कोंकण : एक सहज साध्य नंदनवन

Submitted by पशुपत on 24 January, 2020 - 05:39

मी प्रथम कोकणात , गुहागरला गेलो मित्रांसमवेत , मित्राच्याच घरी... १९८५ मधे.
अगदी आपण कोकणतलं घर म्हणून जे सर्व ऐकलेलं असतं , ते सारं आहे त्या घरात. खालच्या पाटातलं हे १०० वर्षे वयाचं कौलरू घर . पडवी , सोपा , झोपाळा , माजघर , देवघर इतर खोल्या...मागे परसात विहीर , नारळ , सुपारी ची शेकडो झाडं... आणि त्या मागे थेट पुळण आणि अथांग पसरलेला , डोळ्याला फक्त आणि फक्त निववणारा सागर... सतत गाज देऊन आधाराची भक्कम जाणीव करून देणारं त्याचं अस्तित्व !
आधीच साध्या साध्या गोष्टींनी भारावून जाण्याच ते तरल वय.. त्यातून हे असे अनपेक्षितपणे समोर ठाकलेले नंदनवन..निसर्गच्या आणि जीवनाच्या विविध रंगांचे भव्य विश्व.. जीवनात घेवून आलेले कोकण.
सकाळी , संध्याकाळी , रात्री .. हवे तेव्हा त्या निर्मनुष्य सागर-किनार्यावर जाऊन बसणे , गाणे , डुंबणे ..बागडणे..
रात्री शेकोटी करून गप्पांच्या आणि गाण्यांच्या मैफिली जमवणे. एखाद्या दिवशी किनार्याने चालत चालत मैलोनमैल भरकटणे हे सारे मनसोक्त , तुडुंब करून घेतले.
समुद्रावर वाळूत बसून मावळणार्या सूर्याला तासन तास पहात रहाणे हे व्यसन मला तेव्हा प्रथम जडले..

आणि त्या नंतर पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या रुतूंमधे , वेगवेगळ्या आप्तांबरोबर कोकणाच्या विविध भागांमधे जाणे होत राहिले. आणि दर वेळेस तितकाच ताजा , मनसोक्त आनंद कोकण देत गेला...

आता तर आनंदाची साधी सोपी व्याख्या म्हणजे 'कोकणची एक ट्रीप' अशीच झाली आहे.

Group content visibility: 
Use group defaults

सुंदर वर्णन केलय.
खाद्यसंस्कृतीही घ्यायला हवी होती लेखात.

माझ्या कोकणच्या आठवणी या छोट्या छोट्या कवडशां सारख्या आहेत.
त्या एखाद्या छानशा लेखात सांधण्याचे कसब माझ्याकडे नाही. पण प्रयत्न करायला हवा.

सातपाटी ते दक्षिणेला रेडीपर्यंतचा 750 किलोमीटरचा समुद्रकिनारा हे महाराष्ट्राला मिळालेलं एक वरदानच आहे ! त्यातच, सिंधुदुर्ग -रत्नागिरीत नारळी- पोफळीच्या बागा, आंबे, काजू, फणस यानी सजवलेले डोंगर व नदी-खाडया यांनी अधिकच भर घातली आहे. गुहागरप्रमाणेच कोकणात इतरत्रही निसर्गाच्या कोंदणात चपखलपणे वसलेलीं स्वछ, सुबक देवळंही विखुरलेली असतातच.
संपत्तिचं वांटप करतांना निसर्ग तरी आणखी किती भेदभाव करील !!

गुहागर माझं माहेर. आता खूप सुधारणा झाल्या आहेत. बाकी भाऊकाका म्हणालेत त्याप्रमाणे समुद्रकिनारा हे महाराष्ट्राला मिळालेलं एक वरदानच आहे !

*मात्र वाहनसोय पाहता कर्नाटक किनारा पर्यटन अधिक चांगले आहे.* तें निसर्गाच्या अखत्यारीत येत नाहीं ना ! Wink
*गुहागर माझं माहेर. * नशीबवान अहात !

अमचे कोकणात कुणी नातेवाईक नव्हते. पण गुहागर आम्ही वेगळ्या कोनातून अनुभवले. जणू आम्हीच लहान झालो.
----––--

छान लिहिलंय. गुहागर, वरचा पाट, खालचा पाट, त्यांना जोडणारा तो टुमदार रस्ता, व्याडेश्वर, दुर्गादेवी, समांतर असणारा किनारा, सारंच न्यारं आहे खरंच. गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावरील स्वच्छता आणि शांतता भुरळ घालते नेहमी.

एक दु:ख - कोकणात शहाळी खायला स्वस्तात मिळत नाहीत.
भूवनेश्वर/पुरी येथे १०/१५ /२० रुपयांना जागोजागी शहाळी मिळतात ते कसं?

कर्नाटक किनारा पर्यटन अधिक चांगले आहे.* तें निसर्गाच्या अखत्यारीत येत नाहीं ना ! Wink

का म्हणे? Sad
कारवार ते मंगळूर १६० किमिटरांत आहेत ना किनारे, लाल चीऱ्यांची कौलारु घरं, वेलची केळी, काजू, मिरी, सुपारी, विड्याची पानं, फणस,कोकम,अननस,,आंबे
Wink

एक दु:ख - कोकणात शहाळी खायला स्वस्तात मिळत नाहीत.

कोकणात शहाळी उतरवायला माणसं मिळत नाहीत. स्थानिक माणसं काम करत नाहीत. राखणदार म्हणून कोकणात सर्वत्र आता नेपाळीच दिसतात. झाडावर चढायला मल्याळी माणसं येतात ती अव्वाच्या सव्वा भाव घेतात.

त्यातून कोकणात मुंबईपुण्याचे लोक पर्यटनासाठी येतात त्यामुळे कोकणात आता एखादी गोष्ट स्वस्त मिळेल हि अपेक्षा सोडून द्या.

आमच्या गावात ( श्री क्षेत्र परशुराम) येथे भाजी पोळी भात आमटी पापड लोणचं आणि साबुदाण्याची खीर इ थाळी १२५ रुपयात मिळते तर मुंबईत ७५ रुपयाच्या थाळीत यापेक्षा जास्त पदार्थ मिळतात.

*का म्हणे? * अहो, रस्ते व वाहनसोय निसर्गाच्या अखत्यारीत येत नाहीत, असं म्हटलंय मीं ! Wink

गुहागरचा समुद्रा हा अगदी खास आहे. सुंदर, शांत. खास करून अंजनवेल. इतकं सुंदर शांत गाव आहे.
जमलं तर अंजनवेलला भेट द्यावीच.