विषय क्रमांक २ - 'राव आजोबा '

Submitted by जाई. on 29 June, 2014 - 18:00

" आईला आठवडयापुर्वीचा टाइम्स ऑफ़ इंडिया हवा आहे " एका भिजलेल्या सशीणीचा आवाज.

" दोन मिनिट थांब , देतो काढून " खणखणीत स्वरातील आवाज

" हं! , हा घे पेपर , नीट व्यवस्थित घेऊन जा, एक लक्षात ठेव पेपरची घड़ी मोड़ायची नाही , त्यावर काही लिहायचं नाही , डाग पाडायचे नाहीत आणि मुख्य म्हणजे काम झाल्यावर लग्गेच पेपर परत करायचा . काय समजलं का ? "

यावर भिजलेली सशीण ( पक्षी :: अस्मादिक ) काय बोलणार ! तिला तर कधी एकदा पेपर हातात पडतोय आणि पळून जातेय अस झालेलं. निवृत्त सैन्याधिकारी श्री दिनकर राव उर्फ़ राव आजोबा यांच्याशी झालेला हा अस्मादिकांचा पहिला आणि शेवटचा संवाद (?)

दरवर्षीची ऊन्ह्याळ्याची सुट्टी आजोळी घालवायची हा नेम ठरलेला. राव आजोबा तिथेच भेटले पहिल्यांदा . भेटले म्हणण्यापेक्षा भेटत गेले. कधी आई आजीच्या गप्पांमधून , कधी शेजारच्या 'आख्यायिकांमधून' तर कधी कडक शिस्तीच्या , नीटनेटकेपणाच्या गोष्टीमधून..

"श्री दिनकर राव "..., जवळपास सहा फूट उंची , निळसर समोरच्याचा ठाव घेणारे डोळे , मूळचा गौर पण रापलेला वर्ण, सैनिकी शिस्त असल्याने ताठ कणा ठेवून चालण्याची सवय ,करडा चेहरा .. अश्या वर्णनाच्या माणसाचं आणि आम्हा मुलांचं त्या वयात जमणं शक्यच नव्हतं. आम्ही कायम चार हात अंतर राखून राहिलो त्यांच्यापासून. त्यांनीही कधी स्वत प्रयत्न केले नाहीत. किंबहुना तो त्यांचा स्वभाव नव्हताचं. टिपिकल म्हातार्या लोकांची प्रेमळ , मायाळू वगैरे विशेषण त्यांच्यासाठी नव्हतीच.

राव आजोबा ओळखले जात ते त्यांच्या कडक शिस्तीसाठी आणि व्हिक्टोरियन इंग्लिशसाठी. मूळच्या शिस्तीच्या स्वभावाला ब्रिटिश सैन्यातील कारकिर्दीची जोड़ मिळाल्याने तो अधिकच धारदार बनलेला. मग त्याचे चटके साहजिकच इतरांना सोसावे लागत. खरेतर ह्या शिस्तीच्या संकल्पना सोप्या होत्या. ऊदाहरणार्थ रोजचं वर्तमानपत्र कस वाचावं , ते चुरगळू नये ,त्यावर डाग पडू नयेत, नीट घड़ी घालून ठेवावं याबातीत ते अगदी दक्ष असत . त्यांच्याकडचं महिन्याभराचं वर्तमानपत्रही व्यवस्थित दिसायच. त्यांचा घराचा एक कोपरा ख़ास त्यासाठी राखून ठेवलेला असे .इंग्रजी, मराठी वर्तमानपत्रांची चळत तिथे व्यवस्थित ठेवलेली असायची . त्या चळतीला हात लावायचा अधिकार अगदी माईना पण नव्हता. अश्या माणसाकड़े वर्तमानपत्र मागायला जाण म्हणजे एक दिव्य !

लोकांच्या मते तिरसट , खत्रूड असलेल्या या माणसाचं आजीच्या इमारतीतल्या इतर लोकांशी कधीही जमलं नाही. चाळीस जणांच्या त्या इमारतीत त्यांच फक्त माझ्या आजोळशी जमत असे . खरेतर स्वातंत्र्यसैनिक असलेले माझे आजोबा आणि ब्रिटिश सैन्याधिकारी असलेले राव आजोबा यांची ही युती अजब होती.त्यांच्या घरात आम्हा मुलांना मुक्त प्रवेश असायचा पण त्यांच्याबाबतीतल्या एकंदरित भीतीमुळे तिथे कामाव्यतिरिक्त पायही ठेवायला आम्ही कचरत असू .

सैन्यदलातून निवृत्त झालेल्या या माणसाचं घर सुखसोईनं समृद्ध असेल हा समज तिथे खोटा पडला होता.अगदीच अठरा विश्वे दारिद्र्य नसलं तरीही जेमतेम भागेल इतपतच त्यांची आर्थिक परिस्थिती होती. निवृत्तीचे पैसे नव्याने सुरु केलेल्या एका व्यवसायात बुडाले आणि घराला अवकळा आली असा उल्लेख आजीच्या बोलण्यात अनेकदा आला होता . मात्र त्या कुडमुड्या संसारातही त्यांच घर अतिशय लख्ख असे. याच मुख्य श्रेय माई ( राव आजी ) यांना द्याव लागेल. त्यांना सर्व माई म्हणत . मग आम्ही मूलही त्यांना माईच म्हणत असू . माई आणि रावआजोबा हे एक वेगळ मिश्रण होतं. रावआजोबा जितके तापट , चिडखोर , कडक तितक्या माई शांत , समजूतदार, प्रेमळ . राव आजोबांच्या हेकेखोरपणाचे , तिरसटपणाचे चटके त्यांना जास्त सोसावे लागले . पण कधीही आम्हाला त्या घरातून माईंचा चढ़लेला आवाज ऐकायला आला नाही. त्या वयातही दुधासारखी नितळ कांती,भरगच्च मऊसूत केस आणि सौम्य चेहरा असलेल्या माईंनी रावआजोबांचा कोंडयाचा मांडा असलेला संसार यशस्वी करून दाखवला.काही नवीन पदार्थ केला तर आजीची आणि त्यांची देवाणघेवाण मस्त चालत असे . या देवाणघेवाणची वाहक म्हणून मी खूपदा काम केलेलं आहे.

प्रभामावशीचं अकाली जाणं हा त्या दांपत्याला एक मोठा धक्का होता.वरवर दाखवलं नाही तरीही राव आजोबा मनातून खचले होते . माईनी तर हाय खाल्लेली . प्रभा मावशी त्या दोघांच एकुलत एक अपत्य ! लंड्नमध्ये असताना तिचा एका ब्रिटिश तरुणाशी परिचय झाला आणि त्यांनी लग्न करायचं ठरवलं. राव आजोबांचा या लग्नाला विरोध होता . वडिलांप्रमाणेच मानी असलेल्या प्रभा मावशीने त्यांच्या इच्छेचा मान राखला मात्र कधीही लग्न केल नाही. विमनस्क मनस्थितीतल्या प्रभामावशीचा चेहरा आजही आठवतो. ती कधीही कुणाशी बोलत नसे . एकटीच गप्प राहून एकांतात बसे . बिल्डिंग मधल्या इतर लोकांच्या मते तिच्या डोक्यावर परिणाम झाला होता . शेवटी अगदीच असह्य झाल आणि तिने आत्महत्या केली. या घटनेमुळे राव आजोबांवरचा तिरसटपणाचा शिक्का अगदी गडद झाला.

राव आजोबांची शिस्त हे एक प्रकरण होतं. मात्र ज्या कट्टरतेने , आटोकोटीने ते ती राबवण्याचा प्रयत्न करत ते सर्वानांच जमे असे नाही. त्यामुळे नेमका तिथेच घोळ होई. सोसायटीची मीटिंग आठ म्हणजे आठ वाजताच सुरु झाली पाहिजे,आठ वाजून एक मिनिटाचाही उशीर झालेला चालत नसे.मग उशीर झालेल्यांची हजेरी घेतली जात असे.वयामुळे कोणी काही बोलत नसले तरीही माणसं दुखावली जात.त्याची परिणिती किस्स्यात होई.
सर्व कागदपत्रे "नीट" व "नेमकी" असली पाहिजेत यावर कटाक्ष असे. यामुळे उड़णारे खटकेही नेहमीचेच होते .स्वच्छतेविषयीचं मतं,रोखठोक वागणं, काही नियमांबाबतचा आग्रह (!) यातली त्यांची मते अनेकांच्या पचनी पडत नसत. राव आजोबांच्या विक्षिप्तपणाचे किस्से मग चवीने चघळले जात. शेजारच्या "गप्पांतून" ह्या गोष्टी मुलांपर्यत पोचत. माझे आजोबाही त्यांच्या या वागण्यापुढे हताश होऊन बसत असत. सैनिकी जीवनातील शिस्त नागरी जीवनात जशीच्या तशी राबवता येत नाही हे आजोबांच म्हणणं त्यांनी कधी मनावर घेतलचं नाही. पुढे पुढे तर ह्या शिस्तीच्या अतिरेकाचं रूपांतर हेकेखोरपणात झाल. कौटुंबिक समस्या ,व्यवसायातील अपयश,वाढत जाणार वार्धक्य यामुळे त्यात अधिकच भर पडत गेली.

त्यांच्या 'चमत्कारिक' वागण्याचे असे भरपूर किस्से असले तरीही त्यांच्या व्हिक्टोरियन इंग्रजीबद्दल सर्वानांच कौतुक होतं . जुन्या वळणाचं ब्रिटिश हेल असणारं इंग्रजी ते बोलत असत.त्यात अनेक जुन्या इंग्रजी शब्दांचा समावेश असे. याला कारणीभूत सैन्याची कारकीर्दच. ब्रिटिश सार्जटांच्या तालमीत घोटवून तयार झालेलं ते इंग्लिश ऐकताना वेगळं काही ऐकल्याचा भास होई. माझ्या आईशी ते इंग्रजीमिश्रित मराठीत बोलत असत .आईच ,तिच्या शिक्षणाचं त्यांना जाम कौतुक असायचं. लहान असताना मी आईच शेपूट या वर्गवारीमध्ये मोडत असल्याने त्या कौतुकाच्या काही थेंबांचा वर्षाव अस्मादिकांवरही झाला होता .मात्र ह्या माणसाचं व आपलं काही जमणार नाही हे मनाशी घट्ट बसल्याने मी त्यांना घाबरूनच असे. पण एकंदरीतच त्यांच सफाईदार इंग्लिश बोलणं भारी वाटायचं.

राव आजोबांच्या इंग्रजीचा फायदा झाला तो वेगळ्या अर्थाने . या बाबतीत त्यांचे आमच्या कुटुंबावर अगणित उपकार आहेत. माझ्या बाबांच अकाली निधन झाल्यावर कौटुंबिक निर्वाहाची जबाबदारी आईवर येऊन पडली. बाबांच्या जागेवर आईला नियमाप्रमाणे नोकरी मिळणार हे नक्की होतं . पण बाबांच अकाली झालेल निधन ,त्याचा आईला बसलेला धक्का ,सरकारी खात्यातील नेहमीची दिरंगाई यामुळे वेळ लागणार अस दिसू लागलं. सर्व कागदपत्र देऊनही उशीर होणार अस दिसू लागताच बाबांच्या मित्रांनी कमिशनरला प्रत्यक्ष भेटा असा सल्ला दिला .पण त्या आयएएस दर्जाच्या अधिकार्याला भेटायचा, त्यांच्याशी बोलायचा अनुभव कुटूंबियांपैकी कोणालाच नव्हता. मामा , मावशी तर कॉलेजमध्ये शिकत असलेले. अशा वेळी धावून आले ते राव आजोबा ! सर्व परिस्थिती समजताच सर्व सूत्रे त्यांनी हाती घेतली. नेहमीच्या शिस्तीप्रमाणे सर्व कागदपत्र एका फाइल मध्ये नीट लावली आणि तडक दुसर्या दिवशी आईला घेऊन कमिशनरचं ऑफिस गाठलं. आपल्या ख़ास शैलीतल्या फ़र्ड्या इंग्रजीमध्ये त्यांनी आईला ही नोकरी मिळण का व किती गरजेचं आहे हे आयुक्तांना व्यवस्थित समजावून सांगितलं. ते अधिकारीही प्रभावित झाले असावेत.शेवटी चक्रं फिरली आणि पंधरा दिवसात आईच्या हातात जॉइनिंग ऑर्डर पडली .अर्थातच हे सर्व आम्हा मुलांना आईकडून नंतर कळालं. पण जेव्हा कळालं तेव्हा फणस काटेरी असला तरीही तो आतून गोड असतो याच प्रत्यंतर आलं .

ही घटना घडली तरीही आम्ही मुलं काही त्यांच्या जवळ आलो नाही . ती एक अदृश्य दरी कायम तशीच राहिली . मात्र आता त्या वचकात रावआजोबा सॉलीड भारी आहेत या गोष्टीची मात्र भर पडली.

पुढे जसा शाळॆतला अभ्यास वाढत गेला तस आजीकडे घालवायच्या सुट्टीचं प्रमाण कमी होत गेलं. नववी , दहावीत तर ते ही बंद झालं. परीक्षा ,मार्क्स , अभ्यास, मेरिट यामध्ये रावआजोबा हळूहळू विस्मृतीत जायला लागले. आणि एके दिवशी राव आजोबा गेल्याची बातमी आली. माई तर आधीच निघून गेलेल्या .. माईंच्या निधनानंतर राव आजोबा अधिकच एकाकी झालेले .त्यात प्रभामावशीच्या निधनाचा सलही.. हेकेखोर स्वभावामुळे नातेवाईकही गमावलेले. कोणीही सोबतीला नाही . फक्त माझ्या आजी आणि आजोबांचाच काय तो आधार . अखेरच्या क्षणी माझा मामा आणि एक किरण नावाचा मुलगा ज्याला त्यांनी शिक्षणासाठी आर्थिक मदत केलेली तेच सोबतीला..एकेकाळी ब्रिटिश सैंन्यामध्ये अधिकारपद भूषवलेल्या या वृध्दाच्या नशिबी शेवटी एकाकी जगणं आणि मरणं आलं.मात्र या वयातही त्यांचा मान , स्वभाव तसाच राहिलेला.

रावआजोबा गेले. लहानपणी कायम त्यांची भीती वाटत असली तरीही त्यांच्या जाण्याने मनात कुठेतरी वाईट वाटून गेलं.आधीही म्हटल्याप्रमाणे आम्हा मुलांमधलं आणि त्यांच्यातलं ते अंतर नेहमी कायम राहिलं. ते अंतर मिटावं म्हणून दोन्हीबाजूने प्रयत्न कधीच झाले नाहीत. एका सुरक्षित ठिकाणी राहूनच आम्ही अदमास घेत राहिलो ,किंबहुना तेच दोन्ही बाजूंना सोयीचं होत. त्यांनी आम्हाला कधी चॉकलेट ,गोळ्या दिल्या नाहीत पण कधी खेकसून बोललेही नाहीत. मात्र त्यांच्याभोवती असलेलं की आम्ही कल्पलेलं भीतीचं दडपण कायम राहिलं. आमच्यासाठी ते नेहमीच शाळेतल्या हेड्मास्तराच्या भूमिकेत राहिले.

काही माणसांशी आपला हवा तसा, नियमीत संवाद घडून येत नाही. पण त्या व्यक्तीचं अस्तित्व आपल्या आयुष्यावर एक अदृष्य तरीही ठळक असा ठसा उमटवून जातं. आठवणींच्या पडद्यावर, आयुष्याच्या रंगपटावर त्या किंचितश्या ठिपक्याची सूक्ष्म तरीही प्रकर्षाने जाणवणारी अशी नोंद झालेली असते. ती नोंद अगदी एखाद्या सूक्ष्मातिसूक्ष्म ठिपक्याएवढी असली तरीही कायम आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत राहते.

राव आजोबा हे त्या ठिपक्यासारखे होते.बाजूलाच राहत असलेले रावआजोबा पटकन घरी येऊन आपली शाळा घेतील या विचाराने आम्ही वर्तमानपत्र,घर, पुस्तकं नीट नेट्कं ठेवत असू. या वागण्याचा फ़ायदा घरच्यांना होत असल्याने त्यांनीही या गोष्टीला पाठिंबाच दिला. आजोळची ही शिस्त मग स्वतच्या घरीही सहजरित्या अंगात भिनत गेली.उत्तम इंग्लिश ऐकायची सवय त्यांनीच लावली.हे सर्व करताना आम्हा मुलांवर आरडाओरड कधीच झाली नाही. तो मान मोठ्यांचा असे.;) Proud त्यांच्या व्यक्तीमत्वातल्या जरबेनं, वागणूकीनं ते सार काही आपसूक अंगवळणी पडत गेलं.बोले तैसा चाले ही त्यांची अंगभूत वृत्ती असल्याने ते आतून मनातून पटतही गेलं..

आजही वर्तमानपत्राची घड़ी मोडलेली दिसली की नापसंतीची रेख कपाळावर उमटतेच.अश्यावेळी मग रावआजोबा आठ्वतात. तो करडा चेहरा , ती शिस्त आठवते आणि कळत नकळत हात मग त्या वर्तमानपत्राची नीट घडी घालण्यासाठी पुढे होतात ...

***

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.

आजोबांवरचा तिरसटपणाचा शिक्का अगदी गडद झाला >> खूप आवडले हे वाक्य. परीस्थीतीचा सर्वांगाने विचार न करता, त्या व्यक्तीचा दृष्टीकोन विचारात न घेता किती सहजपणे शिक्के मारत असतो ना आपण!

खुप आवडले राव आजोबा. जाई, त्यांच्याशी संवाद नसूनही त्यांचं इतकं निरिक्षण तुझ्याही नकळत तुझ्याकडून केलं जात होतं हे लेखातून सतत जाणवतंय. शेवट अगदी योग्य केलायस Happy

छान लिहीलंय. फक्त किश्श्यांच्या नुसत्या उल्लेखापेक्शा अजून तपशीलात किस्से हवे होते असं वाटलं.

सुंदर लिहिलयं जाई ! व्हिक्टोरियन इंग्लिश, ब्रिटिश सर्व्हिस आणि कडक शिस्त याबाबतीत माझ्या आजोबांशी साम्य असल्याने अगदीच जवळचा वाटला लेख.
>> मला सर्वात जास्त आवडलेलं व्यक्तीचित्रण.>> +१ Happy

तन्मय शेंडे , श्रीयू , मामी , राधिका थँक्स !

हो , राधिका . दोन माणसामध्ये साम्य दिसले की जवळची वाटू लागतात

जाई, त्यांच्याशी संवाद नसूनही त्यांचं इतकं निरिक्षण तुझ्याही नकळत तुझ्याकडून केलं जात होतं हे लेखातून सतत जाणवतंय. शेवट अगदी योग्य केलायस >>> +१

Pages