आठवणीतली बडबडगीतं

Submitted by मृण्मयी on 28 March, 2009 - 12:57

निषादची लहानपणची 'नर्सरी र्‍हाइम्सची' काही पुस्तकं अचानक सापडली. ती उघडून सगळ्या कविता पुन्हा एकदा वाचताना मला माझ्या लहानपणीची 'बडबडगीतं' आठवायला लागली. लहान मुलांच्या कवितांकरता इतकं समर्पक नाव सुचणार्‍या महाभागाचं कौतुक!
जशी आठवतील तशी आपापल्या बालपणीची , आठवणीतली गाणी इथे लिहून काढलीत तर वाचायला (बहुतेक सगळ्यांना) आवडेल. (अभ्यासक्रमातल्या कविता जुन्या हितगुजवर कुठेतरी लिहील्या आहेत. पण बडबडगीतं सापडली नाही.)

माझी एक आवडती कविता...
ह्या कवितेतला चित्ता खूप हावरट वाटायचा. कुणाला ह्या कवितेचे कवी आठवत असतील तर सांगा.

एकदा एक चित्ता
हातात घेऊन अडकित्ता
चित्ता आला दुपारी
मागु लागला सुपारी
मी म्हंटले "कशाला?"
तेव्हा चित्ता म्हणाला,
"नुकतेच जेवण झाले फक्कड,
खाऊन टाकले बारा बोकड.
बारा बोकड सोळा शेळ्या,
बघता बघता फस्त केल्या.
नंतर थोडी गंमत म्हणून,
तीन कोंबड्या टाकल्या खाऊन.
जेवण जरा जडच झाले,
भलते अंगावरती आले.
म्हंटले खावी सुपारी,
म्हणून आलो दुपारी."

किशोर मासिकातली एक...
आलगट्टी गालगट्टी
शोन्याशी गट्टी फू

तुला मी घेणार घेणार नाही
चॉकलेट गोळ्या देणार नाही
आलास तर घेईन गालगुच्चा
अंगावर सोडीन भू

पमगाडी, कूकगाडी
शेतावरची हम्मागाडी
आम्ही सगळे भूर जाऊ
एकटाच राहशील तू

पप्पु, बिट्टी, वेदा, राणी
आम्ही घेळू छापापाणी
तूच एकटा बाथरुममधे
रडके डोळे धू

(अशी दुष्ट प्रवृत्तीची बालगीतं आवडंत असल्याचं बघून आई-वडलांनी 'बाळीचे पाय पाळण्यातच ओळखले'.! Proud )

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मन-कवड्या,

त्या "छडी लागे छम छम छम.." वाल्या गाण्यात अजून एक शेवटचे कडवे असे आहे:

तोंडे फिरवा पुस्ती गिरवा बघू नका कोणी
हसू नका रडू नका बोलू नका कोणी
म्हणा सारे एकदम
ओम नमः सिद्धम्, ओम नमः सिद्धम्
छमछमछम छमछमछम

इथे इंग्रजी मधली पण nursery rhymes लिहा ना येत असतील कुणाला तर. आजच्या पिढीला ते ही आवश्यक आहेच ना. आत्ताच एका मैत्रिणीने मला ही nursery rhymes ची लिंक दिली आहे. ती इथे शेअर करतेय Happy

http://www.nurseryrhymes.co.in/some-rhymes.htm

झाडावरून पडला आंबा
टुणकन जाउन पेटीत बसला

फणसबुवा हळूच हसला
हळूच जाउन टोपलीत बसला

आंब्याची पेटी फणसाची टोपली
सरकत सरकत बोटीत बसली

भो भो वाजला भोंगा
उभा होता मुंबईचा टांगा

टांगा मोटार झाली टक्कर
फणस्बुवांना आली चक्कर

आंबा गेला गड्गडत
फणस्बुवा धड्पडत

आंबा झाला पिवळा पिवळा
फणसाचा झाला लोळा गोळा

नको रे बुवा मुंबईची हवा
कोकण आपले बरे बुवा !!

मला अजुन एक कविता आठवली, खुप पुर्वी किशोर मासिकात आली होती . इंदिरा संताची आहे
बाबा तेवढे गावाला जाणार ,
नाही नाही मी पण जाणार, मी पण जाणार !

आईची आठ्वण काढणार नाही
दिसेल ते ते मागणार नाही.
हट्ट काही करणार नाही,
झोपेत ऊठून रड्णार नाही,
आई माझे कपडे भर , तयार होतो भराभर,
पुस्तक, पेन पाटी पेन्सिल
गाडीत तेव्ह्ढाच वेळ जाईल.
डबा तेवढा हातात दे खिशात खारे दाणे दे
आधी माझे कपडे कर मग तुझे काम कर.

बाबांचे कपडे करुन झाले,
बाबांचे सामान भरुन झाले,
दारा समोर मोटार आली
सामान घेउन नंदा गेली

पण जाणार जाणार कुठे गेला?
आईच्या मागे जाउन लपला

मी नाही बाबा , मी नाही जाणार
आईच्या सोबतीला इथेच रहाणार!!!
- इंदिरा संत.

आम्ही अटक मटक असं म्हणतो..

अटक मटक चवळी चटक
चवळी झाली गोड गोड
जिभेला आला फोड फोड
जिभेचा फोड फुटला
घरचा पाहुणा उठला.. Happy

अडगुलं मडगुलं

अडगुलं मडगुलं
सोन्याचं कडगुलं'
रुप्याचा वाळा
तान्ह्या बाळा
तीट लावा.. Happy

एक गाणं थोडंसच आठवतय मला.. कोणला पुढे माहित असले तर लिहा..
एक झुरळ
रेडीओत गेलं
गवई होउन
बाहेर निघाले

एक उंदिर
तबल्यात गेला
तबलजी होउन
बाहेर निघाला

पुढचं नाही आठवत.. Sad

लोकहो, आत्ताच पुस्तकांच कपाट आवरताना विंदा करंदीकरांचं 'अजबखाना' हे बालगीतांच पुस्तक सापडलं. खुप मस्त मस्त बालगीतं/बडबडगाणी आहेत त्यात. आज परत लेकीला बरीच वाचुन दाखवली. अगदी संग्रही ठेवावं असं पुस्तक आहे हे.

थोडासा विषय बदल.. माझ्याकडे शाळेतत्या कविता म्हणुन एक शम्भरपानी PDF आहे. कुणाला हवी असेल तर मला विपू टाका.. तुमच्याकडे gmail असेल तर Document Share पण करता येईल..
यात दिडशे तरी कविता असतील..

अरे माझ्याकडून पण ....

छान माझी बाहुली....
मोठी तिची सावुली...
घारे डोळे फिरवीते...
चपटे नाक उडवीते...
भात केला कच्चा झाला...
वरण केले पातळ झाले...
आडाच पाणी काढायला गेली....
डुपकन पडली आत..... Happy

आणखीन एक

माझ हे घर छान सुंदर...
चांदोबाच घर जस डोंगरावर ...
माझ्या या घरात येऊन जा...
तुप रोटी खाऊन जा....

मिरची कोथिंबीर आल,
त्या तिघांच भांडण झाल
आजीबाई आल्या पदर खोचुन
त्या तिघांना काढल ठेचुन
त्यांची केली सुरेख चटणी
ती ठेवली बशीत
जेवण झाले खुशीत.

अभिनय आवश्यक Happy बच्चे कंपनी सॉलिड एन्जोय करते ...

एक होता आक्या
एक होता मक्या
एक होते मी

आक्या गेला फिरायला
मक्या गेला फिरायला
मी पण गेले फिरायला

आक्याला एक पैसा सापडला
मक्याला एक पैसा सापडला
मलाही एक पैसा सापडला

आक्या ने खाऊ घेतला
मक्याने खाऊ घेतला
मी ही खाऊ घेतला

आक्या ने खाऊ खाल्ला
मक्याने ने खाऊ खाल्ला
मी ही खाऊ खाल्ला

आक्या गेला आडावर
मक्या गेला आडावर
मी हि गेले आडावर

आक्याने पाणी पिले
मक्याने पाणी पिले
मी पाणी पिता पिता आडात पडले

आक्याने एक हात पकडला
मक्याने एक हात पकडला
मी वर आले

आक्याने एक चापट दिली
मक्याने एक चापट दिली
मी रडायला लागले

आक्याने एक डोळा पुसला
मक्याने एक डोळा पुसला
मी हसायला लागले

वाघाची मावशी, ए मनी मावशी
वाघाला आण ना घरी एके दिवशी

तुझं की नाही बाळा, काहीतरीच बाई,
वाघ काही इथं या गावात रहात नाही!

मग कुठे? लांबलांबच्या तिथे
तिथे म्हणजे कुठे? लांबलांबच्या जंगलात!

जंगलात जायची तुला वाटते ना गं भीती?
छे रे बाळा! आता मी थकले आहे किती?

उंदिरमामा दिसताच जातेस कशी पळत?
तू लहान आहेस बाळा, तुला एव्हढं नाही कळत

कळत नाही म्हणून तर थापा मारतेस अशी?
म्हणे मी जंगलातल्या वाघोबाची मावशी

शर्थ झाली बाई! तुला खोटं वाटतं का रे?
वाघाची आई माझी बहीण आहे बरे!

भेटायला तिला तू का नाही जात?
जंगल आहे दाट, तिथं सापडत नाही वाट

अंधार म्हणतो मी अंधार म्हणतो मी
त्यात जरा अलिकडं दिसतं मला कमी

बरं का रे बाळा,
जंगलातल्या वाघोबाची सूरु असेल शाळा

सूट्टी लागली ना, की मग आणीन मी घरी
नसत्या उठा ठेवी याला काय बाई तरी!

कवी
- अज्ञात(किंवा तूर्तास माहीती नाही!)

ही सध्या मला आणि गार्गीला म्हणायला आवडणारी कवीता आहे!

छोटी माझी गाडी तिला जोडलं बदक
तिला जोडलं बदक
गाडी दीली सोडुन
करत बसलंय पक पक पक
----- मधली कडवी आठवत नाहीयेत

छोटी माझी गाडी तिला जोडला घोडा
तिला जोडला घोडा
गाडी आली गाडी आली जरा वाट सोडा

जंगल झाडीत वाघोबा लपले, म्हातारीला पाहून खुदकन हसले
अग अग म्हातारे कुठे चालली, खाऊ दे मला आता भूक लागली
थांब थांब वाघोबा मला जाऊ दे, लेकीचे लाडू मला खाऊ दे
लाडू खाऊन होइन ताजी, मग कर हवी तर खुशाल भाजी
दोन तीन दिवसांन्नी गम्मत झाली, भोपळ्यात बसून म्हातारी आली
वाघोबाने भोपळा अडविला, भोपळ्याच्या आतून आवाज आला
म्हाताती कोतारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुणुक टुणुक

चांदोमामा घर तुझं लांब लांब लांब
पाय दुखतील चालून जरा थांब थांब थांब
चालू नको गड्या असा झप झप झप
निंबोणीच्या झाडामागे लप लप लप
निंबोणीचं झाड आहे छान छान छान
तुझ्यासारखी आई माझी गोरी गोरी पान
तुझ्यासारखा चेहरा तिचा गोल गोल गोल
भाऊ ना रे आईचा तू बोल बोल बोल
तुझ्यासाठी खाऊ केला गोड गोड गोड
आळिमिळी गुपचिळी सोड सोड सोड

हे एक ताजे बडबडगीत.

मोरा मोरा नाच रे (बडबडगीत)

मोरा मोरा नाच रे
अंकलिपी वाच रे
वाचता वाचता बोल रे
पृथ्वी कशी गोल रे

गोल चेंडू उडला
सुर्यावरती पडला
कान त्याचा कापला
म्हणून सुर्य तापला

ऊन, हवा आणि
गरम झाले पाणी
पाणी गरम झाले
वाफ़ होऊन आले

सोडूनिया धरती
वाफ़ गेली वरती
आभाळात मगं
तिचे झाले ढगं

ढग वाजे गडगड
वीज चमके कडकड
वारा सुटला सो-सो
पाऊस आला धो-धो

मोरा मोरा नाच रे
श्रावणाचा मास रे
नाचता नाचता सारा
फ़ुलवून दे पिसारा

गंगाधर मुटे
...................................
http://www.maayboli.com/node/18730

माझ्या मुलीने हे नर्सरीच्या निरोपसमारंभाला म्हटलेल गाण.

निळ्या निळ्या आभाळी
चांदोबाची दिवाळी
चांदण्यांच्या पणत्या
जागोजागी चमचमती

रिंगण केले ठगांनी
सुंदर सुंदर रंगांनी
मध्ये गोल ठब्बू उभा
एकटा एकटा चांदोबा

मनात होता चिडलेला
दारु नव्हती उडवायला
पाणी आले डोळ्याला
डाग पडले गालाला

तिकडून आली रोहीणी
हातात फुलबाजे घेउनी
खुदकन हसला चांदोबा
दूर पळाले ढग्गोब्बा.

एक होती चिऊ, तिला झाला भाऊ
ती म्हणली अय्या, नाव काय ठेऊ
कोणीतरी म्हणालं, चिव्-चिव्-चिव
बाळाचं नाव ठेव, काव काव काऊ
चिऊ म्हणली शी SSS काऊ असतो काळा
माझ्या तर आईचा गोरा गोरा बाळा
नाव याचं ठेवीन चिमण्-चिंटुला

स्वप्नात पाहिली राणीची बाग
हत्तीच्या पाठीवर बसलाय नाग
हरणाबरोबर खेळत पत्ते
बसले होते दोन चित्ते
उंट होता वाचत कुराण
माकड होते सांगित पुराण
सिंह होता व्याख्यान देत
गाढव होते उतरुन घेत
जिराफ होता गात छान
मानेइतकीच लांब तान
कोल्हा होता दुकानदार
त्याच्या दुधात पाणी फार
मला पहाता म्हणती सारे
एक पिंजरा याला द्यारे
त्याबरोबर आली जाग
स्वप्नात पाहिली राणीची बाग

यात ते पुराण नक्की कोण सांगत होतं ते आठ्वत नाहीये...मी आपलं सध्या आयामला म्हणून दाखवताना सोयीसाठी माकड म्हणतेय. दुरस्त करा जर काही राहिलं असेल तर..
बरं ते जंबोजेट जंबोजेट वालं गाणं कुणाला माहित आहे का पुर्ण? माझा मामा म्हणायचा मी लहान असताना, ते आणि एक गम्मत जम्मत ऐका रे असं एक

लहानपणी ही कविता बालवाडीत शिकवली होती..

एकदा पक्षांची भरली शाळा
मास्तर झाला कावळा काळा
मोर झाला हेडमास्तर
पिसारा फुलवून बसला खुर्चीवर
पोपटाने घेतला गणिताचा तास
सोडवायला दिले गणित खास
एक पेरु चार आण्याला
चार पेरु किती आण्याला?
चिऊताई आल्या ठुमकत ठुमकत
विचारु नका त्यांची करामत
कोकिळेने दिली एक तान
बगळ्याने केली उंचच मान
इतक्यात कोणीतरी क्वॅक क्वॅक केले
शाळेत उशीरा बदक आले
कबुतराने केले गुटुर्र.. गु
शाळा सुटली पळा रे धुम

गणपती बाप्पा गणपती बाप्पा
येता का हो खेळायला ?
मी नाही येणार ... मी नाही येणार
मला नाही येत पळायला

गणपती बाप्पा गणपती बाप्पा
येता का हो पोहायला ?
मी नाही येणार ... मी नाही येणार
पोटात लागतं दुखायला

गणपती बाप्पा गणपती बाप्पा
येता का हो शाळेला ?
मी नाही येणार ... मी नाही येणार
अभ्यास लागतो करायला

गणपती बाप्पा गणपती बाप्पा
येता का हो जेवायला ?
मी येणार ... मी येणार
मोदकांचा वास लागलाय सुटायला

माझे बाबा माझ्या लहानपणी एक गाणं ऐकवायचे, थोडंफार आठवतंय.

निळ्या निळ्या आभाळी चला जाऊ उड्त
घसरगुंडीवरून खाली येऊ परत.

आभाळात भेटेल देवबाप्पा मोठा
मिशी देईल टाकून होईल एकदम छोटा
देवबाप्पा खेळताना कधी नाही रडत (हरत ..?)
घसरगुंडीवरून खाली येऊ परत.

पूर्ण गाणं कोणाला येत असेल तर लिहाल का प्लीज?

टुक टुक माकड
आम्ही खातो पापड
पापड आहे उडदाचा
तुम्हाला नाही मिळायचा

बे बे बकरी
आम्ही खातो भाकरी
भाकरी आहे बाजरीची
तुम्हाला नाही मिळायची

म्याव म्याव माऊ
आम्ही खातो खाऊ
खाऊ आहे मस्त
केला आम्ही फस्त!!!

इथे 'आठवणीतली' बडबडगीते लिहायची आहेत ना? की स्वरचित?
गणपतीबाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या
हे खरे तर चित्रपटगीत आहे, गीता दत्त यांनी गायिलेले पण बडबडगीताचे सगळे गुण आहेत त्यात.

भरत, आठवणीतली बडबडगीतं अपेक्षीत आहेत. स्वरचीत गीतं गुलमोहरात देता येतील.

असंच एक आठवणीतलं..
बाळूला किती लहानवयात, 'इंग्लडला जाणं आणि ऐटबाज गाडी घेणं' या गोष्टी शाळेत जाण्याशी संबंधीत आहेत हे सांगण्यात आलंय. ( मोठेपणी अंगठाछाप राजकारण्यांकडे पाहून बाळूच्या जीवाला किती यातना झाल्या असतील! :P)

शाळेत नाही जाणार येतं मला रडू
आई मला शाळेत नको ना गं धाडू

मुसमुसत बोललं कोण हळूहळू?
दुसरं कोण असणार, हा तर आमचा बाळू!

आई मग म्हणाली, 'शहाणा माझा राजा,
शाळेत गेलास तर देईन तुला मजा..'

शाळेत नाही गेलास तर मोठा कसा होशील,
बाबांसारखा कसा इंग्लंडला जाशील?

आपला रामागडी शाळेत नाही गेला,
म्हणून भांडी घासावी लागतात ना त्याला.

तू कोण होणार डॉक्टर का गडी?
बाबांसारखी ऐटबाज नको का तुला गाडी?'

मुसमुसत बोलला बाळू आमचा खुळा,
"होईन मी गडी, नको मला शाळा." Proud

Pages