उन्हाळ्यासाठी गारेगार बर्फ

Submitted by लसावि on 21 April, 2014 - 00:41

साहित्य -
एक रेफ्रिजिरेटर (चालू)
आईसक्यूब ट्रे (न गळणारा)
पाणी (प्यायचे)

कृती -
१. एका तांब्यात (हे एका प्रकारचे भांडे असते) पाणी घ्यावे.
२. स्वच्छ धुतलेल्या आईसक्यूब ट्रे मध्ये ते हळूहळू ओतावे*.
३. पाणी भरलेला हा ट्रे न हिंदकाळता फ्रीजच्या डीप फ्रीजर मध्ये ठेवावा. (कृतीचा हा भाग फार अवघड आणि महत्वाचा आहे. भरलेला ट्रे एका हातात धरुन त्यातले पाणी न सांडता दुसर्‍या हाताने आधी फ्रीजचा आणि मग डीप फ्रीजरचा दरवाजा उघडणे हे एक परिश्रमसाध्य स्कील आहे.)
४. आता डीप फ्रीजचा आणि मग फ्रीजचा दरवाजा बंद करावा.
५. तुमच्या फ्रीजच्या लायकी प्रमाणे आणि तुमच्याकडे किती वेळ सलग वीज असते त्याप्रमाणे कधीतरी बर्फ तयार होईल.
६. बर्फ वापरायच्या वेळी तो ट्रे डायगोनली पकडून धुणे पिळल्याप्रमाणे हाताची हालचाल करावी. हे करताना काळजी घ्यावी कारण काही चुकार आईसक्यूब्स एकदम उडी मारुन नको तिथे पडू शकतात.
७. अशा प्रकारे तयार झालेला बर्फ इतर अनेक कृतीत वापरता येतो उदा. हळूच कॉलरमागून शर्टात टाकणे इ.इ.

* ही स्टेप करताना पाण्याशी गोड बोलल्यास चांगले आणि त्याला शिव्या घातल्यास खत्रूड आकाराचे क्यूब्स तयार होतात म्हणे. http://rationalwiki.org/wiki/Water_memory
फक्त इच्छाधारी नागांनाच नव्हे तर पाण्यालाही मेमरी असते हेच यावरुन सिद्ध होते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उगाच कॉम्प्लीकेट करून स्वतःचे स्किल्स दाखवू नका.>>> माझे काय स्किल्स नाहीत यात... हिरवं पाणी नळाला येऊ शकतं आणि सोनेरी द्रव्य बाटलीत असतं. ते फक्त जांभळ्या रंगाच्या ट्रेमधे ओतायचं. आणि आगाऊ गुर्जींची रेस्पी फॉलो करायची.

फारतर पाणी भरताना 'पानी रे पानी तेरा रंग कैसा' किंवा 'आज ब्लू है पानी पानी' हे म्हणू शकता. >>> माझ्या एका मैत्रिणीला ही पाककृती पाठवायची आहे. ती नॉर्वेत राहते. फ्रीजमधला बर्फ हे तिच्याकरता खूप अप्रुप आहे. पण तिला हिंदी येत नसल्याने या गाण्यांचे इंग्रजी भाषांतर गायले तर चालेल का?

'water o water, how is your colour' आणि 'today blue is water water' असं म्हटल्याने चालेल ना?

आमच्याकडे आर्द्रतायुक्त ऊन असतं. ते चालतं का या बर्फाला दाखवलं तर?>>>>>>
खडखडीत वाळायला हवं गं बर्फ. जराही ओलसर राहिलं तर बुरशी येऊ शकते.

मामी, ट्रेंमुळे सध्या रेडीमेड चौकोनी तुकडे मिळतात.

>>> खरंय श्र, टेक्नॉलॉजीमुळे बायकांची कामं कित्ती सोप्पी झाली नै?

योकु, धन्यवाद. अ‍ॅडते. अ‍ॅडायलाच हवं.

अय्या श्र, मी पण बाणेर्मधेच , टेरेस मधे दाखविन उन्ह. Happy आप्ल्या लॅटिट्युडला उन्ह दाखवायचा तुझा अनुभव आहे का ?
आगाउ धन्यवाद , स्तोत्र स्वतः म्हणावी लागतात का रेकॉर्डेड चालतात?

मी पुण्याला आले की मगच करता येईल मग ही पाकृ.
तोपर्यंत मी इथले लोक कशा प्रकारे बर्फ करतात (काही वेगळी स्तोत्रे म्हणतात का, आर्द्रतायुक्त ऊन असल्याने काही प्रिजर्वेटिव्ज घालायला लागतात का, कशा प्रमाणात व पाकृच्या कुठल्या टप्प्यात इ.) ही माहिती संकलित करून 'गारेगार बंगाली बर्फ' अशीही एक व्हरायटी टाकेन म्हणते.

dhanya Happy

इतर कामांसाठी, म्हणजे रंगीत पाण्याचे तपमान कमी करणे इ.इ. साठी नॉर्मल अपारदर्शक पाणी वापरा.
जगबुडीत टिकणार्‍या बर्फासाठी किरिमिजी पाणी, स्तोत्रे स्वतःच म्हणायची आहेत, त्यासाठी आध्यात्मिक भूमिका हवी.

वरची प्रचि प्रताधिकारमुक्त आहेत का? (हे सीरियसली विचारते आहे - उगाच अ‍ॅडमिनची वक्रदृष्टी इकडे वळायला नको)

रच्याकने, आईसक्यूबट्रे धुताना पाणी कुठलं वापरायचं ते लिहिलंच नाहीये. आमच्यासारख्या नवशिक्यांची फार अडचण होते मग.. तेव्हा अध्याहृत गोष्टीही उलगडून नीट लिहाव्यात. कृपया. धन्यवाद.

सामी, शब्दांचा क्रम उलटसुलट झालाय. तुम्हांला 'आगाऊ, तुम्हांला धन्यवाद.' असं म्हणायचंय का? > श्रद्धा , मला आगाऊंना आगाऊ धन्यवादच ध्यायचे आहेत. पुढच्या रविवारी घाट घातला आहे ना , म्हणून 'आगाऊ धन्यवाद' असं आहे ते.

आगाऊ, ओके. त्या शेजार्‍यांस थंड करण्याच्या युक्त्याही (जमल्यास फोटोंसह) द्याल का, कृपया.

कुणी केल्यास फोटो टाका रे <<< सामी, हो, मी करणार आहे. पण आधी ह्यांनी 'उरलेल्या बर्फाचे काय काय करता येईल?' या प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतरच करायला घेणार आहे.

बापरे, सगळे अगदी बर्फात मनसोक्त बागड्तायत.....
आगाऊ - लहानपणी काश्मिरला खेळले होते बर्फात, तेव्हापासुन या बर्फाची पा.क्रु. जाणुन घ्यायची होती, ती इच्छा आज पुरी झाली हो...... धन्यवाद बरं...

नक्की ट्राय करेन, जरा कठीणच आहे, पण बघु प्रयत्न करुन..

एक शंका आहे मात्र, मामीकडे जसे वेग-वेगळ्या रंगांचे ट्रे आहेत, तसे माझ्याकडे चित्र-विचित्र आकाराचे ice-cube ट्रे आहेत, चांदणी, स्माइली, माकड आणि असेच काही-बाही, यामुळे काही बदल करावा लागेल का मूळ पा. क्रुतीत? चवीत बदल होऊ शकतो का?

क्रुपया सांगा हो कोणाला महित असल्यास

आमच्याकडे गावी आठ दिवसांनी पाणी येतं, ते वापरलं तर चालेल का? ईन्व्हरटर वर फ्रीज नाही तगत. याकरता काही युक्त्या?
वर्षभराकरता नाही का करून साठवता येणार? का ताजीच छान लागते ही डीश?

उत्तम पाकृ!! बर्फाची, नव्हे, गारेगार बर्फाची इतकी सोपी सुरेख तपशीलवार रेसिपी दिल्याबद्दल आभार! ह्या वीकेन्डाला जरुर करून बघणार!

ऐन उन्हाळ्यात हृदय व डोळ्याना गारवा मिळाला.:स्मित:

या बर्फाच्या पाण्यात ( बर्फ तयार होणा आधीचे पाणी) शहाळ्याची मलई, डाळिम्बाचे दाणे, खरबुजाचे तुकडे, स्ट्रॉब्रेरी/ रासबेरी काप असे टाकुन पौष्टीक आईस क्युब्ज तयार करता येतात का?

आणी आधीच्या रात्रीच्या उरलेल्या पार्टीतील मॉकटेल्स/ कॉकटेल्स वापरुन पण क्युब्ज कराव्यात का? ते वाया जाऊ नये असा उदार आणी उदात्त हेतू आहे.

Pages