मी वाचलेले पुस्तक - २

Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे. Happy

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सध्या 'राजा रविवर्मा' वाचतेय.
घोर निराशा. Sad

हातात घेतेलेले पुस्तक अर्धवट ठेवायला आवडत नाही, केवळ म्हणूनच वाचून पूर्ण करणारे. Sad

एके काळी रणजित देसाईंच्या स्वामी, श्रीमान योगी ह्या कादंबर्‍यांवर अतोनात प्रेम होते. आता पुन्हा वाचायला घेतल्या तर प्रेम कमी होईल की काय ह्या शंकेने हात लावायचा धीर होत नाहीये.

वयानुसार वाचनानंदाचे क्रायटेरीया बदलत जातात, बहुदा Proud

++++++++++

गेल्या वर्षी डिसेंबरात पुरंदरे प्रकाशनाने मीना प्रभु ची (हो! मी मीना ला एकेरी हाक मारते! Happy जसं आपण लता-आशा करतो तसं आणि तितक्याच जवळीकीने! यासाठी व्यक्तिगत ओळख नसली तरी चालते! Happy ) सर्व पुस्तके संच स्वरुपात सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिली होती. डिसेंबरात नोंदणी करून मार्च मध्ये पुस्तके घरपोच आलीत. जमेल तसा एक एक करून फडशा पाडणे चालू आहे. Happy

वयानुसार वाचनानंदाचे क्रायटेरीया बदलत जातात, बहुदा >> हो. एकेकाळी वपु आवडायचे आता ती पुस्तक वाचायला नको वाटतात. खुपच बाळबोध वाटतात आता वपु. पण एकेकाळी त्याच पुस्तकांनी आनंद दिला होता हे खरे.

डॉ. माधवी मेहेंदळे यांचे 'दैवी प्रतिभेचा कलावंत - मायकेलअँजेलो' हे छोटेसे पुस्तक वाचले. तसंही त्याची कलाकारी जी काय पाहिली होती त्यावरुन भारावुन जायला होतेच पण एकुण त्याचे आयुष्य वाचुन आश्चर्यच वाटले. एकेका कलाकृतीला कित्येक वर्षे लागलीत तरी त्याचे सातत्य, एकाग्रता आणि स्किल्स कुठे कमी झाल्याचे जाणवत नाही. हे पुस्तक वाचल्यावर पुन्हा एकदा रोम आणि फ्लोरेन्सला जायला हवे असे वाटतेय. पुस्तक अगदी सोप्या भाषेत आणि सुटसुटीत लिहीले आहे.

टिळकां चे गीता रहस्य मराठीतून आहे ते कुठे मिळेल वाचायला? विकत घ्यायचे आहे.

पेपरमधली परिक्षणं वाचून बुकगंगावरून दोन पुस्तकं मागवली ती परवाच आली आहेत.

माय नेम इज रेड : हा ओरहान पामुक (https://en.wikipedia.org/wiki/Orhan_Pamuk) च्या पुस्तकाचा अनुवाद आहे. गणेश विसपुते यांनी केला आहे.

शोध : मुरलीधर खैरनार यांनी बराच रिसर्च करून लिहिलेली ही रहस्य कादंबरी आहे. जरा वेगळं आणि इंटरेस्टिंग दिसतंय.

शोधच्या ऋणनिर्देशात काही मायबोलीकरांची नावं वाचून छान वाटलं - शर्मिला फडके, नंदिनी देसाई आणि रणजित पराडकर.

Electric universe
Author: Bodanis, David.

हे एक सोप्या भाषेत लिहिलेले पण रंजक/उत्कंठावर्धक पुस्तक आपल्याला रोजच्या जीवनाचा अविभाज्य अंग असलेल्या विद्युत उर्जेची ओळख करून देते. वोल्ट/अ‍ॅम्पिअर/वॅट या त्रयीपासून सुरुवात करून मायकेल फॅरेडे, मार्कोनी, बेल, एडिसन, वॅटसन वॅट (रडारच्या शोधातील महत्त्वाचा सदस्य), अ‍ॅलन ट्युरिंग, बेल लॅब्जमधला ट्रान्झिस्टरचा शोध (विल्यम शॉकली ज्याच्यामुळे सिलिकॉन वॅली जन्माला आली + बार्डीन आणि ब्रॅट्टन) अश्या अनेक वल्लींमार्फत विद्युत उर्जेचा वापर कसा आपल्या जीवनात येत गेला याचा इतिहास लेखकाने मांडला आहे. पुस्तकातील एक धडा मनुष्याच्या शरीरातील विद्युत उर्जा, तिचे परिवहन याबाबत आहे. पुस्तकाचा उपोद्घात फार सुंदर. पुस्तक छोटेखानी असल्याने अनेक गोष्टींना स्थान मिळालेले नाहिये. पॉवर जनरेशन, आल्टरनेट करंट, टेस्ला वगैरे गोष्टी पुस्तकात येत नाहीत.

मामी Happy

शोध मस्त आहे. त्यावर लवकरच सविस्त्तर लिहिण्यात येईल.

सलग गेम ऑफ् थ्रोन्स, क्लॅश ऑफकिंज्ग्ज, स्टॉर्म ऑफ स्वोर्ड्स वाचून संपवलं. आता फीस्ट ऑफ क्रोज वाचते आहे. सीरीज अफलातून आहे. सलगता फार चांगली राखली आहे.

कालच फ्रेडरिक फोर्सिथचं आत्मचरित्र 'आउटसायडर' वाचलं. केवळ भन्नाट! त्याच्या कादंबर्‍यांच्याच तोडीचं थ्रिलिंग आयुष्य जगलाय हा बाबा....

नंतर तपशीलात लिहेन

पॉवर जनरेशन, आल्टरनेट करंट, टेस्ला वगैरे गोष्टी पुस्तकात येत नाहीत. >>

हे सर्व वाचायचं असेल तर एम्पायर्स ऑफ लाईट वाच, माझ्या सर्व इंटर्न्स आणि न्यू हायर्सना रेक्वायर्ड रीडिंग आहे .

Avoiding Armageddon: America, India, and Pakistan to the Brink and Back : Bruce Riedel

हे एक छोटेखानी पुस्तक आहे, जेमतेम २५० पानांच्या या पुस्तकात ब्रुस रिडेल या अमेरिकी डिप्लोमॅटने भारत, पाकिस्तान व अमेरिकेचे त्यांच्याबरोबरील संबंधांचा छान आढावा घेतला आहे. ब्रुस रिडेल काही महत्त्वाच्या घटनांच्या वेळी स्वतः उपस्थित होते. उदा: नवाझ शरीफ कारगिल युद्धाच्या वेळी जेव्हा अमेरिकेला तातडीच्या भेटीवर आले तेव्हा ब्रुस रिडेल शरीफ - क्लिन्टन बैठकीत नोट्स काढायला उपस्थित होते. तसेच गुजराल व इतर काही भारतीय पंतप्रधानांच्या भेटींच्या वेळी देखील ते उपस्थित होते. अमेरिकी परराष्ट्र खात्यात भारतीय उपखंडाचे तज्ञ म्हणुन त्यांनी अनेक वर्षे काम केले आहे.

पुस्तकात दोन्ही देश स्वतंत्र झाल्यापासून त्यांचे अमेरिकेबरोबर कसे संबंध राहिले, काय चुका झाल्या हे सविस्तर येते. आपल्याला वाटते तितके अमेरिका-पाकिस्तान संबंध ९/११च्या आधी देखील मैत्रीचे नव्हते. अमेरिका आपला ऑल वेदर दोस्त नाही व ऐनवेळी मैत्रीचा बळी देतो ही भावना पाकिस्तानी लष्करात व जनसामान्यांच्यात ६०च्या दशकापासून आहे. तसेच अमेरिकी निती ही शॉर्ट टर्म क्रायसेस मुळे कायमच प्रभावित राहिली. जेव्हा जेव्हा अमेरिकेने पाकिस्तानशी कडक व भारताशी मैत्री वाढवायचा प्रयत्न केला त्या त्या वेळी इतर घटक (सोविएतचा अफगाणिस्ताना प्रवेश), ९/११ याचा पाकिस्तानला फायदा झाला.
गेल्या २० वर्षात विशेषतः थोरले बुश, मग क्लिन्टन, आणि ओबामा कारकिर्दीत भारताबरोबर मैत्रिचे संबंध घट्ट करण्याचा खूप प्रयत्न झाला आहे.
काश्मिर मुद्दा हा अति कठिण या श्रेणीत ढकलून अमेरिका त्यात पडायचे टाळत आली. तसेच भारत आणि पाकिस्तान हे कधी कधी वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधे होते तर कधी एक्त्र असले तर अफगाणिस्तान त्यात नव्हता. यातल्या कुठल्याच देशाला स्वतंत्रपणे बघता येणार नाही आणि काश्मिरशिवाय यांच्यात संवाद होऊ शकत नाही.
काश्मिरमधली एल.ओ.सी. ही आंतरराष्ट्रीय सीमा जाहीर करून पाकव्याप्त काश्मिर व भारत काश्मिर यात खुला प्रवास, व्यापार सुरु ठेवणे, पाकिस्तानने लष्कर मागे घेणे, भारताने फक्त आवश्यक तेव्हडे लष्कर ठेवणे हा फॉर्मुला (फ्रान्स-जर्मनी मधील सार प्रांतांच्या धर्तीवर) अमेरिकेने रेटावा असे मत रिडेल यांचे आहे. मुशर्र्फ - वाजपेयी, मुशर्र्फ - मनमोहन सिंघ, झरदारी - मनमोहर सिंघ यांच्या वाटाघाटीत हाच फॉर्मुला कायम करण्या चा प्रयत्न झाला आहे असे बातम्यातून/अन-ऑफिशिअल अकाउन्ट्स मधून दिसून येते. याच आठवड्यात कस्तुरींच्या पुस्तकातदेखील याच धर्तीवरची विधाने आहेत.
इंग्लंडचा पाकिस्तानी राजकारणात असलेला प्रभाव (व थोडाफार भारतीय) आणि फार मोठा पाकिस्तानी समाज इंग्लंडमध्ये आज स्थायिक आहे याचा वापर केला पाहिजे असेही रिडल यांचे मत आहे.

रिडेल यांच्या पुस्तकाचा एक मोठा दोष म्हणजे चीनची उपखंडातील भुमिका व दूरगामी स्टेक्स याबद्दल काहिही अ‍ॅनास्लिसि नाही. चीन हा पाकिस्तानचा ऑल वेदर दोस्त आहे, हिंदी महासागर वर्च्चस्व हे पुढल्या ५० वर्षांत जिओपॉलिटिक्स डोमिनेट करणार हे दिसत असताना केवळ अमेरिकेच्या व युरोपच्या मदतीने भारत - पाकिस्तान प्रश्न तडीस निघेल असे म्हणणे शॉर्ट साइटेड असेल.

आणि कृपया हे पहाचः http://indianexpress.com/article/trending/dont-become-another-pakistan-w...

मेधा, ते पुस्तक बरेच दिवस यादीत होते तू मागे सांगितल्यापासून. आत्ताच लायब्रीत दिसले. होल्ड वर टाकले आहे!

इंटरेस्टिंग, टण्या. मी साधारण याच विषयावरचे "The Duel: Pakistan on the flight path of American power" हे तारिक अली यांचे पुस्तक वाचतोय. हे तारिक अली बहुधा कम्युनिस्ट विचारसरणीचे असावेत (नाव ऐकले होते पण आत्तापर्यंत फारशी माहिती नव्हती). त्यामुळे यात एक आणखी वेगळाच दृष्टीकोन दिसतो. पाक च्या भारताविरूद्धच्या युद्धप्रयत्नांबद्दल (थोडी पाकच्या क्षमतेची चेष्टा करणारी) टीका आहेत त्यात, पण एक तो 'वर्गीय' अ‍ॅन्गल वगैरे दिसतो, जो मी या विषयावरच्या पुस्तकांत आत्तापर्यंत बघितला नव्हता.

पाक च्या सुरूवातीच्या दिवसातली बरीच इंटरेस्टिम्ग माहिती आहे. भारताबद्दल बराच उदार दृष्टीकोन आहे.

मी तारिक अलिंची पुस्तके पाहिली आहेत लायब्रीत पण अजून वाचले नाहिये कुठलेही. पाकिस्तान तसेच भारत-पाकिस्तान संबंधांवर काही महत्त्वाचे लेखक:
ख्रिस्तोफ जेफर्लट (Christophe Jaffrelot), अनतोल लिवेन (Anatol Lieven), स्टेफन कोहेन (stephen p cohen), हुसेन हक्कानी (Husain Haqqani)

ईटरेस्टींग टण्या आणि फा. वाचायला हवे. धन्यवाद Happy
तारीक अलींच मी Clash of Fundamentalisms वाचलंय. ९/११ बद्दल लिहिलेलं. इंटरेस्टींग लिहितात.

टण्या, रार - ती वाचलेली नाहीत मी. बघतो येथे सहज मिळतात का.

पाक वर Descent into chaos हे एक चांगले वाचले होते. बाकी फाळणीबद्दलची वाचली आहेत पण सध्याच्या पाक वर नाहीत. बांगला देश मुक्ती व त्यावेळचे भारत-पाक-अमेरिका संबंध यावर Blood Telegram अतिशय जबरी पुस्तक आहे. नेटफ्लिक्स वर बेनझिर भुट्टोंवरची डॉक्युमेण्टरी व नंतर पाक या विषयावर युट्यूब वर पाहिलेले असंख्य व्हिडीओ असे one thing leads to another होत जाते यावर Happy

डिसेंट इन्टू केऑस वर मी मायबोलीवरच काही वर्षांपुर्वी लिहिले होते. http://www.maayboli.com/node/2685?page=39
ह्हे बघ. आपण दोघांनीच तेव्हा एकमेकांना पोस्टी टाकल्या होत्या Proud
या पुस्तकांचे क्रॉस रेफरन्स कसे ठेवायचे, ते तपासायचे कसे वगैरे शिकले पाहिजे. म्हणजे एखादा लेखक लिहितो की 'अमूक तमूक ने असे विधान केले' पण ते विधान आउट ऑफ कन्टेक्स्ट पुस्तकात घेतले आहे का, लेखक आपला व्युह (हे आमचे एक नातेवाईक व्यु ला व्युह म्हणतात तसे Happy ) पुढे ढकलतोय का ते सारखे चपापत बसायला लागते.

त्याच पोस्टमध्ये मी दिलेले दुसरे पुस्तक From Fatwa to Jihad: The Rushdie Affair and Its Legacy - केनन मलिकः पण अगदी वाचण्यासारखे आहे. मल्टिकल्चरलिझम हा भारतात उत्तरोत्तर तीव्र होत जाणारा विषय असेल.

खालिद हुसैनी यांच्या ' अ थाऊजंड स्पेल्न्डीड सन्स', ह्या पुस्तकाचा अनुवाद (मधुकर प्रधान) यांनी केलाय. तेच पुस्तक वाचतेय सध्या. कालच सुरुवात केली.

गाणार्‍याचे पोर ----- राघवेंद्र भीमसेन जोशी.
भीमसेन जोशींच्या पहिल्या बायकोच्या चिरंजीवांनी लिहिलेले पुस्तक आहे.आयुष्यभर पहिल्या संसारावर ,मुलांवर अन्याय झाला असूनही त्याचे रडगाणे नाही.उलट पित्याबद्दल आदरयुक्त हळवा भाव ,राघवेंद्र जोशींच्या मनात शेवटपर्यंत राहिले याचे नवल वाटत रहाते.

भूमी--- अशा बगे. परत एकदा ही कादंबरी वाचली.

डॉ. माधवी मेहेंदळे यांचे 'दैवी प्रतिभेचा कलावंत - मायकेलअँजेलो' हे छोटेसे पुस्तक वाचले .. >>
हो सावली. मी ही वाचलेय. मायकेलअँजेलो या इटालियन कलाकाराचे व्यक्तिचित्र फार छान रेखाटलेय त्यात. त्या पुस्तका पाठोपाठ दीपक घारे यांचे 'लिओनार्दो - बहुरूपी प्रतिभावंत' ही वाचले होते. ते ही छान पुस्तक आहे - लिओनार्दो द विन्सी (विंची?) वरती.

`...तरीही जिवंत मी!` हे सुआद यांचं पुस्तक याच आठवड्यात वाचलं. (मराठी अनुवाद - गौरी केळकर. मेहता पब्लिशिंग हाऊस) पॅलेस्टिनी तरुणीची ही भयंकर कथा आहे. दोनशे पानांचं पुस्तक अंगावर येतं. पण ही मंडळी लेखिकांचा ठावठिकाणा `युरोपात कुठे तरी` असा का सांगतात? `नॉट विदाऊट माय डॉटर`मध्येही असंच आहे. म्हणजे बाईवर सूड घेण्यासाठी संबंधित कुठपर्यंतही पोहोचू शकतात, हेच त्यातून त्यांना दाखवायचं असतं ना!

मागे अफगाणिस्तानच्या पुस्तकांची लाट आली होती. यातली काही पुस्तके ही बेतीव व खोटी असल्याचे आरोप झालेले आहेत. इव्हन दुसर्‍या महा युद्धा तल्या छळाच्या बर्‍याचशा कहाण्या 'लिहवून ' घेतल्या आहेत प्रचारासाठी असेही म्हटले आहे. वेगवेगळ्या संघटनांची आणि सरकारांची 'पोहोच 'लक्शात घेता या बाबीही अशक्य नाहीत. वेशेषतः वैय्यक्तिक अनुभवावरच्या पुस्तकातील तपशील व्हेरिफाय करणेही अशक्यच असते. अगदी नॉट विदाऊत माय डॉटर हेही काल्पनिकच आहे असे म्हटले जाते. वर म्हटल्या प्रमाणे लेखकाची गुप्तता राखण्यामागे हेही कारण असू शकते. आपल्याला उल्लू बनवणारे इतके लोक जगात आहेत की आपण फसवून सेन्टी होतो की काय असे बर्‍याच्दा वाटत राहते....
जर्मनांच्या मते दुसर्‍या महायुद्धातल्या मारल्या गेलेल्या ज्यूंची संख्या दोस्त राष्ट्रानी प्रचंड फुगवलेली आहे...

गदी नॉट विदाऊत माय डॉटर हेही काल्पनिकच आहे असे म्हटले जाते. >> लेखिकेच्या नवर्‍याने त्यावर एक पुस्तक लिहिलं आहे आणि त्यामध्ये तिनं लिहिलेलं किती चुकीचं आहे ते सांगितलं आहे. (पुस्तकाचे नाव आठवत नाहीये पन बहुतेक विदाऊट माय डॉटर)

"फिरुनी नवी जन्मले मी"
अरुणिमा सिन्हा हीचे "Born Again on the Mountain" या पुस्तकाचा मराठी अनुवाद केलाय प्रभाकर करंदीकर यांनी.

अलिकडली घटलेली सत्यकथा (२०११)
एक गरीब घरातील तरुणी लखनौहुन दिल्लीला रेल्वेने जात असते, जनरल डब्यातून. त्यात शिरलेल्या लुटेर्‍यांसोबत तिची चममक होते. डब्यातल्या एकाचीही तिला मदत करण्याची इच्छा / हिंमत होत नाही. लुटेरे तिला चालत्या गाडीतून बाहेर भिरकावतात.
नेमकी त्याच वेळेस विरुद्ध दिशेने दुसरी गाडी येते आणि एक पाय कापल्या जाऊन अत्यावस्थेत ती रुळांमध्ये पडते. रात्रभर, कित्येक तास.
ती मग इस्पितळात कशी पोचते, भूल न देता आपला पाय कापून घेण्यास कशी तयार होते, पुढे मिडिया आधी तिला कशी प्रसीद्धी देते आणि मग रेल्वे पोलीस आपली जबाबदारी झटकण्यास, असे काही घडलेच नाही, तिने रेल्वे प्रवास केलाच नव्हता वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा मिडिया तिच्या विरुद्ध कशी उलटते हे सगळे वाचून मन सुन्न होऊन जाते.

एक पाय कापलेला, दुसर्‍याचे ऑपरेशन, ही मुलगी धड चालेल की नाही अशीच बहुतेकांना शंका. बिचारीचं जिवन उध्वस्त झालं असंच बहुतेकांना वाटतं. पण जसे वाईट अनुभव तसे तिला चांगले अनुभवही येतात, चांगले लोक सुद्धा भेटतात.
आणि ही पठ्ठी ठरवते मी अशी लुळी पांगळी रहाणार नाही, मी एव्हरेस्ट सर करणार.
आणि शेवटी ती ते करुन दाखवते. एव्हरेस्ट सर करणारी जगातील पहिली अपंग महिला ठरते.

हे सर्व तिने कसे केले, सगळे या पुस्तकात आहे.

"फिरुनी नवी जन्मले मी " ही आहे या महान मुलीची आत्मकथा.
आवर्जून वाचण्याजोगी.

Pages