शब्दकोशांच्या मनोरंजक विश्वात

Submitted by कुमार१ on 22 June, 2017 - 22:44

माध्यमिक शाळेत असताना आम्हाला रोजच्या वेळापत्रकात दोन मधल्या सुट्या असायच्या – एक लहान १५ मिनिटांची तर दुसरी मोठी ४५ मिनिटांची. मोठ्या सुटीमध्ये शाळेच्या ग्रंथालयात आमच्यासाठी वाचनाची सोय केलेली असे. तिथे बसून वाचताना समोरच्या भिंतीवर नजर जाई. तिथे मोठ्या व आकर्षक अक्षरात ‘ग्रंथ हेच गुरु’ हे वचन लिहिलेले होते. वाचनाच्या आवडीतून त्या वचनाची सत्यता पटत गेली, यात शंकाच नाही. मोठे होता होता मी विविध प्रकारचे तीन भाषांतील साहित्य वाचत गेलो आणि एका निष्कर्षाप्रत येउन ठेपलो. तो म्हणजे, या सर्व ग्रंथरूपी गुरूंचे गुरु म्हणजे शब्दकोश!

सुरवातीला वाचनात एखादा शब्द अडला, की त्याचा अर्थ पाहण्यापुरता शब्दकोश उघडला जाई. तो जमाना अर्थात फक्त छापील पुस्तकांचाच होता. त्या वयात मी शब्दकोशाच्या जाडजूड ‘प्रकृती’कडे कुतूहलाने बघत असे. शालेय जीवनात शब्दकोशाचा उपयोग शब्दार्थ पाहण्यापुरताच सीमित होता. तेव्हा इंग्लिश–मराठी, मराठी-इंग्लिश आणि हिंदी-मराठी हे शब्दकोश हाताळले जात.
महाविद्यालयीन जीवनात ‘ब्रिटीश लायब्ररी’ चा सभासद झाल्यावर काही थोर इंग्लिश लेखक वाचायला घेतले. तेव्हा इंग्लिश पुस्तकांचे वाचन म्हणजे एक अभ्यासच असायचा. हातात ते पुस्तक, टेबलावर इं-मराठी शब्दकोश आणि शब्दार्थ टिपून घ्यायला बाजूला वही-पेन. वाचलेल्या साहित्याची काही वडीलधाऱ्यांशी चर्चा होई. त्यात एका गृहस्थांनी सल्ला दिला, की आता शब्दार्थ पाहण्यासाठी तुमच्या शालेय शब्दकोशावर समाधान मानू नकोस; आता गरज आहे ती तू ‘Oxford’ ची कास धरण्याची.
मग मी Concise Oxford च्या इंग्लिश- इंग्लिश कोशाची खरेदी केली. सहज म्हणून हा कोश चाळू लागलो अन पहिल्या नजरेतच लक्षात आले, की हा निव्वळ शब्दकोश नसून साक्षात ज्ञानकोश आहे. त्यात एखाद्या शब्दाचे अनेक अर्थ देण्यासाठी पुस्तकाच्या पानाचा तब्बल एक स्तंभही खर्ची पडलेला दिसे. एखाद्या कठीण शब्दाचा अर्थ पाहण्यासाठी म्हणून कोश उघडला जाई आणि तो अर्थ पाहता पाहता एकातून दुसऱ्या व त्यातून तिसऱ्या शब्दात मी उड्या मारत असे. कित्येकदा शब्दार्थासाठी उघडलेला कोश पाहताना वाचनाचे मूळ पुस्तक बाजूलाच राही आणि बराच वेळ मी शब्दकोशातच मनसोक्त विहार करीत असे. शब्दाच्या अर्थाबरोबरच त्याचा उगम, ऐतिहासिक संदर्भ इत्यादी माहिती वाचून छान मनोरंजन होई.

बऱ्याचदा आपल्या नेहमीच्या वापरातले शब्दसुद्धा कोशात पाहण्यात मजा येते. उदाहरणार्थ ‘August’ हा शब्द पाहा. आता हे एका महिन्याचे नाव आहे हे शाळकरी पोरही सांगते. पण ते नाव रोमन साम्राज्याचा पहिला राजा ऑगस्टस सीझर याच्यावरून आहे, तसेच august चा दुसरा अर्थ ‘थोर’ असाही आहे हे ज्ञान आपल्याला शब्दकोशात डोकावल्याशिवाय कसे मिळेल? एखाद्या शब्दाला तर एकापेक्षा अनेक असे कित्येक अर्थ असतात आणि त्या अर्थांचा एकमेकाशी सुतराम संबंध नसतो. ‘set’ चे तब्बल १५६ प्रकारचे अर्थ आहेत हे जेव्हा आपल्याला कोशात दिसते तेव्हा मोठा अचंबा वाटतो.
एकच उच्चार पण भिन्न स्पेलिंग व अर्थ असणारे शब्द जेव्हा आपण कोशात पाहून पक्के करून घेतो तेव्हा होणारा आनंद काही वेगळाच असतो. सध्याच्या ‘ हॅलो, हाय’च्या युगात बहुतेकांना फोनवरचाच ‘हॅलो’ माहित असतो. पण, शब्दकोश बारकाईने पाहणाऱ्यालाच hallo, hallow & halo यांतील फरक समजलेले असतील.

आपल्या देशात गेल्या पंचवीस वर्षांत इंग्लिश माध्यमातून शालेय शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय दिसून येते. ही पिढी ‘स्पोकन इंग्लिश’ च्या बळावर येताजाता टूरटूर करीत असते. पण त्याचबरोबर त्यांचे स्पेलिंग व व्याकरण यांकडे कमालीचे दुर्लक्ष झालेले जाणवते. अशा काहींची फिरकी घ्यायला मला आवडते. त्यांना मी ‘फुलस्केप’ या परिचित शब्दाचे स्पेलिंग विचारतो. आतापर्यंत तरी मला हे अचूक स्पेलिंग सांगणारी व्यक्ती भेटलेली नाही. याचे स्पेलिंग आहे ‘foolscap’ आणि योग्य उच्चार आहे ‘फुल्झकॅप’. हे ज्ञान शब्दकोशाला आपला मित्र केल्याशिवाय प्राप्त होणे नाही! मोठ्या आकाराचा कागद म्हटल्यावर बहुतेकजण ‘full…’अशी सुरवात करतात अन fool होऊन बसतात! या शब्दाचा उगम तर किती मनोरंजक. Fool म्हणजे विदूषक. पुरातनकाळी विदूषक जी टोपी वापरत त्या टोपीचे चिन्ह ‘watermark’ म्हणून या कागदात उमटवलेले असे.
‘फुलस्केप’ वरून घडलेला एक किस्सा सांगतो. एका माध्यमिक शाळेत सत्राच्या पहिल्या दिवशी एक शिक्षिका विद्यार्थ्यांना म्हणाल्या, “हे बघा, सर्वांनी ‘फुलस्केप’ वह्या आणायच्या आहेत, ‘हाफस्केप’ वह्या आणलेल्या मला अजिबात चालणार नाहीत!” एखादा शब्द नीट न शिकून घेतल्याचे परिणाम एका पिढीकडून पुढच्यांकडे कसे संक्रमित होतात याचे हे उदाहरण.

गडद काचांच्या चष्म्याला आपण ‘गॉगल’ म्हणतो यात नवीन काहीच नाही. पण या शब्दाचे स्पेलिंग goggles असून ते अनेकवचनी नाम म्हणूनच वापरायचे असते ही दृष्टी मला शब्दकोशानेच दिली. आपल्या समाजात एखाद्याने ‘लेस्बिअन’ हा शब्द जरी उच्चारला तर आपण पटकन चमकून त्याच्याकडे पाहतो. जर उत्सुकता म्हणून आपण हा शब्द कोशात पाहिला तर त्याचा उगम पाहून आपली करमणूक होते. ‘lesbos’ नावाच्या बेटावर ‘साफो’ नावाची कवयित्री राहत असे आणि ती समलिंगी संबंधात गुंतल्याचा लोकांना संशय होता. ही माहिती समजल्यावर या शब्दाकडे आपण अश्लील म्हणून न पाहता कुतूहलाने पाहू लागतो.

आजकाल आपले एखादे कार्यालयीन काम होणे जर एखाद्या स्त्रीच्या हातात असेल तर तिच्या तेथील दर्जाचा विचार न करता आपण तिच्यापुढे सारखे ‘Madam, Madam’ करीत असतो. आता ‘madam’ चे कोशातील दोन अर्थ बघा. या शब्दाचा उगम फ्रेंचमधून आहे.त्याचा पहिला अर्थ ‘बाईसाहेब’ असा तर दुसरा चक्क ‘वेश्यागृहाची मालकीण’ असा आहे! तसेच या शब्दाचे अनेकवचन( madams असे नसून) फ्रेंच पद्धतीने Mesdames असे आहे. सध्या सर्वत्र बोकाळलेल्या मॅडमांनी हा शब्द पूर्णपणे समजून घ्यायला काही हरकत नाही.

वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यापासून ते डॉक्टर होऊन तीस वर्षे उलटून गेल्यावरही वैद्यकीय शब्दकोश हा तर माझा जिवलग मित्र आहे. त्याच्या पातळ पांढऱ्याशुभ्र कागदावर परदेशात केलेली सुंदर छपाई, त्याचा लठ्ठ पण मोहक आकार, त्यातील अवघड शब्दांची केलेली सुरेख फोड, शब्दार्थांचा पाडलेला कीस आणि शब्दानुरूप चित्रे ही त्याची वैशिष्ट्ये मला नेहमीच मोहित करतात. सामान्य वाचकांसाठी त्यातले दोन मनोरंजक शब्द सांगतो:

१. AC/DC : खरे तर आपल्या सामान्यज्ञानानुसार हे विद्युत प्रवाहाचे दोन प्रकार आहेत. पण वैद्यकीय कोशातील त्याचा अर्थ ‘bisexual individual’ असा वाचल्यावर आपण कपाळावर हात मारून घेतो!
२. Hartnup disease : हा एक आनुवंशिक आजार आहे. आता Hartnup हे बहुधा ज्या शास्त्रज्ञाने तो आजार शोधला त्याचे नाव असेल असा अंदाज आपण बांधतो. पण शब्दकोशाचा पाहा काय सांगतो ते. Hartnup हा शास्त्रज्ञ नसून, तो आजार ज्या रुग्णामध्ये पहिल्यांदा आढळला त्याचे आडनाव आहे. १९५० च्या सुमारास ब्रिटनमधील श्री. हार्टनप यांनी आपल्या cousinशी लग्न केले होते. त्या दाम्पत्याला झालेल्या आठ अपत्यांपैकी चौघांमध्ये हा आजार आढळून आला.

मराठी-मराठी कोश हाताळणे ही सुद्धा एक चांगली करमणूक आहे. अर्थात इंग्लिश-इंग्लिशच्या तुलनेत या कोशाचे स्वरूप त्रोटक वाटते, हे कबूल करावे लागेल. बऱ्याचदा मराठी कोश बघण्याच्या बाबतीत मराठी माणूस उदासीन असतो. आपल्या दैनंदिन वापरातील काही मराठी शब्दांचा खरा अर्थ हा कोश पाहिल्यावरच आपल्याला समजतो. अन्यथा त्याऐवजी काहीतरी चुकीची कल्पना किंवा अर्धवट माहिती आपल्या डोक्यात असते. एकदा एका कॉलेजच्या तरुणाला मी ‘आदिवासी’ चा अर्थ विचारला. क्षणाचाही विलंब न लावता तो म्हणाला, “ते म्हणजे अति मागास गरीब लोक”. त्याच्या म्हणण्यात जरी तथ्य असले तरी खरा अर्थ तो नाही. ‘आदी’= मूळ व ‘वासी’= राहणारे. म्हणजेच, एखाद्या प्रदेशातील मूळ रहिवासी.

आपल्याकडे पाटील, कुलकर्णी, कांबळे ही अगदी सर्रास आढळणारी आडनावे. एकदा सहज म्हणून ‘कुलकर्णी’ ची व्युत्पत्ती कोशात बघितली आणि स्तिमित झालो. ती बघण्यापूर्वी, ‘कुलकर्णी’ हा शब्द अस्सल मराठीच – एवढेच काय, पण पक्का पुणेरीच- या भ्रमात मी होतो. शब्दकोशाने मला सांगितले, की हा शब्द मूळ तेलुगु (कुळकरणी) आहे. कुळ = शेतकरी आणि करण = हिशेब. हे वाचल्यावर मला एका ‘कुळाचा’ शोध तर लागलाच आणि त्याचबरोबर माझ्या भाषिक अस्मितेचे कुंपण गळून पडले, हे नक्की!

शब्दकोशांमध्ये काही व्यवहारोपयोगी परिशिष्टेही असतात. निरनिराळ्या लघुरुपांचे (acronyms) पूर्ण रूप देणारे परिशिष्ट हे त्यातले एक ठळक उदाहरण. सध्याच्या संगणकीय युगात कित्येक नवीन लघुरुपांचा सुळसुळाट झालेला आहे. अशी काही लघुरूपे आपल्या डोळ्यांसमोर सतत आल्याने हळूहळू आपल्याला ते जणू काही शब्दच आहेत असे वाटू लागते. एक उदाहरण देतो. सध्या कोणताही online व्यवहार करताना आपल्याला सतत भेटणारे एक लघुरूप म्हणजे ‘CAPTCHA’. त्याचे दीर्घरूप किती मनोरंजक आहे आणि त्यामागचा तांत्रिक इतिहास काय आहे, ते आपल्याला कोश पाहिल्याशिवाय कळणे नाही!

आपले ज्ञान समृद्ध करतानाच आपल्यावर मनोरंजनाचाही शिडकावा करणारे विविध शब्दकोश आपल्या वापरात जरूर असावेत. माझ्याकडे विविध प्रकारचे सुमारे डझनभर कोश आहेत. आंतरजालाच्या व्यापक प्रसारानंतर आता अनेक प्रकारचे कोश जालावर उपलब्ध आहेत. त्यामुळे जाडजूड वजनाचे छापील कोश आता एखाद्याच्या वैयक्तिक ग्रंथसंग्रहात कमी दिसतात. पण, माझी पिढी ही मुळात अशा छापील कोशांवर ‘पोसली’ गेली असल्याने माझ्याकडे ते आजही आहेत. माझे त्यांच्यावर इतके प्रेम आहे की मी त्यांना माझे कुटुंबघटकच मानतो! माझ्या घरभर ते विखुरलेले आहेत. त्यापैके एक-दोघांनी तर माझ्या पलंगावर विसावण्याचा मान पटकावलाय. वेळप्रसंगी माझ्या एकटेपणात ते माझी सुरेख सोबत करतात. धष्टपुष्ट छापील कोशाला प्रेमाने उराशी कवटाळण्याची मजा काही औरच असते. त्याची सर जालकोशाच्या ‘सर्च इंजिन’ला कशी येईल?

एखादे दिवशी जर हाताशी वाचण्यासारखे काही नसेल तर मी खुशाल एखादा कोश हाती घेऊन त्यात डोके खुपसून बसतो. दिवसाकाठी निदान एकतरी नवीन शब्द मी कोशांमधून शिकतो व समजावून घेतो. ग्रंथाचे गुरु असलेल्या शब्दकोशांनी मला ज्ञान आणि मनोरंजन या दोन्ही पातळ्यांवर अतीव समाधान दिलेले असल्याने मी त्यांचा कायमचा ऋणी आहे.
***********************************************************************************************************
( टीप : माझ्या या लेखाची पूर्वप्रसिद्धी : ‘अंतर्नाद’ मासिक. काही सुधारणांसह येथे प्रकाशित )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पैशाच्या विशेषतः पिढीजात संपत्ती च्या जोरावर कॉलेज मध्ये प्रवेश, स्पर्धांमध्ये विनासायास संधी मिळवणाऱ्या कंपूबाबत Plutocrats हा शब्द बऱ्याचदा ऐकला आहे.

विडंबनाचे इंग्लिशमधले तीन प्रकार रोचक आहेत :
१. satire : यामध्ये एकंदरीत समाजमूल्यांचेच विडंबन (टीका) असते ( सांस्कृतिक, नैतिक मुद्दे, इत्यादी).

२. parody : यात एकाच विशिष्ट कलेचे विडंबन (नक्कल) असते ( कविता, पुस्तक, चित्रपट, इत्यादी).

३. spoof : यामध्ये एखाद्या संपूर्ण कलाप्रकाराचेच विडंबन (उपहास) केले जाते. ( उदा., प्रणय कादंबऱ्या, दे-मार चित्रपट इत्यादी).

मराठी भाषा शास्त्रानुसार नक्की कल्पना नाही. परंतु खालील दोन संदर्भ पाहिले असता अशी माहिती मिळाली :
१.
...हे विडंबन सहेतुक व बहुशः विनोद, उपहास अगर व्यंजना या अभिव्यक्तीच्या अंगांनी साधलेले असते.
(https://vishwakosh.marathi.gov.in/32635/)

व्याजोक्ति
पूर्ण ( लेखन) = हेटाळणी, व्यंजना, विडंबन, टवाळी, वक्रोक्तिपूर्ण, टर, टेर, बोचक लागट लेखन).
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%82%...

ninja
हे जपानी विशेषनाम आता इंग्लिशने सामान्यनाम म्हणून स्वीकारलेले आहे.

मुळात ninja चा अर्थ मार्शल आर्ट्समध्ये ( ninjutsu ) तरबेज असलेला असा आहे. युद्धकाळात या लोकांचा वापर गुप्तहेर आणि मारेकरी म्हणून केला जाई.
आता कुठल्याही कामात/कलेत अत्यंत तरबेज असलेल्या व्यक्तीसाठी देखील हा शब्द वापरतात.
उदाहरणार्थ, computer ninja

छान आहेत शब्द.
>>spoofing >> याचा एक अर्थ cyber attack हा पण आहे.

mesa, mensa & Mensa
ही शब्दत्रयी रंजक आहे

. mesa & mensa या दोघांचा मूलभूत अर्थ table.
. भूगोलात mesa = high table land
. mensa = चर्चमधील उंच जागा

Mensa = ‘Round table’ स्वरूपाची अत्यंत बुद्धिमान लोकांची आंतरराष्ट्रीय संस्था.
(Round table = संस्थेतील सर्वजण समान दर्जाचे).

herring
हा एक समुद्री मासा आहे. त्याच्या नावावरून red herring हा शब्दप्रयोग लाक्षणिक अर्थाने साहित्यात वापरतात - विशेषता रहस्यकथांच्या संदर्भात.
दिशाभूल करणारी माहिती (clue)’ हा त्याचा अर्थ आहे.

त्याच्या उगमाबद्दल बऱ्याच दंतकथा प्रचालित आहेत. त्यातली एक अशी :
तुरुंगातून फरार झालेले लोक जेव्हा जंगलात गायब होत तेव्हा ते खरपूस भाजलेला herring मासा एका ठिकाणी फेकून देत आणि स्वतः दुसऱ्या दिशेने पलायन करीत. त्यानंतर तिथे आलेली पोलिसांची वास काढणारी कुत्री त्या माशाच्या तीव्र वासामुळे गंडत.

ऑक्सफर्डने 2023 चा मानाचा शब्द जाहीर केला आहे :
rizz = आकर्षकता, भुरळ.

हा लघुशब्द charisma या शब्दातील मधली दोन अक्षरे घेऊन तयार केलेला आहे.
सध्या तो तरुणांमध्ये लोकप्रिय आहे.

https://www.google.com/amp/s/thehill.com/blogs/blog-briefing-room/434033...

sushi ( = मासे वगैरे घालून केलेला आंबट भात)
हा जपानी शब्द इंग्लिशने स्वीकारलेला आहे.
तो आता शब्दकोड्यांमध्ये असतो.

रेड हेरिंग वरून कात्रज करणे आठवला.

शिवाजी महाराजांनी पाठलागावर असलेल्या शत्रू सैन्याची दिशाभूल करण्यासाठी बैलांच्या शिंगांना पलिते बांधून त्यांना कात्रजच्या घाटात सोडलं होतं.

कात्रज >> +१
.. ..
Rehearsal dinner
अमेरिकी संस्कृतीतील लग्नांमध्ये प्रत्यक्ष लग्नाच्या आदल्या रात्रीच्या जेवणाला असे म्हणतात. हे वधू-वरांच्या जवळच्या माणसांसाठी असते. (थोडक्यात, आपल्याकडील सीमांतपूजनाच्या जेवणासारखे).

Hackney_Horse.jpg

या घोड्याला Hackney असे नाव आहे. त्या नावाचा इतिहास रंजक आहे.

लंडनजवळील Hackney या नावाच्या खेड्यात एकेकाळी या घोड्यांची पैदास करीत असत. हे घोडे भाड्याने वापरायच्या घोडागाडीसाठी वापरले जाऊ लागले. या घोडागाड्यांचा वापर कोणीही सर्वसामान्य नागरिक सर्रास करत असे.

या घटनेवरून अतिसामान्य/नीरस गोष्टीसाठी hackneyed हे विशेषण अस्तित्वात आले. साहित्यात ते बऱ्यापैकी वापरतात. वापरून वापरून गुळगुळीत झालेल्या शब्दप्रयोग किंवा वाक्प्रचारांना hackneyed quotations/phrases असे म्हणतात.

aqua & hydro या दोन्हींचा अर्थ ‘पाणी’ हाच असला तरी खालील दोन शब्दांचा अर्थ वेगळ्या संदर्भात घेतला जातो :
aquaphobia
hydrophobia

aquaphobia : यामध्ये एखाद्या व्यक्तीला पाण्यात उतरण्याचीच नको इतकी भीती (त्यात बुडण्याच्या भावनेने)
वाटते. पाण्याच्या कुठल्याही साठयाबाबत हे होते.

hydrophobia : हे रेबीज या घातक रोगाचे लक्षण आहे. तेव्हा घशाचे स्नायू प्रचंड आकुंचित असल्यामुळे त्या व्यक्तीला कुठलाच द्रव पदार्थ प्यायला नको वाटून भीती निर्माण होते.

https://www.dictionary.com/browse/aquaphobia

cloves.jpg

हे दोन वेगळे पदार्थ एकाच चित्रात का घेतले असावेत ?
जरा विचार करून तर बघा..
..
..
..
..
या दोघांनाही एकच इंग्लिश शब्द आहे : clove

अर्थानुसार ती दोन स्वतंत्र नामे असून त्यांच्या व्युत्पत्ती वेगवेगळ्या आहेत :
लवंग : (Latin) clavus = a nail
लसणाची पाकळी : ( Old English) clufu = cleft, thing cloven.

ebook
हा एक सलग ५ अक्षरी शब्द म्हणून आता स्वीकारला गेला आहे :
https://dictionary.cambridge.org/dictionary/english/ebook
शब्दकोडे सोडवताना हे लक्षात घ्यावे लागते.

पण ebook का e-book यावर ब्रिटिश आणि अमेरिकी मतभेद आहेत.
(https://grammarist.com/style/e-book-ebook/)

तसेच,
email or e-mail च्या बाबतही !

clove - दोन स्वतंत्र नामे असून त्यांच्या व्युत्पत्ती वेगवेगळ्या आहेत >> भारीच! हे आवडलं.

weak point
त्याचा अर्थ संदर्भाने घ्यावा लागेल.
हे पहा : https://bruhadkosh.org/words?shodh=weak+point

मर्मस्थल = fig. a sore or sensitive point; the weak side.
दोन्ही दिलेत.

Pages