'मन्हा गाव मन्हा देस' खानदेशातले ४ दुर्ग - एका दिवसात

Submitted by Discoverसह्याद्री on 21 October, 2013 - 14:59

सह्याद्री दुरांतो एक्सप्रेसनं ३३ तासात धुळ्याचे ४ किल्ले - लळिंग, सोनगीर, कंक्राळा, गाळणा | झोडग्याचं अद्भूत शिवमंदिर | ८२५ किमी प्रवास

00Dhule_Forts_DiscoverSahyadri.jpg
...आमच्या सह्याद्रीची त-हांच अजब न्यारी.. कधी तो होतो रौद्राकर्षक - कोकणकडा किंवा ढाकोबासारखा, तर कुठे जावळीसारखा थरारक दुर्घट... कुठे प्रकटतो राजगड-तोरण्यासारख्या तालेवार रांगांमधून, तर कधी विखुरतो खानदेशातल्या पठारांवर तुरळक टेकड्यांमधून... धुळे जिल्ह्यातल्या गाळणा-लळिंग किल्ल्यांचं कवतिक लssय दिन ऐकिवात होतं. म्हणून आम्ही भटके यंदाच्या पावसात पोहोचलो होतो धुळे जिल्ह्यातल्या गाळणा टेकड्यांवरच्या अन् अजूनही इतिहासात रेंगाळणा-या किल्ल्यांच्या भेटीला... एरवी रखरखीत असलेल्या माळरानाला आता मात्र पावसानं तजेला आलेला.. कुठे रानोमाळ विखुरलेली शेरडं, कुठे तरारलेली बाजरी, कुठे अख्ख्या दरीत लगडलेल्या सीताफळांनी झुकलेला झाडोरा..

01Dhule_Forts_DiscoverSahyadri.jpg

पुण्यापासून सह्याद्री दुरांतो एक्सप्रेसनं ३०० कि.मी. प्रवास करून पहाटे ३ वाजता लळिंग गावी पोहोचलो. पण गावात मुक्काम करायला प्रसन्न वाटलं नाही. म्हणून, १० किमी उलटं परत जाऊन आर्वी गावच्या रोकडेश्वर आश्रमात कॅरीमॅट्स पसरली.
02Dhule_Forts_DiscoverSahyadri.jpgदुर्गस्थापत्यानं नटलेला - दुर्ग लळिंग
मुंबई- आग्रा महामार्गावरचं लळिंग गाव रटाळ, पण ‘रोड-टच’ किल्ला मात्र देखणा.
3ADhule_Forts_DiscoverSahyadri.jpg03BDhule_Forts_DiscoverSahyadri.jpg

लळिंग गावातून किल्ला अन् माथ्याकडचे स्थापत्य खुणावू लागते. निवडुंगातून जाणारी खडकाळ वाट.
03CDhule_Forts_DiscoverSahyadri.jpg

अर्ध्या तासात झुडपी उतारांवरून माथ्याजवळ भग्न द्वारापाशी अन् बुरुजापाशी पोहोचलो. हुप्प्या वानरानं कुतूहलानं विचारपूस केली.
04Dhule_Forts_DiscoverSahyadri.jpg05Dhule_Forts_DiscoverSahyadri.jpg

दुर्गस्थापत्यात उत्तरेच्या मोघल शैलीतले झरोके, तटबंदी अन् कोनाडे लक्षवेधक होते. १३-१४ व्या शतकातल्या फारुकी राजवटीचा हा अत्यंत महत्त्वाचा दुर्ग होता.
06Dhule_Forts_DiscoverSahyadri.jpg

हुप्प्या आम्हांला बघून भलताच एक्साईट झाला होता.
07Dhule_Forts_DiscoverSahyadri.jpg

हुप्प्याकडून प्रेरणा घेऊन, गडाची सर्व टोकं कुतूहलाने न्याहाळण्याचे (खरंतर डोक्यात जाणारे) प्रयोग...
08Dhule_Forts_DiscoverSahyadri.jpg

माथ्यावर चौकोनी खोल टाक्यांचा समूह, कोठीची वास्तू अन् मोघल शैलीची तटबंदी सामोरी होती.
09Dhule_Forts_DiscoverSahyadri.jpg

कोठीच्या पोटात खोदत नेलेली खोल टाकी विस्मयकारक होती.
10Dhule_Forts_DiscoverSahyadri.jpg

दुस-या बाजूने बघितल्यावर दिसणारे ललितादेवी मंदिर, कोठीची वास्तू, कोरीव पाय-या अन् कातळात कोरत नेलेली खोल टाकी. गडावर मुक्काम करायचा झालाच, तर ललितादेवी मंदिरात ३ जण झोपू शकतील. अन् कोठीच्या खोलीजवळ हिरवट तवंग असलेले पाणी शुद्ध करून घ्यावं लागेल.
11Dhule_Forts_DiscoverSahyadri.jpg

गडाच्या चोरदरवाज्यातून उतरून सोप्पा कातळ उतरून आडवं निघालो. आडव्या वाटेवर चांगल्या पाण्याची टाकी अन् मारुती मंदिर लागलं.
12Dhule_Forts_DiscoverSahyadri.jpg

गडाच्या माचीवर उत्तरेला तलावाच्या काठी अतिशय काव्यात्मक अशी घुमटी आहे. ही घुमटी हमरस्त्याच्या बाजूने दिसत नाही. पण इथून आसमंताचं देखणं दर्शन घडतं. कदाचित राजघराण्यातल्या खानदानी स्त्रियांना एकांत निवांत क्षणांसाठी ही सोय केलेली असावी.
13Dhule_Forts_DiscoverSahyadri.jpg

घुमटीपासून दिसणारा लळिंगचा बालेकिल्ला
14Dhule_Forts_DiscoverSahyadri.jpg

चढाई अन् गडफेरी करून, लळिंग गावात परत यायला २ तास लागले होते. १४ व्या शतकातल्या फारुखी घराण्याच्या राजवटीपासून पुढे मुघल – निजाम – मराठे – इंग्रज अशी स्थित्यंतरं जगलेल्या लळिंगचं सुंदर स्थापत्य मनात घर करून गेलं...

मध्ययुगीन व्यापारी मार्गांचा रक्षक – दुर्ग सोनगीर
आता आमचं लक्ष्य होतं आग्रा हायवेवरचा अजून एक किल्ला – सोनगीर! धुळे शहर बायपास करून उत्तरेला २० कि.मी. अंतरावर सोनगीर गाव गाठलं. गावातल्या गल्लीबोळांमधून पुढे जात गड बघायला येणा-या पर्यटकांच्या स्वागतासाठी बांधलेली कमान गाठली. गडाची तटबंदी हाकेच्या अंतरावर डोकावली.
17Dhule_Forts_DiscoverSahyadri.jpg

एरवी गडाचं दर्शनसुद्धा आपल्याला एकदम उत्साह आणतं. पण इथे मात्र गावाला स्वच्छतेची अँलर्जी असल्यानं रुमाल नाकास लावूनंच, सिमेंटच्या नवीन पाय-यांवरून कशीबशी वाट काढू लागलो.
18Dhule_Forts_DiscoverSahyadri.jpg

कोसळलेल्या बुरुजांचा ठावठिकाणा नसला, तरी तग धरून उभं असलेल्या प्रवेशद्वारापाशी पोहोचायला गावातून निघाल्यापासून १० मिनिटं पुरली. द्वारावरचा संस्कृत भाषेतला शिलालेख कोसळल्यामुळे आता धुळ्याच्या राजवाडे संशोधन मंडळात जपलाय.
19Dhule_Forts_DiscoverSahyadri.jpg

द्वाराजवळ कोसळलेले भग्न स्तंभ पाहता, इथं द्वारापाशी सुरेख देवळी असू शकेल असं वाटलं. सध्या इथे एक कबर अन् पांढ-या रंगात रंगवलेले स्तंभ दिसतात.
20Dhule_Forts_DiscoverSahyadri.jpg21Dhule_Forts_DiscoverSahyadri.jpg

चिंचोळ्या माथ्यावर पोहोचायला घळीतून पाय-या खणल्या आहेत.
22Dhule_Forts_DiscoverSahyadri.jpg

मुंबई - धुळे – आग्रा अन् नागपूर - धुळे – अंमळनेर – सूरत अश्या महत्त्वाच्या मार्गांवर नजर ठेवणारा किल्ला १३व्या शतकापासून इथेच असाच उभा आहे.
23Dhule_Forts_DiscoverSahyadri.jpg

माथ्यावर तुरळक, पण वैशिष्ट्यपूर्ण अवशेष आहे. दोन रांजण बघून, ते फक्त धान्य साठवण्यासाठी असतील, की व्यापारी मार्गांवरची जकात गोळा करायला असं वाटून गेलं.
24Dhule_Forts_DiscoverSahyadri.jpg

माथ्यावर एक चौकोनी आकाराची पाय-या नसलेली अतिशय खोल विहीर आहे. झाडांच्या दाटीमुळे आवाका लक्षात येत नाही. पण “अंतर = वेग x वेळ” असले फंडे मारून, इंजिनीयर्सनी - खडा पाण्यात पडायला किती वेळ लागतो हे मोजून, त्यावरून विहीरीतलं पाणी १०० फूट खोलवर असावं, असं गणित मांडलं. पाणी पिण्यास योग्य वाटलं, तरी काढणं शक्य नाही. त्यामुळे गडावर आजमितीस पिण्यास पाणी, किंवा मुक्कामास निवारा नाही.
25Dhule_Forts_DiscoverSahyadri.jpg

एकीकडे पुष्करणी अन् त्यातले कोनाडे, तर दुसरीकडे चुनाविरहीत तटबंदी लक्ष्यवेधी.
26Dhule_Forts_DiscoverSahyadri.jpg

चढाई अन् गडफेरी करून, एका तासात सोनगीर गावात परतलो. हायवेवर न्याहारी-भोजनासाठी हॉटेल्सची रेलचेल होतीच, पण बहुतांशी निराशाच झाली. स्वत: पौष्टिक आहार सोबत घेतला होता, हे बरं झालं. परत एकदा हायवेवर बुंग बुंग करत खानदेशातल्या किल्ल्यांची सफर चालू ठेवली.

झोडग्याचं अद्भूत माणकेश्वर शिवालय
सिन्नर-अंबरनाथ-खिद्रापूरच्या मंदिरांची आठवण यावी, असं अद्भूत शिवालय धुळे-मालेगाव महामार्गाजवळ अवचित गवसलं.
29Dhule_Forts_DiscoverSahyadri.jpg

तीन कीर्तीमुखे एकावर एक असलेलं दुर्मिळ शिल्प
30Dhule_Forts_DiscoverSahyadri.jpg

पौराणिक देखावे, प्राणी-यक्ष-किन्नर-गंधर्व अन् मंदिराच्या शिखरांच्या छोट्या प्रतिकृतींनी सजवलेला कळस.
31Dhule_Forts_DiscoverSahyadri.jpg32Dhule_Forts_DiscoverSahyadri.jpg

मंदिराच्या उजव्या बाजूवर कोरलेला विष्णूच्या दशावताराचं शिल्पं म्हणजे केवळ अप्रतिम!!!
34Dhule_Forts_DiscoverSahyadri.jpg35Dhule_Forts_DiscoverSahyadri.jpgविस्मृतीत गेलेल्या काहीशे वर्षांपूर्वीच्या संस्कृतीच्या पाऊलखुणा आता या विखुरलेल्या अवशेषांच्या रूपाने साद घालतात. हे अद्भूत वैभव कोरणा-या हातांना अन् त्यामागच्या प्रेरणेला सलाम केला!!!

अन् सरतेशेवटी सापडला एक ओळखीचा निळा फलक - “आम्ही अस्तित्वात आहोत, अन् आमच्या लेखी ही एक पुरातन वास्तू आहे” असं सांगणारा पुरातत्व खात्याचा फलक!!!

(टीप: झोडग्याचं अद्भूत माणकेश्वर शिवालयाबद्दल अधिक माहितीसाठी मायबोलीकर ज्ञानु यांनी लिहिलेला इथे वाचता येईल: http://www.maayboli.com/node/42663)

हजारो सीताफळांसह आमंत्रण देणारा, आडवाटेचा ‘दुर्ग कंक्राळा’
मूळ नियोजनानुसार आता मुक्कामासाठी गाळणा किल्ल्यावर पोहोचायचं होतं, अन् दुस-या दिवशी कंक्राळा किल्ला बघून परतीचा प्रवास करायचा होता. घड्याळ बघितलं, अन् वाटलं कंक्राळा आत्ताच करता येईल. मग काय, झोडगे गावापाशी आग्रा हायवे सोडून, करंजगव्हाण गावामार्गे पुढे कंक्राळे गाव गाठलं.

साल्हेरजवळच्या सेलबारी-डोलबारीच्या उत्तुंग रांगा पूर्वेकडे पसरत जातात, अन् मालेगावच्या उत्तरेला भेटतात तुरळक पसरलेल्या ‘गाळणा टेकड्यांच्या’ रुपाने. अश्याच एका विखुरलेल्या टेकडीवर कंक्राळे किल्ला वसला आहे. कंक्राळे गावापासून साधारण दोन कि.मी. अंतरावर गडाची चढाई सुरू होते. पाझरतलावापासून बाजरीच्या शेतांमधून वाट काढत आपण किल्ल्यासमोर येतो.
36Dhule_Forts_DiscoverSahyadri.jpg

गडाचा बराचसा उतार कातळाचा असून, एका लक्ष्यवेधी घळीमधून चढाई वाट असणार, असा आडाखा आपण बांधतो. तसा हा प्रदेश रुक्ष असल्यानं गडाच्या अग्गदी पायथ्यापर्यंत बाजरीची शेती फुलवलीये. गडाकडे जाणारी एक ठळक वाट अशी नाहीच. त्यामुळे, चढाईसाठी सोप्पी खूण म्हणजे गडाच्या उजव्या धारेच्या पायथ्याशी पोहोचून आडवं-आडवं जायचं, शेताडी डावीकडे ठेवत घळीचा पायथा गाठायचा. घळीत एक आश्चर्य आपली वाट बघत असतं - शेकडो सीताफळांनी लगडलेली झुडुपं...
38Dhule_Forts_DiscoverSahyadri.jpg

घळीतून एक-एक पाऊल दगड-धोंड्यांवर रोवत चढाई करायची. ठळक नसली, तरी दगडांमधून वाट जाणवते अन् सहजंच आपण माथ्याजवळ येतो. उजवीकडे कातळाच्या उतरंडीवर कोरीव टाकी दिसतात. माथ्याकडून टाक्यांपाशी उतरलेला चुन्याचा पांढरा रंग नैसर्गिक वाटत नाही. पाणी मात्र झक्कास मिळालं.
39Dhule_Forts_DiscoverSahyadri.jpg

कोसळलेल्या द्वारापासून माथ्यावर पोहोचलो. लांबवर विखुरलेल्या टेकड्या, पावसामुळे मातीला आलेला तजेला, पर्जन्यानंतर विश्रांती घेणारे रिक्त पांढरे ढग, लुसलुशीत गवताच्या शोधात असलेली चोखंदळ शेरडं अन् निवांत गुराखी – असा मस्त माहोल!!!
40Dhule_Forts_DiscoverSahyadri.jpg

गडावर उघड्यावर मारुती अन् शिवपिंडीचं दर्शन घेतलं. एकदम साधं ठिकाण. मुक्कामासाठी सुयोग्य जागा गडावर कुठेच नाही. पल्याड डोकावत होती डोंगरांची दाटी अन् छानशी दरी. आसपासच्या डोंगरांवरही काही टाकी-अवशेष असतील का असं वाटून गेलं. दरीमधली हिरवळ अन् पल्याडचा गाळणा किल्ला बघून आम्ही पुढे निघालो.
41Dhule_Forts_DiscoverSahyadri.jpg

माथ्यावर आहे एकास एक बिलगलेल्या पाण्याच्या टाक्यांची मालिका.
42Dhule_Forts_DiscoverSahyadri.jpg

गडावरचा भर्राट वारा, सीताफळांच्या झुडुपांची दाटी, पाण्याची विपुल टाकी, दूरवर पसरलेल्या टेकड्यांचं मोहक दृश्य, अन् आडवाटेच्या सौंदर्यानं हा छोटेखानी गड आम्हांला फारंच आवडून गेला...
43Dhule_Forts_DiscoverSahyadri.jpgप्रत्येक दुर्गप्रेमीनं बघितलाच पाहिजे, असा खानदेशातला सर्वोत्तम दुर्गखजिना – दुर्ग गाळणा
कंक्राळ्यावरून गाळणा किल्ला पायी चालल्यास जेमतेम ७-८ किमी. पण, गाडीनं यायचं, तर कंक्राळे – करंजगव्हाण – डोंगरळे – गाळणा असा तब्बल ३७-३८ किमीचा वळसा पडला. गाळणा गावात प्रवेश करता करता उन्हं उतरणीला लागली होती.
44Dhule_Forts_DiscoverSahyadri.jpg

गुरू गोरक्षनाथ शिवपंचायतन मंदिर ट्रस्टच्या चकाचक मंदिरापल्याड गडाचा मार्ग सुरू होतो. ‘गडावर मुक्काम करायचाय’, असं म्हणल्यावर फॉरेस्ट गार्डनी गडावरच्या जनावरांची अन् वाघाची भीती घातली. नोंदवहीत नाव-गाव-पत्ता अश्या नोंदी करून, ट्रेकमध्ये पहिल्यांदाच पूर्ण वजनाची सॅक पाठीवर चढवली. समोर गडाची खणखणीत तटबंदी चित्ताकर्षक दिसत होती.
45Dhule_Forts_DiscoverSahyadri.jpg

एकावर एक बांधलेल्या - परकोट द्वार, लोखंडी द्वार, कोतवाल पीर द्वार व लाखा द्वार अश्या भव्य अभेद्य द्वारांची रचना केवळ बेजोड आहे. चढाई मार्ग माथ्यावरून पूर्णत: तोफेच्या टप्प्यात आहे. प्रत्येक द्वारावरची शिल्पं अभ्यासण्यासारखी. या द्वारावर पर्शियन लिपीतील शिलालेख दिसला.
46Dhule_Forts_DiscoverSahyadri.jpg

लांबचलांब पसरलेला देखणा तट तब्बल ३५ ते ४० फूट उंच आहे.
47Dhule_Forts_DiscoverSahyadri.jpg

सुंदर महिरपी सज्जांमुळे तटबंदीचं सौंदर्य अजूनंच खुललंय.
48Dhule_Forts_DiscoverSahyadri.jpg

कातळकोरीव गुहा, चोरदरवाजा बघून माथ्यावर पोहोचलो. कलाकुसर केलेला भव्य दर्गा अन् खांबावर कोरलेले कुराणातील आयते वैशिष्ट्यपूर्ण होते. या दर्ग्याच्या मागे बांधीव तळ्यात पिण्याचं पाणी आहे. ट्रेकर्सना मुक्कामास दर्गा योग्य. दर्ग्याच्या जागी १५ व्या शतकात गाळणेश्वर महादेवाचे मंदिर होते, असं म्हणतात. १५ व्या शतकापासून गाळणा किल्ल्यास अत्यंत महत्त्व होतें. हिंदू राजवट, निजामशहा, बागलाणची राजवट, शिवाजीराजे, औरंगझेब, इंग्रज असे कित्येक शासक या दुर्गाने अनुभवले आहेत.
49Dhule_Forts_DiscoverSahyadri.jpg

माथ्यावरच्या टेपाडावर कलाकुसर असलेली थडगी सोडली, तर काहीच नाही. सूर्यास्त होण्यापूर्वीच गडफेरी पूर्ण झाली होती. पठारी किल्ल्यांच्या अश्या ट्रेकसाठी आमचं तंत्र म्हणजे, व्यवस्थित सर्व गड बघायचा, पण अजिबात वेळ वाया न घालवता...

गाळणा गडावर मुक्कामाच्या तयारीने शिधा अन् सॅकसकट पोहोचलो असलो, तरी अचानक ट्रेकर्सची सुपीक डोकी अन् खुमखुमी आड आली, ‘गड उतरून चला आत्ताच परतीच्या प्रवासाला..’ गडाच्या पाय-या उतरत असलो, तरी मनात रुंजी घालत होता, संधीप्रकाशात उजळलेला महिरपी सज्जा!!!
50Dhule_Forts_DiscoverSahyadri.jpg

...परतीचा ३५० कि.मी. प्रवास सुरू झाला. गप्पांमध्ये अन् डोळ्यांसमोर तरळत होती एका दिवसात बघितलेल्या दृश्यांची मालिका..

..लांबवर विखुरलेली माळरानं अन् तुरळक टेकड्या, बाजरीची शेती, पाझर तलाव अन् ढगांच्या पसरलेल्या सावल्या...
Z1Dhule_Forts_DiscoverSahyadri.jpg

….मध्ययुगीन राजवटीच्या खुणा जपणारे दुर्ग!
Z2Dhule_Forts_DiscoverSahyadri.jpg

...शेकडो सीताफळांनी लगडलेली झुडुपं..
Z3Dhule_Forts_DiscoverSahyadri.jpg

...एकीकडे मजबूतीचा गर्व करणारं सिमेंटचं अर्वाचीन बांधकाम, तर दुसरीकडे चुनासुद्धा न भरता केवळ दगड रचून उभं केलेलं मध्ययुगीन स्थापत्याचं सौंदर्य, असं परस्परविरोधी दृश्य!!! एकीकडे विकासाची अन् वेगाची प्रौढी मिरवणारा मुंबई-आग्रा महामार्ग, तर दुसरीकडे बहुसंख्यांच्या नजरेत निकामी झालेल्या जुन्या किल्ल्याचे अवशेष असं परस्परविरोधी दृश्य..
Z4Dhule_Forts_DiscoverSahyadri.jpg

...खानदेशची भन्नाट माणसं..
Z5Dhule_Forts_DiscoverSahyadri.jpg

...अद्भूत, पण विस्मृतीच्या काजळीत हरवलेल्या संस्कृतीच्या खुणा..
Z6Dhule_Forts_DiscoverSahyadri.jpg

खरंच, खानदेशचे हे दुर्ग म्हणजे गत-इतिहासात डोकावायचा-रमायचा झरोका आहेत, हे मनोमन पटतं..
Z7Dhule_Forts_DiscoverSahyadri.jpg

विशेष सूचना: खानदेशाचं दुर्गभांडार आम्ही एका दिवसात बघितलं असलं, तरी ट्रेकर्सनी नियोजन करताना दोन दिवसांचा बेत आखला, तर निवांतपणे दुर्गभेट करता येईल.

- © Discoverसह्याद्री (साईप्रकाश बेलसरे)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वाह, सुंदरच!
हॉय्लॉ.... गाळणा किल्ल्याचं मी नावसुद्धा ऐकलं नव्हतं.
लळींग धुळ्याजवळच अस्ल्याने आणि सोनगीरचा किल्ला हे दुरुनच पाहिलेत. लळींगच्या किल्ल्यावर एवढं काही असेल असं वाटलच नव्हतं.
नाशिक, मालेगाव, मुंबई जातांना लळिंगचा घाट उतरला की रोकडोबाचं दर्शन घ्यायचं हे ठरलेलं असायचं. दसर्याला शिलांगण खेळायला(सिमोल्लंघन करायला) आम्ही गाडीभरुन रोकडोबालाच जायचो. खुप जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. Happy

मस्त माहिती, फॅण्टॅस्टिक फोटो

खानदेशचे हे दुर्ग म्हणजे गत-इतिहासात डोकावायचा-रमायचा झरोका आहेत, हे मनोमन पटतं>> संपुर्ण अनुमोदन Happy

वा, फारच सुरेख लेखन आणि फोटोही सुंदरच .....

चरैवेति, चरैवेति = चालत रहा .... (चालते व्हा Wink )

ते पडके अवशेष, उभे करुन ठेवायला पण पुरातन खात्याची परवानगी नसते का ? काही काळाने ते कुणाच्यातरी घरी जातील एवढे मात्र नक्की.

बाकी फोटो छानच पण आता असे अवशेष बघून मन विषण्ण व्हायला लागलेय. इजिप्तमधे ४००० वर्षांपुर्वीचे सगळे अजून बघायला मिळते आणि आपल्याकडे ३०० वर्षांपुर्वीचे काही धड दाखवण्यासारखे राहिलेले नाही.

कंसराज
चिन्नु
हेम
इंद्रधनुष्य
मी_आर्या
झकासराव
सृष्टी
हर्पेन
पुरंदरे शशांक
सुनिल परचुरे
मयुरी.
रंगासेठ
जिप्सी
रोहित ..एक मावळा
पाषाणभेद
दोस्तहो, प्रत्येक प्रतिक्रियेबद्दल खूप खूप खूप धन्यवाद!!! Happy Happy
गाळणा किल्ला अत्यंत प्रेक्षणीय अन् कौटुंबिक सहली सहज काढण्यासारखा आहे!!!!!!

@पुरंदरे शशांक:: चरैवेति, चरैवेति = चालत रहा .... (चालते व्हा) >>भन्नाट शुभेच्छा!!! Happy

@निनाद: घाई अशी नाही केली.. किल्ल्यावर राहायला खरंतर अग्गदी आवडतंच.. या ट्रेकला समहाऊ डोकं तिरकं चाललं, अन् मुक्कामापेक्षा रात्रीचा दुरांतो एक्सप्रेसच्या प्रवासाचा मोह पडला..

यो:
हा पटटा यावर्षी जमला नाही >> होईलचं... पण, या वर्षी हा पट्टा न करता, ‘पट्ट्या’च्या पट्ट्यातला ‘पट्टा’ करून आलात की!!! Wink

दिनेशदा: तुमच्या भावना अगदी ख-या आहेत. या ट्रेकला तर पदोपदी त्रास झाला, की जुन्या संस्कृतीचे वारसा किती दिवस टिकणार.. अन्, आपण त्यासाठी फार काही करत नाही, अशी हतबलता देखील!!!
‘पुरातन’ खातं असं वाटणं, साहजिक आहे. आजकाल तर ते स्वप्नांवरून उत्खनन करत बसतात, खजिना शोधायला. तुमच्या पडक्या किल्ल्यांमध्ये कोणाला इंटरेस्ट!!!

Srd:: दुरांतो एक्सप्रेसचा फोटो खास विनंतीवरून
51Dhule_Forts_DiscoverSahyadri.jpg