शब्दकोशांच्या मनोरंजक विश्वात

Submitted by कुमार१ on 22 June, 2017 - 22:44

माध्यमिक शाळेत असताना आम्हाला रोजच्या वेळापत्रकात दोन मधल्या सुट्या असायच्या – एक लहान १५ मिनिटांची तर दुसरी मोठी ४५ मिनिटांची. मोठ्या सुटीमध्ये शाळेच्या ग्रंथालयात आमच्यासाठी वाचनाची सोय केलेली असे. तिथे बसून वाचताना समोरच्या भिंतीवर नजर जाई. तिथे मोठ्या व आकर्षक अक्षरात ‘ग्रंथ हेच गुरु’ हे वचन लिहिलेले होते. वाचनाच्या आवडीतून त्या वचनाची सत्यता पटत गेली, यात शंकाच नाही. मोठे होता होता मी विविध प्रकारचे तीन भाषांतील साहित्य वाचत गेलो आणि एका निष्कर्षाप्रत येउन ठेपलो. तो म्हणजे, या सर्व ग्रंथरूपी गुरूंचे गुरु म्हणजे शब्दकोश!

सुरवातीला वाचनात एखादा शब्द अडला, की त्याचा अर्थ पाहण्यापुरता शब्दकोश उघडला जाई. तो जमाना अर्थात फक्त छापील पुस्तकांचाच होता. त्या वयात मी शब्दकोशाच्या जाडजूड ‘प्रकृती’कडे कुतूहलाने बघत असे. शालेय जीवनात शब्दकोशाचा उपयोग शब्दार्थ पाहण्यापुरताच सीमित होता. तेव्हा इंग्लिश–मराठी, मराठी-इंग्लिश आणि हिंदी-मराठी हे शब्दकोश हाताळले जात.
महाविद्यालयीन जीवनात ‘ब्रिटीश लायब्ररी’ चा सभासद झाल्यावर काही थोर इंग्लिश लेखक वाचायला घेतले. तेव्हा इंग्लिश पुस्तकांचे वाचन म्हणजे एक अभ्यासच असायचा. हातात ते पुस्तक, टेबलावर इं-मराठी शब्दकोश आणि शब्दार्थ टिपून घ्यायला बाजूला वही-पेन. वाचलेल्या साहित्याची काही वडीलधाऱ्यांशी चर्चा होई. त्यात एका गृहस्थांनी सल्ला दिला, की आता शब्दार्थ पाहण्यासाठी तुमच्या शालेय शब्दकोशावर समाधान मानू नकोस; आता गरज आहे ती तू ‘Oxford’ ची कास धरण्याची.
मग मी Concise Oxford च्या इंग्लिश- इंग्लिश कोशाची खरेदी केली. सहज म्हणून हा कोश चाळू लागलो अन पहिल्या नजरेतच लक्षात आले, की हा निव्वळ शब्दकोश नसून साक्षात ज्ञानकोश आहे. त्यात एखाद्या शब्दाचे अनेक अर्थ देण्यासाठी पुस्तकाच्या पानाचा तब्बल एक स्तंभही खर्ची पडलेला दिसे. एखाद्या कठीण शब्दाचा अर्थ पाहण्यासाठी म्हणून कोश उघडला जाई आणि तो अर्थ पाहता पाहता एकातून दुसऱ्या व त्यातून तिसऱ्या शब्दात मी उड्या मारत असे. कित्येकदा शब्दार्थासाठी उघडलेला कोश पाहताना वाचनाचे मूळ पुस्तक बाजूलाच राही आणि बराच वेळ मी शब्दकोशातच मनसोक्त विहार करीत असे. शब्दाच्या अर्थाबरोबरच त्याचा उगम, ऐतिहासिक संदर्भ इत्यादी माहिती वाचून छान मनोरंजन होई.

बऱ्याचदा आपल्या नेहमीच्या वापरातले शब्दसुद्धा कोशात पाहण्यात मजा येते. उदाहरणार्थ ‘August’ हा शब्द पाहा. आता हे एका महिन्याचे नाव आहे हे शाळकरी पोरही सांगते. पण ते नाव रोमन साम्राज्याचा पहिला राजा ऑगस्टस सीझर याच्यावरून आहे, तसेच august चा दुसरा अर्थ ‘थोर’ असाही आहे हे ज्ञान आपल्याला शब्दकोशात डोकावल्याशिवाय कसे मिळेल? एखाद्या शब्दाला तर एकापेक्षा अनेक असे कित्येक अर्थ असतात आणि त्या अर्थांचा एकमेकाशी सुतराम संबंध नसतो. ‘set’ चे तब्बल १५६ प्रकारचे अर्थ आहेत हे जेव्हा आपल्याला कोशात दिसते तेव्हा मोठा अचंबा वाटतो.
एकच उच्चार पण भिन्न स्पेलिंग व अर्थ असणारे शब्द जेव्हा आपण कोशात पाहून पक्के करून घेतो तेव्हा होणारा आनंद काही वेगळाच असतो. सध्याच्या ‘ हॅलो, हाय’च्या युगात बहुतेकांना फोनवरचाच ‘हॅलो’ माहित असतो. पण, शब्दकोश बारकाईने पाहणाऱ्यालाच hallo, hallow & halo यांतील फरक समजलेले असतील.

आपल्या देशात गेल्या पंचवीस वर्षांत इंग्लिश माध्यमातून शालेय शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय दिसून येते. ही पिढी ‘स्पोकन इंग्लिश’ च्या बळावर येताजाता टूरटूर करीत असते. पण त्याचबरोबर त्यांचे स्पेलिंग व व्याकरण यांकडे कमालीचे दुर्लक्ष झालेले जाणवते. अशा काहींची फिरकी घ्यायला मला आवडते. त्यांना मी ‘फुलस्केप’ या परिचित शब्दाचे स्पेलिंग विचारतो. आतापर्यंत तरी मला हे अचूक स्पेलिंग सांगणारी व्यक्ती भेटलेली नाही. याचे स्पेलिंग आहे ‘foolscap’ आणि योग्य उच्चार आहे ‘फुल्झकॅप’. हे ज्ञान शब्दकोशाला आपला मित्र केल्याशिवाय प्राप्त होणे नाही! मोठ्या आकाराचा कागद म्हटल्यावर बहुतेकजण ‘full…’अशी सुरवात करतात अन fool होऊन बसतात! या शब्दाचा उगम तर किती मनोरंजक. Fool म्हणजे विदूषक. पुरातनकाळी विदूषक जी टोपी वापरत त्या टोपीचे चिन्ह ‘watermark’ म्हणून या कागदात उमटवलेले असे.
‘फुलस्केप’ वरून घडलेला एक किस्सा सांगतो. एका माध्यमिक शाळेत सत्राच्या पहिल्या दिवशी एक शिक्षिका विद्यार्थ्यांना म्हणाल्या, “हे बघा, सर्वांनी ‘फुलस्केप’ वह्या आणायच्या आहेत, ‘हाफस्केप’ वह्या आणलेल्या मला अजिबात चालणार नाहीत!” एखादा शब्द नीट न शिकून घेतल्याचे परिणाम एका पिढीकडून पुढच्यांकडे कसे संक्रमित होतात याचे हे उदाहरण.

गडद काचांच्या चष्म्याला आपण ‘गॉगल’ म्हणतो यात नवीन काहीच नाही. पण या शब्दाचे स्पेलिंग goggles असून ते अनेकवचनी नाम म्हणूनच वापरायचे असते ही दृष्टी मला शब्दकोशानेच दिली. आपल्या समाजात एखाद्याने ‘लेस्बिअन’ हा शब्द जरी उच्चारला तर आपण पटकन चमकून त्याच्याकडे पाहतो. जर उत्सुकता म्हणून आपण हा शब्द कोशात पाहिला तर त्याचा उगम पाहून आपली करमणूक होते. ‘lesbos’ नावाच्या बेटावर ‘साफो’ नावाची कवयित्री राहत असे आणि ती समलिंगी संबंधात गुंतल्याचा लोकांना संशय होता. ही माहिती समजल्यावर या शब्दाकडे आपण अश्लील म्हणून न पाहता कुतूहलाने पाहू लागतो.

आजकाल आपले एखादे कार्यालयीन काम होणे जर एखाद्या स्त्रीच्या हातात असेल तर तिच्या तेथील दर्जाचा विचार न करता आपण तिच्यापुढे सारखे ‘Madam, Madam’ करीत असतो. आता ‘madam’ चे कोशातील दोन अर्थ बघा. या शब्दाचा उगम फ्रेंचमधून आहे.त्याचा पहिला अर्थ ‘बाईसाहेब’ असा तर दुसरा चक्क ‘वेश्यागृहाची मालकीण’ असा आहे! तसेच या शब्दाचे अनेकवचन( madams असे नसून) फ्रेंच पद्धतीने Mesdames असे आहे. सध्या सर्वत्र बोकाळलेल्या मॅडमांनी हा शब्द पूर्णपणे समजून घ्यायला काही हरकत नाही.

वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यापासून ते डॉक्टर होऊन तीस वर्षे उलटून गेल्यावरही वैद्यकीय शब्दकोश हा तर माझा जिवलग मित्र आहे. त्याच्या पातळ पांढऱ्याशुभ्र कागदावर परदेशात केलेली सुंदर छपाई, त्याचा लठ्ठ पण मोहक आकार, त्यातील अवघड शब्दांची केलेली सुरेख फोड, शब्दार्थांचा पाडलेला कीस आणि शब्दानुरूप चित्रे ही त्याची वैशिष्ट्ये मला नेहमीच मोहित करतात. सामान्य वाचकांसाठी त्यातले दोन मनोरंजक शब्द सांगतो:

१. AC/DC : खरे तर आपल्या सामान्यज्ञानानुसार हे विद्युत प्रवाहाचे दोन प्रकार आहेत. पण वैद्यकीय कोशातील त्याचा अर्थ ‘bisexual individual’ असा वाचल्यावर आपण कपाळावर हात मारून घेतो!
२. Hartnup disease : हा एक आनुवंशिक आजार आहे. आता Hartnup हे बहुधा ज्या शास्त्रज्ञाने तो आजार शोधला त्याचे नाव असेल असा अंदाज आपण बांधतो. पण शब्दकोशाचा पाहा काय सांगतो ते. Hartnup हा शास्त्रज्ञ नसून, तो आजार ज्या रुग्णामध्ये पहिल्यांदा आढळला त्याचे आडनाव आहे. १९५० च्या सुमारास ब्रिटनमधील श्री. हार्टनप यांनी आपल्या cousinशी लग्न केले होते. त्या दाम्पत्याला झालेल्या आठ अपत्यांपैकी चौघांमध्ये हा आजार आढळून आला.

मराठी-मराठी कोश हाताळणे ही सुद्धा एक चांगली करमणूक आहे. अर्थात इंग्लिश-इंग्लिशच्या तुलनेत या कोशाचे स्वरूप त्रोटक वाटते, हे कबूल करावे लागेल. बऱ्याचदा मराठी कोश बघण्याच्या बाबतीत मराठी माणूस उदासीन असतो. आपल्या दैनंदिन वापरातील काही मराठी शब्दांचा खरा अर्थ हा कोश पाहिल्यावरच आपल्याला समजतो. अन्यथा त्याऐवजी काहीतरी चुकीची कल्पना किंवा अर्धवट माहिती आपल्या डोक्यात असते. एकदा एका कॉलेजच्या तरुणाला मी ‘आदिवासी’ चा अर्थ विचारला. क्षणाचाही विलंब न लावता तो म्हणाला, “ते म्हणजे अति मागास गरीब लोक”. त्याच्या म्हणण्यात जरी तथ्य असले तरी खरा अर्थ तो नाही. ‘आदी’= मूळ व ‘वासी’= राहणारे. म्हणजेच, एखाद्या प्रदेशातील मूळ रहिवासी.

आपल्याकडे पाटील, कुलकर्णी, कांबळे ही अगदी सर्रास आढळणारी आडनावे. एकदा सहज म्हणून ‘कुलकर्णी’ ची व्युत्पत्ती कोशात बघितली आणि स्तिमित झालो. ती बघण्यापूर्वी, ‘कुलकर्णी’ हा शब्द अस्सल मराठीच – एवढेच काय, पण पक्का पुणेरीच- या भ्रमात मी होतो. शब्दकोशाने मला सांगितले, की हा शब्द मूळ तेलुगु (कुळकरणी) आहे. कुळ = शेतकरी आणि करण = हिशेब. हे वाचल्यावर मला एका ‘कुळाचा’ शोध तर लागलाच आणि त्याचबरोबर माझ्या भाषिक अस्मितेचे कुंपण गळून पडले, हे नक्की!

शब्दकोशांमध्ये काही व्यवहारोपयोगी परिशिष्टेही असतात. निरनिराळ्या लघुरुपांचे (acronyms) पूर्ण रूप देणारे परिशिष्ट हे त्यातले एक ठळक उदाहरण. सध्याच्या संगणकीय युगात कित्येक नवीन लघुरुपांचा सुळसुळाट झालेला आहे. अशी काही लघुरूपे आपल्या डोळ्यांसमोर सतत आल्याने हळूहळू आपल्याला ते जणू काही शब्दच आहेत असे वाटू लागते. एक उदाहरण देतो. सध्या कोणताही online व्यवहार करताना आपल्याला सतत भेटणारे एक लघुरूप म्हणजे ‘CAPTCHA’. त्याचे दीर्घरूप किती मनोरंजक आहे आणि त्यामागचा तांत्रिक इतिहास काय आहे, ते आपल्याला कोश पाहिल्याशिवाय कळणे नाही!

आपले ज्ञान समृद्ध करतानाच आपल्यावर मनोरंजनाचाही शिडकावा करणारे विविध शब्दकोश आपल्या वापरात जरूर असावेत. माझ्याकडे विविध प्रकारचे सुमारे डझनभर कोश आहेत. आंतरजालाच्या व्यापक प्रसारानंतर आता अनेक प्रकारचे कोश जालावर उपलब्ध आहेत. त्यामुळे जाडजूड वजनाचे छापील कोश आता एखाद्याच्या वैयक्तिक ग्रंथसंग्रहात कमी दिसतात. पण, माझी पिढी ही मुळात अशा छापील कोशांवर ‘पोसली’ गेली असल्याने माझ्याकडे ते आजही आहेत. माझे त्यांच्यावर इतके प्रेम आहे की मी त्यांना माझे कुटुंबघटकच मानतो! माझ्या घरभर ते विखुरलेले आहेत. त्यापैके एक-दोघांनी तर माझ्या पलंगावर विसावण्याचा मान पटकावलाय. वेळप्रसंगी माझ्या एकटेपणात ते माझी सुरेख सोबत करतात. धष्टपुष्ट छापील कोशाला प्रेमाने उराशी कवटाळण्याची मजा काही औरच असते. त्याची सर जालकोशाच्या ‘सर्च इंजिन’ला कशी येईल?

एखादे दिवशी जर हाताशी वाचण्यासारखे काही नसेल तर मी खुशाल एखादा कोश हाती घेऊन त्यात डोके खुपसून बसतो. दिवसाकाठी निदान एकतरी नवीन शब्द मी कोशांमधून शिकतो व समजावून घेतो. ग्रंथाचे गुरु असलेल्या शब्दकोशांनी मला ज्ञान आणि मनोरंजन या दोन्ही पातळ्यांवर अतीव समाधान दिलेले असल्याने मी त्यांचा कायमचा ऋणी आहे.
***********************************************************************************************************
( टीप : माझ्या या लेखाची पूर्वप्रसिद्धी : ‘अंतर्नाद’ मासिक. काही सुधारणांसह येथे प्रकाशित )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

mind-space/fantasy/feeling(s) ज्या अर्थी वापरायचा आहे त्यानुसार.

मला emotional world of children असे सुचले.

turnpike.jpg
वरच्या चित्रातला मोठा आडवा दांडा अगदी परिचयाचा आहे. एखादा पथकर नाका असो वा एखाद्या भल्या मोठ्या गृहसंकुलाचे प्रवेशद्वार, तिथे आपल्याला हा भेटतोच !

भारतात याला सर्वसाधारण संभाषणात बार किंवा बॅरियर म्हणतात. परंतु त्याचे मूळ नाव वेगळे असून ते रंजक आहे :
turnpike
याचा इतिहास आहे मोठा मजेदार आहे. सन 1540मध्ये ते गावाच्या वेशीवर बसवलेले असत आणि हल्ले करणाऱ्या घोडदळापासून संरक्षण करणे हा त्यांचा हेतू होता. तेव्हाची रचना :
turrnpi hist.jpg

सन 1670 नंतर त्यांचे स्वरूप सध्यासारखे झाले ( "barrier to stop passage until a toll is paid").

turnpike>> रोचक

झोंबींना अडकवण्यास वापरलेत >> मात्र झोंबींनी टोल भरला तर?

Turnpike>>> अमेरिकेतील Princeton Pike शी याचा संबंध असावा का?
मात्र झोंबींनी टोल भरला तर?>>>>>>....तर ती टोल धाड ठरेल...

Princeton Pike >>>
हे विशेषनाम आहे; त्याचा संबंध नसावा.
मूळ शब्द pike हा असून त्याचा अर्थ pointed tip or spike on a staff असा आहे

https://www.etymonline.com/word/pike#etymonline_v_46326
...
टोल धाड >> आवडेश! +११ Happy

cardinal MAN.png
आणि
cardinal bird.jpg

वरील दोघांनाही cardinal या नावाने ओळखले जाते. का बरे ?
त्याची एक गंमत आहे !
..
..
..

cardinal या शब्दाचा मूळ अर्थ : चर्चमधील उच्च धर्मगुरू.

cardinal हा जो उत्तर अमेरिकेतील पक्षी आहे त्याचा रंग वरील धर्मगुरूंच्या पोशाखाशी साम्य दाखवतो म्हणून त्याचे असे नाव. त्याचा आवाज मंजूळ असतो.

यानिमित्ताने पक्षांमधली एक गंमत बघितलेली.
लेकाच्या घरा समोर एक पाईन कोनचे छोटे झाड आहे. तर त्याच्या विविध फांद्यांची टोकं अन वर एक टोक असं आहे. तर त्यातल्या कोणत्या फांदीवर कोणी बसायचं याचे नियम होते बरं का. एक मोठा मेल पक्षी होता, वरच्या टोकावर बसण्याचा अधिकार फक्त त्यालाच होता. बाकीचे पक्षी खालच्या फांदीवर बसत. जवळ जवळ महिना बर बघत होते, हा नियम कोणी मोडला नाही Happy या पक्षाचा रंग इतका ब्राईट होता की ऊन असेल तर फार वेळ त्याच्याकडे बघितलं तर डोळे दिपून जात. बाकीच्यांचे रंग थोडे फिके होते. एकच प्रजाती पण शेडसचे किती वैविध्य!
( काही इंग्रजी शब्द आलेत माफ करा)

व्यंग हा खरा शब्द व्यंग्य आहे म्हणे.
---------
शालेय जीवनात व नंतर मी काही जुन्या इंग्रजी कादंबऱ्या वाचण्याचा प्रयत्न करीत असे. शब्दकोश चित्रमय नसे आणि त्यांच्या लेखनात घोडा, घर आणि जहाजं यासंबंधी अनेक शब्द येत ते समजत नसत. वर्णनातून समजणे अवघड असे. कारण घोड्यांच्या बऱ्याच चाली, घराच्या (इमारतीच्या) विविध भागांची नावे, जहाजांवर विषयी हजारो शब्द.

>>cardinal हा जो उत्तर अमेरिकेतील पक्षी >>
पक्षी एकदम गोड आहे. आवडला

liquor
म्हटल्यावर नजरेसमोर एकच गोष्ट येते ! Happy
पण या शब्दाची उत्क्रांती पाहण्यासारखी आहे.

बाराव्या शतकात त्याला व्यापक अर्थ होता, तो म्हणजे :
any liquid/ fluid.
यामध्ये कुठल्याही द्रवापासून थेट समुद्रापर्यंत सगळ्यांचा समावेश होता.

सन १३०० पासून तो अर्थ संकुचित होऊन मद्य /मद्यार्क हा झाला.
तर सन १७०० पासून जुना व्यापक अर्थ कालबाह्य ठरला.

रोचक माहिती कुमार सर
Liquor च्या स्पेलिंग मध्ये ice जोडलं की Liquorice तयार होत.
Liquor + ice = Liquorice Happy
Liquorice म्हणजे ज्येष्ठमध, जो औषधी म्हणून वापरला जातो

Liquorice etymology म्हणून गुगलल्यास मूळ शब्दाचा किती अपभ्रंश होत गेला आहे ते कळते.

Liquorice etymology म्हणून गुगलल्यास
>>> अगदी अगदी !
किंबहुना मी या शब्दाचा अभ्यास करता करताच liquor मध्ये शिरलो.
Happy

bridewell
या शब्दाचा वधूशी काही संबंध नाही परंतु विहिरीशी मात्र आहे !

या शब्दाचा विशेषनामाकडून सामान्यनामाकडे झालेला प्रवास पाहणे रंजक ठरेल. अगदी सुरुवातीस लंडनमधील एका विहिरीला St. Bride यांचे नाव देण्यात आले. म्हणजेच ते झाले Bridewell.
(https://www.megalithic.co.uk/article.php?sid=57084#:~:text=%3E%20St,Scot...)
पुढे या जागेचे रूपांतर क्रमाक्रमाने चर्च, राजवाडा, अनाथालय, रुग्णालय आणि शेवटी तुरुंगात झाले.
Bridewell_prison_rebuilt_after_the_Great_Fire.gif

आज हा शब्द शहरातील मोठ्या व महत्त्वाच्या तुरुंगासाठी वापरला जातो.
https://www.merriam-webster.com/dictionary/bridewell

yam
हे दिसते आपल्या रताळ्यासारखेच पण खालील चित्रात फरक स्पष्ट होईल :
Screenshot (14).png

शब्दकोशाच्या विश्वात म्हणजे इंग्रजी शब्दकोशाच्या. आता त्यातले बरेचसे शब्द हे तिथल्या ( युकेतल्या) जीवनाशी संबंधित असलेले बाद झाले आहेत. म्हणजे नवीन लेखक ते वापरत नाहीत. कारण त्यांचे लेखन जगात इंग्रजी भाषा येणाऱ्यांनी वाचावे ही इच्छा असते. म्हणी, वाक्प्रचार, words followed by prepositions याचा गैरवापर बंद झाला आहे. आणि ते १९७० च्या अगोदरचे लेखन वाचण्यात काहीही अर्थ नाही.

brow (भुवई) या मूळ शब्दापासून झालेला
highbrow हा शब्द सर्वपरिचित आहे.

परंतु समाजातील तिन्ही स्तर दाखवण्यासाठी वास्तवात हे शब्दत्रिकूट आहे :
१. highbrow (उच्चभ्रू )
२. middlebrow
३. lowbrow (निम्नभ्रू)

middlebrow याच्यासाठी मात्र 'भ्रू' प्रकरातला मराठी शब्द वाचनात नाही आलेला.

घशामध्ये खवखव होऊ लागली की सामान्य माणूस Strepsil या गोळ्या चघळायला घेतो व त्या अगदी सहज कुठेही उपलब्ध असतात. (https://www.amazon.in/Strepsils-Blister-tablets-Bacterial-Infection/dp/B...).

या नावाचा उगम रंजक आहे आणि तो अमेरिकी वैद्यकीय इंग्लिशमधून आलेला आहे. घशाचा दाह होण्यामागे streptococcus हे जंतू सर्वाधिक जबाबदार असतात. म्हणून घसा खवखवण्याला तिकडच्या डॉक्टरांनी
Strep throat
असे नाव दिले आहे. त्यावरूनच वरील औषधाचे नाव घेतलेले दिसते.

gravy
चमचमीत खाद्यपदार्थांमधले ‘पातळ मिश्रण’ या अर्थी हा शब्द सर्वपरिचित आहे. हा मूळचा पर्शियन शब्द.

त्यातून पुढे gravy train असा एक शब्दप्रयोग उत्क्रांत झाला आणि to ride the gravy train हा वाक्प्रचार देखील. त्याचा अर्थ,
अत्यंत कमी श्रमात मोठा नफा मिळवणे हा आहे.

Pages