चावंड - कुकडेश्वर - ढाकोबा - दुर्ग - आहुपेघाट - गोरखगड - सिद्धगड - नारीवली घाट - भीमाशंकर
... केवळ ‘स्वप्नवत’ वाटावा, अश्या ५ दिवसांच्या ट्रेकची ‘मस्ती’ अंगात चांगलीच भिनू लागली होती. पहिल्या दिवशी कुकडनेराचा काळाकभिन्न पहारेकरी – ‘दुर्ग चावंड’ पाहून, आमची तुकडी डोंगरझाडीत दडलेल्या कोरीव वैभवापाशी – ‘श्री कुकडेश्वरा’च्या राउळी विसावली. दुस-या दिवशी ‘ढाकोबा’ शिखराचा अद्वितीय कोकणकडा पाहून, पुढं दुर्गम रानव्यात हरवलोच होतो. केवळ ढाकोबा देवाची कृपा, की गर्द झाडो-यातल्या ‘दुर्ग’ नावाच्या किल्ल्याची वाट सापडली. घनदाट पण शांत देवराईमधल्या दुर्गा देवीच्या मंदिरातल्या शांततेनं, अन् पावित्र्यानं आम्हाला तिथेच खिळवून ठेवलं. दमदार चाल, मैलोनमैल चालायला सरावलेले पाय अन् वजनास सरावलेले खांदे, सह्याद्रीच्या अंतर्भागात दडलेली दुर्गम गिरीस्थळे, ढाकोबा-दुर्गादेवीची माया, तहान लागली की वाघरू-styleनं पाणी अन् भुकेल्या क्षणाला गरमागरम रुचकर जेवण, दात थडथडवणारी थंडी अन् ताकदीनं रानवाटा तुडवायला मित्रांची साथ.... लयं खास!!!!!! वाचा पूर्वार्ध इथे: http://www.maayboli.com/node/41784
उत्तरोत्तर रंगत जाणा-या एखाद्या मैफलीसारखा, ट्रेकचा उत्तरार्ध अधिकंच जास्त खडतर, भन्नाट अन् कसदार असणार होता...
हातवीज ते डोणी गावच्या वाटेवर खास ठेवणीतले चढ-उतार
भटकंतीच्या तिस-या दिवशी पहाटेच उठलो. आज ‘दुर्ग’वरून निघून ‘हातवीज’ अन् ‘डोणी’ नावाची गावं गाठत, पुढे ‘आहुपे घाट’ उतरून ‘गोरखगडा’वर मुक्कामी पोहोचायचं होतं. प्रदीर्घ चालीसाठी अन् चढ-उताराकरता आम्ही हॅवरसॅक्सचे बंद आणि ह्ंटरशूजच्या नाड्या घट्ट बांधल्या. दुर्गादेवीला दंडवत घातलं अन् कूच केलं.
दुर्गा देवीच्या राईच्या बाहेर पडलं, की खाली पठारावर उजव्या बाजूला एक बारमाही विहीर आहे. पावसाळ्यांत या प्रांतात ढग मनमुरादपणे बरसतात, पाणलोट क्षेत्रातलं डिंभे धरण भरतं. पण, उन्हाळ्यांत मात्र इथल्या वाड्या-वस्त्यांत पाण्याचं खूपंच दुर्भिक्ष असतं. तेव्हा दुर्गा देवीच्या याच विहिरीच्या पाण्यावर ४ गावं जगतात. ‘हातवीजवाडी’ गाठली. हातवीजवाडीच्या पल्याड उभा उतार उतरून तासाभरात ‘हातवीज’ गाव गाठलं.
आता भटकंतीच्या पुढच्या टप्पात क्लिष्ट रचनेच्या निर्जन डोंगरद-यांमधून आपल्याला ‘डोणी’ नावाचं गाव गाठायचं असतं. हातवीजमध्ये गावकरी म्हणाले, “आता आसं बगा, रानात नव्या मानसाला वाट तर चुकू शकते... एकंच करा - पायाखालची मळलेली पावठी अज्जिबात सोडू नका. म्या सांगतो, ह्ये असं दरीच्या पोटापर्यंत उतरा, मग ही सगली दरड चढलं की आलंच की ‘डोणी’ गाव...”. हातवीज गावच्या शेताडीतून वाट दरीच्या टोकाशी पोहोचली. दरीत सुबाभळीचं रान होतं. उभा उतार उजवीकडे उतरत जात होता. पाय हुळहुळायला लागले, तरी उतार संपेना. अखेरीस वाट पोहोचली बुबरा नदीच्या पात्रापाशी. घोडनदीची ही उपनदी पुढे डिंभे धरणापाशी आपलं योगदान देते. नदीजवळ कातळावर पाठपिशव्या टेकवल्या. एकदम ‘वसूल’ ठिकाण! खरंच.. अशा निसर्गस्थळांच्या ओढीनंच पुन:पुन्हा सह्याद्रीकडे आपण वळतो..
बुबरा नदीच्यापुढे एक अस्सल ठेवणीतला करकरीत चढ आमची वाट बघत होता. एक एक पाऊल नेटानं चढत डावीकडून चढत गेलो. पुढं माथ्यावर दाट रानवा सामोरा आला. वाट निर्जन असल्यानं ‘आपण वाट चुकत तर नाही ना’, असं वाटंत होतं. हातवीज ते डोणी या पूर्ण वाटेवर ओळख पटावी, अश्या ठळक वैशिष्ट्यपूर्ण खूणा सांगणं अवघड आहे. बरं, ‘डोणी गाव - १ तास’, किंवा ‘उभा चढ. वळणांचा रस्ता. पाऊलं लवकर उचला’ अशा पाट्याही नाहीत. क्वचित वाटसरूंनी टाकलेल्या पान-सुपारीच्या पाकिटांवरून आपण योग्य ‘वाटे’वर असल्याचा दिलासा मिळे. एरवी प्लॅस्टीक कचरा निसर्गात टाकणा-यांच्या नावे बोटं मोडणा-या आम्हांला, आत्ता मात्र या कच-याचाच आधार वाटू लागला.
चढावरून दम खात मागं बघितलं, तर ढाकोबा-दुर्गपासून डोणी गावापर्यंतचा अत्यंत क्लिष्ट रचना असलेला भूप्रदेश डोळ्यांसमोर आला. हातवीजपासून सलग २ तास चालीनंतर डोणी गाव आलं. डोणी गावाला छानसं पठार लाभलेलं. गावामागं ‘काकुळ्या’ नावाचा डोंगर उठावलेला. इथं पाणी पुरेसं असावं, कारण शिवारात गहू - हरभरा तरारला होता. हरभ-याची निळसर हिरवी फुलं गळून पडून, तिथं टपोरी सालं आता दाणा भरायची वाट बघत होती.
बेत शिकारीचा - रानडुकरांच्या!
आजचं गन्तव्य अजूनही दूर होतं - ‘आहुपे’ घाट उतरून, पुढे गोरखगड चढायचा होता. डोणी गावात एक मामा म्हणाले, “आहुप्याला जायला एस.टी. मिळेल की १२ वाजता. चालत कशाला जाता..” पावसाळ्याचे चार महिने सोडले, तर घोडेगाव - डिंभे धरण – आहुपे अशी जायला एस्. टी. ये-जा करते. आहुपे फाट्यावर पाहतो तर काय, गावातले २५-३० गडी सोबत भाले, जाळी. काठ्या अन् बंदूका घेऊन जमा झाले होते. सोबत होती तगडी शिकारी कुत्री. आम्हाला बघून गणपतभाऊ म्हणतात कसं, “काय पाव्हणं.. येताय का शिकारीच्या - रानडुकरांच्या!... ही: ही:.. आता आसं बगा.. डुक्कर ह्ये रानातलं लय वंगाळ जनावर. बिल्कुल जुमानत नाही.. शेताची नासाडी करतंय. त्याचं कायेना, रानात नाही त्याला शत्रू कोनीपन..’’ अन्, गणपतभाऊ आम्हांला सांगू लागले शिकारीचं मंत्र-तंत्र... बख्खळ माजलेल्या रानात हे शिकारी लोक डुकरांच्या जागा धुंडाळून, एके ठिकाणी काठ्यांच्या आधारानं अडचणीच्या गचपणांजवळ जाळी रोवतात. ८-१० जणांचे गट करून तीन गट करून हे शिकारी लोक पांगतात. तीन दिशांना गेलेले तीन गट दाबत दाबत डुकराला जाळ्यापाशी आणायचं अन अडकवायचं. मग काय, भाले, काठ्या, प्रसंगी बंदुका वापरून डुकरास मारायचं. एका डुकरापासून मिळणा-या १००-१२५ किलो मांस-चरबीवर आख्खं गाव आठवडाभर निश्चिंतपणे जगतं. शिकारीचा थरार गणपतभाऊंच्या नजरेत दाटलेला होता...
‘ढगां’वरून उतरणारी आहुपे घाटाची घळ
शिका-यांच्या गप्पा आठवतंच एस्.टी.नं आहुप्याला गेलो. आहुप्याला खूप मोठं पठार लाभलं आहे. गावाबाहेर देवराई आहे. आहुप्यावरून ‘कोंढवळ’ मार्गे भीमाशंकर अशी बैलगाडी वाट आहे. केवळ अभयारण्यातून जाते, म्हणून इथे डांबरी रस्ता बनला नाहीये. अन् त्यामुळेच आज आहुप्याचं सौंदर्य टिकून आहे. आहुपे गावच्या पश्चिमेला कोकणात कडे कोसळले आहेत. या कड्यांना गावकरी ’ढग’ असं म्हणतात. आणि या ’ढगां’वरून उतरणा-या अनेक घळीपैकी एक ‘आहुपे घाटा’ची असणार होती म्हणे. पश्चिमेचं पठार तुडवलं.
आहुपे घाटाच्या घळीच्या प्रथम दर्शनानं पोरं खूष! ही घळ कशी उतरणार, हा विचार करत असतानाच, एक अस्सल ठेवणीतली वळणवाट आम्हांला घळीच्या डावीकडून अलगदपणे उतरली. डावीकडच्या डोंगराचा आधार घेत घेत, घळीचा ५०० मी. उंचीचा उभा उतार उतरलो. घशाला कोरड पडलेली.. अन् सामोरं आलं, ‘अमृत’ तुल्य पाण्याचं कातळकोरीव टाकं! अक्षरश: शेकडो वर्षं पांथस्थांची तृष्णा भागवणारं हे टाकं शरीराला आणि मनालाही खूप उभारी देऊन गेलं. दुरूनच ‘साजरी’ (खरंतर भीतीदायक) वाटलेली आहुपे घाटाची घळ, प्रत्यक्षात मात्र थंडगार झाडीतून अलगदपणे उतरवत गेली.
समोर गोरखगड आणि मच्छिंद्र सुळक्याची जोडी अफलातून उठावलेली! सह्याद्रीचं ते वैभव बघून अगदी अंगावर सुद्धा शहारा आला. प्रशस्त वाट जशी उतरत गेली, तसं पाय सागां-ऐनाच्या पाचोळ्यांत चुबूक-चुबूक करू लागले. अवघ्या दीड तासात खोपिवलीच्या शेताडीत पोहोचलो, पण पायांवर अजिबात ताण आला नाही. उभ्या घळीतून इतकी सुंदर घाटवाट शोधणा-या घाटकर्त्याच्या कौशल्याला मनोमन सलाम ठोकला.
पाठीमागे सह्याद्रीचं राकट रौद्र सौंदर्य उभ्या कातळकड्यांतून आणि असंख्य ओढ्यां-नाल्यांतून प्रकटलं होतं. (खरं सांगू, आत्ता हे लिहिताना सुद्धा ट्रेकचे ते क्षण परत अनुभवायला मिळावे, अशी हूरहूर वाटतीये..)
निसर्गचित्राला नजर लावणारी माणसांची घुसखोरी!
...खोपिवलीकडून पश्चिमेला सह्याद्रीकडे निघालं, की डावीकडची वाट आहुपे घाटाकडे, तर उजवीकडे दक्षिणेला वाट कातळटोपी घातलेल्या गोरखगडाकडे निसटते. दाट जंगलातून उठावलेल्या गोरख-मच्छिंद्रच्या कातळमाथ्यांकडे जसं आपलं लक्ष वेधलं जातं, तसंच गोरखगडाच्या गुहांना विद्रुप करणा-या पांढ-या रंगाकडेही लक्ष जातं. शेताडीतून राबणारे एक मामा म्हणाले, “कार्तिकी एकादशीची गोरक्षनाथाची यात्रा होती ना... दूरदूरहून लोकं येतात गडावर दर्शनाला!” आम्हालाही खूपसे लोकं, बाया-बापड्या, पोरं-टोरं गड उतरताना दिसत होते. गडावरच्या देवस्थानांमुळे गडाच्या वाटा राबत्या राहतात, पण बेशिस्त जनता मागं सोडत होती - फटाक्यांची खोकी, कचरा आणि रानातली शांतता गढुळणारा कल्लोळ! एक सुंदर निसर्गचित्र विस्कटू पाहणारी माणसाची ही घुसखोरी सून्न करून गेली...
मस्ती जिरवणारी गोरखगडाची कातळवाट!
... दोन-अडीच दिवसांच्या चालीनं पाय आता चढाई-उतराईकरता सरावले होते. आशूला तर खात्रीच, की अवघ्या दीड तासात आपण नक्की गोरखगडी मुक्कामांस पोहोचणार. पण आम्हांला कोणालाच कल्पना नव्हती, की पुढं कशी चढाई आमचं स्वागत करणार आहे ते.
गोरख-मच्छिंद्रचे सुळके एखाद्या ध्यानस्थ मुनींसारखे मख्खपणे उन्हांत तळपत होते. वा-याची मोजून एकंही झुळूकही येत नव्हती. ‘भीमाशंकर अभयारण्यात प्रवेश’ या पाटीजवळ वनखात्यानं अस्तित्व जाणवून दिलं. सह्याद्री मुख्य धारेपासून किंचित सुटावलेल्या गोरख-मच्छिंद्रच्या लगतच्या खिंडीकडे वाटचाल सुरू झाली. पण अपेक्षेपेक्षा ही वाट भलतीच खट निघाली. पाच-पाच पावलांवर थकून आम्ही थांबू लागलो. बेसुमार तापलेलं ऊन, जीभ अगदी कोरडी करणारा उष्मा, घामटं काढणारा चढ, पाठीवरचं मनसोक्त वजन... अहाहा बेत भलताच जमला होता. अखेर गुळाची चिक्की, पाणी, बिस्किटं, ग्लुकॉन-डीची साथ गोरखच्या खिंडीपर्यंत घेवून गेली.
खिंडीमध्ये लाकडी कोरीव काम केलेलं सुबक मंदिर पाहून, आता गडापेक्षा इथंच मुक्काम करूयात का, अशी पळवाट काढता आली असती. समोर गोरखचा माथा अजूनही १५०मी. आभाळात घुसला होता, अन् खरोखरंच आम्ही दमलो होतो. कसं कुणास ठावूक, पण ठरलं - आता माघार नाही, आज गडावर मुक्कामास पोहोचायचंच.
...गोरखचा शेवटचा टप्पा जरा अवघडच असणार होता. ६० अंशात झुकलेल्या कातळकड्यावर कोरीव पायर्यांची ही वाट! शिणावलेली तुकडी थोडं वारं खावून परत सज्ज झाली. आशूनं आघाडी घेत आखूड, पण उंचच उंच कातळटप्प्यांवर चाल सुरू केली. हृदयाचे ठोके वाढले होते - उभ्या चढामुळे आणि खाली खोलावत गेलेल्या दरीच्या दृष्यामुळेही! जड पाठपिशव्यांसह कातळातल्या अनगड टप्प्यांवरून वरवर सरकत होतो.
गोरखगडानं आमची परीक्षा घेतली होती, पण अखेरीस आमच्या जिद्दीला दाद देत गोरखगडाच्या वैशिष्ट्यपूर्ण कातळकोरीव प्रवेशद्वारानं आमचं स्वागत केलं. सह्याद्रीची विराट भिंत, अन् सिद्धगडामागे दडणारा सूर्य यांना साक्षी ठेवत गडावर शिवरायांचा जयघोष निनादला. मन विलक्षण प्रसन्नतेनं दाटून आलं होतं. डोळ्यासमोर सह्याद्रीची एकाच दिवसांत पाहिलेली नानाविध दृष्यं पिंगा घालत होती...
...गोरखगडावर पोहोचल्यावर पाय-या थेट जातात कातळमाथ्याच्या पोटातल्या विस्तीर्ण गुहांपाशी. गुहांजवळ पाणी आहे. अमितनं अफलातून थालीपीठं बनवली होती. रात्री गुहेबाहेर कितीतरी वेळ धम्माल गप्पा रंगल्या. चंद्राभोवती तारकांचा वेढा पडलेला, अवचित निखळणारी उल्का - सारं सारं भन्नाट! खरंच ट्रेकमधल्या असे क्षण खरंच अनमोल!
गोरखगडावरून सह्याद्रीचं रौद्र दर्शन
दिवस चौथा. क्षणाक्षणाला भटकंतीची नशा वाढतच चालली होती. धकाधकीच्या दिनक्रमापासून कोसोंदूर पोहोचलेल्या आम्हां चौकडीला पहाटेच जाग आली. पूर्वेला सह्यधार आणि सूर्यकिरणं अश्या तूल्यबळ शक्तींचा संघर्ष आता सुरू होणार होता.
सह्यधार उजळली, समोरच्या मच्छिंद्र सुळक्याचा माथा सूर्यतेजानं न्हाऊन निघाला. गडफेरीला निघालो. गोरखगडाच्या माथ्यावर जाण्याकरता पश्चिमेकडून कातळकोरीव पाय-या आहेत. उभ्या कातळावर उंचच उंच, पण अरुंद अश्या पावठ्या, अन् पाठीमागे खोल दरी यामुळे भीतीदायक आहेत. खोबणी उत्तम खोदल्या आहेत. काही ठिकाणी तर कातळात आरपार खोदलेल्या आहेत. १५० फूटाचा हा रॉकपॅच सावकाश पार करत प्रवेशद्वारापाशी पोहोचलो. पुढं तोकड्या माथ्यावर गोरखनाथांचं मंदिर आहे.
पूर्वेला सह्याद्रीचं अतिविराट ‘दर्शन’ घडतं. अगदी नाणेघाट, ढाकोबापासून आग्नेयेस सिद्धगडापर्यंत पसरलेला सह्याद्री डोळ्यांचं पारणं फेडतो!!! आहुपे घाट हा कोकण अन् देशाला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा. त्यामुळे आहुपे घाटाचं डोळ्यात तेल घालून पहारा करणारा ‘गोरखगड’ - हा खडा पहारेकरी.
कातळमाथा सावकाश उतरून गडप्रदक्षिणा घातली. ४-५टाकी, कोरीव गुहा आणि मूर्ती बस्स इतकंच!
मुक्कामाच्या गुहेत उपद्रवी वानरांनी काही खाण्याच्या आशेनं अमितची हॅवरसॅक टरकावली होती. गोरखगडाच्या खास आठवणींसोबत, हीदेखील आठवण सोबत घेवून, पाठीवर जड सॅक सांभाळत आम्ही गड सोडला. कातळपायर्यांवरची डोंबारी कसरत करत खिंडीत पोहोचलो.
इथून एक रानवाट थेट सिद्धगडाकडं निसटते म्हणे. आम्ही मात्र ‘देहरी’ गावची मळलेली वाट घेतली. गोरखला दक्षिणेकडून वळसा घालत, धारेवरून प्रचंड प्रचंड उताराची आणि घसा-याची ही वाट अखेरीस थेट देहरी गावाच्या डोक्यावर आली. शेवटी पाय खडखडत, रखडत रखडत देहरीत पोहोचलो. भूकेल्या पोटाला गरमागरम कांदापोह्यांचा खुराक, अभिला भारत-श्रीलंका क्रिकेटचा स्कोअर, घरी खुशालीचा फोन, भटक्यांच्या नोंदवहीत आपल्या गटाचं नाव, त्यासोबत गावकर्यांच्या कौतुकाच्या नजरा असे सोपस्कार पार पाडले. चार दिवसांनी प्रगत जगाचा प्रथमंच स्पर्श झालेला…
सदाहरित रानातून आली सिद्धगडाची साद!
...टळटळीत दुपारच्या झळा झेलत देहरी – नांदिवली - म्हसे रस्त्यावर आमची चौकडी मार्गस्थ झाली. सह्यधारेपासून किंचित सुटावलेला, अन् पायथ्यापासून ८०० मी उठावलेला सिद्धगड भव्य दिसत होता. गडाची माची ५०० मी उंचीवर, तर त्यावर ३०० मी उंचीचा बालेकिल्ला उठावलेला. डावीकडची बैलगाडीवाटेनं काकडमळा, शिंदेवाडी अश्या वस्त्या मागं टाकल्या. तासाभरात रानाच्या दाटव्यातून सह्याद्रीचा चढ चढू लागलो. हवा दमट, निर्जीव, भकास होती. सदाहरित रानात वृक्षलतांचा दाटवा असूनही, कोकणातल्या उन्हामुळे घामटं निघत निघत होतं. मोठ्या आकाराच्या कोळ्यांनी आपल्या सावजासाठी ’जाळं’ ताणून धरलं होतं. पण ‘मोहपाशा’त न अडकता, आम्ही नारिवली/नारमाता/सिद्धगड घाटाची मळलेली वाट मनमुरादपणे ‘एन्जॉय’ करत होतो. वाट अलगद चढत होती, सिद्धगड लिंगीच्या (सुळक्याच्या) दिशेनं. डावीकडं कातळकडे, झाडीभरले टप्पे, ओढ्यां-धबधब्यांच्या ‘पाऊलखुणा’, कारवीचे भरलेले माथे अश्या अंगभूत खुब्यांसह पश्चिमघाट उजळला होता.
...कातकर्यांची वाडी दृष्टीक्षेपात आली. उभ्या रानात राहणा-या या गिरीजनांमुळेच असंख्य दुर्गम वाटा वापरात राहिल्या, याबद्दल कृतज्ञता बाळगली पाहिजे. मोठ्या-मोठ्या पानांचा कढिलिंब आणि मोळ्या बांधायला वापरायच्या वेली घेऊन निघालेले बाप्ये भेटले. “सिद्धगडाची वाट कशी हो गावायची तुम्हांस्नी. वाडीतनं घ्या एखांदा वाटाड्या.” सल्ला तर ऐकून घेतला, पण आपल्यालाच वाट सापडेल असं वाटत होतं. एकटीच खेळणारी कातक-यांची लहान पोरं आणि चूल पेटती राहण्यासाठी रानात काही-बाही ढुंढाळणारे त्यांचे माय-बाप, यांना मागं ठेवत पावलं झपाझप उचलली.
डोक्यावर सिद्धगड लिंगी आली, तसं मधल्या घळीतून खळाळत निघालेल्या ओढ्यानं साद घातली. ऐन डिसेंबरात भरपूर पाणी भरल्या ओढ्यानं शिणलेल्या पायांना, डोळ्यांना थंड केलं. समोर सिद्धगडचा बालेकिल्ला असलेला उभा कातळमाथा आभाळात घुसलेला. आता १०० मी. अजून चढल्यावर, डावीकडे भीमाशंकर अन् उजवीकडे सिद्धगड, असा फाटा आला. जवळच्या पुरातन मूर्ती अवशेष अन् सिद्धगडाचं द्वार पार करत अखेरीस ‘सिद्धगडवाडी’ गाठली. सिद्धगड गाठण्यासाठी आम्ही ज्या वाटेनं चढलो, ती नारीवली घाटाची वाट थोडी लांबची. जवळची वाट पश्चिमेच्या बोरवाडीतून डे-याच्या कातळावरून शिडीवरून येते..
...बोरवाडीवरून आठवलं, सिद्धगडाची १९४२ च्या स्वातंत्र्यसंग्रामातली एक थरारक, पण हृद्यद्रावक आठवण जपणारं एक स्मारक बोरवाडीला आहे. सिद्धगडावर हुतात्मा झालेल्या क्रांतिकारक भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांची आठवण जागवणारं हे स्मारक आहे. (थोडक्यात कथा: एल.एल.बी झालेल्या भाईंनी देशप्रेमाने प्रभावित होउन स्वतःला देशकार्यास वाहून घेतले. शेतकरी, आदिवासी यांच्यासाठी झटत असलेल्या भाईंनी सशस्त्र क्रांतिचा मार्ग अंगीकारला. भाई कोतवाल व त्यांचे साथीदार हे संदेशवहन व विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा तोडून, इंग्रजांची दळणवळण व्यवस्था कोलमडून टाकण्यासाठी तारा वाहून नेणारे डोंगरांवरचे मनोरे पाडत असत. १ जानेवारी १९४३ रोजी एका फितुराने दिलेल्या खबरीवरून पोलीस अधिक्षक हॉल स्वतः जातीने १०० सशस्त्र पोलीस घेऊन सिद्धगडावर आला आणि त्याने गडाला वेढा घातला. गडावरील क्रांतिकारकांना दूध देण्यासाठी जाणाऱ्या गवळ्याचा पाठलाग करत पोलिस गडावर पोहचले व त्यांनी गोळीबार सुरू केला. भाई आणि हीराजी पाटील यानी मोठ्या शिळेआड लपून अखेरपर्यंत प्रतिकार केला. दोन तास झालेल्या चकमकीनंतर भाई व हीराजी यांना हौतात्म्य प्राप्त झाले. जखमी भगत मास्तर तिसऱ्या दिवशी शहीद झाले. – साभार: Wikipedia)
...सिद्धगडाची ही आठवण जागवत ‘सिद्धगडवाडी’मध्ये पोहोचलो. वाडीतून सिद्धगडचा कातळमाथा ३०० मी. झेपावलाय. आजच्या दिवसात गड बघून, मुक्कामास वाडीमध्ये पोहोचायचं होतं. शाळेत गुरुजींनी आपुलकीनं चौकशी केली आणि शाळेत मुक्कामाला परवानगीपण दिली. १९६२ ला सुरू झालेल्या ह्या शाळेच्या गुरूजींच्या चिकाटीचं मनोमन कौतुक वाटलं..
‘‘...वाट एकच आहे, पण ठळक नाही. लवकर निघा आणि पावठी सोडू नका. तर ६ वाजेपर्यंत याल परत. वाटेत स्वामीजी पण भेटतील...”, गुरुजी सांगत होते. वाडीतून गडाकडे बघितलं, तर फक्त आणि फक्त कातळ दिसत होता. मात्र त्यातून वाट कशी असेल, याचा काहीच अंदाज लागेना. आणि हे स्वामीजी कोण, याचीही उत्सुकता होती. मोठ्ठ्या आंब्यापासून १५ मिनिटांत एका सातवाहनकालीन गुहेपाशी पोहोचलो. प्राचीन गुहेला चकाचक रूप देऊन एका साधूनं बस्तान बांधलंय. इथपर्यंतची वाट गावकर्यांनी चांगल्या अवस्थेत ठेवली होती. स्वामीजींची राहण्याची गुहा म्हणजे अफलातून प्रकार होता. प्राचीन ‘विहारा’स (निवासी गुहा) आता चकाचक रूप दिलेलं होतं. भरपूर सरपण, आरामशीर बिछाना, स्वयंपाक साहित्य, जवळंच पाण्याची २-३ टाकी, सारवलेली जमीन अशी भन्नाट जागा! आम्ही सगळे त्या ठिकाणाच्या प्रेमातच पडलो. स्वामीजींनी आमचं स्वागत केलं आणि त्यांची गुहा दाखवली. अजून थोडं वर दुसरी एक सातवाहनकालीन गुहा आहे. आशूनं आणि अभिनं लग्गेच ठरवलं – सिद्धगडवाडीच्या साधूला स्पर्धा म्हणून या वरच्या गुहेत आपण बस्तान मांडूयात... आता परमेश्वरंच भोळ्या गावकर्यांचं रक्षण करो!!!
...स्वामीजींच्या वहीत आमचं नाव नोंदवलं अजून एक भटके सिद्धगडला भेट देणारे म्हणून. “गडाचा माथा चढायला एक तास लागेल.” इति स्वामीजी. त्यांना निरोप देवून गडाची अवघड वाट चढू लागलो. वाट कसली ती! पावलागणिक उभी होत, कधी तुटक्या कातळपाय-या, गवताळ घसरडे टप्पे अश्या अस्सल अस्त्रांनी प्रहार करत आम्हांला बिचकवत होती. माथ्याजवळ तर फारच दुर्दशा... म्हणजे, आम्हांला उतरताना भलतीच मज्जा येणार होती. दमवणारा, बिचकवणारा उभा चढ चढून तासाभराच्या झुंजीनंतर आम्ही सिद्धगडाच्या माथ्यावर पोहोचलो. सह्याद्रीचं एक अनोखं दर्शन - भीमाशंकर, माथेरान सह्यधारेच्या विस्तृत दर्शनानं आम्ही खुळावलो. माथ्यावर मोजक्या जुन्या वास्तूंचे अवशेष, जुनी टाकी, बख्खळ माजलेलं गवत अन् कमालीची शांतता! धो-धो पाऊस, अव्याहत वाहणारा वारा, तळपतं ऊन अशा ऋतूचक्राच्या नाना कळा आणि छटा अंगावर झेलत झेलत, सिद्धगड शेकडो वर्षं इथेच असाच खडा आहे. जागा फार मोक्याची. समोरच्या सिद्धगडघाटावर अन् आसपासच्या विस्तृत परिसराची राखण करण्यासाठी ’सिद्ध’ उभा आहे. गडावर आज पाणी नाही. राहण्यासारखी योग्य जागा अजिबात नाही. गडावर गावकरीसुद्धा फारसे फिरकत नसावेत. त्यामुळे उन्हं कलंडायच्या आतंच, त्या उभ्या घसरड्या उतरंडीवरून वाडीत पोहोचायचं दिव्य पार पाडलं. वाडीतून निघून गडाच्या भेटीला साधारणत: अडीच-तीन तास हवेत.
स्वच्छ आणि नेटक्या सिद्धगडवाडीत ‘‘सांज ये गोकुळी, सावळी सावळी ’’ असा सांजप्रहर सजला होता. शाळेच्या पटांगणासमोर स्वच्छ सारवलेलं पटांगण, धूसर जाणवणारी गडाची कातळधार, आकाशगंगेच्या धूसर पट्ट्यात खुलून दिसणा-या चांदण्यांनी आकाशात धरलेला फेर, वाडीतल्या आंब्या-फणसां-सागांमधून, शेता-शिवारा-गोठ्यांमधून घुमत येणारा वारा...सारं सारं काही धुंद करणारं!!!
भीमाशंकर अभयारण्यात बिबट्याचे आगंतुक पाहुणे!
आणि उजाडला आमच्या भटकंतीचा पाचवा आणि शेवटचा दिवस! पहाटे फटफटायच्या आत शाळेच्या मुक्कामाचा परिसर स्वच्छ करून वाडी सोडली. कोबड्यांच्या आवरण्यानं लहान पोरं जागी होत होती. गावातलं विपुल पाणी, पठारामुळे वा-याच्या तालावर पिकं डोलतात. धुवांधार पावसांत, वादळी वा-यातंही ही चिवट माणसं सिद्धगडाच्या मायेनं रानात टिकून राहतात. वाडी सोडताना पाय अंमळ जडच झाले होते ते सिद्धगडाच्या थरारक भेटीमुळे, की भाई कोतवालांच्या हृदयस्पर्शी आठवणीनं, गुरुजींच्या आपुलकीनं की लवकरंच भटकंती संपणार या हुरहुरीमुळे... कोणास ठावूक!!!
पुन्हा येण्याचा निर्धार करत, झपाझप पावलं टाकत आल्या वाटेनं नारिवली घाटाची वाट पकडली. सिद्धगडाच्या प्रवेशद्वारापाशी नारमातेच्या देवळीपाशी विसावलो. सकाळच्या वेळी समोर होता - सह्याद्रीचा उभा पहाड, उजवीकडे माथ्यावर सिद्धगडाची लिंगी अन् पाठीमागे खुद्द सिद्धगड! वळणा-वळणांच्या वाटेनं अर्ध्या तासात माथ्याकडून येणा-या ओढ्यांच्या तीन मोठ्या घळी पार केल्या. इथे समोरची वाट सोडून, उजवीकडे सह्याद्रीच्या खड्या धारेकडे वळलो. घाटवाट आता कारवीतून पुढे सरकू लागली. छातीचा भाता ‘हाफ-हूफ’ करू लागला. घाटवाट मंद वळणं घेत घाटमाथ्यावरून घळीत उतरू पाहणा-या सूर्यकिरणांपाशी पोहोचली. अन् आम्ही पोहोचलो घाटमाथ्यावर! समोर होतं भीमाशंकर अभयारण्याचं अप्रतिम जंगल! सदाहरित रानटप्प्यांतून जागोजागी वाहणारे ओढे, हवेतला सुखद गारवा घाट चढण्याचे सारे श्रम नाहिसे करून गेला.
दमदम्या डोंगराला रामराम करत पुढे आहुपे – कोंढवळ - भीमाशंकर अश्या बैलगाडीवाटेवरचा ४-५ तासांचा प्रवास केवळ अप्रतिम. अभयारण्याच्या नियमांनुसार डांबरी न होवू शकल्यानं बचावलेला हा रानाचा तुकडा डोळ्यांचे पारणे फेडतो. प्राणी निरीक्षणाचे मनोरे, कृत्रिम पाणीसाठे, वन्यजीवांचे पायांचे ठसे आपल्याला जाणीव करून देत राहतात की आपण बिबट्याच्या रानांतले आगंतुक पाहुणे, तेव्हा त्याला न दुखावता त्याच्या अरण्याचं मनापासून कौतुक करणं, हेच योग्य! सिद्धगडवाडीपासून ७ तासांच्या दमदार चालीनंतर भीमाशंकराच्या राउळात नतमस्तक होताना, ऊर अभिमानानं भरून आलं...
कसदार अनुभव देणारी सह्याद्रीची भटकंती!
डोळ्यांसमोर सह्याद्रीची नानाविध दृष्यं पिंगा घालत होती. शहराचं वारं पोहोचलं नाही अश्या दुर्गम भागांत, टोल-जकात न भरता पायगाडी काढून सुसाट निघालो होतो. सामोरा आला सखा सह्याद्री! दुर्गडोंगर – दरेंदुर्कुटे – कडेकपारी – ओढेनाले – धबधबे – झाडी – कातळकडे – नद्या – वृक्षलता - वन्यजीवांनी नटलेला, सजलेला, बहरलेला..
दुर्ग-ढाकोबाच्या परिसरातला अस्पर्शित गहनगूढ दाटवा, हातवीजसारखं टुमदार गाव, बुबरा नदीचा नीतळ डोह आणि तिथली मनस्वी शांतता, डोणी गावातल्या बेडर शिकारी लोकांच्या डोळ्यांतली शिकारीची चमक, आहुपे गावाचं विस्तीर्ण पठार, आहुपे घाटातली मायेची छाया अन् ‘अमृत’तुल्य पाणी, आहुपे घाटातून कोसळलेली सह्याद्रीची रौद्रभीषण भिंत, गोरखगडाची दमवणारी कातळवाट, सिद्धगडाची प्रदीर्घ फसवी वाट अश्या रानवाटा, त्यांवर रंगलेल्या गप्पा, निसर्गदृष्यं, गावकर्यांचं आतिथ्य अश्या झकास अन् जबरदस्त अनुभवाचं देणं देणारां - सह्याद्री!
घरी आराम सोडून रानोमाळ उंडारणा-या आपणां समविचारी आणि खरंतर समव्यसनी भटक्या मंडळींना सह्याद्रीच्या या दुर्ग-डोंगरांवर असं काही प्रलोभन आहे म्हणून सांगू. सगळा मोकळा वेळ ट्रेक्समध्ये आणि उरलेल्या वेळेत पुढच्या ट्रेक्सचे वेध लागलेले असतात. सह्याद्री भरल्या हातांनी कसदार अनुभवांचं देणं देतोच... देतंच राहतो! आपली ताकदंच तोकडी पडते, या सा-याचा आस्वाद घ्यायला.
मग...का़ढतांय ना तुमची (पाय)गाडी सह्यदर्शनासाठी!!!
(उत्तरार्ध)
ऋणनिर्देश: काही प्रकाशचित्रांचे श्रेय श्री. अमित चिल्का यांना आहे.
--- Discoverसह्याद्री (साईप्रकाश बेलसरे)
थरारक अनुभव share केल्याबद्दल
थरारक अनुभव share केल्याबद्दल धन्यवाद
आणि त्रिवार मुजरा तुमच्या धाडसाला आणी तुम्हाला
जबरदस्त भटकंती. फोटु जरा
जबरदस्त भटकंती.
फोटु जरा गंडलेत वाटतं. फार स्ट्रेच झाल्यासारखे / पिक्सेल फाटल्यासारखे दिसत आहेत.
की मलाच असे दिसत आहेत काय माहिती.
क.....मा....ल!!! अफ्फाट...
क.....मा....ल!!!
अफ्फाट... शब्दच नाहीयेत माझ्याकडे..
प्रचंड अभिमान, आनंद, हुरहुर, आठवणी... असं काय काय झालं माझं हे वाचताना...
धन्यवाद!
आहुपे, गोरखगड, सिद्धगडला आमची
आहुपे, गोरखगड, सिद्धगडला आमची पायगाडी गेली असल्याने वरिल थराराची मजा पुन्हा अनुभवता आली. अप्रतिम भटकंती.. सुंदर लेखन
काय थरारक अनुभव आहेत एकेक !
काय थरारक अनुभव आहेत एकेक !
फार सुरेख लिहिलं आहे! अतिशय
फार सुरेख लिहिलं आहे! अतिशय आवडलं.
अजूनही लिहा.
म स्त भटकंती.. अहुपे
म स्त भटकंती..
अहुपे घाट,गोरखगड,सिध्ध्गड म्हणजे पावसाळ्यातला स्वर्गच...
अहुपे घाट ते भीमाशंकर
अहुपे घाट ते भीमाशंकर ट्रेकवेळी घाट चढतांना आम्हांलाही गोवा गुटख्याच्या रॅपर्सनी वाट दाखवली होती
सुंदर लेख, वर्णन.. आता पुढील रेंज ट्रेक वर्णन वाचण्याच्या प्रतिक्षेत...
@झकासराव: खरंय.. यावेळी
@झकासराव: खरंय.. यावेळी प्र.चि. टाकताना जरा जास्तच आणि परत परत खटपट करावी लागली. त्यात प्र.चि. गंडले असू शकतील. क्षमस्व!
@आनंदयात्री: भटकंतीचे अनुभव
@आनंदयात्री: भटकंतीचे अनुभव जस्सेच्या तस्से तुमच्यापर्यंत पोहोचले, हे वाचून छान वाटलं. धन्यवाद!
@vinayakparanjpe @झकासराव @इं
@vinayakparanjpe
@झकासराव
@इंद्रधनुष्य
@दिनेशदा
@रोहित ..एक मावळा
@हेम
@शैलजा
अनुभवी ट्रेकर मित्रांची दाद ही फारंच मोलाची! अजून भारी ट्रेक्स करायला, ते शब्दबद्ध करायला हुरूप येतो.
...कधीतरी रोजच्या रूटीनमध्ये तोचतोचपणा वाटू लागला,
तर हे अनुभव परत एकदा ट्रेकच्या त्या क्षणांपाशी घेऊन जातात.. फसलेले अन् जमलेले ट्रेक्स, जुने ट्रेकर मित्र, सह्याद्री, दुर्ग.. असं बरंच काही मनात रुंजी घालू लागतं.. विलक्षण हूरहूर वाटू लागतं..
अश्या वेळी काही नाही, फोन उचलून पुढच्या ट्रेकचा बेत लग्गेच ठरतो..
आवडलं.
आवडलं.
अप्रतिम लिखाण ...वाचताना जणु
अप्रतिम लिखाण ...वाचताना जणु काही तुमच्याबरोबरच असल्याचा भास झाला...खास करुन सिद्धगडचा (उत्तरार्ध) भाग...मनापासुन आवडले..
बंकापुरे.