परवाच जितूजींचा बड्डे झाला. मधे त्याची काही गाणी बघत होतो. तीही त्यात जितू आहे म्हणून नाही तर इतरच कारणांनी. (थांबा थांबा. मी हिम्मतवाला, मवाली बद्दल म्हणत नाहीये. 'ये मुलाकात एक बहाना है' सारखी गाणी ऐकायला छान आहेत म्हणून लावली होती). तेव्हा जाणवले की जितेंद्रच्या पिक्चर्स मधे असंख्य पिक्चर्स असे होते की त्याचे जिच्याशी प्रेम जमले तिच्याशी त्याचे क्वचितच लग्न व्हायचे. त्यामुळे एखाद्या आनंदी गाण्यात ती "एक्स" रडताना दिसते. किंवा तिचे एक सॅड कडवे नंतर असते. एका फेज मधे बहुतांश रीना रॉय कधी इकडे तर कधी तिकडे असायची
अशा कथानकांची ही काही उदाहरणे:
- खानदान मधे बिंदिया गोस्वामीला सोडून सुलक्षणा पंडित
- अपनापन मधे रीना रॉयला सोडून सुलक्षणा पंडित
- आशा मधे रीना रॉयला सोडून रामेश्वरी
- अर्पण मधे रीना रॉयला सोडून परवीन
- बदलते रिश्ते मधे रीना रॉय ऋषीकपूरला सोडून याच्याकडे येते
- प्रेम तपस्या मधे रीना रॉयला सोडून रेखा
नंतर श्रीदेवी/जयाप्रदा यांचेही पिक्चर्स अशाच स्वरूपात येऊ लागले (तोहफा). पण एकूणच बरीच वर्षे ही रिकरिंग फेज होती त्यांच्या पिक्चर्सची.
दुसरे म्हणजे मुलेबाळे. जितूजी व त्यांच्या दोन हिरॉइन्स पैकी कोणाला मूल हवे असेल, कोणाला प्रत्यक्षात होईल व पिक्चरच्या शेवटी ते कोणाच्या पदरात पडेल यावर अनेक पिक्चर्स चालले. यातील अनेक प्रेमाच्या त्रिकोणांना सोडवायचे म्हणजे एका हिरॉइनने डायरेक्ट मरायला हवे असाच नियम असावा. अर्थात तो हिंदी मधल्या कोणत्याही दशकाच्या प्रेमाच्या त्रिकोणाच्या बाबतीत लागू होईल. मी दुसरी मुलगी/मुलगा शोधतो वगैरे प्रकार नाहीत. एकवेळ व्हिलनच्या माफिया टोळ्यांमधून लोक जिवंत बाहेर पडतील, पण प्रेमाच्या त्रिकोणातून नाही.
बहुतांश कथा अशा की दोन स्त्रियांना त्याग करायला मधे एक हीरो पाहिजे म्हणून जितूजींना घेतले असावे. जितक्या चित्रपटांत असे रोल होते ते धरले तर त्या दृष्टीने जितूजी हे "वन मॅन बेख्डेल टेस्ट बीटर इंडस्ट्री" आहेत.
कधी कधी तर जितूजींचे कारनामे (ज्यामुळे त्या हिरॉइन्स चित्रपटात दाखवलेल्या अवस्थेत आहेत ते) बाजूला राहून त्या दोघी एकमेकींशीच भांडत. माँग भरो सजना मधे नक्की डबल रोल का आहे, त्यातला फ्लॅशबॅक खुलासा नक्की काय आहे आणि त्यामुळे ओम शिवपुरीच्या निर्णयात का फरक पडला ते विकीवर वाचून तरी डोक्यावरून गेले. त्यात त्यातली माँग वाली हिरॉइन त्या पिक्चरमधल्या तीन हीरॉइन्सपैकी कोणासारखीच दिसत नाही आणि तेथे जितूजींचा फोटो लोक एखाद्या मोठ्या उंच लॅण्डमार्कपासून लांब उभे राहून त्याच्या टोकावर हात धरतात तसा काढला आहे. उद्या कोणी जितूजींना घेउन Honey I shrunk the husband काढला तर त्याकरताही हा पोस्टर खपून जाईल.
मात्र एका पिक्चर मधे काकाने त्याच्या वरताण केले आहे. त्याच्या "आशाज्योती" मधे अशाच एका नाट्यमय त्रिकोणाला सोडवायला दोघीही हिरॉइन्स मरतात. नक्की का व कशा ते नीट पाहिले नाही. गरजूंकरता चित्रपट उपलब्ध आहे यूट्यूबवर.
हे पाहताना हे ही लक्षात आले की रीना रॉयचे पिक्चरही बरेचसे तसेच असत. दोघांचा ओव्हरलॅप प्रचंड आहे. हे सगळे पिक्चर्स फॅमिली ड्रामा टाइप, म्हणजे पुण्याला वसंत टॉकीज मधे लागत तसे असत. पिक्चरमधे रीना रॉय ज्याच्या प्रेमात पडते त्याच्याशी तिचे लग्न फार क्वचित होते. जितेंद्र असेल तर जवळजवळ नाहीच. फक्त 'बदलते रिश्ते' मधे ऋषी कपूर ते अस्सल ७०ज मसाला वापरून घडवून आणतो म्हणून जमते. असे काही अपवाद. असो. तो वेगळा विषय आहे.
विकीवरची लिस्ट पाहिली तर जितूजींनी चाळीस-एक वर्षे काय अफाट पिक्चर्स मधे काम केले आहे! एकाच नावाच्या दोन पिक्चर्स मधे दोन वेळा काम करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. गंमत म्हणजे त्या दोन्ही चित्रपटांच्या नावांचाही अर्थ एकच आहे: संतान व औलाद. म्हणजे संतान नावाच्या दोन पिक्चर्स मधे (संतान-१, संतान-२) व औलाद नावाच्या दोन पिक्चर्स मधे (औलाद-१, औलाद-२) त्यांनी काम केले आहे. पहिल्या संतान (चित्रपटा) मधे ते बापाला सुधरवणारा मुलगा असतात तर दुसर्यामधे मुलाकडून छळला जाणारा बाप. नशीब एक डबल रोल करून त्यांनी दोन्ही रोल स्वतःच केले नाहीत. औलाद मधेही असेच काहीतरी असावे.
यातील एका औलाद मधे तर एकीचे नाव देवकी व दुसरीचे यशोदा आहे. साहजिकच त्यातील बाळ पिक्चरभर इकडून तिकडे फिरते. शेवटी तर ते यशोदाला दिले जाते तेव्हा विकीवरील माहिती नुसार "...Devki falls down due to headache. Doctor gives good news that she is expecting and would become mother in near future" . विकीवर त्यांच्या प्रत्येक पिक्चरचे इंग्रजीतूनही नाव्/अर्थ आहे तो ही तितकाच मनोरंजक आहे: The thirsty monsoon - प्यासा सावन, Life on palm - जान हथेली पे, Complete household - घर संसार, Where is love like this - ऐसा प्यार कहाँ, More beautiful than heaven - स्वर्ग से सुंदर, Henna brings color - मेहंदी रंग लायेगी etc.
याखेरीज त्यांनी "हिंमत", "हिंमतवाला" आणि "हिंमत और मेहनत" या तिन्हीमधे काम केले आहे. इतकेच नव्हे तर एकाच वर्षी "सुहागन" व "सदा सुहागन" दोन्हीमधे, व त्याच वर्षी लगे हाथो एक "सिंदूर"ही केला. तसेच ते "जानी दोस्त" ही होते व "जानी दुश्मन"ही. ते "माँ और ममता" मधेही आहेत आणि मुख्य लीडचे नाव ममता असलेल्या "माँ" मधेही.
त्यात हे वरचे बहुतांश फक्त "फॅमिली मॅन" जितूजींबद्दलचे आहे. या खेरीज गुलजारवाला जितेंद्र वेगळा, जे ओमप्रकाशच्या अ ने सुरू होणार्या पिक्चर्समधला वेगळा, नंतरचा पद्मालय स्टुडिओजचा व राव आडनावाच्या विविध लोकांच्या पिक्चर्समधला मिशीवाला जितेंद्र वेगळा. त्याहीनंतर "नफरत की आँधी" छाप पिक्चर्स मधला वेगळा.
ही लिस्ट बघितली तर एकेक महान रत्ने सापडतात. त्यावरून आणखी शोधले तर ज्या क्लिप्स दिसतात त्या आणखीनच भारी आहेत. बाकी "ढल गया दिन, टुक, हो गयी शाम, टुक" गाणी तर आहेतच. हे सगळे वर्णन म्हणजे हिमनगाचे फक्त वरचे टोक आहे. इथल्या तज्ञांकडून आख्खा हिमनग समजावून घेण्याकरता हा धागा उघडत आहे. पूर्ण लिस्ट इथे या लिन्कवर आहे. येउ द्या!
https://en.wikipedia.org/wiki/Jeetendra_filmography
मस्त निरीक्षणं आणि टिप्पणी.
मस्त निरीक्षणं आणि टिप्पणी.
'गुलजारवाला जितेंद्र निराळा' हा उल्लेख आवर्जून केल्याबद्दल शेप्रेट धन्यवाद. खराखुरा डायरेक्टर्स अॅक्टर!
'धरमवीर'सारखे स्यूडो पीरिअड ड्रामाज कुठे बसतात यात?
>>> यातील एका औलाद मधे तर एकीचे नाव देवकी व दुसरीचे यशोदा आहे. साहजिकच त्यातील बाळ पिक्चरभर इकडून तिकडे फिरते.
मला एक 'संजोग'पण आठवतो आहे तसलाच. किंवा तोच सिनेमा वेगळ्या नावाने पुनःपुन्हा काढत असतील - कुणी सांगावं!
>>> Complete household - घर संसार, Where is love like this - ऐसा प्यार कहाँ
धन्य आहे!
भारी. यातले काही कौटुंबीक
भारी. यातले काही कौटुंबीक सिनेमे आई आणि तिच्या मैत्रिणींसोबत बघितल्याचं आठवतं आहे. औलादमध्ये एक ट्रेन अपघात आहे असं अंधुकसं आठवतं आहे. संजोग म्हणजे 'यशोदा का नंदलाला...' ना?
हो हो तोच!
हो हो तोच!
भावाला तेव्हा का कोण जाणे पण जयाप्रदा आवडत असे म्हणून पाहावे लागत असले सिनेमे! काय बोलणार! आपलेच दात आणि आपलेच ओठ!
कसली धमाल आली वाचून. 2 बायका
कसली धमाल आली वाचून. 2 बायका मेल्या हे जरा फारच अति झालं
तो कोणता तो तब्बू अब्बास विनिथ वाला पिक्चर होता त्यात ती दोघांनाही मिळत नाही तसं झाले हे म्हणजे.
यात माँ पिक्चर पाहिला आहे.(भूत बाळाला बरनोल लावत असते यात)आणि ज्यात सोमवार को हम मिले मंगळवार को नैन असा सातही दिवसाचा स्टेटस अपडेट आहे तो असे 2च पिक्चर पाहिलेत.
खूप मस्त देखणा हिरो.युट्युबवर त्यांच्या मराठी बोलण्याची एक क्लिप आहे ती पण अशक्य गोड आहे.
जितू‘जी’ असा उल्लेख माझ्या
जितू‘जी’ असा उल्लेख माझ्या पचनी पडत नाहीये अजिबातच.
भूत बाळाला बरनोल लावत असते
भूत बाळाला बरनोल लावत असते यात >>>
भावाला तेव्हा का कोण जाणे पण जयाप्रदा आवडत असे म्हणून पाहावे लागत असले सिनेमे! >>> जितेंद्रच्या रोल्सच्या मोठ्या कॅनव्हास बद्दल पूर्वी कधीतरी चर्चा झालेली आठवत आहे. आणि हो - तो स्यूडो-पिरीयड ड्रामा जॉनरा राहिलाच
मधे एकदा ते "ये मुलाकात एक बहाना है" हे प्रचंड आवडते गाणे पाहात होतो. मधेच अचानक सुलक्षणा पंडित रडताना दिसली त्यात. नंतर यू ट्यूबने जी एकेक गाणी दाखवायला सुरूवात केली त्यावरून जाणवले की याचे असंख्य पिक्चर्स याच जातकुळीतील आहेत
त्यामुळे "किंवा तोच सिनेमा वेगळ्या नावाने पुनःपुन्हा काढत असतील" >>> हे परफेक्ट आहे राजाबाई टॉवर व वसईचा पूल
औलाद आणि संतान दोन्हीत दोन
औलाद आणि संतान दोन्हीत दोन दोन वेळा काम केलेय हे महान आहे!
राजाबाई टॉवर आणि वसईचा पूल
अरे काय अभ्यास! हिमनगाच्या
अरे काय अभ्यास! हिमनगाच्या टोकानेच गारद झालो.
एकाच नावाच्या दोन पिक्चर्स मधे दोन वेळा काम करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. , Honey I shrunk the husband, आणि Where is love like this - ऐसा प्यार कहाँ, More beautiful than heaven - स्वर्ग से सुंदर, Henna brings color - मेहंदी रंग लायेगी >>
धमाल लिहिले आहे.
धमाल लिहिले आहे.
रीना रॉय वर्तुळ , स्वैर अनुवाद, हिंमतीच्या पायऱ्या, हनी आय श्रंक मला गुलजारांचा जितू आठवत नाहीये. हिम'नग' असं वाचलं.
अनु आणि स्वाती
जितूजी म्हणजे हिंदीतील अलका कुबल. सुखाचा संसार कधीही नशिबी नाही. स्त्री ही क्षणाची पत्नी व अनंतकाळची माता असते तसं जितूजीच्या नशिबी क्षणाचं टाकीटाकी व अनंतकाळची जुदाई असते. मला जितू म्हणजे घरची भांडणं सोडवून उरलेल्या वेळात किरकिऱ्या बायकोसोबत जमलं तितकं फ्लर्टिंग करणारा, बटाट्यासारखं कुठंही तडजोड करणारा, प्रसंगी बापाची लेकरं स्वतः ची म्हणून वाढवणारा, भलेही स्वतः पांढरी प्यांट, पांढरं ज्याकेट घालणारा पण बायकोला मोठ्या काठाच्या साड्या आणणारा आनंदी-निर्मळ-चपळ जितू आठवतो. My heart goes to Jeetu
मेरा दिल जितू के पास जा रहा
मेरा दिल जितू के पास जा रहा है
अस्मिता
अस्मिता
हे बघा, किती त्रयस्थ भाव आहेत
हे बघा, किती त्रयस्थ भाव आहेत. परिस्थिती कशीही असो.
परिस्थिती १
परिस्थिती २
निष्काम कर्मयोगी है रे बाबा...
अस्मिता उपमा भारी आहेत.
अस्मिता उपमा भारी आहेत.
जितेंद्र आणि रिना रॉयचं हे
जितेंद्र आणि रिना रॉयचं हे गाणं भयानक आहे. काय ते कपडे दोघांचे :डोक्यालाहात:
https://youtu.be/_tWV0ugww7s
मस्त धागा !
जितेंद्रसारखा देखणा हिरो नाही. गालाला आतून जीभ लावून हिरॉईनचा कत्ल करण्याची त्याची अदाच न्यारी होती. बर्याच पोरी - बायका फक्त जितेंद्रला बघायला जात. तसले पिक्चर पोरांना अजिबात आवडत नसत.
जितकं बच्चन, काका, दिलीप-राज-देव, खानावळीवर लिहीलं जातं तेव्हढं जितूवर क्वचितच लिहीलं जातं. विनोद खन्ना सुद्धा काही काळ बच्चनच्या बरोबरीने त्या त्या वेळच्या पोरांचा हिरो होता. शत्रुघ्न सिन्हा ही आणि मिठुन तर होताच.
जितेंद्रवर धागा असावा आणि कारवाचा उल्लेख नसावा हे काही बरं नाही केलं.
खरा जितेंद्र तोच. लटके झटके डान्सवाला, केसांचा कोंबडा जंपिंग जॅक इमेजवाला. त्याचं पळणं सुद्धा डान्सिकल !
ढल गया दिन मधे शटल किती वेळाने परततं हे महत्वाचं नसायचं. जितेंद्रचे झटके बघत पब्लीक विसरून जायचं कि शटलला काल शॉट दिलाय.
मिठुन म्हणजे गरीबांचा बच्चन आणि गोविंदा गरीबांचा मिठुन. या सर्व काळात एक वेगळीच समांतर रेषा जितेंद्रची असायची. या चलाख अभिनेत्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची स्वतःबद्दल अचाट कल्पना नसायची. कोणत्याही हिरोचा बोलबाला असो तो प्रसंगी नायिकाप्रधान चित्रपटात कामं करून टिकून रहायचा. अमिताभचा काळ जोरात असताना त्याने कौटुंबिक चित्रपटांत कामं केली ( त्यांना लव्ह स्टोरी म्हणत नसत). तो कधीच सुपरस्टारपदाच्या शर्यतीत नव्हता पण कधीच शर्यतीतून बाहेरही फेकला गेला नाही.
हिम्मतवालापासून जितेंद्र टॉपला राहिला काही काळ.
भडभडून लिहीण्यासारखं बरंच काही आहे. इतरांचे प्रतिसाद वाचून येइन परत.
भारी आहे जितेंद्र आढावा. जितु
भारी आहे जितेंद्र आढावा. जितु जी म्हणजे अत्यंत कोरा चेहरा आणि त्यांच्या आणि हिरोईन च्या नृत्यात फक्त कोरस नर्तिका, नर्तक क्वचितच असायचे.
नेहमी सारखीच चिरफाड आवडली. ह्या पठडीतला एका सिनेमात (नाव आठवत नाही), जितेंद्र, शबाना आझमी आणि रेखा असा त्रिकोण होता. शबाना आझमी आणि रेखा घट्ट मैत्रीणी असतात आणि सुरुवातीला च शबाना ला ब्लड कॅन्सर होतो पण रेखापासुन तिला ते लपवायचे असते पण रेखाला संशय येतोच मग ती खात्री करून घ्यावी म्हणून शबानाला हिरवी मिरची खायला सांगते कारण 'ब्लड कॅन्सर के मरिज हरी मिर्च नहीं खा सकते!' असं अफाट लॉजिक ह्या पिक्चर मध्ये होते.
जितेंद्र चे पिक्चर्स शनिवारी/रविवारी जे हिंदी पिक्चर्स दाखवले जायचे त्यात हमखास दाखवायचे. त्यात जाणवलेली आणखी एक कौटुंबिक थीम म्हणजे जितेंद्र च वडिल आणि मुलगा अशा डबल रोल मधे , ह्यातील मुलगा जितेंद्र च्या नशिबात लहानपणी च आईचा मृत्यू, कारण वडिलांच्या नशिबात बायको चा विरह.त्याची आई पण कॅन्सर सारख्या घनघोर आजाराने अतिशय हाल होऊन रडत रडत मरायची. ह्या असल्या थीम वर परत परत सिनेमे का काढावे वाटले ते जीतुजीच जाणोत.
हाहा..
हाहा..
त्या काळातली गाणी बघण्यापेक्ष्या ऐकायलाच छान वाटतात.
मस्त धागा !
मस्त धागा !
( आधीच्या प्रतिसादाचा हा भाग सिलेक्ट होऊन उडाला म्हणून वरातीमागून घोड्याप्रमाणे आता आला आहे).
मायबोलीवर "मी बिझी तू रिकामा" असा खेळ चालू असल्याची शंका यावी अशी मायबोली गेले काही दिवस पडलेली होती. ( मी ही बिझीच होतो पण दोन्ही टंचनिका रिपोर्ट देत होत्या). अशात यजमानांनी स्वतः भोजन तयार आहे अशी खूण केल्यावर खवळलेल्या पब्लिकने दुष्काळग्रस्त म्हणतील कि काय याची पर्वा न बाळगता हमला करावा तद्वतच फारेण्डचा धागा म्हटल्यावर रिटेपणाचा आरोप होईल कि काय याची तमा न बाळगता पब्लीक तुटून पडणार यात शंकाच नाही.
मस्त खुसखुशीत आढावा आहे. पब्लिकला नॉस्टॅल्जिक करून त्यांनाही व्यक्त करायची संधी दिलेली आहे. सगळंच लेखात जाणिवपूर्वक नाही घेतलेलं.
एकाच नावाच्या दोन पिक्चर्स मधे दोन वेळा काम करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. >>> हे भारी आहे. अशा खूप जागा आहेत लेखात. लिंक सावकाश बघेन.
अनु आणि अस्मिता यांचे प्रतिसाद पण मस्त.
जितू‘जी’ असा उल्लेख माझ्या पचनी पडत नाहीये अजिबातच >>> +१
त्या कुठल्यातरी पिक्चर मधे रेखा जितेंद्रला तिच्या मैत्रिणीला कायतरी द्यायला पाठवते तेव्हां वाटेत कपडे खराब झाल्याने तो तिच्या बाथरूममधे स्वच्छ व्हायला जातो. पण टॉवेल घेतलेला नसल्याने ती मैत्रीण टॉवेल आणून देताना बाथरूममधल्या साबणावरून तिचा पाय घसरतो आणि शॉवरच्या पाण्याला आग लागते.... हे पाय घसरण सिम्बॉलिक असल्याने कथेचा सुकाणू वेगळ्या दिशेने जाऊ लागतो. अशा गोष्टी फक्त जितेंद्राच्याच पिक्चरमधे विश्वसनीय वाटायच्या.
कसलं रोमँटिक. यांच्या
कसलं रोमँटिक. यांच्या आयुष्यात साबणाने पाय घसरल्यावर अश्या रम्य गोष्टी घडतात.
बाकी आम जनतेच्या आयुष्यात साबणाने पाय घसरल्यावर के वायर सर्जरी, फिजिओथेरपी, 15000 रु चं प्लास्टर अश्या गोष्टी येतात.(हे काल्पनिक प्रोजेक्शन आहे, माझ्या किंवा माझ्या परिचित माणसांच्या आयुष्यात खरोखर अजिबात घडलेलं नाहीये )
भारी आहे. मजा येणार.
भारी आहे. मजा येणार.
कारण या धाग्यावर काही नारीसिस्ट लोक फिरकणार नाहीत. आलेच तर जिवावर आल्यासारखे हजेरी लावून जाणार.
जबरी निरीक्षणं आहेत! 'सौतन की
जबरी निरीक्षणं आहेत! 'सौतन की बेटी' हा असाच आणखी एक चित्रपट ज्यात दोन हिरॉइनींना भांडायला ह्याला हिरो व्हावं लागलं आहे. ह्याचं नाव श्याम आणि हिर्विणींची (पिक्चरमधली) नावं राधा आणि रुक्मिणी. त्यात पुढे ती सौतन की बेटी बालविवाह करत असते आणि त्याविरुद्ध तिचा होणारा सासरा कोर्टात जातो. तर पिक्चरच्या शेवटी तो ती केस मागे घेतो!!! प्यार की जीत वगैरे...
ह्याच पिक्चरमध्ये जितुजी (आणि रेखा) यांचं 'बारह महीने लाईन मारी फिर भी लगा न नंबर' हे अजरामर गाणं आहे. ते प्रत्येकाने सुडोमिसाठी आयुष्यात एकदातरी पहायलाच हवं.
मस्त धागा!
मस्त धागा!
जेम्स बाँडची भूमिका दोनदा (फर्ज आणि बाँड ३०३) वठवण्याची कामगिरीही जॅकच्या खात्यात जमा आहे.
ह्या पठडीतला एका सिनेमात (नाव आठवत नाही), जितेंद्र, शबाना आझमी आणि रेखा असा त्रिकोण होता. शबाना आझमी आणि रेखा घट्ट मैत्रीणी असतात आणि सुरुवातीला च शबाना ला ब्लड कॅन्सर होतो पण रेखापासुन तिला ते लपवायचे असते पण रेखाला संशय येतोच मग ती खात्री करून घ्यावी म्हणून शबानाला हिरवी मिरची खायला सांगते कारण 'ब्लड कॅन्सर के मरिज हरी मिर्च नहीं खा सकते!' असं अफाट लॉजिक ह्या पिक्चर मध्ये होते.
>> रास्ते प्यार के
जॅक हा माझ्यामते तात्विक बैठकीने बॉलिवूडचा सर्वात भारी हिरो आहे. अल्बर्ट कामू वि. ज्याँ-पॉल सार्त्रे या वादाचा वापर करून आपल्याला जॅकचे सर्व करिअर दोन पार्टिशन्समध्ये प्रिसाईजली विभागता येते.
सार्त्रेचा जॅक अस्तित्ववादी आहे. त्याच्या अस्तित्वाने त्याच्या आजूबाजूच्या जगाला, त्याच्या जीवनाला अर्थ आहे. उदा. सिंघासनमध्ये विक्रमसिंह आहे म्हणून गांधारा राज्याला अर्थ आहे. विक्रमसिंह जाताच गांधारा राज्यही पडद्यावरून नाहीसे होते. त्याचा कर्मावर भक्कम विश्वास आहे, तो सार्त्रेच्या अस्तित्वावादी स्वातंत्र्याच्या संकल्पनेनुसार संपूर्णपणे स्वतंत्र आहे आणि तो अॅनालिटकली सर्व काही अभ्यास करून व्हिलनचा सामना करतो. त्यामुळे त्याचे व्हिलन शून्यवत भासतात (आठवा सिंघासनमधले पूर्णपणे नालायक व्हिलन्स!). त्यामुळे त्याचा क्रायसिस हा त्याला साध्य करण्यासाठी काहीतरी साध्य ठरवणे हाच असतो.
या उलट कामू म्हणतो की जगामध्ये काही अर्थ नाही (अॅबसर्डिजम). तुमच्या कर्माचा तुमच्या अस्तित्वाशी अर्थाअर्थी काही संबंध नाही आणि एकंदरीत जीवन व्यर्थ आहे. त्यासाठी तो सिसिफसचे उदाहरण देतो जो एकच दगड वारंवार डोंगरमाथ्यापर्यंत ढकलत आणतो आणि माथ्यापाशी पोहोचताच तोच दगड गडगडत खाली जातो. तसेच कामूचा जॅक विविध सुहागरातींच्या, प्रेमप्रकरणांच्या चक्रातून जाते पण त्याला हवे ते साध्य होत नाही. या अपयशामागे त्याच्या कर्मापेक्षा त्याच्याभोवती निर्माण झालेल्या अॅबसर्ड परिस्थितीचा मोठा वाटा असतो. तरीही पुढल्या सिनेमात तो नव्या दमाने दगड माथ्यापर्यंत ढकलण्याच्या कार्याला पुनश्च सुरुवात करतो.
गंमतीचा भाग असा की सार्त्रेचा जॅक कामूला आदरांजली अर्पण करतो - होशियारमध्ये सिसिफसची आठवण करून देत जॅक डोंगरावरून मीनाक्षी शेषाद्रीसोबत गडगडणार्या लिंबांचा पाठलाग करतो. तर कामूचा जॅक सार्त्रेला आदरांजली अर्पण करतो - जख्मी शेरमधील विजय कुमार सिंगची डिसइल्यूजनमेंट आणि त्याने आलेला 'नॉशिआ'!
बहुतांशी वेळा जॅकच्या डबल रोल्समध्ये एक जॅक सार्त्रेचा आणि एक जॅक कामूचा असतो. तसेच हे दोघेही फ्रेंच असल्याने जॅक अॅक्शन सिनेमातही रोमँटिकच का दिसतो याचेही उत्तर आपण देऊ शकतो. किंबहुना जॅक जर फ्रेंच इंडस्ट्रीत कामाला असता तर त्याने कमीत कमी डझनभर पाम-डे-ऑर विजेते चित्रपट दिले असते याविषयी दुमत नसावे.
वा !!! आवल्डला लेख बम ,
वा !!! आवल्डला लेख बम ,
जितुजी चे पिच्चर अन् गावच्या जत्रा एक अद्वैत रायते, बारके असतानी गावात वेताल बुआ यात्रेले कवा बहिरमच्या जत्रेत तंबू नाई त दोन वाशे गाडून तानेल सफेद पडद्यावर जितूजी पहाले भेटत.
कई तर प्रश्न पडे का बा टुरिंगवाल्याचा पडदा जास्ती सफेद का जितूजी, लै साऱ्या पिच्चरात ते केसं (अन्सो मिशी) सोडून बाकी फुल सफेद. बुटं बी सफेद.
स्वर्ग से भी सुंदर हा सिनेमा लै हीट चाले गावखेड्यात बम बाया डोयाले पदर लावून बसत. मानसं लै नीरस पर, काके मामे मग धोतराच्या पानाने वारा हुलत कवा तंबाखू चुरत.
गावठी हीट स्वर्ग से सुंदर
यातले क्वचितच काही चित्रपट
यातले क्वचितच काही चित्रपट पाहिले आहेत. पण तुमच्या टिप्पण्या आणि लोकांचे प्रतिसाद वाचुन अशक्य हसु आलं. आणि तुमचा अभ्यास...... highly impressed
तुमच्या त्रिकोण यादीत ' मेरा पती सिर्फ मेरा है ' नावाचा एक महान चित्रपट राहून गेला आहे. बालपणी अपघाताने पाहिला होता. नावासकट सगळाच अति अशक्य सिनेमा होता.
ध मा ल लिहिलंय.
ध मा ल लिहिलंय.
मला सुद्धा एक ही रास्ता मधला मिरच्यांचा प्रसंग आठवला होता.
आणाखी एक म्हणजे परिवार नावाचा (कुटुंबनियोजनाचं महत्त्व सांगणारा ?) चित्रपट.
यात जितूजी नुसत्या टॉवेलवर रस्त्याने चालताना दाखवलेत. बहुतेक नेसत्या वस्त्रावर घर सोडायची वेळ आली असावी.
विकिवर त्यांच्या चित्रपटांतील स्त्रियांचे वर्णन करताना तीन ठिकाणी virago हा शब्द दिसला.
भारी लेख आणि लेखाचा विषय
भारी लेख आणि लेखाचा विषय
जितेंद्र काय चीज होता हे आजच्या पिढीला कळणार नाही. ते त्याला त्याच्या पोराच्या रांगेतच उभा करतील.
यातले बरेचसे पिक्चर पाहिले आहेत.
कारवा यात नसला तरी तो मला आशा पारेखसाठीच आठवतो. तिचाच आहे तो..
जितेंद्रचा मी पाहिलेला पहिला पिक्चर म्हणजे लोक परलोक. ज्यात तो मरून स्वर्गात जातो आणि यम चित्रगुप्त यांना सुट्टी घ्यायला सांगून पृथ्बीवर पाठवतो. आता पुर्ण आठवत नसला तरी तेव्हा एंजीय केलेला हे आठवते.
चावट पांचट सीन करायचा हा माणूस पण कधी वल्गर वाटला नाही. रेखाही याला एक छान जोडीदार भेटलेली त्यासाठी..
परीचय चित्रपट आठवतो का कोणाला? मस्त होता. अमोल पालेकरछाप भुमिका होती. पण छान केलेली. सुसह्य अभिनयाची रेंज होती त्याच्याकडे.
तुर्तास ऋमाल
जवळपास २० सिनेमांमध्ये नाव
जवळपास २० सिनेमांमध्ये नाव रवी आहे.
The real multiverse of madness.
Ravirything Ravirywhere all at Ravi.
हे त्याचं मूळ नाव आहे.
हे त्याचं मूळ नाव आहे.
खना रवी कपूर.
खना रवी कपूर.
चर्नीरोड जवळ श्याम सदन चाळीत रहायचा तेव्हा चर्नीरोड पासून दोन स्टेशन पलिकडे दादरला उतरून सेंट्रल वरून कांजूरमार्ग ला उतरले कि हुमा हिना सिनेमाजवळ माझा मामा रहायचा. तिथे जितेंद्र चे चित्रपट लागत. असे जवळचे संबंध होते.
काय अभ्यास आहे रे बाबा!!
काय अभ्यास आहे रे बाबा!!
जितूजीच्या नशिबी क्षणाचं टाकीटाकी व अनंतकाळची जुदाई असते >>>
जिगरी दोस्त, वारीस, यातला जितू तेव्हा जाम आवडायचा.
बदलते रिश्ते मध्ये शेवटी शेवटी त्याच्या तोंडी एक डायलॉग येतो - चलो, अब हम अपना हनीमून मनाएं?
त्यातही अस्मिताने म्हटलंय तसे आवाजात त्रयस्थ भाव आहेत.
Pages