लष्कराच्या भाकऱ्या(२) : जागरूक वाचक मंच

Submitted by कुमार१ on 1 January, 2023 - 20:22

भाग १: https://www.maayboli.com/node/75324
..................................................................................................
नववर्षानिमित्त सर्व मायबोलीकरांचे स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा !
भाग १ मधील पृष्ठसंख्या बरीच फुगल्यामुळे हा भाग काढतो आहे.

नव्या वाचकांसाठी थोडी पार्श्वभूमी :
वृत्तमाध्यमांमधून असंख्य बातम्या आणि विविध प्रकारची माहिती प्रसारित होत असते. अलीकडे माध्यमांमध्ये घाईघाईत अर्धवट बातम्या देणे, मूळ इंग्लिशमधील बातमीचे ढिसाळ व हास्यास्पद भाषांतर आणि एकंदरीतच लेखनाबद्दलची बेफिकिरी या गोष्टी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. अपवाद म्हणून काही माध्यमांमधून इतरांपेक्षा काहीतरी वेगळे किंवा चांगले सुद्धा सादर केले जाते. अशा वृत्तापैकी तुम्हाला आवडलेले/ नावडलेले/ खटकलेले असे काहीही तुम्ही इथे संबंधित दुव्यासकट लिहू शकता.

शीर्षकाच्या नामविस्तारासह सादर आहे हा “लष्कराच्या भाकऱ्याचा” दुसरा भाग..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Screenshot_2024-05-28-19-35-05-91_40deb401b9ffe8e1df2f1cc5ba480b12.jpg

दिशाभूल करणारे शीर्षक आणि बातमी. मार्केटने नवा उच्चांक गाठून कालच्या पेक्षा मोठी घसरण केली असती तर गोष्ट वेगळी. रोजच्या होणाऱ्या चढ उताराला गुंतवणूकदारांचे पैसे बुडाले, पाण्यात गेले म्हणणे चुकीचे आहे.

प्लाझा Lol

प्लाझ्मा विकून खाल्ला म्हणजे नक्की काय? की प्लाझ्मा विकून त्यातून येणारे पैसे खाल्ले?

अशा बातमीदारांनी तांत्रिक इंग्लिश शब्द रोमन लिपीमध्येच लिहिले तर जास्त बरे पडेल.
असे विनोद तरी होणार नाहीत.

IMG-20240601-WA0000.jpg

हा 'नवतपा' प्रकार मला माहिती नव्हता, पण सूर्याचे किरण थेट पृथ्वीवर येतात म्हणजे काय? बाकीच्या वेळी बुध किंवा शुक्रावर मुक्काम करून येतात की काय? 'सूर्य बरोबर डोक्यावर येणे' म्हणजे शून्य सावलीचा दिवस म्हणायचं असेल तर तो त्या त्या ठिकाणच्या अक्षवृत्तानुसार ठरतो. उन्हाळ्यात उष्णता जास्त असते कारण दिवस मोठा असतो. या काळात सूर्य आणि पृथ्वीमधलं अंतर उलट जास्त असतं. ( म्हणून दक्षिण गोलार्धात जास्त तीव्र हिवाळा असतो.)
अधोरेखित केलेल्या शेवटच्या वाक्याचा तर मला काही अर्थच लागला नाही.
आणि हे लोकसत्ता ॲपच्या 'विश्लेषण' विभागात आहे! लिहिणाऱ्या पत्रकाराच्या नावासकट आहे.

खरे आहे. भाषा घोळदार आहे.
थेट >>
मला असं वाटतं की सूर्याच्या किरणांचा पृथ्वीवर पडताना होणारा कोन वेगवेगळ्या ऋतूत भिन्न असतो का ? तो शब्द त्याच्याशी काहीतरी संबंधित असावा. ते त्यांना नीट सांगता आलेले नाही.

मलाही हे नवीनच आहे. नवताप असा शब्द सापडला आणि त्याला हिंदीत नौतपा हा प्रतिशब्द दिसला. नवतपा असा शब्द दिसला नाही.

पृथ्वी गोल आहे, त्यामुळे वर्षातल्या कुठल्याही दिवशी सगळीकडे (एका वेळी अर्ध्या पृथ्वीवर) सूर्यकिरणांचा कोन सारखा नसतो.

कर्कवृत्त आणि मकरवृत्त यांच्या मधल्या भूभागावर वर्षातून दोन दिवस दुपारच्या वेळी सूर्य बरोबर डोक्यावर येतो. एरवी येत नाही. हे दिवस अक्षवृत्तानुसार असतात.

पृथ्वी आणि सूर्यामधलं अंतर वर्षभर समान नसतं. पण उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो, तेव्हा पृथ्वी सूर्यापासून लांब असते. ऋतूंचं कारण 'पृथ्वीचा आस कललेला आहे' हे आहे.

गाव, ठिकाण यांच्या केंद्रापासून पन्नास किलोमीटरच्या परिघात (? की त्रिज्येत?) याचा तर काही अर्थच लागत नाही. गावाच्या मध्यभागी सूर्यकिरण पडतात आणि मग ते पन्नास किलोमीटरपर्यंत पसरतात असं चित्र उभं रहातं डोळ्यासमोर. Lol

Lol
आणि ‘उन्हाळा हा ऋतू उत्तम स्थितीत दिसतो’ म्हणजे काय?!
हे कसलंतरी टुकार भाषांतर दिसतंय.

उत्तम स्थितीत दिसतो >> is/are at their peak असं काहीतरी असावं. मशीन भाषांतर पूर्वी "शिखर" करत असे ते आता context लक्षात घेऊन superlative degree करायला "उत्तम स्थिती" करत असावं. मशीन भाषांतराची वाताहत उत्तम स्थितीत आहे.

लोकसत्ता मुंबई पुरवणीतील बातमी
मध्य रेल्वेच्या जम्बो ब्लॉकमुळे मेट्रोच्या तीन मार्गिकांवर प्रवाशांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे हे वाक्य बातमीत तीन वेळा आहे. मेट्रोच्या फेर्‍या वाढविलेल्या नाहीत , हे वाक्य दोन वेळा आणि वाढविण्याची शक्यता आहे हे वाक्य दोन वेळा आले आहे. शिवाय प्रत्येक वेळी त्या तीन मेट्रो मार्गिकांची नावे दिली आहेत.
नेट आवृत्तीतील बातमीतला शेवटचा परिच्छेद छापील आवृत्तीत नाही. तोवर मेट्रो कडून उत्तर आलं नसावं.

हल्ली लोकसत्तेत बातमीच्या शीर्षकात नाही हा शब्द आला की तो नाहीच असाच लिहिलेला असतो. या बातमीत शक्यता शिल्लक असल्याने च लावला नसावा किंवा पुरवणीचे उपसंपादक वेगळे असावेत.

मी ई पेपर वाचत नाही. छापील पेपरातली बातमी वाचून हे लिहिलं आहे. इथे लिंक देता यावी म्हणून ई आवृत्तीतील बातमी शोधली. पण वृत्तपत्रांनी ई आवृत्तीतल्या मजकुराच्या गुणवत्तेकडेही लक्ष द्यायला हवं. आता तर छापील मजकुराचाही दर्जा घसरत चालला आहे. वरच्यासारखी मजकुराची पुनरावृत्ती वरचेवर दिसते.

वावे म्हणताहेत ती नवतपाची बातमी किंवा जे काय आहे ते छापील आवृत्तीत दिसलं नाही. ते इकडून तिकडून कॉपी पेस्ट आणि अनुवाद केला असेल तर बायलाइन (पत्रकाराचं नाव) नको होतं. राखी चव्हाण पर्यावरणविषयक बातम्या देतात.

सध्याच्या वृत्तमाध्यमांमध्ये आकाशवाणी हे माध्यम मला सर्वात चांगले वाटते. मी सकाळी आणि संध्याकाळी प्रत्येकी दहा मिनिटे त्यावरच्या बातम्या ऐकतो. महिन्यातून एखाददुसऱ्या शब्दाची चूक वगळता त्या बातम्या निर्दोष आणि चांगल्या प्रकारे सांगितलेल्या असतात.

पण वृत्तपत्रांनी ई आवृत्तीतल्या मजकुराच्या गुणवत्तेकडेही लक्ष द्यायला हवं. करेक्ट!
माझी नाचणीच्या इडल्यांची पाकृ लोकसत्तेने चोरल्यावर मी एका नातेवाईकांमार्फत लोकसत्तेच्या एका पत्रकाराला हे कळवलं होतं. पण तो पुण्यात असतो आणि 'ऑनलाइनची टीम वेगळी आहे आणि ती मुंबईत असते' असं त्याने सांगितलं. एकूण सूर असा दिसला की असं बऱ्याच वेळा होत असतं (मजकूर चोरणं). (त्यामुळे फार गांभीर्याने घेण्याचं कारण नाही). बऱ्याच वेळा होतं हे खरं असेलच, पण म्हणून ते बरोबर आहे असं तर नाही ना?
ऑनलाइन आवृत्तीच्या दर्जाची जबाबदारी मूळ वृत्तपत्रावरच असली पाहिजे.

उ. बो. , वाचली लिंक. माझी रेसिपी काही जगावेगळी किंवा जगात भारी होती, जिचा प्रताधिकार मिळावा अशी माझी इच्छा आहे, असं अजिबात नाही. Proud या लिंकमधल्या मजकुरात खालील वाक्य आहे.
However, a unique expression of the recipe can be seen as a ‘literary work’ that falls within the scope of copyright protection.
इथे हे अवांतर होईल, माझ्या धाग्यात लोकसत्तेची लिंक आहे. माझी वाक्यंही त्यांनी कॉपी केली आहेत. अर्थात जितके टक्के कॉपी केल्यावर या कायद्यात बसेल, त्याहून कमी टक्के कॉपी केलं असणार. मी जेवढा पाठपुरावा करणं जमलं तेवढा केला. मुद्दा इतकाच आहे की लोकसत्तेसारख्या वृत्तपत्राला हे शोभत नाही. (किंवा ऑनलाइन आवृत्तीचा दर्जा पाहता, शोभतं. )

ता.क. मी स्वतः आत्ता परत लोकसत्तेच्या लिंकवर गेले तेव्हा लक्षात आलं की त्यांनी अजून काही वाक्यं बदलली आहेत/काढली आहेत. याचा अर्थ कदाचित त्यांच्यापर्यंत हे पोचलं असावं. पण माझ्याकडे मूळ स्क्रीनशॉट्स आहेत! असो.

बरोबर वावे. नाचणी इडलीची दुसऱ्या कुणी पाकृ पोस्ट केली यावर आक्षेप नाही तर पाकृ लिखाण जसेच्या तसे कॉपी केले यावर आहे हे उघड आहे. निषेध करणे कायदेशीरच आहे.

वावे तुमचा धागा पाहिला आणि लोकसत्ता लिंक पण पाहिली. खूप साम्य आहेच. या कॉपीविषयी तुम्ही फेसबुक वर लिहू शकता. किमान तुम्हाला समाधान.

रच्याकने,
तांदूळ न वापरता नाचणीची इडली रेसिपी मी खूप वर्षापूर्वी लिहिली आहे . तिची लिंक देण्याचा मोह आवरत नाही.

गिरणीवरून हा एक भारी किस्सा.>>>>

गिरणीवरून मलाही आठवले. पुणे कात्रज भागात एक पिठाची गिरणी आहे. त्यात बरीच मोठी नियमावली लावलेली आहे. त्यात गिरणी सोडण्यापूर्वी पीठ मोजून घ्यावे, गिरणी मालकाशी हुज्जत घालू नये वगैरे स्टँडर्ड सुचनांसोबत ' गिरणीत अतिप्रसंग केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल ' अशी एक सूचना आहे. मी दहावीत असताना पुण्यात पहिल्यांदा आलेली असताना ती सूचना पाहून चपापले होते. योगायोगाने आता लग्नानंतर त्या गिरणीच्या जवळपास राहायला आले. १५ वर्षे झाली तरी ती सूचना तशीच आहे आणि अजूनही मला गिरणीवाल्याला त्या सूचनेचा अर्थ विचारायची हिम्मत झालेली नाही.

तेही नक्कीच कश्याचे तरी उटपटांग भाषांतर असावे. नाहीतर सदैव पिठाने माखलेल्या वयस्कर एकट्या भैय्याला अतिप्रसंगाची काय भीती? :बुचकळ्यात पडलेली बाहुली:

हेहे, आपल्याला काय माहीत.पाटी बरीच वर्षं आहे म्हणते आहेस ना,तेव्हा भैय्या तरुण असतील आणि त्यांनी गर्लफ्रेंड आणून अतिप्रसंग अरेंज केला पण असेल गिरणीत.

वर पियूच्या प्रतिसादात आता पाहिले असता “पुण्यात” हा शब्द अचानक हायपरलिंक झाला आहे आणि त्याच्या शेजारी भिंगाचे चित्रही उमटले आहे.
काल मी माझे काही जुने लेख पाहत असताना त्यातही मला अशी करामत दिसून आली. पूर्वी काही ते शब्द अजिबात हायपरलिंक केलेले नव्हते.
आता आपण अशा शब्दांवर जर टिचकी मारली तर आपल्याला काही वेगळेच संदर्भ दिसतात आणि मग हे हायपरलिंक व भिंगाचे चित्र निघून जाते.

हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रकार आहे काय ?

Pages