स्तनांचा कर्करोग : धोका कुणाला व किती ?

Submitted by कुमार१ on 25 June, 2023 - 20:29

जागतिक पातळीवर पाहता स्तनांचा कर्करोग हा स्त्रियांच्या कर्करोगांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग आहे. हा आजार शहरी भागात आणि सामाजिक व आर्थिकदृष्ट्या उच्च गटातील स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो. याचे प्रमाण कॉकेशिय गौरवर्णीयांमध्ये सर्वाधिक आहे. गेल्या काही वर्षांत भारतातील जेमतेम चाळीशीत असणाऱ्या स्त्रियांमध्ये या आजाराचे प्रमाण वाढते आहे. या कर्करोगाच्या उपप्रकारांपैकी सुमारे 80 % रोग पसरणारे व आक्रमक स्वरूपाचे असतात. सामाजिक व आर्थिकदृष्ट्या कनिष्ठ वर्गात या रोगाचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी त्यांच्यातील कर्करोग्यांच्या मृत्यूचे प्रमाण मात्र जास्त आहे.

या महत्त्वाच्या विषयाची व्याप्ती एखाद्या प्रबंधाएवढी मोठी आहे. त्याच्या रोगनिदानाच्या पद्धती आणि विविध प्रकारचे उपचार हा तर विशेष तज्ज्ञांचा प्रांत आहे. प्रस्तुत लेखात या आजाराच्या फक्त एका पैलूचे विवेचन करीत आहे, तो म्हणजे - हा आजार होण्याचा अधिक धोका कुणाकुणाला असतो ?

या संदर्भात आपण एखाद्या व्यक्तीचे वय, आनुवंशिकता, वंश, कौटुंबिक आरोग्य-इतिहास, जीवनशैली, कार्यशैली, व्यसने आणि पर्यावरणीय घटकांचा विचार करु. लेखावरील चर्चा फक्त या पैलूपुरतीच मर्यादित राहावी.

(मुख्य विषयाला हात घालण्यापूर्वी एक छोटा पण विशेष मुद्दा. स्तन हे स्त्रीच्या शरीराचे निःसंशय महत्त्वाचे अवयव आहेत. परंतु हेही ध्यानात घ्यावे की पुरुषांच्या छातीवरील उंचवटे हेही स्तनच असतात; फक्त त्यात दूधनिर्मिती करणारी रचना (lobules) नसते. पुरुषांच्या स्तनांमध्येही कर्करोग होतो. परंतु तो दुर्मिळ असल्याने त्याला या लेखात स्थान दिलेले नाही).

धोका ठरवण्याच्या मापनपद्धती
एखादा कर्करोग समाजात कमीअधिक प्रमाणात आढळतो. त्याचा संख्याशास्त्रीय अंदाज सांगायचा झाल्यास, अमुक इतक्या लोकसंख्येमागे तमुक इतक्या लोकांना हा रोग होणे संभवते, असे सांगतात. अर्थात एखाद्या (कर्क)रोगाचा हा जो काही ठराविक आकडा (१०००० : १, इ.) असतो, तो वंश, देश आणि आर्थिक व सामाजिक परिस्थितीनुसार वेगवेगळा असतो. अनेक संशोधनांकडे जर नजर टाकली तर त्यांनी वर्तवलेले अंदाज भिन्न व गोंधळात टाकणारे असू शकतात. तसेच ते कालानुरूप बदलत राहतात. म्हणून या क्लिष्ट मुद्द्याकडे आपण जाणार नाही. परंतु, जीवनशैलीतील कोणत्या घटकांमुळे या कर्करोगाचा धोका किती वाढू शकतो याचा आपण विस्ताराने विचार करणार आहोत.

एखाद्या व्यक्तीच्या शरीरधर्म आणि जीवनशैलीशी निगडित अनेक घटक असतात. त्यापैकी काही घटक या कर्करोगाचा धोका वाढवू शकतात, तर अन्य काही घटक हा धोका कमी करतात.
हा धोका मोजण्याच्या काही संख्याशास्त्रीय पद्धती आहेत. यामध्ये एखादा घटक असणारे आणि नसणारे लोक यांची तुलना केली जाते. यातून जो तुलनात्मक धोका (relative risk) असतो त्याला गुण दिले जातात.

हे गुण दोन प्रकारचे आहेत :
1. तुलनात्मक धोका > १ असेल तर त्याचा अर्थ, संबंधित घटक ज्यांच्या जीवनशैलीशी निगडित आहेत, त्यांना ते लागू नसणाऱ्या लोकांपेक्षा धोका अधिक असतो.

2. पण जर तुलनात्मक धोका <१ असेल तर त्याचा अर्थ बरोबर विरुद्ध आहे. म्हणजेच हे घटक ज्यांच्याशी निगडित आहेत, त्यांना कर्करोग होण्याचा धोका कमी होतो किंवा ते घटक रोगसंरक्षक म्हणून काम करतात.

या प्रणालीनुसार स्तनांच्या कर्करोगाच्या तुलनात्मक धोक्यासाठी चार उतरत्या श्रेणीमध्ये गुण दिले जातात :

धोका > ४.०१ ( सर्वाधिक)
> २.१- ४ ( मध्यम)
> १.१- २ ( साधारण)

<१ (धोका नाही; उलट कर्करोग संरक्षण)

धोका वाढवणारे घटक
या घटकांची पुस्तकातील लांबलचक यादी जर वरपासून खालपर्यंत पाहिली तर डोळे विस्फारतात ! सर्वप्रथम या घटकांची वरील गुणांच्यानुसार मर्यादित जंत्री करतो. नंतर त्यातील काही महत्त्वाच्या घटकांचा स्वतंत्रपणे विचार करू.

ही यादी वाचण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना :
यादीतील एखादा घटक एखाद्याच्या जीवनशैलीत असला, तर निव्वळ एका घटकामुळे कर्करोग होतो असे समजण्याचे बिलकुल कारण नाही. अनेक घटकांच्या एकत्रित परिणामातून हा धोका वाढतो. लांबलचक यादीचा उद्देश वाचकांना घाबरविण्याचा नसून निव्वळ आरोग्यजागृती करणे एवढाच आहे.

up-arrow-.pngसर्वाधिक धोकादायक
• 65 वर्षावरील वय
• शरीरातील आनुवंशिक जनुकीय बिघाड ( BRCA1, BRCA2, इ)
• वयाच्या पन्नाशीच्या आत बीजांडांच्या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास
• स्तनांचा कर्करोग झालेले प्रथम दर्जाचे एकाहून अधिक कुटुंबीय असणे.
• वयाच्या तिशीच्या आत विविध किरणोत्सर्गाचा शरीरावर बऱ्याच प्रमाणात झालेला मारा (धोक्याचे गुण 22 ते 40)

मध्यम धोकादायक
• ऋतूसमाप्तीनंतरच्या वयात शरीरातील इस्ट्रोजेन किंवा टेस्टस्टेरॉन या हार्मोन्सची पातळी बरीच जास्त असणे.
• पूर्ण दिवस भरलेले पहिले गरोदरपण वयाच्या 35 नंतर झालेले असणे.

• मॅमोग्राफी तपासणीनुसार स्तनांची 'घनता" खूप जास्त असणे.
• स्तनांचा कर्करोग झालेली एकच प्रथम दर्जाची कुटुंबीय असणे.

• पेशीवाढ करणारे स्तनांचे काही आजार.
• शरीरातील अन्य काही आनुवंशिक जनुकीय बिघाड

साधारण धोकादायक
• दीर्घकालीन मद्यपान व धूम्रपान
• पहिल्या पूर्ण दिवस भरलेल्या गरोदरपणातील वय 30 ते 35 च्या दरम्यान.

• आयुष्यात प्रथम मासिक पाळी चालू होण्याचे वय < १२
• ऋतूसमाप्तीचे वय > ५५ वर्षे

• स्वतःच्या अपत्याला कधीच स्तन्यपान केलेले नसणे
• स्वतः च्या गरोदरपणातून एकही मूल झालेले नसणे

• शरीराची उंची ५ फूट ३ इंचाहून अधिक.
• उच्च सामाजिक व आर्थिक गट आणि बैठी जीवनशैली
• दीर्घकालीन व्यावसायिक रात्रपाळीचे काम
• केसांना कृत्रिम रंग लावणे आणि अन्य रासायनिक सौंदर्यवर्धकांचा वापर

• स्तनांमध्ये काही प्रकारच्या गाठी होणे
• गर्भाशय, बीजांडे किंवा मोठ्या आतड्याचा कर्करोग झालेला असणे
• इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉनचे उपचार आणि गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर

• हृदय व रक्तवाहिन्याचे काही आजार
• हाडांची घनता प्रमाणाबाहेर जास्त असणे

हुश्श ! आता यादी थांबवतो…
आता वरीलपैकी काही महत्त्वाचे मुद्दे विस्ताराने पाहू.

वय : हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. वयाच्या 25 वर्षांच्या आत हा आजार दुर्मिळ आहे. त्यानंतर वाढत्या वयागणिक त्याचे प्रमाण वाढत जाते. 50 ते 69 या वयोगटात ते सर्वाधिक असते.

कौटुंबिक इतिहास व जनुकीय घटक :
१. ज्या स्त्रीच्या आई किंवा बहिणीला हाच आजार झालेला असतो त्या स्त्रीला भविष्यात हा आजार होण्याची शक्यता सुमारे दीडपट ते तिप्पट असते. जनुकीय बिघाडांमध्ये काही ज्ञात तर काही अजून अज्ञात आहेत. ज्ञातपैकी BRCA1 & BRCA2 -बिघाड हे दोन बऱ्यापैकी आढळतात. जगभरात या बिघाडांमध्ये वांशिक फरक आढळतात. काही स्त्रियांमध्ये जनुकीय बिघाड आणि पर्यावरणीय घटक यांच्या एकत्रित परिणामामुळे कर्करोग होतो.

२. कुटुंबातील अन्य स्त्रीला बीजांडांचा कर्करोग झालेला असणे.
३. काहींच्या बाबतीत प्रथम दर्जाच्या नात्यातील पुरुषाला देखील स्तनांचा कर्करोग झालेला असू शकतो.

हॉर्मोन्सचे उपचार आणि गर्भनिरोधक गोळ्या
१. पारंपरिक गर्भनिरोधक गोळ्यात इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन ही दोन्ही हॉर्मोन्स असायची. अशा गोळ्या सलग दहा वर्षे घेतल्यानंतर या रोगाचा धोका वाढतो. परंतु चालू असलेल्या गोळ्या बंद केल्यानंतर दहा वर्षांनी हा धोका नाहीसा होतो. अलीकडील नव्या गोळ्यांमध्ये फक्त प्रोजेस्टेरॉन असते आणि त्यामुळे संबंधित धोका उद्भवत नाही.

२. ऋतूसमाप्तीच्या दरम्यान व नंतरच्या काळात काही स्त्रियांना त्रास होतो. त्यावर स्त्री- हॉर्मोन्सचे विविधांगी उपचार दिले जातात. असे उपचार सलग पाच वर्षे चालू राहिले तर धोका वाढतो. परंतु उपचार बंद केल्यानंतर पाच वर्षांनी तो नाहीसा होतो.

मासिक पाळी व प्रसूतीचा इतिहास

स्त्रीच्या आयुष्यातील मासिक पाळीचा प्रारंभ ते कायमची समाप्ती हा कालावधी प्रजोत्पादनाचा असतो. या प्रदीर्घ कालावधीत मासिक ऋतुचक्रे (cycles) जेवढी जास्त होतात, तेवढा शरीरावरील इस्ट्रोजेनचा प्रभाव जास्त राहतो. हे हार्मोन पेशीवाढीला उत्तेजन देते. जितकी वाढ जास्त तितक्या डीएनएच्या प्रती जास्ती काढल्या जातात आणि त्या दरम्यान चुका होण्याचे प्रमाण वाढते. परिणामी जनुकीय बदल होतात. त्यातून धोका वाढतो.

यास अनुसरून खालील मुद्दे महत्त्वाचे ठरतात :
१. मासिक पाळीचा प्रारंभ वयाच्या बाराव्या वर्षाच्या आत (दुप्पट धोका)
२. एकाही जिवंत अपत्याला जन्म दिलेला नसणे ( या बाबतीत मासिक ऋतुचक्रे अधिक काळ चालू राहतात).
३. पहिले पूर्ण दिवसांचे गरोदरपण वयाच्या 30 वर्षांनंतर येणे
४. ऋतूसमाप्तीचे वय 50 वर्षांच्या पुढे असणे.

स्तनांची घनता
इथे एक मुद्दा महत्त्वाचा आहे. ही घनता स्तन हाताला किती भरीव लागतात याच्याशी संबंधित नाही. परंतु मॅमोग्राफी तपासणीत विशिष्ट प्रकारच्या टिशू तिथे किती प्रमाणात दिसतात यावर ती ठरते. त्यानुसार अधिक घनता असणाऱ्या स्त्रियांना या रोगाचा धोका वाढतो.

शारीरिक उंची
धोकादायक घटकांच्या यादीत अधिक उंचीचा मुद्दा पाहून वाचकांना आश्चर्य वाटेल. या संदर्भात काही लाख स्त्रियांवर अभ्यास झालेले आहे. त्याचा निष्कर्ष असा आहे की, दर १० सेंटिमीटर उंचीवाढीमागे या कर्करोगाचा धोका १७% वाढतो.

याची कारणे अद्याप अस्पष्ट आहेत. वाढीच्या वयामध्ये होत असलेली विविध हार्मोन्सची उलथापालथ तसेच जनुकीय घटकांचा वाटा असावा. अधिक उंच स्त्रियांमध्ये बीजांड आणि मोठ्या आतड्याचे कर्करोगही अधिक प्रमाणात आढळतात.

शारीरिक जाडी
हा महत्त्वाचा मुद्दा आहे. या संदर्भात स्त्रियांचे दोन गटांमध्ये वर्गीकरण करु :
१. ऋतूसमाप्तीनंतरच्या वयात अधिक जाड असलेल्या स्त्रियांना या कर्करोगाचा धोका दुप्पट असतो. शरीरातील मेदात इस्ट्रोजेन बऱ्यापैकी साठून राहते तसेच अशा स्त्रियांमध्ये रक्तातील इन्सुलिनची पातळी वाढलेली राहते.

२. मात्र ऋतूसमाप्तीपूर्वीच्या वयात जाड असलेल्या स्त्रियांना या रोगाचा धोका चक्क कमी असतो. याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

व्यसने
तंबाखू (धूम्रपान) : हा खूपच मोठा धोकादायक घटक आहे.
आयुष्यात धूम्रपान जेवढे लवकर चालू केले जाईल तेवढा धोका अधिकाधिक राहतो.
सातत्याने धूम्रपान चालू असल्यास धोका 24 टक्क्यांनी वाढतो आणि त्यातून होणारा हा रोग आक्रमक स्वरूपाचा (invasive) राहतो.
तसेच धूम्रपान सोडून दिल्यानंतरही धोका राहतोच.

मद्यपान : प्रौढ वयातील सातत्याने दीर्घकाळ केलेल्या मद्यपानातून शरीरातील इस्ट्रोजन पातळी वाढते आणि म्हणून धोका वाढतो.

अन्य महत्त्वाचे आजार
(मधुमेह प्रकार २ ) आणि हृदय व रक्तवाहिन्यांची दुर्बलता या दोन्ही आजारांमध्ये कर्करोगधोका वाढतो.

कार्यशैली
दीर्घकालीन रात्रपाळीच्या कामाचा या आजाराची निकटचा संबंध आहे. या संदर्भात रुग्णालयीन परिचारिका, विमानातील हवाई सुंदरी आणि अन्य कर्मचाऱ्यांवर बरेच अभ्यास झालेले आहेत. या समूहांमध्ये या कर्करोगाचे प्रमाण वाढलेले दिसते. रात्रभर काम केल्यामुळे शरीरातील मेलाटोनिन या हार्मोनच्या स्रवणात अडथळा येतो; या हार्मोनला ट्यूमर-प्रतिबंधक गुणधर्म आहेत.

केसांची सौंदर्यप्रसाधने
यांत प्रामुख्याने खालील गोष्टींचा वापर होतो :
1. गडद रंग
2. केस मोकळे किंवा सरळ करण्यासाठी वापरलेली प्रसाधने
हे सर्वच प्रकार या रोगाचा धोका वाढवतात. ज्या स्त्रिया या गोष्टींचा वापर सातत्याने आणि कायमस्वरूपी करतात त्यांच्यात धोका अर्थातच अधिक असतो. या उलट त्यांचा प्रासंगिक अल्प वापर केल्यास धोका फारसा नसतो.
.. ….
धोकादायक असलेल्या वरील सर्व घटकांना मूलतः दोन गटांमध्ये विभागता येईल :
1. निसर्गदत्त
2. सुधारणा करता येण्याजोगे (modifiable)

शरीरधर्मातले जे निसर्गदत्त घटक असतात त्यांचा मोठ्या प्रमाणावर अभ्यास झाल्यानंतर त्याचा उपयोग मानववंशशास्त्रजनुकशास्त्र यांच्या संशोधनासाठी होतो. कालांतराने त्यांचे निष्कर्ष आरोग्य क्षेत्रासाठी फायदेशीर ठरतात.
प्रत्येक देशात सर्व नागरिकांच्या चाळणी चाचण्या करणे शक्य होत नाही. अशा वेळेस विशेषत अधिक धोका असलेला समाजगट जर निवडून घेतला तर त्याच्याकडे अधिक काळजीपूर्वक पाहता येते. एखाद्या स्त्रीच्या बाबतीत वरील सर्व घटकांचा विचार करून त्यानुसार संगणकीय पद्धतीने धोक्याचे गुणांकन करता येते.

वरील सविस्तर विवेचनानंतर आता रोगाची उलट बाजू पाहू.
down aarow.pngधोका कमी करणारे घटक

• याबाबतीत काही वंशभेद आहेत. आशियाई, मध्य व दक्षिण अमेरिकी खंडीय (Hispanic) आणि पॅसिफिक बेटवासीयांमध्ये या रोगाचे प्रमाण कमी आहे.

• पहिल्या गरोदरपणाचे वय 20 च्या आत
• स्वतःच्या अपत्यांना प्रत्येक खेपेस एक वर्षाहून अधिक काळ स्तन्यपान केलेले असणे

• या रोगाचा धोका कमी करणारी प्रतिबंधात्मक स्तन-शस्त्रक्रिया करून घेतलेली असणे. या प्रकारे दोन्ही स्तन काढून टाकल्यास भावी कर्करोगाचा धोका 90 टक्क्यांनी कमी होतो. अर्थात अशा शस्त्रक्रियांचा फायदा व मर्यादा व्यक्तीसापेक्ष असून तो निर्णय संबंधित तज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावा लागतो.
• गर्भाशयमुखाचा कर्करोग झालेला असणे ( हा रोग आणि स्तनरोग यांचे सामाजिक-आर्थिक स्तराशी नाते एकमेकांच्या विरुद्ध आहे).

• काही कारणास्तव शरीरातील बीजांडे (ovaries) काढून टाकलेली असणे.
• नियमित व्यायाम आणि हिंडतीफिरती जीवनशैली

• हाडांची घनता कमी असणे
• आहारातील विशिष्ट घटक व या रोगाचा धोका हा अजूनही संशोधनाचा विषय आहे. विविध अभ्यासांचे निष्कर्ष उलटसुलट असून ते जगातील सर्व वंशांना एकसमान लागू होत नाहीत.
……..

बहुचर्चित परंतु सिद्ध न झालेले घटक
काही घटकांचा या रोगाशी संबंध असल्याची गृहीतके एकेकाळी मांडली गेली होती. परंतु भविष्यात ती काही सिद्ध होऊ शकली नाहीत. तसेच काही घटकांसंबंधी आंतरजालीय अफवा देखील मोठ्या प्रमाणावर पसरल्यात. असे तीन महत्त्वाचे घटक पाहू :

ब्रेसीअर्सचा वापर : या सतत वापरल्यामुळे स्तन आणि काखेदरम्यानच्या lymph-प्रवाहात अडथळा येतो असा एक काल्पनिक मुद्दा पसरवला गेलाय. परंतु शास्त्रीय प्रयोगांती यात कोणतेही तथ्य आढळलेले नाही.

प्रत्यारोपित कृत्रिम स्तन
सौंदर्यवर्धन किंवा अन्य काही कारणांसाठी या प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या जातात. परंतु त्यांचा या रोगाशी संबंध नाही.

गर्भपात
नैसर्गिकरित्या झालेल्या किंवा कारणास्तव करवलेल्या गर्भपाताचा हा रोग होण्याशी काही संबंध नाही.
……….

वरील सर्व विवेचनानंतर एक मुद्दा स्पष्ट होईल. ज्या स्त्रियांच्या बाबतीत ही आनुवंशिकता आहे आणि धोका वाढवणारे कुठले ना कुठले घटक त्यांच्या जीवनशैलीत आहेत, त्यांनी अधिक जागरुक असले पाहिजे. वयाच्या 40 च्या दरम्यान कुठलाही त्रास होत नसला तरीही आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने संबंधित चाळणी चाचण्या करून घ्याव्यात. त्या चाचण्यांचा आढावा पूर्वी इथे घेतलेला आहे :
https://www.maayboli.com/node/65597

तसेही प्रत्येक प्रौढ स्त्रीने घरच्या घरी स्तनांची स्व-तपासणी नियमित करावीच. सन 1990 नंतर हा आजार समाजात वाढत्या प्रमाणात 'दिसू' लागला याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, चाळणी चाचण्यांचे वाढलेले प्रमाण आणि लवकर झालेले रोगनिदान.

तमाम स्त्री वाचकांनो,

गेल्या काही वर्षांपासून आपल्या संस्थलावर या विषयासंबंधी अनुभवयुक्त चर्चा होताना दिसतात. या लेखातून आपला शरीरधर्म आणि जीवनशैलीशी निगडित असलेली या रोगाची कारणमीमांसा सादर केली. ती उपयुक्त वाटावी. आपल्यातील काही जण किंवा त्यांचे कुटुंबीय या आजाराचा धैर्याने सामना करीत आहेत. त्यांच्या जिद्दीला सलाम आणि तब्येतीस आराम पडण्यासाठी शुभेच्छा !

बाकी सर्वांना (कर्क)रोगमुक्त निरामय आयुष्य चिंतितो.
ca breast aware pic.png
**************************************************************************************************
संदर्भ :
1. https://www.cancer.org/content/dam/cancer-org/research/cancer-facts-and-...

2. https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC8966510/

3. Lancet. 2002;360(9328):187-195.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमा, काम थांबवलेत हे उत्तम केलेत.
आराम करा आणि जमेल तसे इथे येत रहा. तुम्हाला रिकव्हरी साठी खूप शुभेच्छा!
+१
आपण गप्पा मारू तुमचा वेळ छान जाईल

अमा, काम थांबवलेत हे उत्तम केलेत.
आराम करा आणि जमेल तसे इथे येत रहा. तुम्हाला रिकव्हरी साठी खूप शुभेच्छा!>>+१

अश्विनीमामी, हॅट्स ऑफ टू यू. तुम्ही १००% बर्‍या व्हाल. अजिबात धीर सोडू नका. तुमच्या लिखाणातली सकारात्मकता नेहमीच आवडते. अशाच रहा.
माझ्या भावाला सहा महीने जास्तीत जास्त सांगितले होते. सर्जिकल ऑपरेशन्सने पोटात बर्‍याच समस्या निर्माण झालेल्या होत्या. होमिओपॅथीमुळे प्रतिकाआरशक्ती टिकून राहिली. त्यामुळे डॉक्टरांनी केमोथेरपी रिस्क घेऊन करूयात असे सांगितले. तीन महीन्यांनी सकारात्मक रिपोर्ट्स आले आहेत. मी त्यालाही पहिल्यापासून तू बरा होणार आहेस हेच सांगत होतो. खूप शस्त्रक्रियांमुळे तो आयुष्याला कंटाळला होता. आता मात्र उपचारांना नाही म्हणत नाही. त्याची प्रगती पहायला वडील नाहीत एव्हढेच काय ते.

Thanks a lot and prayers for your father. Believe me their souls are always watching over us.

अमा,
2 D-Echo >>>>
हा विषय हृदयाशी संबंधित असल्याने संबंधित धाग्यावर ( https://www.maayboli.com/node/84260) त्याची माहिती देतो.

रघू, तुमच्या भावाला लवकर बरे वाटून निरोगी दीर्घायुष्य लाभो.
अमा तुमच्यासाठी कायम सदिच्छा आहेतच. तुमची सकारात्मक वृत्ती घेण्यासारखी आहे.
तेजो, तुमच्या मुलीचे कौतुक वाटले.

अमा, wishing you speedy recovery. Take good care of yourself and you will jump back to your energetic self soon.

My prayers and best wishes.

अलीकडे प्रकाश प्रदूषण आणि कर्करोगाचा धोका या विषयावर बऱ्यापैकी उलटसुलट वाचनात येते. या संदर्भात एका वाचकांनी संपर्कातून सूचना केली की स्तनांचा कर्करोग आणि प्रकाश प्रदूषणाचा संबंध यावर काही लिहावे.

या संदर्भात निर्विवाद असे काही सिद्ध झालेले नाही परंतु काही निरीक्षणे आणि त्यावर आधारित गृहीतक यासंबंधी काही मुद्दे :
१. दीर्घकालीन रात्रपाळी आणि/किंवा आधुनिक एलईडी आणि तत्सम प्रकाशातला रात्रीचा वावर यामुळे शरीरातील मेलाटोनिनचे प्रमाण कमी होते.
२. मेलाटोनिन आणि स्तनांच्या कर्करोग पेशींची वाढ या संदर्भात काही अभ्यास झालेले आहेत. या पेशींची वाढ रोखण्याचा गुणधर्म मेलाटोनिनमध्ये आहे.

३. या ज्ञानातून दोन मुद्दे विचारार्थ पुढे आले :
a) नियमित मेलाटोनिनचे सेवन केल्यास या कर्करोगाचा प्रतिबंध होईल का, आणि
b) या रोगाच्या उपचारांमध्ये त्याचा पूरक म्हणून काही उपयोग होईल का?

४. अशा तऱ्हेने मेलाटोनिन या कर्करोगामध्ये उपयुक्त असावे असे गृहीतक मांडले गेले. मात्र विविध अभ्यासांमध्ये वरील गृहीतक पूर्णपणे सिद्ध होईल असा विदा अद्याप तरी मिळालेला नाही. काही संशोधनांचे निष्कर्ष अगदी उलटसुलट देखील आहेत.

सारांश : या विषयावरील भविष्यकालीन संशोधन पुरेसे झाल्याशिवाय ठोस निष्कर्ष काढता येत नाही.

https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC9736645/
https://www.explorationpub.com/Journals/em/Article/100178

Hi everyone. Focused on recovery. Simple thing like hot water bottle is helping a lot. I got on Amazon. Really relieves bone mets pain and sciatica pain. So far not using walking stick. Horrible side effects are continuing. But can cope better as no job stress. Taking pill alternate day.

अमा तुम्हाला किंचित का होइना आराम मिळतो आहे हे ऐकून फार बरे वाटले. खूप धीराच्या आणि सकारात्मक आहात. यु आर सिम्प्ली अमेझिंग. _/\_
There is a 'Can' in Cancer
प्राचीनचा हा चॅनल बघते आहे - https://www.youtube.com/watch?v=oeq3wQM84_A - कर्कविज्ञानाची गोष्ट
विपू पहा अमा. आवडली नाही तर डिलीट करा.

हरकत नाही. वेदनेपासून थोडाफार तरी आराम मिळालेला पाहून बरे वाटले.
आमच्या शुभेच्छा आहेतच....

There is a 'Can' in Cancer
अगदी !
यावरून हे पण आठवले :
Impossible शब्दातला खूप मोठा वाटा possible चाच आहे.
I m possible !!

अमा, लवकरच पूर्णपणे बरं वाटू दे.
तुम्हाला कोकोनट आवडतो म्हणून त्याच्याकडून नारळाच्या बर्फी सारखे गोड गोड हग्ज..! तिकडे फोटो दिले आहेत. Happy

*कोकोनट माझा कुत्रा आहे.

इथल्या एक स्त्री- सभासद निव्वळ वाचक आहेत. नुकताच त्यांनाही हा आजार असल्याचे निदान झाले - अर्थात अगदी लवकरच्या स्थितीत असताना. त्यांच्या आईनाही पूर्वी हाच आजार झालेला होता.
अलिकडे त्यांनी त्यांच्या रिपोर्टमधील शंका विचारल्या होत्या. नुकतीच त्यांची शस्त्रक्रिया झाली. त्यांनाही आपल्या सर्वांतर्फे शुभेच्छा दिलेल्या आहेतच.

सांगायचा मुद्दा असा, की या आजाराची आकडेवारी/टक्केवारी काही असो, सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून पाहता तो तुमच्याआमच्या घरातला आजार झालेला आहे.
जागरूकता आवश्यक !

Yess. All ladies should consider mammography. Early stage bc can be cured. No need to feel sad . All the best for recovery

अमा
लवकर लवकर बऱ्या व्हा
अजून माबोकर खूप मजा करायची आहे

भारतातील बालरोग आणि स्त्रीरोगतज्ञांनी गेल्या तीन वर्षात एक महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे.
मुलींचे “वयात येण्याचे” वय ८ वर्षांपेक्षाही कमी असल्याची बरीच उदाहरणे त्यांच्या पाहण्यात आहेत (आणि मुलग्यांच्या बाबतीत ९ वर्षांच्या आत).

या मुद्द्यावर बरीच चर्चा झाल्यानंतर आता आयसीएमआरने संपूर्ण भारतात या विषयाचे सर्वेक्षण करण्याचे ठरवले आहे :
https://www.msn.com/en-in/health/other/rate-of-early-puberty-rising-in-i...

संबंधित बातमीत त्यांनी " India is seeing a rise in precocious puberty" असे म्हटले आहे.

precocious च्या व्याख्येत पाळी असू शकते. साधारणपणे स्तनवाढ सुरू झाल्यापासून दोन वर्षांनी पहिली पाळी येते. बातमीतील घटनांमध्ये जर ८ वर्षांच्या आतच स्तनवाढ चालू झालेली असेल, तर मग पाळीचे वय सुद्धा ९-१० वर्षे असे असू शकते. हे अर्थातच लवकर आहे.
असे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतरच या गोष्टींवर नीट प्रकाश पडेल.

मागच्या पानावर माझा हा प्रतिसाद आहे : Submitted by कुमार१ on 21 March, 2024 - 05:36
आपल्या एक निव्वळ वाचक असलेल्या स्त्री- सभासदांची या रोगाच्या बाबतीतली प्रगती त्या मला कळवत आहेत. त्या अनुषंगाने इच्छुकांना उपयुक्त अशी काही माहिती देतो.

त्या बाईंना आनुवंशिकता असल्यामुळे त्या खूप जागरूक होत्याच. एका स्तनामध्ये गाठ जाणवताक्षणीच त्या डॉक्टरांकडे गेल्या, वेगात रोगनिदान झाले आणि आठ दिवसातच त्यांची शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडली. त्यानंतर संबंधित नमुन्याच्या प्रयोगशाळा तपासण्या केल्यावर खालील दोन गोष्टी समजल्या :
१. कर्करोग त्यांच्या काखेतल्या लिम्फनोडमध्ये पोचला आहे
२. त्यांचा कर्करोग स्त्री हार्मोन्सना संवेदनशील आहे.

वरील रिपोर्टनुसार रुग्णाला उपचारांचे दोन पर्याय उपलब्ध होतात : हॉर्मोन - संबंधित उपचार किंवा केमोथेरपी.

त्या बाईंना असलेला मधुमेह आणि तब्येतीतील अन्य काही घटक लक्षात घेता त्यांच्या बाबतीत केमोथेरेपीचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्या संदर्भातील काही आधुनिक पद्धतीची माहिती पुढील प्रतिसादात . . .

केमोथेरपी अनेक टप्प्यांमध्ये आणि आजारानुसार बऱ्याच कालावधीसाठी द्यावी लागू शकते. त्यासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्रत्येक वेळेस शरीरावरील रक्तवाहिनी निवडणे आणि त्यासाठी दरवेळेला रुग्णाला टोचण्याचा त्रास होणे या समस्या असतातच.
यावर तोडगा म्हणून आता रोपण करण्याचे केमोथेरपी पोर्ट निघालेले आहेत.
खालील चित्र पहा :
chemo-port.jpg

( चित्रसौजन्य : Cleveland Clinic).

या छोट्याशा शल्यक्रियेमध्ये रुग्णाच्या मानेजवळ छेद घेऊन ( आणि प्रतिमा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने) एक लहानशी सिलिकॉन नळी मोठ्या नीलावाहिनीमध्येच घालून ठेवली जाते. यातून त्वचेवर निर्माण झालेले छिद्र असते तेच ‘पोर्ट’ म्हणून काम करते. एका वेळेचे उपचार झाले की ते आपल्याला बंद करून ठेवता येते. असा शरीरात बसवलेला पोर्ट रुग्णाचे आजारानुसार तीन ते पाच वर्ष तसाच ठेवला जातो.

अर्थात ही प्रणाली बऱ्यापैकी खर्चिक आहे.

Pages