नाम नामेति नामेति
" नाव काय ठरलं शेवटी मुलीचं?"
" एकदम यूनिक ठेवलंय,अवीरा."
" अवीरा? काय अर्थ होतो या नावाचा?"
" बहादुर, ब्रेव, स्ट्रॉंग, कॉन्फिडेंशियल; कसं वाटलं नाव?"
"अवीरा म्हणजे बहादुर, ब्रेव, स्ट्रॉंग, कॉन्फिडेंशियल हा अर्थ तुम्ही कुठे शोधलात ?"
" गुगल बाबा आहे ना, मॉम जंक्शन नावाची एक साईट आहे तिथे मिळाले हे नाव. चांगलं नाव आहे ना?"
हे नाव हिंदू आहे?
१०० टक्के .का?
अवीरा नावाचा अर्थ होतो पुत्र आणि पतीरहित स्त्री. नास्ति वीरः पुत्त्रादिर्यस्याः सा अवीरा.
म्हणजे ही मुलगी आजन्म कुमारी असेल किंवा.... जाऊ द्या.
आता काय करायचं? बर्थ सर्टिफिकेटवर हेच नाव आहे.
मॉम जंक्शन पेक्षा ललिता सहस्रनाम वाचले असतेत तर हजारो नावं मिळाली असती.सत्तावीस नक्षत्रांची नावं माहिती नाहीत का तुम्हाला? आता काय उपयोग? ऍफिडेव्हिट करून नावं बदलून घ्या.
आजकाल काहीतरी हटके करायच्या नादात बाष्कळपणाचा ट्रेंड चाललाय. मुलगी झाली की मियारा, शियारा, कियारा, नयारा, मायरा, टियारा, अल्मायरा ... मुलगा झाला तर वियान, कियान, गियान, केयांश. गोमांश.. आणि त्याचा अर्थ विचारला कि घे गुगल, घे याहू ...... मग उत्तरं देतील इट मीन्स रे ऑफ लाइट.;इट मीन्स गॉड्स फेवरेट.इट मीन्स ब्ला ब्ला..
हे असं यूनीक नाव ठेवायच्या नादात मिसेस शहा नी तिच्या मुलीचं नाव श्लेष्मा ठेवलं. मी तर चकितच झाले. मी तिला विचारलं, काय गं भावना, श्लेष्मा म्हणजे काय?
तिनं काय उत्तर दिलं असावं? ती म्हणाली, श्लेष्माचा अर्थ होतो,जिच्यावर आईची कृपा आहे " . मी डोकं गच्च धरून बसले. मला असं बघून ती म्हणाली, का गं, काही चुकलं कि काय?"
मी म्हणाले, काय गं, तुझ्या मुलीला सारखी सर्दी असते, नाक गळत असतं असं काही आहे का?
नाही, असं काहीच नाही, का ?
अगं श्लेष्माचा अर्थ शेंबडी मुलगी, श्लेष्म म्हणजे नाकातला कचरा, मेकुड.
तिचा चेहरा पाहण्यालायक झाला. काय करणार होती ती? तिलाही तेच सांगितलं, ऍफिडेव्हिट करून नावं बदलून घ्या.
फॅशनेबल कपडे घालायच्या लाटेत अर्थहीन, अनर्थकारी, बेढब शब्दांचा प्रयोग समाज आपल्या संततीच्या नावासाठी करू लागलाय. नाव द्यायचा अधिकार आजी, आजोबा, गुरु, आत्याबाई यांच्याकडेच राहू द्या ना. तेच हिताचं नाही का?
व्यक्तीचे नाव आणि दैव यांच्यात एक नशिबाचा दुवा असतो म्हणून चांगले, शुभ नाव ठेवावे . नामाखिलस्य व्यवहारहेतु: शुभावहं कर्मसु भाग्यहेतु:। नाम्नैव कीर्तिं लभते मनुष्य-स्तत: प्रशस्तं खलु नामकर्म। ब्राह्मणांनी देव देवतेची नवे ठेवावीत , क्षत्रियांनी वीरता दिसेल अशी नावे ठेवावीत , उदा रिपुदमन , वीरेंद्र , ,प्रताप , राजेंद्र इत्यादी , वैश्यांनी संपत्ती दर्शक नावे ठेवावीत , उदा लक्ष्मीकांत लक्ष्मीधर, इत्यादी. आयुर्वर्चो sभिवृद्धिश्च सिद्धिर्व्यवहृतेस्तथा । नामकर्मफलं त्वेतत् समुद्दिष्टं मनीषिभि:। मुलांची नावे कशा प्रकारे ठेवावीत या बद्दल पारस्करगृह्यसूत्र मध्ये असा श्लोक आहे, द्व्यक्षरं चतुरक्षरं वा घोषवदाद्यंतरस्थं। दीर्घाभिनिष्ठानं कृतं कुर्यान्न तद्धितम्।।अयुजाक्षरमाकारान्तम् स्त्रियै तद्धितम्। नवा पण तीन प्रकारची; देवनाम, नक्षत्रनाम आणि व्यावहारिक नाम. कुंडलीतले नाव व्यवहारात नको कारण कोणी आपल्यावर जादू टोणा, जारण मारण, करणी संमोहन इत्यादी करत असेल तर त्या साठी नक्षत्र नावाची गरज असते. व्यवहारातल्या नावावर त्याचा प्रभाव पडत नाही.आपले नक्षत्र नाव सहसा कुणाला सांगायचे नसते हे ही लक्षात ठेवा.
तुमच्या समोरच्या फ्लॅट मध्ये राहणारे मिस्टर चुडासमा, त्यांच्या मुलाचं नाव ठाऊक आहे का?
होय. अनल नाव आहे.
काय स्पेलिंग कराल तुम्ही या नावाचं?
एएनएएल
याचा अर्थ इंग्रजीत काय होतो ते ही बघा एकदा गुगलवर. मुलाला त्यांनी इंग्रजी शाळेत घातलेय.
.............
काही गोष्टी एकदम पटल्या.
चांगला लेख. काही गोष्टी एकदम पटल्या.
डोळ्यासमोर एकदम ओळखीतल्या ५-६ अवीरा आणि तितक्याच नायरा नाचून गेल्या. थेंब - ठिपका (जुळी मुले), रजस्वला, श्लेश्मा, प्रणय वगैरे सुद्धा फर्स्ट हॅण्ड ऐकलेली नावे आहेत.
ते नक्षत्र नाव तारण मारण वगैरे माहीत नव्हते. पहिल्यांदाच ऐकले.
ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी कशी नावे ठेवावे ते सांगितले तर या तिन्ही कॅटेगरी मध्ये न येणाऱ्या लोकांनी काय नावं ठेवायची? ही एक शंका मनाला चाटून गेली.
तसे तर माझे नाव (विनिता) पण संस्कृत अर्थाने चुकीचे आहे असं अनेकजण सांगतात. पण दुसरा / चुकलेला अर्थ पण फार वाईट नाही म्हणून मी इग्नोर मारते. संस्कृत अभ्यासकांच्या मते माझे नाव विनता (वि + नता - चांगल्या प्रकारे नतमस्तक विनम्र असलेली वगैरे) असायला हवे होते. आणि विनिता म्हणजे (वि + निता) म्हणजे चांगल्या प्रकारे नेली गेलेली (शुभ अर्थाने घ्यायचे म्हटले तर जीचे लग्न चांगल्या प्रकारे झाले आहे अशी) असा होतो.
अभ्यासकांनी कृपया प्रकाश टाकावा ही नम्र विनंती __/\__
आमच्या गावी अनला देवी आहे,
आमच्या गावी अनला देवी आहे, तिला affidevit करून नाव कुठे बदलून मिळेल?
लेखातील विनोदी भागा करता
लेखातील विनोदी भागा करता
नाव हटके ठेवण्याच्या नादात भलत्याच अर्थाचे नाव ठेवलेले पाहिले आहे. कोणी काय नाव ठेवायचे ते ठेवा, काहीच अर्थ निघत नसेल तर हरकत नाही (किंवा ते उत्तमही कदाचित) पण नाविन्यपूर्ण ठेवण्याच्या नादात भलताच अर्थ निघणारे ठेवतोय का हे तरी बघायला हवे.
बाकी कोणती/कशी नावे ठेवावीत याला पास, तो भाग वाचवला नाही.
इंग्रजी स्पेलिंगने / उच्चाराने काय अर्थ निघतो हे बघत बसले तर हर्ष, गोपी अशी नावेही खटकतील.
पियू विनीतचा अर्थ बघा. त्याच अर्थाने विनिता हे स्त्रीलिंगी रूप असाच अर्थ घ्यावा असे माझे मत.
बाकी कोणती/कशी नावे ठेवावीत
बाकी कोणती/कशी नावे ठेवावीत याला पास, तो भाग वाचवला नाही.## त्यात फक्त 3 वर्णानी नावे ठेवणे अपेक्षित दिसते.
बाकी कोणती/कशी नावे ठेवावीत
बाकी कोणती/कशी नावे ठेवावीत याला पास, तो भाग वाचवला नाही........ +१.
बाकी तात्या =शंकर (हे नाव ठेवले नाही.पण म्हणे गुगलवर आहे.)
रिजुल= निष्पाप(गुगल)
हेतल हे नाव ठेवणाऱ्याने मात्र सांगितले की अर्थ माहीत नाही,नाव आवडले ठेवले.
लेखातील विनोदी भाग मस्त जमलाय
लेखातील विनोदी भाग मस्त जमलाय.
ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य भाग वगळता आला असता, उगाच ट्रोल भैरव मंडळींना मुद्दा दिला गेल्या आहे आणि व्यक्तिशः मलाही तो उल्लेख आवडला नाहीये. तुम्ही लिहिलेल्या याच अनालॉजी नुसार मग क्षुद्रानी कोणती नावे ठेवणे अपेक्षित आहे?
तुमच्या शेजाऱ्यांनी "अनल" असे नाव ठवेले आहे त्याचा संस्कृत अर्थ योग्यच आहे पण इंग्रजीत लिहिताना लावलेला अर्थ अनर्थ करतो पण हा असा अर्थाचा अनर्थ करणे चूक आहे. त्याच प्रमाणे लॅटिन ओरिजिन, फ्रेंच ओरिजिन, स्पॅनिश ओरिजिन नाव आता आपल्याकडे येत आहेत त्यांचाही आपल्या भाषेप्रमाणे अर्थ लावणे ही चूक. आता माझेच सभासद नाव बघा ना "वॉल-ई" असे आहे जे एका फेमस चित्रपट कॅरेक्टर वरून ठेवले आहे. पण आपल्या मायथोलॉजी मध्ये "वाली" असे नाव आल्याने बरेच सभासद वाली असेच लिहितात.
श्लेष्माचा अर्थ होतो,जिच्यावर
श्लेष्माचा अर्थ होतो,जिच्यावर आईची कृपा आहे >> काहीही
तुमच्या शेजाऱ्यांनी "अनल" असे नाव ठवेले आहे त्याचा संस्कृत अर्थ योग्यच आहे पण इंग्रजीत लिहिताना लावलेला अर्थ अनर्थ करतो पण हा असा अर्थाचा अनर्थ करणे चूक आहे. >> +१
वर्णव्यवस्था आणि त्यानुसार कशी नावं ठेवावीत हा मुद्दा आता बाद करून टाकावा. शिवाय हिंदूंनी कशी नावं ठेवावीत आणि मुसलमानांनी कशी हेही नकोच. खरं म्हणजे काहीही नावं ठेवा, माझं काही म्हणणं नाही. फक्त निदान समजून उमजून ठेवा. गुगल म्हणतोय म्हणून उगाच कायच्या काय अर्थ सांगायचा हे हास्यास्पद ठरतं. काही वेळा तर अर्थ न सांगता "हे अमुक तमुक देवाचं नाव आहे" असं सांगितलं जातं. पण त्या नावालाही काही अर्थ होता ना? मागे कुणीतरी तात्या हे शंकराचे नाव आहे असा
जावईगुगलशोध लावला होता. नंतर शोध घेतल्यावर ते "तथ्य" असं नाव असल्याचं आणि इंग्रजी स्पेलिंगच्या घोळात ते चुकीचं वाचल्याचं (माबोकरांना) लक्षात आलं. इथेच कुठल्यातरी धाग्यावर वाचलं आहे. मला वाटतं, या धाग्याचा मूळ मुद्दा हा आहे, आणि त्याच्याशी सहमत.काय स्पेलिंग कराल तुम्ही या
काय स्पेलिंग कराल तुम्ही या नावाचं? …..
हर्षित बद्दल वाईट वाटते.
गूगल विद्वान खतरनाक असतात, (इतर) कुणाचेही ऐकत नाहीत
कोणती/कशी नावे ठेवावीत … धर्म, वर्ण इ. This is in bad taste in todays world. बाकी लेख मजेशीर
मानव पृथ्विकर थॅन्क्स.
मानव पृथ्विकर थॅन्क्स.
इतके वर्ष माझं नाव चुकलं आहे असच वाटत होतं मला !!
ह्या लेखातील बऱ्याचश्या
ह्या लेखातील बऱ्याचश्या गोष्टी नित्यानंद मिश्रा यांच्या "How not to name your child" या व्याख्यानात YouTube वर ऐकल्या आहेत.
थेंब - ठिपका (जुळी मुले),
थेंब - ठिपका (जुळी मुले), रजस्वला
??? सिरीअसली पियु?
असंख्य कि/का/मा/समायरा नी वियान/टियान/विहान दिसतात आजूबाजूला. पण त्यातून जोपर्यंत निगेटिव्ह अर्थ निघत नाही किंवा काहीच अर्थबोध होत नाही तोपर्यंत ‘जो जे वांछिल तो ते लाहो’. अगदी जवळच्या व्यक्तीने जर निगेटिव्ह अर्थाचं नाव ठरवलं तर एकदा सांगून पाहिन.
बहुतांश जन चाकरीच करतात ना आता? मग वर्णाप्रमाणे नावं वगैरे काय?
मजेशीर लेख आहे...
मजेशीर लेख आहे...
बाकी कोणती/कशी नावे ठेवावीत याला पास, तो भाग वाचवला नाही.## त्यात फक्त 3 वर्णानी नावे ठेवणे अपेक्षित दिसते.>>>> +1
थेंब - ठिपका (जुळी मुले), रजस्वला, श्लेश्मा, प्रणय वगैरे सुद्धा फर्स्ट हॅण्ड ऐकलेली नावे आहेत.>>>> कठीण आहे.. :हाहा
पण खरंच कधीतरी मुलं मोठी झाली की कधीकधी वैतागतात विचित्र नाव ठेवलं म्हणून..
अर्थ बघून ठेवलेली नावे कधी कधी उच्चार आणि स्पेलिंग साठी कठीण जातात... मग तेही नकोस होत..
तरी अजून मुलाचं नाव पद्मभूषण, भारतरत्न झालच तर मुलीच नाव पद्मश्री वगैरे ठेवायचं कोणी मनावर घेतलं नाहिये...
मला ‘पार्थिव’ नावाबद्दल
मला ‘पार्थिव’ नावाबद्दल वाटायचं, असलं कसलं नाव..? पण त्याचा दूसरा अर्थ गुगल केला, तेव्हा कळला.
पद्मभूषण, भारतरत्न झालच तर मुलीच नाव पद्मश्री वगैरे ठेवायचं कोणी मनावर घेतलं नाहिये...
>> .. हा.. हा..
तरी अजून मुलाचं नाव पद्मभूषण,
तरी अजून मुलाचं नाव पद्मभूषण, भारतरत्न झालच तर मुलीच नाव पद्मश्री वगैरे ठेवायचं कोणी मनावर घेतलं नाहिये...
नवीन Submitted by छन्दिफन्दि on 25 March, 2024 - 08:57>>>
पद्मश्री नावाची मुलगी ओळखित आहे!
पद्मश्री ऐकलं आहे. कणेकरांनी
पद्मश्री ऐकलं आहे. कणेकरांनी विजय कदम यांच्या लग्नाच्या पत्रिकेचा किस्सा सांगितला आहे. त्यांच्या बायकोचं नाव पद्मश्री. पत्रिकेत ओळी होत्या - विजयला पद्मश्री मिळाली, विजय पद्मश्रीचा झाला.
पद्मश्री वगैरे ठेवायचं कोणी
पद्मश्री वगैरे ठेवायचं कोणी मनावर घेतलं नाहिये...>>>
हो मलाही पद्मश्री नावाची मुलगी माहितेय.
थेंब - ठिपका (जुळी मुले),
थेंब - ठिपका (जुळी मुले), रजस्वला
??? सिरीअसली पियु?
>> येस येस. थेंब-ठिपका पुण्यात आहे. साबाई अतिशय चिडल्या होत्या बारश्याहून घरी आल्यावर. काय फाजिलपणा आहे म्हणून. (मला एकदम ' डॅडी मुझसे बोला.. तू गळती हैं मेरी ' या फेमस टायपो ची आठवण झाली. पण साबा असल्याने तो जोक फाजिल जोक मारला नाही )
रजस्वला एका गुजराती फॅमिली मध्ये ठेवले होते. ते लोक पिंकेश वगैरे काहीही नाव ठेवतात. पण रजस्वला हा शब्द महाभारत आणि द्रौपदी वस्त्रहरण रेफरन्समुळे सगळ्यांना माहीत आहे असं मला वाटत होतं तोपर्यंत.
थेंब-ठिपका पुण्यात आहे.
थेंब-ठिपका पुण्यात आहे.
>>>>>
माझ्या एका रूममेट च नाव बंटीराजे होत, त्याला पण नाही आवडायचं त्याचं नाव.
माझ्याच टीममधे एक प्रणय आहे.
माझ्याच टीममधे एक प्रणय आहे. त्याला मी नेहमी आडनावाने हाक मारते.
पद्मश्री जोशी आहं की. मराठी
पद्मश्री जोशी आहं की. मराठी अभिनेत्री
लेख ठिक. पण वर्णनिहाय नाव रचना अगदीच कालबाह्य वाटलं
छान मजेशीर लेख आहे.
छान मजेशीर लेख/विषय आहे.
नावाला अर्थ असलाच पाहिजे हा हट्ट देखील मला व्यक्तीशा पटत नाही.
मुलाचे नाव विचारताना लोकं सोबत त्याचा अर्थ सुद्धा विचारतात. मी आजवर कधी कोणाला असा अर्थ विचारला नाही. कारण त्याने काही फरक पडत नाही असे मला वाटते. जसे एखाद्याचे आडनाव ऐकून त्याची जात काय हा विचार माझ्या मनात येत नाही तसेच एखाद्याने आपल्या मुलाचे नाव सांगितल्यावर याचा अर्थ काय असेल हा विचार देखील मनात येत नाही.
उलट नावाला अर्थ असेल तर पुढे मूल त्या अर्थाला जागणारे झाले पाहिजे अशी अपेक्षा आपण नकळत त्याच्यावर लादणार नाही ना असेही एक वाटते.
त्यामुळे नावाचा अर्थ काय आहे यापेक्षा नाव उच्चारायला गोड सुटसुटीत असावे, आणि त्यासोबत आपल्या भावना जोडल्या गेलेल्या असाव्यात हे निकष मला जास्त महत्त्वाचे वाटतात.
आमच्याकडे मुलीचे नाव ठेवताना शेवटपर्यंत काही फायनल होत नव्हते. अखेर बारशाला माझ्या वडिलांनी म्हटले पोरगी परीसारखी दिसतेय. तूर्तास परी नाव ठेऊया. नंतर हवे तर बदलूया. पण एकदा परी हाक मारायची सवय झाल्यावर आम्ही नाही बदलले.
नंतर बरेच जणांनी म्हटले की अरे हे पापा की परी वगैरे घरी लाडाने घ्यायचे नाव असते. असे सिंपल नाव कोणी ठेवते का..
पण आम्ही विचार केला की नाव काहीतरी संस्कृतप्रचुर आणि क्लिष्ट ठेवायचे आणि मग ते बोलायला सोपे नाही म्हणून पप्पू बाबू शोना मोना अश्या नावाने हाक मारायची त्यापेक्षा हेच राहू दे. किती सिंपल नाव ठेवले म्हणून लोकं हसू दे. पण आपल्याला आयुष्यभर लेकीला या नावाने हाक मारायला छानच वाटेल.. आणि आता तो निर्णय योग्यच वाटत आहे.
मुलाचे नाव आम्ही ऋन्मेष (Runmesh) ठेवले. इथे माझ्यासाठी भावनिक निकष लागू झाला.
हे नाव सुद्धा छान आहे आणि ठेऊ शकतो हे बायकोने आधी बोलून दाखवले. माझ्या डोक्यात हा विचार होताच, त्यामुळे तिने असे म्हणताच मी तिचा विचार पलटण्याआधी शिक्कामोर्तब केले.
लोकं नावाचा अर्थ विचारतात. आम्ही जे आहे ते सांगतो. नावाला अर्थ नाही हे काही जणांना पटत नाही. अगदी नाराजी सुद्धा व्यक्त करतात. कारण नावाला अर्थ हवाच म्हणून काही लोक आग्रही असतात. पण ठिक आहे, ज्याचे त्याचे विचार म्हणून मनाला लावून घेत नाही.
अर्थहीनही चालेल पण किमान
अर्थहीनही चालेल पण किमान अनर्थकारी तरी नसावं.
ऋन्मेष >> या नावाला अर्थ हवा
ऋन्मेष >> या नावाला अर्थ हवा असेल तर तयार करून देऊ शकतो. काहीतरी ऋत् + मा + इष अशी ञम्त्व + गुण संधी होते असली नावं तोंडावर फेकायची.
ऋत् म्हणजे नाकारणे, मा = लक्ष्मी, इष् म्हणजे इच्छा करणे. आता काहीतरी अर्थ लावता येईल. जाऊ दे! कशाला एवढं लक्षात ठेवत बसायचं. तुझंच उत्तर बरोबर आहे.
भारतरत्न आणि पद्मश्री नावे
भारतरत्न आणि पद्मश्री नावे आहेत की.
आमच्या एका मित्राने हटकून ठेवली आहेत.
साहेबराव असते.पंजाबराव आणि पतंगराव ह्या नावाच्या व्यक्ती फेमस देखील झाल्या आपल्या कार्याने2.
लेखातली नावे मजेशीर आहेत
श्लेष्मा वै
पार्थिव ( पटेल ) नाव ऐकलं होतं तेव्हा विचित्र वाटलेलं.
नावात काय आहे
नावात काय आहे
ही किसका वाली रील माझ्या
ही किसका वाली रील माझ्या मुलीने सुद्धा बनवली होती
हपा धन्यवाद
तसे Run मेष ची अशी फोड करून धावणारा किंवा मोकाट सुटलेला मेंढा असा एक अर्थ घरी काढून झालाय.
<<<. तसे Run मेष ची अशी फोड
<<<. तसे Run मेष ची अशी फोड करून धावणारा किंवा मोकाट सुटलेला मेंढा असा एक अर्थ घरी काढून झालाय.>>
तसेच. ऋण मेष अशी फोड करता येईल.. म्हणजे कर्ज काढून घेतलेला मेंढा... (हलके घ्या)
बराचसा लेख पटला. ऑफिसच्या
बराचसा लेख पटला. ऑफिसच्या एकाच टीम मध्ये प्रणयराज आणि मदनतिलक असे दोन सहकारी होते.
त्यांना अनुक्रमे राज आणि तिलक अशी हाक मारण्यात येई.
बाकी एकेका नावाची लाट असते. आमच्या पिढीत ढिगाने राहुल आणि प्रियंका आहेत. (१९८०s born).
मधे २००० नंतर केकता च्या मालिकांमुळे खुशबू, कुमकुम, कशिश, मिहिर, सुजल, अनुराग या नावांची चलती होती.
२०१०s मध्ये सानवी, मनस्वी, ईशानवी, तन्वी अशा बऱ्याच ' वी ' तर देवांश, रुद्रांश, शिवांश, भव्यांश असे अनेक अंश आहेत.
सध्या कियारा, नायरा, मायरा (या नावाचा मल्याळम भाषेत भलताच अर्थ होतो. पण एका शब्दाचा दुसऱ्या भाषांतील अर्थ हा स्वतंत्र विनोदाचा आणि धाग्याच्या विषय आहे. ) अदिरा, विदिरा अशा 'रा' कन्या तर
अन्वय, आरव, अद्विक, अंगद, आर्यन अशी ' अ ' बालके आहेत.
हो पद्मश्री.. . पल्लवी जोशी
हो पद्मश्री.. . पल्लवी जोशी ची बहीण.. एकदा कधीतरी ऐकलं होत..
पद्मश्री वह्या कॉमेंट्स वाचल्यावर आठवलं.
प्रणय नाव आवडते मला. सुदैवाने
प्रणय नाव आवडते मला. सुदैवाने माझ्या पिढीत तरी याचा अर्थ कुणाला विचारावासा वाटला नसेल. एक मदनही होता टीममधे. तो बिचारा लाजायचा नाव सांगताना.
Pages