शब्दकोशांच्या मनोरंजक विश्वात

Submitted by कुमार१ on 22 June, 2017 - 22:44

माध्यमिक शाळेत असताना आम्हाला रोजच्या वेळापत्रकात दोन मधल्या सुट्या असायच्या – एक लहान १५ मिनिटांची तर दुसरी मोठी ४५ मिनिटांची. मोठ्या सुटीमध्ये शाळेच्या ग्रंथालयात आमच्यासाठी वाचनाची सोय केलेली असे. तिथे बसून वाचताना समोरच्या भिंतीवर नजर जाई. तिथे मोठ्या व आकर्षक अक्षरात ‘ग्रंथ हेच गुरु’ हे वचन लिहिलेले होते. वाचनाच्या आवडीतून त्या वचनाची सत्यता पटत गेली, यात शंकाच नाही. मोठे होता होता मी विविध प्रकारचे तीन भाषांतील साहित्य वाचत गेलो आणि एका निष्कर्षाप्रत येउन ठेपलो. तो म्हणजे, या सर्व ग्रंथरूपी गुरूंचे गुरु म्हणजे शब्दकोश!

सुरवातीला वाचनात एखादा शब्द अडला, की त्याचा अर्थ पाहण्यापुरता शब्दकोश उघडला जाई. तो जमाना अर्थात फक्त छापील पुस्तकांचाच होता. त्या वयात मी शब्दकोशाच्या जाडजूड ‘प्रकृती’कडे कुतूहलाने बघत असे. शालेय जीवनात शब्दकोशाचा उपयोग शब्दार्थ पाहण्यापुरताच सीमित होता. तेव्हा इंग्लिश–मराठी, मराठी-इंग्लिश आणि हिंदी-मराठी हे शब्दकोश हाताळले जात.
महाविद्यालयीन जीवनात ‘ब्रिटीश लायब्ररी’ चा सभासद झाल्यावर काही थोर इंग्लिश लेखक वाचायला घेतले. तेव्हा इंग्लिश पुस्तकांचे वाचन म्हणजे एक अभ्यासच असायचा. हातात ते पुस्तक, टेबलावर इं-मराठी शब्दकोश आणि शब्दार्थ टिपून घ्यायला बाजूला वही-पेन. वाचलेल्या साहित्याची काही वडीलधाऱ्यांशी चर्चा होई. त्यात एका गृहस्थांनी सल्ला दिला, की आता शब्दार्थ पाहण्यासाठी तुमच्या शालेय शब्दकोशावर समाधान मानू नकोस; आता गरज आहे ती तू ‘Oxford’ ची कास धरण्याची.
मग मी Concise Oxford च्या इंग्लिश- इंग्लिश कोशाची खरेदी केली. सहज म्हणून हा कोश चाळू लागलो अन पहिल्या नजरेतच लक्षात आले, की हा निव्वळ शब्दकोश नसून साक्षात ज्ञानकोश आहे. त्यात एखाद्या शब्दाचे अनेक अर्थ देण्यासाठी पुस्तकाच्या पानाचा तब्बल एक स्तंभही खर्ची पडलेला दिसे. एखाद्या कठीण शब्दाचा अर्थ पाहण्यासाठी म्हणून कोश उघडला जाई आणि तो अर्थ पाहता पाहता एकातून दुसऱ्या व त्यातून तिसऱ्या शब्दात मी उड्या मारत असे. कित्येकदा शब्दार्थासाठी उघडलेला कोश पाहताना वाचनाचे मूळ पुस्तक बाजूलाच राही आणि बराच वेळ मी शब्दकोशातच मनसोक्त विहार करीत असे. शब्दाच्या अर्थाबरोबरच त्याचा उगम, ऐतिहासिक संदर्भ इत्यादी माहिती वाचून छान मनोरंजन होई.

बऱ्याचदा आपल्या नेहमीच्या वापरातले शब्दसुद्धा कोशात पाहण्यात मजा येते. उदाहरणार्थ ‘August’ हा शब्द पाहा. आता हे एका महिन्याचे नाव आहे हे शाळकरी पोरही सांगते. पण ते नाव रोमन साम्राज्याचा पहिला राजा ऑगस्टस सीझर याच्यावरून आहे, तसेच august चा दुसरा अर्थ ‘थोर’ असाही आहे हे ज्ञान आपल्याला शब्दकोशात डोकावल्याशिवाय कसे मिळेल? एखाद्या शब्दाला तर एकापेक्षा अनेक असे कित्येक अर्थ असतात आणि त्या अर्थांचा एकमेकाशी सुतराम संबंध नसतो. ‘set’ चे तब्बल १५६ प्रकारचे अर्थ आहेत हे जेव्हा आपल्याला कोशात दिसते तेव्हा मोठा अचंबा वाटतो.
एकच उच्चार पण भिन्न स्पेलिंग व अर्थ असणारे शब्द जेव्हा आपण कोशात पाहून पक्के करून घेतो तेव्हा होणारा आनंद काही वेगळाच असतो. सध्याच्या ‘ हॅलो, हाय’च्या युगात बहुतेकांना फोनवरचाच ‘हॅलो’ माहित असतो. पण, शब्दकोश बारकाईने पाहणाऱ्यालाच hallo, hallow & halo यांतील फरक समजलेले असतील.

आपल्या देशात गेल्या पंचवीस वर्षांत इंग्लिश माध्यमातून शालेय शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय दिसून येते. ही पिढी ‘स्पोकन इंग्लिश’ च्या बळावर येताजाता टूरटूर करीत असते. पण त्याचबरोबर त्यांचे स्पेलिंग व व्याकरण यांकडे कमालीचे दुर्लक्ष झालेले जाणवते. अशा काहींची फिरकी घ्यायला मला आवडते. त्यांना मी ‘फुलस्केप’ या परिचित शब्दाचे स्पेलिंग विचारतो. आतापर्यंत तरी मला हे अचूक स्पेलिंग सांगणारी व्यक्ती भेटलेली नाही. याचे स्पेलिंग आहे ‘foolscap’ आणि योग्य उच्चार आहे ‘फुल्झकॅप’. हे ज्ञान शब्दकोशाला आपला मित्र केल्याशिवाय प्राप्त होणे नाही! मोठ्या आकाराचा कागद म्हटल्यावर बहुतेकजण ‘full…’अशी सुरवात करतात अन fool होऊन बसतात! या शब्दाचा उगम तर किती मनोरंजक. Fool म्हणजे विदूषक. पुरातनकाळी विदूषक जी टोपी वापरत त्या टोपीचे चिन्ह ‘watermark’ म्हणून या कागदात उमटवलेले असे.
‘फुलस्केप’ वरून घडलेला एक किस्सा सांगतो. एका माध्यमिक शाळेत सत्राच्या पहिल्या दिवशी एक शिक्षिका विद्यार्थ्यांना म्हणाल्या, “हे बघा, सर्वांनी ‘फुलस्केप’ वह्या आणायच्या आहेत, ‘हाफस्केप’ वह्या आणलेल्या मला अजिबात चालणार नाहीत!” एखादा शब्द नीट न शिकून घेतल्याचे परिणाम एका पिढीकडून पुढच्यांकडे कसे संक्रमित होतात याचे हे उदाहरण.

गडद काचांच्या चष्म्याला आपण ‘गॉगल’ म्हणतो यात नवीन काहीच नाही. पण या शब्दाचे स्पेलिंग goggles असून ते अनेकवचनी नाम म्हणूनच वापरायचे असते ही दृष्टी मला शब्दकोशानेच दिली. आपल्या समाजात एखाद्याने ‘लेस्बिअन’ हा शब्द जरी उच्चारला तर आपण पटकन चमकून त्याच्याकडे पाहतो. जर उत्सुकता म्हणून आपण हा शब्द कोशात पाहिला तर त्याचा उगम पाहून आपली करमणूक होते. ‘lesbos’ नावाच्या बेटावर ‘साफो’ नावाची कवयित्री राहत असे आणि ती समलिंगी संबंधात गुंतल्याचा लोकांना संशय होता. ही माहिती समजल्यावर या शब्दाकडे आपण अश्लील म्हणून न पाहता कुतूहलाने पाहू लागतो.

आजकाल आपले एखादे कार्यालयीन काम होणे जर एखाद्या स्त्रीच्या हातात असेल तर तिच्या तेथील दर्जाचा विचार न करता आपण तिच्यापुढे सारखे ‘Madam, Madam’ करीत असतो. आता ‘madam’ चे कोशातील दोन अर्थ बघा. या शब्दाचा उगम फ्रेंचमधून आहे.त्याचा पहिला अर्थ ‘बाईसाहेब’ असा तर दुसरा चक्क ‘वेश्यागृहाची मालकीण’ असा आहे! तसेच या शब्दाचे अनेकवचन( madams असे नसून) फ्रेंच पद्धतीने Mesdames असे आहे. सध्या सर्वत्र बोकाळलेल्या मॅडमांनी हा शब्द पूर्णपणे समजून घ्यायला काही हरकत नाही.

वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यापासून ते डॉक्टर होऊन तीस वर्षे उलटून गेल्यावरही वैद्यकीय शब्दकोश हा तर माझा जिवलग मित्र आहे. त्याच्या पातळ पांढऱ्याशुभ्र कागदावर परदेशात केलेली सुंदर छपाई, त्याचा लठ्ठ पण मोहक आकार, त्यातील अवघड शब्दांची केलेली सुरेख फोड, शब्दार्थांचा पाडलेला कीस आणि शब्दानुरूप चित्रे ही त्याची वैशिष्ट्ये मला नेहमीच मोहित करतात. सामान्य वाचकांसाठी त्यातले दोन मनोरंजक शब्द सांगतो:

१. AC/DC : खरे तर आपल्या सामान्यज्ञानानुसार हे विद्युत प्रवाहाचे दोन प्रकार आहेत. पण वैद्यकीय कोशातील त्याचा अर्थ ‘bisexual individual’ असा वाचल्यावर आपण कपाळावर हात मारून घेतो!
२. Hartnup disease : हा एक आनुवंशिक आजार आहे. आता Hartnup हे बहुधा ज्या शास्त्रज्ञाने तो आजार शोधला त्याचे नाव असेल असा अंदाज आपण बांधतो. पण शब्दकोशाचा पाहा काय सांगतो ते. Hartnup हा शास्त्रज्ञ नसून, तो आजार ज्या रुग्णामध्ये पहिल्यांदा आढळला त्याचे आडनाव आहे. १९५० च्या सुमारास ब्रिटनमधील श्री. हार्टनप यांनी आपल्या cousinशी लग्न केले होते. त्या दाम्पत्याला झालेल्या आठ अपत्यांपैकी चौघांमध्ये हा आजार आढळून आला.

मराठी-मराठी कोश हाताळणे ही सुद्धा एक चांगली करमणूक आहे. अर्थात इंग्लिश-इंग्लिशच्या तुलनेत या कोशाचे स्वरूप त्रोटक वाटते, हे कबूल करावे लागेल. बऱ्याचदा मराठी कोश बघण्याच्या बाबतीत मराठी माणूस उदासीन असतो. आपल्या दैनंदिन वापरातील काही मराठी शब्दांचा खरा अर्थ हा कोश पाहिल्यावरच आपल्याला समजतो. अन्यथा त्याऐवजी काहीतरी चुकीची कल्पना किंवा अर्धवट माहिती आपल्या डोक्यात असते. एकदा एका कॉलेजच्या तरुणाला मी ‘आदिवासी’ चा अर्थ विचारला. क्षणाचाही विलंब न लावता तो म्हणाला, “ते म्हणजे अति मागास गरीब लोक”. त्याच्या म्हणण्यात जरी तथ्य असले तरी खरा अर्थ तो नाही. ‘आदी’= मूळ व ‘वासी’= राहणारे. म्हणजेच, एखाद्या प्रदेशातील मूळ रहिवासी.

आपल्याकडे पाटील, कुलकर्णी, कांबळे ही अगदी सर्रास आढळणारी आडनावे. एकदा सहज म्हणून ‘कुलकर्णी’ ची व्युत्पत्ती कोशात बघितली आणि स्तिमित झालो. ती बघण्यापूर्वी, ‘कुलकर्णी’ हा शब्द अस्सल मराठीच – एवढेच काय, पण पक्का पुणेरीच- या भ्रमात मी होतो. शब्दकोशाने मला सांगितले, की हा शब्द मूळ तेलुगु (कुळकरणी) आहे. कुळ = शेतकरी आणि करण = हिशेब. हे वाचल्यावर मला एका ‘कुळाचा’ शोध तर लागलाच आणि त्याचबरोबर माझ्या भाषिक अस्मितेचे कुंपण गळून पडले, हे नक्की!

शब्दकोशांमध्ये काही व्यवहारोपयोगी परिशिष्टेही असतात. निरनिराळ्या लघुरुपांचे (acronyms) पूर्ण रूप देणारे परिशिष्ट हे त्यातले एक ठळक उदाहरण. सध्याच्या संगणकीय युगात कित्येक नवीन लघुरुपांचा सुळसुळाट झालेला आहे. अशी काही लघुरूपे आपल्या डोळ्यांसमोर सतत आल्याने हळूहळू आपल्याला ते जणू काही शब्दच आहेत असे वाटू लागते. एक उदाहरण देतो. सध्या कोणताही online व्यवहार करताना आपल्याला सतत भेटणारे एक लघुरूप म्हणजे ‘CAPTCHA’. त्याचे दीर्घरूप किती मनोरंजक आहे आणि त्यामागचा तांत्रिक इतिहास काय आहे, ते आपल्याला कोश पाहिल्याशिवाय कळणे नाही!

आपले ज्ञान समृद्ध करतानाच आपल्यावर मनोरंजनाचाही शिडकावा करणारे विविध शब्दकोश आपल्या वापरात जरूर असावेत. माझ्याकडे विविध प्रकारचे सुमारे डझनभर कोश आहेत. आंतरजालाच्या व्यापक प्रसारानंतर आता अनेक प्रकारचे कोश जालावर उपलब्ध आहेत. त्यामुळे जाडजूड वजनाचे छापील कोश आता एखाद्याच्या वैयक्तिक ग्रंथसंग्रहात कमी दिसतात. पण, माझी पिढी ही मुळात अशा छापील कोशांवर ‘पोसली’ गेली असल्याने माझ्याकडे ते आजही आहेत. माझे त्यांच्यावर इतके प्रेम आहे की मी त्यांना माझे कुटुंबघटकच मानतो! माझ्या घरभर ते विखुरलेले आहेत. त्यापैके एक-दोघांनी तर माझ्या पलंगावर विसावण्याचा मान पटकावलाय. वेळप्रसंगी माझ्या एकटेपणात ते माझी सुरेख सोबत करतात. धष्टपुष्ट छापील कोशाला प्रेमाने उराशी कवटाळण्याची मजा काही औरच असते. त्याची सर जालकोशाच्या ‘सर्च इंजिन’ला कशी येईल?

एखादे दिवशी जर हाताशी वाचण्यासारखे काही नसेल तर मी खुशाल एखादा कोश हाती घेऊन त्यात डोके खुपसून बसतो. दिवसाकाठी निदान एकतरी नवीन शब्द मी कोशांमधून शिकतो व समजावून घेतो. ग्रंथाचे गुरु असलेल्या शब्दकोशांनी मला ज्ञान आणि मनोरंजन या दोन्ही पातळ्यांवर अतीव समाधान दिलेले असल्याने मी त्यांचा कायमचा ऋणी आहे.
***********************************************************************************************************
( टीप : माझ्या या लेखाची पूर्वप्रसिद्धी : ‘अंतर्नाद’ मासिक. काही सुधारणांसह येथे प्रकाशित )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Workaholigarch

नजरेसमोर चेहरे आले काही Happy

veranda, verandah या इंग्रजी आणि वर्‍हांडा, बरामदा या अनुक्रमे मराठी आणि हिंदी शब्दांचे मूळ पोर्तुगीज आहे.

*वर्‍हांडा
* काँट्रॉनिम
>>> वा ! दोन्ही रोचक

I am / We are !
काही प्रसंगी भाषेचे किंचित फेरफार करून वा नियम वाकवून एखादे वाक्य म्हटल्यास ते परिणामकारक व हृद्य वाटते.

अमलताश या मराठी चित्रपटात नायक व नायिकेचे शरीरसबंधासह गहिरे प्रेम आहे परंतु अद्याप लग्न झालेले नाही. जेव्हा नायक एका दुर्धर आजारावरील शस्त्रक्रियेसाठी सज्ज होत असतो तेव्हा ती प्रेमिका त्याला म्हणते,
We are pregnant !”

इथे I am ऐवजी We are ने जी आर्तता व्यक्त झाली आहे ती सिनेमात गुंतल्यावरच भावते.

Phrazle (3) : अनवट इं. वाक्प्रचार :
1. lipstick on a pig : तांत्रिक दर्जा हलका असलेल्या वस्तूला वरून दिखाऊ रंगरंगोटी करणे.

2. “shape up or ship out” : एकेकाळी जे सैनिक बेशिस्त वागायचे त्यांना अत्यंत खडतर आणि हलाखीच्या परिस्थितीत काम करायला पाठवले जायचे. त्या दृष्टीने ही तंबी दिली जायची. आता उद्योग जगतातले याचे आधुनिक रूप म्हणजे
‘perform or quit!’

3. Bet my bottom dollar : जेव्हा एखाद्या गोष्टीची आपल्याला अत्यंत खात्रीशीर माहिती असते तेव्हा त्या मुद्द्यावर आपण दुसऱ्याशी वाटेल तेवढ्या पैशांची पैज लावायला तयार असतो.

कॉनी फ्रॅन्सिसचे - लिप्स्टिक ऑन युअर कॉलर हे एक धमाले गाणे आहे त्यात हा वाक्प्रचार आहे.

https://www.youtube.com/watch?v=gPaAqt8t1g4

When you left me all alone at the record hop
Told me you were goin' out for a soda pop
You were gone for quite a while, half an hour or more
You came back and man, oh man, this is what I saw
Lipstick on your collar told a tale on you
Lipstick on your collar said you were untrue

Bet your bottom dollar, you and I are through
'Cause lipstick on your collar told a tale on you, yeah

धन्यवाद कुमार सर. माझे प्रचंड आवडते गाणे आहे. अजुन एक ऐका. कॉनीचेच -

https://www.youtube.com/watch?v=7EQX70weW8o
स्टुपिड क्युपिड

मला या मूर्ख आणि दुष्ट क्युपिडचे पंखच कापायचे आहेत. आणि मग हा क्युपिड या स्कुलगर्ल कडुन कशी दप्तर वगैरे सांभाळण्याची कामे करवतो ते वर्णन येते. हे सर्व का तर शी इज इन लव्ह विथ हर क्लासमेट Happy

अतिगोड!!

Albatross.jpgAlbatross हा एक उत्तर पॅसिफिकमध्ये आढळणारा समुद्रपक्षी आहे.

खलाशांच्या दृष्टीने हा एक शुभ पक्षी असतो. एका इंग्लिश कवितेत या संबंधित एक रोचक कथा आहे. एका खलाश्याने या पक्षाची शिकार केली. त्यावर अन्य खलाशी संतापले आणि त्यांनी तो मेलेला पक्षी त्या शिकारी खलाशाच्या मानेभोवती करकचून बांधून टाकला.

हे रूपक वापरून इंग्लिशमध्ये "albatross around one's neck" हा एक सुरेख वाक्प्रचार तयार झाला आहे. म्हणजे, एखाद्याच्या कार्यामध्ये त्रासदायक मोठा अडथळा निर्माण झालेला असणे.

मराठीत आपण जसे म्हणतो की एखादी गोष्ट ‘माझ्या गळ्यातली/मार्गातली एक धोंड झाली आहे’, तो भावार्थ.

अवांतर: मी बॅडमिंटनसाठी अल्बाट्रॉस ब्रँडची फेदर शटलकॉक्स वापरत असे, त्याची आठवण झाली. (पण ती पिसे अल्बाट्रॉस पक्षाची होती का याबद्दल खात्री नाही.)

albatross >>>
पूरक माहितीबद्दल आभार !

“ We are pregnant !”>>>
छान वाक्य आहे आहे!

इलेक्ट्रिक वस्तू आणि इतर ठिकाणी ( आग विझवणे यासाठी लागणारे नळ) जोड वस्तूंना male female शब्द वापरला जायचा. अजूनही लिहिला बोलला जातो. तो बदलला जातो आहे. प्लग , सॉकेट.
वीज/पाणी/माहिती देणारा भाग तो सॉकेट/सप्लाइअर. घेणारा तो प्लग/ रिसिवर

बाकी साहित्यात/ पर्यटनात एखाद्या स्वस्त आणि त्याच प्रकारातल्या महागड्या जागेसाठी पर्याय म्हणून गरीबांचे स्विझरलँड इत्यादी म्हटले जाते. तेही बंद केले जाईल.

male female शब्द वापरला जायचा. अजूनही लिहिला बोलला जातो. तो बदलला जातो आहे. प्लग , सॉकेट. >>

निव्वळ Political Correctness साठी, वोक लोकांच्या सुपीक डोक्यातून आलेली आचरट कल्पना. पुढील चित्रात बघा, कुठल्या कपलिंगला प्लग म्हणणार आणि कुणाला सॉकेट? आणि त्यातून काय साध्य करणार?

आणि हो, male female शब्द बदलणार तर मग screw चे काय? Lol

The difference between male and female couplings is straightforward: male couplings have external threads and act as the insertion component, while female couplings have internal threads and act as the receiving component. These fittings work together to create secure connections in various systems, from plumbing and gas to hydraulic and air systems.

पाईप जोडताना straight/ bent/90degree coupling लागतात. प्लंबर लोक योग्य मापाचा पाईप कापून जोडतात.
नळ लावण्यासाठी भिंतीकडे threaded pipeचे टोक असते. त्याला स्ट्रेस कपलिंगने नळ बसवतात. त्यामुळे male female शब्द न वापरताही काम होते. दुकानात पाईप फिटिंग विकत घ्यायला जाणारे हव्या त्या कपलिंग आणि थ्रेड नसलेले दहा फुटी पाईप विकत घेतात. काम झाले . वरच्या शब्दांची काही गरज नसते. कपलिंगला दोन्ही बाजूस आलेच थ्रेड असतात.

फायर फाइटिंगचे कापडी होज पाईप.... हे गाडीच्या मागे गुंडाळून ठेवलेले असतात. पाण्याच्या टाकीला मागे सप्लायर पॉइंट असतात. तिथे गुंडाळलेल्या होजचे रिसिवर जोडून होजची गुंडाळी खांद्यावर धरून ती सोडवत लांब जायचे असते. तिथे मग दुसरा होज जोडता येतो किंवा पाणी दूर फेकणारा नळा लावता येतो.
हळूहळू हे शब्द बदलले जातील.

शरीर शास्त्रात रचना आणि कार्य जे आहे त्याची तुलना तिथेच संपते. इलेक्ट्रिकलमध्ये केवळ साधर्म्य नसते. सॉकेट किंवा सप्लायर मधून २३० वोल्टस दाब असतो ते सुरक्षित असावे लागते. रिसिवर उघडा चालतो.

माझ्या अंदाजाने एकजात लिंगनिरपेक्ष शब्दांना वापरात आणून आपण समस्त मानवजातीला भेडसावणाऱ्या ९५% समस्यांचा तरी निकाल लावूनच टाकू.....आणि त्यनंतल उरलेल्या ज्या सटर फटर ५% समस्या आहेत त्यांना संपवायला आपल्याला वेळ लागतोय होय?? Rofl

<< त्यामुळे male female शब्द न वापरताही काम होते.
.
शरीर शास्त्रात रचना आणि कार्य जे आहे त्याची तुलना तिथेच संपते. इलेक्ट्रिकलमध्ये केवळ साधर्म्य नसते.
.
रिसिवर उघडा चालतो.
Submitted by Srd on 25 December, 2024 >>

इतक्या आत्मविश्वासाने दिलेला तुमचा प्रतिसाद वाचून मी नि:शब्द झालो आहे, माझी वाचाच बसली आहे.

इतरांनी तूर्तास खालील चित्रे फक्त बघावीत.


.

.

.

.

.

.

चांगली चर्चा.
* * *
* ** *
मुंबईचे गतिमान जीवन आपणा सर्वांना अनेक दशकांपासून परिचित आहे.
“8.42 ची फास्ट”, इत्यादी शब्दप्रयोग मुंबईनेच आपल्या बोलीभाषेला दिलेत. याच धर्तीवरील एक अनौपचारिक अमेरिकी वाक्प्रचार म्हणजे
‘A New York minute’.

जेव्हा एखादी कृती अत्यंत तातडीने करणे सुचवायचे असते त्यावेळेस हा वापरला जातो. न्यूयॉर्कमधील गतिमान जीवनावरूनच हा वाक्प्रचार विसाव्या शतकात तिकडे रूढ झाला.

( उदा. : “I’d quit this job in a New York minute if I got a nice offer.”).

Pages