अमानवीय...? - १

Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34

अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

http://www.maayboli.com/node/12295

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धर्मशाळेतील वाटसरू (मध्यांतरा नंतर)

संभा दरवाजामागच्या त्या चादरीपाशी आला. डोक्यापाशी जाऊन उभा राहिला. उजव्या हातातल्या कोयत्यावरची मुठ आवळली गेली. तो हात कोयत्यासहित वर गेला. आणि आहे नाही ती सगळी शक्ती एकवटून घोगऱ्या आवाजात तो खच्चून गरजला,

"एऽऽऽ....... कोण हायेस तू ऽऽऽऽऽ...."

चादरीत थोडी हालचाल जाणवली. संभाने पुन्हा जोरात आवाज दिला. त्याबरोबर एका बाजूने चादर थोडी वर झाली. संभा सावध होऊन बघू लागला. अंगावर काटा येऊन त्याच्या मानेवरचे केस उभे राहिले. आणि पंचवीस तिशीतला एक तरुण पोरगा चादरीतून यंत्रासारखा उठून बसला. काळाभिन्न निस्तेज चेहरा. निर्विकार. केस पिंजरलेले. धुळीने माखलेले. दाढी अर्धवट वाढलेली. चेहऱ्यावर मानेवर कसलासे मोठाले व्रण. पांढरा पण विटलेला शर्ट घातलेला. अंगात त्राण नाहीच अशी अवस्था. आणि भकास चेहऱ्याने त्याने संभाकडे पाहिले. हातातला कोयता अजून वर उगारून संभाने दरडावून विचारले,

"कोण हायेस? हितं कशाला आलास?"

चादरीतून काळे हात बाहेर आले. जोडले गेले. चेहऱ्यावर एकाएकी करुण भाव आले. डोळ्यात आसवे दाटली. आणि तो बोलला,

"मालक, आई आजारी आहे. गारगोटीला दवाखान्यात आडमिट केलंय. तिला बघाय चाललो होतो सायकल वरनं. वाटेत पाऊस आला. धर्मशाळा दिसली म्हणून आडोशाला थांबलो. मला मारू नका मालक. पाऊस थांबल्यावर जाईन मी. मला मारू नका."

पोरगा घडाघडा एका दमात सगळे बोलून गेला. गयावया करू लागला. आणि हात जोडून बसला. टोल पडून गेल्यावर घंटा हलावी तशी त्याची मान अजून हलत होती. संभाचा कोयता धरलेला हात आपसूकच थोडा खाली आला आणि आवाज चढवूनच पण जरा नरमेच्या सुरात तो बोलला

"ठीक हाय, गुमान झोप आणि पाऊस थांबला कि मुकाट्यानं आपली वाट धर. काय दगाफटका केलास तर हितल्या हितं मुंडी मारीन. याद राख", गुरगुरत संभानं पुन्हा कोयता उगारला.

पोरग्यानं घाबरून हात घट्ट जोडले. आवंढा गिळला. नुसतीच होकाराची मान हलवली. डोळ्यातनं पाणी ओघळलं.

संभा पुन्हा आपल्या अंथरुणाकडे वळला. पोरगा हात जोडून अजूनही त्याच्याकडे बघतच होता. संभाने आपल्या अंथरुणावर बसून भिंतीला टेकून त्याच्याकडे पुन्हा नजर रोखली. तसा पोरगा चादर ओढून पुन्हा मुटकुळे करून पडून राहिला. आता संभाची झोप पूर्ण उडाली होती. बाहेर पाऊस थांबायचे नाव घेत नव्हता. जोडीला वारा पण सुटला होता. कंदिलाची वात कमी करून संभा टक लावून त्या पोराच्या दिशेने बघत अंथरुणावर उगाचच बसून राहिला. थोड्या वेळाने केंव्हा त्याचा डोळा लागला ते त्यालाच कळले नाही.

पहाटे साडेचार पाचच्या दरम्यान संभाला पुन्हा जाग आली. रात्री घडलेला प्रकार खरा कि स्वप्न हे तो आठवायचा प्रयत्न करू लागला. झोपताना मुख्य दाराला आपण आतून कडी लावली होती हे त्याला आता स्पष्ट आठवू लागले. आणि तो हादरला. जे घडलं ते खरं असेल तर पोरगा आत आलाच कसा? आपण त्याला मघाशी ते विचारले कसे नाही? तो अजूनही दरवाजामागे झोपला असेल काय? या विचारांसरशी संभा ताड्कन अंथरुणात उठून बसला. कंदील विझून आजूबाजूला अंधार मातला होता. बाहेर पाऊस थांबला होता. पण प्रचंड मोसमी वारे आडवेतिडवे घोंघावत होते. आणि झाडा-झुडपातून खिडकी-झरोक्यातून विचित्र शिट्ट्या घातल्यासारख्या त्याच्या भीषण आवाजाने संभाला धडकी भरली होती. उशालगत ठेवलेला कोयता त्याने पुन्हा हाताशी धरला. कापऱ्या हाताने पुन्हा कसाबसा कंदील पेटवला. आणि दरवाजाकडे नजर टाकली. दरवाजाला आतून कडी लावलेलीच होती. पण दरवाजाजवळ झोपलेला पोरगा मात्र चादरीसहित गायब झाला होता. संभा चपापला. कंदील आणि कोयता धरून ताड्कन उठून उभा राहिला. मनात शंकेचे काहूर माजले होते. पुन्हा एकदा सावधपणे सगळी शाळा पिंजून काढली. कौले बघितली. ऑफिस, वर्गखोल्या, स्टाफरूम बघितले. कुठेच कोणी नव्हते. मग तो पोरगा आत आला कुठून आणि बाहेर गेला कसा? आता मात्र संभाचे धाबे दणाणले. काल रात्री जे झाले ते स्वप्न नव्हते हे त्याला पक्के ठावूक होते. तरीही काहीतरी भास असेल अशी खोटी समजूत काढून त्याने मनाला पोकळ धीर दिला. पण आता इथे थांबण्यात अर्थ नाही हे त्याला कळून चुकले. सर्वांगावर तरारून काटा आला होता. कंदील कोयता घेऊन लगबगीने त्याने पायात चप्पल चढवली. आणि कडी काढून दरवाजा उघडला. त्याबरोबर थंड वाऱ्याचा एक झोत भप्पकन आत आला. संभाला हुडहुडी भरली. कंदील विझता विझता राहिला. बाहेर काळोख दाटला होता. हवेत चांगलाच गारठा जाणवत होता. आजूबाजूला किर्र अंधाराशिवाय कुठेही काहीही दिसत नव्हते. दरवाजा बंद करून इथून पळ काढावा असा विचार त्याने केला. तोच त्याची नजर पायाखाली वळली.

कंदिलाच्या प्रकाशात बाहेर पायरीखाली पावसाने झालेला चिखल दिसत होता. आणि त्यात पायरीपर्यंत आलेले सायकलच्या चाकांचे व्रण स्पष्टपणे उमटलेले दिसत होते. म्हणजे कुणाचीतरी सायकल दारापर्यंत आली होती. पण ती परत गेल्याची एकही खून आजूबाजूला दिसत नव्हती. आणि आत तर कुणीही नव्हते याची त्याला खात्री होती. संभा चक्रावला. त्याची विचारशक्तीच खुंटली. डोळ्यासमोर अंधारी आली. उरलेसुरले अवसान गळून गेले. पाय लटलटू लागले. उजव्या हातातला कोयता गळून पडला. कसाबसा त्याने डाव्या हातातला कंदील खाली ठेवला. घेरी येतीय कि काय असे वाटू लागले. इतक्या थंड हवेत सुद्धा तो घामाने डबडबला होता. घशाला कोरड पडली होती. दरवाजाच्या चौकटीला हात टेकून तो कसाबसा उभा राहिला. कंदिलाच्या प्रकाशात त्याची भलीमोठ्ठी सावली मागच्या भिंतीवर पडलेली त्याला तिरक्या नजरेने दिसत होती. संभाचा श्वास वरखाली होऊ लागला. त्याला धाप लागली. वाऱ्याने कंदिलाची ज्योत हलकेच फडफडली तशी मागची सावली सुद्धा अक्राळविक्राळ हलली. ते पाहताच संभा थरारला. हातापायातले त्राण नष्ट होऊ लागले. पुढच्या क्षणी सावलीचे हात संभाच्या हातापासून विलग झाले. वर उचलले गेले. आणि संभाच्या त्या काळ्या कृश सावलीनेच संभाला मागून मिठी मारली. अकस्मात सावलीचे ते काळे हात त्याच्या गळ्याभोवती आले. तेच काळे हात. त्या मघाच्या तरुण पोराचे. मघाशी जुळलेले. विनवणी करणारे. अगदी तसेच हात दिसत होते. हळूहळू त्या हातांचा संभाच्या गळ्याला मागून विळखा पडला. त्यात त्याचा गळा आवळू लागला.

"मी हि इ ..... ये हे ए...... तो... हों....य..... आ.... हां हां....... ई...... व्ही हिं इ...... आ.... हा....... ई...." झाडा झुडपातून वाहणाऱ्या वाऱ्यातून संभाला कुजबुजल्या सारखे विचित्र आवाज ऐकू येऊ लागले. कुणीतरी काहीतरी सांगत असल्याचा भास होऊ लागला. मी येतोय आई. मी येतोय आई.

संभाने जीवाच्या आकांताने बोंब ठोकायचा प्रयत्न केला. पण तोंडातून आवाजच निघत नव्हता. काळ्या सावलीने हातांची मगरमिठी घट्ट केली. तशी संभाच्या तोंडून चित्र विचित्र आवाज येऊ लागले. आता श्वास घेणेसुद्धा अवघड झाले होते. वरचा श्वास वर आणि खालचा खाली. त्याचा जीव गुदमरला. कंदिलाच्या ज्योतीची फडफड झाली. आपल्या गळ्याभोवती पडलेला काळा हात सोडवायचा आटोकाट प्रयत्न संभा करू लागला. पण ताकद अपुरी पडत होती. एका जबरदस्त शक्तीनेच जणू त्याच्या गळ्याभोवती काळ्या हातांचा फास आवळला होता. ते हात सोडवायच्या नादात अखेर पाठीमागच्या दिशेने तोल जाऊन तोंड वरती करून संभा खाली पडला. डोके मागच्या पायरीवर नारळ आपटावा तसे दाण्णकण आपटले. डोळ्यासमोर अंधारी आली. गळ्या भोवतीचे काळे पाश अजून घट्ट आवळले गेले. जीवाच्या आकांताने तडफडून संभा लाथा झाडू लागला. आचके देऊ लागला. कंदिलाची ज्योत वाऱ्याने वेगात फडफडत होती. आणि पुढच्याच क्षणी संभाच्या एका जोरदार लाथेच्या जबरी तडाख्यात कंदील पायरीवरून उंच उडवला गेला. आणि दूरवर जाऊन पडला. कंदिलाची काच फुटल्याचा आवाज आला. आणि ज्योत कायमची विझली. आणि सर्व शांत झाले. शांत झाले. आता मात्र वातावरणात सर्वत्र फक्त आणि फक्त काळोख आणि भयाण सन्नाटा भरून राहिला होता. कुठेच कसली हालचाल जाणवत नव्हती. सगळे सुन्न सुन्न झाले होते. वारे मात्र उगीचच त्या भयाण काळोखात वेड्यासारखे काहीतरी आवाज काढत वाहतच होते.

--x--

जमीनदाराची गुरं सांभाळणारा रामा गडी गुरांना वैरण आणायला म्हणून सकाळी नेहमीप्रमाणे लवकर उठून शाळेच्या बाजूच्या रानात गेला होता. तिथून डोक्यावरून वैरणीचा भारा घेऊन येत असताना शाळेच्या पुढच्या भागात त्याचे लक्ष गेले. शाळेचे दार सताड उघडे दिसले म्हणून संशय येऊन रामाने जरा जवळ जाऊन पाहिले. संभा शिपाई शाळेच्या पायरीवर तोंड वर आणि हात पाय ताठ करून निपचित पडला होता. डोळे उघडे. तोंड उघडे. दोन चार माशा घोंघावत होत्या. नाकातोंडात जात येत होत्या. पायापाशी कोयता आणि थोड्या अंतरावर कंदील काच फुटून पडला होता. ते दृश्य बघून रामाने डोक्यावरचा वैरणीचा भारा तिथेच टाकला आणि "खून, खून" म्हणून खच्चून बोंब ठोकली. बोंब मारतच तो गावाच्या दिशेने पळाला. त्याचा आरडाओरडा ऐकून आसपासचे लोक धावत शाळेत आले. बघता बघता सगळा गाव शाळेपाशी लोटला. लगबगीने संभाला गावातल्याच दवाखान्यात नेले. पण डॉक्टरांनी नाडी तपासून लगेचच त्याला मृत घोषित केले. दवाखान्यापुढे हि गर्दी जमली. संभा दुसऱ्या गावचा होता. त्या गावी त्याच्या कुटुंबाला निरोप धाडला. ते सगळे रडतच एस्टीतून उतरले. त्यांना खूप मोठा आकस्मिक धक्का होता. संभाच्या बायको व मुलाच्या काळीज पिळवटून टाकणाऱ्या आक्रोशाने गाव हेलावले. मृतदेहाची तपासणी झाली. आत्यंतिक भीतीमुळे ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे निदान करण्यात आले. एवढा धडधाकट गडी. कशाला न घाबरणारा. नक्की काय झालं असेल? पूर्वी कधी अॅटॅक आला होता का? वगैरे चर्चा सुरु झाल्या.

दुसरीकडे, गावातल्या जेष्ठ आणि वयोवृद्ध नागरिकांनी कोंडाळे केले. एकमेकांशी कुजबुजत ते काहीतरी चर्चा करू लागले. पंचवीसएक वर्षांपूर्वी अगदी असाच प्रकार घडलेला ते विसरले नव्हते. शाळेच्या पायरीवर अनोळखी तरुणाचा मृतदेह सकाळी सकाळी कुणालातरी आढळून आला होता. वय पंचवीस ते तीस. काळा वर्ण. केस पिंजरलेले. धुळीने माखलेले. दाढी अर्धवट वाढलेली. पांढरा पण विटलेला शर्ट घातलेला. आणि शेजारीच सायकल पडलेली होती. त्याच्या मानेवर चेहऱ्यावर कोयत्यासारख्या धारधार शस्त्राने घाव केले होते. तो गावातला नव्हता. कुठून आला, कुठे चालला होता, कुणी मारले याचा काहीच पत्ता आजतागायत लागला नव्हता. आणि उगीच पोलिसांची लचांड गावकऱ्यांच्या मागे लागायला नको म्हणून मोजक्याच गावकऱ्यांनी फार बोभाटा न करता शाळेच्या आवारातच त्याला दफन केले होते.

(समाप्त)

अमानवीय चा काही र्वष पासून चा वाचक आहे काही दिवसा पूर्वीची माझ्या बरोबर घडलेली सत्य घटना काहीसा अमानवीय प्रकार असेल , जागा स्थान या बाबत माहिती देण्या चे टाळत आहे , कोणीही यावर विश्वास ठेवावा अशी माझी इचछा नाही . आणि यावर कृपया विनोद नको ,
तर ,
फेब्रुवारी चा महिना होता मी आणि माझी बायको मुंबई ला असतो बहिणीच्या घरीच राहतो आम्ही मुंबई ला नौकरी लागून काही महिने पण नाव्हते झाले , घरात आम्ही तिघे चौघेच असतो, एके दिवशी माझी बायको माहेरी गेली होती घरात मी आणि माझी बहीण भाचा होतो , रात्रीला खाणे पिणे करून झोपी गेलो घर तसं मोठंच आहे , मी एकटाच दुसऱ्या खोलीत झोपलो होतो , रात्रीची २. ३० ते ३. ०० ची वेळ होती , अचानक तीन चार जन माझ्या बेड वर उडी मारल्या चा भास झाला आणि मी झोपेतुन खडबडून जागे झालो अचानक मला जाणवले कि कोणीतरी माझा हात आणि गळा दाबून धरला आहे ,मी उठण्याचा प्रयत्न करत होतो तरीपण उठता येत नव्हतं , घश्यातुन आवाज तर फुटांचं नव्हता तरीपण कसाबसा प्रयत्न करून उठलो आणि पांघरून घेऊन सरळ बहिणीच्या रूम मध्ये पळालो भाचा च्या शेजारी जाऊन झोपलो पण जे काई होता त्यांनी माझा पिच्छा च सोडला नाही आणि मी जेव्हा फॅन कडे पहिले तेव्हा काही तरी काळ वादळ घोगावतांना दिसले , आता तर खूप घाबरलो , खूप घाम फुटला , बहिणीला उठवायचा प्रयत्न केला पण तोंडातून शब्दच बाहेर पडत नव्हते , काही वेळ असाच चालू होते , त्या रात्री मला जाणवत होते कि कोणीतरी मला त्रास द्यायचा प्रयत्न करताय आणि मी जोरात ओरडतोय , हे सगळं सकाळी ४. ३० वाजे पर्यंत सुरु होता , कसाबसा मी झोपण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत ५ वाजले होते , त्यादिवशी मी फक्त १ तास झोपू शकलो , सकाळी मग उठून ऑफसच्या तयारी ला लागलो आणि लोकल मध्ये असतांना विचार करत होतो कि नक्की हा माझा भास होता कि अजून दुसरा काही तरी , नंतर ही सगळं घरातल्यांना सांगितलं तेव्हा सगळे खूप घाबरले होते. दुसऱ्या दिवशी पासून बायको येईपर्यंत बहिणीच्या खोलीत गादी टाकून झोपत होतो , एकटा झोपायची हिम्मतच झाली नाही, हा अनुभव इतका भयंकर होता कि आठवले तरी अंगावर काटा येतो

अंजली_१२ ... धन्यवाद् Happy

चिखलु ... Biggrin Biggrin नाही अंदाज चुकला Wink

मी मिनु ... डॉक्टरनी सांगितल्यानुसार भीतीने हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाला. लोकांच्या समजानुसार संभाने हत्यार उपसले म्हणून त्या खून झालेल्या मुलाच्या आत्म्याने त्याला मारले

वावे/Swara@1 ... हे सत्य अनुभवकथन नव्हे. खूप पूर्वी घडून गेलेल्या एका गूढ घटनेचे नाट्यीकरण आहे. आईला भेटायला चाललेल्या मुलाचा खून कोण्या एका अज्ञात हत्याऱ्याने केला होता. म्हणून त्या अतृप्त आत्म्याने हत्याराची भीती दाखवणाऱ्या संभाला मारले असा समज आहे. त्यावर हे नाट्यीकरण आधारित आहे. नक्की कसा मृत्यू झाला याविषयी मात्र केवळ तर्कवितर्कच आहेत. (ज्यांचा विश्वास नाही त्याच्या दृष्टीने तर हि बस्स साधी हार्ट अॅटॅकची केस आहे)

हा मी अनुभवलेला किस्सा आहे.
२००९ मध्ये मी पहिल्यांदा च माझ्या होणाऱ्या नवऱ्याच्या घरी गेलेले, उस्मानाबाद येथे मुंबई हुन रात्री ट्रेन ने.
मी आणि माझा होणारा नवरा सकाळी ६ च्या दरम्यान घरी आलो. घरी जाऊन फ्रेश होऊन चहा नास्ता करून मी हॉल ला लागून असलेल्या खोलीत झोपले. तर नवीन जागा, नवीन लोक लवकर झोप काही येईना, पण प्रवासाने थकले होते.
तेव्हढ्यात मला जाणवले की स्वयंपाक घरातुन एक मुलगी जोरात किंचाळत ओरडत येतेय जिच्या पूर्ण शरीराला आग लागली, मी फक्त तिला बघत होते. तिचे बोलके डोळे अजून नजरेसमोर येतात माझ्या....
मी घाबरून उठले . पण कोणाला काही सांगितले नाही. काही महिन्यांनी आमचे लग्न झाले, १५ दिवस गावी आलो. एकदा जुन्या अल्बम बघताना, एक चेहरा ओळखीचा वाटला, विचारल्यावर समजले की माझ्या नवऱ्याला दोन बहिणी अजून होत्या मोठी नुकतीच मेंदू ज्वर ने वारली तर छोटी अपघातात घरातच दिवाळीच्या फटाक्यांना लागलेल्या आगीत सापडून, फक्त १४/१५ वर्षाची असताना.

मी नगरला फॅक्टरीत कामास होतो . हि गोष्ट आहे साधारण १९८० चे दरम्यानची, त्यावेळी मी दिवसा कामावर जात असे, रुमवर आल्यावर स्वयंपाक करुन जेवन झाले कि पुस्तक वाचत असे. त्यावेळी टिव्ही जास्त नव्हते, त्यात मी एकटा , आणि काका पोलिस असल्याने बर्याचदा बाहेरच ड्युटीवर असत. असे मी त्या क्वार्टर मधील रुमवर रहात असे, मावशी गावाकडॅच रहात असे. असाच नेहमी सारखा पुस्तक वाचत होतो आणि कंटाळा आला म्हणुन पुस्तक उशाला ठेऊन नेहमी प्रमाणे अंगावर लुंगी घेउन झोपायला लागलो. लाईट रात्रीची नेहमी चालु ठेऊन झोपण्याची सवय होती. कारण ऊठुन बंद करायचा कंटाळा. पुस्तक ऊशाला टाकुन अंगावर लुंगी घेई पर्यंत जास्तीत जास्त १०-१५ सेकंदच लागले असतील तेवढ्यात [ लाईट चालुच होती ] माझ्या डोक्याजवळ काहीतरी पडल्या सारखे झाले , त्यावेळी मला वाटले मांजर असेल , मला खात्री होती मी झोपताना दार, खिडकी बंद केलेली आहे . कारण एकटा असे आणि काकांनी सांगितल्यामुळे दरवाजा, खिडकी ऊघडी ठेवतच नसे. आणि नव्हतीही. डोळे चक्क ऊघडे ठेऊन मी बल्बकडे पहात होतो आणि विचार करत होतो आपण दार, खिडकी बंद केली आहे त्यामुळे मांजर आत येऊ शतच नाही. जे काही डोक्याजळ पडले असे वाटत होते त्याने माझ्या डोक्यावर चढण्यास सुरवात केली ,तो दाब हळुह्ळु वाढत आहे असे जानवत होते, आता तो दाब तोडावर पडायला सुरवात झाले होती , तेवढ्या २-३ मिनिटात मी घामाने अक्षरशः न्हाऊन निघालो होतो. इतका घाबरलो होतो कि ऊठायचे धाडसच होत नव्हते, लहानपणापासुन " श्री स्वामी समर्थां" ची सेवा करत होतो त्यामुळे " श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ नामस्मरण चालु केले , लहानपणा पासुन माझ्यागळ्यात श्री स्वामी समर्थांचे काळ्या दोर्यातील लॉकेट होते , ते तुटत आले तरीही मी आजही माझ्या पाकिटात ठेवलेले आहे. तोंडावरुन तो दाब गळ्याकडे चालला होता तरीही माझे नामस्मरण चालु होते आणि काय चमत्कार झाला. तो दाब एकदम नाहिसा झाला. तरीही मी तात्काळ ऊठण्याचे धाडस करु शकलो नाही. मी तसाच १०-१५ पडुनच राहिलो, घामाच्या धारा चालुच होत्या, हातापाय त्राणच राहिले नव्हते, १०-१५ मिनिटांनी अंगात ताकत आल्या सारखा ऊठुन बसलो ईकडे तिकडे पाहिले पण काहिही नव्हते, लाईट चालू होती, दार खिडक्या बंदच होत्या. सकाळी लवकर ऊठावे लागत असल्याने परत झोपण्याचा प्रयत्न केला पण २ तास तरी झोप लागली नाही, नंतर झोप लागली ते कळले नाही , सकाळी ५-५.३० ला पाणी सुटत असल्याने लवकर ऊठावे लागे,पाणी भरुन , अंघोळ करुन आणि डबा तयार करुन नेहमी प्रमाणे कामावर गेलो.संध्याकाळी परत आल्यावर . शेजारच्या काकुंना रात्रीची घटना सांगितली, २-३ वर्ष शेजारी राहुनही मी कोणाशी जास्त बोलत नसे, पण त्या दिवशी काकुंशी बोललो, घटना सांगितली त्यावर त्यांनी जे सांगितले ते धक्कादायक होते , त्या मला म्हणाल्या अरे दत्ता तुमच्या रुममधे तेथे राहणार्या एका सुनेने जाळून घेतले आहे , तु एकटा असतोस म्हणुन तुला कधी सांगितले नाही, दुसरी गोष्ट म्हणजे अरे काल आमावस्या होती. मागे मला कधीच असा काही अनुभव आला नव्हता

माझा मित्र मंगेश याच्या बरोबर घडलेली घटना,

सहा सात महिन्यांअगोदर माझ्या बरोबर घडलेली एक सत्य घटना . त्या एका रजेच्या दिवशी मी माझ्या बायकोसह मुलीला घेऊन समुद्रावर फिरायला गेलो होतो . दुपारचे ऊशीराचे जेवण व नंतर मुलीशी खेळता खेळता रात्रीचे आठ कधी वाजले ते आम्हाला कळलेच नाही. समुद्रावर प्रकाश व्यवस्था होती पण दोन तीन कुटुंबाशिवाय तिथे अजून कोणीही ऊरले नव्हतेच. मग आम्हीही जास्त वेळ न दडवता घरच्या दिशेने प्रयाण करण्याची तयारी केली . समुद्रापासून 80 किलोमीटर नंतर पहिले गाव लागणार होते . तो पर्यंतचा रस्ता एकदम निर्जन व काळोखी अंधाराचा होता .

गाडीत बसल्या बसल्या मुलीने टॅब ऊघडला व ती मागच्या सीटवर बसून गेम्स खेळू लागली . तिला टॅबच्या प्रकाशाचा त्रास होऊ नये म्हणून मी गाडीतला बल्ब चालू केला होता . पण त्या बल्बच्या प्रकाशामुळे असं होत होतं की , मी जेव्हा जेव्हा गप्पागोष्टी करताना बायकोकडे अध्येमध्ये नजर टाकत होतो , तेव्हा तेव्हा मला तीच्या बाजूने असलेल्या गाडीच्या काचेत आम्हचे जरासे ओबडधोबड प्रतिबिंब दिसायचे व मला गाडीबाहेरून आम्हच्या सोबत अजून कोणीतरी दोघे जण प्रवास करतायेत असा भास व्हायचा.

असाच साधारणतः 30 किलोमीटरचा रस्ता कापला असेल की नाही की , मला अचानक कोणीतरी पुढून रस्ता ओलांडून गेल्याचे स्पष्टपणे जाणवले . मी गाडीला तिथल्या तिथेच जोरदार ब्रेक लावला व गाडीचा वेग तात्काळ कमी केला . पण गाडी थांबविण्याची हिंमत काही झाली नाही . मी बायकोला , " तु....ला का...ही दिस...ले का गं ? " असे भीतभीतच विचारले . तीनेही थरथरत रस्त्यावर बोट करत अंदाजे साडेपाच ऊंचीची एक मानवी आकृती रस्ता पार करून जाताना पाहिल्याचे मला सांगितले . तीने नंतर केलेल्या त्या आकृतीचे वर्णन व मी पाहिलेली ती अर्धदृश्य आकृती यांत कमालीचे साम्य होते .
भयंकर दडपणाखाली मी गाडी चालवत पुढचा रस्ता कापित होतो . काय पाहिले होते ते , याचा मनात विचार घोळत होता की , हे कमी होते की काय , पुढे एक वाळूचे लहानसे वावटळ येऊन गेले व माझी गाडी जोरदार हलली . गाडीच्या मागच्या भागावर काहितरी जोरदार आपटल्याचा आवाजही आला . मी कसेबसे गाडीवर नियंत्रण करून गाडी रस्त्याच्या एका कडेला लावली . गाडी बाहेर ऊतरलो तर बाहेरच्या वातावरणात अत्तराचा एक मांसल सुगंध दरवळत असल्याचे मला जाणवले . आजूबाजूच्या त्या निर्मनुष्य भागात, वाळूच्या पहाडावरून हा मानवनिर्मित सुगंध कुठून येत असावा या विचाराने मी गांगरूनच गेलो . मी त्या ही परिस्थितीत गाडीच्या मागच्या भागाची तपासणी करण्याचे ठरविले . गाडीच्या मागच्या बाजूला काहीही हानी पोहोचलेली नव्हती. सर्व ठिकठाक आहे , हे पाहून मी सुटकेचा निश्वास सोडला खरा पण त्याच वेळी माझे लक्ष गाडीच्या मागच्या काचेतून बायकोच्या सीटवर गेले व मी हादरलोच . माझी बायको गायब झालेली होती . तीच्या सीटवर ती दिसतच नव्हती. माझ्या छातीत एकदम धस्स झाले. मी पडत धडपडत कसाबसा तीच्या सीटपाशी पोहचलो. पाहतो तर ती खाली पडलेल्या मोबाईलला ऊचलून त्याच्या स्क्रीनवर काही ओरखडे पडले आहेत का ते पाहत होती . मी तात्काळ सीटवर बसलो व गाडी अजून जास्त वेगाने घराच्या दिशेने दामटली . घर येईपर्यंत माझ्या गाडीत डरावनी शांतता पसरलेली होती .

छान वर्णन
लोकेशन कळले असते तर अधिक रंजक झाले असते

या धाग्याचे नाव अमानवीय वरुन फेकाफेकीय धागा असे करावे.
कुणी काहीही लिहित आहे.
भुत दाखवा व एकलाख रुपये मिळवा अशी माझी योजना इथे जाहीर करतो.कुणाला हवेत एक लाख रुपये.

या धाग्याचे नाव अमानवीय वरुन फेकाफेकीय धागा असे करावे.
कुणी काहीही लिहित आहे.
भुत दाखवा व एकलाख रुपये मिळवा अशी माझी योजना इथे जाहीर करतो.कुणाला हवेत एक लाख रुपये.?

क्रांतीवीर व भुत्याभाउ यांचे अनुभव हे मनाचे खेळ किंवा भ्रम आहेत असे वैज्ञानिक स्पष्टीकरण दिले तरी त्यांच्यादृष्टीने त्यांच्या पुरता हा अनुभव खरा होता असेच ते म्हणतील व त्याला उत्तर नाही. कारण तो अनुभुतीचा भाग आहे. मानवी मनाचा उलगडा अद्याप पुर्णपणे झाला नाही. पण त्याचे अधिष्ठान हे मेंदु आहे. मेंदुच्या मनात हे सुबोध जावडेकरांचे पुस्तक जरुर वाचा. बाकी मनात- अच्युत गोडबोले,मेंदुतला माणुस- सुबोध जावडेकर डो आनंद जोशी, मन- निरंजन घाटे ही पुस्तके देखील उत्तम आहेत.मेंदुतला माणसाचा परिचय पहा

Gaurav tiwari कोणी कधी वाचले आहे का? दुर्दैवाने गेल्या वर्षी त्यांचा अनैसर्गिक म्रुत्यू झाला.

नेमके हे एपिसोड मी शनिवारी बघत होते. रात्री झोपताना लक्षात आले की आज अमावस्या लागली आहे. डोळे उघडायची खूप भीती वाटत होती

Pages