पेट पीव्हज ( डोक्यात जाणार्‍या - लहान सहान गोष्टी)

Submitted by सामो on 19 January, 2024 - 09:21

लोक हो आपापल्या पेट पीव्हज (लहान सहान डोक्यात जाणार्‍या गोष्टी) लिहा. कदाचित काहीतरी शिकायला मिळेल की कसे असू नये. नकळत आपण त्या कॅटॅगरीत मोडतही असू.

माझ्या काही पेट पिव्हज -

- आय अ‍ॅम सॉरी पण मला हॉटेलात भात हाताने खाणारी माणसे आवडत नाहीत. याईक्स होते. माझी जेवायची इच्छाच मरते. आणि अशी माणसे आहेत.

- चौकशीखोर लोकं आवडत नाहीत. फार वैयक्तिक प्रश्नं विचारणारी. अरे जनरल बोला ना. हवापाणी, चालू घडामोडी, सिनेमे, पुस्तके.

- गॉसिपी लोकंसुद्धा आवडत नाहीत. गोंदवलेकर महाराज म्हणतात - परनिंदा ही विष्ठेसमान माना. मला ते पटते.

- माझ्या घरात चपला न काढता येणारी माणसे तर तिडीकच जाते डोक्यात. बहुसंख्य लोक अशातच मोडतात. नो कन्सिडरेशन. अरे स्वतःच्या घरात चपला काढता अन आमचं घर काय कचरापट्टी आहे का? आपण नम्रपणे सांगतो की तुम्हाला काय सोयीस्कर आहे ते करा आणि अचूकपणे लोक चपला पायात ठेवतात. तुमच्या नानाची टांग.

अजुन एक वैश्विक पेट पीव्ह म्हणजे बायकांची पंगत वेगळी पुरुषांची वेगळी , घरातच कार्यक्रमात, बायकांचा ग्रुप वेगळा व पुरुषांचा वेगळा. हे अमेरिकेत नाही पाहीले फारसे. पण क्वचित पाहीलेले आहे.

मला तर आँटी म्हणणारे लोकही डोक्यात जातात Wink तुम्ही स्वतः २५ शीचे घोडे आहात, आंटी कसलं म्हणताय? आणि तेही अमेरीकेतील दुसरी जनरेशन हमखास म्हणतेच.

अरे हां अजुन एक आपण चुकून कोणाच्या अध्यात्मध्यात कडमडलो चुकून तर - 'EXCUSE ME' असे जोरात व अ‍ॅग्रेसिव्हली बोलणारी लोकं. मला फार राग येतो यांचा. अरे मुद्दाम पायात आलो का?

अजुन एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे मुलीला काही शिकवायला गेलं की आधी आपल्यात तो गुण कसा नाही हे नवर्‍याने त्याच वेळी तिथेच सांगणं.
उदा मुलीला "ईट युअर ग्रीन्स." वगैरे शहाणपणा तेही कॉलर ताठ करुन इंग्रजी वाक्प्रचार वापरत सांगताना, तेव्हाच नवर्‍याने "तू तरी तुझं सॅलड खाल्लस का?" वगैरे विचारणे Happy
मुलीला आपण ठामपणे , फेमिनिस्ट रोल घेउन "आपल्याकडे ते तसलं बार्बी कल्चर नाही!!" वगैरे सांगतेवेळी. नवर्‍याने कुत्सितपणे हसत आपल्याकडे पाहून म्हणणे "नाही गं! आपल्याकडे नाही ते कल्चर." म्हणजे नको तिथे जोक करुन हवा फुस्स करुन टाकणे. Happy

आठवेल तसे संपादित करत जाइन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही हो! खराब वगैरे काही नाही.
डोंबिवलीकर पाण्याची नासाडी बघूच शकत नाहीत. कारण (पूर्वी तरी) डोंबिवलीत पाण्याची बोंब होती.

आमच्याकडे सदोदित चालत आलेला एक पेट पीव्ह: काहीतरी अतिशय गंभीर,रोचक विषय चालू असताना सांगणाऱ्या माणसाने मध्येच काहीतरी पूर्ण वेगळं बोलणे
"आज सकाळी ना, त्या अमक्याचा मला फोन आला होता. खूप अपसेट होता.बराच वेळ बोलला.अरे वा, ही चटणी मस्त लागतेय वरण भाताबरोबर, जरा पाणी पास कर.टीव्ही चा रिमोट कुठे गेलाय?."
(इथे तो फोन केलेला सकाळचा व्हर्च्युअल माणूस बिचारा त्याचं दुःख अजून ऐकणाऱ्या माणसांना न कळल्याने तसाच अपसेट हवेत लटकतोय Lol )

>>>>>तसाच अपसेट हवेत लटकतोय Lol
या वाक्याला हसू की
>>>बिचारा त्याचं दुःख अजून ऐकणाऱ्या माणसांना न कळल्याने
कळेनासे झालेले आहे Lol Lol Lol

अतिशय गंभीर,रोचक विषय चालू असताना सांगणाऱ्या माणसाने मध्येच काहीतरी पूर्ण वेगळं बोलणे>> एक्सट्रोवर्ट लोकांचं असं बर्याच दा होतं.. Lol विषय गंभीर रोगा वरून राजमा कसा अजिबात भिजत नाही ह्या वर यायला १ क्षण पुरे! Wink

Lol अनु
हे माझ्या सासूबाई खूप वेळा करतात. याला आम्ही 'फोटोवर फोटो काढणं' म्हणतो. (संदर्भ-नाथा कामत. असा आवाज शतकानुशतकांत एकदाच निर्माण होतो. टाचेपर्यंत लांब शेपटा होता तिचा. )

यातलाच एक प्रकार म्हणजे किस्सा सांगणाऱ्या व्यक्तीने थिंकिंग अलाऊड करत काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करणे आणि मग शेवटी आठवतच नाही तेव्हा, बरं ते जाऊ दे , त्याचा काही संबंध नाही असे म्हणुन किस्सा पुढे सांगणे सुरू करणे.

"अगं काय ती बाई आहे सांगते, मला तर अश्शी चीड आली होती ना. आपल्या सात वर्षाच्या मुलीला घेऊन आली, ती पोरगी वाट्टेल त्याला हात लावत होती.
त्या दिवशी रविवार होता बहुतेक.... नाही बहुतेक कसली तरी सुट्टी होती. गुड फ्रायडे होता वाटतं .. नाही तो तर शुक्रवारी असतो ना, शुक्रवार नव्हता नक्की कारण तिचा शुक्रवार असतो, पोहे खाल्ले तिने त्या दिवशी..
तर असू दे रविवार असो अजुन कुठला वार, कुठली तरी सुट्टी होती हे नक्की..

तर... आल्या आल्या ती म्हणते कशी....... "

आपण काही सल्ला मागितला तर अत्यंत महागडे उपाय सुचवणारे लोक. उदा. अमुक ठिकाणी काही दिवसांसाठी हॉटेल सुचवा तर थेट Marriott वगैरे सुचवतात लोक. अहो लोकांना बजेट तरी विचारा... किंवा गेलाबाजार त्यांचे प्राधान्य तरी. Marriott वगैरे तर बेस्ट असणारच, ते तुम्ही कशाला सांगायाला हवय? असे ऑप्शन्स तर डोळे झाकून जावे असे असतात. आणि सांगणाऱ्याचा आव असा असतो जणू काही आपण Marriott चे लाइफ टाईम मेम्बरच आहोत.
एकदा मी असंच कुठेतरी मैत्रिणीच्या घोळक्यात शेअर केलं की आपलं नॉर्मल काजळ असतं ते काही वेळाने ओघळते... तर काजळ लावण्या आधी डोळ्यांच्या खाली भरपूर पावडर लावायची. मग एक म्हटली अतिशहाणा huh ! इतकं कशाला मॅक चं काजळ घ्यायचं कि त्यापेक्षा... ??
अरे? मॅक च्या काजळाची किंमत माहिताय?

ज्यांना Marriott वगैरे मध्ये उतरायचे असते ते एखादे चांगले हॉटेल सुचवा असे विचारणार नाहीत.

मानव......खरंय. वाचून अगदी अगदी झालं
दक्षिणा,
असतात असे महाभाग. आत्ताच हे लिहिण्यापूर्वी हा अनुभव आला.
कॉफी प्यायला कुठे जाऊयात तर लगेच स्टार बक्सला जा असा उपदेश....अरे काय..

मानव, असेही नमुने आहेत आमच्याकडे Happy
कधीकधी आपल्याला मोठी हॉटेल्स दिसणारे 'महागडे' लोक कॉर्पोरेट इव्हेंट ला चांगली परवडणारी पॅकेज देतात(आणि त्यांचं खाणं न देता नॉर्मल बफे देऊन कॉस्ट कंट्रोल करतात.)त्या संदर्भात मॅरीयोट सुचवलेलं असू शकेल, कोर्टयार्ड ला आहेत वेडिंग ऑफर्स.

मानवदा, टोटली कळतायेत भावना. माझ्या सासूबाई अगदी अशाच आहेत. कित्येक वेळा मी त्यांना मुद्द्यावर या असं सांगते पण त्या काही येतच नाहीत.
माझ्या अतिप्रचंड डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे तेच तेच बोलणारी माणसं. सकाळी उठल्यावर सोनटक्क्याला किती छान फुल आलंय हे एकदा म्हणून झालं तरी झोपेपर्यंत त्याचाच जप. बरं मग काय करायचं tyaa फुलांचं त्याच्याबद्दल काही नाही. नुसतं ‘किती छान फूल आलंय ना?’ परत दहा पंधरा मिनिटं गेली की ‘नाही पण फूल किती छाने ना?’ असं अख्खा दिवसा सुरु असतं. बर फूल तरी बरं दुसऱ्या दिवशी सुकून जातं. आंब्याचा सिझन चार महिने असतो आणि चार महिने दर पंधरा मिनिटाने ‘आंबा किती छान आहे ना’ कधी कधी तर आंबट असतो आंबा पण तरी सिझन संपलेला नाहीये त्यामुळे ‘आंबा किती छान लागतो ना , हा जरा आंबट होता पण किती छान असतो नाही आंबा’ Angry
मला मानसिक रिकामा वेळ मिळत नाही विचार करायला अशा माणसांसोबत. तेच तेच तेच तेच दळण ऐकून मी एकदम दमून जाते मेंटली रात्रीपर्यंत.

तसाच अपसेट हवेत लटकतोय >>>>
आम्ही याला 'शुगरकेन फॅक्टरी करणे म्हणतो'....असेच काहीतरी महत्वाचे सांगत असताना एक मैत्रीण ती राहत असलेल्या साखरकारखान्याच्या वसाहतीविषयी सांगायला लागली तेव्हापासून.

कॉर्पोरेट इव्हेंटट्ससाठी असेल तर ठीकच की.
मला वाटते जनरली कुठे फिरायला वगैरे साठी जाणे याबद्दल दक्षिणा बोलत आहेत.

सांगणाऱ्याचा आव असा असतो जणू काही आपण Marriott चे लाइफ टाईम मेम्बरच आहोत.>> मॅरि आट चा बॉनव्हॉ य प्रोग्रम असतो मी आहे मेंबर त्याची. पुण्यात त्यातल्या त्यात प्रोफेशनल सर्वि सेस तेच देतात. शिवाय पॅकेजेस मध्ये भरपूर निगोशिएशन करायला वाव असतो. मुंबई सारख्या ऑप्शन पुण्यात मिळणे फार अवघ ड. प्रोफेशनल सर्विसेस तर बोलुच नका.

मानव, अनु >> Lol दोन्ही किस्से वाचून क्षणभर वाटलं की आमच्या घरातलंच लिहिलंय. विशेषतः असे प्रकार ज्येष्ठ महिला मेंबर करत असतात. समोरासमोर बोलत असतील तर ठीक, मोबाईल वर बोलत असतील तर पलिकडचा पार गोंधळून जातो.

हां अजुन एक गोष्ट,
माझा कलीग वामसी, मी आणि माझा एक सिनिअर कलीग, बाकी टीम. आम्ही डेली हडल ला फोनवरती स्टॅटस अपडेटस वगैरे देत असू. तर हा सिनिअर कलीग जरा एक वाक्य बोलला की हा वामसी "ह्म्म्म" किंवा "ओके" म्हणायचा. एकेका वाक्याला दुजोरा. पुढे पुढे मी जीवाचा कान करुन फक्त ते ओके ऐकायचे आणि मेन मुद्दा रहायचा बाजूला. की हा आता ओके किंवा ह्म्म्म कधी म्हणतोय.

इतका भयानक इरिटेटिंग अनुभव होता ना. परत सांगायची चोरी. कुणाला काय सांगायचं हा "ओके" म्हणतो त्याचा मला त्रास होतो?

जनरल कॉल मधे सगळं संभाषण स्वतःकडे वळवणारे... म्हणजे माझ्या एका मैत्रिणीला सवय आहे स्वतःचीच डायरी सांगत बसायची... इतका वाजता उठले, नाश्त्याला हे हे बनवलं, जेवणाला हे, मी दमले, जॉबला गेले, आल्यावर हे हे. इतकं रंगवून अक्षरशः तासभर हेच सांगत बसायचं वेड्यासारखं? .. अरे दुसर्‍याच्या वेळेची काही किंमत आहे का नाही... घरी असेल तर मी म्युटवर टाकून आरामात माझी कामं करते मग माझ्याकडून काही रिस्पॉन्स मिळेनासा झाला की हॅलो हॅलो आहेस का? मनात येतं सांगावं तुझी बडबड ऐकून हगवण लागली मला (पकपक पकाक मधला ड्वायलॉग Lol

डोक्यातच जातं हे . .. मैत्री ठेवायची तर हे काय जबरदस्ती झेलणं.. मी विषय कट करून सरळ मुद्द्यावर ये सांगते हल्ली किंवा मेसेज करते कामात आहे नंतर बोलू किंवा उचलतच नाही. माणूस ऑफिसमधे आहे याची काही दखल न घेता आपली टकळी चालूच...

पाल्हाळ लावत बोलण्यात गावच्या एका शेजारी काकूंची आम्ही अजुनही आठवण काढतो.
ही पेट पिव्ह नाही तर पेट आठवण आहे.

आज बाई मी सकाळीच बसले तांदुळ नेसत.
मग मंदा आली.
ती म्हणाली "आई गं"
मी म्हटलं "काय?"
ती म्हणाली "काय करुन राहिली जेवायला"
मी म्हटलं "खिचडी ."
ती म्हणाली "नको नं खिचडी आज. पोळी भाजीच करं"
मी म्हटलं "बरं" अन घेतली मी बाई गवार धुवून.
मग आला घनश्याम.
तो म्हणाला "सुशीला"
मी म्हटलं "काय"
तो म्हणाला "काय करून राहिली?"
.
.
.
असं करून मग तिघातले सगळे संवाद, मी म्हटलं काय, ती तो म्हणाला "असं" वगैरे... अन शेवटी काय तर खिचडीच केली.
माझी एक बहीण त्यांचा टोन काढुन पूर्ण वऱ्हाडी भाषेत छान नक्कल करते.

खरंय सामो, काही काही पेट पिव्हज सांगता येत नाहित आणि सहनही होत नाहीत कॅटेगरीतले असतात.

माझी एक मैत्रिण आहे ती जेवताना चमच्यातून घास अलगद ओठ आणि जिभेने काढून घेत नाही, चमच्यावर दात आपटून तो आवाज होतो तो भयंकर इरिटेट होतो मला. आणि ताटात शेवटी काही शितं, तुकडे... थोडीशी भाजी.... असे रेसिड्युअल्स ठेवायची पण सवय असते लोकांना. स्वच्छ चाटून पुसून पान/ताट साफ का करत नाहीत देव जाणे. तिलाच चालताना तिरके जोर जोरात हालवत चालायची सवय आहे... तिच्या हातात कायम २ मोबाईल एक मोठं वॉलेट असतं ते धाड धाड आपल्या हातावर बडवतं... पण सुधारत नाही.

बापरे! मला एक पेट पिव्ह अगदी डोक्यात जाते, बहुतेक सगळ्यांची असेल ही. कुणाच्याही कुठेही असलेल्या वाढदिवसाला केक कापल्यावर, तो एकच तुकडा सगळ्या जगाला भरवत बसणे. अगदी यक्क होतं मला. पूर्वी काय करावं सुचत नसे, आता मी नम्रपणे टाळते आणि मीच दुसरा छोटा तुकडा कापून वाढदिवस असलेल्यास भरवते. आणि तिकडून सटकते. एरव्ही इतके hygene चं पडलेलं असतं यांना आणि इकडे कशी डोकी काम करत नाही कोण जाणे.

बापरे! मला एक पेट पिव्ह अगदी डोक्यात जाते, बहुतेक सगळ्यांची असेल ही. कुणाच्याही कुठेही असलेल्या वाढदिवसाला केक कापल्यावर, तो एकच तुकडा सगळ्या जगाला भरवत बसणे.>> +१००

सगळ्या जगाला भरवत बसणे.>> +१००......+200.
त्यानंतर अजून यक् म्हणजे हाताला लागलेले क्रीम चाटून साफ करून परत केकचा दुसरा तुकडा कापायला धावणे.

त्यानंतर अजून यक् म्हणजे हाताला लागलेले क्रीम चाटून साफ करून परत केकचा दुसरा तुकडा कापायला धावणे. >> हे असही करतात? याईक्स!!

Pages