समुद्रकिनारा

Submitted by नंदिनी on 4 September, 2013 - 10:19

समुद्र विशाल असतो, अमर्याद असतो, अथांग असतो.
पण प्रत्येक समुद्राला एक किनारा असतो...
आणि तो किनारा त्या समुद्राला थोपवून धरतो. हा किनारा त्या समुद्राची सीमा असतो.
किनार्‍याकडे स्वत:ची काहीच शक्ती नसते. बघायला गेलं तर जमिनीचा एक तुकडा...
पण समुद्राला थांबवायची कला मात्र त्या किनार्‍यामधे असते.
किनारा.... त्या समुद्रासाठी विश्रांतीचं शेवटचं ठिकाण.
किनारा.... त्या समुद्राची अखेर.
किनारा.... त्या समुद्राची सुरूवात....
घणाघाती येणार्‍या लाटांशी सतत युद्ध खेळत किनारा तिथेच असतो, अविचल, अविरत.
आणि तो समुद्र, तो मात्र क्षणाक्षणाला बदलत आणि गरजत....

ती कोण आहे? असाच एक समुद्र तर आहे. तिच्या मनाचा ठाव आजवर कधी लागला नाही.
तिच्या आयुष्यात माझं स्थान मलाच कधी समजलं नाही.
वेड्यासारखा तिच्यावर प्रेम करत राहिलो....... पण तरी तिच्या जीवनामधे कधीच मला स्थान मिळालं नाही..
खोल, अथांग आणि वरून शांत असणार्‍या आणि मनामधे प्रचंड खळबळ घेऊन जगणार्‍या त्या समुद्राचा मी कधीच किनारा झालो नाही....

मी तिचा कधी नव्हतोच, आजही नाही, आणि कदाचित उद्यादेखील नसेन.... उद्या... तिचा साहिल तिला सोडून गेल्यावरदेखील.

मी तिचा आयुष्यात असून नसल्यासारखा... आणि ती माझ्या आयुष्यात नसूनदेखील अख्ख्या आयुष्याचं केंद्रस्थान असल्यासारखी.....
ती... माझा समुद्र!!!! आणि मी??? मी मात्र कुणीच नाही!!!!! कुणीच नाही!!!!!

=============================================

डोळ्यावरचा चष्मा नीट करत वीरने पुन्हा एकदा ती नोट वाचली. अवघ्या चार पाच ओळीचीच नोट. तरी वीर पुन्हा पुन्हा ती वाचून बघत होता. तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला. राजनचा फोन..

“बोल” त्याने फोन कानाला लावत म्हटलं.

“इथे सर्व ओके आहे, मीडीयाला अद्यापतरी काही माहिती नाही. अजून मला कन्फ़र्मेशनचे फोन येत आहेत. काय सांगू त्यांना?”

“आता काहीच बोलू नकोस. कुठल्याही मीडीयावाल्याचा कॉल घेऊच नकोस. मी दहा मिनीटांत नोट पाठवतोय. त्याआधी तुझा मोबाईल स्विच ऑफ़ कर.” तुटकपणे वीर म्हणाला आणि त्याने कॉल कट केला.
डोळ्यावरचा चष्मा काढून त्याने डोळे पुसले. आणि खुर्चीतच मान मागे करत स्वत:च्या केसांतून हात फ़िरवला.

“काय होणार आपलं?” त्याच्या आईचं आवडतं वाक्य तो स्वत:शी पुटपुटला आणि त्याने कम्प्य्टरवरची ती नोट ईमेलमधून पाठवून दिली.

“आता जे काय होइल ते होइल.... एकदा निर्णय घेऊन झाला... धनुला काल रात्रीच सांगितलं. चिडली, ओरडली, रडली, माझ्यावर वैतागली आणि निघून गेली.” वीर परत स्वत:शीच बोलल्यासारखा म्हणाला.

ईमेल सेन्ड झाल्याची नोटिस येताच वीरने उठून कम्प्युटर बंद केला. मोबाईल स्विच ऑफ़ केला आणि लगेच तो त्याच्या फ़्लॅटबाहेर पडला. पाचेक मिनिटांनी त्याची नवीकोरी एसुयुव्ही मुंबईच्या ट्राफ़िकच्या रस्त्याबाहेर पडत होती. ईमेल मिळाल्या मिळाल्या मीडीयाकडून प्रश्नांची सरबत्ती चालू झाली असती, त्याच्या मोबाईलवर उत्तर मिळत नाहीत हे बघून काही मीडीयावाले सरळ त्याच्या फ़्लॅटकडे पण आले असतेच. त्या सर्वांना चुकवायला म्हणून तर तो सरळ मुंबईबाहेर निघाला होता. सगळं काही शांत झाल्यावरच परत फ़्लॅटवर यायचं हे त्याने आधीच ठरवलेलं होतं. राजनला, त्याच्या आईला अगदी धनुला सुद्धा या संदर्भात कुठल्याही बाहेरच्या माणसाशी बोलायला त्याने सक्त मनाई केली होती.. धनु काल रात्री उशीराची फ़्लाईट पकडून चेन्नईला निघून पण गेली होती. “पुन्हा मला कधीही फोन करू नकोस” अशी त्याला विनंती करून.

आता कशाचाही विचार नको... त्याने पुन्हा एकदा स्वत:लाच समजावलं.
====================================================

“सारा.... सारा....” अख्ख्या वर्क एरियामधे देशमुखांचा आवाज घुमला. सारा डेस्कवर डोकं ठेवून शांत बसली होती, देशमुखांच्या एवढ्या घणाघाती आवाजाने ती लगेच उठली आणि धावत त्यांच्या केबिनमधे गेली.

“येस सर?” तिने विचारलं.

“काय हे मुली? किती चुका? किती छोट्या छोट्या चुका? सीरीअर रिपोर्टर झालात मागच्या महिन्यात, तरी स्पेलिंग मिस्टेक्स” देशमुख आता मात्र एकदम हळू आवाजात म्हणाले. “असं करू नकोस. मी एडिट करतोय तोपर्यंत ठिक आहे, धवनकडे कॉपी गेली असती तर....”

“तर त्याला चुका झाल्यात हे पण समजलं नसतं.” सारा पटकन बोलून गेली आणि काय बोललंय हे ल़क्षात आल्यावर लगेच गप्प बसली.

“महान आहेस” देशमुख सर हसू दाबत म्हणाले. “ही कॉपी पाठवतोय तुला परत. व्यवस्थित लिहून पाठव.”

“ओके. शिवाय अजून दोन तीन छोट्या स्निपेट्स आहेत त्यापण एकदम पाठवून देते” म्हणत सारा केबिनबाहेर निघाली.

“लवकरात लवकर, तुला नंतर प्रेस कॉनलापण जायचं आहे ना?” देशमुख सर परत एकदा कीबोर्डवर टाईप करत म्हणाले.

“कुठल्या?” साराने दरवाजा उघडत म्हटलं.

“गंमत करतेस का?” देशमुखांनी वर तिच्याकडे बघत म्हटलं. “सारा, वीर कपूरची प्रेस कॉन्फ़रन्स, दुपारी तीन वाजता. हॉटेल मरीना. त्याच्या लग्नाची अनाऊन्समेंट.”

सारा क्षणभर थांबली. “ओह, ती होय, ती आहे की लक्षात. अशी कशी विसरेन मी? आता दीड तर वाजतोय. अडीच वाजता निघेन ऑफ़िसमधून....” सारा हसत म्हणाली आणि केबिनबाहेर आली.

वीरची प्रेस कॉन्फ़रन्स आज होती? तिच्या खरंच लक्षात नव्हतं. आणि आपणच त्या प्रेस कॉन्फ़रन्सला जायचं? राजनला फोन करून कल्पना द्यावी का? की सरळ राजनकडून रीलीज आणि फोटो मागवावेत? पण धवनला वीरकडून काही एक्स्क्लुझिव बाईट हवा असणार.... म्हणजे तिने वीरशी किमान फोनवर तरी बोलायला हवं. कसं शक्य होतं??? दोन महिन्यापूर्वी तर तिने आणि वीरने......

“हाय डीअर!!” नेत्रा जवळजवळ तिच्या गळ्यात येऊन पडली.

“काय झालं? इतकी कशाला खुश आहेस?” साराने विचारलं.

“अरे क्या स्कूप मिला है... सीएम का कोट मिला है. ए पण प्लीज मला लिहायला थोडी मदत करशील? देशमुखला माझी कॉपी कधीच आवडत नाही...” नेत्रा उत्साहाने नुसती फ़सफ़सत होती.

“आणि माझी आवडते असं वाटलं की काय तुला?? रीराईट करायचं फ़र्मान घेऊन आले आत्ताच” सारा नेत्राला टाळण्यासाठी म्हणाली. नाहीतर जरा मदत म्हणत म्हणत अख्खी बातमीच कुणाकडून तरी दररोज लिहून घ्यायची. सारा तिची कॉपी परत एकदा वाचून बघत होती एवढ्यात इंटरकॉम वाजला, तिच्या आधी नेत्राने पटकन फोन घेतलापण.

“धवन....” फोन ठेवत ती इतकंच म्हणाली. “आता काय टुमणं काढलं याने?” म्हणत सारा त्याच्या केबिनमधे गेली.

“आपने मेल चेक किया?” धवन जेव्हा कधी इतक्या नम्रपणे बोलतो तेव्हा त्यानंतर लवकरच फ़ ची बाराखडी ऐकवणार हे प्रत्येकाला माहित होतंच.

“आधे घंटे पहले चेक किया था सर, कुछ खास नही रूटिन था” ती शांतपणे म्हणाली.

“आज वीर कपूरकी..”

“हां सर, मै अभी निकलही रही थी उसकेलिये”

“कहां जा रही थी?” धवन हाताची मूठ धडाधडा टेबलावर आपटत म्हणाला. “प्रेन कॉन हॅज बीन कॅन्स्ल्ड”

“व्हॉट?” साराचा तिच्या कानांवर विश्वास बसेना.

“येस, वीर कपूर हॅज सेन्ट अ नोट टू मीडीया. उसके और धनुयारिनी के बीचमे कोइ रिलेशन नही है. और ये शादीका अनाऊन्समेंट वॉज नेव्हर हॅपनिंग. ये क्या चक्कर है?”

“क्या झूठ बोलता है बंदा....” सारा म्हणाली “अरे, कल उसके सेक्रेटरीने फोन करके सारे मीडीया को बोला है... मॅरेज अनाऊन्समेंट...” सारा बोलता बोलता थबकली. वीरने नुसती लग्नाची घोषणा रद्द केली नव्हती, तर धनुबरोबर लग्न करणार नाही हे पण जाहीर केलं होतं. पण असं कसं घडलं होतं? पण वीरने तर स्पष्ट सांगितलं होतं की....

“आय विल स्टार्ट वर्कींग ऑन दिस सर...” सारा लगेच म्हणाली.

“आयडीयली, ये तुम्हाला स्कूप होना चाहिये था. वीर कपूर तुम्हारा बेस्ट फ़्रेन्ड जैसा है. गेट इन टच विथ हिम, प्रॉमिस अ गूड कव्हरेज ऍन्ड गेट ऍन एक्स्क्लुझिव कमेंट, ओल्सो ट्राय टू गेट इन टच विथ दॅट साऊथ गर्ल”

“येस सर, विल डू दॅट!!” म्हणून सारा केबिनबाहेर पडली. धवनच्या समोर मोठ्या कष्टाने तिने तिच्या मनातील भावना लपवल्या होत्या. बाहेर आल्यावर मात्र ती इकडे तिकडे न बघता सरळ लेडीज वॉशरूममधे गेली. आतमधे गेल्यावर तिने आतून लॉक करून घेतलं आणि तिच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. आज दिवसभर वीर च्या लग्नाच्या घोषणेबद्दल मनामधे घालमेल चालूच होती. आठच दिवसांपूर्वी तिला राजनने मुद्दाम फोन करून ही बातमी दिली होती. एक रिपोर्टर म्हणून नव्हे, तर वीरची गर्लफ़्रेंड म्हणून. वीरने दोन महिन्यापूर्वी तिच्याशी असलेलं नातं तोडलं होतं. स्वत:हून, तिच्याकडून कसलंही स्पष्टीकरण ऐकूनदेखील न घेता.....

दोन तीन मिनिटांनी साराने डोळे पुसले. रडून काहीही फ़ायदा नव्हता. धवनला एक्स्क्लुझिव्ह बाईट हवा होता, तो कसाही करून मिळवायलाच हवा. वीर आता नक्की कुठे आहे ते बघायलाच हवं. साराने चेहर्‍यावर पाणी मारलं आणि ती वॉशरूमधून वर्क एरियाकडे आली.

नेत्रा एखाद्या शिकार्‍यासारखी टपलेलीच होती. “सारा, ब्रेकींग न्युज!! वीरने...”

“माहित आहे. वीरने त्या इडलीअम्माबरोबर लग्नाची घोषणा रद्द केली” तिच्याआधी सारा हसत म्हणाली. वीर बॉलीवूडचा नेक्स्ट सुपरस्टार असेल, पण तिच्याइतका चांगला अभिनय करणं कुणालाच शक्य नव्हतं. “त्यासाठीच मी निघतेय आता”

“कुठे?” नेत्रा उत्साहाने म्हणाली. “मीपण येऊ? देशमुख सर म्हणाले होते की सीनीअर्सच्या सोबत जात रहा म्हणून”

“आज नको गं. थोडी सेन्सीटीव्ह स्टोरी आहे म्हणून. मी आता वीरच्या फ़्लॅटवर निघतेय. त्याचा मोबाईल बंद आहे. घरी असेल तर तिथेच बोलेन त्याच्याशी....” सारा तिची बॅग उचलत म्हणाली. “नेस्क्ट टाईम पक्का” तिने थम्ब्स अप करत नेत्राला उत्तर दिलं आणि ती निघाली.

ऑफ़िसच्या बिल्डिंगमधून बाहेर पडताना साराला नक्की माहिती होतं वीर आता घरी नसणार, त्याच्यापण आणि तिच्यापण. वीर आता त्याची गाडी घेऊन कुठेतरी दूर भटकायला निघाला असेल, पुण्याला. अलिबागला. दमणला. दूर, कुठेतरी.

ऑफ़िसचा रस्ता ओलांडून ती मरीन ड्राईव्हपर्यंत चालत गेली. समुद्राचा खारा वारा तिचे केस उडवत होता. तिने ताबडतोब राजनला फोन लावला. त्याच्या कामाचा फोन बंद होता, पण तिच्याकडे त्याचा एक दुसरा नंबर पण होता.

“राजन, एक्स्क्लुझिव्ह दे” ती शांतपणे म्हणाली.

“ओह.. तुला समजलं तर...”

“तुझ्या बॉसने मीडीयाला रीलीज पाठवली, मग मला कसं नाही समजणार.” अतिशय कृत्रिम आवाजात ती म्हणाली.

“मी तुला फोन करणारच होतो, पण वीरने...”

“माहित आहे, तू मागच्या वेळी मला फोन करून या लग्नाबद्दल सांगितलं होतंस तेव्हा चिडला होता तो. पण आता मला काहीतरी खास बाईट दे. वीरने लग्नाची घोषणा रद्द का केली?”

“मुळात आजची प्रेस कॉन्फ़रन्स ही लग्नाच्या घोषणेसाठी नव्हतीच. मीडीयमधे हा एक प्रचंड मोठा गैरसमज पसरला आहे, त्याबद्दल वीर कपूर दिलगीर आहेत. धनुयारिणीसोबत वीर कपूर एक नवीन सिनेमा करत आहेत, त्याच्या मार्केटींगसाठी निर्मात्यांकडून या अफ़वा उठवण्यात आलेल्या आहेत. आजची प्रेस कॉन्फ़रन्सदेखील सिनेमाशी संबंधित होती, मात्र आमची नायिका धनुयारिणी हिच्या एका नातेवाईकाची तब्बेत अचानक बिघडल्याच्या अपरिहार्य कारणाने आजची ही प्रेस मीट रद्द करावी लागली. मीडीयमधे ज्या काही अफ़वा उठत आहेत, त्याबद्दल वीर कपूर आणि धनुयारिणी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, ते एकमेकांचे फ़क्त प्रोफ़ेशनल कलीग्ज आहेत” राजन क्षणभर थांबला.

पलिकडून साराचे काही उत्तर आलं नाही. “झालं माझं बोलून” राजन म्हणाला.

“साल्या, ही ऑफ़िशीयल कमेंट नेऊन खड्ड्यात घाल” सारा म्हणाली. राजन आणि सारा दोघे हसायला लागले.

“मी तरी काय करू? त्याने आयत्यावेळेला सर्व कॅन्सल केलं. रसिकामॅडमना तर आज सकाळपर्यंत माहित नव्हतं. समजलं तेव्हा असल्या चिडल्या त्याच्यावर.” राजन हसतच म्हणाला.

“वेडा आहे तो.” सारा अचानक गंभीर होत म्हणाली. “गेले दोन महिने त्या धनुबरोबर फ़िरत होता, आणि अचानक हा असा ब्रेकप... सवयच झालीये आता त्याला...”

“आय नो, सारा! त्याने असं करायला नको हवं होतं पण तूदेखील थोडं त्याला समजून घेतलं असतंस तर...”

“मला आता त्याबद्द्ल बोलायचं नाही. तीन वाजत आलेत, मला काहीतरी स्कूप दे. तुझी मघास़ची भिकारडी लाईन नकोय मला. प्रोफ़ेशनल कलीग वगैरे... आय नीड मोर दॅन दॅट!”

“सारा, यु आर इम्पॉसिबल. आपण तुझ्या होणार्‍या नवर्‍याबद्दल बोलतोय..” राजन अविश्वासाने म्हणाला.

“एक्स-होणारा नवरा. साखरपुडा ठरवून मग ज्याने मोडला असा नवरा. आणि माझ्यासाठी वीर कपूर सध्या फ़क्त माझी आजची बाय-लाईन आहे. त्याहून जास्त नाही. तुझ्याकडे देण्यासारखी इन्फ़र्मेशन असेल तर दे... नाहीतर मी दुसरे काही रीसोर्स वापरून बघते.” सारा शांतपणे एकेक शब्द उच्चारत म्हणाली.

“ओके, धनुयारिणी आणि वीर ज्या पिक्चरमधे एकत्र होते, “मर गये हम तुमपे” त्याची लीड हिरॉइन आज दुपारी बदलली.”

“येस्स्स्स्स” सारा पलिकडून म्हणाली.

“धनुयारिणी तमिळमधे खूप बिझी आहे, तिला हिंदीमधे डेट्स देता येत नाहीत.”

“राजन, यु आर द बेस्ट. चल, मी ठेवते फोन आता, धवन खुशीने उड्या मारेल हे ऐकून”

साराने फोन कट केला आणि ती लगेच ऑफ़िसमधे परत आली.

“अरे हे काय? एवढ्या लवकर परत!! वीरचं घर बांद्र्याला आहे ना?” नेत्रा लगेच तिच्याकडे बघत म्हणाली. वर्क एरियामधे चार पाच रिपोर्टर आले होते.

“ह्म्म...” सारा तिचा कम्प्युटर ऑन करत म्हणाली.

“अगं नुसतं काय? सांग ना...” नेत्रा तिचा हात धरत म्हणाली.

“नेत्रा...” सारा तिच्यावर ओरडली, “प्लीज कामामधे डिस्टर्ब करू नकोस.” नेत्रा वरमून लगेच खाली बसली. वर्क एरियामधले सगळेजण वळून दोघींकडे बघायला लागले.

साराने धवनला इंटर्कॉमवरून मिळालेली इन्फ़र्मेशन आणि स्टोरीचा ऍंगल सांगितला. धवन केबिनमधून बाहेर येऊन नाचण्याइतका खुश झाला होता.

साराने तासभर बसून कॉपी लिहिली. विषय मोठा ट्रीकी होता, प्रत्येक शब्द काळजीपूर्वक वापरायला हवा होता. देशमुख सरांनी कॉपी ओके केल्यावर तिने धवनला पाठवली. धवनकडून “बायलाईन” असा मेसेज आल्यावर तिने कम्प्युटर बंद केला आणि ती घरी जायला निघाली.

“इतनी जल्दी?” दमून भागून ऑफ़िसमधे आलेल्या रूचीने विचारलं.

“फ़्रंट पेज बायलाईन तो मिल गया. वो भी ऍंकरमे. और किसलीये गधा मजदूरी करनेका?” म्हणत सारा हसली.

वीर जेव्हा ही स्टोरी वाचेल तेव्हा केवढा वैतागेल आपल्यावर या विचाराने साराला हसू आलं.

तिची न्युज स्टोरी क्लीअर होती. वीरच्या या सिनेमाचा विषय नायिकाप्रधान होता. धनुच्या आधी कितीतरी नायिकांनी हा सिनेमा करण्याची इच्छा व्यक्त केली होती, पण जेव्हा ही भूमिका एका नवोदित तमिळ मुलीला मिळाली, तेव्हा सगळ्याजणी हिरमुसल्या होत्या. त्यापैकी... कुणीतरी.. कुणीतरीच वीर आणि धनुबद्दल या कंड्या पिकवल्या होत्या, मीडीयाला खोट्या बातम्या दिल्या होत्या आणि परिणामी, धनुच्या अतिकडक वडलांनी धनुला या सिनेमामधून बाहेर पडायला सांगितलं होतं. आपण लिहिलेला प्रत्येक शब्द खोटा आहे हे साराला चांगलंच माहित होतं. पण तरी उद्या बॉलीवूडमधे ही स्टोरी वणव्यासारखी पसरणार होती. ज्या कुण्या नायिकेला ही भूमिका मिळेल, तिच्याकडे सर्वांच्या संशयी नजरा वळाल्या असत्या.

वीर मुंबईकडे परत आला तेव्हा रात्रीचे दहा वाजून गेले होते. पुण्य़ापर्यंत जाऊन तो परत आला होता, वाटेत फ़ूड कोर्टमधे थोडंफ़ार खाल्लं होतं, पण आता भूक जास्त नव्हती. त्याच्या मोबाईलवर रसिकाचे तीन चार कॉल आले होते. राजनचा एक मेसेज आला होता.

“सारा कॉल्ड.”

पण त्याच्या मोबाईलवर साराचा एकही फोन नव्हता. तिला जरासुद्धा वाटलं नसेल, आपल्याला फोन करावंसं? पुन्हा एकदा त्याचा मनात प्रश्न येऊन गेला. ती विसरली आपल्याला? की आपण तिला विसरायचा प्रयत्न करतोय हेच त्याला समजेना.

त्याने साराच्या फ़्लॅटची बेल वाजवली, तरी दरवाजा उघडला नाही, त्याने त्याच्याकडच्या चावीने दरवाजा उघडला. सारा समोर अख्खी व्हीस्कीची बाटली ठेवून नशेत पडली होती. वीरला हेच होणार हे माहित होतं. “किती वेळा सांगितलंय, दारू पित जाऊ नको. तरी ऐकत नाही” पुन्हा एकदा वीर स्वत:शी बडबडला. “एवढं होतं तर एक फोन कॉल करायचा ना... मी आलो असतो...”

“सारा... सारा...” त्याने दोन तीनदा तिला हाक मारली.

साराकडून काहीच उत्तर आलं नाही, म्हणून त्याने तिला खुर्चीवरून उठवली आणि आत बेडवर नेऊन झोपवली. झोपवताना साराने हलकेच डोळे उघडले. “आय लव्ह यु, सारा” वीर तिच्या गालावर ओठ टेकवत तिच्या कानात म्हणाला.

“आय लव्ह यु साहिल!!!” सारा नशेमधे डोळे बंद करून बरळली.

(क्रमश:)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो. शूम्पी, ही जुन्या मायबोलीवर अर्धवट सोडलेली एक कथा आहे. या वेळेला बरीचशी नावे बदलली आहेत, शिवाय कथापण जशी पुढे सरकेल तशी बदलत जाईल. दहा किंवा बारा भागात कथा संपेल.

मस्त.. वाचतोय.. आतापर्यंत गुंतवणारे कथानक आणि पुढच्या भागाची उत्सुकता लावणारी लास्ट लाईन..!

ही पण रेहान-प्रिया कथाच होती ना?
हि जुन्या मायबोली वर आहे का रेहान या नावाने?
<<<< हो. पण आता कथानक बदलले आहे.

आयला.....शेवटी नवीन ट्वीस्ट.....मस्त मस्त येउदेत लवकर पुढचा भाग

चिमुरे. यात आधी पण प्रिया नव्हती, सारा व्ही के हीच नायिका होती आणि वीर कपूर हीरो!

रेहान नाव ठेवलं असतं पण सगळे म्हणतात फार घोळ होतो, Sad म्हणून यावेळेला साहिल नाव ठेवलंय.

रेहान नक्क्क्क्क्क्क्क्क्क्क्को! घोळ वगैरे नाही होत पण य वर्षे वाट पहावी लागते - (समाप्त) वाचण्यासाठी. Happy

ओक्के नंदिनी... जमल्यास जुन्या माबोवरची लिंक देशील का प्लीज? अन ती सिझोफ्रेनिया वगैरे असतो कोणाला तरी ती कथा कोणती?

सॉरी फॉर अवांतर

अन ती सिझोफ्रेनिया वगैरे असतो कोणाला तरी ती कथा कोणती?
>> तीच ही कथा. पण आता कथानक बदलले आहे. आधीच्या कथानकामधे आणि यामधे फारसे साम्य राहणार नाही. आता कुणालाही स्किझोफ्रेनिया नाहीये. (पण वीरला एकट्याने बडबडायची सवय आहे!!)

भानुप्रिया, सांगता येणार नाही. एकदा लिहायला जमलं, काही कारणं आडवी आली नाहीत तर महिन्याभरात सुद्धा होइल. मोरपिसेचे शेवटचे भाग पंधरा दिवसांत प्रकाशित झाले होते. तसेच, इथेही होइल अशी अपेक्षा ठेवू.

नविन लेखना बद्दल अभिनंदन...

या कथेचे सुद्धा १४-१५ भाग असतील अशी अपेक्शा आहे.

http://www.maayboli.com/node/39455

इथे असलेली रेहान कथा अर्धवट आहे का?

पुलेशु

http://www.maayboli.com/node/39455

इथे असलेली रेहान कथा अर्धवट आहे का?
>>>>>>>>>>> नाही. दुसरा भाग आहे ना तिचा.. प्रतिसादात चेक करा, लिंक असावी तिथे

Pages