटली, इथे असायला काहीच हरकत नाही. काढू नका,
पण शक्यतो स्वतःचे अनुभव व मते स्वतःच्या शब्दात असावीत तर जास्त बरे.
(अर्थात तो मजकुर, दुसरीकडूनचा असला तरी तुमचीच मते म्हणुन असेल, तर हरकत कशाला घ्यावी? नै का? पण मग लोक केवळ कॉपीपेस्ट करत बसतील व मायबोलीच्या सभासदाला मराठीतून विचार करून मराठीतून देवनागरी लिपी वापरीत लिहीते करत संवाद साधण्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासल्यासारखे होईल, बरोबर ना? )
देण्याघेण्याला विरोध नाही, पण त्याची सक्ति अशक्य वाटते, सक्तिमुळे देण्याघेण्यातील जिव्हाळा प्रेम आपुलकीच काढून घेते.
मुग्धटली, छान पोस्ट. हो
मुग्धटली, छान पोस्ट.

हो लिंबूकाका.
मात्रं आमच्या कर्नाटकातही इथले घाटावरचे आणि इथले समुद्रकिनार्यावरचे असा फरक आहेच.
आमच्या मंगलोरी शेजारणीने आपल्या डॉक्टर मुलीचे लग्नं किनार्याजवळच्या आपल्या जुन्या गावातल्या मंदिरात केलं.
मुलीला जाताना फक्तं एक छोटिशी ब्रिफकेस दिली होती ज्यात काही मोजकेच हिर्यामोत्यांचे दागिने होते. एक खास मंगलोरी रेसिप्या लिहिलेली वही आणि पासपोर्ट.(मुलगी पुढच्याच आठवड्यात विदेशी जाणार होती)
लग्नाचे फोटो पाहतानापण अगदी कोकणातलं साधसं लग्नं पहातोय असं वाटत होतं.
साधे हार, मंदिरातली साधी सजावट आणि साधं पंगतीतलं जेवण.
त्या लग्नात नवरीमुलगी जेवढी नटली होती तेवढी आमच्या गावातली बाई ओळखीतल्या लांबच्या लग्नाला जाताना नटते.
लिंब्याभाउ, अजुनतरी अश्या
लिंब्याभाउ, अजुनतरी अश्या काही अतर्क्य गोष्टी अनुभवायला मिळाल्या नाहीत, पण मगाशी सहज फेबुवर डोकावले असता हे दिसल, म्हणुन वाटल की इथे शेअर कराव..
अनुभव आल्यास नक्की लिहिन इथे.. तुमच्या या आधीच्या पोस्टशी मी पूर्णपणे सहमत आहे..
लिंबूकाका , वा ! बर्याच
लिंबूकाका , वा ! बर्याच दिसांनी माबोवर !
छान बाफ सुरु केलात .
आपल्या आपल्यात ठराविक मानपान असतात, मात्र वधू-वर पक्षामध्ये जवळपास ५०-५० टक्क्यांचा हिशोब चालतो.>>>> कोकणस्थाकड़न्च्या लग्नात हे बर्याचदा पाहिले अनुभवले आहे.
माझ्या एका देशस्थ सरांचा अनुभव बोलका आहे याबाबतीत.
तर या सरांनी आपल्या मोठ्या मुलीच लग्न गावाला केल . सातारा साईड. मुलगी बीएससी केमिस्ट्री. मुलगा कुठल्या तरी दूध संघाचा अध्यक्षाचा मुलगा . मला अजूनही आठवत. सर जाम मेटा कुटिला आलेले. अक्षरश आख्या संसार दिला होता मुलाकडच्यांना .फ्रिज , भांडीकुंडी , सासरच्याना कपड़े , त्यांचे मानापमान वगैरे . थक्क व्हायला झालेल हे सर्व पाहून .
सरही मुलीला त्रास नको व्ह्यायला म्हणून निमूटपणे मान्य करत होते
अचाट पैसेकाढू प्रथांमुळे व शेळपट/पुचाट वर- पुरुषांमुळे परिस्थिती इतकी बिघडली की सरसकट मुली नकोतच व्हायला असा सरळ सरळ अन्यायी स्त्रीविरोधी भुमिकेचा प्रचार होऊन स्त्रीभृणहत्येत भर पडत
राहिली आहे. हजारी स्त्रीयांचे प्रमाण
अनैसर्गिकरित्या घटले आहे.
>>>+1
आमच्या एच आय व्हीच्या ओपीडीत
आमच्या एच आय व्हीच्या ओपीडीत बहुतांश पेशंट मुस्लिम समाजातील आहेत.
एकदा अशीच एक अगदी तरुण मुलगी नुकतेच लग्न होऊन सहा आठ महिने झाले असताना रिपोर्ट पॉझिटिव्ह घेऊन आली.. तिला रोग नवर्याकडुन गेला ह अगदी उघड होते.
तेंव्हा आमची सिस्टर खोचकपणे त्या मुलीला म्हणाली ... काय गं , तुमच्या लग्नात कबूल कबूल कबूल म्हणतात ना ?
म्हणजे तूच कबुल करुन नवरा मागुन घेतलास . आता आला एच आय व्ही तर तोही घे ! अशा अर्थाने बोलली .
मला अगदी राग आला होता.
दुपारी जेवताना मी सिस्टरला बोललो.. दिस्टर त्यांच्या लग्नात कबुल कबुल म्हणतात.. तुमच्या हिंदु लग्नात काय म्हणतात माहित आहे का ? तुमच्यातही तेच म्हणतात , पण संस्कृतात म्हणतात.
धर्मे च अर्थे च कामे च मोक्षे च नातिचरामि नातिचरामि नातिचरामि
म्हणजे एका अर्थाने तेही कुबुल कुबुल कुबुल असेच असते.
मुसलमानांचेम्मंत्र हिंदी उर्दुत.
ख्रीस्चनाण्चे इंग्रजीत.
हिंदुंचे मंत्र न कळणार्या संस्कृतात का ? नवरा बायकोनी काय वचनेदिलीत हे त्याना मातृभाषेत का सांगितले जात नाही ? म्हणजे मुसलमानांच्या कुबुल कुबुलला हिंदु दात काढुन हसणार नाहीत.
सोळाव्याचा विधी व त्यातले पठण
सोळाव्याचा विधी व त्यातले पठण व त्याचे मराठीतले अर्थ ऐकले तर इथले पांढरपेशे झीट येऊन पडतील.
'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास '- वि. का. राजवाडे हे जब्बरदस्त पुस्तक कुणी वाचलं आहे का?
हे वाचुन सप्तपदी , पाणीग्रहण , अग्नीच्या साक्षीने विवाह या सगळ्या रूढी मागे काय दडलंय ते कळते...
ते पुस्तक वि.का. राजवाड्यांनी
ते पुस्तक वि.का. राजवाड्यांनी लिहले ते एक मोठे कार्य आहे, अनेक अनाकलनीय व कालबाह्य हिंदू रुढी प्रथेँच्या मागे लपलेल्या विकृत मनोप्रवृत्तींचा समाचार राजवाड्यांनी त्या पुस्तकात घेतलाय. आता त्यांना इतिहासाचार्य हि पदवी असल्याने त्यावर कुणीही आक्षेप घेऊ शकत नाही.
http://www.marathipustake.org/Books/bharatiya_vivaha_sansthecha_itihaas.pdf पुस्तकं छोटे आहे ,पण अभ्यासपुर्ण आणि चांगले. खासकरुन कल्ट मांइण्डेड लोकांनी जरुर वाचावे.
सोळावं नै हो तेरावं
सोळावं नै हो तेरावं
ला आलेले. अक्षरश आख्या संसार
ला आलेले. अक्षरश आख्या संसार दिला होता मुलाकडच्यांना .फ्रिज , भांडीकुंडी , सासरच्याना कपड़े , त्यांचे मानापमान वगैरे . थक्क व्हायला झालेल हे सर्व पाहून .
>>
जाई, तुम्ही थक्कं झालात पण आमच्या इथे म्हणजे मराठवाडा आणि बॉर्डर कर्नाटक यांत हे अगदी कॉमन आहे.
लग्नसराईत इथे कपड्यांच्या दुकानात 'लग्नाचा बस्ता' मिळेल म्हणजे मुलीचाशालू, मुलाचे सूटचे कापड, मानपानाच्या साड्या , ब्लाऊज पीस, टॉवेल , टोप्या मिळतात.
भांड्यांच्या दुकानात लग्नाचा सेट- गॅस शेगडी, सहा किंवा बारा ताट, वाट्या, पेले, चमचे, नाश्त्याच्या प्लेटस, इडलीपात्रं, पूरण पात्रं, लहान्मोठे चमचे, उलथणी, कॅसरोल्स, बाऊल्स, पातेली यांचा सेटस.
इलेक्ट्रॉनिक्स दुकानात खास सिंगल्/डबल डोअर फ्रीज,वॉशिंग फ्रीज्,एसी मिळतात.
गरीबांसाठी साध्यातले कुलर विकायला येतात.
पलंग, ड्रेसिंग टेबल, गादी आणि उश्या तर द्याव्याच लागतात.
डिनरटेबल , सोफा सेट द्यावे न द्यावे अजूनतरी ऑप्शनल आहे.
लग्नात किती मोठा ट्रक मुलीबरोबर आला यावरूनही वधूपित्याचे माप काढले जाते.
गरीबांचीही यातून सुटका नाही. तसेच मुस्लिम, ख्रिश्चन, नवबौद्ध, ब्राह्मण यांतही सेम प्रथा आहे.
सगळ्याची स्वस्तं व्हर्जनही मिळतातच.
माझ्या एका कलिगच्या लग्नात तर कितीतरी सोनं देऊनही एका कानातल्याचे मळसूत्रं / फिरकी पितळेचे होते, सोन्याचे नव्हते यावरून तिच्या अख्ख्या गावाची लायकी काढली गेली. ही कलिग मुस्लिम.
साती .. बापरे! आमच्याकडे ही
साती .. बापरे!
आमच्याकडे ही सोनंही २५ तोळे नि पुढे अशीच सुरुवात असते.. मैत्रिणीच्या लग्नात तिच्या वडिलांनी मिक्सरपासुन सोफासेट, एसी पर्यंत सामान रुखवतातच ठेवलं होत.. सोनं वेगळंच नि लग्नही मुलीकडेच!
मारवाडी लोकांकडेही सासरी
मारवाडी लोकांकडेही सासरी मुलीबरोबर सगळं द्यावं लागतं. वरून हुंडा आहेच. मुलीला मुलगा/मुलाला मुलगी बघतानाही २५ लाखाची पार्टी/ ५० लाखाची पार्टी आहे अशी सुरूवात होते.
कर्नाटकात मुलगी देताना दहा
कर्नाटकात मुलगी देताना दहा वेळा विचार करायला हवा.
भा.प्र. एव्हढे सामान ठेवतात
भा.प्र. एव्हढे सामान ठेवतात कुठे? की नवे घरही घेऊन देतात?!
साती , अवघड आहे .. सायो हे
साती , अवघड आहे ..:-(
सायो हे पंचवीस /५० लाखाच प्रकरण पाहिले आहे.आजुबाजुला मोस्टली तेच शेजारी आहेत .
उत्तर प्रदेशी लोकांत अजून एक प्रथा ऐकलिये ते म्ह्नण्जे किती प्रमाणात हुंडा मानापमान करायची वधु पित्याची तयारी असेल तर तसे रिश्ते येतात
दिल्लीमधील ऐकलेली व दुरून
दिल्लीमधील ऐकलेली व दुरून अनुभवलेली एक पद्धत. आपल्याकडे मध्यस्थ बरेचदा नात्यातले कोणीतरी वा वधुवरसुचक मंडळ असते (जर कुणीच समान नातेवाईक-ओळखीचे नसतील तर).
दिल्लीत बर्याचदा हा मध्यस्थ व्यावसायिक असतो व सुताराप्रमाणे लग्नात होणार्या खर्चाच्या टक्केवारीत (पर्सेंटेज) त्या मध्यस्थाची कमाई असते. त्यामुळे खर्च वाढवायला तो दोन्ही बाजूंना हुसकावत असतो.
माझ्या लग्नात बायकोच्या मावशीने विहिण म्हटली होती. मला हा प्रकार माहितीच नव्हता. स्त्रीवादी दृष्टिकोन थोडा बाजूला ठेवला तर मला त्या विहिणी फार सुंदर वाटल्या (आणि मावशींचा आवाजही फार चांगला आहे). या विहिणी एक सांस्कृतिक/साहित्यिक ठेवा आहेत. तसेच लग्नाच्या दिवशी सकाळी लवकर मुसळाची पूजा व त्याबरोबर गायच्या ओव्या माझ्या एका मामीने म्हटल्या. मला त्या पूजेचे नाव वा ओव्या पण आठवत नाहीत. अश्विनी के, हिम्याला, रैनाला वगैरे कदाचित आठवत असेल - ते तिथेच समोर हॉलमध्ये नुकतेच झोपून उठले होते :फिदी:. त्या ओव्या पण सुंदर होत्या.
वासुदेव, कुडबुडे जोशी, पिंगळा, बहुरुपी असे अनेक लोक पाहून जमाना झाला. पोलिस बनून बाजारात एखाद्या दुकानात वा घरी येणारे बहुरुपी, त्यांचे नाटक, ते दाखवत ती जरब - या सगळ्यात मजा असे.
हे सर्व लोक दिसावेत का रस्त्यावर? तर जाचक प्रथा/उदरनिर्वाहाचे साधन म्हणुन नकोत. पण सांस्कृतिक ठेव म्हणुन ही परंपरा वॉलंटरीली चालू रहावी का? युरोपातल्या अनेक परंपरा अशा आजही चालू आहेत.
मुग्धटली मस्त पोस्ट. सातीजी
मुग्धटली मस्त पोस्ट.
पण आमच्या (प.महाराष्ट्र)साईड्ला ही आता परीस्थिती सुधारते आहे. आपणच विरोध करायचा या हुंडयाच्या अयोग्य रिती रिवाज रुढी परंपरांचा, नाहीतर थयथयाट करायचा(लग्नात नाही ,लग्न ठरतानाच) अशा लोकांसमोर तरच ते लोकलाजेसाठीतरी सुधारतील. ( प्रेरणा-- दावत-ए -इष्क) 
सातीजी ,खरच कोकणातल्या सारखी पद्धत सगळीकडे व्हायला हवी. कोकणात मुलींना मान असतो ,असे आमच्या शेजारच्या कोकणातल्या काकु सांगायच्या.
गूगलला हा बाफ वाचता येतो का ?
गूगलला हा बाफ वाचता येतो का ? बाफच्या उजव्या बाजूला शादी.कॉम ची जाहिरात दिसतेय

थयथयाट करायचा(लग्नात नाही
थयथयाट करायचा(लग्नात नाही ,लग्न ठरतानाच) >>
दूरच्या नात्यात एक लग्न ठरले. साखरपुडा साधा १५-२० माणसे एकत्र येवून देवळात करणार होती. एक आठवडा आधी मुलाने फोन करून मुलीला सांगितले आमचा आकडा १०० झाला आहे. कमावती मुलगी पण बर म्हणाली. टीव्ही शो मध्ये शोभेल असा साखरपुडा केला. अशा वेळी कोण काय म्हणणार.
Pages