पेठच्या किल्ल्याच्या घाटवाटा::: वाजंत्री घाट अन् कौल्याची धार
..रेंगाळलेले तुरळक ढग, खळाळणारा एखादा झरा, फुलांच्या ताटव्यामागे सदाहरित रानाचा टप्पा अन् या आकृतीबंधाला अनोखं परिमाण देणारा एक वृक्ष...
नकळत कवी अनिल यांची एक जुनी कविता गुणगुणू लागलो:
'मला आवडते वाट वळणाची
अशी भुलकावणीची हुलकावणीची
निसर्गवेळूच्या भर रानीची
मला आवडते वाट वळणाची'
------------------------------------------------------------------------------------------------------------
... भीमाशंकरच्या नैऋत्येचा पेठचा किल्ला ट्रेकर्स अन् पर्यटकांनाही चिरपरिचित.
पेठचा किल्ला सह्याद्री मुख्य रांगेपासून किंचित सुटावलेला, पण मुख्य रांगेशी नाळ जुळवून ठेवलेली. गडाच्या माथ्यावरून पाहताना वाटतं, की गडाला जणू सह्याद्रीनं दुलईचं पांघरली आहे..
सह्याद्रीच्या धारेच्या पश्चिमेचा पेठचा किल्ला, अन् पूर्वेच्या भामा नदीच्या (भीमेची उपनदी) खो-यातल्या वांद्रे गावाला जोडणा-या दोन घाटवाटा धुंडायला साकेत अन् मी निघालो होतो.
घाटमाथ्यावरची अनवट वाट..
भामा नदीच्या खो-यात कोवळी उन्हं उतरू लागली होती. तासुबाईच्या डोंगररांगेवरची दाट झाडी अन् पवनचक्क्या खुणावत होत्या.
अवचितंच, एका अडीच फूट उंचीच्या विशाल आकाराच्या गरुडाच्या भेदक दर्शनाने थरारलो..
वांद्रे गावात ‘लक्ष्मण शिंदे’ यांच्याकडे वाहनाची सोय लावली.
“पेठच्या किल्ल्याला जायचंय ना, मग इकडून का आलात.. कर्जत-आंबिवली मधनं जायचं की.. वाजंत्री घाट लय लांबचा हो दादा.. बरं त्यो वाजंत्री घाट काय सहजी गावणारे का तुम्हांला... आता माझं ऐका, हे असं उतरा ना जवळच्या नाखिन्द्यापासून कौल्याच्या धारेनं..”
मग अर्थातंच, ‘आम्ही सह्याद्री घाटवाटा ट्रेक्स का करतो’ ही चर्चा आलीच. साधारणत: पटू शकेल असं उत्तर म्हणजे, ‘शिवाजी महाराजांचे किल्ले बघायला’. थोडेसे गोंधळलेले - थोडे कवतिकाचे, अन् खूप सा-या आपुलकीचे चेहरे मागे ठेवत लाल मातीच्या रस्त्यावरून निघालो.
आसपास शिवारात सगळीकडे भातझोडपणी जोरात चालू होती. मॉन्सूनचे काही बेशिस्त ढग अजूनही रेंगाळत सह्याद्री माथ्याशी लगट करू पाहत होते.
वाटचाल चालू केली, अन् मोरांच्या कळपानं मोहून टाकलं. त्यातली एक लांडोर.
वांद्रे गावातून निघून तीन तासांच्या चालीवर स्थानिक रानदेव ‘खेतोबा’च्या देवळापासून वाजंत्री घाट उतरतो, अशी माहिती मिळाली होती. पश्चिमेला पवनचक्क्यांच्या दिशेनं जाणारा रस्ता पकडला. साधारण २ किमी अंतर चालल्यावर ‘लोणावळे - भीमाशंकर रानवाटेचा फाटा’ लागणार होता. ऑक्टोबरच्या सकाळच्या सुखद गारव्यात, सह्याद्रीतल्या दमदार चालीची सुरुवात तर झक्क झाली होती.
आम्हांला पवनचक्क्यांचे रखवालदार भेटले नसते, तर रस्त्याच्या बाजूचा हा ‘लोणावळे - भीमाशंकर नाका’ गावला नसता अन् ट्रेकच्या सुरुवातीलाच चकवा लागला असता हे निश्चित!
वाटेवरच्या प्रवेश-बंदीकडे दुर्लक्ष करत घुसखोरी केली, अन् भीमाशंकरची करकरीत पाऊलवाट तुडवायला सुरुवात केली..
झाडीतून वाट मोकळवनात आली, अन् थबकलोच... अवचितंच, आम्ही सह्याद्री धारेवर उभे ठाकलो होतो. उत्तरेला कोवळ्या उन्हांत न्हात असलेले पदरगड, भीमाशंकराचा पहाड अन् उत्तुंग नागफणी टोक..
तर दुसरीकडे कारवीच्या झुदुपांमागे कोकणात डोकावू लागलेला पेठचा किल्ला... वाह, अप्रतिम दृश्य!!!
वांद्रे गावातून पाऊण तास चाल झाल्यावर माळावरून मागे बघितलं, तर वरसूबाई रांगेवरच्या पवनचक्क्या अन् नाखिंद टोक दिसत होतं.
सह्याद्री धारेवरून उत्तरेकडे भीमाशंकरकडे जाणारी निवांत मळलेली वाट पकडली. घाटमाथ्यावर असलो, तरी सर्वोच्च शिखरांची रांग १०० मी उंचावर ठेवून गवताळ माळांवरून वाटचाल चालली होती. बांधीव घरांजवळून वाट अत्यंत दाट कारवीच्या रानात शिरली.
मागं वळून बघितल्यावर दिसणारं दाट झुडूपी रान.
पावणेदोन चालीनंतर दिसणारे महत्त्वाचे टप्पे. परतीच्या प्रवासाची कौल्याची धार तीव्र उताराची नसली, तरी चाल दमदार असणार, हे नक्की होतं.अरे तो वाजंत्री घाट आहे तरी कुठे..
वाजंत्री घाट उतरण्यासाठी मुळात खेतोबा मंदिर सापडणं गरजेचं होतं. वांद्रे गावापासून दोन तास चालल्यावर देखील खेतोबा मंदिराचा ठावठिकाणा नव्हता. आधी वाटलं होतं, खेतोबा मंदिर एकतर लोणावळे-भीमाशंकर रानवाटेवरंच असेल, किंवा निदान मंदिराकडे नेणारा एखादा ठळक फाटा तरी येईल. पायाखालची वाट होती दाट रानातली. त्यामुळे आपण खेतोबाच्या अजूनही अलीकडे आहोत, की मंदिर मागे टाकलंय, याचा अंदाज येईना. मग शेवटी झुडूपांमधून १०० मी घुसखोरी करून, सह्याद्रीच्या धारेपाशी आलो.
कॉपी करून ठेवलेल्या Google Map शी तुलना केल्यावर, समोरच्या धारेजवळची वाजंत्री घाटाची घळ अन् कोकणातले जाम्रुग डोंगर पटकन सापडले, म्हणजे त्याच्यामागे खेतोबा दडला असणार... स्थाननिश्चितीच्या काथ्याकुटीमध्ये अन् धारेवरून पुढे-मागे शोधाशोधीत अर्धा-पाऊण तास मोडला होता.
जलद पुढे निघालो. आता झुडूपी कारवीनं झाकोळलेल्या माळांवरून लांबचं लांब वळणदार वाट होती.
सकाळी वांद्रे गावातून निघाल्यापासून ‘लोणावळे-भीमाशंकर’ची रानवाट सह्याद्री धारेच्या १०० मी आतल्या बाजूंनी धावत होती. आता मात्र वाट अरुंद होत सह्याद्रीच्या धारेवर आली. आमच्या ट्रेकमधली सगळी मुख्य टोकं खुणावत होती.
रणतोंडी धबधब्याच्या उगमापाशी वाट दरीच्या अग्गदी जवळ आली. वाजंत्री घाटाची सोबत करत, कोकणात झेपावणारा हा ‘रणतोंडी’ नावाचा भला थोरला धबधबा आहे. पल्याड दूरवर पेठचा किल्ला अन् कौल्याची धार भन्नाट दिसत होतेच, पण ते अजून चांगलेच लांब आहेत हेही जाणवलं.अखेरीस, खेतोबा मंदिर सापडलं...
रडतोंडी धबधब्याची घळ पार केल्यावर कुठल्याश्या अंत:प्रेरणेनी साकेत म्हणाला, ‘चल ही डावीकडची पुसट वाट घेऊया.. मला वाटतं, जाईल ही खेतोबाला..’. रडतोंडी धबधब्यापाशी ‘लोणावळे-भीमाशंकर’ची रानवाट सोडून, डावीकडे जाणारी वाट आम्ही घेतली होती. सदाहरित जंगलात दिवसाढवळ्या किर्रर्र अंधार दाटला होता. तीव्र उतार सुरू झाला. मला तर वाटलं, खेतोबा देऊळ टाळून ही वाट थेट वाजंत्री घाटाच्या उताराला लागली.
झाडीभरला १०० मी उतार उतरून सपाटीवर आलो.
रंगीबेरंगी तणांची रांगोळी वेधक होती.
अखेरीस पठाराच्या टोकाशी दूरवर खेतोबाचं देउळ दिसलं. खेतोबा फार जागृत. एखाद्याचं जनावर आजारी पडलं, तर खेतोबाला कोंबडं कापून प्रसाद दाखवल्यास जनावर नक्की बरं होतं, अशी स्थानिकांची श्रद्धा आहे. वांद्रे गावातून निघून ३ तास बंबाळ्या रानातनं फिरल्यावर, खेतोबाच्या देवळापाशी पोहोचल्यावर कोणी ओळखीचं भेटल्यासारखा आनंद झाला.
खेतोबापासून दिसणारे पदरगड अन् सह्याद्रीचे सणसणीत कडेवाजंत्री-खेतोबा घाटाची झाडीभरली घळ
विश्रांती, फोटो, घाटमाथ्याचा वारा अन् सह्याद्रीचं कवतिक करता करता तासभर वेळ भुर्रर्रकन उडून गेला होता. वाजंत्री घाटाची ही सुरुवात.
आजच्या दिवसात वाजंत्री घाट उतरून आधी पेठ गावापर्यंत चढायचं, अन् पुढे कौल्याची धार चढून वांद्रे गावात पोहोचायचं, असा द्रुतगती मनसुबा होता. स्वत:च्या endurance बद्दल हा फाजील आत्मविश्वास होता, याचं सोदाहरण स्पष्टीकरण मला लवकरंच मिळणार होतं.
भीमाशंकरच्या भागात जाणवतं, की इथे सह्याद्रीचा पश्चिमकडा थेट कोकणात कोसळला नसून, माथ्याजवळ ३०० मी कातळकडा, त्यानंतर एक सपाटी/ पदर अन् त्याच्या पश्चिमेला परत एकदा कातळ. वाजंत्री/ खेतोबा घाटातून दिसणारा हा पहा सह्याद्री.
वाट उत्कृष्ठ मळलेली.
झाडीभरल्या घळीतून १०० मी उतरल्यावर सह्याद्रीची धार लांबवर पसरलेली. काळे ढग आभाळात जमू लागलेले.. पावसाळ्यात इकडे आलो तर ढग अन् धबधबे यांचं अनोखं दृश्य असणार, यात शंकाच नाही. कवी अनिलांची कविता अजूनही मनात घुमत होती,
‘मला आवडते वाट वळणाची
जरा अडचणीची चढउतरणीची
घाटमाथ्याची ती पलीकडची
मला आवडते वाट वळणाची’
वैशिष्ट्यपूर्ण मश्रूम
खेतोबाची घळ उतरून सह्याद्रीच्या पदरात आलो.
पदरातल्या वाडीचं नाव मोठ्ठं काव्यात्मक – रानमळा. ११० एकर जमिनीचा श्रीमंत मालक ‘नामदेव बाणेरे’ या हवामहालात राहतो. अर्थात, शेतकीखाली जमीन निव्वळ २-४ एकर.
नामदेवनं आम्हांला समजावून सांगितलं, की रानमळ्यातून कोकणात उतरायला वाटा दोन – सोप्पी वाट आहे ‘वाजंत्री घाटाची’, पण ही वाट लांबवरून रणतोंडी धबधब्याजवळून उतरते. जवळची ‘शिडीची वाट’ पाठीवर बोजी घेऊन तुम्हांला नाही जमायची.
शिडीच्या वाटेवर ताकद संपली: थिअरी पाठ, प्रॅक्टीकल नापास!!!
शिडीच्या वाटेचं कोडं सोप्पं करण्यासाठी नामदेवला वाटाड्या म्हणून घेतलं, हे फार फार बरं झालं. माझी काठी बघून नामदेवनं मला ‘तुम्ही पुढे व्हा’ म्हणलं. गच्च गवत अन् आदल्या दिवशीचा पाऊस यामुळे त्याला सापांची भीती वाटत होती. मी मनात म्हणलं, ‘अरे बाबा, वेळप्रसंगी आमच्यापेक्षा तुलाच आधी दिसणार धोके..’ असो. रानमळ्यापासून १५ मिनिटं अंतर चालल्यावर कड्याच्या टोकाशी आलो.
ट्रेकपूर्वी सराव असणं; ट्रेकमध्ये सकस अन् भरपूर न्याहारी घेणं, ही थिअरी पाठ होती. पण या ट्रेकसाठी आपण दोन्ही नियम तोडलेले आहेत, याची जाणीव झाली थेट शिडीच्या रॉकपॅचवर. शे-सव्वाशे फुटी उभा कडा. पावसानं शेवाळलेले कातळटप्पे अन् थोडं दृष्टीभय आहे. अवघड कुठेच नाही.
कुठे एखाद्या फांदीचा बेचका, तर कुठे कुजलेली लाकडी शिडी.. फारसा कशाचाच उपयोग नाही. अर्थात अवघड नसलं, तरी दमलेल्या अवस्थेत काही झेपेना. नामदेवनं होल्ड्स दाखवले.
निसरडी आडवी वाट पार करताना हाताला होल्ड्स नसल्याने, कातळावर भार टाकत पार केली.
शेवटची लोखंडी शिडी पार करताना नामदेव. मागे संपूर्ण पॅचची उंची दिसतीये. दमलेल्या अवस्थेत रॉकपॅच लवकर पार करण्यासाठी नामदेवच्या सोबतीची फारच मदत झाली.
ताकद संपली होती. विचित्र धाप लागलेली जी कमीच होईना. अंग जड झालेलं. १० मिनिटं नुस्तं भकास बसून राहिलो. सरावाचा अभाव अन् वेळच्या वेळी पोषक आहार न घेतल्याचा परिणाम. नवीन थिअरी नव्हतीच, पण सह्याद्रीनं बरोब्बर लायकी दाखवून दिली, यात शंकाच नाही.
पावसाची बारीक सर आसमंत थंड करून गेली. जाम्रुगच्या डोंगरापासून पाठीमागे बघितल्यावर आम्ही नक्की काय उतरलो, ते सारं उलगडलं.
जाम्रुग गावच्या कामतपाड्यापाशी गवतावर लोळत पडलो असता, पदरगड अन् नागफणीचं लोभस चित्र समोर होतं.
कामतपाड्यातला बालक खेळणं म्हणून दो-याला खेकडा बांधून खेळतो... कम्माल!
तर, कामतपाड्यातल्या या युवकानं आम्हांला चक्क ‘गांजा’ ऑफर केला... अजून एक कम्माल!!
पाठीमागे सह्याद्रीची भिंत... ही खरी कम्माल!!!
जाम्रुगपासून पेठचा किल्ल्याकडे चालू लागलो. स्थानिक क्षेत्र विकास झाला की नाही माहित नाही, पण मायबाप सरकारच्या कृपेने ‘ही दिशा सह्याद्रीकडे’ अशी मोलाची माहिती मिळाली.
पेठच्या किल्ल्याच्या पठाराकडे चढणारी वाट प्रशस्त मळलेली होती. ढग दाटून येत होते. प्रकाश झपाट्याने कमी होऊ लागला होता. सिद्धगड अन् पदरगडाच्या दृश्याने प्रसन्न वाटत होतं.
पेठच्या पठारावर पोहोचलो, तर आभाळात विजांचं सणसणीत तांडव सुरू झालेलं. समोर शिवारात करकरीत ‘वीज लवली’, त्याचा थरार अनुभवला. पेठच्या सावंतांकडे मुक्कामाची ‘रॉयल’ सोय झाली. दिवसाभराच्या दमदार चालीनंतर तृप्तता मनी दाटली होती. खरंतर, एका दिवसात वाजंत्री घाट उतरून कौल्याची धार चढून घरी मुक्कामाला जाऊ, ह्या भ्रमाचा भोपळा फुटला, याचा आनंद जास्त होत होता....पेठ गावातली तजेलदार रम्य सकाळ
.. पहाटे लवकर जाग आली, अवीट गोडीच्या अभंगांनी.. अप्रतिम तयारीनं टाळकरी पांडुरंगाला आळवत होते. तांबडफुटीला कूच केलं. आज पेठच्या किल्ल्याची दुसरी एक घाटवाट चढून सह्याद्री माथ्यावर वांद्रे गाव गाठायचं होतं.
भाताच्या पात्यांवरचा मोहक तजेला...
कोळ्याने विणलेला अजब कशिदा... (मला तर हा स्पीकरसारखा वाटला.)
पेठच्या किल्ल्याचा कातळमाथा उजवीकडे ठेवत, पूर्वेला कूच केलं.
गुरांनी चरायला रानाकडे जाऊ नये, म्हणून फांदीचा फाटा आडवा आला. समोर घाटमाथा समोर दिसत होताच. फांदीच्या फाट्याची गलोल केली, तर आपण थेट घाटमाथ्यावर पोहोचू शकू का, याचा अंदाज साकेतनी घेतला.
मनात गुणगुणत होतो...
‘मला आवडते वाट वळणाची
दाट झाडीची नागमोडीची
ही अलिकडची, नदीच्या थडीची
मला आवडते वाट वळणाची’
कोवळी उन्हं गवताळ वाटेवर उतरू लागली. कौल्याच्या धारेचा ४०० मी उभा पहाड समोर होता.
सह्याद्रीची उंची अन् पेठचं पठार यांच्या मधल्या ओढ्यापाशी पोहोचलो. या ओढ्यापासून समोर कौल्याची धार अन् उजवीकडे नाखिंदा घाट असे दोन घाट चढता येतात.
हवेतला विलक्षण गारवा अन् पाण्याचा खळखळाट सुखावत होता. परत एकदा कविता गुणगुणली..
‘मला आवडते वाट वळणाची
सरघसरणीची पायफसणीची
लवणावरची पानबसणीची
मला आवडते वाट वळणाची’
पेठचा किल्ला मागे टाकून वाट कौल्याची धार चढत होती.
अचानक डावीकडे एक आश्चर्य समोर आलं. कातळकोरीव पाण्याची उथळ टाकी (अर्थात पिण्यासाठी सध्या उपयोग नाही). नेहेमीच्या लॉजीकने ‘ही घाटवाट पुरातन अन् महत्त्वाची असणार’ असा तर्क काढण्यात आला.
पेठचा किल्ला अन् त्याचा झाडोरा हळूहळू लांब जाऊ लागला.
अजून थोडकी उंची गाठल्यावर दिसला पेठचा किल्ला, ढगांमधला तुंगी डोंगर, पदरगड अन् भीमाशंकर असा झक्कास नजारा. बारकाईनं बघितलं, तर माथ्यावरच्या पवनचक्क्यांची सावली दरीत दिसेल.
घाटाच्या शेवटच्या टप्प्यांत दाट कारवीतून लख्ख मळलेली वाट होती.
अखेर घाटमाथ्याजवळ कोवळी सूर्यकिरणं वाटेवर उतरू लागली.
पेठ गावातून अडीच तासात कौल्याच्या धारेनं माथ्यावर पोहोचलो होतो. दगड रचलेल्या थाळामागे कुसूर पठार अन् ढाक बहिरी धाक दाखवत होता.
घाटमाथ्यावरून पेठचा किल्ला कारवीच्या टप्प्यांच्या मागे कितीतरी लांब दिसत होता.
माथ्यावरच्या पवनचक्क्या रात्रंदिवस कुरकुरत असाव्यात..
सह्यधारेच्या काठावरून पेठच्या किल्ल्याला अलविदा केलं.
भिरीभिरी भ्रमंती करत कुठवर गेलेलो, याचा अशक्य वाटावा असा व्ह्यू
ट्रेक संपवण्यासाठी घाटमाथ्यावरची तब्बल दोन तासांची चाल बाकी होती.
वाटेत भेटले - सदाहरित रानाचे टप्पे...
वाटेत भेटलं - नाखिंदा टोकाचं नेढं, माथ्याच्या या खडकात...
वाटेत भेटली - लक्षलक्ष फुलं-कोळी-खेकडे...
वाटेत भेटली – काही अवली माणसं...
पडारवाडीपासनं मागे वळून पाहताना..
वांद्रे गावातून परत निघालो. कवी अनिल यांची कविता अजूनही मनात घुमत होती..
‘मला आवडते वाट वळणाची
इथची तिथची कधी कुणीकडची
क्षितीजाकडची पुढची पुढची
मला आवडते वाट वळणाची’
डोळ्यासमोर तरळत होते दोन दिवसात अनुभवलेलं सह्याद्रीचं वैविध्य..
(कृतज्ञता:
1. वर्णनात वापरलेल्या कवितेच्या ओळी ‘कवी अनिल’ यांच्या आहेत. १९५१ ला श्रीनिवास खळे यांनी गायिका सुधा माडगांवकरांच्या आवाजात रेकॉर्ड केलेलं..
2. ओंकार: शीर्षकात भन्नाट enhancement सुचवल्याबद्दल
)
- © Discoverसह्याद्री (साईप्रकाश बेलसरे)
काय सुंदर वर्णन आणि एक सो एक
काय सुंदर वर्णन आणि एक सो एक फोटु ..... वा मजा आ गया ....
सह्याद्रिची किती रुपे पाहिलीत तुम्ही आणि अनुभव पण जबरीच असणार .....
सलाम तुम्हा मंडळींना, सलाम सह्याद्रीला आणि अर्थातच महाराजांनाही .........
भारी! सुरेख लिहिलं आहे आणि
भारी! सुरेख लिहिलं आहे आणि फोटोंमुळे मजा आली वाचायला.
अप्रतिम
अप्रतिम
छान वर्णन व फोटो
छान वर्णन व फोटो
सुरेख वर्णन, अप्रतीम फोटो
सुरेख वर्णन, अप्रतीम फोटो
भारी तंगडतोड आहे.. सुंदर
भारी तंगडतोड आहे.. सुंदर वर्णन नि सुंदर घाटवाटांचे सुंदर चित्रण !
मस्त... वाजंत्री घाटाची चाल
मस्त... वाजंत्री घाटाची चाल खुपच आहे.
अरे वा.. मस्त आहे.
अरे वा.. मस्त आहे.
- शशांकजी: खूप धन्यवाद!!!
- शशांकजी: खूप धन्यवाद!!! अनुभव भन्नाट होताच.. मॉन्सून लांबल्यामुळे अशक्य भारी व्ह्यूज आहेत यंदा सह्याद्रीत...
- शैलजा, झकासराव, सुनिल परचुरे, हर्पेन, मिलिंदा : मन:पूर्वक धन्यवाद!
- यो आणि इंद्रा: अरे हो रे, पहिल्या दिवशी फारंच चाल झाली. पण, मस्त रीजन अन् मस्त वातावरण मिळालं.. धन्यवाद
घाटवाटांवर कुठेही कचरा नाही. बेशिस्त ट्रेकर-पर्यटकांपासून बचावलेला अनवट सह्याद्री!
नेहमीप्रमाणेच अफलातून
नेहमीप्रमाणेच अफलातून "डिस्कव्हरी" !!!!
खरं तर शीर्षक मला आवडते वाट (आड) वळणाची...असं असायला हवं !!!
ओंकार: अरे कसली भारी कल्पना
ओंकार:

अरे कसली भारी कल्पना आहे.. एकदम apt!!
माझं मलाच जाणवत होतं, की टायटलमध्ये काहीतरी मिसिंग आहे.
लग्गेच केलं अपडेट लेखाचं नाव
वा! काय सुंदर अनुभव, निसर्ग,
वा! काय सुंदर अनुभव, निसर्ग, लिखाण, फोटो!
भन्नाट! डिसेंबर मोकळाच आहे,
भन्नाट!
डिसेंबर मोकळाच आहे, नक्कीच प्लान करण्यासारखा ट्रेक.
गरुड मिळाला, मला तुमचा हेवा वाटतोय.
बोनेली इगल आहे का ते?
बोनेली इगल आहे का ते?
बोनेली इगल आहे का ते? >>
बोनेली इगल आहे का ते? >> Imperial असावा. समोरुन फोटो असेल किंवा निदान पायांच असेल तर टाक
आड वाट ,फुले ,गरूड
आड वाट ,फुले ,गरूड
आड वाट ,फुले ,गरूड ,लांडोर
आड वाट ,फुले ,गरूड ,लांडोर सर्वच फोटो छान .वांद्रे खिंडीत वांदरे हल्ला करतात असे पेठच्या गावकऱ्यांनी मला सांगितले होते .
खुप सुंदर ! याचे दोन तीन भाग
खुप सुंदर !
याचे दोन तीन भाग करायला हवे होते. पुर्ण लेख आणि सर्व फोटो डाऊनलोड व्हायला वेळ लागतोय.
तुम्ही लोक आहाराकडे का दुर्लक्ष करता ? आपल्याकडे आडगावात किंवा वाटेवर काही मिळायची सोयही नसते.
मी एका लेखात असे अनेक खाद्यप्रकार सुचवले होते. तुम्हा लोकांना सोबत न्यायला किंवा वेळ पडल्यास शिजवायला खुप सोपे आहेत.
- मानुषी: खूप छान वाटलं
- मानुषी: खूप छान वाटलं तुमची प्रतिक्रिया वाचून.. धन्यवाद!!!
- सूनटून्या: धन्यवाद... डिसेंबरमध्ये हा ट्रेक अवश्य करा...
फोटोवरून खरंच कळणार नाही, पण गरुड 'अशक्य' मोठ्ठा होता...
- इंद्रा: बोनेली इगलचे फोटोज गुगल केले. हा वेगळा होता असं वाटतं. पूर्ण ग्रे.अजून फोटोज नाहीत. पण, अचूक identity कळली तर नक्कीच आवडेल..
- Srd: धन्यवाद!!
गम्मत म्हणजे, वांद्रे खिंडीत आम्हांला वांदरं दिसली नाहीतच.
पण हल्ला करणारी वांदरांचा त्र्यंबक-भंडारदुर्ग आणि हाजी मलंगला वाईट अनुभव आहे..
- दिनेशदा: खूप धन्यवाद... तुमचा ट्रेक खाद्यप्रकारांचा लेख भारी होता. उपयुक्त!

या ट्रेकला सकस आहार सोबत होताच, पण ट्रेकच्या फ्लो मध्ये बेसिक चुका झाल्या. म्हणून म्हणलं ना, थिअरी पाठ, प्रॅक्टीकल नापास!!!
भन्नाट...
भन्नाट...
खुप छान वाटलं वाचुन अन फोटो
खुप छान वाटलं वाचुन अन फोटो पाहुन.. शुरवीर तुंम्ही खरच.. असे दुर्गभ्रमण करणारे..
जबरदस्त अन ..अप्रतिम ..!!
जबरदस्त अन ..अप्रतिम ..!!
मस्त रे भन्नाट भटकंती .. फोटु
मस्त रे भन्नाट भटकंती .. फोटु पण लय भारी
vinayakparanjpe भावना
vinayakparanjpe
भावना गोवेकर
वेडसह्याद्रीचे
रोहित ..एक मावळा
खूप छान वाटलं तुमच्या प्रतिक्रिया वाचून.. मन:पूर्वक धन्यवाद!!!
अगदीच जबरी वर्णन… आणि
अगदीच जबरी वर्णन… आणि तेवढ्याच ताकदीचे फोटो… खास करून स्पीकर (कोळ्याचं जाळं)…
एकंदरीत खूपंच लांबचा पल्ला मारलेला दिसतोय… कौल्याची धार वाजंत्री घाटाची दणदणीत सफर झालेली आहे तर वाह …बढीया … ज्या अर्थी "ओंक्या" ने शीर्षक सुचवलंय त्या अर्थी नक्कीच सरस्वती ने पुन्हा एकदा "एकाच" ठिकाणी क्लासेस उघडले दिसतायत…
कवी अनिल ह्यांच्या कविता अगदी योग्य ठिकाणी चपखल बसवल्या आहेस… जमलेलं आहे ...
ट्रेकळावे,
दत्तू तुपे.
www.bankapure.com
दत्तू: तुझ्यासारख्या अस्सल
दत्तू: तुझ्यासारख्या अस्सल भटक्या दोस्ताची प्रतिक्रिया मोलाची..

पल्ला खूप लांबचा होतांच.
कवी अनिल यांची कविता अगदी योग्य वेळी चालत आली.
खूप खूप धन्यवाद!!!
खूप छान....वर्णन, अप्रतीम
खूप छान....वर्णन, अप्रतीम फोटो....