या विषयावर लिहावे का नको असा विचार बरेच दिवस मनात घोळत होता. निमित्त झाले एका जेष्ठ मैत्रिणीच्या भेटीचे. आमच्या वयात साधारण ३५ वर्षाचे अंतर आहे. तिला आंटी / काकू / मावशी / आजी म्हटलेले आवडत नाही म्हणून मैत्रीणच आहे ती माझी, फ्रेंड-सखी. जोडीदार वैतरिणीपार. स्वतः सेवानिवृत्त. अपत्ये तीन. एक मुलगा तरुणपणीच निवर्तला, दुसरा दूरदेशी संपन्न-सुखी आयुष्य जगतो आहे. मुलगी स्वतःच्या शहरातच थोडे दूरवर सासरच्या मोठ्या संयुक्त कुटुंबात राहते. मैत्रीण आनंदी आणि प्रेमळ स्वभावाची आहे. मुलगा-मुलगी-सून-जावई-नातवंडे-व्याही सर्वांशी उत्तम संबंध आहेत, सगळीकडे येणे-जाणे आहे. राहते मात्र तिच्या स्वकमाईच्या सुंदर सजवलेल्या घरात, एकटी. स्वतः सुखवस्तू आहे आणि वयोपरत्वे येणाऱ्या छोट्या कुरबुरी सोडल्या तर बाकी तिला कोणाचा आणि तिचा कोणाला काहीच त्रास नाही.
तर ही ऐंशीपार सखी सध्या एका वेगळ्या विचाराने झपाटलेली आहे. तीन वर्षांपूर्वी एका स्वीडिश जोडप्याच्या निमंत्रणावरून स्वीडनला जाऊन आल्यानंतर आणि विशेषतः करोनाच्या वावटळीत दोनदा सापडल्यानंतर तिला Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ 'मोकळे हात' सिन्ड्रोमने पछाडले आहे. आपल्याला 'मृत्यू' म्हटलं की बहुदा दुःख, निराशा, रडारड अशा नकारात्मक भावना दाटून येतात. नकोच तो विषय, त्यात काय बोलायचं. जेव्हा जायची वेळ येईल तेंव्हा बघू असेच सर्वांचे साधारण मत असते. माझेही तसेच मत आहे. पण ही सखी वेगळीय. तिला संध्याछाया जरी भिववीत नसल्या तरी 'मोकळ्या हाताने' पैलतीरी जायचे आहे यावर ठाम आहे.
तर काय आहे हे Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ 'मोकळे हात'? अगदी थोडक्यात सांगायचे तर एका विशिष्ट वयानंतर स्वतः आयुष्यभर केलेला पसारा स्वतः आवरणे. स्वीडिश लेखिका मार्गरेट मॅग्नसन हिचे The Gentle Art of Swedish Death Cleaning: How to Free Yourself and Your Family From a Lifetime of Clutter असे भारदस्त नावाचे पुस्तक आहे यावर. त्याचा सारांश :- पुढच्या प्रवासाला निघतांना आपल्या मागे राहणाऱ्या प्रियाजनांसाठी आवरण्याची कमीत कमी कामे सोडून जाणे. साधारण २०१७ सालापासून ही कल्पना त्यांच्याकडे जोर धरू लागलेली आहे. भारतात वर्षानुवर्षे 'वानप्रस्थाश्रम' ही कल्पना आहे, पण ती थोडी वेगळी आहे, घरदार-संसारातून पाश पूर्णपणे सोडवण्याची. इथे घरातच राहत असतांना, स्वतःच्या हयातीत, स्वतःच्या हाताने आयुष्यभराचा संसार Stada म्हणजे स्वच्छ - मोकळा - नीटनेटका करून मग पुढच्या प्रवासास निघणे असा विचार आहे. सोपे नाही. सिमटे तो दिल-ए-आशिक और फैले तो जमाना है !
सखीनं पुस्तक वाचलंय, मी अजून नाही. चर्चेवरून मला थोडंफार समजलंय ते इथे लिहितो. मार्गरेटनी 'मोकळ्या हातांनी जाण्यासाठी' काही मार्गदर्शक तत्वे सांगितली आहेत, ती अशी :
१. एकट्याने सुरुवात करणे :-
हा प्रवास मोठा आहे, आयुष्यभर जमवलेला पसारा ४-२ दिवसात आटोपणार नाहीच. सुरवातीला कोण्या दुसऱ्याला हा विचार पटवून द्यायला वेळ लागेल, जोडीदारालाही पटेलच असे नाही. त्यामुळे सुरवात 'एकट्याने' करा. जे जमेल तेव्हढेच.
२. पुढच्या टप्प्यावर जोडीदार, परिवार आणि मित्रांना हळूहळू सामील करणे. आयुष्यभर हौसेनी जमवलेल्या हजारो वस्तू कुणाला हव्या आहेत की कुणालाच नको आहेत याचा अंदाज घेत घेत वाटचाल करणे. यात पुस्तके, छंदापोटी जमवलेल्या वस्तू, घरगुती वापराच्या अधिकच्या वस्तू, सजावटीचे सामान, फर्निचर असे खूप काही येईल. सगळेच काही एकावेळी देऊन टाकण्यासारखे नसले तरी मोठ्या प्रमाणात वस्तुकपात करायला परिवार आणि मित्रमंडळी मदत करू शकतात. त्यांना जे हवे आहे ते बेलाशक देऊन टाकणे. अर्थात यासाठी वय उलटण्याची वाट बघायला नकोच, हे आपण सततचा गृहपाठ म्हणून करू शकतो - वापरात नसलेल्या-बिनकामाच्या वस्तू त्यांचा ज्याला उपयोग आहे त्याला देऊन टाकणे.
३. योग्य वस्तूंपासून आवरण्याची सुरुवात करणे. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. जर सुरवातीलाच फोटो अल्बम, आईच्या/स्वतःच्या लग्नातल्या साड्या-बांगड्या आणि जुनी पत्रे काढून बसलात तर काम पुढे सरकत नाही, भावना दाटून येतात असा ‘पटेबल’ युक्तिवाद आहे. त्यामुळे सोप्पे काम आधी. गाद्या-दुलयांमध्ये जीव तेव्हढा गुंतलेला नसतो, वापरलेल्या जुन्या कपड्यांमध्ये, भांड्यांमध्ये पण कमीच. त्यामुळे ते आधी. अर्थात हे व्यक्तिपरत्वे बदलेल. कुणाला पुस्तके देववणार नाहीत तर कुणाला जुने कॅमेरे, जुनी भांडी. स्वतः मुखत्यार व्हावे, काय आधी काय नंतर स्वतःपुरते ठरवावे.
४. ज्याला हवे त्यालाच द्यावे. सगळं सामान कुणावरही ओतू नये. वेळ काळ पाहून एक-एक वस्तू समोरच्याला विचारून देत राहावी. संचयातल्या एखाद्या वस्तूचे आपल्याला अप्रूप असले तरी जुनेपाने हल्ली कुणालाच नको असते हा विचार नेहेमी असू द्यावा. जिथे वापर होईल अशा ठिकाणी, ज्यांना किंमत असेल, आवड असेल अशा लोकांना ती-ती वस्तू द्यावी. उदा. गावातले घर सोडले तेंव्हा आमच्या सुमारे २४०० पुस्तकांवर अनेक पुस्तकप्रेमींचा डोळा होता. काही त्यांच्याकडे गेलीत, काही पिताश्रींनी मित्राच्या वाचनालयाला दिलीत, अधिकाधिक लोकं वाचतील म्हणून. बागेतील शंभरेक कुंड्यातील सुंदर झाडांना सर्व बागप्रेमी मंडळी - शेजारीपाजारी यांच्याकडे नवीन घर मिळाले. तर, योग्य वस्तू योग्य व्यक्तीस आणि त्यांना हवी असेल त्याच वेळी हा नियम पाळावा.
५. जीव गुंतलेल्या वस्तूंना सरसकट दूर न करणे. आपण उद्याच जग सोडणार नाही आहोत. ज्या वस्तू आनंद देतात त्या आपल्यासोबत असू द्याव्यात. फोटो काढणे-बघणे, गाणी ऐकणे, चित्रे काढणे, एखादे वाद्य असे आपले छंद असल्यास त्याला लागणाऱ्या वस्तू जपाव्यात, उत्तमपणे शेवटपर्यंत वापराव्यात. आपल्यापश्चात समछंदी व्यक्तीला मिळतील अशी व्यवस्था करून ठेवावी. आपल्याला परमप्रिय असलेल्या अनेक वस्तू आपल्यानंतर कचऱ्यात जाऊ शकतात हे भान असू द्यावे, त्याने काम सोपे होते. परमप्रिय वस्तूंचे प्रमाण कमी असते, किंबहुना कमीच असावे. आवरायला सोपे असावे, जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी.
६. पुनर्विचार न करणे. प्रत्येक वस्तुबद्दल विचारपूर्वक निर्णय घ्यावा, हवा तेव्हढा वेळ निर्णयासाठी घ्यावा पण एकदा एखादी वस्तू देण्यासाठी काढली की मग ती पुन्हा घरात न घेणे हा एक महत्वाचा टप्पा आहे. नाहीतर चार पावले पुढे आणि चार मागे करत मोकळ्या हातांनी करायच्या प्रवासाची तयारी काही संपणार नाही. अगदी कुणीच घेणारा नसेल तर ती वस्तू विकून टाकावी, भंगारात द्यावी पण परत घरात घेऊ नये. ही आवराआवर पुन्हा पुन्हा करायची नाही आणि हा प्रवास परतून येण्यासाठी नाही ही जाणीव ठेवल्यास हा कठीण टप्पा पार पाडता येतो.
७. दस्तावेज वगैरे. हा टप्पा विचारपूर्वक आणि योग्य सल्ले-विचार घेऊन मगच पार पाडण्याचा आहे. आपल्या हयातीत कमावलेली संपत्ती, घरदार, दागदागिने, पैसाअडका वगैरे आपल्यापश्चात कुणाला मिळावे यासाठी मृत्युपत्र- इच्छापत्र जाणकार व्यक्तीच्या मदतीने करून घ्यावे. संपत्ती आणि बँकखाती, आयुर्विमा वगैरेसाठी वारसांचे नामनिर्देशन करावे. अनेक शहरात असलेला जमीनजुमला किंवा बँकेत अनेकजागी खाती / लॉकर्स कमी करू शकलात तर वारसांचा वेळ वाचेल आणि त्यांना पडणारे कष्ट कमी होतील. जवळच्या मित्रांना आणि वारसांना त्याबद्दलची माहिती देऊन ठेवावी. नेत्रदान-देहदान वगैरेचे काय ते ठरवून त्याचे दस्तावेज, औषधोपचार आणि दीर्घकालीन कोमा वगैरे झाल्यास उपचार थांबवण्यासाठीचे अधिकार कुणाला द्यावे याबद्दलचे आरोग्यविषयक इच्छापत्र, अंतिम संस्काराचे विधी कसे आणि किती करावेत याबद्दलची इच्छा, जमल्यास त्याबद्दलची आर्थिक तरतूद हे सगळे झाले की मग बऱ्यापैकी मोकळे हात घेऊन मजेत जगावे.
आणि हो, पुन्हा पसारा जमा होऊ देऊ नये, नाहीतर सगळे मुसळ केरात !!!
सखीची तयारी जोरात सुरु आहे. मलातरी हा 'मोकळ्या हातांनी प्रवासाचा' विचार आवडला आहे. इथल्या मंडळींचे काय मत ?
Such Hearty ❤️ discussion is
Such Hearty ❤️ discussion is on !
❤️ मी पण आधी विपूत सेव्ह करून
❤️ मी पण आधी विपूत सेव्ह करून ठेवला होता हा बदाम. आता मुक्त झाला.
काय योगायोग.. आज हे खालील
काय योगायोग.. आज हे खालील फॉरवर्ड आले कायप्पा वर. इथे डकवते.
*मध्यमवर्गीय*
विकी कौशल एका मुलाखतीत म्हणाला होता, "मिडल क्लास वो होता है, जो कभी मनसे जाता नहीं "
मला पटलं. हे कदाचित सगळ्याच "क्लास" बद्दल सत्य असेल. पण मी पडले मध्यमवर्गीय! त्यामुळे मला ते पटलं.
तो म्हणाला, " हम ' कल ' के लिये बचाके रखते है मगर 'आज ' जीना भूल जाते हैं!"
"असू दे, उद्यासाठी होईल!" हे तर आपलं पालुपद असतं. मग , उद्या मुलं मोठी झाल्यावर वापरता येईल, नातवंडांसाठी होईल, आपल्या म्हातारपणात उपयोगी पडेल अशी यादी वाढत जाते आणि गरज नाहीच - पण पसारा मात्र वाढत जातो!
आपले माळे भरलेले असतात, कपाटं ओसंडून वाहत असतात आणि त्यातल्या गरजेच्या किंवा वापरत्या वस्तू कमीच असतात.
आता minimalism (कमीत कमी) ची चर्चा वरचेवर ऐकू येते. जी गोष्ट तीन महिन्यात तुम्ही वापरली नाही ती तुम्ही पुढे कधीही वापरणार नाहीये. ती उचला आणि देऊन टाका असं तज्ञ मंडळी सांगत असतात. आपण ऐकतो आणि ती वस्तू माळ्यावर टाकतो!
हा हव्यास नाहीये तर वृत्तीच आहे, मध्यमवर्गीय वृत्ती! काहीही वाया न घालवण्याची वृत्ती. सगळं जोडून, सांभाळून ठेवण्याची वृत्ती! पण याचा अतिरेक होत नाहीये ना हे पाहिलं पाहिजे. अति ज्येष्ठांच्या घरात, सगळ्या भिंती भरून सामान पाहिलं की हल्ली मलाच अस्वस्थ व्हायला होतं. हे यांच्या पश्चात कोण आणि कधी आवरणार अशी काळजी वाटायला लागते.
मुळात minimalism म्हणजे कंजूसपणा किंवा अति काटकसर असा आपण एक समज करून घेतला आहे. जेव्हा जी वस्तू गरजेची असते ती नक्की घ्यावी, वापरावी, पूर्ण उपभोगावी. पण त्याची वेळ झाली की टाकून द्यावी. जोमाळून ठेवू नये हे नक्की.
एका ज्येष्ठ नागरिकाची एक खोली फक्त रद्दी पेपर ने भरलेली होती. एकटेच राहत होते. इतका कुबट वास पसरला होता घरभर, उंदीर होतेच. त्यांना विचारलं की म्हणायचे, जेव्हा पैश्याची गरज असेल तेव्हा एकदाच विकून टाकीन म्हणजे भरपूर पैसे मिळतील. नाहीतर थोडे थोडे पैसे कुठे जातात कळत नाही!
जवळच बंगल्यात एकटी राहणारी एक सखी अचानक गेली. मुलं बाहेर देशात. तिचं घर गाठोड्यानी भरलेलं होतं. कपड्यांची, दागिन्यांची प्रचंड आवड. कपाटात जागा नाही म्हणून साड्या, कपडे जागोजागी बांधून ठेवले होते. अगदी मोठं डायनिंग टेबल ही एवढं भरलेलं की ही एकटी असूनही जेवायला ते वापरू शकणार नाही! खूप वाईट वाटलं. एवढे कपडे ती निश्चितच वापरत नव्हती. मग ती असताना तिने तिचे कपडे गरजूंना देऊन टाकले असते तर??
साठी उलटल्यावर मला उपरती झाली आणि मी सामान कमी करायला सुरुवात केली. मी कंजूस आहे का? नाही! अति काटकसर करते का? ते ही नाही. मला वाचायची आवड आहे. आपल्याला हवी ती पुस्तकं लायब्ररीत मिळतील याची खात्री नसते. मी पुस्तक online मागवते, वाचते आणि लगेच लायब्ररीत किंवा मैत्रिणीला देऊन टाकते. साठवायचं नाही.
आजारी पडल्यावर डॉ काही औषधं देतात. शिल्लक राहिलेली औषधं मी माझ्या नेहमीच्या केमिस्ट ला परत देते. त्याला सांगते की मला पैसे नकोत. पण एखाद्या गरजूला २-४ गोळ्या हव्या असतील तर यातल्या द्या म्हणजे त्याचे पैसे वाचतील.
Frozen shoulder चा त्रास सुरू झाल्यावर माझ्या लक्षात आलं की साडी नेसणे शक्य होणार नाही. ब्लाऊज काढायला मदतीशिवाय शक्य नाही. मी ३-४ साड्या ठेवल्या आणि बाकी सगळ्या देऊन टाकल्या, अगदी महागतल्या साड्या सुद्धा दिल्या.
अर्थात असं बऱ्याच गोष्टींबद्दल सांगता येईल पण तूर्तास एवढे पुरे!
पण मग माझ्याकडे मॅचींग चपला नाहीत, दागिने तर नाहीच नाहीत, पर्सची चळत नाही, भरपूर प्लास्टिक पिशव्यांचा साठा नाही , disposable प्लास्टिक डब्यांच्या उतरंडी नाहीत, यामुळे काही अडतं का? तर बिलकुल नाही.
आटोपशीर राहता आलं की झालं असा प्रयत्न करते आहे. आपल्या पश्चात मुलांना इंटरेस्ट नसेल अश्या गोष्टी तर नक्की काढायचा प्रयत्न करते. त्यात सध्या प्रेमाने वाढविलेल्या झाडांचाही नंबर लावला आहे. माझ्या झाडांना माझ्या सारखंच प्रेम मिळेल हे माहीत असलेल्या व्यक्तींना, मैत्रीणीना झाडंही देऊन टाकली.
केवळ हौस म्हणून, गरज नसताना, काहीही नवीन खरेदी करायची नाही हे स्वतःला घालून घेतलेलं बंधन आहे. बाजारात नवीन आलं , छान दिसलं म्हणून विकत घेतलं असं कधीही करत नाही.
पण फिरायची हौस आहे, तर शक्य तेवढी फिरत असते, ट्रिपस् करते, त्यासाठी काटकसर करत नाही. पण ट्रीपला जाऊन सुद्धा काहीही खरेदी न करता परत येणारी मी एकटीच असेन.
आपण ३०-४० वर्ष जपून ठेवलेल्या वस्तू, आपल्या मुलांनी त्यांच्या संसारात वापराव्यात अशी अपेक्षाही आता करता येत नाही. कारण त्यांनी तो मध्यमवर्ग कधीच मागे सोडलेला असतो. आपणही सोडलेला असतोच, पण आपण मनाने तिथेच असतो.
गुंतलेल्या मनाचा गुंता सोडवणे आवश्यक आहे याची जाणीव झाली की गोष्टी सोप्या व्हायला लागतात. आता तर नात्यातही गुंतू नका असा सल्ला दिला जातो. मग निर्जीव वस्तू मधला जीव काढून घेणं सोपच आहे ना?
चला तर मग, निवृत्तीच्या वाटेवर चालताना minimalism ची वाटही शोधायची का?
*संध्या घोलप*
❤️
❤️
मिडल क्लास वो होता है, जो कभी
मिडल क्लास वो होता है, जो कभी मनसे जाता नहीं >> जबरी वाक्य! हे धाग्याच्या विषयालाही अनुसरून आहे आणि नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या निकालालाही.
जोमाळून ठेवू नये हे नक्की. -
जोमाळून ठेवू नये हे नक्की. - जोमाळून म्हणजे काय?
मला विकी कौशलच्या वाक्याचा अर्थ लागला नाही. म्हणजे आपण पैशाने श्रीमंत झालो तरी मनात मध्यमवर्गीयपणा कुठेतरी असतो, असं का?
मिडल क्लास वो होता है, जो कभी
मिडल क्लास वो होता है, जो कभी मनसे जाता नहीं >> मला वाटते की तुमचे सुरवातीचे आयुष्य मध्यमवर्गात गेले असेल तर नंतर कितीही पैसा कमवला तरी मनाने तुम्ही मध्यमवर्गीच रहाता असे काही म्हणायचे असावे. पण तरी 'कल के लिए बचाना वेगळे' आणि वस्तूचा उपयोग असो-नसो साठवणे/होर्डिंग वेगळे.
गूगल ट्रांसलेटनुसार जोमाळून
गूगल ट्रांसलेटनुसार जोमाळून म्हणजे with vigor
अनिंद्य, सखीचा पुढचा प्रवासही
अनिंद्य, सखीचा पुढचा प्रवासही सांगा. दोन वर्षात काय झाला?
>> आपण पैशाने श्रीमंत झालो
>> आपण पैशाने श्रीमंत झालो तरी मनात मध्यमवर्गीयपणा कुठेतरी असतो, असं का? >> मी असाच अर्थ लावला.
स्वाती२ शी सहमत. होर्डिंगचा मध्यमवर्गीय असण्याशी संबंध नाही. मला तरी मध्यमवर्गीय मूल्य कायम असावी असं वाटतं. माझ्यालेखी मध्यमवर्गीय म्हणजे काटकसरी, उधळमाधळ न करणारा, काही फुकट न दवडणारा. हे साचेबद्ध, चौकटीतील असेल, आहेच. पण पैशाने श्रीमंत झालो तरी ही मूल्ये मला तरी कायम सर्वांनी जोपासावी असंच वाटतं.
अर्थात होतं काय, ही फर्स्ट वर्ल्ड काटकसर आणि थर्ड वर्ल्ड काटकसर यात तफावत पडत जाते आणि तशी तुलना केली ही सगळ हास्यास्पद होतं. आम्हा डोंबिवलीकरांना पाणी टंचाई आहे, पाणी वाचवा म्हणजे फ्रंट लॉनला आठवड्यात फक्त दोनदा पाणी घाला असं कॅलिफोर्निया सांगतं तेव्हा ते पचायला जडच जातं. पाणी टंचाई म्हणजे ५-६ बादल्यांत चौघांनी जेवण खाण आंघोळी कपडे इतर सगळं करुन रहायचं हे आम्हाला ठाऊक.
होर्डिंग हे सर्वस्वी वेगळं आहे. ते फक्त इनसिक्युरिटीतून येत नाही तर वर अनिंद्य यांनी अनेक मुद्दे सांगितले आहेत त्यांचा त्यात समावेश होतो.
मला वाटतं म्हणूनच तुलना आणि
मला वाटतं म्हणूनच तुलना आणि सरसकटीकरण टाळायला हवं. मध्यमवर्ग, मध्यममार्ग, उधळमाधळ/काटकसर या भयंकर सापेक्ष संकल्पना आहेत. तुलना करायचीच तर आपली आपल्याशीच - कालच्या माझ्या तुलनेत आजचा/ची मी कुठे आहे, माझी वाटचाल योग्य दिशेत होते आहे का, माझी योग्यायोग्याची व्याख्याच बदलते आहे का, कशामुळे बदलते आहे - हे स्वतःशी प्रामाणिकपणे तपासत राहायला हवं.
मलाही स्वाती सारखेच वाटते.
मलाही स्वाती सारखेच वाटते. कारण आपली आणि (आपल्याच व्हॅल्यू दिलेल्या पण पूर्ण वेगळ्या वातावरणात वाढलेल्या) आपल्या मुलांची सुद्धा तुलना करणं unfair वाटतं. इतरांची तर सोडाच. हा माझा मार्ग एकला..!
नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या निकालालाही.>>>
>>>>>आपल्याच व्हॅल्यू
>>>>>आपल्याच व्हॅल्यू दिलेल्या पण पूर्ण वेगळ्या वातावरणात वाढलेल्या) आपल्या मुलांची सुद्धा तुलना करणं unfair वाटतं.
अगदी अगदी. म्हणजे इतका मार्मिक आहे हा विचार.
डेथ क्लिनिंगही संकल्पना मला
डेथ क्लिनिंगही संकल्पना मला आवडली आहे आणि त्या दिशेने हळूहळू वाटचलही सुरु आहे. मात्र मध्यंतरी +१च्या मित्राला आलेला अनुभव सावधगिरी म्हणून शेअर करावासा वाटला. कारण वृद्ध मंडळींचा गैरफायदाही घेतला जावू शकतो.
तर झाले असे की या मित्राची आई एकटी रहाते. मुलं जवळच्याच गावात, त्यामुळे तशी जावून येवून असतात. तर हळू हळू घरातले सामान कमी होवू लागले. सुरुवातीला आई तिला गरज नसलेले देत आहे, असु दे म्हणून कुणी फार विचार केला नाही. पण नंतर काही जुने उत्तम प्रतीचे जड फर्निचर, काही हाय एंड शोभेचे सामान वगैरे गायब बघून विषय काढला तेव्हा कळले की त्यांचा पास्टर आणि चर्च रिलेटेड लोकं 'दान करा, पुण्य कमवा' म्हणून भरीला पाडत होते. बरे हे काही गराज सेल किमतीचे सामान नव्हते. नीट किंमत करुन त्यानुसार रिसीट- टॅक्स ब्रेक , दिले तिथेही व्यवस्थित नोंद वगैरे होणे गरजेचे होते, पण तसा काही पेपर ट्रेलच नाही. धर्मादाय संस्था म्हणून स्टेट्स असले तरी नोंदी चोख हव्यात ना! थोडक्यात अपहार कॅटेगरी!
परत डेथ क्लिनिंग वरुन गाडी
परत डेथ क्लिनिंग वरुन गाडी काटकसर मिनिमलिझमकडे गेली म्हणून थांबतो.
स्वाती२, तुमच्या पोस्टचा
स्वाती२, तुमच्या पोस्टचा विचार करते आहे. म्हणजे निरवानिरव करणार्या व्यक्तीला लिखित नोंदी, टॅक्स ब्रेक इत्यादींचं अगत्य उरलेलं नाही असं होऊ शकतं ना? सामान स्वखुशीने दिलं असेल (चर्चने चोरलं नसेल), जिथे दिलं तिथे त्याचा चांगला उपयोग/विनियोग होणार असेल तर काय प्रॉब्लेम आहे?
या बाईंनी मुलांना आधी त्यातलं काही देऊ केलं असेल का, मुलांनी त्यात रस दाखवला असेल का असाही एक विचार मनात आला.
स्वाती,
स्वाती,
त्या बाईंना जरी रिसीट, टॅक्स ब्रेक वगैरेत इंटरेस्ट नसला फेअर बिझनेस प्रॅक्टिस म्हणून धर्मादाय संस्थेकडून तसे करण्याची ऑफर यायला हवी होती. काही नको म्हटले तर ते निदान एक थॅक्यूचे पत्र तरी देतातच. हे सगळे वैयक्तिक ओळख म्हणून भेट दिली असे नव्हते तर चर्चला दान या श्रद्धेपोटी दिले होते, अशा वेळी चर्चकडे वस्तू मिळाल्याचे रेकॉर्ड हवेच. धर्मादाय संस्था म्हणून स्टेटस असले तरी रेकॉर्ड क्लिन हवे. . चर्चमधे घपले बरेचदा होतात.
माझा अनुभव, चांगली धर्मादाय संस्था असेल तर दिलेल्या वस्तू, पैसेच नव्हे तर श्रमदान म्हणून दिलेला वेळही अॅक्नॉलेज करतात, लॉगबुकात त्याचीही व्यवस्थित नोंद होते. वर्षाच्या शेवटी संस्थेच्या पदाधिकार्यांकडून सर्वांना साधेसेच कार्ड पाठवले जाते.
चर्चमधले घपले हा खूप निराळा
चर्चमधले घपले हा खूप निराळा अणि खूप मोठा विषय आहे. तुम्ही इथे सावधगिरीची सूचना दिलीत, पण मला यात कुणाची कसली फसवणूक झाल्याचं दिसत नाही.
म्हणजे यातून इतरांनी काय धडा घेणं अपेक्षित आहे? पेपर ट्रेलसाठी पाठपुरावा करावा? रिसीट मिळण्याची खातरजमा झाल्याशिवाय दान करू नये? ज्याला किमती फर्निचर बाळगायची इच्छा उरली नाही, तो रिसीट बाळगत बसेल?
स्वाती, मुलांनी चौकशी केली
स्वाती, मुलांनी चौकशी केली तेव्हा चर्च कडे हे सामान मिळाल्याची कसलीच नोंद नव्हती, बाईंचे म्हणणे पास्टरच्या सांगण्यावरुन मी चर्चला मदत म्हणून दिले., कुणा व्यक्तीला दिले नाही. सामान काही साधेसुधे नव्हते, ना ते मिळाल्याची नोंद ना ते पुढे कुणाला विकले/ वापरायला दिल्रे-दान दिले कसलीच नोंद नाही. चर्चला द्या म्हणायचे मात्र त्याची हिशोबासाठी रेकॉर्डला नोंद करायची नाही ही फसवणूक नाही का?
मुलांना काहीच नको आहे पण या वयात आईच्या श्रद्धेचा असा गैरफायदा घेतला गेला याचे वाईट वाटले. त्या बाईंना स्वतःला टॅक्स ब्रेक नको होता पण चर्चच्या हिशोबातूनही गायब ही अपेक्षा नव्हती.
रिसिट बाळगत नाही बसायची आहे.
रिसिट बाळगत नाही बसायची आहे. पण जर संस्थेला दिलं असेल तर दिलेलं दान त्या संस्थेलाच मिळावं ना की पॅस्टरच्या घरी जावं. नंतर संस्थेने त्याचं काय करायचं तो त्यांचा प्रश्न. इंडिव्हिज्युअल व्यक्तीला दिलं असेल तर तो प्रश्न नाही. असं म्हणायचं असावं.
बाय नथिंग ग्रुपवरुन सामान घेऊन ते जर कोणी विकुन पैसे कमावत असेल तर ते कुणाला बिट्रेअल वाटू शकेल. तसं आहे का नाही याबद्दल मला दोन्ही बाजू पटतात आणि काहीच मत नाही.
अमित बाय नथिंग वर एखाद्या
अमित, बाय नथिंग वर एखाद्या व्यक्तीला देवून टाकले तर पुढे त्याचे काय झाले, ते त्याने स्वतः वापरले, अपसायकल केले/विकले काही फरक पडत नाही. पण हे तसे नाही. इथे चर्चच्या नावाखाली घडले असे इतर श्रद्धा/ सॉफ्ट कॉर्नर असलेले कार्य या निमित्तानेही घडू शकते.
माझ्या पाहण्यात इथे अशा वृद्ध
माझ्या पाहण्यात इथे अशा वृद्ध व्यक्ती आहेत, ज्यांना असा पसारा आवरून ‘डाऊनसाइज’ करण्याची प्रामाणिक इच्छा असते. असं जड आणि जुनं सामान विकतच काय, फुकटही नेत नाही कोणी. (मुलांनाही नकोच होतं म्हणताहात.) जंक रिमूव्हलही महाग होऊन बसतं. अशावेळी चर्चच्या लोकांनी त्यांच्या माहिती आणि संमतीने नेलं असेल सामान, तर त्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला असण्याची शक्यता जास्त!
इथे बहुधा ही सगळीच चर्चा अस्थानी आहे, पण डेथ क्लीनिंग करणाऱ्या व्यक्तीने या घटनेतून काय धडा घ्यावा हे मला अजूनही समजलेलं नाही.
स्वाती,
स्वाती,
मी चर्चच्या लोकांना योग्य पद्धतीने काम करताना बघितले आहे आणि अयोग्य पद्धतीनेही. मी स्वतःही ख्रिश्चन चॅरिटीसाठी काम केले आहे. या केसमधे वस्तू सेकंडरी मार्केटसाठी देखील हाय एंडच होत्या. त्या विकून चर्चतर्फे इतर लोकांना मदत करता येईल असे भासवले गेले पण प्रत्यक्षात चर्चला काहीच मिळाले नाही. डेथ क्लिनिंग व्यक्तीने घ्यावयाचा धडा म्हणाल तर डाऊनसाईज करताना सत्पात्री दान हा देखील हेतू असेल तर तो पूर्ण होणार आहे का याची जरा खात्री करावी.
हो ते आलं लक्षात, पण यात काय
हो ते आलं लक्षात, पण यात काय निराळं करता आलं असतं संबंधित व्यक्तींना? यापुढे अशा परिस्थितीतील लोकांनी काय सावधगिरी बाळगावी? चर्च हे सत्पात्रच वाटलं असणार त्यांना.
त्यातल्या त्यात लहानसहान वस्तू गेलेल्या दिसल्या तेव्हाच मुलांनी त्यांच्याशी ही बाकी सामानाच्या विल्हेवाटीची चर्चा करायला हवी होती असं मला वाटलं. तेही जवळ/जाऊनयेऊन संपर्कात होती म्हणून.
मी माझ्या घरातल्या वस्तू NAB
मी माझ्या घरातल्या वस्तू NAB ला दिल्या. न्यायला त्यांचीच गाडी आली होती. दोन दिवसांनी मला व्हाट्सअप वर पावती आली. (नं मागता )
चर्चेत मुद्दयांची सरमिसळ झाली
चर्चेत मुद्दयांची सरमिसळ झाली की थोडे थांबून, थोडे लांबून बघायचे
महत्वाचे मुद्दे / गोषवारा टंकतो आहे :
१} …होर्डिंगचा मध्यमवर्गीय असण्याशी संबंध नाही. …..
+१११११
२} काटकसर ही सापेक्ष असते हे सुद्धा बरोबर. पिढीप्रमाणे “वाया” घालवणे म्हणजे काय याची व्याख्या बदलते हे सुसंगत वाटले.
३} Minimalism वेगळी कंसेप्ट आहे, त्याचा Döstädning शी संबध पुसट आहे. म्हणजे त्यांचा पसाराच कमी असल्याने आयुष्याच्या संध्याकाळी आवराआवर सोपी होईल असे. पण म्हणून माझ्याकडे चांगले कपडे नाहीत आणि त्याची आडून आडून व्यक्त केलेली खंत.. याची गरजच नाही. चांगले सुखसोईचे, आनंदाचे आयुष्य शेवटपर्यंत जगणे हा चॉइस आहे. मुद्द्यांची गल्लत होते आहे.
४} मिडल क्लास / मध्यमवर्गीय वृत्ती! काहीही वाया न घालवण्याची वृत्ती. हे चुकीचे ग्लोरिफिकेशन वाटते. कारण मुद्दा “वाया घालवणे” असा नाहीच आहे. “वापरात आणणे” हा आहे. स्वत: “वापरत नसल्यास” इतरांना वापरण्यास देणे असा आहे. वापराविना अती संग्रह भारतासारख्या गरीब देशात तर फारच चुकीचा आहे. Resources are very precious, so squeezing more out of them makes more sense than dumping them on some godforsaken माळा , isn’t it ?
५} मध्यमवर्गीय किंवा श्रीमंत असणे नसणे यानी Döstädning ची व्याप्ती बदलेल फारतर. धनवान लोकांचे आणि मिडिल क्लास सामान्यांचे Stada वेगवेगळे असणार पण एक सोपे दुसरे कठिण असे असणार नाही.
दोन अतिश्रीमंतांची उदाहरणे पहाण्यात आहेत.
प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांनी शेवटची काही वर्षे व्यवसायातील उत्तराधिकार पुढच्या पिढीला gradually सोपवत भरपूर वेळ पारिवारिक ट्रस्ट, २-३ पिढ्यांचे एकमेकांच्या कंपन्यांमधले क्लिष्ट cross holdings, management control इ. मुद्दे, सख्ख्या-चुलत बंधुबांधवांसोबतचे सांपत्तिक वाद, व्यक्तिगत संपत्तीचे हयातीत/ मृत्युपश्चात वितरण असा गुंता सोडवण्यात व्यतीत केला. हे त्यांचे Döstädning.
सध्या ख्यातनाम अभिनेत्री शर्मिला टागोर (she is 80 already !) दिवंगत पती नवाब ऑफ पतौडी आणि सासूबाईंच्या (नवाब ऑफ भोपाल स्टेट) वारस म्हणून जगभर पसरलेल्या कोट्यावधी डॉलर्सच्या मालमत्ता, त्याबद्दलचे तीन पिढ्यांचे पारिवारिक विवाद, अतिक्रमण झालेले महाल-किल्ले-जमीनी, संपत्तीचे साधारण २३० कोर्ट कज्जे असे मुद्दे सोडवण्यात पूर्णवेळ मग्न आहेत. पुढच्या पिढीसाठी गुंतागुंतीचा inheritance सोपा करणे हे त्यांचे Döstädning.
याउलट तुम्ही-आम्ही ४-५ बँक खाती आणि ती विनावापर डॉर्मंट होणे, २० वर्षांपूर्वीच्या विमा पॉलिसीचा नॉमिनी बदललेला नसणे, राहत्या घराची किंवा इतर गुंतवणुकीची कागदपत्रे जागेवर नसणे असे मुद्दे सोडवत असू. कामाचे स्वरूप बदलले, काम आहेच.
>>>
>>>
चांगले सुखसोईचे, आनंदाचे आयुष्य शेवटपर्यंत जगणे हा चॉइस आहे ...
...मुद्दा “वाया घालवणे” असा नाहीच आहे. “वापरात आणणे” हा आहे. स्वत: “वापरत नसल्यास” इतरांना वापरण्यास देणे असा आहे.
<<<
नेमकं आणि स्वच्छ सार मांडलंत! वा!
६} अपहार कॅटेगरी / पावती/
६} अपहार कॅटेगरी / पावती/ दानधर्म/ फसवणूक याबद्दल:
जी सावधगिरी आपण सामान्य दैनंदिन व्यवहारात घेतो ती इथेही अपेक्षित आहे. कुणी फसवेल म्हणून ते काम आपण करतच नाही असे नाही, आपण सावधगिरी राखून करतो, करावे.
७} ….जड आणि जुनं सामान विकतच काय, फुकटही नेत नाही कोणी… हो. अनुभव आहे. म्हणूनच एकदा देण्याचे ठरवले की मग अती चिकित्सा करु नये असे वाटते. विकले तरी किरकोळ पैसे येतात. जुन्या रद्दीचे “खूप” पैसे येतात असे कुणीतरी लिहिलेय. त्यांना reality check ची गरज आहे. पिवळ्या पानांची जुनी रद्दी फेकून देतात भंगारवाले, पैसे नाही देत. घरुन स्वत:च्या वाहनानी आपले सामान पिकअप करणाऱ्या NAB सारख्या संस्थांचा उल्लेख वर आला आहे. असे जमले तर बेस्ट.
८} आपल्या समाजात वस्तू “सत्पात्री” जावी असा एक सूप्त दबाव असतो. ते ठीक. पण वस्तू किरकोळ असेल तर “सत्पात्र” शोधण्यात फार प्रयत्न, वेळ घालवू नये असे वैयक्तिक मत. प्लास्टिकचे डबे-पिशव्या, जुने कपडे, फ़र्निचर, पुस्तके असे सर्वकाही भारतात रिसायकल होतेच. आपले नको असलेले सामान नेमका कोण आणि कसा वापरतो आहे याचे अपडेट नाही मिळाले तर असा काय फरक पडतो ?
९} ट्रीपला जाऊन सुद्धा काहीही खरेदी न करता परत…
हे लोक आदर्श, अनुकरणीय ! सुवेनियर्स आणायची हौस कमीच होती आधीही. शॉटग्लासेस आणि की चेनचा संग्रह करित होतो. आता शून्य. अपवाद करायचाच तर खास खाण्यापिण्याच्या वस्तू असल्या तर. ते ही किमान वजन होईल, पटकन संपतील इतक्याच. Memories of time well spent are the best souvenirs.
मस्त लिहील आहेत अनिंद्य.
मस्त लिहील आहेत अनिंद्य.
मुद्दे कळतायेत पण वळत नाहीत असे म्हणता येईल.
अनिंद्य मध्ये मध्ये सारांश
अनिंद्य मध्ये मध्ये सारांश लिहून स्वतः चे हात मोकळे करून घेत आहेत
Pages