असा सूर लागे जसा श्वास घेतो
Submitted by पुरंदरे शशांक on 6 February, 2023 - 04:50
असा सूर लागे जसा श्वास घेतो
असा सूर लागे जसा श्वास घेतो कळेना तरी दैवी की लाभला
सदा अंतरींच्या जशा सप्त तारा विशेषे तिन्ही सप्तका लागल्या
मना मोहवी, दुःखही मोह घाली असे सूर स्वर्गीय कोंदाटले
लडी रेशमाच्या वरी कर्णद्वारी ह्रदी येत ते सौख्य सामावले
अभिसारिका ती कधी विद्ध होई सखा पाहुनी लाली गालावरी
कधी साद घाली जरी ईश्वराला तरी दाह भावे इथे अंतरी
असे भाव सारे सुरा गुंफुनिया रसिका मनी सौख्यदा जाहले
पियूषा परी ते सदा निर्मळाचे शशी सूर्य तारे तसे नांदले
शब्दखुणा: