मुलाखत कशी वाटली.

Submitted by अस्मिता. on 28 June, 2023 - 21:16

हा मुलाखतींसाठी काढलेला स्वतंत्र धागा. वेबसिरिज धाग्यावर हे योग्य वाटत नव्हतं म्हणून काढला. मला मुलाखती बघायला अतिशय आवडतं. त्यातल्या गप्पा क्वचित समृद्ध करणाऱ्या काही नवीन विचार देणाऱ्या असू शकतात. तसंच कधी बढाया, थापाही असू शकतात. पण हे सगळंच मला रंजक वाटतं. इथे तुम्हाला आवडलेल्या-न आवडलेल्या, फिल्मी-नॉन फिल्मी, प्रमोशनसाठी असलेल्या किंवा नुसत्याच, गणित, विज्ञान, खेळ, इतिहास, पुरातत्व संशोधन, Astrophysics किंवा इतर कुठल्याही विषयावर आधारित देशी-विदेशी अशा अनेक मुलाखतींवर चर्चा करता येईल. स्वयंपाक व पाककृती संबंधित किंवा तत्सम मुलाखतीवर चर्चा नकोत. मी दिल के करीब, Tweak ,रंगपंढरी, David Letterman, BeerBiceps हे नियमितपणे बघते. मला रणवीर अलाहाबादीया फार फार आवडतो . His podcasts are my new found love.

तुम्ही बघितलेली मुलाखत तुम्हाला कशी वाटली , कुठं बघितली हे प्रतिसादात नक्की लिहा. Happy
धन्यवाद Happy
अस्मिता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'सागरा प्राण तळमळला'च्या निमित्ताने कविवर्य शंकर वैद्य यांनी लता व हृदयनाथ मंगेशकरांनी दूरदर्शनच्या सह्याद्री चॅनेलवर घेतलेली मुलाखत. शंकर वैद्यांचे विवेचनही सुंदर आहे. मुलाखत म्हणण्यापेक्षा चर्चाच म्हणावी लागेल.अश्या सौम्य व अभ्यासपूर्ण मुलाखती आता दुर्मिळ आहेत.
मुलाखतीमध्ये मंगेशकर बंधूभगिनी व अरुण दातेंनी गायलेले 'सागरा' व लताबाईंनी गायलेले 'हे हिंदू नृसिंहा' गाणीही आहेत.

एकंदरीत या चॅनेलवर 'कालवा स्तरीय पाणी वापर - नियोजन', 'वासरांची निगा' पासून 'कथा सईची' (सई परांजपे यांची मुलाखत) असे भरगच्च प्रोग्रॅम्स दिसताहेत. हळू हळू पाहिले पाहिजेत.

'कथा सईची' नियमित बघतो आहे. दर आठवड्याला एक भाग येतोय. २५-२६ भाग झालेत पण अजिबात कंटाळा आला नाही. मी सई फॅन झालो आहे.

कथा सईची सुरुवातीचे काही भाग बघितलेले आणि आवडलेले. पुढचे भाग शोधतो.
नयना आपटे यांची मुलाखत बघितली. त्या आवडतात. मुलाखतीतही चांगलं बोलल्या आहेत. प्रभुअजी गमला त्यांना जागा दिसत होत्या पण वयानुसार आवाज साथ देत न्हवता. पण उत्साह जेन्युअन आणि जबरदस्त आहे! अनुभव आणि वय वाढलं की जी वैचारिक खोली आणि साधेपणा येतो तो सतत जाणवत होता.

Happy रीया, हे बघ.
https://m.youtube.com/@navyanavelinanda

ही लिंक उघडत नसेल तर तिच्या शो चे नाव What the hell Navya आहे. ते गूगल करून बघ.

नव्या खूपच तरतरीत व गोड वाटते पण मुलाखतींमधे आई, आजी आणि छोटा दादा एवढेच मेम्बर्स असल्याने थोड्याच बघितल्या.

'अंतर्नाद'चे संपादक भानू काळे यांची 'साधना'चे संपादक विनोद शिरसाठ यांनी घेतलेली मुलाखत 'साधना'मध्ये आली आहे. तीच मुलाखत यूट्यूबवर उपलब्ध आहे म्हणून वाचण्याऐवजी पाहिली.
दोन भागांत आहे मुलाखत. अंतर्नाद सुरू करण्यापूर्वीचे आणि अंतर्नादचं संपादन करत असतानाचे भानू काळे, असे हे दोन भाग.
https://youtu.be/In6C9fBovDs?si=6Foh4KiMawWsHTPP
भाग १
https://youtu.be/x82AUDN-mEw?si=b_jhnZXeLRkZ8zFH
भाग २
दोन्ही भाग बघायला आवडले.
आम्ही 'अंतर्नाद'चे २००८ पासून ते तो बंद पडेपर्यंत वर्गणीदार होतो. भानू काळ्यांचं 'बदलता भारत' हे पुस्तकही मी वाचलंय आणि ते तेव्हा आवडलंही होतं. या मुलाखतीतून लक्षात आलं की साधारणपणे २०१२ पर्यंत अंतर्नादचा भरभराटीचा काळ होता आणि नंतर उतरण सुरू झाली.
अंतर्नाद वाचत असताना आणि ही मुलाखत बघतानाही खटकलेली एक गोष्ट म्हणजे एलिटिझम. 'सांस्कृतिक समृद्धीसाठी' हे अंतर्नादचं बोधवाक्य होतं. पण समाजातला मुळातच सुशिक्षित, सुसंस्कृत, चांगलं वाचन असणारा वगैरे जो भाग होता, तोच त्यांचा टार्गेट वाचकवर्ग होता हे मुलाखतीतून लक्षात आलं. ज्या घटकांपर्यंत ही समृद्धी पोचलेलीच नाही, त्यांच्यापर्यंत ती पोचवावी, असे काही प्रयत्न त्यांनी केले असं वाटत नाही. मग त्यांचा वाचकवर्ग हळूहळू कमी होत गेला याचं आश्चर्य वाटत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे एक प्रकारचा व्यक्तिकेंद्रितपणा. स्वतः भानू काळे हे अतिशय व्यासंगी, बहुश्रुत आहेत यात शंकाच नाही. पण मासिकाचं संपादन करताना आपल्या स्वतःच्या आवडीनिवडीच्या, खरं तर अनुभवविश्वाच्याही पलीकडे त्यांनी जायला हवं होतं असं वाटलं. 'अंतर्नाद'वरची एक टीका म्हणजे त्यांनी ग्रामीण साहित्याला जास्त वाव दिला नाही, असा उल्लेख विनोद शिरसाठांनी केल्यावर त्यावर भानू काळ्यांचं उत्तर असं होतं की माझा ग्रामीण भागाशी कधी काही फारसा संबंध आलेला नाही, आमची कुठे गावाकडे शेती वगैरेही नाही. हे ऐकून मला 'अरेच्चा?' असं झालं. आपल्या लेखनात आपल्या अनुभवविश्वाचं प्रतिबिंब पडणं बरोबर आहे. पण संपादक म्हणून असं म्हणणं हे म्हणजे फारच मर्यादा घालून घेणं झालं.

विनोद शिरसाठ हे संपादक म्हणून मला आवडतात. अभ्यासू आणि चांगला, मोकळा दृष्टिकोन असतो त्यांचा. त्यांनी ही मुलाखतही अतिशय उत्तम घेतली आहे.

मुलाखतीचा पहिला भाग, म्हणजे त्यांच्या जडणघडणीचा भाग खूपच आवडला. मुंबईत राहणाऱ्या, सांस्कृतिकदृष्टीने सजग असणाऱ्या कुटुंबात वाढत असतानाचे अनुभव ऐकायला आवडले. वाढीच्या वयातल्या मुलांना पुस्तकं, वर्तमानपत्रं, चांगल्या वक्त्यांची भाषणं वगैरे उपलब्ध असली आणि या गोष्टींची आवड निर्माण करण्याचा पालकांकडूनही जाणीवपूर्वक थोडा प्रयत्न झाला तर असं समृद्ध व्यक्तिमत्त्व निर्माण होण्याची शक्यता खूप असते. मुळात मुलांना ती आवड नसेल तर अर्थात वेगळी गोष्ट.

या मुलाखतीतच असं नाही, एरवीही अनेक ठिकाणी 'हल्ली मराठीत कुणी चांगलं लिहिणारं फारसं उरलंच नाही' असा एक सूर ऐकायला मिळतो. तो कदाचित बरोबरही आहे, पण शंभर टक्के बरोबर नाही असं मला वाटतं. नवीन चांगले लेखकही आहेत आणि मायबोलीसारख्या ऑनलाइन माध्यमांतून लिहिणारेही अनेक उत्तमोत्तम लेखक आहेत. या ऑनलाइन माध्यमांतून लिहिणाऱ्या लेखकांची जेवढी घ्यायला हवी तेवढी दखल घेतली जात नाही असं मला वाटतं. ऑनलाइन म्हटलं की फेसबुकच समोर येतं आणि मग ते इन्स्टंट कौतुकासाठीच, 'लाईक्स'साठीच लिहितात, असाच तक्रारवजा सूर निघतो. तो फेसबुकसाठी कदाचित बरोबर असेल, पण सगळ्याच ऑनलाइन विश्वाला तो लागू करणं बरोबर नाही.

आभार अस्मिता Happy (थॅंक्स लिहायला फार कष्ट पडतात या कीबोर्ड वर)
बघते आता. मला तीचे रिल्स दिसत रहातात त्यामुळे एक्दा तरी बघायचं होतं.

>>>>> वावे, मुलाखतीवरचा अभिप्राय आवडला आणि पटला.
+१
फेसबुक आणि मायबोलीची तुलना नाही होऊ शकत ह्यालाही अनुमोदन.

धन्यवाद मंडळी Happy
स्टोरीटेलवर किशोर कदमची मुलाखत ऐकली. रीमा सदाशिव अमरापूरकर हिने घेतली आहे मुलाखत. किशोर कदमचा अभिनय, त्याच्या कविता आणि सादरीकरण (अभिवाचन, कवितावाचन वगैरे) मला खूप म्हणजे खूप आवडतं Happy त्यामुळे आवर्जून मुलाखत ऐकली. तो अर्थात छानच बोलला आहे, पण अतिच अनौपचारिक वाटली मुलाखत म्हणून. पण चांगली आहे. त्यात त्याने नटराजाची प्रार्थना नावाची कविता सादर केली आहे ती प्रचंड आवडली.

शकुंतला परांजपे यांची सह्याद्री वर 'तुफानी दिवे ' ह्या कार्यक्रमातील मुलाखत youtube वर ऐकली.
त्यांचं संतती नियमनाच कार्य, लग्न, सईच संगोपन ह्या विषयी कथा सई ची मध्ये थोड थोड कळलेलं. ते त्यांच्या कडून ऐकायला अजून छान वाटत.
किती बुध्दीमान किंवा gifted कुटुंब आहे असं परत एकदा मनात येत.

किती बुध्दीमान किंवा gifted कुटुंब आहे असं परत एकदा मनात येत.>>>> +1
सह्याद्री वाहिनीवर कथा सुचली नियमित ऐकते आणि उत्तरा मोनेचा गोष्टी गाण्याच्या हा आवडता कार्यक्रम आहे. अजित परब व गुरू ठाकुरची मुलाखत खूप आवडली....

किती बुध्दीमान किंवा gifted कुटुंब आहे असं परत एकदा मनात येत.>> हो ना! हे परांजप्यें कुटुंबीय काय किंवा धोंडो केशव कर्व्यांच्या पुढच्या पिढ्या काय, सगळेच तसे. नंतर या दोन कुटुंबात नातं आहे हे कळल्यावर आश्चर्य वाटायचं कमी झालं. सब मिले हुए हैं जी (केजरीवालांच्या आवाजात म्हणा).

आज गौतम जोगळेकर, त्यांची पुढची पिढी. ची मुलाखत अचानक (?) समोर आली. अर्थात पहिली.
त्याचा अजूनच वेगळा दृष्टिकोन. आई आणि त्याच फारस पटत नाही, आजी खूप कडाक होती वगैरे काही गोष्टी त्याने सांगितल्या आहेत.
तो त्याच्या वडिलांविषयी भरभरून बोललाय.

मला आवडतो गौतम जोगळेकर, बहिणही आवडते. खरंतर पूर्ण कुटुंब आवडतं. त्यांच्या आईबाबांचे (सई परांजपे, अरुण जोगळेकर) नातं फार सुरेख वाटायचं मला, सेपरेट झालेले, नवरा बायको म्हणून नातं संपुष्टात आलेलं, पण छान मैत्री होती. एकाच बिल्डिंगमध्ये रहायचे बहुतेक.

कर्वे कुटुंब आणि परांजपे कुटुंब रीस्पेक्ट.

थॅंक्स लिहायला फार कष्ट पडतात या कीबोर्ड वर >>> माझ्यासारख्या काहींना जनरलीच कष्ट पडतात थँक्स लिहायला, कीबोर्ड सोपा असला तरी Wink

हपाच्या "आठवण करून द्यायला एक धागा काढला पाहिजे" ची दखल घेत आहे. लोल Happy

वावे - तो अभिप्राय आवडला.

बाकी मुलाखंतीबद्दल वाचतोय. शंकर वैद्य/मंगेशकर, सई परांजपे वगैरेंबद्दलच्या मुलाखती बघायच्या आहेत.

माबोवर अतिशय सुंदर कथा लिहिणारे अनेक आहेत. मी जेव्हा माबोवर नवीन आलो होतो तेव्हा तत्कालीन मासिकांमधल्या लेखनापेक्षा माबोवरच्या ललित्/कथालेखनाचा दर्जा मला जास्त चांगला वाटला होता. अजूनही अनेक उतम कथा व ललित लेख येतात. फेबुवर त्यामानाने कमी पाहिले आहेत. अर्थात माझ्या फीड मधे जितके येते त्यावरूनच लिहीतोय. फेबुवर मला जास्त दिसते ते विरोधी मतांना दारे बंद करून आपल्याच बबल मधे मान डोलावणार्‍यांसमोर preaching to the choir टाइप लिहून "रोखठोक" वगैरे कौतुके करून घेणारे पब्लिक.

kcraft म्हणून चॅनेल आहे त्यावर जुन्या serials वाल्या crew and cast ना बोलावून making, गमती जमती discuss करतात.काल त्यात झोका मधल्या लोकांना बोलावलं होत. मला ही सिरीयल खूप आवडायची. त्यामुळे आवडल ऐकायला त्याच्या बद्दल.
श्वेता शिंदे हिंदी त एवढी highly पेड होती की तिच्या बॉय चा पगार झोका च्या payment एवढा होता हे ऐकून धक्का चं बसला. कारण मी श्वेता शिंदे ला सुद्धा त्यातच पहिल्यांदा पाहिलं.

झोका म्हणजे अमिता खोपकर (मम्मा, फार गोड रोल), सुनिल बर्वे, अमृता सुभाषवाली का. ह्यात श्वेता शिंदे होती का, आठवत नाहीये.

अमृता सुभाष यात आवडायची मला, नंतर फार कधीच आवडली नाही.

श्वेता शिंदेच्या आईची फॅक्टरी वगैरे आहे ना (तिनेच सांगितलेलं आठवतं), सातारा का सांगली कुठेतरी त्यामुळे ती श्रीमंत घरातून आलेली आहे.

हो अंजु तीच झोका, अमृता सुभाष ची पहिली सिरीयल. श्रीरंग गोडबोले, कान्हा, मालविका, चिनू सगळीच पात्र इव्हन अगदी ऑफिस स्टाफ सुद्धा इतका रिअल वाटायचा त्यातला. अगदी आपल्या आसपास बघतो तशी पात्र. त्यामुळे आवडायची सिरीयल. अमृता सुभाष खूप आवडली त्यात. म्हणून तीच ती फुलराणी पाहिलं तर लाऊड वाटलं. पण वाटलं मे be character तसं असेल म्हणून तसं वाटलं म्हणून आवडून घेतलं.
पण नंतर अमृता सुभाष चढत्या भाजणी सारखी लाऊड लाऊडर loudest होत गेली आणि आवडेनाशी झाली. झोका मध्ये जो इनोसन्स होता तिच्या मध्ये तो गेला आणि दुड्डाचार्य चेहरा घेऊन वावर नकोसा वाटायला लागला नंतर.
अबाऊट श्वेता शिंदे, हो सातारा ला आहे तिची श्रीमंती वाटत. पण besides श्रीमंती ती हिंदीत well paid आणि फेमस होती तेव्हा हे आत्ता कळलं

हिंदीत कुठल्या सिरीयलमध्ये होती.

अमृता सुभाष खरंच झोक्यात गोड होती, ती हरवलीच नंतर. नंतर अवघाची संसारमध्ये फेमस झाली, जेवढा वेळ मी बघितली त्यात तिचं काम आवडलं नाहीच.

Pages