माध्यमिक शाळेत असताना आम्हाला रोजच्या वेळापत्रकात दोन मधल्या सुट्या असायच्या – एक लहान १५ मिनिटांची तर दुसरी मोठी ४५ मिनिटांची. मोठ्या सुटीमध्ये शाळेच्या ग्रंथालयात आमच्यासाठी वाचनाची सोय केलेली असे. तिथे बसून वाचताना समोरच्या भिंतीवर नजर जाई. तिथे मोठ्या व आकर्षक अक्षरात ‘ग्रंथ हेच गुरु’ हे वचन लिहिलेले होते. वाचनाच्या आवडीतून त्या वचनाची सत्यता पटत गेली, यात शंकाच नाही. मोठे होता होता मी विविध प्रकारचे तीन भाषांतील साहित्य वाचत गेलो आणि एका निष्कर्षाप्रत येउन ठेपलो. तो म्हणजे, या सर्व ग्रंथरूपी गुरूंचे गुरु म्हणजे शब्दकोश!
सुरवातीला वाचनात एखादा शब्द अडला, की त्याचा अर्थ पाहण्यापुरता शब्दकोश उघडला जाई. तो जमाना अर्थात फक्त छापील पुस्तकांचाच होता. त्या वयात मी शब्दकोशाच्या जाडजूड ‘प्रकृती’कडे कुतूहलाने बघत असे. शालेय जीवनात शब्दकोशाचा उपयोग शब्दार्थ पाहण्यापुरताच सीमित होता. तेव्हा इंग्लिश–मराठी, मराठी-इंग्लिश आणि हिंदी-मराठी हे शब्दकोश हाताळले जात.
महाविद्यालयीन जीवनात ‘ब्रिटीश लायब्ररी’ चा सभासद झाल्यावर काही थोर इंग्लिश लेखक वाचायला घेतले. तेव्हा इंग्लिश पुस्तकांचे वाचन म्हणजे एक अभ्यासच असायचा. हातात ते पुस्तक, टेबलावर इं-मराठी शब्दकोश आणि शब्दार्थ टिपून घ्यायला बाजूला वही-पेन. वाचलेल्या साहित्याची काही वडीलधाऱ्यांशी चर्चा होई. त्यात एका गृहस्थांनी सल्ला दिला, की आता शब्दार्थ पाहण्यासाठी तुमच्या शालेय शब्दकोशावर समाधान मानू नकोस; आता गरज आहे ती तू ‘Oxford’ ची कास धरण्याची.
मग मी Concise Oxford च्या इंग्लिश- इंग्लिश कोशाची खरेदी केली. सहज म्हणून हा कोश चाळू लागलो अन पहिल्या नजरेतच लक्षात आले, की हा निव्वळ शब्दकोश नसून साक्षात ज्ञानकोश आहे. त्यात एखाद्या शब्दाचे अनेक अर्थ देण्यासाठी पुस्तकाच्या पानाचा तब्बल एक स्तंभही खर्ची पडलेला दिसे. एखाद्या कठीण शब्दाचा अर्थ पाहण्यासाठी म्हणून कोश उघडला जाई आणि तो अर्थ पाहता पाहता एकातून दुसऱ्या व त्यातून तिसऱ्या शब्दात मी उड्या मारत असे. कित्येकदा शब्दार्थासाठी उघडलेला कोश पाहताना वाचनाचे मूळ पुस्तक बाजूलाच राही आणि बराच वेळ मी शब्दकोशातच मनसोक्त विहार करीत असे. शब्दाच्या अर्थाबरोबरच त्याचा उगम, ऐतिहासिक संदर्भ इत्यादी माहिती वाचून छान मनोरंजन होई.
बऱ्याचदा आपल्या नेहमीच्या वापरातले शब्दसुद्धा कोशात पाहण्यात मजा येते. उदाहरणार्थ ‘August’ हा शब्द पाहा. आता हे एका महिन्याचे नाव आहे हे शाळकरी पोरही सांगते. पण ते नाव रोमन साम्राज्याचा पहिला राजा ऑगस्टस सीझर याच्यावरून आहे, तसेच august चा दुसरा अर्थ ‘थोर’ असाही आहे हे ज्ञान आपल्याला शब्दकोशात डोकावल्याशिवाय कसे मिळेल? एखाद्या शब्दाला तर एकापेक्षा अनेक असे कित्येक अर्थ असतात आणि त्या अर्थांचा एकमेकाशी सुतराम संबंध नसतो. ‘set’ चे तब्बल १५६ प्रकारचे अर्थ आहेत हे जेव्हा आपल्याला कोशात दिसते तेव्हा मोठा अचंबा वाटतो.
एकच उच्चार पण भिन्न स्पेलिंग व अर्थ असणारे शब्द जेव्हा आपण कोशात पाहून पक्के करून घेतो तेव्हा होणारा आनंद काही वेगळाच असतो. सध्याच्या ‘ हॅलो, हाय’च्या युगात बहुतेकांना फोनवरचाच ‘हॅलो’ माहित असतो. पण, शब्दकोश बारकाईने पाहणाऱ्यालाच hallo, hallow & halo यांतील फरक समजलेले असतील.
आपल्या देशात गेल्या पंचवीस वर्षांत इंग्लिश माध्यमातून शालेय शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय दिसून येते. ही पिढी ‘स्पोकन इंग्लिश’ च्या बळावर येताजाता टूरटूर करीत असते. पण त्याचबरोबर त्यांचे स्पेलिंग व व्याकरण यांकडे कमालीचे दुर्लक्ष झालेले जाणवते. अशा काहींची फिरकी घ्यायला मला आवडते. त्यांना मी ‘फुलस्केप’ या परिचित शब्दाचे स्पेलिंग विचारतो. आतापर्यंत तरी मला हे अचूक स्पेलिंग सांगणारी व्यक्ती भेटलेली नाही. याचे स्पेलिंग आहे ‘foolscap’ आणि योग्य उच्चार आहे ‘फुल्झकॅप’. हे ज्ञान शब्दकोशाला आपला मित्र केल्याशिवाय प्राप्त होणे नाही! मोठ्या आकाराचा कागद म्हटल्यावर बहुतेकजण ‘full…’अशी सुरवात करतात अन fool होऊन बसतात! या शब्दाचा उगम तर किती मनोरंजक. Fool म्हणजे विदूषक. पुरातनकाळी विदूषक जी टोपी वापरत त्या टोपीचे चिन्ह ‘watermark’ म्हणून या कागदात उमटवलेले असे.
‘फुलस्केप’ वरून घडलेला एक किस्सा सांगतो. एका माध्यमिक शाळेत सत्राच्या पहिल्या दिवशी एक शिक्षिका विद्यार्थ्यांना म्हणाल्या, “हे बघा, सर्वांनी ‘फुलस्केप’ वह्या आणायच्या आहेत, ‘हाफस्केप’ वह्या आणलेल्या मला अजिबात चालणार नाहीत!” एखादा शब्द नीट न शिकून घेतल्याचे परिणाम एका पिढीकडून पुढच्यांकडे कसे संक्रमित होतात याचे हे उदाहरण.
गडद काचांच्या चष्म्याला आपण ‘गॉगल’ म्हणतो यात नवीन काहीच नाही. पण या शब्दाचे स्पेलिंग goggles असून ते अनेकवचनी नाम म्हणूनच वापरायचे असते ही दृष्टी मला शब्दकोशानेच दिली. आपल्या समाजात एखाद्याने ‘लेस्बिअन’ हा शब्द जरी उच्चारला तर आपण पटकन चमकून त्याच्याकडे पाहतो. जर उत्सुकता म्हणून आपण हा शब्द कोशात पाहिला तर त्याचा उगम पाहून आपली करमणूक होते. ‘lesbos’ नावाच्या बेटावर ‘साफो’ नावाची कवयित्री राहत असे आणि ती समलिंगी संबंधात गुंतल्याचा लोकांना संशय होता. ही माहिती समजल्यावर या शब्दाकडे आपण अश्लील म्हणून न पाहता कुतूहलाने पाहू लागतो.
आजकाल आपले एखादे कार्यालयीन काम होणे जर एखाद्या स्त्रीच्या हातात असेल तर तिच्या तेथील दर्जाचा विचार न करता आपण तिच्यापुढे सारखे ‘Madam, Madam’ करीत असतो. आता ‘madam’ चे कोशातील दोन अर्थ बघा. या शब्दाचा उगम फ्रेंचमधून आहे.त्याचा पहिला अर्थ ‘बाईसाहेब’ असा तर दुसरा चक्क ‘वेश्यागृहाची मालकीण’ असा आहे! तसेच या शब्दाचे अनेकवचन( madams असे नसून) फ्रेंच पद्धतीने Mesdames असे आहे. सध्या सर्वत्र बोकाळलेल्या मॅडमांनी हा शब्द पूर्णपणे समजून घ्यायला काही हरकत नाही.
वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यापासून ते डॉक्टर होऊन तीस वर्षे उलटून गेल्यावरही वैद्यकीय शब्दकोश हा तर माझा जिवलग मित्र आहे. त्याच्या पातळ पांढऱ्याशुभ्र कागदावर परदेशात केलेली सुंदर छपाई, त्याचा लठ्ठ पण मोहक आकार, त्यातील अवघड शब्दांची केलेली सुरेख फोड, शब्दार्थांचा पाडलेला कीस आणि शब्दानुरूप चित्रे ही त्याची वैशिष्ट्ये मला नेहमीच मोहित करतात. सामान्य वाचकांसाठी त्यातले दोन मनोरंजक शब्द सांगतो:
१. AC/DC : खरे तर आपल्या सामान्यज्ञानानुसार हे विद्युत प्रवाहाचे दोन प्रकार आहेत. पण वैद्यकीय कोशातील त्याचा अर्थ ‘bisexual individual’ असा वाचल्यावर आपण कपाळावर हात मारून घेतो!
२. Hartnup disease : हा एक आनुवंशिक आजार आहे. आता Hartnup हे बहुधा ज्या शास्त्रज्ञाने तो आजार शोधला त्याचे नाव असेल असा अंदाज आपण बांधतो. पण शब्दकोशाचा पाहा काय सांगतो ते. Hartnup हा शास्त्रज्ञ नसून, तो आजार ज्या रुग्णामध्ये पहिल्यांदा आढळला त्याचे आडनाव आहे. १९५० च्या सुमारास ब्रिटनमधील श्री. हार्टनप यांनी आपल्या cousinशी लग्न केले होते. त्या दाम्पत्याला झालेल्या आठ अपत्यांपैकी चौघांमध्ये हा आजार आढळून आला.
मराठी-मराठी कोश हाताळणे ही सुद्धा एक चांगली करमणूक आहे. अर्थात इंग्लिश-इंग्लिशच्या तुलनेत या कोशाचे स्वरूप त्रोटक वाटते, हे कबूल करावे लागेल. बऱ्याचदा मराठी कोश बघण्याच्या बाबतीत मराठी माणूस उदासीन असतो. आपल्या दैनंदिन वापरातील काही मराठी शब्दांचा खरा अर्थ हा कोश पाहिल्यावरच आपल्याला समजतो. अन्यथा त्याऐवजी काहीतरी चुकीची कल्पना किंवा अर्धवट माहिती आपल्या डोक्यात असते. एकदा एका कॉलेजच्या तरुणाला मी ‘आदिवासी’ चा अर्थ विचारला. क्षणाचाही विलंब न लावता तो म्हणाला, “ते म्हणजे अति मागास गरीब लोक”. त्याच्या म्हणण्यात जरी तथ्य असले तरी खरा अर्थ तो नाही. ‘आदी’= मूळ व ‘वासी’= राहणारे. म्हणजेच, एखाद्या प्रदेशातील मूळ रहिवासी.
आपल्याकडे पाटील, कुलकर्णी, कांबळे ही अगदी सर्रास आढळणारी आडनावे. एकदा सहज म्हणून ‘कुलकर्णी’ ची व्युत्पत्ती कोशात बघितली आणि स्तिमित झालो. ती बघण्यापूर्वी, ‘कुलकर्णी’ हा शब्द अस्सल मराठीच – एवढेच काय, पण पक्का पुणेरीच- या भ्रमात मी होतो. शब्दकोशाने मला सांगितले, की हा शब्द मूळ तेलुगु (कुळकरणी) आहे. कुळ = शेतकरी आणि करण = हिशेब. हे वाचल्यावर मला एका ‘कुळाचा’ शोध तर लागलाच आणि त्याचबरोबर माझ्या भाषिक अस्मितेचे कुंपण गळून पडले, हे नक्की!
शब्दकोशांमध्ये काही व्यवहारोपयोगी परिशिष्टेही असतात. निरनिराळ्या लघुरुपांचे (acronyms) पूर्ण रूप देणारे परिशिष्ट हे त्यातले एक ठळक उदाहरण. सध्याच्या संगणकीय युगात कित्येक नवीन लघुरुपांचा सुळसुळाट झालेला आहे. अशी काही लघुरूपे आपल्या डोळ्यांसमोर सतत आल्याने हळूहळू आपल्याला ते जणू काही शब्दच आहेत असे वाटू लागते. एक उदाहरण देतो. सध्या कोणताही online व्यवहार करताना आपल्याला सतत भेटणारे एक लघुरूप म्हणजे ‘CAPTCHA’. त्याचे दीर्घरूप किती मनोरंजक आहे आणि त्यामागचा तांत्रिक इतिहास काय आहे, ते आपल्याला कोश पाहिल्याशिवाय कळणे नाही!
आपले ज्ञान समृद्ध करतानाच आपल्यावर मनोरंजनाचाही शिडकावा करणारे विविध शब्दकोश आपल्या वापरात जरूर असावेत. माझ्याकडे विविध प्रकारचे सुमारे डझनभर कोश आहेत. आंतरजालाच्या व्यापक प्रसारानंतर आता अनेक प्रकारचे कोश जालावर उपलब्ध आहेत. त्यामुळे जाडजूड वजनाचे छापील कोश आता एखाद्याच्या वैयक्तिक ग्रंथसंग्रहात कमी दिसतात. पण, माझी पिढी ही मुळात अशा छापील कोशांवर ‘पोसली’ गेली असल्याने माझ्याकडे ते आजही आहेत. माझे त्यांच्यावर इतके प्रेम आहे की मी त्यांना माझे कुटुंबघटकच मानतो! माझ्या घरभर ते विखुरलेले आहेत. त्यापैके एक-दोघांनी तर माझ्या पलंगावर विसावण्याचा मान पटकावलाय. वेळप्रसंगी माझ्या एकटेपणात ते माझी सुरेख सोबत करतात. धष्टपुष्ट छापील कोशाला प्रेमाने उराशी कवटाळण्याची मजा काही औरच असते. त्याची सर जालकोशाच्या ‘सर्च इंजिन’ला कशी येईल?
एखादे दिवशी जर हाताशी वाचण्यासारखे काही नसेल तर मी खुशाल एखादा कोश हाती घेऊन त्यात डोके खुपसून बसतो. दिवसाकाठी निदान एकतरी नवीन शब्द मी कोशांमधून शिकतो व समजावून घेतो. ग्रंथाचे गुरु असलेल्या शब्दकोशांनी मला ज्ञान आणि मनोरंजन या दोन्ही पातळ्यांवर अतीव समाधान दिलेले असल्याने मी त्यांचा कायमचा ऋणी आहे.
***********************************************************************************************************
( टीप : माझ्या या लेखाची पूर्वप्रसिद्धी : ‘अंतर्नाद’ मासिक. काही सुधारणांसह येथे प्रकाशित )
**उच्चार "हहोबा
**उच्चार "हहोबा
>> ओहो! धन्यवाद
स्कीइंग या खेळामध्ये एक शर्यत
स्कीइंग या खेळामध्ये एक शर्यत असते. त्याच्यासाठी जो विशिष्ट शब्द आहे तो कधीच ऐकला नव्हता. तसेही या खेळाशी कधी संबंध आलेला नाही. त्यामुळे त्या शब्दशोधाने खूप झुंजवले. पण अखेर मटका लागला व हे उत्तर आले:
….
….
…
slalom
= Sloping track
हा वेश आपल्याला सहसा परिचित
हा वेश आपल्याला सहसा परिचित नसतो. तो मूळचा दक्षिण अमेरिकेतील आहे.
त्याचे नाव वर्डलमधील शब्दशोधातून समजले :
poncho
हा मूळचा मेक्सिकन पोषाख आहे,
हा मूळचा मेक्सिकन पोषाख आहे, स्पेनमधेही हा प्रचलित आहे. त्यांची एक टोपीही असते, त्याला ते सॉम्ब्रेरो म्हणतात. हे दोन्ही एकत्र घातलेलं बघितलं आहे.
हा 1850च्या आसपास मिलिटरीत कधीतरीचा गणवेश म्हणून सुरू केला होता. पॉन्चोज अनेक प्रकारचे असतात, सुती, विणलेले, पावसाळ्यातील रेनकोट सारखे, भरतकाम केलेले, सहसा आकर्षक रंगसंगती जमून आलेली असते. मेक्सिकोचा राष्ट्रीय किंवा सांस्कृतिक पोषाख म्हणता येईल.
तुम्ही फार उत्साही आहात, कौतुक वाटते.
धन्यवाद ! काही वैशिष्ट्यपूर्ण
धन्यवाद ! काही वैशिष्ट्यपूर्ण दिसले की इथे नोंदवतो.
मेक्सिकोचा राष्ट्रीय किंवा सांस्कृतिक पोषाख >>
होय, हा वेश परिधान केलेले आंतरजालावरचे काही समूह फोटो छान आहेत
milliner
milliner
हा तसा अपरिचित पण मजेदार शब्द !
सुरुवातीला त्याच्याकडे पाहिल्यावर वाटले की millionaire शी त्याचा काही संबंध आहे काय ? पण बिलकुल नाही.
Milliner याचा उगम मजेदार आहे. Milan हे इटलीतले एक गाव, जे आकर्षक आणि कलाकुसरीच्या वस्तूंसाठी प्रसिद्ध होते. तिथून आणलेल्या महिलांच्या आकर्षक वस्तू (हॅट्स वगैरे) जो विकायचा त्याला हे नाव पडले. सुरुवातीला हे नाव पुरुषांसाठी होते. कालांतराने तशा महिला विक्रेतीसाठी हे नाव रूढ झाले.
हा धागा खुप आवडतो.
हा धागा खुप आवडतो.
मानवी आहारशैलीच्या संदर्भात
मानवी आहारशैलीच्या संदर्भात pescatarian हा शब्द अलीकडे वाचला. शब्दकोशांमधला तो बऱ्यापैकी तरुण शब्द आहे (1990).
या निमित्ताने आहारशैलीचे ढोबळ मानाने जे ६ प्रमुख प्रकार आहेत त्यांची इंग्लिश नावे अशी :
• Vegan
• Vegetarian
• Pescatarian = यांना खाण्यासाठी मासे चालतात परंतु प्राण्यांचे मांस नाही
• Omnivore = सर्वभक्षक
• Keto dietarian = आहारातील मेदाचे प्रमाण भरपूर परंतु कर्बोदकांचे प्रमाण अत्यंत कमी
• Paleo dietarian = अश्मयुगीन मानवाप्रमाणे आहार. यात मांस,मासे, भाज्या आणि फळांचा समावेश. परंतु कुठलाही दुग्धजन्य प्रकार किंवा धान्य खात नाहीत.
Archi ही एक Caucasian गटातील
Archi ही एक Caucasian गटातील भाषा असून रशियाच्या काही प्रांतात बोलली जाते.
तिची काही वैशिष्ट्ये अफलातून आहेत.
तिच्यात क्रियापदपूर्व आणि क्रियापदोत्तर असे प्रत्यय लावल्यानंतर मूळ क्रियापद 1,502,839 इतक्या रूपांमध्ये वापरता येते !
cyesis हा शब्द इंग्लिशने
cyesis (= गरोदरपण) हा शब्द इंग्लिशने ग्रीक भाषेतून स्वीकारलेला आहे. हा शब्द आता वापरत नसतो, परंतु त्याला एक पूर्वप्रत्यय लावल्यावर,
pseudocyesis हा जो शब्द होतो,
तो वैद्यकात वापरात आहे.
याचा अर्थ "काल्पनिक गरोदरपण" असा आहे.
हा एक दुर्मिळ मनोविकार आहे. ज्या स्त्रीला स्वतःचे मूल व्हावे अशी तीव्र इच्छा असते परंतु ते होत नसते, तिच्या बाबतीत हा आजार होतो.
यामध्ये पाळी बंद होणे, पोट फुगणे (फुगवणे), उलट्या काढणे इथपासून ते अगदी प्रसववेदनांपर्यंत ‘आभासी’ लक्षणे दिसतात.
दोन संगणकीय शब्द email हा
दोन संगणकीय शब्द
email हा आता सलग शब्द म्हणून (नाम व क्रियापद दोन्ही) रूढ झालेला आहे.
मध्यंतरी पाच अक्षरी वर्डलमध्ये तो ओळखायला दिला होता.
शब्दकोशात त्याची तिन्ही रूपे दिलेली दिसतात:
email, e-mail & E-mail
https://www.collinsdictionary.com/dictionary/english/email
*******
vlog (= video + blog)
याचे वैशिष्ट्य म्हणजे v नंतर कोणताही स्वर न येता लगेच दुसरे व्यंजन आले आहे.
v ने सुरु होणारा असा दुसरा शब्द आहे का ?
( w ने सुरु होणारे बरेच असतात).
कारचा आवाज vroom असा लिहिला
कारचा आवाज vroom असा लिहिला जातो, त्यात व्यंजन येते. केंब्रिजादि शब्दकोशांत ऑनलाइन तरी दिसतो आहे हा शब्द. Onomatopoeia (नादानुकृत शब्द) असावा हा.
वा मस्त शब्द आहे !
वा, मस्त शब्द आहे !
vlog उच्चारताना जिभेला चांगलेच कष्ट पडतात...
vroom त्यामानाने सोपा जातो.
खरंच की! आपल्याकडेही वृ, व्र
खरंच की! आपल्याकडेही वृ, व्र वगैरे असलेले शब्द आहेत (वृत्त, व्रत वगैरे). व्ल असलेले शब्द आहे का, काही कल्पना नाही.
Vladimir Putin
v ने सुरु होणारा असा दुसरा शब्द आहे का ?>>>>>
Vladimir Putin
Vlog शब्द नाही तर slang वाटतं, त्याला शुलेचे नियम नसावेत.
हे व्यंजनानंतर व्यंजनाचे उदा.
इंग्रजी G नंतर N असलेले शब्द आहेत, तेथे G शांत होतो.
Align, Gnaw
G शांत होतो. >> बरोबर.
G शांत होतो. >> बरोबर.
तसेच write मध्ये डब्ल्यू शांत होतो.
परंतु vlog मध्ये v >> उच्चारीत आहे
अरे हां
अरे हां
vlog ला अधिकृत नाम व
vlog ला अधिकृत नाम व क्रियापदाचा दर्जा आहे.
slang असे कुठे म्हटले नाहीये
मला ते ओढूनताणून तयार
मला ते ओढूनताणून तयार केल्यासारखे वाटते म्हणून slang वाटलं
Video चं V व log .
नवं तंत्रज्ञान. नव्या गोष्टी
नवं तंत्रज्ञान. नव्या गोष्टी येतील तशी त्यांच्यासाठी नवी नावं तयार करायला लागतीलच.
-----
हे इथे आधी आले आहे का माहीत नाही.
drone = a male bee.
Ghosting हे थोडं नवीन
Ghosting हे थोडं नवीन क्रियापद ऐकलं आहे.
न सांगता सवरता गायब होणं.
Gaslighting बेमालूमपणे समोरच्याचा आत्मविश्वास घालवणे.
Permacrisis प्रदीर्घकाळाची अनिश्चितता. (Permanent crisis)
Nomophobia मोबाईल न बघता आल्याने येणारी भीती व अस्वस्थता. हे तर घरोघरी असेल.
छान आहेत वरील सर्व शब्द.
छान आहेत वरील सर्व शब्द. अलीकडे संयोग शब्दांची तर खूप चलती आहे.
.....
मराठीतल्या स्वप्नरंजन, स्मरणरंजन यांच्या धर्तीवर मला माहितीरंजन असा एक शब्द सुचलाय. तो बरोबर वाटतो का ?
इंग्लिशमध्ये infotainment हा आलेलाच आहे.
ज्ञानरंजन असा शब्द वापरात आहे
ज्ञानरंजन असा शब्द वापरात आहे.
माहिती information
ज्ञान knowledge असा भेद असला तरी तो सवयीचा झाला आहे.
ज्ञानरंजन >>>> उत्तम !
ज्ञानरंजन >>>> उत्तम !
strong>घेराव या शब्दाचा उगम
घेराव या शब्दाचा उगम बंगालीमधून आहे.
हा शब्द मराठी आणि इंग्रजी भाषेने सुद्धा (gherao) स्वीकारलेला आहे.
कामगार क्षेत्रात घेराव ही संकल्पना सर्वप्रथम पश्चिम बंगालच्या सुबोध बॅनर्जी या तत्कालीन मंत्र्यांनी आणली.
वाचतोय. छान माहिती मिळाली.
वाचतोय. छान माहिती मिळाली.
>> vlog, vroom >>>>> मस्त !
इंग्लिशमध्ये a या अक्षराने
इंग्लिशमध्ये a या अक्षराने अंत होणारे शब्द ऐकायला गोड वाटतात.
nebula हा असाच एक शब्द. त्याचा अर्थ वायूचा किंवा धूलिकणांचा प्रकाशमान पट्टा.
chaos हा एक परिचयातील शब्द.
या दोन शब्दांचा संयोग करून
nebulochaotic
हा एक सुंदर शब्द तयार झाला आहे.
मनाच्या प्रचंड गोंधळलेल्या अवस्थेसाठी तो वापरतात.
चित्रातील हातोडा आणि कोर्ट
चित्रातील हातोडा आणि कोर्ट यांचे अतूट नाते आहे. तो पाहिला की आपल्याला “ऑर्डर, ऑर्डर” या शब्दांची आठवण होते. याला इंग्लिशमध्ये gavel म्हणतात. त्या शब्दाचा उगम रंजक असून त्याबद्दल दोन मते आहेत :
१. to gavel = give/receive
पूर्वीच्या इंग्लंडमध्ये एखाद्या कामाचे भाडे रोख रकमेशिवाय अन्यप्रकारे द्यायचे असेल तर त्यासंबंधीचे करार भूमीविषयक कोर्टांमध्ये होत. त्याप्रसंगी हातोड्याने आवाज काढायची पद्धत होती.
२. gavel हे गवंडीकामाचे एक हत्यार देखील असते. त्यावरूनही हे नाम आले असू शकेल.
अमेरिकी संसदेतील gavel मात्र वेगळ्या प्रकारचे असतात. त्यांचा आकार वेगळा असून त्यांना हातोड्याचा दांडा नसतो.
bomb म्हटल्यावर आपल्याला
bomb म्हटल्यावर आपल्याला एकदम स्फोटकच आठवते. परंतु हाँगकाँगच्या संस्कृतीत याला एक वेगळाच अर्थ आहे.
जेव्हा एखाद्या लग्नाचे आमंत्रण लाल रंगाच्या कार्डवर छापून ते कार्ड लाल रंगाच्या पाकिटातून एखाद्याला दिले जाते, त्याला red bomb असे म्हणतात. अशी व्यक्ती ही यजमान कुटुंबीयांच्या अगदी जवळची व्यक्ती असते
ज्या व्यक्तीला असा red bomb मिळतो त्याने त्या लग्नाला जाताना वधूवरांना मोठ्या रकमेचे रोख बक्षीस द्यायचे असते !
whodunnit /whodunit
whodunnit /whodunit
हा एक मस्त अनौपचारिक शब्द असून ते
"who [has] done it?"
याचे लघुरूप आहे.
अर्थ :
खुनाचे रहस्य असलेली कथा किंवा नाटक. यामध्ये वाचक किंवा प्रेक्षक शेवटपर्यंत, "खुनी कोण" या शोधात गढून गेलेला असतो.
Pages