समुद्रकिनारा (भाग ३)
आश्रमापाठीमागच्या बागेमधे मी अभ्यास करत बसले होते. कुण्या पाटणकर नावाच्या माणसाची ही आंब्याची बाग होती. ऑक्टोबर महिना चालू होता. नुकताच पावसाळा संपल्याच्या हिरव्याशार खुणा अजून सगळीकडे पसरल्या होत्या. रविवारचा दिवस होता. माझी बीजगणिताशी थोडी खटपट चालू होती. साईन कॉस वगैरे जरा जास्तच त्वेषात लढत होते. वर्गात अजून शिकवलं नव्हतं. पण सर शिकवेपर्यन्त थांबण्यापेक्षा आपलं आपण समजून घेता आलं तर बरं कारण गणित हा माझा नंबर एकचा शत्रू होता. भाषा इतिहास भूगोल कधी समजायला अडचण यायची नाही, पण गणित विद्न्यान हे मात्र गेल्या जन्माचे वैरी होते माझ्या.