नाम नामेति नामेति

Submitted by Revati1980 on 24 March, 2024 - 02:06

नाम नामेति नामेति

" नाव काय ठरलं शेवटी मुलीचं?"

" एकदम यूनिक ठेवलंय,अवीरा."

" अवीरा? काय अर्थ होतो या नावाचा?"

" बहादुर, ब्रेव, स्ट्रॉंग, कॉन्फिडेंशियल; कसं वाटलं नाव?"

"अवीरा म्हणजे बहादुर, ब्रेव, स्ट्रॉंग, कॉन्फिडेंशियल हा अर्थ तुम्ही कुठे शोधलात ?"

" गुगल बाबा आहे ना, मॉम जंक्शन नावाची एक साईट आहे तिथे मिळाले हे नाव. चांगलं नाव आहे ना?"

हे नाव हिंदू आहे?
१०० टक्के .का?

अवीरा नावाचा अर्थ होतो पुत्र आणि पतीरहित स्त्री. नास्ति वीरः पुत्त्रादिर्यस्याः सा अवीरा.
म्हणजे ही मुलगी आजन्म कुमारी असेल किंवा.... जाऊ द्या.

आता काय करायचं? बर्थ सर्टिफिकेटवर हेच नाव आहे.
मॉम जंक्शन पेक्षा ललिता सहस्रनाम वाचले असतेत तर हजारो नावं मिळाली असती.सत्तावीस नक्षत्रांची नावं माहिती नाहीत का तुम्हाला? आता काय उपयोग? ऍफिडेव्हिट करून नावं बदलून घ्या.

आजकाल काहीतरी हटके करायच्या नादात बाष्कळपणाचा ट्रेंड चाललाय. मुलगी झाली की मियारा, शियारा, कियारा, नयारा, मायरा, टियारा, अल्मायरा ... मुलगा झाला तर वियान, कियान, गियान, केयांश. गोमांश.. आणि त्याचा अर्थ विचारला कि घे गुगल, घे याहू ...... मग उत्तरं देतील इट मीन्स रे ऑफ लाइट.;इट मीन्स गॉड्स फेवरेट.इट मीन्स ब्ला ब्ला..
हे असं यूनीक नाव ठेवायच्या नादात मिसेस शहा नी तिच्या मुलीचं नाव श्लेष्मा ठेवलं. मी तर चकितच झाले. मी तिला विचारलं, काय गं भावना, श्लेष्मा म्हणजे काय?
तिनं काय उत्तर दिलं असावं? ती म्हणाली, श्लेष्माचा अर्थ होतो,जिच्यावर आईची कृपा आहे " . मी डोकं गच्च धरून बसले. मला असं बघून ती म्हणाली, का गं, काही चुकलं कि काय?"

मी म्हणाले, काय गं, तुझ्या मुलीला सारखी सर्दी असते, नाक गळत असतं असं काही आहे का?

नाही, असं काहीच नाही, का ?

अगं श्लेष्माचा अर्थ शेंबडी मुलगी, श्लेष्म म्हणजे नाकातला कचरा, मेकुड.

तिचा चेहरा पाहण्यालायक झाला. काय करणार होती ती? तिलाही तेच सांगितलं, ऍफिडेव्हिट करून नावं बदलून घ्या.
फॅशनेबल कपडे घालायच्या लाटेत अर्थहीन, अनर्थकारी, बेढब शब्दांचा प्रयोग समाज आपल्या संततीच्या नावासाठी करू लागलाय. नाव द्यायचा अधिकार आजी, आजोबा, गुरु, आत्याबाई यांच्याकडेच राहू द्या ना. तेच हिताचं नाही का?

व्यक्तीचे नाव आणि दैव यांच्यात एक नशिबाचा दुवा असतो म्हणून चांगले, शुभ नाव ठेवावे . नामाखिलस्य व्यवहारहेतु: शुभावहं कर्मसु भाग्यहेतु:। नाम्नैव कीर्तिं लभते मनुष्य-स्तत: प्रशस्तं खलु नामकर्म। ब्राह्मणांनी देव देवतेची नवे ठेवावीत , क्षत्रियांनी वीरता दिसेल अशी नावे ठेवावीत , उदा रिपुदमन , वीरेंद्र , ,प्रताप , राजेंद्र इत्यादी , वैश्यांनी संपत्ती दर्शक नावे ठेवावीत , उदा लक्ष्मीकांत लक्ष्मीधर, इत्यादी. आयुर्वर्चो sभिवृद्धिश्च सिद्धिर्व्यवहृतेस्तथा । नामकर्मफलं त्वेतत् समुद्दिष्टं मनीषिभि:। मुलांची नावे कशा प्रकारे ठेवावीत या बद्दल पारस्करगृह्यसूत्र मध्ये असा श्लोक आहे, द्व्यक्षरं चतुरक्षरं वा घोषवदाद्यंतरस्थं। दीर्घाभिनिष्ठानं कृतं कुर्यान्न तद्धितम्।।अयुजाक्षरमाकारान्तम् स्त्रियै तद्धितम्। नवा पण तीन प्रकारची; देवनाम, नक्षत्रनाम आणि व्यावहारिक नाम. कुंडलीतले नाव व्यवहारात नको कारण कोणी आपल्यावर जादू टोणा, जारण मारण, करणी संमोहन इत्यादी करत असेल तर त्या साठी नक्षत्र नावाची गरज असते. व्यवहारातल्या नावावर त्याचा प्रभाव पडत नाही.आपले नक्षत्र नाव सहसा कुणाला सांगायचे नसते हे ही लक्षात ठेवा.
तुमच्या समोरच्या फ्लॅट मध्ये राहणारे मिस्टर चुडासमा, त्यांच्या मुलाचं नाव ठाऊक आहे का?

होय. अनल नाव आहे.

काय स्पेलिंग कराल तुम्ही या नावाचं?

एएनएएल

याचा अर्थ इंग्रजीत काय होतो ते ही बघा एकदा गुगलवर. मुलाला त्यांनी इंग्रजी शाळेत घातलेय.

.............

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

नितिष भारद्वाज मायबोलीवर आला तर आपण कोण हे कळु नये पण आपल्या ओळखीतील सुज्ञांना मात्र ओळखण्यास वाव असावा म्हणुन हे वापरायचे नाव घेईल.

रखेल, आईची सासू मोनालिसा, प्राणनाथ ...... Lol

एखाद्या बाळाचं नाव हे असं प्राणनाथ म्हणून कसं ठेववतं? म्हणजे पाळण्यात घालून, कानात कुर्र करून मग अनाउन्स करताना थोडीतरी लाज वाटत असावी ना? चार विती उंचीचं बाळ आणि नाव काय तर म्हणे प्राणनाथ! कठीणे.

नितिष भारद्वाज व मानव, Lol
चार वितीचा प्राणनाथ Lol

गंमत आठवली …. मलापण एकदा एक स्थळ आलेलं तेव्हा त्या मुलाचे आडनाव माझेच होते पण त्याच्या मातापित्याची नावं पण माझ्या मातापित्याचीच होती.

माझी लेक शाळेत असताना अनन्या नावाचा धुमाकूळ माजला होता. दगड मारल्यास किमान ४-५ अनन्या खाली पडतील इतका.

दगड मारल्यास किमान ४-५ अनन्या खाली पडतील इतका
चार वितीचा प्राणनाथ
>>> Lol Lol

अदिरा = आदी चोप्रा मधले आदी/अदी + 'रा' (राणी मुखर्जीचा)

मुलींच्या नावांच्या अशा लाटा येतात. नेहा, अवनी, श्रीया आणि इरा ह्या लक्शात आहेत.
माझ्या बालपणी अपर्णाची लाट असावी. माझ्या शाळेच्या वर्गात दोन आणि कॉलेजात तीन अपर्णा होत्या.

फणिंद्रा. >>>> नको नको. इंग्लिशमध्ये ते फारच फनी होईल.
Submitted by मामी on 3 April, 2024 >>>>
हो गं मामी, सासूबाईंचा शोध आहे हे नाव . अर्थ... नागांची राणी..
फणिंद्र म्हणजे शेषनाग हे माहिती होते पण आता फणिंद्रा म्हंजे मिसेस शेषनाग की काय? की क्वीन कोब्रा!

ते आई वडिलांच्या नावावरून नाव ठेवण्यावरून आठवलं की माझ्या नवऱ्याच्या मित्राने त्याच्या मुलीचं नाव इतकं विचित्र काही तरी ठेवलं आहे.
आई, वडील, मावशी,मामा, आत्याकाका,आईची आई, आईचे बाबा, बाबाचे बाबा, बाबाची आई या सगळ्यांच्या नावाच्या आद्यक्षरांवरून स्पेलिंग बनवून नाव ठेवलेलं. त्याचा उच्चार पण अतिशय विचित्र आहे. ते नावच आम्हाला कोणाला आठवत नाही आता. आम्ही आपले तिला मिष्टीचं म्हणतो पण मला फार दया आलेली त्या मुलीची.

फुलवा हे नाव पहील्यांदा अवधूत गुप्तेंच्या गाण्यात ऐकले -

अगं फुलवा तू फुलवायचं की नुसतच झुलवायचं?
शिंगरु मेलं हेलपाट्यानं असं नाही चालायचं

मला आवडलं ते नाव.

आजच एका मुलीचं नाव महिषा वाचलं,
नेहमीप्रमाणे गुगल ने अर्थ सांगितला-ग्रेट पावरफुल असा पण खरंच अर्थ आहे की म्हैस असाच अर्थ असेल

Pages