निषादची लहानपणची 'नर्सरी र्हाइम्सची' काही पुस्तकं अचानक सापडली. ती उघडून सगळ्या कविता पुन्हा एकदा वाचताना मला माझ्या लहानपणीची 'बडबडगीतं' आठवायला लागली. लहान मुलांच्या कवितांकरता इतकं समर्पक नाव सुचणार्या महाभागाचं कौतुक!
जशी आठवतील तशी आपापल्या बालपणीची , आठवणीतली गाणी इथे लिहून काढलीत तर वाचायला (बहुतेक सगळ्यांना) आवडेल. (अभ्यासक्रमातल्या कविता जुन्या हितगुजवर कुठेतरी लिहील्या आहेत. पण बडबडगीतं सापडली नाही.)
माझी एक आवडती कविता...
ह्या कवितेतला चित्ता खूप हावरट वाटायचा. कुणाला ह्या कवितेचे कवी आठवत असतील तर सांगा.
एकदा एक चित्ता
हातात घेऊन अडकित्ता
चित्ता आला दुपारी
मागु लागला सुपारी
मी म्हंटले "कशाला?"
तेव्हा चित्ता म्हणाला,
"नुकतेच जेवण झाले फक्कड,
खाऊन टाकले बारा बोकड.
बारा बोकड सोळा शेळ्या,
बघता बघता फस्त केल्या.
नंतर थोडी गंमत म्हणून,
तीन कोंबड्या टाकल्या खाऊन.
जेवण जरा जडच झाले,
भलते अंगावरती आले.
म्हंटले खावी सुपारी,
म्हणून आलो दुपारी."
किशोर मासिकातली एक...
आलगट्टी गालगट्टी
शोन्याशी गट्टी फू
तुला मी घेणार घेणार नाही
चॉकलेट गोळ्या देणार नाही
आलास तर घेईन गालगुच्चा
अंगावर सोडीन भू
पमगाडी, कूकगाडी
शेतावरची हम्मागाडी
आम्ही सगळे भूर जाऊ
एकटाच राहशील तू
पप्पु, बिट्टी, वेदा, राणी
आम्ही घेळू छापापाणी
तूच एकटा बाथरुममधे
रडके डोळे धू
(अशी दुष्ट प्रवृत्तीची बालगीतं आवडंत असल्याचं बघून आई-वडलांनी 'बाळीचे पाय पाळण्यातच ओळखले'.! )
अरे वा मृ.
अरे वा मृ. अशी बडबडगीतं शोधतच होते कधीचे. Thanks गं.
मृण्मयी
मृण्मयी छान बिबी सुरू केलास.
काय मेल्या त्या नर्सरी र्हाईम्स...
Georgy porgy pudding and pie..
kissed the girls and made them cry
किंवा
Goosey Goosey gander...
...
.....
there I met an old man
who could not say his prayers
i took him by the left leg and
threw him down the stairs...
काय शिकवतोय आपण आपल्या मुलांना ?
माझा मुलगा मला विचारतो ."आई असं का पाडलं आजोबांना ? "
असो.
ही मला आवडणारी / आठवणारी बडबडगीतं
म्हातारी आणि वाघोबा
जंगल झाडीत वाघोबा लपले
म्हातारीला बघून खुदकन हसले
"म्हातारे म्हातारे कुठे चाललीस ?
मला तर बाबा खूप भूक लागली"
"थांब थांब वाघोबा मला जाउदे
लेकीचे लाडू मला खाउ दे
लाडू खाउन होउन मी ताजी
मग कर माझी खुशाल भाजी"
दोनचार दिवसानी गंमत झाली
भोपळ्यात बसून म्हातारी आली.
वाघोबाने भोपळा अडविला
भोपळ्याच्या आतून आवाज आला
"म्हातारी बितारी मला नाही ठाउक
चल रे भोपळ्या टुणुक टुणुक"
विदुषक
लांबनाक्या विदुषक
खेळ करतो बेलाषक
उंच टोपी उडवितो
आमचे चेंडू दडवितो
कुणाचिही घालतो चप्पल
कुणालाही देतो टप्पल
हा आम्हाला हसवतो
हाच आमहाला आवडतो.
परी
एक होती परी
तिला सापडली दोरी
दोरी होती लांब
जवळ होता खांब
दोरी बांधली खांबाला
परी लागली चढायला
दोरी तुटली खस्सकन
परी पडली धप्पकन !:हाहा:
डॅफो,
डॅफो, कित्ती दिवसांनी वाचली 'जंगल झाडीत वाघोबा लपले'. आवडती कविता. थँक्यु!
ही 'माकडं निघाली ' कविता माझी आतेबहीण म्हणायची. (विथ अॅक्शन! :P) 'उसाच्ची बंदुक आणि शेपटीच्च्या खुर्च्या' असंच म्हणायचं.
माकडं निघाली शिकारीला
उसाच्ची बंदुक खांद्याला
माकडं निघाली लढाईला
नारळाचे बाँब फेकायला
माकडं निघाली नाटकाला
शेपटीच्च्या खुर्च्या बसायला
माकडं निघाली लग्नाला
नकट्या नवर्या जोडीला.
एक होते
एक होते खोबरे
गाल काळे गोबरे
ताइला ते दिसले
तिने त्याला किसले
त्यात घातली साख्रर
वेलची आणि केशर
अशी तिची करामत
छान झाली खिरापत
एक होती
एक होती इडली
ती फार चिडली
चिडून धावत सुटली
धावता धावता अडली
सांबार चटणीत बुडली
सांबार होते गरम गरम
इडली झाली नरम नरम
तिकडून आला चमचा खुशीत
जाऊन बसला बशीत
चमच्याने पाहिले इकडे तिकडे
इडलीचे केले तुकडे तुकडे
सगळ्यामुलांनी केली फस्त
इडली झाली मस्त मस्त
एक होती
एक होती आजी
चिरत होती भाजी
भाजीतून निघाली आळी
आजी होती आंधळी
आळीने घेतला चावा
आजी म्हनाली धावा
मुले आली धावून
आळी काडली पाहून
आळी टाकली लांब
आजीचे झाले काम
मुले लागली नाचायला
आजी लागली गायाला.
चांदोमामा
चांदोमामा भारी खट्याळ पोर
एक नंबरचा दंगेखोर
छळायचा सगळ्या तार्यांना
आभाळात घालून धिंगाणा
एकदा आई त्याला रागवली
चापट देउन म्हणाली
बाळा तुझी मोडते खोड
जेवण तुझं करते बंद
चंदू बिचारा खूप खूप रडला
पंधरा दिवसात बारीक झाला
दया आली आईला
चंदूला दिलं जेवायला
अस्सा पठ्ठया फुगत गेला
पंधरा दिवसात टुमटुमित झाला
आरगोटी गारगोटी
चांदोमामाची झाली फजिती.
****************
ठेविले अनंते तैसेची रहावे
चित्ती असू द्यावे समाधान!
एक होती
एक होती आजी
चिरत होती भाजी
भाजी चिरली खसाखसा
तांदुळ घेतला पसापसा
भात शिजला रटारटा
मुले जेवली मटामटा
मुले गेली खेळायला
धावायला अन पळायला
खेळून खेळून दमली
आजीजवळ झोपली.
दोन होती
दोन होती अंडी
त्यांना वाजली थंडी
दात लागले वाजायला
अंडी लागली नाचायला
नाचता नाचता टक्कर लागली
दोन अंडी फुटून गेली
आईने केले आम्लेट मस्त
मुलांनी खावून केले फस्त.
मस्तच
मस्तच बडबडगीतं. 'जंगलझाडीत बाघोबा लपले' सोडून बाकी इतर कधी ऐकली नव्हती.
अटक मटक
अटक मटक चवळी चटक
चवळी झाली गोड गोड
जिभेला आला फोड फोड
जिभेचा फोड फुटेना
मामाला बायको मिळेना..
ढुम ढुम
ढुम ढुम ढोलक
पी पी बाजा
आज आहे आमची
खूप खूप मजा
छान छान बाहुली
बाहुलीचा नवरा
लगीन लागलं
पसारा आवरा.
एक होता
एक होता भोपळा
वेलीवरती झोपला
आजीला तो दिसला
तिने त्याला किसला
भोपळ्याची केली भाजी
भाजी झाली मस्त
मुलांनी खावून केली फस्त.
छानच !!!
छानच !!! माकडे निघाली शिक्कारीला - म्हणून कित्तीतरी दिवस झाले
बाहुले
बाहुले बाहुले डोल डोल
चुटू चुटू बोल बोल
दूध पी कपभर
मग घेईन कडेवर
रडू नको थांब थांब
राहिले माझे काम काम
काम करुन घेईन तुला
नेईन भूर देईन फुगा.
एक होतं
एक होतं झुरळ
चालत नव्हतं सरळं
गाडीमध्ये चढलं
तिकिट नाही काढलं
कंडक्टरने पाहीलं
बाहेर फेकुन दिलं
.................................................................................
शहाण्याचे ते कसले जगणे? जगाप्रमाणे जगती ते...
वेडे जगती मनाप्रमाणे! मग जगही त्यांच्यामागे वेडे....!!
एक होता
एक होता बंगला
त्यात राही टिंगुला
बंगल्याभोवती बाग
बागेमध्ये कारंजे
कारंज्यात मासे
बागेभोवती ससे
खुराड्यात कोंबडे
तबेल्यात घोडे
गोठ्यामध्ये गाय
विहिरीत पहा काय
कासव आणि बेडुकराव
यांची सदा डराव डराव
बिळामध्ये उंदीर
घरामध्ये मांजर
दारामध्ये कुत्रा
टिंगुला आमचा भित्रा
असा होता बंगला
त्यात राही टिंगुला
.................................................................................
शहाण्याचे ते कसले जगणे? जगाप्रमाणे जगती ते...
वेडे जगती मनाप्रमाणे! मग जगही त्यांच्यामागे वेडे....!!
दत्ताची
दत्ताची गाय
आईच दुध
दुधाच दही
दह्याच ताक
तकातल लोणी
लोण्याच तुप
तुपाची बेरी
बेरीची माती
मातीच देऊळ
देवळातली घंटा
घण घण घण!!
मस्त बी बी
बालणात गेले एकदम.आणि काही बालगीत टाकण्याचा मोह आवरलाच नाही.
.................................................................................
शहाण्याचे ते कसले जगणे? जगाप्रमाणे जगती ते...
वेडे जगती मनाप्रमाणे! मग जगही त्यांच्यामागे वेडे....!!
एक होतं
एक होतं झुऱळ
चालत नव्ह्तं सरळ
बस मध्ये चढलं
तिकिट नाही काढलं
कंडक्टर ने विचारलं
बाळ तु कुणाचा
मी माझ्या आईचा
अजून एक
खार बाई खार
नाजूक नार
शेपूट तिचे
किती झुपकेदार
खार बाई खार
चपळ फार
क्षणात होते
नजरे पार
किशोरमासि
किशोरमासिकात खूप पूर्वी आली होती.
क कसा क कसा ?
कमरेवर हात विठोबा जसा.
अ कसा अ कसा?
गुबर्या गालात हसतोय जसा.
ई कशी ई कशी
डोक्यावर पदर घेतलीये जशी.
उ कशी उ कशी?
चटणी वाटत बसलीये जशी
ऐ कसा ऐ कसा
बॉलिंग टाकतोय बाळु जसा.
( अजुन बरीच मोठी आहे कवीता कोणाला आठवते आहे का?
वाटाणा
वाटाणा फुटाणा शेंगदाणा
उडत चालले टणाटणा
वाटेत भेटला चिमुकला तीळकण
हसायला लागले तिघेजण,
तीळा तीळा , कसली रे गडबड?
सांगायला वेळ नाही थांबायला वेळ नाही...
........ ....... .....
तीळ चालला भराभर, वाटेत लागले ताईचे घर,
तीळ शिरला आत, थेट स्वैयंपाकघरात ,
ताईच्यापुढ्यात रिकमी परात
हलवा करायला तीळ नाही घरात!
ताई बसली रुसून, तीळ म्हणाला हसून
घाल मला पाकात , हलवा कर झोकात
ताईने घेतला तीळ परातीत , चमच्याने थेंब थेंब पाक ओतीत , इकडून तिकडे बसली हलवीत,
शेगडी पेटली रसरसून , वाटाणा फूटाणा गेले घाबरुन
पण तीळ पहा कसा ? हाय नाही हूय नाही , हसे फसा फसा!!
....
...
वटाणा फूटाणा पाहिलेत ना? एव्हढासा म्हणून हसलात ना?
कणभर तीळाची मणभर करामत.
( मधल्या आणि शेवटच्या ओळी नीट आठवत नाहीयेत , कुणाला येत असल्यास कृपया लिहा.)
भटो भटो
भटो भटो कुठे गेला होतात?
भटो भटो कुठे गेला होतात?
कोकणांत.
कोकणातून काय आणलं?
फणस.
फणसांत काय?
गरे.
गर्यांत काय?
आठळी.
आम्ही खातो गरे, तुम्ही खा गरे, म्हशीला काय?
चारखंड.
खबडक खबडक
खबडक खबडक घोडोबा,
घोड्यावर बसले लाडोबा.
लाडोबाचे लाड करतं कोण?
आजोबा, आज्जी, मावश्या दोन.
~साक्षी
कैरी,
कैरी, मिरची, कोथिंबीर, आलं

एकदा त्यांचं भांडण झालं.
कशावरुन कशावरुन?
येवढ्याश्या खोबर्याच्या तुकड्यावरुन.
काकु आल्या पदर खोचुन,
एकेकाला काढले ठेचुन ठेचुन.
चटणी काढली बशीत,
जेवण झालं खुशीत!
_______________________________
"शापादपि शरादपि"
बोकोबा
बोकोबा बोकोबा
आहे कुठे डोळा
दिसतोय का कुठे
लोण्याचा गोळा?
आणखी एक
आईच्या बाळाला
अक्कल ना शक्कल
बाळाच्या चड्डीला
बटण ना बक्कल
माझ्या भावाला हे शिकवलं होतं. तो नेहमी चुकीचच म्हणायचा मी, आई आणि बहीण खूप हसायचो.
_______________________________
"शापादपि शरादपि"
एक खूप
एक खूप जुनी छोटीशी कवीता आठवली. माझ्या वडिलांच्या तोंडुन ऐकल्या आहेत.
बोकोबा तर गडी एकटा
गुरगुर फुसफूस मुखी सपाटा
सुरू करी अनिवार
तेव्हा शुर गड्यांचे पोटी
धस्सच झाले गोष्ट न खोटी
निळूचे हातुन गळली काठी
वाहवा रे सरदार
अजुन एक छोटी कविता
लांबट मान्या ठिपकेवाला
प्राणी खिडकीमधुनी आला
धडा गिरवला जो बाळाने
चटुनी त्याने टाकियला.
धनु.
चांदोबा चांदोबा भागलास
चांदोबा चांदोबा भागलास का
सोसायटीच्या बिल्डिंग मागे लपलास का
सोसायटी ची बिल्डिंग पाच मजली
मामाचा वाडा पाडून बांधली
मामाच्या फ्लैट मध्ये येवून जा
पाव-भाजी खावुन जा
पावात सापडली माशी
चांदोबा राहिला उपाशी
ऋतु ची गंमत (नक्कल) ऋतु भारी
ऋतु ची गंमत (नक्कल)
ऋतु भारी खट्याळखोर
एक नंबरची दंगेखोर
छळायची साऱ्या साऱ्या ना
घरामध्ये घालून धिंगाणा
एकदा मम्मी तिला रागवली
चापट देउन म्हणाली
थांब तुझी मोडते खोड
फिरण तुझं करते बंद
ऋतु बिचारी खूप खूप रडली
पंधरा दिवसात बारीक झाली
दया आली मग मम्मीला
ऋतु ला नेल दूर फिरायला
आश्शी पठ्ठी खुश झाली
पंधरा दिवसात टुमटुमित झाली
आपल्याकडे लहान मुलांना नवीन
आपल्याकडे लहान मुलांना नवीन शब्द, वेगवेगळ्या प्राणी-पक्ष्यांची नावे, सण इ. ची सोप्या पद्धतीने ओळख करून देण्याच्या दृष्टीने खूप बडबडगीते, गाणी, कविता आहेत. मुलांना जेवू घालताना, झोपवताना, सकाळी उठवताना, आंघोळ घालताना वै. म्हणण्याची ही गाणी मुलांना जाम आवडतात.
माझ्या माहीतीत असलेली अशी बडबडगीते, गाणी, कविता इथे पोस्टतेय
१)
ये गं ये गं सरी,
माझे मडके भरी
सर आली धावून
मडके गेले वाहून
२)
टपटप टपटप टाकीत टापा चाले माझा घोडा
पाठीवरती जीन मखमली पायी रुपेरी तोडा
टपटप टपटप...
उंच उभारी दोन्ही कान
ऐटीत वळवी मागेच मान
मध्येच केव्हा दुडकत दुडकत
चाले थोडा थोडा
पाठीवरती जीन मखमली पायी रुपेरी तोडा
टपटप टपटप...
घोडा माझा फार हुशार
पाठीवर मी होता स्वार
नुसता त्याला पुरे इशारा
कशास चाबूक ओढा
पाठीवरती जीन मखमली पायी रुपेरी तोडा
टपटप टपटप...
पाच अरण्ये समुद्र सात
ओलांडील हा एक दमात
आला आला माझा घोडा
सोडा रस्ता सोडा
पाठीवरती जीन मखमली पायी रुपेरी तोडा
टपटप टपटप...
३)
अजाण आम्ही तुझी लेकरे तू सर्वांचा पिता
प्रेमाने तुज नमितो गातो तुझ्या गुणांच्या कथा
चंद्र-सूर्य हे तुझेच देवा तुझी गुरे वासरे
तुझीच शेते, सागर, डोंगर, तुझी फुले पाखरे
अनेक नावे तुला तुझे रे दाही दिशांना घर
करीशी देवा सारखीच तू माया सगळ्यांवर
खूप शिकावे काम करावे प्रेम धरावे मनी
हौस एव्हढी पुरवी देवा हीच एक मागणी
४) माझ्या आईने स्वतः बनवलेलं हे एक गाणं आहे
मनूच्या ओटीवर कोण कोण येतं? कोण कोण येतं?
काऊ येतो आणि चिऊ येते
मनूच्या ओटीवर कोण कोण येतं? कोण कोण येतं?
भूभू येतो आणि माऊ येते
मनूच्या ओटीवर कोण कोण येतं? कोण कोण येतं?
पोपत येतो आणि मैना येते
मनूच्या ओटीवर कोण कोण येतं? कोण कोण येतं?
मोर येतो आणि लांडोर येते
मनूच्या ओटीवर कोण कोण येतं? कोण कोण येतं?
बाघोबा येतो आणि कोल्होबा येतो
मनूच्या ओटीवर कोण कोण येतं? कोण कोण येतं?
कब्बु (कबूतर) येतो आणि खारूताई येते
+++++++आपल्याला हवी तशी अॅडीशन करता येते यात प्राण्या-पक्ष्यांच्या नावाची ++++++
५)
एक होतं झुरळ
चालत नव्हतं सरळ
बसमध्ये चढलं
सीटखाली दडलं
तिकिट नाही काढलं
तरी घर गाठलं
माझ्या आईने एका वहीत अशा खूप बालकवितांचा संग्रह केला आहे. त्या ही शेअर करेन जमेल तसे इथे.
उठा उठा चिऊताई सारीकडे
उठा उठा चिऊताई
सारीकडे उजडलें
डोळे तरी मिटलेले
अजूनही!
सोनेरी हे दूत आले
घरट्याच्या दारापाशी
डोळ्यावंर झोप कशी
अजूनही!
लगबग पांखरें हीं
गात गात गोड गाणे
टिपतात बघा दाणे
चोहीकडे!
झोपलेल्या अशा तुम्ही
आणायचे मग कोणी
बाळासाठी चारा-पाणी
चिमुकल्या?
बाळचे नी घेतां नांव
जागी झाली चिऊताई
उठोनिया दूर जाई
भूर भूर ........
.....................कुसुमाग्रज.
ओह.. ह्या कुसुमाग्रजांच्या
ओह.. ह्या कुसुमाग्रजांच्या आहेत ओळी?? पहिल्या ४ ओळी आई नेहेमी म्हणते मला उठवायला. अजुनही!
नॉस्टॅल्जिक झाले..
Pages