अमानवीय...? - १

Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34

अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

http://www.maayboli.com/node/12295

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भुत्याभाऊ भयंकर अनुभव.
पण इतके होऊनही तुमचे त्या घरात राहणे टळले नाही. हे भोग असतात बहुधा ते भोगावेच लागतात मग चांगले असोत वा वाईट. नाही का?

मला माहित नव्हते कि २०१५ आली आहे हि गोष्ट ... माझ्या वाचनात आत्ता आली म्हणून टाकली

@ दक्षिणा - हा माझा अनुभव नाहीये तर अविनाश पाटसकर यांचा आहे

ही घटना वाट्सॅप्प्प वरुन
=रस्ता व चकवा=

तीन वर्षांपूर्वीची सत्य घटना आहे. अशीच जून-जुलै मधली. मी, केदार, प्रसाद आणि सुशांत पुण्याहून विदर्भातल्या माहूरला गेलो होतो. तेव्हा आलेला हा भयाण अनुभव.
.
आम्ही चौघं इनोव्हा घेऊन संध्याकाळच्या सुमारास कारंजात पोहचलो. कारंजा म्हणजे दत्तसंप्रदायातील महत्वाचं स्थान. तिथे तासभर थांबायचं आणि पुढे १५० किमीवर असलेल्या माहूरला निघायचं, असं ठरलं होतं. पण पावसामूळे आणि गाडीने नाटकं केल्याने कारंजात पोहचायला रात्रीचे ८ः३० वाजले. तिथे दर्शन आणि जेवण वगैरे करत १०:०० झाले... पाऊस सुरूच होता... गाडीचा बॅटरी प्रॉब्लेम... त्यामुळे पुढे जावं की नाही, हा प्रश्न होता. हो हो नाही नाही करत १०ः३० वाजता आम्ही पुढे जायचं ठरवलं... ड्रायव्हिंगचं तसं टेंशन नव्हतं... पण तो भाग आम्हाला नवा होता, शिवाय पाऊस... ! सुट्टीचं नियोजन असल्याने वेळ वाया न घालवता आम्हाला पूर्ण ट्रिप करायची होती... म्हणून हळू हळू पोहचून जाऊ म्हणत आम्ही निघालोच... त्या आधी मंदीराजवळ गाडी पार्क केली तिथे एका दुकानाच्या आडोशाला उभ्या तीन गुरुजींनी आम्हाला शेगांवला जाण्यासाठी कारंजा बस स्थानकापर्यंत लिफ्ट मागितली. त्यांनाही बरोबर घेतलं आणि बसस्थानकात सोडलं...
तिथून थोडं पुढे आल्यावरच प्रसादला सिटवर एक बॅग दिसली. त्या गुरुजींची बॅग राहील्याने आम्ही ती देण्यासाठी परत बस स्टँडवर आलो, पण त्यांना बहूतेक गाडी मिळाली होती. त्यामुळे त्यात नंबर वगैरे असेल तर फोन करुन कळवू म्हणत ती बॅग केदारने त्याच्या सॅकमध्ये ठेवली.... निघालो. आता आम्हा चौघांचा प्रवास माहूरच्या दिशेने सुरु झाला.
वेळ : रात्री ११, पाऊस आणि काळोख...
.
कारंजा ते माहूर हा ११० किमीचा रस्ता तसा आडमार्ग... शांतच ! कारंजा सोडलं की १० किमीपासूनच जंगल सुरु होतं. क्वचितच एखादी गाडी दिसते. चौकातली छोटी गावं सोडली तर अंधार आणि भयाण शांतताच सोबत असते. आम्ही निघालो तसं मुसळधार पाऊस पडतच होता. थंड वारा, थकवा यामुळे बाकी सगळे ढार झोपले. मी ड्रायव्हिंग करत होतो. पाऊस, काळोख, अनोळखी वाटा आणि भयाण शांतता, त्यात एकही दुसरी गाडी सोबत नाही... परत अश्यात गाडी बंद पडली तर कल्याण ! थोडी भिती वाटायला लागली... उडी घेतली होती, त्यामुळे या भितीला अर्थ नव्हता... गाण्यांचा व्हॉल्यूम फुल केला, पावसातला शक्य तो टॉप स्पीड गाठला... पण कारंजा ते मानोरा असा ४० किमी प्रवास झाल्यावर मला झोप यायला लागली. म्हणून मानोरात थांबलो... चहा घेतला.
वेळ : रात्री १२
.
तासभर आम्ही सरळ रस्त्यावर चालत होतो... किमीचे दगड वगैरे होते. ५०- ५५ कि मी गेल्यावर एके ठिकाणी दोन रस्ते दिसले. त्याठिकाणी एक सेकंड थांबलो...
कुठे जायचं ?
तिथे दर्शक फलक नव्हता...
मला कन्फ्यूज झालं.
एक रस्ता त्या रस्त्याला सरळ होता. दुसरा जरा तिरपा.
.
सरळ रस्ता पकडून गेलो...
पण काही अंतर गेल्यावर पुढे माहूरचा उल्लेख दिसेना... ना कुठलं गांव... इतर गाड्यांचा भास पण नाही... फक्त भयाण काळोख, आणि पाऊस... आणि समोरचा रस्ता... आम्ही रस्ता चुकलो होतो... फिरुन मागे यायचं शक्य होत नव्हतं... (डोक्यात येत नव्हतं)
रात्रीचे दिड वाजले होते... त्या भागात मोबाईललाही रेंज नव्हती... पूर्ण रस्त्यावर फक्त आमची गाडी... आणि फूल व्हॅल्यूममध्ये गाणे... एव्हाना सगळे जागे झाले होते... चौघंच असल्याने वैयक्तीक जरी टरकलेली असली तरीही कुणीच दाखवत नव्हतं...
"सुश्या - त्या दोन मध्ये चुकलोय रस्ता... आता सरळ चालू देऊ... फाटा सापडेल"
त्या भयाण वातावरणाचा परीणाम भितीत बदलला होता...
अशात गाडी बंद पडायला नको... हीच मोठी प्रार्थना होती.
.
एखादं गाव येईपर्यंत आहे तोच रस्ता पकडून चालायचं आम्ही ठरवलं. अर्धा पाऊण तास तसाच गेला... पाऊस पडतच होता. त्यामुळे खिडक्या बंद होत्या...
रस्ता संपत नव्हता. अर्धा-पाऊण तास तसंच चालत होतो. गाडी चालवून जाम लागली होती.
पाऊस, थंडी, थकवा आणि भितीचा एकत्रित परीणाम म्हणून निसर्गाची हाक आली... त्यावेळी मला किडनी स्टोन झालेला होता... त्यामुळे फाटा गेला खड्डयात आधी अॅटलिस्ट आडोसा शोधून मोकळं होवू या शोधात असतांनाच...
.
त्या सुमसाम रोडवर डाव्या हाताला दूरवर एक शेत दिसलं. त्या शेतातच एक फार्म हाऊस होतं... "फायनली..!"...
इथे मोकळं होवू आणि माहूरचा रस्ता विचारु. आता रस्ता सापडेल आणि पोहचू या भरात मी त्या फार्म हाऊसच्या बाहेर गाडी थांबवली...
गाडीतून छत्र्या काढल्या आणि चौघं उतरलो.
केदारने सवयीनं त्याची सॅकही घेतली...
मी आणि सुश्यानं आधी एका बाजूला जाऊन शू केली...
तिथेच पावसात पाय धुतले. कानाला हात लावला आणि घराकडे आलो.
.
जुनाट पद्धतीचं बांधकाम असलेलं ते मोठ्ठं घर होतं...
शेताच्या एंट्री वर एक लिंबाचं मोठ्ठं झाड,
घराबाहेर एक पिवळा बल्ब लावलेला त्याच्या प्रकाशात बाह्यभाग किमान प्रकाशमान होता.
एक छोटा पोर्च होता.
एका बाजूला लाकडी बैलगाडी बांधलेली.... तिच्यापुढे चारा वगैरे पडला होता..
एक कुत्र त्या गाडीखालच्या कोरड्या जागेत निर्विकारपणे बसलेलं...
पाऊस, काळोख
एकुणच भयाण वातावरण...
अचानक सुश्याचं लक्ष कोपऱ्यात गेलं, तिथे एक माणूस इतक्या मुसळधार पावसातही डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण झाकलेल्या अवस्थेत शांत झोपलेला होता... त्याचे ते झाकलेले कपडेही पूर्ण कोरडे...
आम्ही चौघं चक्रावलो...
एकुण भयाण वातावरणात ते भितीदायक होतं...
.
रस्ता विचारणं महत्वाचं होतं, आणि कदाचित मदत मिळेल या अपेक्षेने
तश्याच चक्रावलेल्या अवस्थेत आम्ही चौघं एकमेकांचा हात पकडून त्या पोर्चजवळ आलो...
दरवाजा उघडाच होता, पण आतमधलं दृष्य विचित्र होतं..
आतमध्ये सात ते आठ माणसं तश्याच अवस्थेत डोकं ते पाय पांघरून शांत झोपले होते...
.
घर पूर्ण उघडं होतं... मी आणि सुश्यानं दरवाजा वाजवून ''भाऊ" "दादा" वगैरे हाका मारल्या... पण काहीच फरक पडला नाही.
मध्ये जावूयात कां ?
.
एखादं प्रेत असावं असं सगळे पडले होते..
त्या भयाण वातावरणात ती विचित्र परिस्थिती अनामिक भिती घालत होती.
पावसात असूनही न भिजलेला तो बाहेरचा माणूस...
पुतळ्यासारखा स्तब्ध कुत्रा...
सगळं समजण्यापल्याड होतं...
.
आम्ही मध्ये पाय ठेवणार इतक्यात
इतक्यात एक गडगडाट झाला... आणि वीज चमकली..
केदारला अचानक काय झालं कळलं नाही...
तो ओरडलाच..
"तेजा, सुश्या, प्रसाद.. थांब...."
आमचा पाय ठिकाणीच थांबला...
निघू इथून.. चल... गाडी काढ..."
आणि घाईत ओरडतच ओढतच त्याने आम्हाला गाडीत बसवलं... चल...
आधीच भेदरलेलो आम्ही केदारच्या वागण्याने चक्रावलोच..."
याला काय झालं अचानक ?
एकुण प्रकार काय ?
नाटकं करणारी गाडी सहज कशी सुरु झाली ?
हे विचारेपर्यंत आम्ही त्या रस्त्याला लागलो होतो...
सुश्या गाडी चालवत होता.
...:
.
केदारने गाडीत बसल्या दुसऱ्या मिनिटाला झोप ताणली...
कुणीच काही बोलत नव्हतं..
सगळं कळण्यापलिकडे होतं...
केदारचं वागणंही विचित्र होतं... मी, सुश्या आणि प्रसाद भलत्याच तंद्रीत होतो...
रात्रीचे ३ वाजले होते. पावसाचा जोर कणभरही कमी झाला नव्हता...
फूल व्हॉल्यूम म्यूझिक फक्त होतं...
तोच सुन्न रस्ता... काळोख...
.
यात अजून एक गोष्ट होत होती...
ती म्हणजे आम्हाला गोल गोल फिरतोय असंच वाटत होतं...
थकवा असल्याने तंद्रीत असल्याचं वाटून आम्ही त्या गोष्टी एकमेकांशी बोलत नव्हतो...
पण रस्ता कापणं महत्वाचं होतं. त्यामूळे कुठलाच एक्स्ट्रा विचार न करता आम्ही चालत होतो. ते गुढ फार्महाऊस, केदारचं वागणं पण डोक्यात होतं...
.
दोन तास आम्ही तसेच सरळ सरळ जात होतो...
किती अंतर कापलं ?
कुठे जातोय ?
काय सुरुय कळत नव्हतं.
एव्हाना पहाट झाली...
पाऊस जवळपास थांबला होता...
५ वाजेच्या सुमारास आम्हाला एक चौक दिसला... "फायनली !"
.
आम्ही तिघं अक्षरशः किंचाळलोच !
(केदार झोपेतच होता)
सुटलो बाबा एकदाचे !
त्या चौकात एकीकडे माहूर, एकीकडे दारव्हा, तिसरा रस्ता मानोराकडे जातो असा फलक होता...
"सापडला रस्ता....!"
माहूरकडच्या रस्त्याकडे आम्ही वळलो... आता जरा नॉर्मल वाटत होतं. गाड्या वगैरे ये जा करत होत्या... माहूरचे माईलस्टोन दिसत होते..
हलकं वाटत होतं...
काल रात्रभर डोकं जड झालं होतं...
रस्त्यावरच्या एका चहाच्या टपरीवर आम्ही थांबलो...
गाडी लावली आणि उतरलो...
खूप रिलॅक्स वाटत होतं... केदारला उठवलं...
चहा घेत घेत आमच्या त्या घराविषयी आणि रस्त्याविषयी गप्पा सुरु होत्या...
माझी आणि सुशांतची ड्राईव्हिंगमूळे वाट लागली होती...
केदारचं डोकं दुखत होतं..
.
"पण, तुला काय झालं होतं रे अचानक केदार ? का ओरडलास तिथे? काय विचित्र वागत होतास ?"
केदार - "तेजा, आईशप्पथ ! कळतंच नव्हतं रे... अचानक... मी काय बोलत होतो... काय करतोय... मी करतच नव्हतो... आपोआप होत होतं सगळं..."
केदार खोटं बोलत नसावा... कारण त्याचं वागणं, आमचं ऐकणं चमत्कारीक होतं...
आम्ही जरा चक्रावलो होतो...
तो न संपणारा रस्ता, ते घर, ती माणसं... याच गप्पा सुरु होत्या...
इतक्यात तिथला चहावाला आश्चर्यचकीत चेहऱ्यानं आमच्या गप्पांत पडला..."
" तुमी शेतातल्या रस्त्यानं आल्यात ? तरी वाचलं ?"
..
"क्याय ? काय बोलतोय ?"
"भाऊ, ती माणसं वाचत नसत्यात... भुलभूलैया हाय तो रस्ता... औसच्या राती माणसं गिळत्यात... काल औस आसूनबी वाचल्यात ? पोरांनो.. नशीबवान हायात तुम्ही..."
चहावाल्यानं असं सांगितल्यावर आम्ही पार गोंधळलो... आपलं रस्ता चुकणं इतकं भयंकर कसं झालं ?
वाचलं ? काय ?
"एक मिनिट... नीट सांग भाऊ... काय आहे ते ?"...
- "डेंजर होतं भाऊ"... देवाची कृपा समजा... मारुतीला नारळ फोडा.. गुरूंचं दर्शन करा"
चहावाल्या माणसाला बघून खरं तर मी अजून गोंधळलो होतो... त्याचा चेहरा कुठेतरी बघितलेला वाटत होता...
पण चहापुढे ते महत्वाचं नव्हतं...
.
झाला प्रकार भयंकर वाटत होता...
त्यात चहावाल्याचं बोलणं आमच्या डोक्यावरुन जात होतं.
माहूरला पोहचायची घाई असल्यानं आम्ही या प्रकरणाचा छडा लावणं पुढचं पुढे बघून म्हणून तिथून निघालो...
तासाभरात आम्ही माहूरला सुखरूप पोहचलो.
तिथे दोन दिवसांच्या मजेत झाला प्रवास विसरलो...
रस्ता चुकल्याने १००-१५० किमीचा आम्हाला मोठा फेरा पडला, पाऊस आणि आडमार्ग यामुळे भयाण वाटलं इतकंच डोक्यात होतं...
मग चहावाला काय बोलत होता ?
त्याला आधी कुठे पाहिलं ? या प्रश्नाचं मला उत्तर मिळत नव्हतं... नेमकं आठवत नव्हतं !
.
माहूरहून निघायची वेळ आली.
आम्ही गाडीत बसलो...
मी नेहमी गाडी सुरू करतांना डिझेल, किमी वगैरे चेक करतो... त्या दिवशी पण केली.
कीती कि.मी रिकामं फिरलो याचा हिशोब करायला...
आणि एक मोठ्ठा धक्का बसला...
ज्यामुळे आम्ही सगळेच चक्रावलो...
.
कारंजा ते मानोरा ४० किमी... मानोरा ते जिथे आम्ही रस्ता चुकलो तो पॉईंट २० किमी, आणि तो चौक ते माहूर ४० किमी, इतकं जवळपास १००-११० किमीच पुढे सरकलं होतं... मग रात्री १२:३० ते सकाळी ५ः०० आम्ही अखंड ज्या रस्त्यावर फिरलो ते किमी कुठे गेले ?
त्या रस्त्यावर फिरल्याची नोंदही झाली नव्हती...
ना गाडीतलं डिझेल संपलं होतं...
- " सुश्या भलतीच गडबड दिसतेय..."
- "हो रे ! कळत नाही काय होतंय ते ?
- चहावाल्याला गाठू..."
- चहावाला काय बोलत होता...
- असंख्य प्रश्नांचं काहूर माजलं..
भिती पेक्षा गोंधळ झाला होता... आम्ही जरा चक्रातच प्रवास सुरु केला. यावेळी दिवसाच ! कारण संध्याकाळच्या आत धुळ्यात आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पुण्यात पोहचायचं होतं... पाऊसही नव्हता...
.
चहाच्या टपरीपर्यंत आलो...
तिथे कुणीच नव्हतं...
हा चहावाला कुठे गेला यार ?
प्रसादनं भैया.. भाऊ करुन आवाज दिला...
रस्त्याच्या दूसऱ्या बाजूनं एक माणूस आलो आलो म्हणत पळत आला...
बोला... काय देऊ ? चहा कॉफी ?
हा कोण चहावाला ?
"ते दुसरे भाऊ कुठेत ?"
तो - कोण दुसरे भाऊ ?
- तेच ! जे परवा होते...
तो - नै तर... परवा पण मीच होता इथं... माझंच हॉटेल हाय... तुम्ही कोणाला भेटलं ?
अजून एक धक्का
परवा भेटलेलं ते कोण ?
चेहरा पण कुठेतरी बघितलेला वाटत होता...
.
रस्ता चुकणं, निर्जन-अनोळखी रस्ता इथपर्यंत ठिक... तसं नॉर्मल होतं. ते घर सुद्धा... म्हणजे विचारांच्या एका चौकटीत बसू शकत होतं..
पण तो न भिजलेला माणूस, प्रेतवत झोपलेली माणसं... केदारचं विचित्र वागणं... तो किलोमीटरचा गोंधळ आणि त्या चहावाल्याने सांगितलं ते सगळं काय होतं ?
तो माणूस गेला कुठे ?
इथे अजून जास्त गोंधळ होत होता...
.
जास्त वाढवण्यापेक्षा, विचार करण्यापेक्षा हे प्रकरण इथेच विसरू, डोक्याला ताण देण्यानं फायदा होणार नाही... प्रॅक्टीकल विचारांना मनाची साथ नव्हती..
काहीतरी भयंकर नक्की आहे... चौघंही शांत होतो... भिती नव्हती, पण दडपण जाणवत होतं...
.
आम्ही चौकात पोहचलो... चौकातलं दृष्य अजून चक्रावणारं होतं... आम्हाला चक्कर यायचं बाकी होतं... परवा सकाळी ज्या चौकात आम्ही आलो, तिथे एक रस्ता व्हाया मानोरा कारंजाला जातो, एक व्हाया दारव्हा कारंजाला जातो तिसरा रस्ता माहूरकडे जातो... मग चौथा रस्ता ? आम्ही ज्या रस्त्याने या चौकात आलो तो ? तो रस्ता आम्हाला दिसतंच नव्हता...
त्याठिकाणी चौथा रस्ताच नव्हता...
तो रस्ताच गायब झाला होता.
काय प्रकार आहे यार हा ?
याच चौकात आलो होतो ना ? आम्ही सुन्न झालो होतो.
"हे तीनच रस्ते हाय भाऊ..."
एका वडापवाल्यानं सांगितलं !...
.
डोकं जड झालं होतं. असला प्रकार मन मानत नव्हतं.
कारंजा व्हाया दारव्हा ११० किमी, व्हाया मानोरा १५० किमी...
"सुश्या... आपण बघू काय प्रकार आहे ते ?
दिवस आहे, कोरडा आहे... ४० किमी जास्त तर चालेल..."
.
व्हाया मानोरा हा रस्ता पकडला... सरळ. आणि अगदी नॉर्मल... गाड्या वगैरे होत्या. तो रस्ता गायब असणं ही सीमा होती... गोंधळलेलो होतो...
जिथे आम्ही रस्ता चुकलो होतो तो पॉईंट आता आमच्या नजरा शोधत होत्या... ५०-६० च्या स्पीडनं हळू गाडी चालवत होतो...
मी आणि सुश्या एकही टप्पा सोडत नव्हतो.
आम्ही मानोरात येवून पोहचलो... जिथे मी चहा घेतला त्याच टपरीवर...
चौघं आता सून्न होतो... शांत होतो...
त्या रस्त्याची एंट्री आणि एक्झीट गायब झाले होते...
मग तो न संपणारा रस्ता, ते घर.. हा काय प्रकार होता ?
आमचा भ्रम की अजून काही ?
तो चहावाला.... तो कोण होता ?...
झाला प्रकार अविश्वसनीय होता... पण काय होता ?
.
"भाऊ, ते पुढे २० कि मी वर दोन रस्ते मिळतात ते गांव कुठलं हो ? कुठला रस्ता आहे तो ?" - सुश्यानं चहा घेता घेता त्या चहावाल्याला विचारलं !
चहावाल्यानं डोळे फाडून आमच्याकडे पाहिलं !
"तुम्हाला तो रस्ता भेटला ? - औसेला ? गेलावता त्यावर ?"
- हो... खूप लांबचा फेरा होता...
- "आगागा... पोरांहो लांबचा नव्हं... मरनाचा फेरा व्हता... त्यावर जो जातो तो परत येत नाय... रस्ता गिळतो त्याला... परत कसं आलंत तुम्ही ?
हे ऐकून आम्ही गोंधळलो... आता इथे बसून काय ते प्रकरण निपटायचंच असं ठरवलं... त्या वयस्कर चहावाल्याला आम्ही समोर बसवलं... ! त्याने जे सांगितलं ते धक्कादायक होतं, स्वतः अनुभवल्यामूळे ते खोटं ठरवायचा प्रश्नच नव्हता...
"हा भूलभूलैया हाय... चकवा... एकदा जो जातो तो तिथेच गडप होतो... अवसेला सापळ्यात अडकतो मानूस... घेरी येते... तुमाला दिसलं कायं ? भायर कसे आले ? त्या दिसी माझा लेओक व्हता इथं... त्यानं सांगायं राहिलं की आडवी वाट पकडा... औस हाय..."
तो माणूस त्याबाबतीत माहितगार दिसत होता...
मग आम्ही त्या माणसाला ते घर, माणसं, केदारचं विचित्र वागणं वगैरे सांगितलं...
"तुमची घेरी आलीवती, ते घर नाय काळाचं नरडं व्हतं.. आनी ते मानसं नाय म्हडी वती... तुमी तसेच पडले असतां..."
आमच्या पायाखालची जमीन सरकली... अंगावर शहारे आले...
"औसेच्या राती त्यो रस्ता उघडा होतो... ज्याची घेरी असंल तो त्या वाटंला जातो, आनी फसतो... ज्यानं ती रात काटली तो वाचला... त्यो घरात जो गेला तो मेला... तुमी लै नशीबवान बगा... देवाची किरपा मनून सुटल्यात... लै किस्से ऐकलंत त्या वाटेचं"
...
सगळं चित्र आमच्या समोर आलं...
विश्वास नव्हता, पण नाकारु शकत नव्हतो...
"आम्हीच फसलो कसं ?" यापेक्षा त्या माणसाचा
"तुमी वाचले कसं ?"
हा प्रश्न महत्वाचा होता...
ज्यापुढे कसे फसलो हे गौण होतं...
हादरलो मात्र होतो... आपल्याबरोबर हे कसं घडू शकतं ?
"वाचलो" ! यामुळे आम्ही मनोमन सुखावलो... त्या माणसानं सांगितलं ते खरं-खोटं देव जाणे, पण आम्ही काहीतरी विचित्र, अघटीत अनुभवलं होतं हे खरं होतं..
- तो उंबरठा ओलांडला असता तर ?
- त्या माणसाला हात लावून उठवलं असतं तर ?
"वाचलो"...
केदारने वेळीच रोखलं म्हणून !
.
यस ! केदार... तूच ! मी, सुश्या आणि प्रशांत केदारकडे थॅंकफुली बघू लागलो... केदार थोडा बावचळला...
केदार - "तेजा, आईशप्पथ ! कळतंच नव्हतं रे... अचानक... मी काय बोलत होतो... काय करतोय... मी करतच नव्हतो... आपोआप होत होतं सगळं..."
"भाऊ तुमी कारंजात मंदीरात पाठक भटजींना भेटा... समदं सांगतीत ते"
चहावाल्याने सांगितलं...
.
आम्ही कारंजात आलो...
पत्ता विचारून पाठक गुरुंजींकडे गेलो... ते मंदिरातच होते... तिथे जाऊन भेटलो...
माझ्या स्नेहबंध मासिकातून त्यांच्याशी ओळख निघाली. त्यांनी आम्हाला मंदिरापुढे एका रुममध्ये नेलं... शांततेत बोलू...
आम्ही त्यांना घडला प्रकार, चहावाल्याचं बोलणं सविस्तर सांगितलं...
- "तुमची घेरी आली होती हे खरंय... पण महाराजांच्या कृपेने वाचलात. दैवी शक्ती होती तुमच्यासोबत...
म्हणजे केदारच्या हातून कुठलीतरी चांगली शक्ती आमचं त्या वाईट स्थितीत रक्षण करत होती... मार्ग दाखवत होती (?)
पाठक गुरुजींनी एक हिंट फक्त दिली... आणि परत गेले...
दैवी शक्ती ? आमच्यासोबत ?
.
आम्ही आधीपासूनच्या एक एक पैलू वर विचार सुरु केला...
रस्ता चुकणं, निर्जन-अनोळखी रस्ता ... ते घर,
पण तो न भिजलेला माणूस, प्रेतवत झोपलेली माणसं... केदारचं विचित्र वागणं... तो किलोमीटरचा गोंधळ, दोन्ही ओळखीचे वाटणारे चहावाले...
यातली बरीच उत्तरं मिळाली. पण नवीन प्रश्न देऊन..
.
दैवी शक्ती कोणती ?
केदारचं विचित्र वागणं होतं ? पण केदारच का ?
याचं उत्तर शोधायला लागलो... कारण त्याशिवाय मूळ सापडणार नव्हतं
आम्ही चौघे मित्र सोबत होतो....
चौघंही उपनयीत...
शाकाहारी...
मी आणि सुश्यानं शू केली होती. केदार नं नाही... पण प्रसादपण तर तिथेच होता...
एक एक गोष्ट पडताळून पाहिली आणि तेव्हा सुश्याला अचानक ट्रेस झालं... "सॅक"... केदारच्या पाठीवरची सॅक... हा एकमेव फरक चौघांत होता...
"केदार सॅक दे..."
मी केदारची सॅक उघडली...
त्यात त्याच्या रोजच्या वस्तू शिवाय आणखी एक वस्तू होती...
एक महत्वाची कडी सुटली होती...
आम्हाला आमची सगळी उत्तरं तिथेच मिळाली...
.
माझे डोळे विस्फारले गेले...
सगळं चित्र माझ्यासमोर आलं... डोळे पाणावले...
.
"फ्रेंड्स.... आपण एक महत्वाची कडी विसरत होतो... ते दोन गुरुजी आठवतंय ? आपण त्या दिवशी त्यांना बसस्टँडवर सोडलं... ! त्यांची बॅग राहीली... केदारच्या सॅकमध्येच ती बॅग होती..."
- पण त्या बॅगचा, गुरुजींचा काय संबंधय ?
- "अरे संबंध आहेच... तो चौकातला गायब झालेला चहावाला आठवा..."
- "ओहss माय गॉड... यस यस तेजा... यस"
- "मी म्हणालो ना... ओळखीचा चेहरा आहे... तेच गुरुजी.... ! आता मानोरातले ते म्हातारे चहावाले आठवा... हे ते दुसरे गुरुजी ...!"
- "यस... म्हणून चेहरा ओळखीचा वाटत होता..."
आम्ही अनुभूतीच्या उंबरठ्यावर होतो...
मी ती बॅग उघडली...
त्यात "श्री गुरुचरीत्र" ग्रंथ होता. त्या भयाण वाटेवर आम्ही जे निर्णय घेतले,
सरळ चालत राहू
थांबायचं नाही
त्या घरात प्रवेश करायचा नाही...
गाडी सुरळीत चालणं हे सगळं त्या ग्रंथाचा प्रभाव होता...
त्या शक्तीने अमावस्या संपेपर्यंत आमचं रक्षण केलं...
.
केदारच्या सॅकमध्ये हा ग्रंथ होता, आणि ती सॅक त्याच्या पाठीवर...!
फक्त केदारच कां ? या प्रश्नाचं हे उत्तर होतं...
.
आता चौघांच्या डोळ्यात वेगळीच चमक आली...."
"देवाची कृपा समजा... मारुतीला नारळ फोडा.. गुरूंचं दर्शन करा"
"तुमी लै नशीबवान बगा... देवाची किरपा मनून सुटल्यात..."
त्या दोन्ही चहावाल्यांचे शब्द आठवले...
आम्ही सुखरुप बाहेर पडल्याचं सगळं चित्र समोर होतं...
ते कुणीतरी अवतारी असावेत...
त्यांचं गाडीत बसणं,
बॅग विसरणं हे सहज नव्हतं. आमच्यावर पुढे येणारं संकट ओळखून त्यांनी निर्माण केलेलं ते सुरक्षा कवच होतं...
आणि त्या संकटाच्या काळातही त्यांची आमच्यावर नजर होती...
आम्ही चौघं त्याच रुममध्ये पाणावल्या डोळयांनी शांत बसलो... चौघंही गुरुचरीत्राचं दरवर्षी पारायण करतो,
गुरूंची अश्याप्रकारे अनुभूती मिळेल हे स्वप्नातही वाटलं नव्हतं
आम्ही महाराजांच्या मठात साष्टांग नमस्कार केला...
.
तो भयाण गुढ रस्ता, चकवा, घेरी, ते घर, ती प्रेतं हे सगळं आजही स्वप्नवत वाटतं... ती रात्र तो प्रवास आमच्या आयुष्यातल्या भयाण रात्रींपैकी एक होती...
तेव्हा काय प्रसंग उभा होता, काय झालं असतं ?
गुरुचरीत्राचा जागृत ग्रंथ, महाराजांवर दृढ विश्वास कवच होवून आला...
तो ग्रंथ माझ्याकडे आहे. दरवर्षी त्याचं पारायण करतो...
.
काळ आला होता... वेळ आली नव्हती...!
ही घटना खरी आहे.
कथानक नाही.
एका पिशाच्चशक्तिने गाडीला अपघात करण्याचा प्रयत्न केला पण करू शकला नाही कारण त्या गाडीत श्रीगुरूचरित्राची पोथी ठेवली होती.

- ही माहिती परलोकविद्या श्री न. ख. क्षीरसागर (नाशिक)यांच्या पुस्तकात आहे.
फ़ेसबुक वरून साभार

>> =रस्ता व चकवा=

हो मी ही वाचला होता पूर्वी हा अनुभव. वरचा "माळावरचा खेळ" वाचून या कथेची आठवण झाली होती. सत्य असत्य काहीही असो पण खूपच थरारक आहे अनुभव.

पण कारणमीमांसा केलेली न पटण्यासारखी आहे.

मी जरा माहिती काढण्याचा प्रयत्न केला होता आणि जे कळले त्यावरून हा अनुभव खरंच आला होता त्याना अशी माहिती मिळाली ... गुरुचरित्र खरोखर एक दिव्या ग्रंथ आहे ...

काळ आला होता... वेळ आली नव्हती...!
ही घटना खरी आहे.
कथानक नाही.
एका पिशाच्चशक्तिने गाडीला अपघात करण्याचा प्रयत्न केला पण करू शकला नाही कारण त्या गाडीत श्रीगुरूचरित्राची पोथी ठेवली होती.

- ही माहिती परलोकविद्या श्री न. ख. क्षीरसागर (नाशिक)यांच्या पुस्तकात आहे.
फ़ेसबुक वरून साभार>>>>>>>>>>> हि कथा आधी माबो वरच वाचली होती

काही गोष्टी मानो या ना मानो सारख्या असतात. जेव्हा स्वताला काही अनुभव येतात त्याच वेळी आपण अशा गोष्टींवरती विश्वास ठेवू लागतो. त्या मुळे माहूरच्या ह्या घटनेवर माझा तरी विश्वास आहे. कारण चकवा लागण्याची थोडीफार घटना आमच्या बाबतीतपण माहूर मधेच घडली आहे.
'चकवा'
हा प्रकार आम्ही माहूरला गेलो असताना अनुभवला आहे. आत्ता आठवल तरी अंगावर काटा येतो. या गोष्टीला आता पंधरा वर्ष होऊन गेली, पण आम्ही कोणीच ती ट्रिप विसरू शकत नाही. माहूरचा विषय निघाला की ही घटना आठवते.
तर झाल अस, माझ्या मावशीची ही कुलदेवी. दरवर्षी ती देविच्या दर्शनाला जायची. या वेळी ती आम्हालापण बरोबर घेऊन गेली. मावशीचे मिस्टर तसे देव-देव करणारे. ईतके की अगदी रस्त्यात दिसणार्‍या प्रत्येक देवाला ते फुलवात, उदबत्ती लावून त्याची आरती म्हनून पुजा करता. प्रवासात सतत देवाची पुस्तक वाचत असतात. त्यांची एक बॅग पुस्तकांनीच भरलेली असते. ती कायम त्यांच्या खांद्याला असते. ( त्यांच्या या प्रकारा मुळे आम्हाला त्यांच्या बरोबर ट्रिपला जायला आवडायचे नाही. वडिलांसाठी आणि आम्ही लहान असल्याने जाण्यावाचून सुटका नसायची म्हणून आम्ही जायचो.)
तर आम्ही निघाल्या पासूनच एक एक देव करत माहूरला पोहोचलो. तिथे रात्रीचा मुक्काम होता. त्या साठी एका गुरूंच्या घरी राहण्याची आणि जेवणाची सोय केली होती. दूसर्‍या दिवशी देवीचे दर्शन घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघणार होतो.
ठरल्या प्रमाणे आम्ही गडावर पोहोचलो. देवीचे दर्शन छान झाले. आम्ही गाभार्‍यातून बाहेर पडून जरा बासायला एका कट्ट्याच्या जवळ गेलो. (आम्हाला निघायला अजून एक तास होता.) आणि तोच एक बाई जोरजोरात ओरडत आणि हातवारे करत आमच्या दिशेने येऊ लागली. तिच्या पाठोपाठ एक आडदांड असा माणूस पण आमच्याकडे येऊ लागला. तो एकदम मावशीच्या मिस्टरांपाशी जाऊन भांडायला लागला.
आम्हाला काहीच कळत न्हवते काय झाले ते. ती बाई आम्हा मुलींकडे बघून ओरडत शिव्या देत होती, तर तो माणुस काकांशी भांडत होता. त्यांना कस बस शांत केल्यावर कळाल की मंदिरात लाईनीत उभे असताना त्या बाईला आमच्या कुणाचा तरी धक्का लागला त्यावरून ते भांडत होते. खर तर मंदिरात धक्का बुक्की होतेच त्याच एवढ काय असे काका म्हणाले तर तो माणूस अजूनच संतापला. एकदम त्यांच्या अंगावर धावून आला. हे बघून माझ्या बाबांनी त्याला गच्च धरून ठेवले.
हे बघताच त्यांच्या बरोबरचे अजून दोन जण आमच्याशी भांडायला लागले. आम्हाला काय करावे ते कळेना. आजूबाजूला लोक असून पण कोणी मदतीला येत न्हवत. कस बस त्यांना समजावत थोड शांत केल. काकांनी लगेच ईथून निघण्याची खुण केली. तस आम्ही सगळे गड उतरायला लागलो. वाटेत भेटणार्‍या लोकांकडून कळाले की ती फॅमिली अशीच भांड्खोर आहे. ते लोक गावातलेच असून गावात त्यांची दादागिरी आहे. काही वेळातच ते लोक पुन्हा आमच्या मागे पळत येताना दिसले. तसे आम्ही सगळेच घाबरलो. काकांनी जोरात ओरडून सांगीतले की जितक जोरात पळता येईल तेवढ पळा. अम्ही पळत पळत गड उतरलो. आई आणि मावशीनी पळत गड उतरायच दिव्य कस पार पाडल हे अजूनही आम्हाला कळाल नाही. ड्रायव्हर नशीबाने समोरच होता. शेवटच्या पायरी वरूनच काकांनी त्याला आवाज देऊन गाडी काढायला सांगीतली. त्यालाही नेमक काय झाल ते कळेना. पण काका ज्या पद्धतीने त्याला सांगत होते त्यावरून काहीतरी घडलय हे त्याच्या लक्षात आले.
त्याने पण लगेच गाडी आणली. आम्ही गाडीत बसलो. पण गाडी सुरूच होईना. आम्ही अजूनच घाबरलो. ती फॅमिली आता पायर्‍या संपवून गाडीच्या दिशेने येत होती. काकांनी देवाचा धावा सुरू केला. गाडी स्टार्ट झाली. कुठेही न थांबता गाडी थेट करंजाच्या रस्ताला घ्यायला काकांनी ड्रायव्हरला सांगीतल. आमची गाडी पुढे आणि ती फॅमिली पळत गाडीच्या मागे अस चालू होत, पण गाडीच्या वेगापुढे त्यांचा वेग कमी पडला आणि आम्ही पुढे आलो. काही अंतर आल्यावर समोर चौक दिसला. चौकात छान सर्कल बांधल होत. कुठल्या रस्त्याला जायच ते कळत न्हवत. आजूबाजूला सांगणारपण कोणी न्हवत.
आम्ही थोडावेळ कोणी येते आहे का त्याची वाट बघितली. पण उपयोग झाला नाही.
तिथ आम्हाला जास्त वेळ थांबण धोक्याच वाटत होत. कारण ती फॅमिली मागे येतीये की काय अशी भिती वाटत होती. झाला प्रकार ड्रायव्हरला गाडित सांगितला, तस त्याने ही आपण पुढे निघू असे सांगीतले.
आम्ही त्या पैकी एक रस्ता घेतला. बराच वेळ होऊन देखील रस्त्यावर जाणारी- येणारि काहीच वहने न्हवती. थोड अंतर पूढ गेल्यावर एक गॅरेज दिसल. ड्रायव्हरने एकदा गाडी दाखवून घेऊ म्हणून सांगीतल. पुढच्या प्रवासात त्रास नको म्हणून काका तयार झाले.
आम्ही गाडीतून उतरलो. मनातील भिती अजूनही गेली न्हवती. तिथल्याच एका तुटक्या बाकड्यावर आम्ही बसलो. काकांना जो भेटेल त्याची चौकशी करायची सवय , त्या मुळे त्यांनी त्या गॅरेजवाल्या बरोबर गप्पा सुरू केल्या. हा सगळा प्रकार घडताना संध्याकाळचे चार वाजून गेले होते. गॅरेजवाल्याने गाडी नीट व्हायला दोन तास लागतील असे सांगीतले. कसे बसे आम्ही दोन तास काढले. काकांनी त्याला करंजाचा रस्ता विचारला. तस तो क्षणभर त्यांच्याकडे बघतच बसला. त्याने काकांना सांगीतले की आत्ता ईथून पुढे आम्ही त्या रस्त्याने न गेलेल बर. आज माहूरमधेच मुक्काम करून उद्या सकाळीच निघा. पण पुन्हा माहूरमधे जाण्याची आमची तयारी न्हवती. शेवटी आम्ही त्या रस्त्याने निघायचा निर्णय घेतला.
पण हे नाट्य ईतक्याच थांबल नाही. निघताना काही केल्या आमच्या गाडीची चावीच सापडेना. सगळेजण शोधाशोध करत होते. जवळ जवळ एक तास यात गेला. काहीच सुचेना. मग गॅरेजवाल्यानेच सुचवल की थोडावेळ शांतबसून आठवायचा प्रयत्न करा. ड्रायव्हर टेन्शनमधे येऊन तिथच गाडीच्याजवळ खाली बसला. त्याला काय वाटले म्हणून त्याने सहज गाडीच्या टायरवर हात फिरवला आणि चावी तिथ सापडली. त्यालाही कळेना की त्याने चावी तिथ कधी ठेवली. आमच्या जीवात जीव आला.
ड्रायव्हरला कधीन्हवे ती जोरात गाडी चालवायची परमिशन काकांनी दिली. गॅरेजवाल्याने सांगितल्या प्रमाणे आम्ही त्या रस्त्याच्या खाणा-खुणा शोधत जाऊ लागलो. रात्रीचे ८ वाजले असतील. एका ठिकाणी आम्हाला तीन रस्ते लागले. गॅरेजवाल्याने सांगीतलेली खुण कुठेच दिसेना. शेवटी एक रस्ता पकडून पुढे निघालो. रस्त्यावर लाईट न्हवते. त्यामुळे गाडीच्या मागे भयाण अंधार होता. रत्याच्या दुतर्फा झाडी होती. आमची एकच गाडी रस्त्यावर धावत होती.
जवळ जवळ दोन तास झाले तरी आम्ही एकाच रस्त्यावरून फिरतोय असे जाणवले. त्याच त्याच खुणा परत दिसत होत्या. कितीही पुढे गेलो तरी तो तीन रस्ते असलेला रस्ता आमच्या समोर येत होता.
शेवटी काकांनी थोडावेळ ईथेच थांबूया म्हणून सांगीतले. बाबा आणि काका दोघेही गाडीतून उतरले. थोड्यावेळातच अजून एका गाडीचा आवाज आला. तस दोघेही जरा रस्त्यावर पुढे होऊन हात दाखवू लागले. ती टू व्हिलर आमच्या गाडी जवळ येऊन थांबली. काकांनी त्त्यांना आमचा रस्ता विचारला तस, हे काय हा समोरचा एकच रस्ता आहे तिकड जायला अस त्याने सांगीतल. पुढ अजून काही विचारणार तोच गाडीचा गेअर बदलत रात्रीची शांतता तोडत तो गाडीवाला निघूनपण गेला. आम्ही सगळे सुन्न झालो होतो.
आम्हाला तीन रस्ते दिसत होते आणि त्याला एकच...... आम्ही त्या रस्त्याने पुढे गेलो. आत्तापर्यन्त कधीच रात्री दहाच्या पुढे काकांनी प्रवास केला न्हवता पण आज वेळच तशी आली होती. त्या ननतरच फारस काही आठवत नाही. कुठेतरी जेवायला थांबलो. काका त्याच्याशीपण गप्पा मारू लागले. जेव्हा त्याला कळाले की आम्ही त्या रस्त्यावरून आलोय तो पण आमच्याकडे बघून एवढच म्हणाला.... "वाचलात"

Avinash Pataskar ह्यांचा अनुभव खरंच विचित्र आहे. टीव्हीवर घोस्टहन्टर्स वगैरे कार्यक्रमात ह्याचा उल्लेख residual haunting असा केला जातो. म्हणजे घडून गेलेल्या घटनांचा प्लेबॅक.

>>ही घटना वाट्सॅप्प्प वरुन
हे तर भयानकच आहे. पण आधी ३ गुरुजी भेटले होते ना? नंतरचा उल्लेख २ गुरुजी भेटले असा आहे. निर्झरा ह्यांचा अनुभव पण भारी. आता ह्यापुढे कधीही अनोळखी रस्त्यावरून कोणाला रात्री गाडी चालवू देणार नाही बाबा.

माझा एक कझीन आहे त्याने सांगितलेली गोष्ट.
माझ्या गावी माझ्या घराशेजारी अंबा देवी च देऊळ आहे.
माझे कझीन्स रात्री पिक्चर बघून येत होते साडे अकरा ला वगैरे. 2000 सालापर्यंत अलिबाग ला लहान गावात पडद्यावर पिक्चर दाखवायचे.
तोच पाहून हे लोक येत होते. तर अंबादेवी च्या देवळाच्या पडवीत एक बाई येरझाऱ्या घालत होती.
ती गावातली किंवा ओळखीची नव्हती पण काष्टा नेसलेली थोडी वयस्कर होती.
माझ्या कझिन ने नवीन handycam घेतलेला. तो जिथे जाईल तिकडे तो हातात असायचा त्याच्या.
तेव्हाही होताच.
त्या बाईला पाहून यांना थोडं आश्चर्य वाटलं की इतक्या रात्री उशिरा ही बाई इकडे काय करतेय.
दुसऱ्या एक भावाने तिला विचारलं की, " काकी कोण तुम्ही इतक्या रात्री इकडे काय करताय? "
काही मदत हवी का?
माझ्या दुसऱ्या भावाने त्याचा कॅम ऑन केला होता. सहजच ... आणि तो दोघांचं रेकॉर्डिंग करत होता।.
त्या बाई ने उत्तर दिलं , " मी खूप लांबून आलेय. माझे कपडे आत कपाटात आहेत पण मला भीती वाटतेय. मी आत नाही जात बघ आत उजेड पण नाही. तू देतोस का मला कपडे आणून? "
भावाला माहीत होतं की आत कुठलंही कपाट नाहीय. ही चोर आहे कोणीतरी.
तो बोलला ,"हो हो चला देतो. तुम्ही आत चला मी बूट काढून येतो.
ती बाई देवळाचा दरवाजा उघडून आत गेली तस याने पटकन दरवाजा लावला. कडी लावली आणि पळत पळत घरी गेले. घर थोडं पुढे होतं. जाता जाता याने मागे वळून पाहिलं तर खिडकीतून ती बाई त्यांना बघत उभी होती. त्या देवळाच्या अगदी बाजूला 4 रस्ता आहे त्यावर एकच लाईट होती म्हणून त्यांना ती दिसू शकली. घरात येऊन भावाने सर्वाना सांगितलं काय झालं ते तसे सर्व तिला चोर समजून निघाले... 4-5 पुरुष निघाले. मग आवाज झाला सर्व निघाले म्हटल्यावर आजू बाजूचे ही बाहेर आले.... टॉर्च वगैरे , आजू बाजूच्या घरातले लाईट्स लावले....

देवळात कोणी नव्हतं... मग ती बाई कुठे गेली.. सर्वाना फसवलं किंवा रात्री च उठवलं म्हणून सर्व लोक वैतागले या तिघांवर...तसं माझ्या भावाने कॅमेरा ऑन केला म्हटलं याना दाखवू ती बाई होती इथे तर कॅमेरा मध्ये पण कोणी नव्हतं.
त्याला कळेना की रेकॉर्डिंग करताना ती दिसत होती पण आता का दिसत नाही...
झालं सर्वांनी यथेछ शिव्या खाल्ल्या....
पण आजही म्हणजे 17 वर्षानंतर तो हेच सांगतो की त्या दिवशी बाई होती तिथे...
पण देवळात अशी बाई गायब कशी झाली?? भूत तर देवाला घाबरतात म्हणजे अश्याच सगळीकडे असतात गोष्टी....
मग ती बाई रेकॉर्डिंग मध्ये का दिसत नाही.....
खरं खोटं कोणाला माहीत... आम्ही आपला किस्सा म्हणून मस्त ऐकतो आणि लोकांना पण ऐकवतो

ज्या लोकांचा विश्वास आहे ते लोक ती देवी च आहे असं म्हणतात. असेलही कारण माझ्या बाबांच्या काकांना अंबा देवी ने दर्शन दिलं होतं म्हणे....

एका मित्राच्या चुलत भावाचा अनुभव ...

भास आभास कि आणखी काही
तीन महिन्यापूर्वी पर्वतीच घर कुटुंबाला पुरत नव्हत म्हणुन सहकार नगर भागात एक फ्लॅट भाड्याने घेतला. थ्री बीएचके पुर्व पश्चिम फ्लॅट पश्चिमेला दरवाजा, दरवाजाला लागुन वायव्य कोपऱ्याला हॉल, नैऋत्येला किचन, पुढे मध्यभागी उत्तरेला दक्षिण मुखी बेडरुम आणि त्याच्या समोरच कॉमन टॉयलेट आणि बाथरुम, बेडरुम आणि बाथरुम च्या मध्ये एक बोळ जे थेट उरलेल्या दोन बेडरुम कडे जायचा रस्ता, पुणे आग्नेयेला एक बेडरुम ॲटाच टायलेट बाथरुमसह त्याला जोडुन बाल्कनी होती. त्या बाल्कनीतुन मागे पसरलेली कळकाची झाडे दिसायची आणि त्याच्या पलिकडे मोकळे मैदान होते जे त्या झाडान्मुळे फारसे दिसायचे नाही. इशान्येला एक मोठी बेडरुम त्याची हि खिडकी पुर्वेला म्हणजे मागे कळकाच्या वनाकडे उघडायची. दुसऱ्या मजल्यावर फक्त दोनच फ्लॅट होते. त्यात समोरचा फ्लॅट कायम स्वरुपी बंद होता. आणि वर टेरेस. आता इतका मोठा फ्लॅट तो ही फक्त १६०००/- रेंटने. मला भुरळ पडली त्या फ्लॅटची. घाईघाईने घरच्याना दाखवायला घेवुन गेलो. घरच्यानाही बरा वाटला. म्हणुन व्यवहाराची बोलणी चालु केली. जागा मालकाची पहिली अट ३ बेडरुमपैकी एक बेडरुम (कॉमन बाथरुम समोरील दक्षिणमुखी) आम्ही उघडून देणार नाही. त्याला आमच कुलुप राहणार. वास्तविक फ्लॅट दाखवताना त्यानी ती रुमहि दाखवली होती. तेव्हा त्यात एक आराम खुर्ची, एक जुना बेड, जुना टेबलखुर्ची, आणि माळ्यावर बऱ्याच जुन्या फाईल्स होत्या. त्यामुळे ती हि बेडरुम मिळायला हवी म्हणुन मी त्याना विनंती केली, तेव्हा " ती रुम बंदच राहणार तुम्हाला फ्लॅट घ्यायचा तर घ्या" असा पवित्रा जागा मालकाने घेतला. शेवटी माघार घेवुन माझी तयारी दाखवली आणि व्यवहार ठरला. व्यवहार ठरत असताना मी माझ्या बायकोला फ्लॅट बघायला घेवुन गेलो. तेव्हा ती तिसरी रुम कुलुपबंद होती. सगळा फ्लॅट बघितल्यावर आम्ही त्या रुमच्या दारात आलो. तिथे पहिली शंका बायकोने उपस्थित केली. 'अख्ख्या घरात कुठेच उंबरठा नव्हता पण ह्या रुम च्या दारात उंबरठा आहे. अस का?' आणि त्या उंबरठ्यावर वेगवेगळ्या प्रकारची चिन्हे काढली होती. ती का काढलीयेत'? मी हसण्यावारी तिचे प्रश्न उडवुन लावले पण नाही म्हंटलं तरी शंकेची पाल मनात कुठेतरी माझ्याही चुकचुकली. १ मार्चला करारनाम्याचे सगळे सोपस्कर पुर्ण झाले आणि आम्हाला ताबा मिळाला. थोडा फार सामान शिफ्ट केल्यावर माझा लहान भाऊ ३ मित्रांसोबत तिकडे झोपायला गेला. रात्री नाटकाची तालीम करता करता त्याना १ वाजला झोपताना लाईट बंद करुन बेडरुम मध्ये जाताना त्यानी सहज मोठ्या बेडरुम डोकावुन पाहिल. तेव्हा त्या बेडरुम मध्ये ठेवलेल्या खुर्चीवर कोणीतरी बसल्याचा भास त्याना झाला. चौघही प्रचंड घाबरले आणि छोट्या बेडरुमची लाईट चालु ठेवुनच झोपले. सकाळी उठुन जेव्हा त्या बेडरुममध्ये गेले तेव्हा त्या खुर्चीवर टॉवेल ठेवलेला होता. मी टॉवेल बघुन घाबरले म्हणुन त्यांची बरीच टर उडवली पण त्यांच्यातल्या एकाने निघता निघता मग विचारले " दादा आम्हाला माणुस आणि टॉवेल मधला फरक कळतो आणि एकाला भास होईल बाकी तिघांचे काय?" मग हा भास होता कि आभास... हळुहळु सगळ सामान तिकडे शिफ्ट केले. आणि आम्ही सगळेच तिकडे शिफ्ट झालो. २/३ दिवसांनीच माझी मुलगी आजारी पडली पण दात निघतायेत म्हणुन आम्ही दुर्लक्ष केल. हळु हळु सगळ रुळायला लागल. मी कामासाठी सकाळी १० वाजता बाहेर पडायचो आईवडील भाऊ माझ्या मागोमाग लगेच हॉटेलला जायला बाहेर पडायचे घरी फक्त बायको आणि मुलगी दोघीच असायच्या. इतके दिवसात एक गोष्ट प्रत्येकाला जाणवत होती, शेवटच्या मजल्यावरील फ्लॅट मागे मोकळ मैदान झाडे अस असतानाही फ्लॅटमध्ये अजिबात वारा यायचा नाही. फक्त किचन कडुन बेडरुम कडे जाणाऱ्या बंद बेडरुम समोरील बोळात अचानक जोरात वारा यायचा आणि तिथे वाळत घातलेले कपडे हि खाली पडायचे, दोन्ही बाथरुम मध्ये अनेक वेळा धुवुनही कसला तरी कुबट वास यायचा, आणि कोणीही न वापरता दोन्ही बाथरुम प्रचंड चिकट व्हायची. इतकी कि पाय ठेवला तरी घसरायचा, अशातच एक दिवस आमचे एक नातेवाईक घरी आले. अर्थात आम्ही घरी नव्हतोच बायको आणि मुलगी दोघीच होत्या. पण नेहमी बराच वेळ बसणारे आणि घरभर वावरणारी आमची हि लोकही अगदी १०च मिनिटात घराबाहेर पडली. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या सोबत संपुर्ण घरभर अजुन कोणीतरी त्यांच्या मागेमागे वावरत होते. मग पाहुण्यांना झालेला तो भास कि आभास.. हळुहळु बायको आणि मुलीच्या तब्येतीत अगदी काही दिवसात कमालीचा फरक पडायला सुरुवात झाली. दोघीही बारीक बारीक होत चालल्या होत्या. पण तरीही त्यामागे काही विषेश कारण असेल अस माझ्या ध्यानी मनी अजिबात नव्हत. अशातच एक दिवस माझे वडीलआईला म्हणाले "सोनु बाल्कनीत यायला नको म्हणते." ( सोनु माझ्या मुलीला प्रेमाने म्हणतात) बाल्कनीकडे बोट करुन जोरजोरात नको नको म्हणते". पण या गोष्टीवर विश्वास नव्हता त्यामुळे एक दिवस संध्याकाळी घरी असताना मी मुद्दाम मुलीला घेउन त्या बाल्कनीकडे गेलो. पण बाल्कनी जवळ जाताच तीने जोरात किंकाळी फोडली आणि हाताने नको नको खुणवत जोरजोरात रडायला लागली. मी तसाच उलट फिरलो आणि माझ्या बेडरुम च्या खिडकीजवळ बसलो. (ती खिडकी आणि बाल्कनी एकाच दिशेला होत्या.)पण मुलगी मला तिथेही बसु द्यायला तयार नाही. शेवटी मी परत हॉल मध्ये येवुन बसलो. त्या खिडकीत खरच काही होत का नुसता आभास.. वेळ संध्याकाळची घरात वडील, बायको आणि मुलगी बाहेरुन आल्यामुळे वडील अंघोळीला गेले. बायको आणि मुलगी बेडरुम च्या बाहेर उभ्या होत्या. इतक्यात वडीलांच्या बाथरुमचा दरवाजा वाजवल्याचा भास बायकोला झाला. तीने त्या दिशेला पाहिल तेव्हा खरच कोणीतरी दार वाजवत असल्याचा आवाज येत होता आणि वडील आतुन आवाज देत होते. " सोनु दार कशाला वाजवतीये." पण त्याच वेळेस मुलगी माझ्या बायकोच्या बाजुला उभी होती...↵↵दरम्यानच्या काळात माझ्या व्यवसायात अनेक अडचणी उत्पन्न व्हायला लागल्या. दोनच महिन्यात १२ लाखाचे कर्ज झाल डोक्यावर. हॉटेलच्या धंद्यातही ही झपाट्याने घट झाली ईतकी की खिशातले लाख दिड लाख रुपये महिन्याला जायला लागले. सगळेच एकदमच चिताग्रस्त वाटायला लागले. आईच्या पायाच्या दुखण्याने परत उभारी घेतली. लहान भाऊ समोरच्याला जाणवेल इतका उतरत गेला. वडीलही हातापायाच्या दुखण्याने ग्रस्त झाले. आणि माझा तर अवतारच बदलाला. कायम देणे दारांचे टेंशन इतके स्वत: चे काही बरे वाईट करुन घ्यावे अशा इच्छा व्हायला लागल्या. घरात वाद वाढायला लागले. असे का झाले कारण काय काही कळत नव्हते. पण शेवटी स्वामींची कृपा असते तसेच एक दिवस प्रत्येकाच्या मनात दाबलेले अनुभव बाहेर आले. आणि मग प्रत्येकजण कारण शोधायला लागला. प्रत्येकाच्या मनात सुरु झालेला विचारांचा प्रवास त्या बंद बेडरुम पाशी येवुन थांबु लागला. शेवटी लवकरात लवकर तो फ्लॅट सोडायचा अस आमच ठरल. त्याचाच पहिला भाग म्हणुन बायको मुलीला माहेरी पाठवायच ठरल. पण जायच्या दिवशी मुलगी घरातुन बाहेरच पडायला तयार नाही. जायच नाही म्हणुन तिने प्रचंड गोंधळ घातला. शेवटी बळ बळ तीला गाडीत बसवल. आम्ही थोड सामान पर्वतीला त्याच रात्री झोपायला आलो. दुसऱ्या दिवशी जागा मालकाला सांगायला गेलो कि घर सोडतोय तेव्हा त्याने तीन महिन्यातच का? असा उलटप्रश्न हि नाही केला. येत्या दोन तीन दिवसात आम्ही घराचा ताबा सोडतोय. पण आज हि काही प्रश्न अनुत्तरीत आहेतच. तिसरी बेडरुम बंद ठेवण्याचे नक्की कारण काय? फक्त बंद बेडरुमच्या दारालाच उंबरठा का होता? त्या उंबरठ्यावर वेगवेगळी चिन्ह का काढली होती.? नातेवाईकांच्या म्हणण्याप्रमाणे आमच्याशिवाय त्या घरात अन्य कोणाचा वावर होता का? मुलीला मागच्या बाल्कनीत भितीदायक असे नक्की काय दिसत होते? वडील अंघोळ करत असताना दरवाज्यावर थाप कोण मारत होत? बायकोला इतक कशाच टेंशन आल होत कि ती झपाट्याने एव्हडी बारीक व्हावी? दोन महिन्यात घरात शब्दा शब्दाने वाढणारे वाद? माझ्या आणि आईच्या मनात अनेक वेळा आलेले वाईट विचार? कडकडीत उन्हात घरात तो कुबटवास बाथरुम आलेला चिकट ओलसर पणा, बेडरुम मध्ये जाणवणारी निरव शांतता आणि सगळ्यात महत्वाच पहिल्याच दिवशी भावाला आणि त्याच्या मित्राना दिसलेली खुर्चीत बसलेली ती आकृती भास होती का आभास कि आणखी काही....

खूपच छान धागा आहे, पूर्ण २ धागे वाचायला ५ रात्री गेल्या(१२:००-३:००), आणि खरं - खोटं करायच्या फंदात न पडत फक्त एन्जॉय करायचा अप्रोच आवडला.
सांगण्यासाठी खूप गोष्टी आहेत पण टाईप करायचा वैताग येतो (ऑफिस मध्ये कोड , मोबाईल वर चॅट) कदाचित जिभेपेक्षा जास्त वाळवळायला लागली आहेत बोटं ..

असो..

हि गोष्ट पहिली सांगण्याचा तास काही खास उद्देश नाही ( कदाचित हि सर्वात लहान असेल , तेवढच कमी टाईप करावं लागेल ), तर जवळपास १९९८-९९ ला घडलेली हि गोष्ट आहे.
माझा चुलत भाऊ समीर जो आता गावी असतो तेंव्हा आमच्याकडे घाटकोपर ला राहायचा, माझं वय साधारण १८ वर्ष असेल तेंव्हा आणि तो माझ्यापेक्षा वर्षाने लहान म्हणजे १७ वर्षाचा.
दिवस कोणता होता ते आठवत नाही, अमावास्या - पौर्णिमा नक्की नव्हती, समीर ला रात्री लवकर सवय तो १० लाच ठार झोपायचा अगदी कुंभकर्ण झोप. तो नेहमीप्रमाणेच झोपलेला आणि आम्ही सर्व म्हणजे काका चुलत भाऊ सर्व बसलेलो (एकत्र कुटुंब पद्धती आमच्या घरी त्यावेळी), फक्त माझा एक चुलत भाऊ बाहेर होता. आमच्याकडे ठोक्याचे वॉल क्लॉक आहे आणि आमच्या दरवाज्याला लैच नव्हते(आजही नाही तस) आम्ही साखळी व काडी लावायचो , भाऊ बाहेर होता म्हणून दरवाजा फक्त बंद केलेला. अचानक खालील घटना जवळपास १ किंवा फार तर १० मिलिसेकंद च्या फरकाने घडल्या.

१) चुलत भाऊ दरवाजा ढकलून आत येणं
२) घड्याळात १२ चा ठोका पडणं
३) आणि समीर झोपेतुन रडत उठणं

एरव्ही प्रसंगात काही खास कनेक्शन वाटण्याच कारण नव्हतं पण सर्वांनाच काय ती अचानक आतून गट फीलिंग आली काहीतरी वेगळं असल्याची, आणि दरवाज्यात माझा चुलत भाऊ तसाच गोंधळलेल्या अवस्थेत उभा.... झालं समीर अगदी मोठं-मोठ्यानं रडायला लागला. माझे काका आणि त्याला विचारू लागले कि काय झालं, असा अचानक काय रडतोयस ? या वेळी त्याचे डोळे अर्धवट मिटलेल्या अवस्थेत होते, तसा तो आजून रडायला लागला...बोलू लागला कि माझा हात तुटलाय दुखतय, आम्हाला वाटलं झोपेत आहे त्याला अगदी हलवून जाग करायचा प्रयत्न केला पण तो जागाच होता तसा पाणी देखील मारला तोंडावर पण त्याचा रडणं काही कमी होत नव्हतं. आमच्या घरी स्वामींची(अक्कलकोट) भक्ती होते, फार पूर्वीपासून, त्यांचा अंगारा घरात होता तो माझ्या काकीने त्याला आणून लावला, अंगारा लावल्या लावल्या समीर नुसता रडायचं थांबला नाही तर तसाच झोपी पण गेला अगदी १-३ सेकंदांचा मामला(सर्व प्रकार जवळ जवळ १५ मिन चालू होता). तो झोपल्यावर माझ्या काकांनी कुलदेवतेसमोर गार्हाणे घातले आणि आम्ही सर्व झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी समीरला विचारलं असता अपेक्षेप्रमाणे त्याला काहीच आठवत नव्हतं.
पण झाल्या प्रकारचे विश्लेषण करू शकणारा एका प्रकार त्याच्या सोबत त्याच रात्री झालेला तो आम्हाला दुसऱ्याच दिवशी त्याच्या मित्राकडून समजला. त्यादिवशी जेवल्यानंतर तो त्याच्या २ मित्रांसोबत बाईक शिकायला घाटकोपर मध्ये रायफल रेंज आहे तिथे गेलेला तिथे मैदान आहे मोठं. पण रात्री अगदी निर्मनुष्य, त्याच्या मित्रांनी सांगितल्या नुसार त्यादिवशी त्यांनी त्याला त्या मैदानात एका ठिकाणी उभ केलेल आणि ते दोघे बाईक शिकत होते. जाताना तो व्यवस्थित होता पण येताना तो काहीच बोलत नव्हता. त्यांनाही थोड विचित्र वाटलं पण त्यांनी लक्ष नव्हतं दिलं खास आणि नंतर हा प्रकार घडला. आजही जेंव्हा कधी सर्व जण घरी एकत्र गप्पा मारायला जमतो आणि १२ चे ठोके पडतात तेंव्हा त्या प्रसंगाची आठवण जरूर येते.

बापरे फ्लॅट ची घटना किती भयंकर आहे Sad
ही घटना आत्ता वाचत होते ऑफिस मद्धे बसुन...आणि अचानक माझ्या समोरच्या काचेतुन मला दिसलं की बाहेरच्या बाजुने एक माणुन दोरीवरुन लटकत खाली गेला..मी प्रचंड घाबरले आणि मग शेवटी लक्षात आले की ऑफिस मद्धे रंगकाम चालु आहे आणि तो रंगारी होता.. ..हुशश झालं एकदम....

भुत्याभाऊ - तुम्ही म्हणताहात तसा प्रकार एका नातेवाईकांच्या घरी पाहिलेला. विविध आजारांनी घरातली सगळी मोठी माणसं जाऊन फक्त २ लहान मुली राहिल्या. त्यानंतर इतर नातेवाईकांनी ते घर विकले. मुलींचे आता उत्तम आहे (मोठ्या होऊन लग्न - उत्तम नोकऱ्या मुले बाळे संसार वगैरे)

धर्मशाळेतील वाटसरू

न १९७० च्या आसपासचा काळ. कोल्हापूर-गारगोटी रस्त्यावर कोल्हापूर पासून खूप दूर अंतरावर वसलेले एक छोटे खेडेगाव. मुख्य सडकेपासून गाव थोडे आत होते. आणि सडकेला लागूनच ती शाळा होती. बाकी आसपास उजाड माळरान आणि थोडीफार झाडे झुडपे. दिवसादेखील कोणी तिकडे फिरकत नसे. कधीमधी सडकेवरून एखादे वाहन जायचे. एसटी जायची. तेवढीच काय ती जाग. बाकी इतर वेळी सगळी सामसूम. हि शाळा सुद्धा त्यावर्षी नुकतीच सुरु करण्यात आली होती. खरेतर हि शाळेची इमारत शाहू महाराजांनी धर्मशाळा म्हणून बांधली होती. त्यांच्या काळात तर इथे जंगल होते म्हणे. त्यामुळे वाटेने जाणायेणाऱ्या पांथस्थाला विश्रांतीची मुक्कामाची सोय असावी अशा उद्देशाने ती बांधली होती. पण नंतरच्या काळात ती वास्तु ओसाड रिकामीच पडून असायची. त्यावर्षीपासून मात्र तिथे एका संस्थेने शाळा सुरु करायचे ठरवले होते. गावातल्या आणि आसपासच्या पंचक्रोशीतल्या अनेक मुलांमुलींच्या शिक्षणाची सोय होणार होती. जूनमध्ये शाळेचे पहिलेच वर्ष सुरु होणार होते. त्यामुळे इमारतीची झाडलोट आणि डागडुजी केली होती. खिडक्या तावदाने दरवाजे नवीन बसवले होते. कड्याकोयंडे नवीन लावले होते. आत वर्गखोल्या, ऑफिस, स्टाफरूम इत्यादी करून घेतले होते. आणि शाळेसाठी आवश्यक ते साहित्य, कागदपत्रे, कपाट आणि अन्य काही मौल्यवान गोष्टी आत ठेवल्या होत्या. भागात भुरट्या चोऱ्यामाऱ्या होत असल्याने रात्री तिथे दोघा शिपायांना मुक्कामाला थांबायला सांगितले होते.

में महिन्याचा शेवटचा आठवडा असेल. रोज रात्री विजांच्या कडकडाटासहित वळीवाची हजेरी असायची. शाळा सुरु व्हायला पंधरा दिवसांचाच अवधी राहिला होता. नेहमीप्रमाणे संभा शिपाई त्या रात्री जेवूनच शाळेत मुक्कामाला आला. बरोबर एक कंदील होता. आणि वेळ पडली तर उपयोगाला यावा म्हणून एक धारधार कोयता पण बरोबर घेतला होता. रात्रीचे साडेनऊ दहा वाजून गेले असावेत. गप्पा मारायला दुसरा जोडीदार शिपाई अजून कसा आला नाही याचा विचार करत संभाने खाली अंथरलेल्या घोंगड्यावर अंग टाकून दिले. कंदिलाची वात एकदम बारीक केली. उशाला लागूनच कोयता ठेवला. आणि अंगावर पांघरून ओढून वर आढ्याकडे भकासपणे बघत तो पडून राहिला. आता आजूबाजूला कंदिलाच्या अंधुक उजेडात मोठाल्या सावल्या दिसत होत्या. बाकी सर्व काळोख आणि भयाण सन्नाटा पसरला होता. अंधार आणि भीतीवर मात होऊन झोप लागावी म्हणून संभा येतानाच थोडी देशी टाकून आला होता. तिचा अंमल होऊन त्याचा डोळा कधी लागला हे त्याला कळलेच नाही.

रात्री अचानक त्याला जाग आली. रात्री एक दीडचा सुमार असेल. बाहेर कधीचाच वळीव सुरु झाला होता आणि एव्हाना त्याने चांगलाच जोर धरला होता. त्याच्या मोठमोठ्या थेंबांच्या कौलावर पडणाऱ्या आवाजाने वातावरण भरून गेले होते. त्यामुळे जास्तच भयाण वाटत होते. तुफान धो धो धो धो पाऊस. त्याचा कौलांवर पडून होणारा घाडघाड घाडघाड घाडघाड आवाज. बोंब जरी ठोकली तरी त्या आवाजामुळे बाहेर कुणाला ऐकू जाण्याची शक्यता नव्हती. संभा मनातून चरकला. कंदील केंव्हाचाच विझून गेला होता. आता तर अंधार इतका होता कि जवळपासचे सुद्धा काहीही दिसत नव्हते. अंदाजाने त्याने डावा उजवा हात बाजूला ताणून चाचपणी केली. दुसरे अंथरून कुठेही हाताला लागत नव्हते. याचा अर्थ जोडीदार शिपाई आलाच नव्हता. म्हणजे त्या संपूर्ण वास्तूत संभा आता एकटाच होता. तेवढ्यात लख्खकन वीज चमकली. विजेचा भलामोठा लोळ आकाशात गप्पकन पेटून विझला. त्याने सगळा आसमंत एका क्षणासाठी उजळून काढला. काचेच्या तावदानामुळे शाळा सुद्धा आतून क्षणभरासाठी उजळून निघाली. पाठोपाठ काड काड काड कानठळ्या बसवणारा आवाज आला. आणि संभा पडल्या जागी गोठून गेला. लख्खकन पडून गेलेल्या विजेच्या प्रकाशात त्याला शाळेच्या मुख्य दरवाजामागे कोणीतरी चादर घेऊन झोपल्याचे स्पष्टपणे दिसले होते. अंगाचे मुटकुळे करून पडावे असे कोणीतरी पडले होते. संभा हबकला. एका क्षणात त्याची झोप पार उडाली. अंधारात डोळे फाडफाडून तो बघण्याचा प्रयत्न करू लागला. पण काळ्यामिट्ट अंधारात काही म्हणजे काहीच दिसत नव्हते. पावसाचा जोर वाढला होता.

कोण असेल तो? जोडीदार तर नक्कीच नसणार. कारण तो दरवाजामागे कशाला झोपेल? मग कोण चोर डाकू वगैरे तर नसेल? एकवेळ चोर सुद्धा परवडला पण "दुसरेच काही" असेल तर? संभाच्या अंगावर सन्नकन काटा आला. हातापायाला कंप सुटला. जोरात बोंब ठोकायची इच्छा झाली. पण तुफान पावसाच्या आवाजात त्याचा काही उपयोग होणार नव्हता. कसेबसे त्याने स्वत:ला सावरले. आपल्याला कदाचित भास पण झाला असेल अशी समजूत करून घेतली. आणि हात वर करून उशाकडेला ठेवलेला कोयता हातात धरून घट्ट पकडला. धीर एकवटला. हा चोर असेल तर एकटा आलेला नसणार. याच्या बरोबर आलेले आजूबाजूला दबा धरून बसलेले असू शकतात. आणि विजेच्या लखलखाटात त्यांनी आपल्याला पाहिलेले पण असू शकते. क्षणाच्या अवधीत संभाच्या मनात शेकडो विचार चमकून गेले. त्याच्या घशाला कोरड पडली.

पाउस धुंवाधार झडीने कौलांवर कोसळतच होत्या. बादलीने पाणी ओतल्यासारखा पडत होता. अक्षरशः कानात जीव आणून संभा आजूबाजूच्या हालचालींचा कानोसा घेऊ लागला. बराच वेळ त्याने काहीही न करता तसाच जाऊ दिला. कुठेच काही हालचाल जाणवत नव्हती कि कुणाची चाहूलही लागत नव्हती. तरीही चादरीच्या खाली कोण असेल याचा छडा लावलाच पाहिजे असा विचार करून संभाने बाजूलाच ठेवलेली आगपेटी सावधपणे अंधारात चाचपडत शोधली. आणि मनाचा हिय्या करून मोठ्या हिकमतीने काडी ओढून कंदिलाची वात पेटवली. विजेचा गोळा अंगातून गेल्यागत झाले. कारण मघाशी विजेच्या चमचमाटात जे दिसल्यासारखे वाटले होते तो भास नव्हता. कंदिलाच्या प्रकाशात बसल्या जागेवरूनच संभाने नीट न्याहाळून पाहिले. दरवाजामागे चादर पांघरून अंगाचे मुटकुळे करून खरेच कोणीतरी निपचित पडले होते. संभाला नकळत घाम फुटला. एक डोळा त्या चादरीवर ठेवून नकळत संभाची नजर इकडे तिकडे फिरू लागली. दरवाजाकडे पहातच कोयता हातात पकडून आसपास अजून कोण याचे साथीदार लपलेले तर नाहीत ना हे तो पाहू लागला. पण कोणीही दिसले नाही. गावात अनेकदा घराची कौले काढून चोर आत घुसतात. म्हणून त्याने हिम्मत करून हळूच नजर वर आढ्याकडे वळवली. तिथे कसलीही संशयास्पद गोष्ट दिसली नाही. आता ऑफिसच्या आणि इतर दोन वर्ग खोल्यांमध्ये पण पहायची गरज होती. एका हातात कंदील आणि दुसऱ्या हातात कोयता पकडून तो ऑफिसकडे वळला. कोणत्याही क्षणी हल्ला झाला तर सप्पकन कोयता हाणायची तयारी त्याने ठेवली होती. एक नजर त्या चादरीवर होतीच. कानोसा घेत ऑफिसात त्याने हळूच डोकावून पाहिले. सगळे साहित्य जिथल्या तिथे होते. सामसूम होती. इतर दोन वर्गखोल्यांमध्ये पण तीच अवस्था. रिकामी बाकडी आणि भिंतीवर ब्लॅकबोर्ड, कंदिलाच्या उजेडात भेसूर दिसत होते. बाकड्यांखाली सुद्धा पाहिले. पण कोणीही तिसरा माणूस आत असल्याची कसलीच लक्षणे दिसत नव्हती. स्टाफरूम मध्ये गेला. टेबल खुर्च्याखाली वाकून पाहिले. कुठेच काही संशयास्पद दिसले नाही.

तो तसाच पुन्हा बाहेर आला. एव्हाना त्याचे कपाळ आणि संपूर्ण चेहरा घामाने डबडबला होता. हातातला कंदील सावकाशीने खाली ठेवत एक आवंढा गिळून त्याने डाव्या हातानेच घाम पुसला. आता त्याला थोडी हिम्मत आली होती. कारण शाळेत त्या चादरीखालच्या माणसाशिवाय बाकी कोणी नव्हते इतके त्याला आता कळले होते. मग पुन्हा डाव्या हातात कंदील धरून दीर्घ श्वास घेत सावकाशीने दबक्या पावलाने तो मुख्य दरवाजामागच्या त्या चादरीपाशी आला. डोक्यापाशी जाऊन उभा राहिला. उजव्या हातातल्या कोयत्यावरची मुठ आवळली गेली. तो हात कोयत्यासहित वर गेला. आणि आहे नाही ती सगळी शक्ती एकवटून...

(मध्यांतर... उर्वरित कथा लवकरच पुढील भागात)

Pages