युक्ती सुचवा युक्ती सांगा- ४

Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36

स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.

याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कांदा वाटून घालायचा.
कांद्याशिवायची भाजी असेल तर थोड्याश्या तेलात ओलं खोबरं परतून त्यात दूध घालून थोडा वेळ उकळू द्यायचं आणि थंड करून वाटून भाजीत घालायचं. कादा-ओलंखोबरं-दुधाची ग्रेव्हीही छान होते.

आम्ही अशा वेळी साय घालतो. वेळ असेल हाताशी तर कांदा वाटून, व्यवस्थित परतून (हे सगळ्यात महत्वाचं, घाई केली की कांद्याचा कच्चट वास आणि चव लागते) घालता येतो. खरं परतून खोबर्‍याचं वाटण हा सोप्पा आणि लवकर होणारा उपय आहे, पण घरच्या पंजाब्यांना खोबर्‍याच्या वाटणाची चव कळते आणि पंजाबी ग्रेव्हींमध्ये ती चव आवडत नाही (मराठी आमट्या आणि रस्स्यामध्ये चालते म्हणे).

खोबर्‍याच्या वाटणाची चव कळते आणि पंजाबी ग्रेव्हींमध्ये ती चव आवडत नाही > एकदम बरोबर. चव बदलते.
आशूडी, ग्रेव्ही मधे काजू ची पेस्ट घालून आंबट पणा कमी होतो.

पण घरच्या पंजाब्यांना खोबर्‍याच्या वाटणाची चव कळते आणि पंजाबी ग्रेव्हींमध्ये ती चव आवडत नाही>> हो अल्पना, म्हणून खोबरं थोडंसंच, क्रिमी होण्यासाठी घ्यायचं. एका मोठ्या कांद्याला एखाद दोन चमचे खोबरं आणि अर्धी वाटी दूध पुरतं.
आयत्यावेळी (धांदलीत) काजू भिजून त्याची पेस्ट होणं अवघड असत त्याजागी खोबरं वापरायचं.

आयत्यावेळी (धांदलीत) काजू भिजून त्याची पेस्ट होणं अवघड असत त्याजागी खोबरं वापरायचं.> मंजूडी, मी काजू न भिजवताच वाटते. फ्रिज मधील काजूची पेस्ट लगेच होते.

ओके, थँक्स सर्वांना. कालच्या भाजीत काजू पेस्ट, मिल्क पावडर, सायीचं दही, उकडलेला बटाटा असूनही टोमेटो जास्त झाले म्हणजे मी काहीच्या काहीच प्रमाणात घेतले असणार. Uhoh पण दुरूस्तीला आज वाव आहे. आणि पुढच्या वेळेस हे लक्षात ठेवेन. धन्यवाद पुन्हा एकदा.

मी यीस्ट कधी वापरलं नाहीये. एक पाकृ करायची आहे त्यात यीस्ट घालून ४-५ तास ठेवायला सांगितलं आहे. यीस्ट घातलं लगेच व झटकन आंबण्याची क्रिया सुरु होते ना ? तर हे असं ४-५ तास ठेवू का?

एक प्रश्न पडलाय. इथेच विचारते. एका रेसिपीमधे इनो सॉल्ट घालायला सांगितलेय. त्याच्या ऐवजी खायचा सोडा चालेल का? दोन्हीत काही/काय फरक असतो?

मंजूताई,
यीस्ट घातले की ते स्टार्च मॉलेक्यूलचे रुपांतर साखरेत करते जोडीला ग्लुटन नेटवर्क चांगले होते. कार्बन डाय ऑक्साईडचे बबल तयार होतात ते चांगल्या प्रकारे पीठ फुगवतात. फर्मेंटेशनने पीठाला चव येते. हे सगळे होण्यासाठी तुम्ही काय बनवताय त्याप्रमाणे काही अवधी आवश्यक . त्यामुळे ४-५ तास सांगितले असेल तर तसेच करा.

सहेली,
मी ढोकळा करताना इनो सॉल्ट ऐवजी नेहमीच बेकिंग सोडा वापरते. जोडीला सायट्रिक अ‍ॅसिड घालते.

मंजूताई, यीस्टचेही दोन प्रकार बाजारात आहेत. एक ड्राय यीस्ट ( ही मोहरीच्या दाण्यासारखी असते आकाराने ) तर दुसरी इंस्टंट यीस्ट ( हि खसखसीसारखी असते ) पहिली वापरताना कोमट साखरपाण्यात १० मिनिटे भिजवावी लागते तर दुसरी थेट पिठात मिसळता येते. दुसरीचे काम लगेचच सुरु होते.

सहेली, इनोचे घटक पहा बरं. त्यातही सोडा आणि सायट्रीक अ‍ॅसिडच असते. हे मिश्रण कोरडे असताना त्यात काहिही प्रक्रिया होत नाही. ते ओले झाल्यासच ती सुरु होते. ते वापरण्याचा एक फायदा म्हणजे त्यातले मिश्रण अगदी योग्य प्रमाणात असते त्यामूळे त्याची क्रिया हमखास होते. शिवाय ते सोयीचेही आहे.

बारिक मोहोरी साफ कशी करायची (बारिक खडे आहेत बहुधा त्यात. फोडणी घातलेल्या पदार्थांमधे मधुनच लागत्तात Sad )

रावी, चमचा चमचा भर मोहरी एका स्टीलच्या ताटात घेऊन ताट कलते करा. मोहरी गोल असल्याने ती घरंगळते. खडे ओबडधोबड आकाराचे असतील तर एका जागी स्थिर राहतील. मग उरलेली मोहरी अशीच ताटात पसरून बोटाने चाचपडून पहा. खड्यांचा वेगळा ( टोकदार ) आकार बोटांना सहज जाणवतो. अगदी गोलच खडे असतील मात्र हे दोन्ही उपाय चालणार नाहीत.

रावी, एक उत्तम ऊपाय आहे. जो मी लहान असतांना शिकले. सांगायचा प्रयत्न करते.
मोहरी पतेल्यात घ्या. त्यात दुप्पट पाणी ओता. हाताने गोल गोल करुन धवळा. मग कलते करुन हळु हळु (साइड बाय साइड हलवत) दुसर्या भांड्यात काढत जा. पहिल्या भांड्यातील पाणी संपले की पुन्हा टाका. दुसर्या भांद्यातले पाणी काढत जा. हलकी मोहोरी पाण्याबरोबर येते आणि जड काकरी(खडे) तळाशी रहातात. नंतर मोहोरीतील पाणी नितरुन वळवुन घ्या.

घरी चुकून मॅक्सिकन चिली या फ्लेवरचं ची़झ स्प्रेड आणलं गेलंय. लेक बर्‍याचदा चपातीला ची़झ स्प्रेड फासून त्यावर भाज्या घालून रोल करून खातो. पण तो अजिबात तिखट खात नसल्याने आता या आख्ख्या डब्ब्याचं काय करायचं हा प्रश्ण आहे.

अल्पना, पराठ्यांची कणीक भिजवताना एक-दोन चमचे घालता येईल. कुठल्यातरी गणेशोत्सवात चीज स्प्रेडच्या पाकृ होत्या ना? नीट आठवत नाहीये. पण तुझीच एक डीपची पाकृ होती Wink

पराठ्याच्या कणकेची आयडीया छान आहे.
गेल्या वेळची आहे रेसेपी काकडीमध्ये भरून. पण ते डीप वगैरे प्रकार आम्ही दोघं खाऊन-खाऊन किती खाणार? खरंतर मी एकटीच.. नवर्‍याला पण तिखट लागेल ते स्प्रेड. आमच्याकडे लेक आणि नवरा दोघांची तिखट खाण्याची क्षमता सारखीच आहे जवळपास. Proud

पिझ्झा बेसवर चीज किसून घालायच्या ऐवजी हे चीजस्प्रेड फासून व इतर टॉपिंग्ज, पिझ्झा सॉस घालून पिझ्झे बनव. तीन-चार रेग्युलर साईज् पिझ्झ्यांमध्ये निम्मं चीजस्प्रेड तरी संपवता येईल!
तसंच टोमॅटो, बटाटा, इतर किसलेल्या भाज्या वगैरे घालून केलेल्या सँडविचमध्ये ते खपवता येईल. ब्रेडमुळे चीजस्प्रेडच्या तिखट चवीची तीव्रता कमी जाणवेल.

आणखी एक म्हणजे ब्रेडचा चुरा, हे चीजस्प्रेड, फेटलेले अंडे, हवे असल्यास थोडा पनीरचा चुरा, चवीप्रमाणे मीठ मिरपूड घालून, हवे असल्यास ब्रेडच्या चुऱ्यात घोळवून या मिश्रणाचे बॉल्स किंवा चपटे गोळे करून डीप फ्राय करायचे. हे क्रॉके जनरली किसलेले चीज वापरून करतात. यात तुम्ही सारणात थोडा शिजलेला भातही घालू शकता. गरमागरम क्रॉके वुईथ केचप - स्नॅक आयटेम.

अकुला हाणा!
दरवेळी काहीतरी भन्नाट आयडिया देऊन ठेवते. बेत किंवा युसुयुसा दोन्हीवर धमाल करत असते! कधी कंटाळाही येत नाही तिला, नि इथे नुसतं वाचन करणार्‍या बिगरी यत्तेतल्या सुगृहिणी (!!?) मनातल्या मनात किती चरफडत असतील याचा विचारही तिच्या मनाला शिवत नाही! नुसतं वाचून भूक खवळली तर रिकाम्या पोटी पित्त किती खवळतं हे तिला माहिती नाही! (मी अंडं खात नाही, त्यामुळे वरच्या युक्तीतला फेटलेल्या अंड्याचा भाग वजा करून मी इमॅजिन केलंय Wink )

अकु, मोठठा Light 1 नाहीच पुरला तर दीपमाळ घे! Proud

अल्पना,
राजमा उकडून मॅश करुन त्यात स्पायसी चीज स्प्रेड घातले तर टॉर्टिया चिप्स बरोबर डीप म्हणून वापरता येइल. किंवा सेम फिलिंग पोळी, टॉर्टियात गुंडाळून रोल्स किंवा पिनविल सॅडविच
उकडून श्रेड केलेले ब्लांड चिकन आणि स्प्रेड एकत्र मिसळून ब्रेडच्या स्लाईसमधे घालून टोस्टेड सॅडविच.

कुर्कुरीत, सोनेरी रंगाचे साबुदाणा-वडे करायचे आहेत. कसे करू ?

(उ.बटाटा+ भि साबुदाणा+ हि मि वाटून + दा. कूट +मीठ+ लिंबूरस + किंचित साखर
असे करून बघितले......पण मऊ झाले )

अकुला हाणा!
दरवेळी काहीतरी भन्नाट आयडिया देऊन ठेवते. बेत किंवा युसुयुसा दोन्हीवर धमाल करत असते! कधी कंटाळाही येत नाही तिला, नि इथे नुसतं वाचन करणार्‍या बिगरी यत्तेतल्या सुगृहिणी (!!?) मनातल्या मनात किती चरफडत असतील याचा विचारही तिच्या मनाला शिवत नाही!>>>>>प्रज्ञा ९ ला फुल्ल अनुमोदन. फक्त मी मनातल्या मनात चरफडत नाही, पण मोठ्ठा आ करुन वाचत असते.:फिदी: अकुला एवढ्या कल्पना कुठलाही ताण न घेता कशा जमु शकतात हे ब्रम्हदेवालाच माहीत असेल.

श्रीखंड कर्ताना साखर घातली की ते पातळ होउ नये यासाठी कहितरी युक्ति सांगा मैत्रिणींनो.
मी दही फड्क्यात बांधून वर काहितरी वजन ठेवते ३ ते ४ तास. मग नीट पीळून उरलेले पाणी पण काढुन टाकते. चक्का छान होतो. पण साखर घातली रे घातली की ते पातळ्सर होते.

Pages

Back to top