शब्दकोशांच्या मनोरंजक विश्वात

Submitted by कुमार१ on 22 June, 2017 - 22:44

माध्यमिक शाळेत असताना आम्हाला रोजच्या वेळापत्रकात दोन मधल्या सुट्या असायच्या – एक लहान १५ मिनिटांची तर दुसरी मोठी ४५ मिनिटांची. मोठ्या सुटीमध्ये शाळेच्या ग्रंथालयात आमच्यासाठी वाचनाची सोय केलेली असे. तिथे बसून वाचताना समोरच्या भिंतीवर नजर जाई. तिथे मोठ्या व आकर्षक अक्षरात ‘ग्रंथ हेच गुरु’ हे वचन लिहिलेले होते. वाचनाच्या आवडीतून त्या वचनाची सत्यता पटत गेली, यात शंकाच नाही. मोठे होता होता मी विविध प्रकारचे तीन भाषांतील साहित्य वाचत गेलो आणि एका निष्कर्षाप्रत येउन ठेपलो. तो म्हणजे, या सर्व ग्रंथरूपी गुरूंचे गुरु म्हणजे शब्दकोश!

सुरवातीला वाचनात एखादा शब्द अडला, की त्याचा अर्थ पाहण्यापुरता शब्दकोश उघडला जाई. तो जमाना अर्थात फक्त छापील पुस्तकांचाच होता. त्या वयात मी शब्दकोशाच्या जाडजूड ‘प्रकृती’कडे कुतूहलाने बघत असे. शालेय जीवनात शब्दकोशाचा उपयोग शब्दार्थ पाहण्यापुरताच सीमित होता. तेव्हा इंग्लिश–मराठी, मराठी-इंग्लिश आणि हिंदी-मराठी हे शब्दकोश हाताळले जात.
महाविद्यालयीन जीवनात ‘ब्रिटीश लायब्ररी’ चा सभासद झाल्यावर काही थोर इंग्लिश लेखक वाचायला घेतले. तेव्हा इंग्लिश पुस्तकांचे वाचन म्हणजे एक अभ्यासच असायचा. हातात ते पुस्तक, टेबलावर इं-मराठी शब्दकोश आणि शब्दार्थ टिपून घ्यायला बाजूला वही-पेन. वाचलेल्या साहित्याची काही वडीलधाऱ्यांशी चर्चा होई. त्यात एका गृहस्थांनी सल्ला दिला, की आता शब्दार्थ पाहण्यासाठी तुमच्या शालेय शब्दकोशावर समाधान मानू नकोस; आता गरज आहे ती तू ‘Oxford’ ची कास धरण्याची.
मग मी Concise Oxford च्या इंग्लिश- इंग्लिश कोशाची खरेदी केली. सहज म्हणून हा कोश चाळू लागलो अन पहिल्या नजरेतच लक्षात आले, की हा निव्वळ शब्दकोश नसून साक्षात ज्ञानकोश आहे. त्यात एखाद्या शब्दाचे अनेक अर्थ देण्यासाठी पुस्तकाच्या पानाचा तब्बल एक स्तंभही खर्ची पडलेला दिसे. एखाद्या कठीण शब्दाचा अर्थ पाहण्यासाठी म्हणून कोश उघडला जाई आणि तो अर्थ पाहता पाहता एकातून दुसऱ्या व त्यातून तिसऱ्या शब्दात मी उड्या मारत असे. कित्येकदा शब्दार्थासाठी उघडलेला कोश पाहताना वाचनाचे मूळ पुस्तक बाजूलाच राही आणि बराच वेळ मी शब्दकोशातच मनसोक्त विहार करीत असे. शब्दाच्या अर्थाबरोबरच त्याचा उगम, ऐतिहासिक संदर्भ इत्यादी माहिती वाचून छान मनोरंजन होई.

बऱ्याचदा आपल्या नेहमीच्या वापरातले शब्दसुद्धा कोशात पाहण्यात मजा येते. उदाहरणार्थ ‘August’ हा शब्द पाहा. आता हे एका महिन्याचे नाव आहे हे शाळकरी पोरही सांगते. पण ते नाव रोमन साम्राज्याचा पहिला राजा ऑगस्टस सीझर याच्यावरून आहे, तसेच august चा दुसरा अर्थ ‘थोर’ असाही आहे हे ज्ञान आपल्याला शब्दकोशात डोकावल्याशिवाय कसे मिळेल? एखाद्या शब्दाला तर एकापेक्षा अनेक असे कित्येक अर्थ असतात आणि त्या अर्थांचा एकमेकाशी सुतराम संबंध नसतो. ‘set’ चे तब्बल १५६ प्रकारचे अर्थ आहेत हे जेव्हा आपल्याला कोशात दिसते तेव्हा मोठा अचंबा वाटतो.
एकच उच्चार पण भिन्न स्पेलिंग व अर्थ असणारे शब्द जेव्हा आपण कोशात पाहून पक्के करून घेतो तेव्हा होणारा आनंद काही वेगळाच असतो. सध्याच्या ‘ हॅलो, हाय’च्या युगात बहुतेकांना फोनवरचाच ‘हॅलो’ माहित असतो. पण, शब्दकोश बारकाईने पाहणाऱ्यालाच hallo, hallow & halo यांतील फरक समजलेले असतील.

आपल्या देशात गेल्या पंचवीस वर्षांत इंग्लिश माध्यमातून शालेय शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय दिसून येते. ही पिढी ‘स्पोकन इंग्लिश’ च्या बळावर येताजाता टूरटूर करीत असते. पण त्याचबरोबर त्यांचे स्पेलिंग व व्याकरण यांकडे कमालीचे दुर्लक्ष झालेले जाणवते. अशा काहींची फिरकी घ्यायला मला आवडते. त्यांना मी ‘फुलस्केप’ या परिचित शब्दाचे स्पेलिंग विचारतो. आतापर्यंत तरी मला हे अचूक स्पेलिंग सांगणारी व्यक्ती भेटलेली नाही. याचे स्पेलिंग आहे ‘foolscap’ आणि योग्य उच्चार आहे ‘फुल्झकॅप’. हे ज्ञान शब्दकोशाला आपला मित्र केल्याशिवाय प्राप्त होणे नाही! मोठ्या आकाराचा कागद म्हटल्यावर बहुतेकजण ‘full…’अशी सुरवात करतात अन fool होऊन बसतात! या शब्दाचा उगम तर किती मनोरंजक. Fool म्हणजे विदूषक. पुरातनकाळी विदूषक जी टोपी वापरत त्या टोपीचे चिन्ह ‘watermark’ म्हणून या कागदात उमटवलेले असे.
‘फुलस्केप’ वरून घडलेला एक किस्सा सांगतो. एका माध्यमिक शाळेत सत्राच्या पहिल्या दिवशी एक शिक्षिका विद्यार्थ्यांना म्हणाल्या, “हे बघा, सर्वांनी ‘फुलस्केप’ वह्या आणायच्या आहेत, ‘हाफस्केप’ वह्या आणलेल्या मला अजिबात चालणार नाहीत!” एखादा शब्द नीट न शिकून घेतल्याचे परिणाम एका पिढीकडून पुढच्यांकडे कसे संक्रमित होतात याचे हे उदाहरण.

गडद काचांच्या चष्म्याला आपण ‘गॉगल’ म्हणतो यात नवीन काहीच नाही. पण या शब्दाचे स्पेलिंग goggles असून ते अनेकवचनी नाम म्हणूनच वापरायचे असते ही दृष्टी मला शब्दकोशानेच दिली. आपल्या समाजात एखाद्याने ‘लेस्बिअन’ हा शब्द जरी उच्चारला तर आपण पटकन चमकून त्याच्याकडे पाहतो. जर उत्सुकता म्हणून आपण हा शब्द कोशात पाहिला तर त्याचा उगम पाहून आपली करमणूक होते. ‘lesbos’ नावाच्या बेटावर ‘साफो’ नावाची कवयित्री राहत असे आणि ती समलिंगी संबंधात गुंतल्याचा लोकांना संशय होता. ही माहिती समजल्यावर या शब्दाकडे आपण अश्लील म्हणून न पाहता कुतूहलाने पाहू लागतो.

आजकाल आपले एखादे कार्यालयीन काम होणे जर एखाद्या स्त्रीच्या हातात असेल तर तिच्या तेथील दर्जाचा विचार न करता आपण तिच्यापुढे सारखे ‘Madam, Madam’ करीत असतो. आता ‘madam’ चे कोशातील दोन अर्थ बघा. या शब्दाचा उगम फ्रेंचमधून आहे.त्याचा पहिला अर्थ ‘बाईसाहेब’ असा तर दुसरा चक्क ‘वेश्यागृहाची मालकीण’ असा आहे! तसेच या शब्दाचे अनेकवचन( madams असे नसून) फ्रेंच पद्धतीने Mesdames असे आहे. सध्या सर्वत्र बोकाळलेल्या मॅडमांनी हा शब्द पूर्णपणे समजून घ्यायला काही हरकत नाही.

वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यापासून ते डॉक्टर होऊन तीस वर्षे उलटून गेल्यावरही वैद्यकीय शब्दकोश हा तर माझा जिवलग मित्र आहे. त्याच्या पातळ पांढऱ्याशुभ्र कागदावर परदेशात केलेली सुंदर छपाई, त्याचा लठ्ठ पण मोहक आकार, त्यातील अवघड शब्दांची केलेली सुरेख फोड, शब्दार्थांचा पाडलेला कीस आणि शब्दानुरूप चित्रे ही त्याची वैशिष्ट्ये मला नेहमीच मोहित करतात. सामान्य वाचकांसाठी त्यातले दोन मनोरंजक शब्द सांगतो:

१. AC/DC : खरे तर आपल्या सामान्यज्ञानानुसार हे विद्युत प्रवाहाचे दोन प्रकार आहेत. पण वैद्यकीय कोशातील त्याचा अर्थ ‘bisexual individual’ असा वाचल्यावर आपण कपाळावर हात मारून घेतो!
२. Hartnup disease : हा एक आनुवंशिक आजार आहे. आता Hartnup हे बहुधा ज्या शास्त्रज्ञाने तो आजार शोधला त्याचे नाव असेल असा अंदाज आपण बांधतो. पण शब्दकोशाचा पाहा काय सांगतो ते. Hartnup हा शास्त्रज्ञ नसून, तो आजार ज्या रुग्णामध्ये पहिल्यांदा आढळला त्याचे आडनाव आहे. १९५० च्या सुमारास ब्रिटनमधील श्री. हार्टनप यांनी आपल्या cousinशी लग्न केले होते. त्या दाम्पत्याला झालेल्या आठ अपत्यांपैकी चौघांमध्ये हा आजार आढळून आला.

मराठी-मराठी कोश हाताळणे ही सुद्धा एक चांगली करमणूक आहे. अर्थात इंग्लिश-इंग्लिशच्या तुलनेत या कोशाचे स्वरूप त्रोटक वाटते, हे कबूल करावे लागेल. बऱ्याचदा मराठी कोश बघण्याच्या बाबतीत मराठी माणूस उदासीन असतो. आपल्या दैनंदिन वापरातील काही मराठी शब्दांचा खरा अर्थ हा कोश पाहिल्यावरच आपल्याला समजतो. अन्यथा त्याऐवजी काहीतरी चुकीची कल्पना किंवा अर्धवट माहिती आपल्या डोक्यात असते. एकदा एका कॉलेजच्या तरुणाला मी ‘आदिवासी’ चा अर्थ विचारला. क्षणाचाही विलंब न लावता तो म्हणाला, “ते म्हणजे अति मागास गरीब लोक”. त्याच्या म्हणण्यात जरी तथ्य असले तरी खरा अर्थ तो नाही. ‘आदी’= मूळ व ‘वासी’= राहणारे. म्हणजेच, एखाद्या प्रदेशातील मूळ रहिवासी.

आपल्याकडे पाटील, कुलकर्णी, कांबळे ही अगदी सर्रास आढळणारी आडनावे. एकदा सहज म्हणून ‘कुलकर्णी’ ची व्युत्पत्ती कोशात बघितली आणि स्तिमित झालो. ती बघण्यापूर्वी, ‘कुलकर्णी’ हा शब्द अस्सल मराठीच – एवढेच काय, पण पक्का पुणेरीच- या भ्रमात मी होतो. शब्दकोशाने मला सांगितले, की हा शब्द मूळ तेलुगु (कुळकरणी) आहे. कुळ = शेतकरी आणि करण = हिशेब. हे वाचल्यावर मला एका ‘कुळाचा’ शोध तर लागलाच आणि त्याचबरोबर माझ्या भाषिक अस्मितेचे कुंपण गळून पडले, हे नक्की!

शब्दकोशांमध्ये काही व्यवहारोपयोगी परिशिष्टेही असतात. निरनिराळ्या लघुरुपांचे (acronyms) पूर्ण रूप देणारे परिशिष्ट हे त्यातले एक ठळक उदाहरण. सध्याच्या संगणकीय युगात कित्येक नवीन लघुरुपांचा सुळसुळाट झालेला आहे. अशी काही लघुरूपे आपल्या डोळ्यांसमोर सतत आल्याने हळूहळू आपल्याला ते जणू काही शब्दच आहेत असे वाटू लागते. एक उदाहरण देतो. सध्या कोणताही online व्यवहार करताना आपल्याला सतत भेटणारे एक लघुरूप म्हणजे ‘CAPTCHA’. त्याचे दीर्घरूप किती मनोरंजक आहे आणि त्यामागचा तांत्रिक इतिहास काय आहे, ते आपल्याला कोश पाहिल्याशिवाय कळणे नाही!

आपले ज्ञान समृद्ध करतानाच आपल्यावर मनोरंजनाचाही शिडकावा करणारे विविध शब्दकोश आपल्या वापरात जरूर असावेत. माझ्याकडे विविध प्रकारचे सुमारे डझनभर कोश आहेत. आंतरजालाच्या व्यापक प्रसारानंतर आता अनेक प्रकारचे कोश जालावर उपलब्ध आहेत. त्यामुळे जाडजूड वजनाचे छापील कोश आता एखाद्याच्या वैयक्तिक ग्रंथसंग्रहात कमी दिसतात. पण, माझी पिढी ही मुळात अशा छापील कोशांवर ‘पोसली’ गेली असल्याने माझ्याकडे ते आजही आहेत. माझे त्यांच्यावर इतके प्रेम आहे की मी त्यांना माझे कुटुंबघटकच मानतो! माझ्या घरभर ते विखुरलेले आहेत. त्यापैके एक-दोघांनी तर माझ्या पलंगावर विसावण्याचा मान पटकावलाय. वेळप्रसंगी माझ्या एकटेपणात ते माझी सुरेख सोबत करतात. धष्टपुष्ट छापील कोशाला प्रेमाने उराशी कवटाळण्याची मजा काही औरच असते. त्याची सर जालकोशाच्या ‘सर्च इंजिन’ला कशी येईल?

एखादे दिवशी जर हाताशी वाचण्यासारखे काही नसेल तर मी खुशाल एखादा कोश हाती घेऊन त्यात डोके खुपसून बसतो. दिवसाकाठी निदान एकतरी नवीन शब्द मी कोशांमधून शिकतो व समजावून घेतो. ग्रंथाचे गुरु असलेल्या शब्दकोशांनी मला ज्ञान आणि मनोरंजन या दोन्ही पातळ्यांवर अतीव समाधान दिलेले असल्याने मी त्यांचा कायमचा ऋणी आहे.
***********************************************************************************************************
( टीप : माझ्या या लेखाची पूर्वप्रसिद्धी : ‘अंतर्नाद’ मासिक. काही सुधारणांसह येथे प्रकाशित )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेवटी oo येणार हे स्पष्ट झाले होते.
हा नवा शब्द समजल्यावर आपल्या खायच्या काजूची आठवण झाली Happy

हा शब्द ऐकला आहे. तो अधिक व्यापक अर्थाने वापरला जात असावा. म्हणजे नुसताच ओव्हरडोस नव्हे, औषधोपचारांचा अतिरेक.

ओव्हरडोस - एखादे औषध प्रमाणाबाहेर घेणे असा अर्थ लावला.

die
हे जेव्हा नाम म्हणून वापरले जाते तेव्हा तो सोंगट्यांमधला फासा असतो :
_dice_rev.jpg

इथे मात्र व्युत्पत्ती काहीशी अनिश्चित आहे :
dare = to give / to play ( सोंगटी)
(नशिबाने दिलेले)

याची अनेकवचने दोन्ही चालतात : dies, dice.

मोबाइलवर इंग्रजी पुस्तके ebooks वाचताना दुसऱ्या एका tab मध्ये डिक्शनरी उघडून ठेवतो. (Vocapture ) वापरत होतो. अडलेला शब्द कॉपी करायचा आणि डिक्शनरी उघडून शोध चौकात पेस्ट करायचा आणि अर्थ बघायचा.
पण त्यात जाहिराती आहेत थोड्या. मग पुन्हा नव्याने डिक्शनरी app शोधताना
Dictionary wordweb सापडले.(https://play.google.com/store/apps/details?id=com.wordwebsoftware.androi...) जाहिराती नाहीत. शिवाय गंमत म्हणजे अडकलेला शब्द कॉपी करून या wordweb चा tab उघडला तर तिथे तो शब्द उघडूनच येतो! काम सोपेच झाले.

Joystick
joyst rev .JPG

या नियंत्रणदांडीने वैमानिक विमानाचे नियंत्रण करतात.
याच्या व्युत्पत्ती मोठ्या रंजक आहेत. नक्की कुठली असावी यावर एकमत नाही.

१. जेव्हा विमानाचा शोध लागला आणि वैमानिक हवेत जाऊ लागले तेव्हा त्यांना होणारा परमानंद म्हणून या दांडीचे नाव.

२. James Henry Joyce या संशोधकाच्या नावावरून.

3. Arthur Edward George यांनी त्याला प्रथम George stick असे म्हटले. पुढे त्याचा Joystick हा अपभ्रंश.

पुढे अशा नियंत्रणदांड्या व्हिडिओ गेम्स आणि वैद्यकशास्त्रातील आधुनिक कॅप्सूल एंडोस्कोपीमध्येही वापरल्या जाऊ लागल्या.

third
हा नेहमीच्या वापरातला शब्द. त्याचा उगम रंजक आहे. tri-tyo- या PIE शब्दमूळापासून अनेक भाषांमध्ये त्याचे बदल झाले (संस्कृत : तृतीय)

आणि शेवटी thrid असा शब्द उगम पावला. पुढे चौथ्या स्थानावरील i तिसऱ्या स्थानावर गेला. या प्रकारच्या बदलाला metathesis असे म्हणतात.

"to table (a topic)"
या क्रियापदाचे चक्क दोन भिन्न अर्थ आहेत :
१. ब्रिटिश अर्थ : एखादा विषय विचारविनिमयासाठी सर्वांसमोर ठेवणे.

२.अमेरिकी : एखादा विषय चर्चेसाठी न ठेवता त्याला बाजूला सारणे !

>>> हे जेव्हा नाम म्हणून वापरले जाते तेव्हा तो सोंगट्यांमधला फासा
मराठी 'फासा' 'फासळी' (बरगड्यांची हाडे) पासून आला असेल का असा एक विचार आला. महाभारतातील द्यूताचे फासे जरासंधाच्या हाडांपासून बनवलेले होते (आणि म्हणून भीम ओरडेल ते दान - घाबरून - पडत असे, हे लक्षात आल्यावर भीमाला गप्प राहायला सांगण्यात आलं) अशी आख्यायिका वाचल्याचं आठवतं. तर एकूणच फासे हाडांपासून बनत असतील का तेव्हा?

स्वातीताई, 'फासा' शब्दावर विचार करताना फासेपारधी, सापळा वगैरे आठवलं, मग 'हाडांचा सापळा' आणि 'छातीचा पिंजरा' आठवले. Happy
फासे हस्तिदंती असत हे मलाही वाचल्याचं आठवतंय.

फासा>>
याचे एक वैशिष्ट्य सहज लक्षात येते. त्याच्या कुठल्याही विरुद्ध बाजूस असणाऱ्या ठिपक्यांची बेरीज नेहमी ७ असते.

Java
मजेदार व अनेक अर्थ असलेला शब्द !
( विशेषनाम / बोलीभाषा)

१. इंडोनेशियाचे एक बेट
२. कॉफी
३. संगणक भाषा
४. गुदसंभोग
५. मोटरसायकलचे ऐतिहासिक नाव (JAWA)

>>>Java
मजेदार व अनेक अर्थ असलेला शब्द !>>> भारी
कॉफी ठीक पण गुदसंभोग नाही झेपलं

**गुदसंभोग नाही झेपलं
>> ते असे आहे :
Java =
Slang for anal sex.
Javascript works across all systems, as anal sex works across all people.
( सामान्य गूगलशोध)

इंग्लिश चित्रपटविश्वात नोलनकृत " Oppenheimer" ची चर्चा सध्या जोरात आहे. या निमित्ताने थोडे भाषेसंबंधी…

पहिली अणुस्फोट चाचणी झाल्यानंतर Oppenheimer यांनी भगवद्गीतेतील खालील वचन उद्धृत केले होते :
“Now I am become Death, the destroyer of worlds.”

यातील am become वर अडखळायला झाले. हे काय जुने इंग्लिश असावे या उद्देशाने काही भाषाविषयक वाचले ते लिहितो.

I am become ही प्राचीन इंग्लिश वाक्यरचना आहे. भगवद्गीतेचे पहिले इंग्लिश भाषांतर सन 1785 मध्ये झाले होते. त्यात ती आहे. भाषापंडितांच्या मते have become हे आधुनिक इंग्लिश असले तरी त्यात am become चा जोरकसपणा ( rhetorical power) नाही.
..
तसेच worlds या अनेकवचनी शब्दात ‘संपूर्ण विश्व’ अभिप्रेत आहे.

toxin हा अगदी परिचित शब्द. परंतु तशाच उच्चाराचा tocsin हा शब्द अगदी भिन्न आहे.
त्याचा अर्थ :धोक्याची सूचना देणारी घंटा

m * ss
या शब्दसमूहात दुसऱ्या अक्षराच्या जागी पाचही प्रमुख स्वर घालून पाच शब्द तयार होतात.
त्यापैकी चार अगदी परिचित;
muss (गोंधळ करणे)
हाच त्यातल्या त्यात अपरिचित

scalp या शब्दाचा डोक्यावरील त्वचा हा अर्थ परिचित आहे.

परंतु हा शब्द जेव्हा अमेरिकी इंग्लिशचा अनौपचारिक शब्द बनतो तेव्हा त्याचा अर्थ भन्नाट आहे.
scalp (v.) = एखाद्या प्रकारची तिकिटे अनधिकृतपणे जादा दराने विकणे.
पाहूया त्यामागचा इतिहास :

सन 1869 मध्ये हा शब्द चित्रपटगृहाची तिकिटे विकण्यासंदर्भात होता. परंतु पुढे तो रेल्वे तिकिटांच्या संदर्भात वापरला जाऊ लागला.

समजा, एखादी ट्रेन 1000 किलोमीटर असा लांबचा प्रवास करणार आहे. पण त्या ट्रेनने एखाद्या व्यक्तीला फक्त दोनशे किलोमीटरचाच प्रवास करायचा आहे. अशा वेळेस तिकीट दराचे एक सूत्र असते - तिकीट जेवढे लांबच्या अंतराचे तेवढे ते ग्राहकाला (एखाद्या टप्प्यासाठी) स्वस्त पडते.

मग प्रवासी अशी युक्ती करायचे. संपूर्ण 1000 किलोमीटर प्रवासाचे तिकीट काढायचे व 200 किलोमीटरवर आपले इच्छित स्थानक आल्यावर उतरायचे. आता या तिकिटाचा 800 किलोमीटरचा टप्पा न वापरलेला आहे. मग तो एजंटला विकायचा.

पुढे एजंट योग्य ते गिऱ्हाईक गाठून त्याला तो उरलेला टप्पा विकतो. परंतु तरीसुद्धा नव्या प्रवाशाला ते तिकीट अधिकृत दरापेक्षा काहीशा कमी किमतीत दिले जाते. असा उद्योग करणाऱ्या एजंटला scalper हे नाव पडले.

(त्या काळी अशा प्रकारे तिकिटाचा उरलेला टप्पा विकण्याची पद्धत तिकडे असावी असे दिसते ).

mackintosh & Mcintosh
या दोघांचा उच्चार समान वाटला तरी त्यांचा उगम आणि अर्थ पूर्णपणे भिन्न आहे.

mackintosh = जलरोधक कोट किंवा झगा. हे नाव Charles Macintosh या संशोधकांवरून दिलेले आहे.

Mcintosh = कॅनडातील एक प्रकारचे सफरचंद. John McIntosh या शेतकऱ्याने या प्रकारची सफरचंदे पिकवायला व विकायला सुरुवात केली होती. मूळ शब्द Mac an toisich = सरदाराचा मुलगा.
कालांतराने हेच नाव ॲपल कंपनीच्या संगणकाला दिले गेले.

MacBook = Macintosh +‎ notebook.

आज एका शब्दखेळाचे उत्तर होते whence = (from) where. हा शब्द मी पहिल्यांदाच पाहिला. मी अनौपचारिक संभाषणात wherefrom असा शब्द वापरला असेल. तो शब्दकोशात नाही.

पण केंब्रिज शब्दकोशात उदाहरण म्हणून दिलेले वाक्य आहे - It has been returned to the shop from whence it came.

तिथे फ्रॉम जोडून काय साधलं?

उत्तर होते whence >>>>
बरोबर ! मी पण एक तासापूर्वीच हा सोडवला Happy
जुना शब्दप्रयोग आहे.
from नको वापरायला .

आज verso हा शब्द कळला.
VERSO / RECTO
Terms used for the front and back of a single sheet of paper, or the right-hand and left-hand page of an open book
मूळ लॅटिन

विविध प्रकारच्या राजवटींसाठी आपण -cracy हा प्रत्यय वापरतो. यापैकी सहसा वाचनात नसलेल्या या काही राजवटी :
Plutocracy (Pluto = संपत्ती)
Chrysocracy ( Chryso= सोने)
Argentocracy (Argento= चांदी )

या तिघांचाही अर्थ एकच : धनाढ्य लोकांनी चालवलेले राज्य.

Plutocracy याच्यावरून पुढे Pluto-democracy असा एक जोडशब्द तयार झालेला आहे

Pages