मी वाचलेले पुस्तक - २

Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे. Happy

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काळा सूर्य आणि हॅट घातलेली बाई ऑस्सम.

>>
अमा , मला झेपलंच नाही ते पुस्तक Sad
कंटाळा आला आणि मग ठेवून दिलं Uhoh

परिक्षण लिहा ना म्हणजे मी त्या दृष्टीने पुन्हा वाचायचा प्रयत्न करेन

Dharmakanya.jpg

हे पुस्तक नक्की विकत घेऊन वाचा. सुनियोजित आंतरराष्ट्रीय कारस्थान भारतातल्या राजकीय परिस्थितीवर कशा प्रकारे प्रभाव टाकू शकतं त्यासंदर्भातली अत्यंत वाचनीय अशी एक उत्तम राजकीय कादंबरी.

शांता शेळके यांचे धूळपाटी. अतिश्य छान पुस्तक. आता उपलब्ध आहे.
प्रकाशराव आमटे यांचे रानमित्र. बारके पण सुरेख पुस्तक. दे आर ऑसम आणि प्राण्यांशी माझे पण लगेचच जमते त्यामुळे एक मोठा स्पिरिचुअल भाउ मिळाला असे वाटले वाचून. फोटो सुरेख आहेत ह्यातले. उत्तम प्रिंटिन्ग. लोक बिरादरी प्रकल्पावर सात आठ कुत्री नेहमे असतात व इतर प्राण्यंच्या पिल्लाना आईविना जगाशी जुळवून घेताना ते लोक्स कुत्र्यांचाच माध्यम म्हणून वापर करतात. अस्वले हरिणे साप माकडे वाघ व सुसर मगर इतर प्राणी ह्यांच्या पालनाचे अनुभव आहेत.

अंताजीची बखर वाचून संपवलं. सुरूवातीला अतिशय भन्नाट वाटणारं पुस्तक शेवटालायेताना एकदम ढेपाळलं. नंतर नंतर अंताजी केवळ घटनांची जंत्रीच मांडतो आहे असं वाटायला लागलं. पुस्तक अर्थातच डीकन्स्ट्रक्शिनस्ट आहे, आणि वाचताना कित्येकजणांच्या "अस्मितेला धक्का" वगैरे बसवणारं आहे. बरेचदा या पुस्तकासंदर्भात फार वेला मी "तिरकस शैलीमधलंं" पुस्तक असं ऐकलं होतं. पण ती शैली इतकी पण काही तिरकस वाटली नाही(!!!!) पण तरी पुस्तक वाचणेबल नक्कीच आहे. सती जाण्याचा प्रसंग या पुस्तकामधला सर्वात जमलेला प्रसंग वाटला. आता मी फ्लॅशमन वाचायला घेणार आहे.

मुकुंद कुळे यांचं लोकरहाटी वाचलं. कोकणात लहानाची मोठी झाल्यानं बर्‍याचशा गोष्टी आधीपासून माहित होत्या तरी पुस्तकांत वाचायला मजा आली. कुळे यांनी चांगला अभ्यास करून पुस्तक लिहिलेलं असलं तरीही कुठेही ते जडबंबाळ वगैरे होत नाही. पुस्तकातला चुलीवरचा लेख वाचताना जागूनं लिहिलेला लेख आपसूक आठवला.

विशाखा पाटील यांनी अरबस्तानात राहून तिथल्या समाजजीवनावर एक पुस्तक लिहिले आहे. त्याबद्दल त्यांची मुलाखत कुठल्यातरी च्यानेलवर अर्धवटच ऐकली. एकूण त्यांची मुलाखत अनुभव आणि विष्लेषण उत्तम वाटले. ते पुस्तक कोणते ते महीत आहे का कुणाला?

विशाखा पाटील यांचं 'धागे अरब जगाचे' हे पुस्तक आणि त्यांची एवढ्यात म्हणजे ३० कि ३१ मे ला डॉ. निरगुडकरांनी मुलाखत घेतली होती 'हार्ट टू हार्ट' मधे. त्यात त्या पुर्वीच्या अन बदलत्या अरब जगाबद्दल सांगत होत्या.

येस

अलिकडे वाचलेलं आणि सगळ्यात लक्षात राहिलेलं पुस्तक म्हणजे गॉन गर्ल. जिलिअन फ्लीन ही लेखिका. सुरू करताना प्रेमाची टीपिकल गोष्ट आहे की काय असं वाटतं पण पुढे सगळीच समीकरणं फोल ठरतात.. खूप सस्पेन्स आणि शेवट खूप अन्प्रेडिक्टेबल आहे.. लिहिण्याची शैली अफाट आहे या बाईची.. आत्ताच यावर चित्रपट येउन गेला, पण बघायचा योग आला नाही.. तसेही मला पुस्तकांवर बेस्ड चित्रपट काहितरी कमी असल्याचा फील देतात.. जिलिअन फ्लीनची अजुन दोन पुस्तकंही वाचली, शार्प ऑब्जेक्ट्स अणि डार्क प्लेसेस तीपण छान आहेत.. खूप वेगळी शैली पण आपल्या आस पास ही गोष्ट घडते आहे असं सतत वाटंत रहातं.

जिलीयन फ्लीन मलादेखील फार आवडते. शार्प ऑबजेक्टस् सगळ्यात जास्त आवडलेलं. त्यानंतर गॉन गर्ल. डार्क प्लेसेस ठीकठीकच वाटलेलं.

बाप्रे! गॉन गर्ल वाचून मी हादरले होते. इतकं डार्क पुस्तक त्या आधी वाचलं नव्हतं आणि यापुढेही वाचणार नाही. शैली वगैरे जबरदस्त आहे, पण नॉट माय कप ऑफ टी!

कियोमी, शार्प ऑब्जेक्ट्स तीचं डेब्यू नॉवेल आहे. ते जरा जास्त सायको थ्रिलर वाटतं. एंड पर्यंत गेल्यावर खरंच भिती वाटायला लागली. स्पॉयलर टाकत नाही, पण खरा खूनी आणि ते दात भयंकर आहेत..
टीना, प्लीज आधी पुस्तक वाच.. मूवी चांगली आहे पण इमॅजीन करण्यात जास्त मजा आहे..
पूनम, हो ती खूपच डार्क लिहिते पण मला तोच जॉनर आवडतो.. मला स्टीवन किंग ची पुस्तकं खूप आवडतात (डार्क + हॉरर) Uhoh

आत्मधून, हो शार्प ऑब्जेक्टस् डेब्यु, मग डार्क प्लेसेस आणि मग गॉन गर्ल. मी वाचताना आधी गॉग मग शाऑ आणि मग डाप्ले वाचलं.
तुला सायको थ्रिलर आवडत असतील तर रेड ड्रेगन आणि सायलेन्स ऑफ द लँब्जपण आवडतील.
किंगची चांगली पुस्तकं सांगा. मला द शायनिंग फार आवडलेलं, पण डॉक्टर स्लिप अजीबात आवडलं नाही, मिस्टर मर्सिडीज ठीकठीक. मी फार इंप्रेस नाही किंगमुळे.

कियोमी, अगं तू नवी पुस्तकं वाचलीस म्हणून आवडला नाही तुला.. द शायनिंग अफाट आवडतं. त्याच्यावर आलेली मूवी पण बघ, क्लासी आहे! मला या क्रमाने आवडली आहेतः
The shining
Carrie
It (याच्यावर एक हिंदी मालिका आली होती, वोह नावाची. मी लहानपणी आवडीने पहात असे, पण पुस्तक वाचल्यानंतर कळलं किती भंगार होती ते Rofl )
Cujo
Pet semetery
Misery
Gerald's game
Christine..

"न सांगण्याजोगी गोष्ट" लेखक मे.जनरल शशिकान्त पित्रे

1962. साम्यवादी चीनबरोबरच्या त्या वर्षीच्या युध्दात आपला
दारुण पराभव झाला. जगभर त्यामुळे आपली मानहानी झाली.
म्हणून ती ठरली 'न सांगण्याजोगी गोष्ट'!

लायब्ररीत पुस्तक चाळताना कविता महाजनांचे ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम दिसले.. हे खरच कुणावर / कुणाचे आत्मचरित्र आहे का त्या फॉरमॅट मध्ये आहे फक्त ?

गो सेट अ वॉचमन वाचलं. टू किल अ मॉकिंगबर्ड हे माझ्या सार्वकालिक आवडत्या पुस्तकांपैकी एक असल्याने हे वाचणं अपरिहार्य होतं. खूप दिवसांनी (हॅरी पॉटर नंतर) प्रकाशनपूर्व नोंदणी करून, उत्सुकतेने बाकीची कामं जरा बाजूला सारून पुस्तक वाचलं Happy

आवडलं. अर्थातच स्वतंत्र कलाकृती म्हणून विचार करताना मॉकिंगबर्डच्या तुलनेत साधारणच आहे. पण मॉकिंगबर्डचा सीक्वेल म्हणून वाचलं की दोन्ही पुस्तकं मिळून मॉकिंगबर्ड मधली पात्रे, घटना, त्यांच्या आजूबाजूचा अवकाश यांना एक जास्तीचे परिमाण येते, काहीसे पूर्णत्व येते. आणि दोन्हीचा मिळून एकत्रित परिणाम जो होतो तो मला मनापासून आवडला.

स्पॉयलर अ‍ॅलर्ट

*****************************************************************************************

कथेचा जीव तसा छोटाच आहे. मॉकिंगबर्डमधली स्काउट आता तरुण आहे. एका छोट्या सुट्टीत न्यूयॉर्कवरून घरी आलेली असताना तिच्या भावनिक आयुष्यात घडलेली उलथापालथ, आतापर्यंत तिच्या सभोवतालचे लोक, ते गाव, सामाजिक संरचना हे तिला जसं वाटत होतं तसं नाहीये किंवा राहिलेलं नाहीये. त्याची व्यामिश्रता, चूक-बरोबर यांच्यासंबंधीच्या तिच्या 'आदर्शवादी' कल्पनांशी यातलं काहीच मेळ खात नाहीये. या बदलामधे, किंवा 'छुप्या वास्तवामधे' तिला इतकेदिवस देवासारखा वाटत असणारा बाप आणि जिवलग मित्र (ज्याच्याशी लग्न करायचं की नाही ते अजून नक्की होत नाहीये) हेही आहेत आणि त्यामुळे ती भावनिकदृष्ट्या जवळ जवळ उन्मळून पडायला आली आहे. या सगळ्याचा अर्थ उलगडायचा प्रयत्न करतेय. जिथे जन्मली, वाढली तिथलं सगळंच अनोळखी वाटायला लागलं आहे आणि पायाखालची जमीन सरकली आहे. मॉकिंगबर्डमधला लॉस ऑफ इनोसन्स हाही खूप निष्पाप निरागस वाटावा असा खराखुरा लॉस ऑफ इनोसन्स इथे होतो.
गोष्टीच्या शेवटी गुंता तिच्यापुरता सुटतो पण सुस्पष्टपणे, cut and dried, नाही. एक पात्र म्हणतं तसं या संघर्षाला कारणीभूत असलेले सामाजिक तणाव हे तिच्या आयुष्यातील भावनिक वाढीतील संघर्षासाठी incidental ठरत आहेत आणि खरी मेख ही तिचा बाप हा देव नाही तर गुणदोषयुक्त माणूसच आहे हे तिला पचत नाहीये हे आहे. पण हे कितीही खरं असलं तरी त्या सामाजिक ताणतणावांना स्काउट आणि आपणही इन्सिडेन्टल म्हणून दूर सारू शकत नाही कारण ते तिथे आहेतच आणि या संघर्षाला कुठेतरी कारणीभूत आहेत असं आपल्यालाही स्काउटप्रमाणेच वाटत रहातं.
इतकेदिवस हे विश्व आपणही तिच्या आणि तिच्या भावाच्या, दोन लहान मुलांच्या चश्म्यातून बघितलंय. तिथले माणसांचे चांगल्या वाईटाचे ताळेबंद तसे सरळच आहेत. आता मात्र हे सगळेच हिशोब मुळापासून तपासायला हवेत हे लक्षात आल्यावर स्काउटला तिचा विश्वासघात झाल्यासारखं वाटतं आहे. आणि वाचकालाही त्याने ज्या पात्रांना आदर्श समजले तीही हाडामांसाची सदोष माणसंच आहेत हे कळतं... तो लॉस ऑफ इनोसन्स आपलाही होतो. (कथानक न लिहिता जेवढं लिहिणं शक्य आहे तेवढं लिहिलंय.. फार घोळाचं अणि फोलपटयुक्त झालं असेल तर एकडाव माफी द्यावी)

***************************************************************
स्पॉयलर अ‍ॅलर्ट संपला
लिखाणाची शैली बर्‍यापैकी पाल्हाळिक आणि पसरट आहे. नायिकेच्या पूर्वायुष्यातील अनेक छोटे प्रसंग, इतर पात्रे यांचा हवाला देत देत कथा उभी रहाते. पण मला आवडली.
सुरुवातीला कथानक मला वर्णवर्चस्ववादातून बाहेर पडणार्‍या अमेरिकेशीच फक्त निगडित वाटत होतं आणि थोडी पानं वाचल्यावर एकदम लख्ख जाण्वलं की हे तर वैश्विक आहे आणि आजच्या माझ्या आधुनिक भारतीय समाजमानसिकतेलाही पूर्णपणे 'रिलेव्हन्ट' आहे. समाजगटांची नावं बदला फक्त. माझ्याच सामाजिक गटाला, त्यांच्या अर्ग्युमेन्टसना, त्यांच्या वास्तव अवास्तव भयगंडांना मी आरशात बघते आहे असं सारखं वाटत होतं. (आणी म्हणूनच कदाचित शेवट मला तितकासा परिणामकारक वाटला नसावा).

दुसरं असं की you can never go back home याचा प्रत्यय फार तीव्रतेने येतो. आपण जिथे वाढलो मोठे झालो ते आता केवळ एक स्मृतीचा भाग आहे. ती ठिकाणे, ते ताणेबाणे, ते लोक, आपलं कुटुम्बही आता काळानुसार फार बदललं आहे ही भावना प्रत्येक घर, गाव सोडून बाहेर जाणार्‍या व्यक्तीला कधीनाकधी जेव्हा पहिल्यांदा होते तेव्हा फार जीवघेणी आणि अस्वस्थ करून सोडणारी असते. त्याचा पुनर्प्रत्यय स्काउटबरोबर आपल्यालाही होतो. पण वाचकासाठी ते आणखी अस्वस्थ करणारे असते कारण you can never go back home but we have always believed that we could go back to our favourite books. या पुस्तकाबरोबर मॉकिंगबर्डच्या निरागस विश्वाचाही वाचकासाठी अंत होतो. एखादे पुस्तक मालिकेतील भाग आहे हे माहित असते तेव्हा वाचताना पात्रांच्या आलेखातील संभाव्य बदल अपेक्षित असतात. पण एखादे पुस्तक, क्लासिक म्हणून गणले गेलेले, पन्नास वर्षांमधे एकांडी कलाकृती म्हणून जेव्हा वाचकाने वाचलेले असते, त्याच्याशी एक नाते जोडलेले असते तेव्हा त्यानंतर 'लॉस ऑफ इनोसन्स' अपेक्षित नसतो. मी तरी परत कधीच मॉकिंगबर्ड त्या निखळ निरागस चश्म्यातून वाचू शकणार नाही. त्या पुस्तकाशी असलेले माझे नाते कायमचे बदलले आहे.

बाकी पुस्तकात काही काही वाक्ये, परिच्छेद एकदम खलास लिहिलेत. थोड्या वेळाने येऊन एक दोन उदाहरणे लिहेन म्हणते...

वरदा, छान लिहिलयस ! मी लायब्ररीत नंबर लावलाय. अजून ६ महिने वाट बघायला लागणार आहे.

वर्षा मुळे यांनी लिहिलेलं महाराणी पुतळाबाई यांच्या जीवनावरचं 'धाकट्या राणीसाहेब' वाचतोय.

मी सध्या गो सेट अ वॉचमन च्या तिसर्‍या चॅप्टरवर आहे.
पण रोज फक्त अर्धा-पाउण तासाच्यावर वेळ होत नाही वाचायला.

मस्त लिहिलं आहेस वरदा.

<<मी तरी परत कधीच मॉकिंगबर्ड त्या निखळ निरागस चश्म्यातून वाचू शकणार नाही. त्या पुस्तकाशी असलेले माझे नाते कायमचे बदलले आहे.>> हे सगळ्यात भारी वाटले, अगदी वाचावे की नाही असा प्रश्न पडावा इतके!

Pages