शब्दवेध व शब्दरंग (४)

Submitted by कुमार१ on 2 October, 2024 - 02:13

भाग ३ :
https://www.maayboli.com/node/84791
* * * * * * * * * * * * *

तीन वर्षांपूर्वी चालू केलेला हा धागा आता चौथ्या भागात पदार्पण करतो आहे. त्यानिमित्त इथे चर्चेस नियमित येणाऱ्या सर्व माबो परिवाराचे मनापासून आभार !

विविध शब्दांची रोचक माहिती, व्युत्पत्ती आणि अर्थपूर्ण व मजेदार चर्चेमुळे शब्दांच्या विश्वातली ही सफर नक्कीच रंगतदार होते.
धागा संयोजनात एक सुसूत्रता असावी म्हणून पूर्वी केलेल्या काही सूचना पुन्हा एकदा :

१. हा मराठी भाषा विभागातील धागा असल्याने इथे फक्त मराठी शब्दच चर्चेला घ्यावेत. अर्थात अशा शब्दाच्या व्युत्पत्तीच्या चर्चेमध्ये आंतरभाषिकता येईलच; त्याचे स्वागत आहे.
( सर्व बिगर मराठी भाषांमधील शब्दचर्चेसाठी अन्य धागे उपलब्ध आहेत )

२. एखाद्या सभासदांनी नवा शब्द चर्चेस घेतल्यानंतर पुढील २० तास त्या शब्दासाठी राखून ठेवूयात. त्या दरम्यान पुढचा शब्द घेऊ नये. ही मुदत संपल्यानंतर त्यावर कोणतीही चर्चा झाली नसेल तरी नवा शब्द जरूर घ्यावा.

सहकार्याबद्दल धन्यवाद आणि चौथ्या भागात सहर्ष स्वागत . . .
Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

“उत्पल” बद्दल थोडे उत्खनन केले. ते कमळ.

परंतु

“उपल” चा अर्थ = दगड

आपल्या कामदेवाने प्रेमीजनांना फेकून मारण्याच्या त्याच्या स्टँडर्ड आयटम्स मधे काही टायपो केला तर “उपलप्रक्षेप” होऊन फुल्ल क़हर होईल Lol

कमळ आणि कवि - फार सख्य होते त्या काळी.>>>>>> यावरून हे कोडे आठवले.

कोणी एक वनी विचित्र पुतळा जेवावया बैसला
पात्री जेवण जेविता अतिबळे पात्रेचि तो भक्षिला
त्याची जी वनिता वनात फिरते सूर्यास प्रार्थी सदा
बोले विठ्ठल हा प्रकार उमगा षण्मासिचा वायदा

>>> त्याची जी वनिता वनात फिरते सूर्यास प्रार्थी सदा
यावरून रात्री कमळात अडकलेला भुंगा की काय असं वाटतं आहे.
(मग पुतळा काय आणि सहा महिन्यांचा काय संदर्भ? ! Proud )

पुतळा म्हणजेच भुंगा वाटतोय.

शेवटली ओळ: सोडवा हे कोडे (सहा महिन्यात?) असे सांगते आहे बहुतेक, कोड्याशी सरळ संबध नसावा.

याचा मात्र दु:खद अंत आहे:
रात्रिर्गमिष्याति भविष्यति सुप्रभातं भास्वानुदेष्यति हसिष्यति पंकजश्रीः
इत्थं विचिन्तयति कोशगते द्विरेफे, हा हन्त हन्त नालिनीं गज उज्जहार।

"रात्र संपेल, सकाळ होईल, सूर्य उगवेल आणि हे कमळ खुलेल" असा कमळात अडकलेला भुंगा विचार करत होता, पण हन्त हन्त! ( तेवढ्यात एका) हत्तीने कमळ उचकटुन फेकले.
याच्या वनितेने आता काय करावे?

शामतक था एक भंवरा फूल पर मंडरा रहा
रात होने पर कमल की पंखुडी मे बंद था
कैद से छूटा सुबह तो हम ने पूछा क्या हुआ
कुछ न बोला, कुछ न बोला
कुछ न बोला अपनी धून मे बस यही गाता रहा

( इथे हवेत उडणारा भुंगारुपी ऋषी कपूर)

दिव्यावर उडणारे आणि जळून मरणारे पाखरू - उर्दूत आणि कमळात अडकून मरणारा भुंगा - संस्कृत आणि तद्भव भाषांत फार कविप्रिय आहेत.

(मिटता कमलदल होई बंदी भृंग परि सोडीना ध्यास वगैरे - फारच क्लिशेड, दोनेक हजार वर्षे जुनी उपमा आहे)

सगळ्यांचं बरोबर.
पात्र म्हणजे कमळ आणि पुतळा म्हणजे भुंगा. कमळ मिटले आणि भुंगा अडकला. पात्राने खाणाऱ्यालाच मटकावले.या भुंग्याची पत्नी सूर्यदेवाची प्रार्थना करत हिंडत आहे कारण सूर्य उगवल्यावर त्याची सुटका होणार आहे. कोड्याचं उत्तर देण्यासाठी सहा महिन्यांची मुदत विठ्ठल कवीने दिली आहे.

कमळ चर्चा जोरदार.

कमळ रेफरंस मराठी, हिंदी, संस्कृत सर्वत्र पद्यात आणि गद्यात भदाभदा येतात खरे. फारच आवडती उपमा कवी-लेखकांची.

चरणकमल सर्वात कॉमन. पदकमल, मुखकमल, हस्तकमल/करकमल वगैरे भरपूर.

मुखारविंद, वदनारविंद, चरणारविंद, पदारविंद, करारविंद, पादपंकज हे ही.

राजीवलोचन, कमललोचन, कमलनयन, नवकंजलोचन, कंजमुख, करकंज, पदकंज, नेत्रकमल/ नयनकमल हे महामूर.

चीन
हे देशाचे नाव म्हणून नाही लिहिलेले. या फारसीतून आलेल्या शब्दाचा हा आहे अर्थ :
कंबरेजवळच्या चुन्या
(शब्दरत्नाकर)

आणि
हा पूर्णच वेगळा शब्द :
नामचीन = प्रसिद्ध, ख्यात.

तुस्त
= (गो.) स्तुति.
असा एकच अर्थ दोन शब्दकोशांनी ( दाते व अन्य एक) दिला आहे.
परंतु खालील वाक्य पहा :
हॉकीचा खेळ म्हणजे मुळातच झंझावती मामला. क्रिकेटची लांबण आणि तुस्तपणा त्यात नाही”.

इथे तुस्तचा अर्थ मंद असा अभिप्रेत दिसतो. मग शब्दकोशांनी तो का दिला नसावा ?
का सुस्तचा अपभ्रंश तुस्त असे काही झाले असावे ?

(तुष्टचा अर्थ वेगळा आहे. तो वरील वाक्यात अभिप्रेत नसावा).

लोभान
= उदबत्ती मधला ऊद

अरबी शब्द आहे.
मोल्सवर्थ शब्दकोश

नामचीन = प्रसिद्ध, ख्यात.

हा शब्द पहिल्यांदा एका आमच्या मुंबईच्या वृत्तपत्रात वाचला होता, मटा किंवा लोकसत्ता असावा. तेव्हा अर्थ कळला नव्हता परंतु आमच्या मुंबईच्या बोली मराठीतील शब्द असावा असे वाटले होते (उदा. गाणे "बोल" - गाणे म्हण नाही).

पुढे जेव्हा नामचीन = प्रसिद्ध, ख्यात असे कळले तेव्हा नावात चीन असूनही प्रसिद्ध, ख्यात कसा असा प्रश्न पडला होता.

नंतर एकदा त्याच वृत्तपत्रांमध्ये "नामचीन गुंड" असे वाचनात आले तेव्हा मात्र अर्थ शब्दशः पटला होता.

Pages