धुवांधार पावसातल्या लोभस घाटवाटा – मढे अन् उपांड्या घाट
...एके दिवशी तापलेल्या मातीवर धुळीची वावटळं उमटू लागतात, पाचोळा सैरभैर उडू लागतो, काळ्या ढगांचा काळोख दाटून येतो, विजांचं तांडव सुरू होतं, मृदगंध दरवळू लागतो, अन् वळवाच्या पावसाचे टप्पोरे थेंब पडू लागतात
– टप्प-टप्प-टप्प... ताड-ताड-ताड... धों-धों-धों...
आधी पोळणा-या उन्हांमुळे आणि आता धों-धों पावसामुळे, सह्याद्रीतल्या अनवट घाटवाटांचे ट्रेक्स करणं अवघड होऊन बसलेले.. आखडलेले पाय, धूळ खात बसलेली ट्रेकची पाठपिशवी अन् रोजच्या रूटीनमुळे आलेला अशक्य कंटाळा!!!
अरे अरे, इतकं काही वैतागायची गरज नाहीये.. खास धुवांधार पावसातही हुंदडायला उत्तम, अश्या घाटवाटा आहेत की. चला तर मग आपल्या राजगड-तोरणा किल्ल्यांजवळच्या ‘मढेघाट’ अन् ‘उपांड्या’ या घाटवाटांच्या भटकंतीला...
मढे अन् उपांड्या घाटवाटांना भेट द्यायची असेल, तर स्वतःचं वाहन सोबत असलेलं सोयीस्कर पडेल. पुण्यापासून नसरापूर/ पानशेत/ पाबे घाट अश्या कुठल्याही मार्गे ‘वेल्हे’ गाव गाठायचं. ‘इस्पेशल चाय’चे घोट घेत गावापाठीमागे ढगात हरवलेल्या दुर्ग तोरण्याचा अंदाज घ्यायचा. पुढे ‘केळद’ गावचा गाडीरस्ता तोरण्याला प्रदक्षिणा घालत संथ निवांत वळणं घेतो. उजवीकडे गुंजवणी धरणाजवळ भू-आमरीच्या नाजूक गालिच्याचं कवतिक न्याहाळायचं.
उभ्या चढाचा झाडीभरल्या खिंडीतला रस्ता चढला की, जाधववाडीच्या धारेवर भर्राट वारा गारठवून टाकतो. पुढे पासली गावापासून सरळ गेल्यावर, छोटा घाट चढून गाडी केळद गावी पोहोचते. पाठपिशवीत पाणी-फळं-खाऊ असा सकस आहार, पायात उत्तम पकड देणारे बूट आणि अंगात पावसाळी जर्किन असा अवतार घेऊन, आपण कुडकुडतंच कारच्या उबेतनं बाहेर पडतो. आणि, सुरुवात होते आपल्या पावसाळ्यातल्या घाटवाटांच्या ट्रेकची!!! (गावात गाईड अन् जेवणाची व्यवस्था होवू शकेल.)
(प्र.चि. साभार - अभिजीत देसले)
केळद गावाबाहेर वेळवन नदीवरचा पूल ओलांडून मढेघाटाकडे मोकळ्या-ढाकळ्या रस्त्यानं निघायचं. पाऊस आता ताडताड-ताडताड कोसळू लागला असतो. खरंच एवढ्या पावसात ट्रेक करायचांय का, हा विचार सतरा वेळा डोक्यातून काढून टाकायचा.
(प्र.चि. साभार - अभिजीत देसले)
मढे घाटापाशी आसमंत दाट धुकटात हरवून गेला असतो. खळाळणा-या ओढ्यातून पलीकडे आलो, की आपण सह्याद्रीच्या धारेजवळ आलेलो असतो.
एका पाठोपाठ एक असे ढगांचे लोट सह्याद्रीच्या कातळमाथ्यांना धडकत राहतात. कोण्या एका मोठ्ठ्या धबधब्याचा ध्रोन्कार घुमू लागला असतो. पण ‘लक्ष्मी’ नावाचा हा धबधबा अजून तरी दिसला नसतो.
अन् मग अवचितंच आलेल्या वा-यामुळे ढगांची दुलई दूर सारून मढे घाटाची झाडीभरली घळ अन् धबधब्याचं सुरेख दर्शन होतं.
निसर्गाच्या या स्वच्छंद रूपाचं जवळून दर्शन घेण्याचा मोह आवरत नाही. धबधब्यापाशी जायचं, अर्थातंच व्यवस्थित काळजी घेऊन. पावसाचे बाण अन् पाण्याचे तुषार मुक्त उधळले असतात. मुक्तपणे कित्येक फूट खोल हिरव्याकंच दरीत झोकून देणा-या पाण्याचा मनस्वी हेवा वाटतो.
(प्र.चि. साभार - अभिजीत देसले)
...मढे घाटात पावसाळी पर्यटनाच्या नावावर चालू झालेली बेताल पर्यटकांची जत्रा, तळीरामांचा स्वैराचार अन् दारूच्या बाटल्यांचा खच मात्र अतिशय अस्वस्थ करून जातो...
...पुन्हा एकदा ढग दाटून येतात, पुन्हा एकदा धबधब्याचा फक्त दणदण आवाज आसमंतात भरून राहतो...
लक्ष्मी धबधब्याचं पठार अन् पल्याडचा कातळमाथा यांच्यामधल्या घळीतून मढे घाटवाटेची सुरुवात आहे. ढग दाटले असले, तरी दगडां-धोंड्यांवरून अन् झाडा-झुडुपांमधून उतरणारी प्रशस्त वाट शोधणं अगदी सोप्पं आहे.
कुठे एखाद्या खडकावर इवलुश्या मातीच्या आधारानं उमलेली रानफुलं पाण्यात निथळत गारठून गपचीप थरथरत असतात. त्याच्यावरचा पाण्याचा थेंब उडवला, की लगबगीनं दुसरा थेंब जमा होतो.
मढेघाटाची वाट धबधब्याशेजारून असली, तरी ती दाट कारवीच्या दाटीतून धुक्यातून वाट उभी उतरत जाते.
माथ्यापासून निघाल्यापासून १०० मी उतार उतरला, की लक्ष्मी धबधब्याचं रौद्र रूप सामोरं येतं. दणदण आदळणा-या पाण्याचा आवाज, भोवतीचा गर्द दाट रानवा, पावसाच्या सरीसोबत धाडधाड वाढणारं पाणी, अंगात हुडहुडी भरवणारी थंडी - असा जबरदस्त माहोल!
इथून रानातून अजून १०० मी उतरल्यावर सपाटीवर – सह्याद्रीच्या पदरात पोहोचते. पाऊस क्षणभर उणावतो, अन् पाठीमागे वळून पाहिलं, तर गाढवकडा – मढेघाट – लक्ष्मी धबधबा - उपांड्या घाट सह्याद्रीच्या मुख्य रांगेतून उठून दिसत असतात. नितांत सुंदर नजारा!!
गाढवकड्याचा देखणा पहाड अन् त्याच्या आतल्या बाजूस दडलेला अजस्र्त केळेश्वर धबधबा जाणवतो.
आणि समोरंच मढेघाटाचा देखणा धबधबा अविरत कोसळताना दिसतो.
मढे अन् उपांड्या या दोघी सख्या घाटवाटा सह्याद्रीच्या घाटमाथ्यापासून निघतात तर मोठ्ठ्या तोऱ्यात स्वतंत्रपणे. पण वेगळं जाणं त्यांना फार काही जमत नाही. जेमतेम २०० मी उतरल्यावर सह्याद्रीच्या पदरात एकमेकींना बिलगतात, अन् ‘कर्णवडी’ गावात भेटतात. मढेघाटानं उतरल्यावर सपाटी लागली की पूर्वेकडे पदरातल्या बैलगाडीवाटेनं आडवं जायचं. वाटेतला मातकट ओढा पार करायचा..
मग लक्षात येतं, अरेच्चा हा तर आहे मढेघाटात भेटलेल्या धबधब्याचाच ओढा आहे..
चिखलाळलेली बैलगाडी वाट १५-२० मिनिटं तुडवली, की शेतातली दो-चार घरं लागतात. (टीप: इथून पुढे भटकंतीचा अजून एक पर्याय म्हणजे याच वाटेनं सरळ ‘कर्णवडी’ गावातून उतरून ‘रानवडी’ गाव गाठायचं. अन् डांबरी रस्त्यानं ८-१० किलोमीटरवर शिवथरघळ गाठायची.) भात-लावणीच्या दिवसात गावकरी शेतात विखुरले असतात, त्यामुळे उपांड्या घाटाची नेमकी वाट सांगायला कोणी भेटायची शक्यता कमी. त्यामुळे डावीकडे थंडगार विहीर ही आपली खुणेची जागा.
जवळपासच्या एखाद्या घरांचा आडोसा बघून दोन घास खाऊन घ्यायचे. पावसाची रानटी सर रानात कोसळत राहते. थोडं उणावलं की दूरवरच्या गाढवकड्यापासून मढे घाट अन् पुढे उपांड्या घाट, असा परत सह्याद्रीचा नजारा डोळ्यासमोर येतो...
ढगांचे लोट सह्याद्रीच्या भिंतीला धडका देऊ लागतात..
सह्याद्रीच्या भिंतीच्या वर जाण्यासाठी उपांड्या घाटाची वाट डावीकडच्या बेचक्यातून वर काढली आहे. पाईपशेजारून वाट उभी झपझप चढू लागते.
अवघ्या पाऊण तासात उपांड्या घाट चढून आपण सह्याद्रीमाथ्यावर पोहोचतो. परतीचा प्रवास सुरू झाला, तरी पावसाळ्यातल्या सह्याद्रीच्या घाटवाटांची दृश्यं डोळ्यांसमोरून हलत नसतात...
थेंब थेंब मोती ओला थरारत्या तनावर
शहार्यांचे रान आले एका एका पानावर
आले जल गेले जल झाले जल आरपार
राकट देशा , कणखर देशा , दगडांच्या देशा
नाजुक देशा , कोमल देशा , फुलांच्याहि देशा
समर्थ रामदास स्वामींनी केलेल्या शिवथर घळीच्या वर्णनातल्या ओळी आठवाव्यात, असे एकसे बढकर एक धबधबे: "गीरीचे मस्तकी गंगा । तेथुनि चालिली बळे । धबाबा लोटती धारा । धबाबा तोय आदळे.."
जाईन विचारित रानफुला ...
(प्र.चि. साभार - अभिजीत देसले)
ये रे घना, ये रे घना, न्हाउ घाल माझ्या मना
नभं उतरू आलं, चिंब थरथर वलं, अंग झिम्माड झालं हिरव्या बहरात
धरती आभाळाची चाकं, त्याच्या दुनवेची हो गाडी
सुर्व्या-चंदराची हो जोडी, त्याच्या सर्गाची रं माडी माझ्या राजा रं
आमच्या मावळात ‘घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा’ अश्या वर्षाधारा एका मागोमाग एक कोसळत राहतात...
धुवांधार पावसातल्या लोभस घाटवाटांचा असा सुंदर ट्रेक केल्यानंतरही ट्रेकची धम्माल बाकी असते.. केळदमध्ये भेटतात जुने-नवे दर्दी आणि तज्ज्ञ ट्रेकर मित्र.. मायबोलीच्या सह्यमेळाव्यामुळे हा बोनस मिळाला असतो... सह्याद्रीतल्या थोडक्या क्षणांच्या भेटींनीही जुळणारे ऋणानुबंध आपल्या संगे कायम राहतात..
लेख आणि फोटो दोन्ही छान!
लेख आणि फोटो दोन्ही छान!
मढे घाटात पावसाळी पर्यटनाच्या
मढे घाटात पावसाळी पर्यटनाच्या नावावर चालू झालेली बेताल पर्यटकांची जत्रा, तळीरामांचा स्वैराचार अन् दारूच्या बाटल्यांचा खच मात्र अतिशय अस्वस्थ करून जातो.>>>+१
जबरा लेख आणि तोडु प्रचि
मढे - शेवत्या एका दिवशी आणि
मढे - शेवत्या एका दिवशी आणि उपांढ्या - गोप्या दुसऱ्या दिवशी मारता येईल…
अप्रतिम!!
अप्रतिम!!
फोटो आणि वर्णन दोन्ही हि
फोटो आणि वर्णन दोन्ही हि मस्तच!!!
अतिशय सुंदर प्रचिं साठी
अतिशय सुंदर प्रचिं साठी धन्यवाद!....तातडीनं 'निवडक १०' मध्ये नोंद केली आहे!
भाऊ
भाऊ नमसकर
यो
वत्सला
Chaitrali
भारती..
झकासराव
कांदापोहे
पवन
saakshi
मार्को पोलो
पुरंदरे शशांक
प्र-साद
रावी
बंकापुरे
स्वाती२
ईनमीन तीन
मो
दिपक डि
दैत्य
_/\_ मंडळी!!! खूप खूप छान वाटलं तुमच्या प्रतिक्रिया वाचून! प्रत्येकाला स्वतंत्र उत्तर देत नाहीये, म्हणून क्षमस्व...
सह्याद्री घाटवाटांच्या दर्दी चाहत्यांनी, पावसाची पर्वा न करता भटकंतीचे बेत आखावेत, असा छुपा डाव आहे
मस्त फोटो, डोळ्याचे पारणे
मस्त फोटो, डोळ्याचे पारणे फिटले.
मस्त .... झकास .... ल य भारी
मस्त .... झकास .... ल य भारी ...
फार छान
फार छान
जबरीच वर्णन आणि फोटोस
जबरीच वर्णन आणि फोटोस
सुंदर.
सुंदर.
जबरदस्त!!!!!!!!
जबरदस्त!!!!!!!!
भारीच आहेत सर्व प्रचि आणि
भारीच आहेत सर्व प्रचि आणि वर्णन !
आम्ही मागच्या वर्षीच्या पावसाळ्यात गेलो होतो, अजुन तरी या भागाचा सिंहगड झालेला नाहीये.
निवडक दहात!!!! अ प्र ति
निवडक दहात!!!!
अ प्र ति म!!!!!
फोटो, वर्णन, पाऊसगाणी सगळंच भन्नाट. >.१००
क्या बात है यार.... इथे हे
क्या बात है यार.... इथे हे सगळे दिल्याबद्दल धन्यवाद.
प्रचि आणि वर्णन अप्रतिम
प्रचि आणि वर्णन अप्रतिम
लेख आणि फोटो दोन्ही सुन्दर.
लेख आणि फोटो दोन्ही सुन्दर.
हे कसे मिसले
हे कसे मिसले मी....................
अप्रतिम फोटो आणि छान पाऊसगाणी. मस्त एकदम हिरवेगार वाटले फोटो पाहून.
अर्रे! काय कहर आहे हा! अशक्य
अर्रे! काय कहर आहे हा!
अशक्य भार्री फोटो आणि वर्णनही !
लेखकाचा आयडी पण भारी आहे
लेखकाचा आयडी पण भारी आहे
Pages