परवाच जितूजींचा बड्डे झाला. मधे त्याची काही गाणी बघत होतो. तीही त्यात जितू आहे म्हणून नाही तर इतरच कारणांनी. (थांबा थांबा. मी हिम्मतवाला, मवाली बद्दल म्हणत नाहीये. 'ये मुलाकात एक बहाना है' सारखी गाणी ऐकायला छान आहेत म्हणून लावली होती). तेव्हा जाणवले की जितेंद्रच्या पिक्चर्स मधे असंख्य पिक्चर्स असे होते की त्याचे जिच्याशी प्रेम जमले तिच्याशी त्याचे क्वचितच लग्न व्हायचे. त्यामुळे एखाद्या आनंदी गाण्यात ती "एक्स" रडताना दिसते. किंवा तिचे एक सॅड कडवे नंतर असते. एका फेज मधे बहुतांश रीना रॉय कधी इकडे तर कधी तिकडे असायची
अशा कथानकांची ही काही उदाहरणे:
- खानदान मधे बिंदिया गोस्वामीला सोडून सुलक्षणा पंडित
- अपनापन मधे रीना रॉयला सोडून सुलक्षणा पंडित
- आशा मधे रीना रॉयला सोडून रामेश्वरी
- अर्पण मधे रीना रॉयला सोडून परवीन
- बदलते रिश्ते मधे रीना रॉय ऋषीकपूरला सोडून याच्याकडे येते
- प्रेम तपस्या मधे रीना रॉयला सोडून रेखा
नंतर श्रीदेवी/जयाप्रदा यांचेही पिक्चर्स अशाच स्वरूपात येऊ लागले (तोहफा). पण एकूणच बरीच वर्षे ही रिकरिंग फेज होती त्यांच्या पिक्चर्सची.
दुसरे म्हणजे मुलेबाळे. जितूजी व त्यांच्या दोन हिरॉइन्स पैकी कोणाला मूल हवे असेल, कोणाला प्रत्यक्षात होईल व पिक्चरच्या शेवटी ते कोणाच्या पदरात पडेल यावर अनेक पिक्चर्स चालले. यातील अनेक प्रेमाच्या त्रिकोणांना सोडवायचे म्हणजे एका हिरॉइनने डायरेक्ट मरायला हवे असाच नियम असावा. अर्थात तो हिंदी मधल्या कोणत्याही दशकाच्या प्रेमाच्या त्रिकोणाच्या बाबतीत लागू होईल. मी दुसरी मुलगी/मुलगा शोधतो वगैरे प्रकार नाहीत. एकवेळ व्हिलनच्या माफिया टोळ्यांमधून लोक जिवंत बाहेर पडतील, पण प्रेमाच्या त्रिकोणातून नाही.
बहुतांश कथा अशा की दोन स्त्रियांना त्याग करायला मधे एक हीरो पाहिजे म्हणून जितूजींना घेतले असावे. जितक्या चित्रपटांत असे रोल होते ते धरले तर त्या दृष्टीने जितूजी हे "वन मॅन बेख्डेल टेस्ट बीटर इंडस्ट्री" आहेत.
कधी कधी तर जितूजींचे कारनामे (ज्यामुळे त्या हिरॉइन्स चित्रपटात दाखवलेल्या अवस्थेत आहेत ते) बाजूला राहून त्या दोघी एकमेकींशीच भांडत. माँग भरो सजना मधे नक्की डबल रोल का आहे, त्यातला फ्लॅशबॅक खुलासा नक्की काय आहे आणि त्यामुळे ओम शिवपुरीच्या निर्णयात का फरक पडला ते विकीवर वाचून तरी डोक्यावरून गेले. त्यात त्यातली माँग वाली हिरॉइन त्या पिक्चरमधल्या तीन हीरॉइन्सपैकी कोणासारखीच दिसत नाही आणि तेथे जितूजींचा फोटो लोक एखाद्या मोठ्या उंच लॅण्डमार्कपासून लांब उभे राहून त्याच्या टोकावर हात धरतात तसा काढला आहे. उद्या कोणी जितूजींना घेउन Honey I shrunk the husband काढला तर त्याकरताही हा पोस्टर खपून जाईल.
मात्र एका पिक्चर मधे काकाने त्याच्या वरताण केले आहे. त्याच्या "आशाज्योती" मधे अशाच एका नाट्यमय त्रिकोणाला सोडवायला दोघीही हिरॉइन्स मरतात. नक्की का व कशा ते नीट पाहिले नाही. गरजूंकरता चित्रपट उपलब्ध आहे यूट्यूबवर.
हे पाहताना हे ही लक्षात आले की रीना रॉयचे पिक्चरही बरेचसे तसेच असत. दोघांचा ओव्हरलॅप प्रचंड आहे. हे सगळे पिक्चर्स फॅमिली ड्रामा टाइप, म्हणजे पुण्याला वसंत टॉकीज मधे लागत तसे असत. पिक्चरमधे रीना रॉय ज्याच्या प्रेमात पडते त्याच्याशी तिचे लग्न फार क्वचित होते. जितेंद्र असेल तर जवळजवळ नाहीच. फक्त 'बदलते रिश्ते' मधे ऋषी कपूर ते अस्सल ७०ज मसाला वापरून घडवून आणतो म्हणून जमते. असे काही अपवाद. असो. तो वेगळा विषय आहे.
विकीवरची लिस्ट पाहिली तर जितूजींनी चाळीस-एक वर्षे काय अफाट पिक्चर्स मधे काम केले आहे! एकाच नावाच्या दोन पिक्चर्स मधे दोन वेळा काम करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. गंमत म्हणजे त्या दोन्ही चित्रपटांच्या नावांचाही अर्थ एकच आहे: संतान व औलाद. म्हणजे संतान नावाच्या दोन पिक्चर्स मधे (संतान-१, संतान-२) व औलाद नावाच्या दोन पिक्चर्स मधे (औलाद-१, औलाद-२) त्यांनी काम केले आहे. पहिल्या संतान (चित्रपटा) मधे ते बापाला सुधरवणारा मुलगा असतात तर दुसर्यामधे मुलाकडून छळला जाणारा बाप. नशीब एक डबल रोल करून त्यांनी दोन्ही रोल स्वतःच केले नाहीत. औलाद मधेही असेच काहीतरी असावे.
यातील एका औलाद मधे तर एकीचे नाव देवकी व दुसरीचे यशोदा आहे. साहजिकच त्यातील बाळ पिक्चरभर इकडून तिकडे फिरते. शेवटी तर ते यशोदाला दिले जाते तेव्हा विकीवरील माहिती नुसार "...Devki falls down due to headache. Doctor gives good news that she is expecting and would become mother in near future" . विकीवर त्यांच्या प्रत्येक पिक्चरचे इंग्रजीतूनही नाव्/अर्थ आहे तो ही तितकाच मनोरंजक आहे: The thirsty monsoon - प्यासा सावन, Life on palm - जान हथेली पे, Complete household - घर संसार, Where is love like this - ऐसा प्यार कहाँ, More beautiful than heaven - स्वर्ग से सुंदर, Henna brings color - मेहंदी रंग लायेगी etc.
याखेरीज त्यांनी "हिंमत", "हिंमतवाला" आणि "हिंमत और मेहनत" या तिन्हीमधे काम केले आहे. इतकेच नव्हे तर एकाच वर्षी "सुहागन" व "सदा सुहागन" दोन्हीमधे, व त्याच वर्षी लगे हाथो एक "सिंदूर"ही केला. तसेच ते "जानी दोस्त" ही होते व "जानी दुश्मन"ही. ते "माँ और ममता" मधेही आहेत आणि मुख्य लीडचे नाव ममता असलेल्या "माँ" मधेही.
त्यात हे वरचे बहुतांश फक्त "फॅमिली मॅन" जितूजींबद्दलचे आहे. या खेरीज गुलजारवाला जितेंद्र वेगळा, जे ओमप्रकाशच्या अ ने सुरू होणार्या पिक्चर्समधला वेगळा, नंतरचा पद्मालय स्टुडिओजचा व राव आडनावाच्या विविध लोकांच्या पिक्चर्समधला मिशीवाला जितेंद्र वेगळा. त्याहीनंतर "नफरत की आँधी" छाप पिक्चर्स मधला वेगळा.
ही लिस्ट बघितली तर एकेक महान रत्ने सापडतात. त्यावरून आणखी शोधले तर ज्या क्लिप्स दिसतात त्या आणखीनच भारी आहेत. बाकी "ढल गया दिन, टुक, हो गयी शाम, टुक" गाणी तर आहेतच. हे सगळे वर्णन म्हणजे हिमनगाचे फक्त वरचे टोक आहे. इथल्या तज्ञांकडून आख्खा हिमनग समजावून घेण्याकरता हा धागा उघडत आहे. पूर्ण लिस्ट इथे या लिन्कवर आहे. येउ द्या!
https://en.wikipedia.org/wiki/Jeetendra_filmography
शाळेत असतांना एका मित्राने
धमाल लेख आणि तितकेच खतरनाक प्रतिसाद
शाळेत असतांना एका मित्राने जितु सरांना पत्र लिहिले होते आणि दोनचार महिन्यांनी सरांचे त्याला उत्तरही आले होते सोबत सरांचा सही असलेला फोटो. हा लेख वाचून त्या प्रसंगाची आठवण झाली.
जितेंद्र मराठी खूप सहजतेने
जितेंद्र मराठी खूप सहजतेने बोलतो. किंबहूना हिंदीपेक्षा मराठी सफाईदार असावं अशी शंका येते इंटरव्ह्यूज बघताना.
बाकी, फा चा लेख आणि त्यावर इतरांनी लावलेले चार चाँद - कमाल आहेत. जितेंद्रचं इतकं निरिक्षण कधी केलं नव्हतं. मला त्याची काही गाणी मात्र आठवतात/आवडतात.
मेरा पती सिर्फ मेरा है '
मेरा पती सिर्फ मेरा है ' नावाचा एक महान चित्रपट राहून गेला आहे. >>>. ह्या वरूनच सुप्रसिद्ध साराभाई मालिकेत मॉनिशा जी सिरियल सतत बघत असते तिचे नाव- "उसका पती सिर्फ मेरा है" असं असतं
लेख आणि प्रतिसाद एकदम भारी
लेख आणि प्रतिसाद एकदम भारी आहेत. धमाल येतीये वाचताना. समहाऊ जितुजी हा शब्द एकदम चपखल वाटतोय.
मी जितुजींचे अगदी काहीच सिनेमे पाहिले आहेत. परिचय पाहिलाय आणि मग डायरेक तोहफा. सर्व सिनेमात 'इदं न मम' अश्याच वृत्तीनं वावरलेला तरीही आवडणारा पण कधीही पहिल्या फळीत न गेलेला (तसा प्रयत्नही न केलेला) असा हा कल्लाकार!
मला हे सर्व वाचताना त्याची ही दोन गाणी आठवली. का आठवली ते अगम्य आहे.
Duniya Ne Mujhko Hai Samjha Nakaara (HD) | Naalayak (1978) | Jeetendra | Leena Chandavarkar : https://www.youtube.com/watch?v=8ryiauHtP5M
यात तो अक्षरशः अंगात आल्यासारखा नाचतो.
यारो आओ खुशी मनाओ HD - खानदान - जितेन्द्र - किशोर कुमार : https://www.youtube.com/watch?v=Ulurks_PmCA
इथे तिशीतले कॉलेजकुमार बागडताना दिसतील.
जितुजी पूर्वी टिव्हीवर कोणत्यातरी 'जवानी का राज' / 'फुर्ती का राज' टाईप प्रॉडक्टच्या जाहिरातीतही दिसायचे. गैरसमज नकोत - कसल्याश्या व्हायटॅमिन अथवा टॉनिकची जाहिरात होती. हातात रॅकेट घेऊन दडदड जीने उतरून यायचा.
मी-अनु, मस्त बोललाय जितेंद्र
मी-अनु, मस्त बोललाय जितेंद्र मराठी. (पुर्विचाच आठवतो, त्यामुळे एकेरीच मनात येतं).
लेखातील निरीक्षणे, पंचेस
लेखातील निरीक्षणे, पंचेस मस्तच.. प्रतिसाद एकाहून एक सरस..
क्षणकाळाचा टाकीटाकी
सखोल अभ्यास ..भाई! सखोल
सखोल अभ्यास ..भाई! सखोल अभ्यास.. लागतो असे सर्व लिहायला. मस्तच !!!
जितेंद्र मराठी खूप सहजतेने
जितेंद्र मराठी खूप सहजतेने बोलतो. किंबहूना हिंदीपेक्षा मराठी सफाईदार असावं अशी शंका येते इंटरव्ह्यूज बघताना.
कपिल शर्माच्या शो मध्ये जितेन्द्रनी सांगितले आहे की लहानपणी त्यांच्या घरात मराठीच बोलायचे. त्यांचा जन्म पंजाबला झाला व मूळ पंजाबी आहेत पण पुर्ण लहानपण मराठी वातावरणातच झाले. त्या शो मध्ये त्यांनी करवाचौथ मुळे कसे वाचले ते ही सांगितले आहे. मद्रासला जायला निघाले होते. विमान लेट झाले म्हणून करवाचौथ रस्म करण्यासाठी घरी आले. नंतर बायकोने जाऊ दिले नाही. ज्या विमानाने जाणार होते तेच विमान टेक ऑफच्या वेळी बिघाडामुळे कोसळले व सगळे जण ठार झाले. जितेंद्र गेले नाहीत म्हणून वाचले.
https://en.wikipedia.org/wiki/Indian_Airlines_Flight_171
कुठेतरी वाचले की यांचे व हेमा मालिनीचे लग्न ठरले होते पण तिने आयत्यावेळी माघार घेतली.
बाकी हळू हळू हा धागा जितूभाईंच्या कौतूकाकडे वळतोय....
एक पर्सनल गोष्ट मला
एक पर्सनल गोष्ट मला जितेंद्रजीबद्दल माहित आहे कदाचित ती सगळ्यांना माहित असेलही कि त्यांनी त्यांच्याकडे काम करणाऱ्या नोकर ,चाकर, यांना व त्यांच्या मुलांना खूप मदत केली। तिकडे मीरा रोड,नायगाव वैग्रे ठिकाणी फ्लॅट्स घेऊन दिले। मुलांना शिक्षणासाठी लागणार पैसा पुरवला। आमच्या ऑफिसमध्ये बदलीवर सिक्युरिटी आलेला तो स्वतः लाभार्थी होता व त्याचा मुलगा L & T मध्ये कामाला आहे
फार पूर्वी जेव्हा स्टार
फार पूर्वी जेव्हा स्टार डस्ट विकत घेण्याची ऐपत नव्हती. घरगुती लायब्ररीवाला यायचा त्याकडे किंवा उत्क र्ष लायब्ररीतून एखादा जुना अंक मिळाला तर फार रेअर माहिती मिळाल्याच्या आविर्भावात तो वाचायचो व सर्व फोटो आसूसून बघायचो तेव्हा जितेंद्र शोभा ह्यांचा बंगला त्याचे आतले संकन सोफा ड्रॉइन्ग रूम घरातील मार्बल वगैरे चे फार अपरूप होते. त्यात ती शोभा बटबटीत दागिने घालून विचित्र कपडे घालून बसलेली.
कधी कल्पना पण करु नाई शकू अशी श्रीमंती.
डेक्कन चित्रपट गृहात ( डेक्कन बस्टॉप समोर) एक जितूचा जैसे को तैसा नावाचा चित्रपट अगदी लहान वयात बघितला होता. धरमवीर पन नंतर इथेच . तिकिटाला भाजलेल्या मक्याच्या कणसाचा वास!!! तर पिक्चर सीता और गीताची मेल वर्जन असावा. त्यात एक जैसे को तैसा मिला
बडामजा आया ह्यात स्मार्ट जितू रणजीत का कोणाला तरी हंटरने बडवतो. ( हा आधी गरीब जितूला बडवायचा तसे) ते जायदाद वगैरे डोक्यावरून गेले. हातात कधी वट्ट दहा रुपये पन नसत. पण पन पण त्यात रीना रॉ य व जितू चे एक अब के सावन मे जी डरे गाणे आहे ते मात्र जबरी आहे आर्डी इन फुल फॉर्म. रिना लुक्स लै भारी. व रोमान्स करायचा तर असा हे डोक्यात घट्ट बसून गेले ते तेव्हाच. मी ह्या गाण्याबद्दल माज्या पावसाची गानी बाफ वर लिहिले आहे. लता किशोर रिअली रॉक. व रेन्स.
डेक्कन ला धरमवीर लहान असताना
डेक्कन ला धरमवीर लहान असताना पाहिला होता. मामाची पर्सनॅलिटी पोलीस अधिकार्यासारखी होती. तिचा फायदा घेऊन त्याने आत जाऊन सर्वांसाठी तिकीटं आणली होती, ते ही बाहेर ब्लॅक चाललेलं असताना.
जितूजींची फ्लाईंग किक
https://www.youtube.com/watch?v=sr473wYh0_8
कुठेतरी वाचले की यांचे व हेमा
कुठेतरी वाचले की यांचे व हेमा मालिनीचे लग्न ठरले होते
>>>>> माझ्या ऐकीव माहितीनुसार त्याला हेमा आवडायची आणि मध्यस्थीसाठी शादीशुदा धरमपाजी ला गळ घातली तर धरामापाजी नेच तीला गळाला लावलं
एक वेळ इतिहास विसरलात तर ते
एक वेळ इतिहास विसरलात तर ते क्षम्य असू शकेल. पण बॉलिवूडच्या बाबतीत अशा चुका अक्षम्य आहेत.
धर्मेंद्र हेमामालिनी चं अफेअर होतं पण धरमपाजी विवाहीत होते. अनेकदा मागे लागूनही ते लग्नाचा विषय टाळत होते. त्यामुळं हेमाने जितेंद्राने मागणी घातल्यावर होकार दिला. दोघांचं लग्न चेन्नईत होणार होतं. ही माहिती मिळताच धरमपाजी तिकडे पोहोचले आणि मग आपल्या अमोघ वक्तृत्वाने (राडा) तो विवाह रद्द करून नंतर गांधर्व पद्धतीने लग्न लावलं. तो कायदेशीर नाही अशी टीका झाल्यावर मुस्लीम धर्म स्विकारून लग्न केले आणि परत हिंदू धर्मात आले.
संजीवकुमार चं हेमामालिनीवर प्रेम बसलं होतं. पण संजीव कुमार लाजाळू असल्याने मनकी बात सांगण्याचे काम जितेंद्राकडे सोपवले. जितूजी गेले आणि स्वतःच्याच लग्नाची बात करून आले. हरीभाई कुंवारेच राहीले.
स्टारभारतीच्या हिरोंची ओळख - इयत्ता तिसरी या क्रमिक पुस्तकातून
मध्ये गिरीश कार्नाड राहिले.
मध्ये गिरीश कार्नाड राहिले.
कसली मस्त माहिती मिळतेय इथून
कसली मस्त माहिती मिळतेय इथून
एक पर्सनल गोष्ट मला
एक पर्सनल गोष्ट मला जितेंद्रजीबद्दल माहित आहे कदाचित ती सगळ्यांना माहित असेलही कि त्यांनी त्यांच्याकडे काम करणाऱ्या नोकर ,चाकर, यांना व त्यांच्या मुलांना खूप मदत केली। तिकडे मीरा रोड,नायगाव वैग्रे ठिकाणी फ्लॅट्स घेऊन दिले। मुलांना शिक्षणासाठी लागणार पैसा पुरवला। आमच्या ऑफिसमध्ये बदलीवर सिक्युरिटी आलेला तो स्वतः लाभार्थी होता व त्याचा मुलगा L & T मध्ये कामाला आहे
>>> अरे वा
लाथ भयानक आहे
लाथ भयानक आहे
<पिक्चर मध्ये जे दागिने
<पिक्चर मध्ये जे दागिने लागतात ते भाड्याने द्यायचा एकांचा व्यवसाय होता व ते डिलिव्हरी करायचे आणायचे काम जितू करीत असे. त्यात च तो व्ही शांताराम ह्यांच्या नजरेस पडला व पहिला पिक्चर मिळाला असे कुठेतरी वाचलेले/ ऐकलेले.> अमीन सायानीच्या गीतमाला की छाँव में मध्ये जितूजींच्याच आवाजात आहे. एकदा ते राजकमल स्टुडियोमध्ये दागिने द्यायला गेले असताना तिथे कोणीतरी त्यांना चला चला, राजकुमाराचे कपडे आणि मेकप करा असं सांगितलं. काही बोलायची संधी दिली नाही किंवा यांनी घेतली नाही. पण आत जाऊन बघतात तर तसे २०० राजकुमार तिथे होते. पहिली भूमिका एक्स्ट्रा. पण तिथे व्ही शांताराम यांनी पाहिलं आणि सेहरामध्ये लहानशी भूमिका दिली. पण ती इतकी लहान होती की जितूजींच्या घरच्या लोकांनाही ते पडद्यावर कधी आले आणि गेले ते कळलं नाही. सेहरामध्येच मुमताजही होती ना?
या दोघांना घेऊन व्ही शांताराम यांनी बूंद जो बन गयी मोती हा चित्रपट काढला. त्याआधी जितूजींना घेऊन गीत गाया पत्थरों ने राजश्रीसोबत.
धर्मेंद्र हेमामालिनी चं अफेअर
धर्मेंद्र हेमामालिनी चं अफेअर होतं पण धरमपाजी विवाहीत होते. अनेकदा मागे लागूनही ते लग्नाचा विषय टाळत होते. त्यामुळं हेमाने जितेंद्राने मागणी घातल्यावर होकार दिला. दोघांचं लग्न चेन्नईत होणार होतं. ही माहिती मिळताच धरमपाजी तिकडे पोहोचले आणि मग आपल्या अमोघ वक्तृत्वाने (राडा) तो विवाह रद्द करून नंतर गांधर्व पद्धतीने लग्न लावलं.>>> हो यावर एकदा कणेकरानी लिहल (लोकसत्ता रविवार पुरवणी बहुधा )होत .
जितू मुन्डावळ्या बान्धुन पुढच्या दाराने आला आणी जट मागच्या दाराने वधु घेवुन पळुन गेला.
जितेंद्र गिरगावात वाढला आहे.
जितेंद्र गिरगावात वाढला आहे. तिथल्या st Sébastien शाळेत होता. ते कारण असू शकतं मराठी चांगले असल्याचे. राजेश खन्ना ही त्याच शाळेचा. अनु - मस्त आहे क्लिप. मजा आली baghun.
फारेंड - लेख छान जमलाय
जितेंद्र गिरगावात वाढला आहे.
जितेंद्र गिरगावात वाढला आहे. तिथल्या st Sébastien शाळेत होता. ते कारण असू शकतं मराठी चांगले असल्याचे. >>>
हो, माझ्या काकांचा गिरगावातल्या चाळी मधला शेजारी होता.
ह्याच पिक्चरमध्ये जितुजी (आणि
ह्याच पिक्चरमध्ये जितुजी (आणि रेखा) यांचं 'बारह महीने लाईन मारी फिर भी लगा न नंबर' हे अजरामर गाणं आहे. ते प्रत्येकाने सुडोमिसाठी आयुष्यात एकदातरी पहायलाच हवं.
असे वाचले होते की हे गाणे आधी सुमित सैगल वर चित्रीत झाले होते. पण गाणे चांगले वाटले म्हणून जितेन्द्रने किंवा रेखा किंवा यांच्या कोणा जवळच्याने निर्मात्या निर्देशकाला पटवून जितेंद्र व रेखावर चित्रित करायला लावले....
Pages