शब्दवेध व शब्दरंग (४)

Submitted by कुमार१ on 2 October, 2024 - 02:13

भाग ३ :
https://www.maayboli.com/node/84791
* * * * * * * * * * * * *

तीन वर्षांपूर्वी चालू केलेला हा धागा आता चौथ्या भागात पदार्पण करतो आहे. त्यानिमित्त इथे चर्चेस नियमित येणाऱ्या सर्व माबो परिवाराचे मनापासून आभार !

विविध शब्दांची रोचक माहिती, व्युत्पत्ती आणि अर्थपूर्ण व मजेदार चर्चेमुळे शब्दांच्या विश्वातली ही सफर नक्कीच रंगतदार होते.
धागा संयोजनात एक सुसूत्रता असावी म्हणून पूर्वी केलेल्या काही सूचना पुन्हा एकदा :

१. हा मराठी भाषा विभागातील धागा असल्याने इथे फक्त मराठी शब्दच चर्चेला घ्यावेत. अर्थात अशा शब्दाच्या व्युत्पत्तीच्या चर्चेमध्ये आंतरभाषिकता येईलच; त्याचे स्वागत आहे.
( सर्व बिगर मराठी भाषांमधील शब्दचर्चेसाठी अन्य धागे उपलब्ध आहेत )

२. एखाद्या सभासदांनी नवा शब्द चर्चेस घेतल्यानंतर पुढील २० तास त्या शब्दासाठी राखून ठेवूयात. त्या दरम्यान पुढचा शब्द घेऊ नये. ही मुदत संपल्यानंतर त्यावर कोणतीही चर्चा झाली नसेल तरी नवा शब्द जरूर घ्यावा.

सहकार्याबद्दल धन्यवाद आणि चौथ्या भागात सहर्ष स्वागत . . .
Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

होड संस्कृत पुल्लिंगी शब्द आहे ज्याचा अर्थ तर, नाव (बोट अर्थाने) होतो. कदाचित त्याचे स्त्रीलिंगी रूप असावे.

आंबा
फळांचा राजा हे त्याचे पर्यायी नाव सर्वपरिचित. परंतु त्यासाठी दोन अन्य ५अक्षरी नावे देखील सापडली. त्यापैकी एक फक्त आंब्यासाठी असून दुसरे तीन-चार फळांसाठी सामायिक आहे.

बघा थोडा विचार करून नाहीतर खाली बघा
..
..
..
..
१. अच्युतफळ [सं. चूतफल]
२. अमृतफळ
= पेरू, आंबा, द्राक्ष, बेदाणा, खिसमिस वगैरे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अलबत्या- गलबत्या
मूळ शब्द अलबत्. मोठ्या लोकांच्या प्रत्येक विधानास अलबत म्हणजे हे असेच आहें असे म्हणून माना डोलावणारे, होयबा, हाँ जी हाँ जी करणारे ते अलबते. मराठीतील द्विरुक्ती करण्याच्या पद्धती प्रमाणे अलबते-गलबते. सोमाजी गोमाजी, नगण्य माणसे.

छान
* सोमाजी गोमाजी >>> यांचे 'आडनाव' कापशे कसं काय आलं हे कुणाला माहिती आहे का ?

दाते शब्दकोशात अलबत्यागलबत्या व वरच्या अन्य शब्दांचा अर्थ वेगळा आहे. कोणीहि; कोणीतरी; भलतासलता; साळकोगीमाळकोजी; गोमाजीसोमाजी; यःकश्चित्, लुडबुड्या माणूस; अलतुफालतु;
इंग्रजीतलं Tom, Dick and Harry

असा शब्द आहे, हेच मला माहीत नाही. या नावाचं एक बालनाट्य होतं , एवढं आठवतंय.

सोमाजी गोमाजी >>> यांचे 'आडनाव' कापशे कसं काय आलं हे कुणाला माहिती आहे का ? >>> ती एक बालकथा आहे ना? त्याचं शरीर कापसासारखं असतं, तो एकेक अवयव काढू शकतो वगैरे. छान छान गोष्टी कॅसेटमध्ये आहे दिलीप प्रभावळकरांच्या आवाजात.

Screenshot_20250217_180736_WhatsApp.jpg

संयोजक,
वा ! खूपच सुंदर.
वाट पाहतोय दिनाची ...

कुरुची (कु- रुची)
सुरुची हा शब्द नेहमीच्या वापरात आहे परंतु कुरुची हा सहसा वापरात नसलेला सलग शब्द खालील वाक्यात वाचनात आला :

“अमेरिकी वाचकाची कुरुची अजून फ्रेंच वाचकांच्या कुरुचीच्या पातळीवर पोचलेली नाही”.

कुरुची छान.

कुयोग हा एक शब्दही असाच. सुयोग वापरात येतो, कुयोग विशेष नाही.

या उलट कुख्यात हा सुख्यात पेक्षा जास्त प्रचलित आहे.

* कुख्यात +1

'ख्यात'ला वेगळा सु लावायची आवश्यकता आहे का ?

हो, ख्यातनामही.
सुविख्यात म्हणतात पण.
तसंच कुरुपचं विरुद्धार्थी रूप 'सुरूप' न होता सुस्वरूप होतं.

सुप्रसिद्ध - कुप्रसिद्ध दोन्ही सारख्याच प्रमाणात रूढ असावेत त्यामानाने.

Happy छान चर्चा. कुरुची नैसर्गिक वाटत नाहीये, सवय नसल्याने असेल.

काल एका पुस्तकात आभासा ऐवजी 'प्रतिभास' वाचला. झेंडुची फुले - केशवकुमार

छान चर्चा.
सु आणि कु वरुन एक वेगळे आठवले :

अनेक शब्दांच्या आधी प्र लावून नवे शब्द तयार झाले आहेत. परंतु प्रत्येक वेळा त्या प्र ची आवश्यकता असते का, असा प्रश्न मागे काही लेखकांनी उपस्थित केला होता.
( शिक्षण / प्रशिक्षण, इ. )

? मूळ शब्दाला निव्वळ जोर येण्यासाठी . . .

पण शब्दांचे अर्थ बदलतात ना?
शिक्षण = education
प्रशिक्षण = training

स्थान - प्रस्थान, भाव - प्रभाव, कृती - प्रकृती, वृत्त - प्रवृत्त, सिद्ध - प्रसिद्ध सगळे अर्थ बदललेले आहेत.

उपसर्ग कुठे अर्थ बदलतात, कुठे तो अधिक ठळक करतात, कुठे अर्थ विरुध्द करतात, कुठे अधिक माहिती देतात, कुठे काहीच करत नाहीत. अर्थ बदलतात याची उदाहरणे वर झाली.
अधिक ठळक करणे: शुद्ध - विशुद्ध.
उलट अर्थ करणे: श्रांत - विश्रांत
अधिक माहिती देणे: प्रसिद्ध - सुप्रसिद्ध - कुप्रसिद्ध (प्रसिद्ध आहे पण, सु की कु सांगणे.)
काहीच न करणे : ख्यात - प्रख्यात (?)
वरच्यासाठी इतर उदाहरण किंवा उपसर्ग या व्यतिरिक्त अजुन काय करतात भर घाला.

प्र
एक उपसर्ग; हा उपसर्ग शब्दांस लागून पुढील मुख्य अर्थ होतात-(अ) अधिक गति. (आ) आधिक्य; प्रकर्ष; अतिशयता (फार, पुष्कळ इ॰)श्रेष्ठता; उच्चपणा. [सं.]

दाते शब्दकोश

उपसर्ग : https://bruhadkosh.org/words?shodh=+%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%B0...

ख्यात - प्रख्यात >> इथे प्रकर्षाने ख्यात असा अर्थ अभिप्रेत आहे. वरती कुमार सरांनी वेगवेगळे अर्थ दिलेच आहेत, आत्ता पाहिले.

अछा धन्यवाद. उपसर्गांविषयी वरील माहिती सरांनी सांगितलेली लक्षात राहिली. अर्थात बदल होत नाही याचे उदाहरण आठवत नाहीय. संस्कृतमध्ये रुह् आणि आरुह् यात बहुतेक अर्थात बदल होत नाही (नक्की आठवत नाही), पण मराठी उदाहरण अजिबात आठवत नाहीय.

हा जोडशब्द देखील :

कराळ विकराळ
वि. भयंकर; भीतिदायक. [सं. कराल द्वि.]

दाते शब्दकोश

धन्यवाद.

काल वंश या शब्दाचा वेगळा अर्थ कळला. वंशवृक्ष, वंशवन असे शब्द प्रयोग होते.
वंश = बांबू/वेळू.

Pages