झिम्मा - मराठी चित्रपट
झिम्मा म्हणून एक मराठी चित्रपट आलाय बघा. काय चित्रपट आलाय. या वर्षात मी पाहिलेला सर्वात आनंददायी चित्रपट. तो देखील कोरोना प्रकरण सुरू झाल्यापासून थिएटरला जाऊन पाहिलेला पहिलाच चित्रपट. या स्पेशल ओकेजनला एखादा छान चित्रपट बघणे नशिबी आला हे भाग्यच म्हणावे.
याच चित्रपटावर चर्चा करायला हा धागा.
ज्यांनी अजून पाहिला नाही ते ट्रेलर बघू शकतात. ट्रेलर सुद्धा फार आवडेल.
झिम्मा ट्रेलर - https://www.youtube.com/watch?v=o8EZsgN167A
चित्रपट मराठी आहे. ओटीटीवर बहुधा नाहीये. पण आला तरी तिथे बघू नका. थिएटरलाच बघा. मराठी चित्रपट ईंग्लंडला गेलाय. आपण थिएटरला जायला हरकत नाही
म्हणजे स्टोरी फार सिंपल आणि चार ओळींची आहे बघा. ट्रेलर पाहिला असेल तर हा पॅराग्राफ वाचूही नका. म्हणजे बघा एक साधारण सात आठ बायका आहेत. वेगवेगळ्या स्वभावाच्या, जातकुळीच्या आणि त्याला साजेश्या पार्श्वभूमीमुळे वेगवेगळे प्रॉब्लेम घेऊन आलेल्या.. या सार्याजणी मिळून एका ईंग्लंड टूरवर दंगा घालतात. भांडतात, एकत्र होतात, एकमेकींना समजून घेतात, आणि त्यात त्यांचे प्रॉब्लेम सुटत जातात, जगण्याचा नवा दृष्टीकोन मिळतो.. वगैरे वगैरे.. पण हे सारे फारच सुंदर पद्धतीने घडते.
ईतक्या बायका जेव्हा पडद्यावर सतत दिसत राहतात तेव्हा चित्रपटाची फ्रेम तशीही सुंदरच होते. पण याऊपर ईंग्लंड ईतके छान टिपलेय की कमॉन, हा मराठी चित्रपट आहे, जो कधीकाळी लो बजेट समजला जायचा, हे स्वतःला चिमटा काढून सांगावे लागते.
सगळ्या व्यक्तीरेखा अगदी सुरेख आणि ठसठशीत उभ्या केल्यात पण त्या पेलायला जो समर्थ अभिनय लागतो त्यात डावेउजवे करणे कठीण व्हावे ईतका नैसर्गिक केलाय प्रत्येकीने.. अर्थात तरीही निर्मितीताई किंचित भाव खाऊन जातात. नुसत्या एक्स्प्रेशनवर हश्या वसूल करतात. त्यांच्यासाठी एक बदाम एक्स्ट्रा
गाणी आणि पार्श्वसंगीतही चोख.. झिम्मा शीर्षकगीत सतत डोक्यात पिंगा घालून राहणारे.. संवाद चुरचुरीत तसेच तत्वज्ञान सांगणारे वगैरे फुल्ल पॅकेज आहे चित्रपट! म्हणजे बघत असतानाच सतत जाणवत राहते की आज आपण काहीतरी छान बघतोय.
चित्रपटात चुका काढायच्या म्हटल्या तर लॉजिक लाऊन त्या निघतीलही. पण अश्या चित्रपटांत मॅजिक बघायचे असते. तरच ते अनुभवण्यात मजा. म्हणजे बघा ना, बायकोने ईंटरव्हलमध्ये पॉपकॉर्न न घेता आम्ही चित्रपटातच गुंतून राहिलोय हे शेवटचे कधी घडले आठवत नाही. तसेच चित्रपट संपल्यावर शेवटी नावे पडताना स्क्रीनवर एका कोपर्यात त्या बायकांच्या व्हॉटसपग्रूपची चॅट दाखवतात. ती सुद्धा शेवटपर्यंत म्हणजे "कबीर लेफ्ट" येईपर्यंत आम्ही खुर्चीत बसून पाहिली, आय मीन वाचली. असंही रोज रोज होत नाही.
अरे हो, त्या व्हॉटसपग्रूपमधून लेफ्ट होणारा हा कबीर म्हणजे सिद्धार्थ चांदेकर, जो त्या टूरचा आयोजक दाखवला आहे. त्याची अभिनयशैली आवडतेच. हा रोल तर त्याचाच होता. तर चित्रपटाचे दिग्दर्शन करणारा आणि सोबत चान्स मारत त्यात अभिनयही करणारा हेमंत ढोमे, त्याचे ईतका सुंदर चित्रपट बनवल्याबद्दल कौतुक आणि आभार.
बाकी मला परीक्षण वगैरे लिहिता येत नाही. एवढी चित्रपट समजायची अक्कल नाही माझ्यात.
पण हे बघा, मी हे पाहिलेय, आणि ते मला फार आवडलेय, तुम्हालाही आवडेल... हे चार लोकांना सांगायला मनापासून आवडते म्हणून हा खटाटोप
थोडेसे अवांतर पण गरजेचे -
आम्ही हा चित्रपट नवी मुंबईच्या सीवूड स्टेशनमधील ग्रॅंड सेंट्रल मॉल मधील सिनेपॉलिसला पाहिला. मॉलमध्ये प्रवेश देताना वॅक्सिन सर्टिफिकेट चेक करूनच आत पाठवत होते. थिएटरमध्ये खुर्च्या एक सोडून एकच बूकिंग होते. आम्ही दोघे नवराबायको ईंटरव्हल पर्यंत याच नियमाचे पालन करत मधली खुर्ची सोडून बसलो होतो. पण पुढे पिक्चरचा प्रभाव पडला. जश्या त्या बायका एकमेकींच्या जवळ आल्या तसे आम्हीही मग ईंटरव्हलनंतर बाजूबाजूच्या खुर्चीवर बसूनच पुढचा पिक्चर पाहिला
असो, सांगायचा मुद्दा हा की सोशल डिस्टंन्सिंग पाळले जाते. चिंता नसावी. त्यामुळे तुम्ही एकटे गेलात तरी शेजारी कोणी लगटून बसायला येणार नाही याची खात्री. त्यामुळे बायकांनी बिनधास्त एकटेही जायला हरकत नाही. तसेच पुरुषांच्या वॉशरूममध्येही सोशल डिस्टन्सिंग पाळून युरिनल एक सोडून एक वापरात असल्याने आपले काम चालू असताना बाजूला कोणी येऊन उभा राहत नाही हे ही फार छान वाटले. पुरुषांनीही हा सुखद अनुभव घेण्यास चित्रपटगृहात जायला हरकत नाही. असे एखादे काहीही कारण शोधा, पण हा चित्रपट चुकवू नका
धन्यवाद,
ऋन्मेष
मग ती भारतातून कशी आलेली
मग ती भारतातून कशी आलेली दाखवली आहे?>> हो ते मलाही कळल नाही पण बरचस न कळण्यासारख चालु होत त्यात एकाची भर.
बाकी क्षिती जोग चे पात्र अगदी ऐन वेळी घुसडून दिले असे त्यांनीच मुलाखतीत सांगितले>>> टिपिकल मराठी माणसकिता का? लन्डन ट्रिप करतो आहोत तर बायकोलाही न्याव
अजून खूप वाईट होण्याचीही संधी
अजून खूप वाईट होण्याचीही संधी होती, तसं झालं नाही. >>>
क्षिती जोग त्या ढोम्या ची बायको आहे ते आत्ता पाहिले!
ढोम्याचा आधीचा सिनेमा चोरीचा मामला हेही आताच समजले. बरोबर मग. तोही सिनेमा बर्याच लोकांना तुफान विनोदी वाटला होता, पण माझ्यासाठी १५ मिनिटात बंद कॅटेगरी होता.
यात्रेचं कारण सांगून भारतात
यात्रेचं कारण सांगून भारतात जाते आणि उलटपावली लंडन>> कच्रल शॉक होता तो. जाणवला नाही का तुम्हाला?
सुहास कुलकर्णी छान दिसल्यात.
सुहास कुलकर्णी छान दिसल्यात. मला त्यांचा वॉर्डरोब आवडला. >>> तुम्हाला सुहास जोशी म्हणायचं आहे, की सोनाली कुलकर्णी?
सुहास जोशीचं कॅरेक्टर इतकं सॉर्टेड आणि फटकळ आहे तर ती खोटं न बोलताही लंडन फिरू शकली असतीच की >> >हो हे खरे आहे. तिने जी व्यक्तिरेखा उभी केली आहे ती सगळे स्पष्ट सांगणारी आहे. ती अशी लपूनछपून येणार नाही.
गुज्जू बाई 'तिला वाटलं, ती गेली!' म्हणून इम्प्रेस होते - मग स्वतः आलीच आहे की टूरवर स्वतःला वाटलं म्हणून >>> हे बघताना जाणवले नाही.
सिद्धार्थ चांदेकरची गाइड गिरी भारी आहे. "हे कॅथीड्रल". That's it.
ढोम्याचा आधीचा सिनेमा चोरीचा
ढोम्याचा आधीचा सिनेमा चोरीचा मामला हेही आताच समजले. बरोबर मग. तोही सिनेमा बर्याच लोकांना तुफान विनोदी वाटला होता, पण माझ्यासाठी १५ मिनिटात बंद कॅटेगरी होता. >>> ओह तो त्याचा होता? मी शब्दशः १५ मिनीटात उठून गेलो होतो.
फारेन्ड मला सुहास जोशी
फारेन्ड मला सुहास जोशी म्हणायचे होते
सिद्धार्थ चांदेकरची गाइड गिरी
सिद्धार्थ चांदेकरची गाइड गिरी भारी आहे. "हे कॅथीड्रल". That's it.>>
त्याचा मराठीचा टोनही मला फार खटकतो.. पण त्या निखिलला बोलताना बघून सिद्धार्थ परवडला असं झालं
"माझं काही चुकतय का?" .... "
"माझं काही चुकतय का?" .... " तुझ्याशिवाय तुला अधिक कोण ओळखणार"" - निखील उवाच
काय तो टोन. नम्रतेची पराकाष्ठा.
पण तिथेच दोन दिवस गुपचूप
यात्रेचं कारण सांगून भारतात जाते आणि उलटपावली लंडन>>
पण तिथेच दोन दिवस गुपचूप एखाद्या हाटेलात काढून मग यांना लंडनमध्येच जॉईन झाले असते तर तिकिटाचा खर्च वाचला असता , असा म म विचार आला. असं करू देत नाहीत का टूर्सवाले ? थाप मारायला खरोखरच उलटपावली यायचे काय कारण ? किंवा दुसरी एखादी बाई वेगळ्या देशात गेली असती नै का...
वावेला +१
सगळे दोष जाणवूनही आवडला.
झिम्मा २ मध्ये पॉला मॅग्लेन
झिम्मा २ मध्ये पॉला मॅग्लेन (उर्फ भाडिपाची प्रोड्यूसरला) रोल द्या कारण मराठी म्हणजे महाराष्ट्रातले इतकीच व्याख्या नको आहे आता. एवढे बोलून मी १०० वा प्रतिसाद् संपवते.
बहुतेक अजून एक भाग काढावा आणि
बहुतेक अजून एक भाग काढावा आणि त्यात प्रत्येकीचा भूतकाळ दाखवावा.. जमल्यास प्रत्येकीसाठी एक एक भाग काढावा..आजकाल ट्रेंड आहे..पुढून मागे जायचा
- एक एव्हेंजर फॅन
वेगळ्या देशांत गेली असती आणि
वेगळ्या देशांत गेली असती आणि तिकडे मुलगा भेटला असता तर तुम्ही लोकांनी किती पिसं काढली असतीत?
आणि ती वेगळ्या देशांत गेली असती तर मग या पिक्चर मध्ये कशी आली असती? काही तरी विचार करुन बोला रे!
हायला सी, आपल्या डोक्यात
हायला सी, आपल्या डोक्यात झिम्मा २ ची कल्पना एकाच वेळेस आली
लेकीन मै आगे जानेका बोल रही
लेकीन मै आगे जानेका बोल रही तो तू पीछे लेकर जा रही... ते लुई १४ वा होता तसं चौदा झिम्मा होतील आपल्याला कुणी बजेट दिलं तर...
अरे जाऊद्यात लोकहो किती ती
अरे जाऊद्यात लोकहो किती ती पिसं, माफ करा बिचाऱ्या ढोम्याला
आणि लेको तुम्ही सिनेमा दाखवत
आणि लेको तुम्ही सिनेमा दाखवत आहात. जो सीन प्रेक्षकांपुढे सादर झाला आहे तो पुन्हा नाट्यवाचन केल्यासारखा प्रेक्षकांना पुन्हा सांगायची गरज नाही. पब्लिकला समजावून घेउ दे. >>>>>>>>> हो हे मात्र जाणवलं त्या बागेत झोपलेल्या सीनला. अरे तुम्ही गपा ना, प्रेक्षकांना कळुदेत ते फिलिंग.
मंग? आमचे दोन तास वाया नाय
मंग? आमचे दोन तास वाया नाय गेले? ती लुस्कानी कोन भरून दील?
मगं तो पिक्चरच वेगळ्या देशात
मगं तो पिक्चरच वेगळ्या देशात काढायला हवा होता नं
अरे हो! वेगळ्या देशांत पण 'हे
अरे हो! वेगळ्या देशांत पण 'हे कॅथिड्रल' दाखवता आलंच असतं की! हे लक्षातच नाही आले.
बाकी शेक्स्पिअर ऐवजी दा विंची दाखवला की इंग्लंडची कॅथिड्रल नंतरची सिनेमातली शेवटची ओळख पण सहज पुसता आली असती.
हे मात्र जाणवलं त्या बागेत झोपलेल्या सीनला.>> हो. ते सगळ्यांनी समजावुन सांगितले. आणि मग शेवटी गाण्यात परत सगळ्या पिक्चरची धावती क्षणचित्रे कशाला ती दाखवली ?
"माझं काही चुकतय का?" .... "
"माझं काही चुकतय का?" .... " तुझ्याशिवाय तुला अधिक कोण ओळखणार"" - निखील उवाच
काय तो टोन. नम्रतेची पराकाष्ठा.>>> त्याचा एकदम दिल चाहता है चा सुबोधच केला होता,...अर्र!! पण तोच डायरेक्टर आहे ना? मग "स्वतःच स्वतःचा सुबोध करणे" ही नविन म्हण लागु करा आता
मग शेवटी गाण्यात परत सगळ्या
मग शेवटी गाण्यात परत सगळ्या पिक्चरची धावती क्षणचित्रे कशाला ती दाखवली ?>>> मराठि माणुस आणी त्यात बायको माहेरची जोग.... पळा!!!
>>पॉला मॅग्लेन (उर्फ भाडिपाची
>>पॉला मॅग्लेन (उर्फ भाडिपाची प्रोड्यूसरला) रोल द्या >> स्टीव्ह आला तो पुरे की! आणखी ती गोरी पण आली की शेवटी. सुहास जोशी आहेतच फारिनच्या पाटलीण. रांवाऊका करत असल्या म्हणून काय झालं! बास झाला सर्वधर्मसमभाव.
ती पॉला आली तर बरोबर तो बब्बू आणि त्याचे ते पारोसे रिसायकल्ड जोक्स येतील. नको रे बाबा! स्त्रीमुक्ती करतो पण जोक्स आवर वेळ यायची.
"स्वतःच स्वतःचा सुबोध करणे" >
"स्वतःच स्वतःचा सुबोध करणे" >>>
बाय द वे, हे कॅथीड्रल आणि बागेमधे कोणीही बिन्धास्त आडवे होउ शकते हे सोडले तर "लंडन" फारसे होते का पिक्चर मधे? म्हणजे सीन मधे मागे ट्राफलगार स्क्वेअर, तो शेरलॉक वाला रोड, बहुधा पिकॅडिली आणि एकदा बाथ - हे दिसते. पण त्याबद्दल कोणी काही फारसे बोलत नाही. तो भाग पुण्यात शूट केला असता तरी चालले असते. क्षिती जोग कोंढवा, पिंपळे सौदागर वगैरे ठिकाणीही इतकीच हरवली असती.
>>> मराठि माणुस आणी त्यात
>>> मराठि माणुस आणी त्यात बायको माहेरची जोग.... पळा!!!
जातीवरून विनोद होय! असू दे असू दे.
सिनेमातही आहे ना - "त्या स्टीव्हची मुंज करतील या बायका". कोणाला ओव्हररिप्रेझेन्टेशन कसं दिसलं नाही अजून त्यात?
स्त्रीमुक्ती करतो पण जोक्स
स्त्रीमुक्ती करतो पण जोक्स आवर वेळ यायची. >>>
अमित समस्त स्त्रीजातीला जा जीले अपनी जिंदगी करत हात सोडून देत आहे असे चित्र उभे राहिले डोळ्यासमोर.
>>> क्षिती जोग कोंढवा, पिंपळे
>>> क्षिती जोग कोंढवा, पिंपळे सौदागर वगैरे ठिकाणीही इतकीच हरवली असती.
स्त्रिमुक्ती करतो>>>>> करतो
स्त्रिमुक्ती करतो>>>>> करतो म्हणजे काय करतो?
मी तिक्डे टिपापात पोस्टी टायपून र्हायलो अन तुम सब इदर लगे हुए हो. चला व्हा घरी सगळे.....
(सगळे बिली बाउंडिंग हाकलायला मावशी येते तसं..)
"त्या स्टीव्हची मुंज करतील या
"त्या स्टीव्हची मुंज करतील या बायका". कोणाला ओव्हररिप्रेझेन्टेशन कसं दिसलं नाही अजून त्यात? >>>
मला मुंज करतील हा काय विनोद होता तेच आधी समजले नाही.
बाय द वे, स्वाती ती क्षिती जोग एकदा "टोकन" बघते बहुधा फुलांचा वास घेउन. हॉर्टिकल्चर, चेक.
निर्मिती सावंतने सुरूवातीलाच "असं फिरायला नव्हतं जायचं, तसं जायचं होतं" म्हणून फाउल केले होते. मला वाटले हीच भयाण लेव्हल आहे की काय विनोदाची पुढे. पण तिचे सीन्स आणि संवाद मस्त आहेत.
रांवाऊका करत असल्या म्हणून
रांवाऊका करत असल्या म्हणून काय झालं! बास झाला सर्वधर्मसमभाव.
ती पॉला आली तर बरोबर तो बब्बू आणि त्याचे ते पारोसे रिसायकल्ड जोक्स येतील. >>> अगदी , तो स्वतःही पारोसाच दिसतो.
क्षिती जोग कोंढवा, पिंपळे सौदागर वगैरे ठिकाणीही इतकीच हरवली असती.>>>> मी तुळशीबागेत अशीच हरवते , मगं दोन बटाटेवडे खाल्लेकी रस्ता आपोआपच सापडतो.
>>> ती क्षिती जोग एकदा "टोकन"
>>> ती क्षिती जोग एकदा "टोकन" बघते बहुधा फुलांचा वास घेउन
ते हॉर्टीकल्चर नव्हतं पण - कट फ्लॉवर्सचा वास, तोही घाबरत/चोरून घेते इतकं(च) डायरेक्शन होतं!
Pages