सह्याद्री दुरांतो एक्सप्रेस

Submitted by Discoverसह्याद्री on 6 October, 2013 - 10:53

..ट्रेकर या प्राण्याबद्दल लोकांचे गैरसमजंच जास्त. २४ तास ट्रेकिंगच्या विचारात - ट्रेकमित्रांमध्ये रमलेला, वीकएंडला घरच्यांना सोडून एकटा उंडारणारा. अन् धम्माल मज्जा मारणारा.

...पण, खरं सांगू हा 'गरीब बिच्चारा' एकीकडे 'व्यवसाय/नोकरी आणि कुटुंब', अन् दुसरीकडे 'सह्याद्रीची हाक' अश्या परस्परविरोधी मागण्यांनी नेहेमीच गांजला असतो. त्यातंच हल्ली ‘नवीन’ किल्ले बघायचे असतील तर मुंबई-पुण्यापासून खूप लांबचा प्रवास अटळ झालेला. काय करावं...

...अन् मग एके दिवशी ट्रेकर्सनी शोधली ‘सह्याद्री दुरांतो एक्सप्रेस’!!! याच स्पेशल एक्सप्रेसची ठळक वैशिष्ट्य सांगण्यासाठी हा लेखनप्रपंच:

१. ऑफिस संपवून शुक्रवारी रात्री एका इंडिकामधून प्रस्थान. इंडीकाची 'शोभा जाणं' वगैरे प्रकार नसल्याने, सॅकचा भार घ्यायला कॅरियर असतंच.
DiscoverSahyadri_DurantoExpress02.jpg

२. प्रवासात हायवेवर फाजील साहस नाही, या नियमाचं पालन केलं जातं.

३. अमुक ठिकाणी खादाडी, तमुक ठिकाणी ढाब्यावरचं रुचकर भोजन अश्या रुढींचं अचूक पालन केलं जातं. गडावरचं टाक्यातले किंचित कण असलेले पाणी पिणारे हेच ट्रेकर्स ढाब्यावर कधी पाणी विकत घेतात. भोजनानंतर दर दीडेक तासानं मसाला दूध किंवा आल्याचा चाय हव्वाच नाही का..
DiscoverSahyadri_DurantoExpress09.jpg

४. चर्चेला विषय एकंच: झालेले-होऊ घातलेले ट्रेक्स हाच. अर्थातच, ऑफिसचा विषय हा फाऊल समजण्यात येतो..

५. क्वचित, रस्त्यात दिसणारे फासेपारधी, रस्त्यावर टाकलेले बाभळीचे काटे भेदरवतात..

६. कधी 'ये रात भीगी भीगी', 'तूम जो मिल गये हो', 'अभी ना जाओ छोड के', 'पल पल दिल के पास', 'माना जनाब ने पुकारा नही', 'ओ साथी रे' पासून, ते 'तरुण आहे रात्र अजुनी', 'अताशा असे हे' पर्यंत - अवीट गीतांचे सूर प्रवासात भरून राहतात... भारून टाकतात...

७. सह्याद्रीत अंतर्भागात तरस, उदमांजर, साळींदर, हरणं, ससे हमखास दर्शन देतात.
*** एकदा हरिश्चंद्रगडाच्या रस्त्यावर तरस आमच्या गाडीसमोर दौडत राहिला. हा पहा व्हिडीओ:: http://www.youtube.com/watch?v=jOi0Jf-eT7I&feature=youtu.be
(Video credit: Aniruddha Kotkar)

८. काही क्षण 'कातील' असतात. हवेत सणसणीत गारवा असतो. मैलोनमैल कोणी दिसत नसताना, गाडी रस्त्याच्या मध्ये थांबवायची. गाडीचा आवाज थांबला, की शांततेत तो आवाज कित्ती मोठ्ठा येत होता याची जाणीव होते. आता दूरवरून एखाद्या राउळात घुमणारे टाळ-मृदुंग हलकेच कानी पडू लागतात. अश्या वेळी डांबरी रस्त्यावर पाठ टेकवून आभाळातल्या आकाशगंगेचं सौंदर्य अनुभवणं, यासारखं सुख ते काय! तर कधी एखाद्या भन्नाट गडाचा भव्य आकार चंद्रप्रकाशात उजळला असतो...
DiscoverSahyadri_DurantoExpress05.jpg

९. रात्री ३ वाजता पोहोचल्यावर मुक्कामाची जागा शोधणे, हे कर्म कठीण असलं; तरी दर वेळी भन्नाट जागा गवसतात.
DiscoverSahyadri_DurantoExpress07.jpg

१०. सक्काळी ट्रेकसाठी मंडळी फ्रेश!!!! इंडिकाकडे कोण्या स्थानिकाला लक्ष ठेवायची विनंती करून कूच करायचं..
DiscoverSahyadri_DurantoExpress06.jpg

११. सह्याद्री दुरांतो एक्सप्रेस फक्त पठारी किंवा कोकणातल्या एकांड्या किल्ल्यांसाठीच वापरण्यात येते. घाटवाटा अन् तंगडतोड डोंगररांगा स्पेशल ट्रेकसाठी तडजोड नाही. दिवसाभरात अधाश्यासारखं जास्तीत जास्त किल्ले, मंदिरं बघत हुंदडायचं. अर्थात अजिबात न उरकता, पण वायफळ टाईमपास न करता..

१२. अटळ असलेल्या सूर्यास्ताबरोबर सह्याद्रीला अलविदा करून दुरांतो एक्सप्रेसनं परतीचा प्रवास सुरू करायचा.. सह्याद्री अजूनही अंधारात एक एक खुबी उलगडून दाखवत असतो...
DiscoverSahyadri_DurantoExpress01.jpg

१३. शरीर थकलं असतं, ते जाणवत नाही, पण मन मात्र खरंच जड झालेलं असतं.. होणारच, काही हरकत नाही. दरम्यान, पुढच्या दुरांतो एक्सप्रेस ट्रेकच्या चर्चा अन् बुकिंग जोरात चालू झालेलं असतं...

विशेष सूचना:: अर्थातचं, पूर्वतयारी - पूर्वानुभवाच्या रिझर्वेशनशिवाय ही सह्याद्री दुरांतो एक्सप्रेस पकडणं, हे धोक्याचं!!!

- © Discoverसह्याद्री (साईप्रकाश बेलसरे)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्वचित, रस्त्यात दिसणारे फासेपारधी, रस्त्यावर टाकलेले बाभळीचे काटे भेदरवतात
>>
हे फासेपारधी म्हणजे दरोडेखोर का?

मस्त

चनस
शैलजा
पुरंदरे शशांक
झकासराव
सुहास्य
दिनेश.
शापित गंधर्व
प्रिति १
पिन्कि ८०
सुनिल परचुरे
रोहित ..एक मावळा
आनंदयात्री
यो

दोस्तहो, खूप खूप खूप धन्यवाद.. Happy Happy
तुमचे सुद्धा सह्याद्री दुरांतो एक्सप्रेसचे अनुभव-फोटो ऐकायला-पाहायला आवडतील..

@राहुल१२३:
फासेपारधी म्हणजे दरोडेखोर नाहीत.. पण, रात्री २-३ वाजता कु-हाडी/ कोयते घेऊन रस्त्यावर हे लोकं दिसले, की आपल्याला भीती नक्कीच वाटते..
...एकदा मित्राने कार रस्त्याच्या एकदम बाजूच्या झुडूपांमधून घातली. पाहतो तर रस्त्याच्या पूर्ण रुंदीइतके अन् २ फूट उंचीइतके बाभळीचे काटे रीतसर मांडले होते... प्रकार स्केरी होता..

@दत्तू
धन्यवाद सर!!! अरे हो, या एरियामध्ये नक्कीच आहेत तरस, एका गावाच्या वेशीपाशी दिसला आम्हांला. दोनदा दिसलाय इथे तरस…

छान.

क्र. ८. कितीही वेळा अनुभवलेलं असलं तरी परत अनुभवण्यासाठी हवाहवासा वाटणारा मुद्दा.. Happy
क्र. ६ हल्ली मी विविध भारतीवरील स्पेशल कार्यक्रमांचे रेकॉर्डींग करुन ते अशा वेळी लावतो. रात्री रेडीओ ऐकण्याची मजाच वेगळी..

शेवटचा अमानवीय फोटो भारी आलाय.. Happy

३. अमुक ठिकाणी खादाडी, तमुक ठिकाणी ढाब्यावरचं रुचकर भोजन अश्या रुढींचं अचूक पालन केलं जातं. गडावरचं टाक्यातले किंचित कण असलेले पाणी पिणारे हेच ट्रेकर्स ढाब्यावर कधी पाणी विकत घेतात. भोजनानंतर दर दीडेक तासानं मसाला दूध किंवा आल्याचा चाय हव्वाच नाही का..>>> भिडणारं वाक्य !!!!

टायटल बघून मला वाटलं तुमची ही दुरांतो एक्स्प्रेस धुळ्याला जाऊन आली त्याचा वृत्तांत आहे की काय. पण कोई बात नाही. तोही लवकर स्टेशनवर येउद्या.बाकी आपने पाठलाग करके उस तरसको बहोत तरसाया Wink

मिलिंदा
हेम
सह्याद्रीमित्र
प्रतिक्रियेबद्दल खूप खूप खूप धन्यवाद!!! Happy

@हेम:
खरंय... क्र. ८ चे अनुभव, विशेषत: उन्हाळ्याच्या रात्रीचे प्रवास... अहाहा, आठवूनसुद्धा विलक्षण हुरहूर वाटते. Happy
रेडीओ रेकॉर्डींग करून ट्रेकला ऐकणे, ही भन्नाट आयडीया आहे..

@सह्याद्रीमित्र:
>> आपने पाठलाग करके उस तरसको बहोत तरसाया >> Lol
अरे, मी खरंतर धुळ्याच्या ट्रेकचं त्रोटक वर्णन लिहायलाचं बसलेलो.. प्रस्तावनेत प्रवासाबद्दल लिहिताना इतकी मज्जा यायला लागली, की धुळ्याच्या ट्रेकचं वर्णन सोडून मग ट्रेकप्रवासावर एक छोटा लेख झाला.