असा सूर लागे जसा श्वास घेतो

Submitted by पुरंदरे शशांक on 6 February, 2023 - 04:50

असा सूर लागे जसा श्वास घेतो

असा सूर लागे जसा श्वास घेतो कळेना तरी दैवी की लाभला
सदा अंतरींच्या जशा सप्त तारा विशेषे तिन्ही सप्तका लागल्या

मना मोहवी, दुःखही मोह घाली असे सूर स्वर्गीय कोंदाटले
लडी रेशमाच्या वरी कर्णद्वारी ह्रदी येत ते सौख्य सामावले

अभिसारिका ती कधी विद्ध होई सखा पाहुनी लाली गालावरी
कधी साद घाली जरी ईश्वराला तरी दाह भावे इथे अंतरी

असे भाव सारे सुरा गुंफुनिया रसिका मनी सौख्यदा जाहले
पियूषा परी ते सदा निर्मळाचे शशी सूर्य तारे तसे नांदले

----------------------------------------------- ---------------------
लतादीदींच्या सुरांचे आपण सर्वसामान्य काय वर्णन करणार ! आपण जसा सहज श्वास घेतो तसे दीदींचे दैवी सूर सतत लागलेलेच होते. त्यांच्या कंठातच काय तर ह्रदयातल्या ताराही अशा झंकारत होत्या की तिन्ही सप्तकातून (खर्ज, मध्य व तार) त्यांचा लीलया संचार होत असे.

अतिशय प्रसन्न, खेळकर मूड्समधील त्यांची गाणी जशी रसिकांना मोहवीत तितकीच अतिशय दर्दभरी गाणीही रसिकांच्या ह्रदयात घर करुन रहातात.
जणू काही रेशमाच्या लडींसारखे त्यांचे सूर आपल्या कानावर अलगदपणे येत येत आपल्या ह्रदयात एक प्रकारचा आल्हादही निर्माण करतात.

एखाद्या प्रियकराची वाट पहाणारी प्रिया (अभिसारिका) असो वा प्रियाच्या जाण्यामुळे अतिशय दुःखी झालेली कोणी असो वा प्रियाच्या आगमनाने लाजेने चूर झालेली कोणी असो - असे विविध भाव लतादीदी त्यांच्या सुरातून नेमकेपणाने व्यक्त करीत असत. इतकेच नव्हे तर कुणा संतांचे अभंग/गीते गात असताना त्यात व्यक्त झालेली व्याकुळता थेट रसिकांच्याही ह्रदयातही ती दाह भावना निर्माण करायची ताकद त्या अलौकिक सुरांमधेच होती.

अशा विविध भावांची पखरण करणारे सूर रसिकांना सदैव सौख्यदायकच झाले व पुढेही होतीलच होतील कारण अमृतासारखे अविट गोडीचे हे सूर आकाशात सूर्य, चंद्र व तारे आहेत तसे अजरामर झालेले आहेत.

स्व. लतादीदींना विनम्र शब्दसुमनांजली.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर आहे.
'ओ फुलोंकी रानी बहारोंकी मलिका, तेरा मुस्कुराना गजब हो गया' गाण्याच्या चालीतच वाचल्या गेली.

सुरेख.
सुंदर शब्द, आशय.
ओ फुलोंकी रानी बहारोंकी मलिका, तेरा मुस्कुराना गजब हो गया' गाण्याच्या चालीतच वाचल्या गेली >>> +१
कोंदाटले असा शब्द आहे का ? आम्ही कोंदट म्हणतो. कोंदटले होईल ना ?

खूप सुंदर.
'मराठी असे आमुची मायबोली, जरी आज ती राष्ट्रभाषा नसे '

"असे रंग आणि ढगांच्या किनारी निळे ऊन लागे मला साजणी
निळे घाटमाथे निळ्या राउळांचे निळाईत माझी भिजे पापणी"

आता ह्या सगळ्याच कवितांना 'ओ फुलोंकी रानी बहारोंकी मलिका' लावली जातेय. सगळेच एका (सुमंदार)मालेचे मणी!

त्यात ओ आणि की हे गुरु पाडून लघु केलेत - त्याला हर्फ गिराना म्हणतात. अचूक सुमंदारमाला नसली तरी हर्फ गिराके सुमंदारमाला हय वह.

आता ह्या सगळ्याच कवितांना 'ओ फुलोंकी रानी बहारोंकी मलिका' लावली जातेय.
>>>> Lol
ओफूs sलों किरानी..>>> Lol

त्यात ओ आणि की हे गुरु पाडून लघु केलेत - त्याला हर्फ गिराना म्हणतात. अचूक सुमंदारमाला नसली तरी हर्फ गिराके सुमंदारमाला हय वह.
>>> मस्तच माहिती आहे. लक्षात ठेवायचा प्रयत्न करते.